अभंग ५३६ मागे संतीं होतें जें जें सांगितलें

अभंग .५३६
मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ।।१।।
आचारभ्रष्ट होती लोक कलीं । पुण्य क्षीण बळी जालें जाप ।।२।।
वर्णधर्म कोणी न धरी विटाऴ । घालिती गोंधऴ एके ठायीं ।।३।।
वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ।।४।।
तुका म्हणे किती करावें फजित । तेचि छंद नित्य बहु होती ।।५।।

*अर्थ:-*
पूर्वीच्या काऴात व्यासादिक संतांनी जे जे कलियुगाचे भविष्य सांगितले ते सर्व आता प्रत्यक्ष दिसू लागले आहे.।।१।।
या कलियुगात लोक आचारभ्रष्ट होत आहेत. पुण्य दुर्बल आणि पाप मात्र प्रबल झाले आहे.।।२।।
वर्णाश्रमधर्माचे पालन कोणीही करीत नाही.अस्पृश्यांचा कोणी विटाळ धरीत नाही. अठरा जाती एका ठिकाणी बसून खान-पानांचा गोंधऴ घालीत आहेत.।।३।।
वेदपठण करण्याचा ज्यांना अधिकार आहे असे ब्राह्मण देखील दारू पिऊ लागले आहेत. गम्य-अगम्य, भक्ष्य-अभक्ष्य, पेय-अपेय, स्पृश्य-अस्पृश्य या विषयांत भेद पाहत नाहीत,आणि क्षुद्र विषयांकरिता भांडखोर झाले आहेत.।।४।।
तुकाराम महाराज म्हणतात, अशा आचारभ्रष्टांना किती तरी फजित करावे.त्यांची कितीही फजिती केली तरी त्यांचे अनाचारांचे हट्ट निरंतर आणि पुष्कळच चालू असतात.।।५।।