अभंग ४०५ क्याला मज आयो वारितेसी घरा

अभंग ४०५ क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥१॥ बहु दिसीं जाली यासीं मज भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥ध्रु.॥ कोवळें बोलतो मना आवरतें । डोळियाचें पातें ढापवेना ॥२॥ आजि सकळांसी आलें चोलुनियां । कां गो पाठी वांयां पुलविली ॥३॥ तुमचें तें काय खोळंबलें काज । बल्या कां गो मज कोंडा घरीं ॥४॥ तुकयाचा धनी गोकुळनायक । सरा कांहीं एक बोलतों मी ॥५॥ अर्थ :- एक बालिश स्वभावाची गौळण आईला बोबड्या भाषेत म्हणते, आईं, 'घरी जा' असे का म्हणतेस ? नंदाचा बाळ आणि मी सुखाने खेळत आहोत, तर मला खेळूदे ना ।।1।। त्याची माझी खुप दिवसानंतर भेट झाली आहे. आता त्याचा वियोग होवू नये असे वाटते ।।ध्रु।। त्याचे गोड बोलने मला खुप आवड़ते. त्याच्याकडे पाहत असताना डोळ्याची पापनि झाकाविशी वाटत नाही ।।2।। मी आज सकाळी सर्वांच्या नकळत आले आहे. तुम्ही उगाच का माझ्या माघे लागता? ।।3।। येथे तुमचे कोणते काम खोळंबले आहे? तुम्ही शहान्या सवरत्या असून मला घरात का कोंडून ठेवता ? ।।4।। तुकाराम महाराज म्हणतात, तुक्याचा स्वामी वैकुंठनायक यांच्याशी मी गुजगोष्टी करत आहे. सारेजन बाजूला वहा बरे ! ।।5।।