अभंग क्र.५३२
काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ।।१।।
जया न फऴे उपदेश । धस ऐसें तया नांव ।।२।।
काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ।।३।।
तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा डेंग हा ।।४।।
*अर्थ:-*
वारा आला म्हणजे झाडे लावत नसतात काय ? पण उद्धट मनुष्याला 'संतांपुढे लव' म्हटले तर तो लवायचा नाही. वेडा मनुष्य देहभाव विसरत नाही काय ? पण अत्यंत देहासक्ताला 'देहभाव विसर' म्हटले तर तो विसरायचा नाही.।।१।।
ज्याचे ठिकाणी कोणताही उपदेश फलद्रूप होत नाही, त्याला अविचारी व धसकट म्हणावे.।।२।।
एखादा दगड काही न बोलता स्तब्ध असत नाही काय ? पण एखाद्या वाचाळाला 'काही न बोलता थोडा वेळ तरी स्तब्ध रहा' म्हटले तर तो बोलल्याशिवाय रहायचा नाही.।।३।।
*गुरुमाउली श्रीतुकाराममहाराज* म्हणतात, असे पहा की,एखादा कुच्चर दाणा जात्यात भरडला तरी भरडला जात नाही आणि शिजविला तरी शिजला जात नाही, किंवा डिर्या कापून घेतल्यानंतर जो बुडाचा डेंग राहतो त्यास कितीही पाणी घातले तरी त्याला पुन: डिरी फुटत नाही. त्याप्रमाणे अविचारी माणसावर उपदेशाचा काहीही परिणाम होत नाही.।।४।।
*॥ रामकृष्णहरि ॥*