अभंग ५३५ तेज्या इशारती । तट्टा फोकावरी घेती ।

अभंग ५३५ : तेज्या इशारती । तट्टा फोकावरी घेती ।।१।।
काय सांगावें त्याहुनी । ऐकारे धरा मनीं ।।२।।
नव्हे भांडखोर । धरूं ओढुनि पदर ।।३।।
तुका म्हणे तोंड । काऴें करा खालीं मुंड ।।४।।


*अर्थ:-* अतिचपऴ असलेल्या जातिमान घोड्याला स्वाराने नुसता इशारा करताच तो दौडत सुटतो पण मठ्ठ जे तट्टू असतात ते आपल्या अंगावर पुष्कऴच फोक मारून घेतात तरी पण एक पाय सुद्धा उचलीत नाहीत.।।१।।
काय तुम्हाला सांगावे ? तुम्ही या मठ्ठ तट्टाहूनही मठ्ठ आहात. मी जो परमार्थ सांगतो तो थोडा तरी ऐका आणि ऐकून मनात ठेवा.।।२।।
मी काही भांडखोर नाही. तुमचा पदर ओढून धरावा आणि तुमच्याशी भांडत रहावे, अशी माझी इच्छा नाही. मी तुम्हाला तुमचे हित सांगत आहे.।।३।।
तुकाराम महाराज म्हणतात, माझे जर तुम्हाला ऐकावयाचे नसेल तर खाली मान घालून येथून काऴे तोंड करा. चालते व्हा. पुन्हा मला तोंड दाखवू नका.।।४।।