2701 " माझे तों स्वभाव मज अनावर । तुज ही देतां भार कांहीं नव्हे ॥१॥ ऐसें कळों आलें मज नारायणा । जागृती स्वपना ताळ नाहीं ॥ध्रु.॥ संपादितों तो अवघा बाहए रंग । तुझा नाहीं संग अभ्यंतरीं ॥२॥ तुका म्हणे सत्या नाहीं पाठी पोट । असतें निघोंट एकी जाती ॥३॥
2702 " माझे पाय तुझी डोईं । ऐसें करिं गा भाक देई ॥१॥ पाहतां तंव उफराटें । घडे तईं भाग्य मोठें ॥ध्रु.॥ बहु साधन मोलाच । यासी जोडा दुजें कैचें ॥२॥ नका अनमानूं विठ्ठला । तुका म्हणे धडा जाला ॥३॥
2703 " माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥१॥ आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥ वाचा वदे परी करणें कठीण । इंद्रियां अधीन जालों देवा ॥२॥ तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥३॥
2704 " माझे मनोरथ पावले सिद्धी । तई पायीं बुद्धि स्थिरावली ॥१॥ समाधान जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरण हें ॥ध्रु.॥ त्रिविध तापाचें जालेंसे दहन । सुखावलें मन प्रेमसुखें ॥२॥ महालाभ वाचे वसे पांडुरंग । अंगोअंगीं संग अखंडित ॥३॥ जीवनाचा जाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरीं सामावलें ॥४॥ तुका म्हणे माप भरी आलें सिगे । धारबोळ गंगे पूर वाहे ॥५॥
2705 " माझे माथां तुझा हात । तुझे पायीं माझें चित्त ॥१॥ ऐसी पडियेली गांठी । शरीरसंबंधाची मिठी ॥ध्रु.॥ येरयेरांपाशीं । सांपडोन गेलों ऐसीं ॥२॥ तुका म्हणे सेवा । माझी कृपा तुझी देवा ॥३॥
2706 " माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥१॥ गोष्टी न करी नांव नेघें । गेलों दोघें खंडोनी ॥ध्रु.॥ स्तुतिसमवेत निंदा । केला धंदा उदंड ॥२॥ तुका म्हणे निवांत ठेलों । वेचित आलों जीवित्व ॥३॥
2707 " माझे विषयीं तुज पडतां विसर । नको धरूं दूर पांडुरंगा ॥१॥ तुझा म्हणवितों हे चि लाज तुला । आतां झणी मला विसरेसी ॥२॥ तुका म्हणे तुझी माझी नाहीं उरी । आतां केली खरी देवराया ॥३॥
2708 " माझे हातीं आहे करावें चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम द्यावें ॥१॥ मागति यां भांडवल आळवण । नामाची जतन दातियासी ॥ध्रु.॥ बाळक धांवोनि आड निघे स्तनीं । घालावा जननी कृपे पान्हां ॥२॥ तुका म्हणे करीं कासवाचे परी । आहे सूत्रदोरी तुझे हातीं ॥३॥
2709 " माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥१॥ तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥ दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥२॥ तुका म्हणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥३॥
2710 " माझें कोण आहे तुजविण देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥ वाट पाहतसें कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ साच करीं हरी आपुली ब्रिदावळी । कृपेनें सांभाळीं महाराजा ॥२॥ क्षमा करीं सर्व अपराध माझा । लडिवाळ मी तुझा पांडुरंगा ॥३॥ साह्य होसी तरी जाती साही वैरी । मग सुखें अंतरीं ध्यान तुझें ॥४॥ कृपा करोनि देई दया क्षमा शांती । तेणें तुझी भक्ति लाभईंल ॥५॥ माझें हें सामर्थ्य नव्हे नारायणा । जरी कांहीं करुणा येइल तुज ॥६॥ तुका म्हणे मज कैसें आपंगा जी । आपुलेंसें करा जी पांडुरंगा ॥७॥
2711 " माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥१॥ चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ध्रु.॥ चोर कुठोरि एके चि ठायीं । वेगळें पाहावें नलगेच कांहीं ॥२॥ आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें तयामधीं मेळविलें ॥३॥ आपल्या आपण शोधिलें तींहीं । करीन मी ही ते चि परी ॥४॥ तुका म्हणे माझें हित चि जालें । फाटकें जाउन धडकें चि आलें ॥५॥
2712 " माझें चित्त तुझे पायीं । राहें ऐसें करीं कांहीं । धरोनियां बाहीं । भव तारीं दातारा ॥१॥ चतुरा तूं शिरोमणि । गुणलावण्याची खाणी । मुगुट सकळां मणि । तूं चि धन्य विठोबा ॥ध्रु.॥ करीं त्रिमिराचा नाश । दीप होउनि प्रकाश । तोडीं आशापाश । करीं वास हृदयीं ॥२॥ पाहें गुंतलों नेणतां । तुज असो माझी चिंता । तुका ठेवी माथा । पायीं आतां राखावें ॥३॥
2713 " माझें जड भारी । आतां अवघें तुम्हांवरी ॥१॥ जालों अंकित अंकिला । तुमच्या मुकलों मागिला ॥ध्रु.॥ करितों जें काम। माझी सेवा तुझें नाम ॥२॥ तुका पायां लागे । कांहीं नेदी ना न मगे ॥३॥
2714 " माझें जीवन तुझे पाय । कृपाळुं तूं माझी माय ॥१॥ नेदीं दिसों किविलवाणें । पांडुरंगा तुझें तान्हें ॥ध्रु.॥ जन्ममरण तुजसाटीं । आणीक नेणें दुजी गोष्टी ॥२॥ तुका म्हणे तुजविण । कोण हरिल माझा सीण ॥३॥
2715 " माझें परिसावें गार्हाणें । चत्ति द्यावें नारायणें ॥१॥ माझे हृदयींचें वर्म । देवा जाणशी तूं कर्म ॥ध्रु.॥ सबाह्यअंतरसाक्ष । ऐसा वेदीं केला पक्ष ॥२॥ तुका म्हणे नेणां । काय सांगों नारायणा ॥३॥
2716 " माझें मज आतां न देखें निरसतां । म्हणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक । जीव भाव तुज दिला । नव्हतीं माझीं कोणी मी कवणांचा । अर्थ मोहो सांडवला । तारीं मारीं करीं भलतें दातारा । होऊन तुझा आतां ठेलों रे ॥१॥ असो माझें कोडें तुज हे सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप । बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरीं मायबाप ॥ध्रु.॥ पापपुण्यें श्रुति आटिल्या । शास्त्रांस न लगे चि ठाव । विधिनिषिधें गोविलीं पुराणें वेदांसी तो अहंभाव । ओंकाराचें मूळ व्यापिलें माया । तेथें न धरे च भाव । म्हणऊन काबाड सांडिलें उपसतां । धरिलें तुझें चि नांव ॥२॥ तनमनइंद्रियें ठेवूनि राहिलों । सर्व आशा तुझे पायीं । तप तीर्थ दान करवूं कवणा । हातीं अधीन तें मज काईं । आहिक्यें परत्रें चाड नाहीं सर्वथा । जन्म सदा मज देहीं । मायामोहपाश करीं विष तैसें । तुका म्हणे माझ्याठायीं ॥३॥
2717 " माझें मज द्यावें । नाहीं करवीत नवें ॥१॥ सहस्रनामाचें रूपडें । भक्त कैवारी चोखडें ॥ध्रु.॥ साक्षीविण बोलें । तरी मज पाहिजे दंडिलें ॥२॥ तुका म्हणे माल । माझा खरा तो विठ्ठल ॥३॥
2718 " माझें मन पाहे कसून । परि चित्त न ढळे तुजपासून ॥१॥ कापुनि देइन शिर । पाहा कृपण कीं उदार ॥ध्रु.॥ मजवरि घालीं घण । परि मी न सोडीं चरण ॥२॥ तुका म्हणे अंतीं । तुजवांचूनि नाहीं गति ॥३॥
2719 " माझें मागणें तें किती । दाता लक्ष्मीचा पति ॥१॥ तान्हेल्यानें पीतां पाणी । तेणें गंगा नव्हे उणी ॥ध्रु.॥ कल्पतरु जाला देता । तेथें पोटाचा मागता ॥२॥ तुका म्हणे संतां ध्यातां । परब्रम्ह आलें हाता ॥३॥
2720 " माझें माझ्या हाता आलें । आतां भलें सकळ ॥१॥ काशासाटीं विषम थारा । तो अंतरा विटाळ ॥ध्रु.॥ जालीं तया दुःखें तुटी । मागिल पोटीं नसावें ॥२॥ तुका म्हणे शुद्धकुळ । तेथें मळ काशाचा ॥३॥
2721 " माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥१॥ अबद्ध चांगलें गाऊं भलतैसें । कळलें हें जैसें मायबापा ॥२॥ तुका म्हणे मज न लगे वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥३॥
2722 " माझ्या इंद्रियांसीं लागलें भांडण । म्हणतील कान रसना धाली ॥१॥ करिती तळमळ हस्त पाद भाळ । नेत्रांसी दुकाळ पडिला थोर ॥ध्रु.॥ गुण गाय मुख आइकती कान । आमचें कारण तैसें नव्हे ॥२॥ दरुषणें फिटे सकळांचा पांग । जेथें ज्याचा भाग घेइल तें ॥३॥ तुका म्हणे ऐसें करीं नारायणा । माझी ही वासना ऐसी आहे ॥४॥
2723 " माझ्या कपाळाच्या गुणें । किंवा सरलेंसे नेणें ॥१॥ नये वचन बाहेरी । उभें तिष्ठतसें दारीं ॥ध्रु.॥ काय सांगायास वेचे । रींद आरंभीं ठायींचे ॥२॥ तुका म्हणे किती । भीड धरावी पुढती ॥३॥
2724 " माझ्या बापें मज दिधलें भातुकें । म्हणोनि कवतुकें क्रीडा करीं ॥१॥ केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें ज्ञान आलें त्याचें ॥ध्रु.॥ घेऊनि विभाग जावें लवलाहा । आलेति या ठाया आपुलिया ॥२॥ तुका ज्ञानदेवीं समुदाय । करावा मी पाय येइन वंदूं ॥३॥
2725 " माझ्या भावें केली जोडी । न सरेसी कल्पकोडी । आणियेलें धाडी । घालुनि अवघें वैकुंठ ॥१॥ आतां न लगे यावें जावें । कोठें कांहीं च करावें । जन्मोजन्मीं खावें । सुखें बैसोनसें जालें ॥ध्रु.॥ असंख्य संख्या नाहीं पार । आनंदें दाटलें अंबर । न माये अपार । त्रिभुवनीं सांटवितां ॥२॥ अवघें भरलें सदोदित । जाले सुखाचे पर्वत । तुकयाबंधु म्हणे परमार्थ । धन अद्भुत सांपडलें ॥३॥
2726 " माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळां॥१॥ आणीक नाही चाड । न लगे संसार हा गोड ॥ध्रु.॥ तरि च फळ जन्मा आलों । सरता पांडुरंगीं जालों ॥२॥ तुका म्हणे देवा । देई चरणांची सेवा ॥३॥
2727 " माझ्या मुखें मज बोलवितो हरि । सकळां अंतरीं नारायण ॥१॥ न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तंव विचार जाणों आम्ही ॥२॥ तुका म्हणे दोष नाहीं या विचारें । हिताचीं उत्तरें शिकवितां ॥३॥
2728 " माता कापी गळा । तेथें कोण राखी बाळा ॥१॥ हें कां नेणां नारायणा । मज चाळवितां दिना ॥ध्रु.॥ नागवी धावणें । तेथें साह्य व्हावें कोणें ॥२॥ राजा सर्व हरी । तेथें दुजा कोण वारी ॥३॥ तुझ्या केल्याविण । नव्हे स्थिर वश जन ॥४॥ तुका म्हणे हरी । सूत्र तुम्हां हातीं दोरी ॥५॥
2729 " माते लेकरांत भिन्न । नाहीं उत्तरांचा सीन ॥१॥ धाडींधाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥ करुनि नवल । याचे बोलिलों ते बोल ॥२॥ तुका म्हणे माते । पांडुरंगे कृपावंते ॥३॥
2730 " मातेचिये चित्ती । अवघी बाळकाची व्याप्ति ॥१॥ देह विसरे आपुला । जवळीं घेतां सीण गेला ॥ध्रु.॥ दावी प्रेमभातें । आणि अंगावरि चढतें ॥२॥ तुका संतापुढें । पायीं झोंबे लाडें कोडें ॥३॥
2731 " मातेची अवस्था काय जाणे बाळ । तिसी तों सकळ चिंता त्याची ॥१॥ ऐसें परस्परें आहे चि विचारा । भोपळ्याचा तारा दगडासी ॥ध्रु.॥ भुजंग पोटाळी चंदनाचें अंग । निवे परि संग नव्हे तैसा ॥२॥ तुका म्हणे करा परिसाचे परी । मज ठेवा सरी लोखंडाचे ॥३॥
2732 " मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥१॥ वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥ध्रु.॥ अगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥२॥ तुका म्हणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥३॥
2733 " मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥१॥ तैसें जालें माझ्या चित्ती । तुजविण पंढरिनाथा ॥ध्रु.॥ वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिता सिंधू ॥२॥ सारसांसी निशीं । ध्यानरवीच्या प्रकाशीं ॥३॥ जीवनाविण मत्स्य । जैसें धेनूलागीं वत्स ॥४॥ पतिव्रते जिणें । भ्रताराच्या वर्त्तमानें ॥५॥ कृपणाचें धन । लोभालागीं जैसें मन ॥६॥ तुका म्हणे काय । तुजविण प्राण राहे ॥७॥
2734 " मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची ॥१॥ एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश सद्धि करी ॥ध्रु.॥ आधीं फळासी कोठें पावों शके । वासनेची भिकेवरी चाली ॥२॥ तुका म्हणे राजहंस ढोरा नांव । काय तया घ्यावें अळंकाराचें ॥३॥
2735 " मानामान किती । तुझ्या क्षुल्लका संपत्ती ॥१॥ जा रे चाळवीं बापुडीं । कोणी धरिती तीं गोडी ॥ध्रु.॥ रिद्धीसिद्धी देसी । आम्हीं चुंभळें नव्हों तैसीं ॥२॥ तुका म्हणे ठका । ऐसें नागविलें लोकां ॥३॥
2736 " मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड ॥१॥ तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥ करूनियां कृपा करीं अंगीकार । न लवीं उसीर आतां देवा ॥२॥ नव्हे साच कांहीं कळों आलें मना । म्हणोनि वासना आवरिली ॥३॥ तुका म्हणे आतां मनोरथ सिद्धी । माझे कृपानिधी पाववावे ॥४॥
2737 " मानी भक्तांचे उपकार । रुणीया म्हणवी निरंतर । केला निर्गुणीं आकार । कीर्त मुखें वर्णितां ॥१॥ म्हणोनि जया जे वासना । ते पुरवितो पंढरिराणा । जाला भक्तांचा आंदणा । ते उपकार फेडावया ॥ध्रु.॥ अंबॠषीकारणें । जन्म घेतले नारायणें । एवडें भक्तीचे लहणें । दास्य करी हा दासाचें ॥२॥ म्हणियें करितां शंका न धरी । रक्षपाळ बिळच्या द्वारीं । भक्तीचा आभारी । रीग न पुरे जावया ॥३॥ अर्जुनाचे रथवारु । ते वागवी सर्वेश्वरु । एवडे भक्तीचे उपकारु । मागें मागें हिंडतसे ॥४॥ पुंडलिकाचे द्वारीं । सम पाउलीं विटेवरी । न वजे कट करीं । धरूनि तेथें राहिला ॥५॥ भावभक्तीचा अंकित । नाम साजे दिनानाथ । म्हणोनि राहिला निवांत । तुका चरण धरोनि ॥६॥
2738 " मानूं कांहीं आम्ही आपुलिया स्वइच्छा । नाहीं तरि सरिसा रंकरावो ॥१॥ आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जाजीवीं चाड नाहीं ॥२॥ तुका म्हणे खेळों आम्ही सहजलीळे । म्हणोनी निराळे सुख दुःख ॥३॥
2739 " माय बाप बंधु सोयरा सांगाती । तूं चि माझी प्रीति गण गोत ॥१॥ शरण आलीं त्यांचीं वारिलीं दुरितें । तारिले पतित असंख्यात ॥ध्रु.॥ इतर कोण जाणे पावलें विश्रांति । न येतां तुजप्रति शरणागत ॥२॥ तयामध्यें मज ठेवीं नारायणा । लक्षुमीरमणा सोइरिया ॥३॥ तुका म्हणे देई दर्शनाचा लाभ । जे पाय दुर्लभ ब्रम्हादिकां ॥४॥
2740 " माय वनीं धाल्या धाये । गर्भ आंवतणें न पाहें॥१॥ तैसें पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ध्रु.॥ पुत्राच्या विजयें । पिता सुखातें जाये ॥२॥ तुका म्हणे अमृतसिद्धी । हरे क्षुधा आणि व्याधि ॥३॥
2741 " मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥१॥ आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥ध्रु.॥ मद्यपीर पुरा अधम यातीचा । तया उपदेशाचा राग वांयां ॥२॥ तुकयाबंधु म्हणे पिसाळलें सुनें । आप पर तेणें न विचारावें ॥३॥
2742 " मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां ॥१॥ नको जाऊं देउळासी । नेतो बागुल लोकांसी ॥ध्रु.॥ कर्णद्वारें पुराणिक । भुलवी शब्दें लावी भीक ॥२॥ वैष्णवां संगती । हातीं पडलीं नेणों किती ॥३॥ आम्हां कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥४॥ तुका म्हणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥५॥
2743 " मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे आभारीं । तो ही परि हरी । तुज जाला असमाईं ॥१॥ हे कां भक्तिचे उपकार । नांदतें विध्वंसिलें घर । प्रसन्नता वेव्हार । सेवटीं हे जालासी ॥ध्रु.॥ एका जिवावरी । होतों दोनी कुटुंबारी । चाळवूं तो तरीं । तुज येतो निर्लज्जा ॥२॥ तुकयाबंधु म्हणे भला । आणीक काय म्हणावें तुला । वेडा त्यानें केला । तुजसवें संबंधु ॥३॥
2744 " मायबाप सवें नये धनवत्ति । करावें संचित भोगावें तें ॥१॥ म्हणऊनि लाभ काय तो विचारीं । नको चालीवरी चत्ति ठेवूं ॥ध्रु.॥ आयुष्य सेवटीं सांडूनि जाणार । नव्हे हें साचार शरीर हें ॥२॥ तुका म्हणे काळें लावियेलें माप । जमे धरी पापपुण्याची ही ॥३॥
2745 " मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी संकोचा ॥१॥ भोगिलें तें आहे सुख । खातां मुख मोकळें ॥ध्रु.॥ उत्तम तें बाळासाटीं । लावी ओठीं माउली ॥२॥ तुका म्हणे जाली धणी । आनंद मनीं न समाये ॥३॥
2746 " मायबापापुढें लाटिकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें ॥१॥ कृपावंता घालीं प्रेमपान्हारस । वोळली वोरसे पांडुरंग ॥ध्रु.॥ नाहीं धीर खुंटी जवळी हुंबरे । ठायीं च पाखर कवळिते ॥२॥ तुका म्हणे मज होऊं नेदी सीण । कळों नेदी भिन्न आहे ऐसें ॥३॥
2747 " मायबापापुढें लेंकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे ॥१॥ सांभाळा जी माझीं विषमें अनंता । जवळी असतां अव्हेर कां ॥ध्रु.॥ आणिकांची चाले सत्ता आम्हांवरी । तुमची ते थोरी काय मग ॥२॥ तुका म्हणे आलों दुरोनि जवळी । आतां टाळाटाळी करूं नये ॥३॥
2748 " मायबापें केवळ काशी । तेणें न वजावें तीर्थासी ॥१॥ पुंडलीकें काय केलें । परब्रम्ह उभें ठेलें ॥ध्रु.॥ तैसा होई सावधान । हृदयीं धरीं नारायण ॥२॥ तुका म्हणे मायबापें । अवघीं देवाचीं स्वरूपें ॥३॥
2749 " मायबापें सांभाळिती । लोभाकारणें पाळिती ॥१॥ तैसा नव्हे देवराव । याचा कृपाळु स्वभाव ॥ध्रु.॥ मनासारिखें न होतां । बाळकासी मारी माता ॥२॥ तुका म्हणे सांगूं किती । बाप लेंकासी मारिती ॥३॥
2750 " मायलेंकरांत भिन्न । नाहीं उत्तराचा सीण ॥१॥ धाडीं धाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥ करूनि नवल । याचें बोलिलों ते बोल ॥२॥ तुका म्हणे माते । पांडुरंगे कृपावंते॥३॥
2751 " माया मोहोजाळीं होतों सांपडलों । परि या विठ्ठला कृपा आली ॥१॥ काढूनि बाहेरि ठेविलों निराळा । कवतुक डोळां दाखविलें ॥ध्रु.॥ नाचे उडे माया करी कवतुक । नासिवंत सुखें साच केलीं ॥२॥ रडे फुंदे दुःखें कुटितील माथा । एकासी रडतां तें ही मरे ॥३॥ तुका म्हणे मज वाटतें नवल । मी माझे बोल ऐकोनियां ॥४॥
2752 " माया साक्षी आम्ही नेणों भीड भार । आप आणि पर नाहीं दोन्ही ॥१॥ सत्याचिये साटीं अवघा चि भरे । नावडे व्यापार तुटीचा तो ॥ध्रु.॥ पोंभाळिता चरे अंतरींचें दुःख । लांसें फांसें मुख उघडावें ॥२॥ तुका म्हणे नव्हे स्फीतीचा हा ठाव । निवाड्यासी देव साक्षी केला ॥३॥
2753 " मायारूपें ऐसें मोहिलेंसे जन । भोगिती पतन नामाकर्में॥१॥ काय याची प्रीती करितां आदर । दुरावितां दूर तें चि भलें ॥ध्रु.॥ नाना छंद अंगीं बैसती विकार । छळियेले फार तपोनिधि ॥२॥ तुका म्हणे ऐसें सिकवितों तुज । आतां धरी लाज मना पुढें ॥३॥
2754 " मायें मोकलिलें कोठें जावें बळें । आपुलिया बळें न वंचे तें ॥१॥ रुसोनियां पळे सांडुनियां ताट । मागें पाहे वाट यावें ऐसीं ॥ध्रु.॥ भांडवल आम्हां आळी करावी हे । आपणें माये धांवसील ॥२॥ तुका म्हणे आळी करुनियां निकी । देसील भातुकीं बुझाऊनि ॥३॥
2755 " मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दुःखें तरी लव धडधडी ॥१॥ न लभे हा काळ न सुटे हातींचा । न बोलवे वाचा खोडावली ॥ध्रु.॥ न पवे धांवणें न पवे चि लाग । न चलती माग धरावया ॥२॥ भेणें तरि अंगा लावियेल्या राखा । परी त्यासी वाखा करीतसे ॥३॥ तुका म्हणे नेदी हाका मारूं देवा । लोकापाठी हेवा लागलासे ॥४॥
2756 " मायेवरी सत्ता आवडीची बाळा । संकोचोनि लळा प्रतिपाळी ॥१॥ अपराध माझे न मनावे मनीं । तुम्ही संतजनीं मायबापीं ॥ध्रु.॥ आरुष वचन लेंकुराची आळी । साहोनि कवळी मागुताली ॥२॥ तुका म्हणे अंगीं काय नाहीं सत्ता । परि निष्ठता उपेजना ॥३॥
2757 " मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥१॥ सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥ पीतांबरें छाया करी लोभापर । पाहे तें उत्तर आवडीचें ॥२॥ तुका म्हणे हें चि करावें जीवन । वाचे नारायण तान भूक ॥३॥
2758 " मारिले असुर दाटले मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥१॥ ते हा नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥२॥ वरिले ते दूतीं यमाचिया दंडीं । नुच्चरितां तोंडीं नारायण ॥३॥ नारायण नाम नावडे जयासि । ते जाले मिरासी कुंभपाकीं ॥४॥ कुंभपाकीं सेल मान तो तयांचा । तुका म्हणे वाचा संतनिंदा ॥५॥
2759 " मारूं नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणें ॥१॥ एक सूत्र जीवशिवीं आइक्यता । रोम उपडितां अंग कांपे ॥ध्रु.॥ नाहीं साहों येत दुखाची ते जाती । परपीडा भूतीं साम्य जालें ॥२॥ तुका म्हणे दिला नीतीचा संकेत । पुजा नांवें चित्त सुखी तेणें ॥३॥
2760 " मार्ग चुकले विदेशीं एकले । तयावरि जाले दिशाभुली ॥१॥ हातीं धरूनियां पावविलें घरा । त्याच्या उपकारा काय द्यावें ॥२॥ तैसा मी कुडकुडा होतों केशीराजा । सेवा न घडे लाजा म्हणऊनि ॥ध्रु.॥ सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुद्ध ॥३॥ उष्ण तान भूक एवढिये अकांतीं । वोसंगा लाविती काय म्हणिजे ॥४॥ खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे । अन्याय हि मोटे साच केले ॥५॥ हातींचें हिरोनि घातला पाठीसी । तुका म्हणे ऐसी परी जाली ॥६॥
2761 " मासं चर्म हाडें । देवा अवघीं च गोडें ॥१॥ जे जे हरिरंगीं रंगले । कांहीं न वचे वांयां गेले ॥ध्रु.॥ वेद खाय शंखासुर । त्याचें वागवी कलिवर ॥२॥ तुका म्हणे ऐसा । बराडी हा भक्तिरसा ॥३॥
2762 " माहार माते चपणी भरे । न कळे खरें पुढील ॥१॥ वोंगळ अधमाचे गुण । जातां घडी न लगे चि ॥ध्रु.॥ श्वान झोळी स्वामिसत्ता । कोप येतां उतरे ॥२॥ तुका म्हणे गुमान कां । सांगों लोकां अधमासी ॥३॥
2763 " माहेरिंचा काय येईंल निरोप । म्हणऊनि झोंप नाहीं डोळां ॥१॥ वाट पाहें आस धरूनियां जीवीं । निडळा हे ठेवीं वरी बाहे ॥ध्रु.॥ बोटवरी माप लेखितों दिवस । होतों कासावीस धीर नाहीं ॥२॥ काय नेणों संतां पडेल विसर । कीं नव्हे सादर मायबाप ॥३॥ तुका म्हणे तेथें होईंल दाटणी । कोण माझें आणी मना तेथें ॥४॥
2764 " माहेरींचें आलें तें मज माहेर । सुखाचें उत्तर करिन त्यासी ॥१॥ पायांवरी माथा आळिंगीन बाहीं । घेईंन लवलाहीं पायवणी ॥ध्रु.॥ सुख समाचार पुसेन सकळ । कैसा पर्वकाळ आहे त्यास ॥२॥ आपुले जीवींचें सुखदुःख भावें । सांगेन अघवें आहे तैसें ॥३॥ तुका म्हणे वीट नेघें आवडीचा । बोलिली च वाचा बोलवीन ॥४॥
2765 " मिटवण्याचे धनी । तुम्ही वेवसाय जनीं ॥१॥ कोण पडे ये लिगाडीं । केली तैसीं उगवा कोडीं ॥ध्रु.॥ केलें सांगितलें काम । दिले पाळूनियां धर्म ॥२॥ तुका म्हणे आतां । असो तुमचें तुमचे माथां ॥३॥
2766 " मिथ्या आहे सर्व अवघें हें मायिक । न कळे विवेक मज कांहीं ॥१॥ सर्व बाजागिरी वाटती ही खरी । पहातां येथें उरी कांहीं नाहीं ॥ध्रु.॥ आतां मज दुःख वाटतें अंतरीं । उपाय झडकरी सांग कांहीं ॥२॥ पुढें कोण गति न कळे सर्वथा । तुझे पायीं माथा ठेवियेला ॥३॥ करणें तें करीं सुखें आतां हरी । तुज म्यां निर्धारीं धरियेलें ॥४॥ स्वहित तें काय न कळे सर्वथा । तारीं तूं अनंता तुका म्हणे ॥५॥
2767 " मिळे हरिदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥१॥ तेथें म्या काय करावें । माझें कोणें आइकावें ॥ध्रु.॥ कैसें तुज लाजवावें । भक्त म्हणोनियां भावें ॥२॥ नाचतां नये ताळीं । मज वाजवितां टाळी ॥३॥ अंतीं मांडिती भुषणें भूषणे । शरीर माझें दैन्य वाणें ॥४॥ तुका म्हणे कमळापति । मज न द्यावें त्या हातीं ॥५॥
2768 " मी अवगुणी अन्यायी किती म्हणोन सांगों काईं । आतां मज पायीं ठाव देई विठ्ठले ॥१॥ पुरे पुरे हा संसार कर्म बिळवंत दुस्तर । राहों नेदी स्थिर एके ठायीं निश्चळ ॥ध्रु.॥ अनेक बुद्धिचे तरंग क्षणक्षणां पालटती रंग । धरूं जातां संग तंव तो होतो बाधक ॥२॥ तुका म्हणे आतां अवघी तोडीं माझी चिंता । येऊनि पंढरिनाथा वास करीं हृदयीं ॥३॥
2769 " मी च विखळ मी च विखळ । येर सकळ बहु बरें ॥१॥ पाहिजे हें क्षमा केलें । येणें बोलें विनवणी ॥ध्रु.॥ मी च माझें मी च माझें । जालें ओझें अन्याय ॥२॥ आधीं आंचवला आधीं आंचवला । तुका जाला निमनुष्य ॥३॥
2770 " मी तव बैसलों धरुनियां ध्यास । न करीं उदास पांडुरंगा ॥१॥ नको आतां मज दवडूं श्रीहरी । मागाया भिकारी जालों दास ॥ध्रु.॥ भुकेलों कृपेच्या वचनाकारणें । आशा नारायणें पुरवावी ॥२॥ तुका म्हणे येऊनियां देई भेटी । कुरवाळुनी पोटीं धरीं मज ॥३॥
2771 " मी तें मी तूं तें तूं । कुंकुड हें लाडसी ॥१॥ वचनासी पडो तुटी । पोटींचें पोटीं राखावें ॥ध्रु.॥ तेथील तेथें येथील येथें । वेगळ्या कुंथे कोण भारें ॥२॥ याचें यास त्याचें त्यास । तुक्यानें कास घातली ॥३॥
2772 " मी तों अल्प मतिहीन । काय वर्णू तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥१॥ नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केलें राक्षसां ॥ध्रु.॥ द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयीं ॥२॥ शिळा होती मनुष्य जाली । थोर कीर्ति वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंते काशानें ॥३॥ राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥४॥ तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना । जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥१॥ नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तूजवांचुनि एका । मनीं मानसीं चिंतितां रूपनाम । पळे पाप ताप भयें नास काम ॥२॥ हरी नाम हें साच तुझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी । करूं मुखवाणी कैसी देशघडी । तुजवांचुनि वाणितां व्यर्थ गोडी ॥३॥ भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी । असो भावें जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काई ॥४॥ दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी । तुका राहिला पायिं तो राख देव । असें मागतसे तुझी चरणसेवा ॥५॥
2773 " मी तों बहु सुखी आनंदभरिता । आहें साधुसंतां मेळीं सदा ॥१॥ देवा कांहीं व्हावें ऐसें नाहीं माझ्या जीवा । आणीक केशवा तुजविण ॥ध्रु.॥ न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता । सुख वाटे घेतां जन्म ऐसें ॥२॥ मृत्युलोकीं कोण धरिलें वासना । पावावया जनासवें दुःख ॥३॥ तुका म्हणे तुझा दास ऐसें लोकां । कांहीं सकळिकां कळों यावें ॥४॥
2774 " मी त्यांसी अनन्य तीं कोणा असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥१॥ आहे तो विचार आपणयापाशीं । कळा बिंबाऐसी प्रतिबिंबीं ॥ध्रु.॥ शुभ शकून तो शुभ लाभें फळे । पुढील तें कळे अनुभवें ॥२॥ तुका म्हणे माझा असेल आठव । तैसा माझा भाव तुझ्या पायीं ॥३॥
2775 " मी दास तयांचा जयां चाड नाहीं । सुखदुःख दोहीं विरहित ॥१॥ राहिलासे उभा भीवरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥ नवल काय तरी पाचारितां पावे । न स्मरत धांवे भक्तकाजा ॥२॥ सर्व भार माझा त्यासी आहे चिंता । तो चि माझा दाता स्वहिताचा ॥३॥ तुका म्हणे त्यासी गाईंन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥४॥
2776 " मी दास तयाचा जया चाड नाहीं । सुख दुःख दोहीविरहित जो ॥१॥ राहिलासे उभा भीमरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥ नवल काईं तरी पाचारितां पावे । न श्मरित धांवे भक्तिकाजें ॥२॥ सर्व भार माझा त्यासी आहें चिंता । तों चि माझा दाता स्वहिताचा ॥३॥ तुका म्हणे त्यास गाईंन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥४॥
2777 " मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खानें ॥१॥ मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥ घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडें चि ॥२॥ तुका म्हणे चोरटा चि जाला साव । सहज चि न्याय नाहीं तेथें ॥३॥
2778 " मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां ॥१॥ म्या तों पसरिला हात । करीं आपुलें उचित ॥ध्रु.॥ आम्ही घ्यावें नाम । तुम्हां समाधान काम ॥२॥ तुका म्हणे देवराजा । वाद खंडीं तुझा माझा ॥३॥
2779 " मीं हें ऐसें काय जाती । अवघड किती पाहातां ॥१॥ नाहीं होत उल्लंघन । नसतां भिन्न दुसरें ॥ध्रु.॥ अंधारानें तेज नेलें । दृष्टीखालें अंतर ॥२॥ तुका म्हणे सवें देव । घेतां ठाव दावील ॥३॥
2780 " मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥१॥ आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥ जालों बरा बळी । गेलों मरोनि तेकाळीं ॥२॥ दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥३॥
2781 " मुंगी आणि राव । आम्हां सारखाची जीव ॥१॥ गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ॥ध्रु.॥ सोनें आणि माती । आम्हां समान हें चित्ती ॥२॥ तुका म्हणे आलें । घरा वैकुंठ सगळें ॥३॥
2782 " मुंगी होउनि साकर खावी । निजवस्तूची भेटी घ्यावी॥१॥ वाळवंटी साकर पडे । गज येउनि काय रडे ॥ध्रु.॥ जाला हरिदास गोसांवी । अवघी मायिक क्रिया दावी ॥२॥ पाठ पाठांतरिक विद्या । जनरंजवणी संध्या ॥३॥ प्रेम नसतां अंगा आणी । दृढ भाव नाहीं मनीं ॥४॥ ब्रम्हज्ञान वाचे बोले । करणी पाहातां न निवती डोळे ॥५॥ मिथ्या भगल वाढविती । आपुली आपण पूजा घेती ॥६॥ तुका म्हणे धाकुटें व्हावें । निजवस्तूसी मागुनि घ्यावें ॥७॥
2783 " मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥१॥ याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥ उदक अन्न काये म्हणे मज खा ये । भुकेला तो जाये चोजवीत ॥२॥ व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा । दुःखाच्या परिहारा आपुलिया ॥३॥ तुका म्हणे जया आपुलें स्वहित । करणें तो चि प्रीत धरी कथे ॥४॥
2784 " मुकें होतां तुझ्या पदरीचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण ॥१॥ आपुलिये घरीं मैंद होऊनी बसे । कवण कवणासी बोलों नका ॥२॥ तुका म्हणे तुम्हां सांगतों मी खुण । देवासी तें ध्यान लावुनि बसा ॥३॥
2785 " मुक्त तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥१॥ सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकांत दंभ करी ॥२॥ तुका म्हणे लागे थोडा च विचार । परी हे प्रकार नागविती ॥३॥
2786 " मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥ पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥ तुका म्हणे वांयां गेलें वांयां विण । जैसा मृगशीण मृगजळीं ॥३॥
2787 " मुक्तिपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥१॥ बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि ते चि अंतीं अवसान ॥ध्रु.॥ भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तो चि गाती ॥२॥ बळ बुद्धी त्यांची उपकारासाटीं । अमृत तें पोटी सांटवलें ॥३॥ दयावेंत तरी देवा च सारिखीं । आपुलीं पारखीं नोळखती ॥४॥ तुका म्हणे त्यांचा जीव तो चि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ॥५॥
2788 " मुख डोळां पाहे । तैशी च ते उभी राहे ॥१॥ केल्याविण नव्हे हातीं । धरोनि आरती परती ॥ध्रु.॥ न धरिती मनीं । कांहीं संकोच दाटणी ॥२॥ तुका म्हणें देवें । ओस केल्या देहभावें ॥३॥
2789 " मुखाकडे वास । पाहें करूनियां आस ॥१॥ आतां होईंल ते शिरीं । मनोगत आज्ञा धरीं ॥ध्रु.॥ तुम्हीं अंगीकार । केला पाहिजे हें सार ॥२॥ तुका म्हणे दारीं । उभें याचक मीं हरी ॥३॥
2790 " मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी ॥१॥ वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥ध्रु.॥ भस्म दंड न लगे काठी । तीर्थां आटी भ्रमण ॥२॥ तुका म्हणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥३॥
2791 " मुखीं विठ्ठलाचें नाम । मग कैचा भवभ्रम ॥१॥ चालतां बोलतां खातां । जेवितां निद्रा करितां ॥ध्रु.॥ सुखें असों संसारीं । मग जवळी च हरि ॥२॥ मुक्तिवरील भक्ती जाण । अखंड मुखीं नारायण ॥३॥ मग देवभक्त जाला । तुका तुकीं उतरला ॥४॥
2792 " मुखें बोलावें तें जीविंचें जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे ॥१॥ आतां हें चि भलें भाकावी करुणा । विनियोग तो जाणां तुम्ही त्याचा ॥ध्रु.॥ आपलें तों येथें केलें नव्हे कांहीं । साधनाचा वांहीं पडों नये ॥२॥ तुका म्हणे देह दिला पिंडदान । वेळोवेळां कोण चिंता करी ॥३॥
2793 " मुखें संति इंद्रियें जती । आणिक नेणे भाव भक्ती॥१॥ देवा हे चि दोन्ही पदें । येर गाइलीं विनोदें ॥२॥ चित्ताचें आसन । तुका करितो कीर्त्तन ॥३॥
2794 " मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥ माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥ जळांत पाहातां हाडति या दृष्टि । म्हणे जगजेठी ऐसें नव्हे ॥३॥ नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चत्ति लावा वरी ॥४॥ वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । म्हणती गोपाळा आतां कैसें ॥५॥ कैसें करूनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥६॥ डोहो बहु खोल काळया भीतरी । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥७॥ जयाचें कारण तयासी च ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरि ॥८॥ त्यासि नारायण म्हणे राहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥ वरि जातां वरि पाहाती गोपाळ । म्हणति सकळ आम्ही नेणों ॥१०॥ नेणों म्हणती हें करितोसि काईं । आम्हां तुझी आईं देइल सिव्या ॥११॥ आपुलिया कानां देउनियां हात । सकळीं निमित्य टाळियेलें ॥१२॥ निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥ खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडू तळीं ॥१४॥ तळील नेणती तुका म्हणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥१५॥
2795 " मुखें सांगे ब्रम्हज्ञान । जन लोकाची कापितो मान ॥१॥ ज्ञान सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ॥ध्रु.॥ कथा करितो देवाची । अंतरीं आशा बहु लोभाची ॥२॥ तुका म्हणे तो चि वेडा । त्याचें हाणूनि थोबाड फोडा ॥३॥
2796 " मुख्य आधीं विषयत्याग । विधिभाग पाळणें ॥१॥ मन पावे समाधान । हें चि दान देवाचें ॥ध्रु.॥ उदासीन वृत्ति देहीं । चाड नाहीं पाळणें ॥२॥ तुका म्हणे नाहीं भय । सम सोय विषमाची ॥३॥
2797 " मुख्य आहे आम्हां मातेचा पटंगा । तुज पांडुरंगा कोण लेखी ॥१॥ नको लावूं आम्हां सवें तूं तोंवरी । पाहा दूरवरी विचारूनी ॥ध्रु.॥ साहे संतजन केले महाराज । न घडे आतां तुज भेईंन मी ॥२॥ तुकयाबंधु म्हणे अहिक्यें ऐक्यता । वाढतें अनंता दुःखें दुःख ॥३॥
2798 " मुदल जतन जालें । मग लाभाचें काय आलें ॥१॥ घरीं देउनि अंतर गांठी । राख्या पारिख्यां न सुटे मिठी ॥ध्रु.॥ घाला पडे थोडें च वाटे । काम मैंदाचें च पेटे ॥२॥ तुका म्हणे वरदळ खोटें । फांसे अंतरिंच्या कपटें ॥३॥
2799 " मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥१॥ आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥ एके सांते सरिखीं वित्ते । हानि हित वेगळालीं ॥२॥ तुका म्हणे हित धरा । नव्हे पुरा गांवढाळ ॥३॥
2800 " मुनि मुक्त जाले भेणें गर्भवासा । आम्हां विष्णुदासां सुलभ तो ॥१॥ अवघा चि संसार केला ब्रम्हरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनियां ॥ध्रु.॥ पुराणीं उपदेश साधन उध्दट । आम्हां सोपी वाट वैकुंठींची ॥२॥ तुका म्हणे जनां सकळांसहित । घेऊं अखंडित प्रेमसुख ॥२॥
2801 " मुरुकुश दोन्ही मारिले आसुर । दुर्वास ॠषीश्वर सुखी केला ॥१॥ मारियेला मुरु म्हणोनी मुरारी । नाम तुझें हरी पडियेलें ॥ध्रु.॥ पूवाअहुनी ऐसा भक्तिप्रतिपाळ । केला त्वां सांभाळ नारायणा ॥२॥ तुका म्हणे ये चि वेळे काय जालें । कां सोंग धरिलें मोहनाचें ॥३॥
2802 " मुळाचिया मुळें । दुःखें वाढती सकळे ॥१॥ ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ध्रु.॥ न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥२॥ तुका म्हणे थीत । दुःख पाववावें चित्त ॥३॥
2803 " मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान ॥१॥ वांयां जावें हें चि खरें । केलें तेणें चि प्रकारें ॥ध्रु.॥ अराणूक नाहीं कधीं । जाली तरि भेदबुद्धि ॥२॥ अंतरली नाव । तुका म्हणे नाहीं ठाव ॥३॥
2804 " मुळींचा तुम्हां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥१॥ घ्यावें त्याचें देणें चि नाहीं । ये चि वाहिं देखतसों ॥ध्रु.॥ माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥२॥ तुका म्हणे म्यां सांडिली आशा । हुंगिला फांसा येथुनियां ॥३॥
2805 " मुसळाचें धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पिळितां रस कैंचा ॥१॥ वांझे बाळा जैसें दुध नाहीं स्तनीं । गारा त्या अधणीं न सिजती ॥ध्रु.॥ नवखंड पृथ्वी पिके मृगजळें । डोंगर भेटे बळें असमानासी ॥२॥ नैश्वर ब्रम्ह तेव्हां होय ब्रम्ह । तुका म्हणे श्रम करुनी काय ॥३॥
2806 " मूर्तिमंत देव नांदतो पंढरी । येर ते दिगांतरीं प्रतिमारूप ॥१॥ जाउनियां वना करावें कीर्तन । मानुनी पाषाण विठ्ठलरूप ॥२॥ तुका मुख्य पाहिजे भाव । भावापासीं देव शीघ्र उभा ॥३॥
2807 " मूळ करणें संतां । नाहीं मिळत उचिता ॥१॥ घडे कासयानें सेवा । सांग ब्रम्हांडाच्या जीवा ॥ध्रु.॥ सागर सागरीं । सामावेसी कैंची थोरी ॥२॥ तुका म्हणे भावें । शरण म्हणवितां बरवें ॥३॥
2808 " मूळस्थळ ज्याचें गोमतीचे तीरीं । तो हा सारी दोरी खेळवितो ॥१॥ ऐसें हे कळलें असावें सकळां । चोर त्या वेगळा नाहीं दुजा ॥ध्रु.॥ वैष्णव हे रे तयाचे पाळती । खूण हे निरुती सांगितली ॥२॥ तुकयाबंधु म्हणे आलें अनुभवास । तेणें च आम्हांस नागविलें ॥३॥
2809 " मृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥१॥ भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ध्रु.॥ चंद्रामृतें तृप्तिपारणें चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥२॥ अधिकारी येथें घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसें ॥३॥ तुका म्हणे काय अंधळिया हातीं । दिले जैसें मोतीं वांयां जाय ॥४॥
2810 " मेघवृष्टीनें करावा उपदेश परि गुरुनें न करावा शिष्य । वांटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१॥ द्रव्य वेचावें अन्नसत्रीं भूतीं द्यावें सर्वत्र । नेदावा हा पुत्र उत्तमयाती पोसना ॥ध्रु.॥ बीज न पेरावें खडकीं ओल नाहीं ज्याचे बुडखीं । थीतां ठके सेखीं पाठी लागे दिवाण ॥२॥ गुज बोलावें संतांशीं पत्नी राखावी जैसी दासी । लाड देतां तियेसी वांटा पावे कर्माचा ॥३॥ शुद्ध कसूनिपाहावें वरि रंगा न भुलावें । तुका म्हणे घ्यावें जया नये तुटी तें ॥४॥
2811 " मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥ हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥१॥ जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हेंदु धेड चंभार ॥२॥ ज्याका चित लगा मेरे रामको नाव । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥३॥
2812 " मेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥१॥ रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥ध्रु.॥ उगी च कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवूनि ॥२॥ तुका म्हणे लोणी घालोनि शेणांत । उपेगाची मात काय असे ॥३॥
2813 " मेलियांच्या रांडा इच्छिती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी ॥१॥ मागिलां पुढिलां एकी सरोबरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु.॥ आन दिसे परी मरणें चि खरें । सांपळा उंदिरें सामाविलीं ॥२॥ तुका म्हणे जाली मनाची परती । निवळली ज्योती दिसों आली ॥३॥
2814 " मेल्यावरि मोक्ष संसारसंबंधें । आरालिया बधे ठेवा आम्हां ॥१॥ वागवीत संदेह राहों कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥ध्रु.॥ गाणें गीत आम्हां नाचणें आनंदें । प्रेम कोठें भेदें अंगा येतें ॥२॥ तुका म्हणे किती सांगावे दृष्टांत । नसतां तूं अनंत सानकुळ ॥३॥
2815 " मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाई वळिवतें ॥१॥ काय खरें न धरी शुद्धी । गेली बुद्धी भ्रमलें ॥ध्रु.॥ अहंकारास उरलें काईं । पांचांठायीं हें वांटे ॥२॥ तुका म्हणे कुंथे भारें । लटिकें खरें मानुनियां ॥३॥
2816 " मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें । आम्हां जन्म घेणें युगायुगीं ॥१॥ विटे ऐसें सुख नव्हे भक्तिरस । पुडतीपुडती आस सेवावें हें ॥ध्रु.॥ देवा हातीं रूप धरविला आकार । नेदूं निराकार होऊं त्यासी ॥२॥ तुका म्हणे चत्ति निवांत राहिलें । ध्याई तीं पाउलें विटेवरि ॥३॥
2817 " मोक्षाचें आम्हांसी नाहीं अवघड । तो असे उघाड गांठोळीस ॥१॥ भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशीं पुरवितां ॥ध्रु.॥ ज्याचें त्यासी देणें कोण तें उचित । मानूनियां हित घेतों सुख ॥२॥ तुका म्हणे सुखें देई संवसार । आवडीसी थार करीं माझे ॥३॥ ॥१२॥
2818 " मोटळें हाटीं सोडिल्या गांठी । विकर्या घातलें केण । ज्याचे भाग त्यासी देऊनि वारिलें । सारूनि लिगाड दान । खरें माप हातीं घेऊनि बैसलों । मानिती ते चौघे जन । खरें वत्ति तेथें आले चोजवीत । गिर्हाइक संतजन ॥१॥ झाडिला पालव केला हाट वेच । जाली सकाळीं च अराणूक । याल तरि तुम्ही करा लगबग । आमचे ते कोणी लोक ॥ध्रु.॥ एक ते उत्तम मध्यम कनिष्ठ । वित्ताचे प्रकार तीन । बहुतां जनाचे बहुत प्रकार । वेगळाले वाण । लाभ हाणि कोणा मुदल जालें । कोणासी पडिलें खाण । अर्धमर्ध कोणी गुंतोनि राहिले । थोडे तैसे बहु जन ॥२॥ एके सांते आले एक गांवीहून । येकामे चि नव्हे जाणें । येतां जातां रुजू नाहीं दिवाणा । काळतोंडीं एकें तेणें । लाग भाग एकी एकानीं गोविलें । मागील पुढिलां ॠणें । तुका म्हणे आतां पाहूं नये वास । साधावें आपुलें पेणें ॥३॥
2819 " मोल घेऊनियां कथा जरी करीं । तरी भंगो हरी देह माझा ॥१॥ माझी कथा करा ऐसें म्हणें कोणा । तरी झडो जाणा जिव्हा माझी ॥ध्रु.॥ साहए तूं जालासी काय उणें तुपें । आणीक भूतांपें काय मागों ॥२॥ तुका म्हणे सर्व सिद्धी तुझे पायीं । तूं माझा गोसावी पांडुरंगा ॥३॥
2820 " मोल देऊनियां सांटवावे दोष । नटाचे ते वेश पाहोनियां ॥१॥ हरिदासां मुखें हरिकथाकीर्तन । तेथें पुण्यें पुण्य विशेषता ॥ध्रु.॥ हरितील वस्त्रें गोपिकांच्या वेशें । पाप त्यासरिसें मात्रागमन ॥२॥ तुका म्हणे पाहा ऐसें जालें जन । सेवाक्तिहीन रसीं गोडी ॥३॥
2821 " मोल वेचूनियां धुंडिती सेवका । आम्ही तरी फुका मागों बळें ॥१॥ नसतां जवळी हित फार करूं । जीव भाव धरूं तुझ्या पायीं ॥ध्रु.॥ नेदूं भोग आम्ही आपुल्या शरीरा । तुम्हांसी दातारा व्हावें म्हूण ॥२॥ कीर्ती तुझी करूं आमुचे सायास । तूं का रे उदास पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे तुज काय मागों आम्ही । फुकाचे कां ना भी म्हणसी ना ॥४॥
2822 " मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥१॥ उगवूं आलेति तुम्हीं नारायणा । परिहार या सिणा निमिस्यांत ॥ध्रु.॥ लिगाडाचे मासी न्यायें जाली परी । उरली ते उरी नाहीं कांहीं ॥२॥ तुका म्हणे लाहो साधीं वाचाबळें । ओढियेलों काळें धांव घाला ॥३॥
2823 " मोलाचें आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा ॥१॥ अनंतजन्मींचे शेवट पाहतां । नर देह हातां आला तुझ्या ॥ध्रु.॥ कराल ते जोडी येईंल कार्यासी । ध्यावें विठ्ठलासी सुखालागीं ॥२॥ सांचलिया धन होईंल ठेवणें । तैसा नारायण जोडी करा ॥३॥ करा हरिभक्ती परलोकीं ये कामा । सोडवील यमापासोनियां ॥४॥ तुका म्हणे करा आयुष्याचें मोल । नका वेचूं बोल नामेंविण ॥५॥
2824 " मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥१॥ तैसा भिक्तवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ध्रु.॥ वेठी धरिल्या दावी भाव । मागें पळायाचा पाव ॥२॥ काजव्याच्या ज्योती । तुका म्हणे न लगे वाती ॥३॥
2825 " मोहरोनी चित्ती । आणूं हळूं चि वरि हिता ॥१॥ तों हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥ध्रु.॥ संवसारा भेणें । कांहीं उसंती तों पेणें ॥२॥ एखादिया भावें । तुका म्हणे जवळी यावें ॥३॥
2826 " मौन कां धरिलें विश्वाच्या जीवना । उत्तर वचना देई माझ्या ॥१॥ तूं माझें संचित तूं चि पूर्वपुण्य । तूं माझें प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥ तूं माझें सत्कर्म तूं माझा स्वधर्म । तूं चि नित्यनेम नारायणा ॥२॥ कृपावचनाची वाट पाहातसें । करुणा वोरसें बोल कांहीं ॥३॥ तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा । बोल सर्वोत्तमा मजसवें ॥४॥
2827 " म्हणउनि काय जीऊं भक्तपण । जायाचीं भूषणें अळंकार ॥१॥ आपुल्या कष्टाची करूनियां जोडी । मिरवीन उघडी इच्छावसें ॥ध्रु.॥ तुके तरि तुकीं खर्याचे उत्तम । मुलाम्याच्या भ्रम कोठवरि ॥२॥ तुका म्हणे पुढें आणि मागें फांस । पावें ऐसा नास न करीं देवा ॥३॥
2828 " म्हणउनि जाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें ॥१॥ दाखविलें देवें वर्म । अवघा भ्रम नासला ॥ध्रु.॥ हातें मुरगाळितां कान । नाहीं भिन्न वेदना ॥२॥ तुका म्हणे एकांतसुखें । अवघें गोतें गुंतलें ॥३॥
2829 " म्हणउनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥१॥ तो हा उतरील पार । भवदुस्तरनदीचा ॥ध्रु.॥ बहु आहे करुणावंत । अनंत हें नाम ज्या ॥२॥ तुका म्हणे साक्षी आलें । तरी केलें प्रगट ॥३॥
2830 " म्हणऊनि काकुळती । येतों पुढतों पुढती । तुम्हां असे हातीं । कमळापती भांडार ॥१॥ फेडूं आलेती दरद्रि । तरी न लगे उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥ध्रु.॥ कोठें न घली धांव । याजसाठीं तजिली हांव । घेऊं नेदी वाव । मना केला विरोध ॥२॥ कारणांच्या गुणें । वेळ काळ तोही नेणें । तुमच्या कीर्तनें । तुका तुम्हां जागवी ॥३॥
2831 " म्हणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चत्ति आशापाशीं आवरूनि ॥१॥ कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च ॥ध्रु.॥ पारिखा तो आतां जाला दुजा ठाव । दृढ केला भाव एकविध ॥२॥ तुका म्हणे कार्यकारणाचा हेवा । नाहीं जीव देवा समर्पिला ॥३॥
2832 " म्हणऊनि धरिले पाय । अवो माय विठ्ठले ॥१॥ आपुलें चि करूनि घ्यावें । आश्वासावें आम्हास ॥ध्रु.॥ वाढली ते तळमळ चिंता । शम आतां करावी ॥२॥ तुका म्हणे जीवीं वसे । मज नसे वेगळी ॥३॥
2833 " म्हणऊनी लवलाहें । पाय आहें चिंतीत ॥१॥ पाठिलागा येतो काळ । तूं कृपाळू माउली ॥ध्रु.॥ बहु उसंतीत आलों । तया भ्यालों स्थळासी ॥२॥ तुका म्हणे तूं जननी । ये निर्वाणीं विठ्ठलें॥३॥
2834 " म्हणतां हरिदास कां रे नाहीं लाज । दीनास महाराज म्हणसी हीना ॥१॥ काय ऐसें पोट न भरे तें गेलें । हालविसी कुले सभेमाजी ॥२॥ तुका म्हणे पोटें केली विटंबना । दीन जाला जना कींव भाकी ॥३॥
2835 " म्हणवितां हरी न म्हणे तयाला । दरवडा पडिला देहामाजी ॥१॥ आयुष्यधन त्याचें नेले यमदूतीं । भुलविला निश्चिंतीं कामरंगें ॥ध्रु.॥ नावडे ती कथा देउळासी जातां । प्रियधनसुता लक्ष तेथें ॥२॥ कोण नेतो तयां घटिका दिवसा एका । कां रे म्हणे तुका नागवसी ॥३॥
2836 " म्हणवितों दास । परि मी असें उदास ॥१॥ हा चि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥ध्रु.॥ सरतें कर्तुत्व माझ्यानें । परि मी त्याही हून भिन्न ॥२॥ तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥१॥
2837 " म्हणवितों दास न करितां सेवा । लंडपणें देवा पोट भरीं ॥१॥ खोटें कोठें सरे तुझे पायांपाशीं । अंतर जाणसी पांडुरंगा ॥ध्रु.॥ आचरण खोटें आपणासी ठावें । लटिकें बोलावें दुसरें तें ॥२॥ तुका म्हणे ऐसा आहें अपराधी । असो कृपानिधी तुम्हां ठावा ॥३॥
2838 " म्हणसी दावीन अवस्था । तैसें नको रे अनंता ॥१॥ होऊनियां सहाकार । रूप दाखवीं सुंदर ॥ध्रु.॥ मृगजळाचिया परी । तैसें न करावें हरी ॥२॥ तुकयाबंधु म्हणे हरी । कामा नये बाह्यात्कारी ॥३॥
2839 " म्हणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥१॥ लाहो घेई हरिनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ध्रु.॥ गळां पडेल यमफांसी । मग कैंचा हरि म्हणसी ॥२॥ पुरलासाटीं देहाडा । ऐसें न म्हणें न म्हणें मूढा ॥३॥ नरदेह दुबळा । ऐसें न म्हणें रे चांडाळा ॥४॥ तुका म्हणे सांगों किती । सेको तोंडीं पडेल माती ॥५॥
2840 " म्हणसी होऊनी निश्चिंता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होईंल तुझ्या ॥१॥ सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील भवडोहीं ॥ध्रु.॥ शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाहीं कधीं अराणूक । करिती तडातोडी । आंत बाह्यात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥२॥ मोलाची घडी जाते वांयांविण । न मिळे मोल धन देतां कोडी । जागा होई करीं हिताचा उपाय । तुका म्हणे हाय करिसी मग ॥३॥
2841 " म्हणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवाया कोड त्याचें ॥१॥ त्याचें आइकोन निष्ठ वचन । भयाभीत मन जालें तीचें ॥२॥ तिची चित्तवृत्ती होती देवावरी । आधीं ते माघारी फिरली वेगीं ॥३॥ वेगीं मन गेलें भ्रताराचे सोयी । विघ्न आलें कांहीं आम्हांवरीं ॥४॥ वरि उदकास अंत नाहीं पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥ संचार करूनि कोण्या वाटे आला । ठायीं च देखिला अवचिता ॥६॥ अवचिता नेणों येथें उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥ मोठ्यानें बोलतो भय नाहीं मनीं । केला उठवूनी काळ जागा ॥८॥ जागविला काळसर्प तये वेळीं । उठिला कल्लोळीं विषाचिये ॥९॥ यमुनेच्या डोहावरी आला ऊत । कार्याकृतांतधूदकारें ॥१०॥ कारणें ज्या येथें आला नारायण । जालें दरुषण दोघांमधीं ॥११॥ दोघांमध्यें जाले बोल परस्परें । प्रसंग उत्तरें युद्धाचिया ॥१२॥ चिंतावला चित्ती तोंडे बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥ जाला सावकाश झेंप घाली वरी । तंव म्हणे हरि मुष्टिघातें ॥१४॥ तेणें काळें त्यासि दिसे काळ तैसा । हरावया जैसा जीव जाला ॥१५॥ आठवले काळा हाकारिलें गोत । मिळालीं बहुतें नागकुळें ॥१६॥ कल्हारीं संधानीं धरियेला हरि । अवघा विखारीं व्यापियेला ॥१७॥ यांस तुका म्हणे नाहीं भक्तीविण । गरुडाचें चिंतन केलें मनीं ॥१८॥
2842 " म्हणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण॥१॥ नको नको दर्शन त्याचें । गलितकुष्ट भरो वाचे ॥ध्रु.॥ शाळिग्रामासि म्हणे धोंडा । कोड पडो त्याच्या तोंडा ॥२॥ भावी सद्गु मनुष्य । त्याचें खंडो का आयुष्य ॥३॥ हरिभक्ताच्या करी चेष्टा । त्याचे तोंडीं पडो विष्ठा ॥४॥ तुका म्हणे किती ऐकों । कोठवरी मर्यादा राखों ॥५॥
2843 " म्हणे विठ्ठल ब्रम्ह नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥१॥ मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रम्हादिक ॥ध्रु.॥ नाहीं विठ्ठल जया ठावा । तो ही डोळां न पाहावा ॥२॥ तुका म्हणे नाहीं । त्याची भीड मज कांहीं ॥३॥
2844 " म्हातारपणीं थेटे पडसें खोकला । हात कपाळाला लावुनि बैसे ॥१॥ खोबरियाची वाटी जालें असे मुख । गळतसे नाक श्लेष्मपुरी ॥ध्रु.॥ बोलों जातां शब्द नये चि हा नीट । गडगडी कंठ कफ भारी ॥२॥ सेजारी म्हणती मरेना कां मेला । आणिला कांटाळा येणें आम्हां ॥३॥ तुका म्हणे आतां सांडुनी सर्वकाम । स्मरा राम राम क्षणक्षणा ॥४॥
2845 " यज्ञ भूतांच्या पाळणा । भेद कारीये कारणा । पावावया उपासना । ब्रम्हस्थानीं प्रस्थान ॥१॥ एक परी पडिलें भागीं । फळ बीजाचिये अंगीं । धन्य तो चि जगीं । आदि अंत सांभाळी ॥ध्रु.॥ आवशक तो शेवट । मागें अवघी खटपट । चालों जाणे वाट । ऐसा विरळा एखादा ॥२॥ तुका होवोनि निराळा । क्षराअक्षरावेगळा । पाहे निगमकळा । बोले विठ्ठलप्रसादें ॥३॥
2846 " यज्ञनिमित्त तें शरिरासी बंधन । कां रे तृष्णा वांयांविण वाढविली ॥१॥ नव्हे ते भक्ति परलोकसाधन । विषयांनीं बंधन केलें तुज ॥ध्रु.॥ आशा धरूनि फळाची । तीर्थी व्रतीं मुक्ति कैंचि ॥२॥ तुका म्हणे सिणसी वांया । शरण न वजतां पंढरिराया ॥३॥
2847 " यत्न आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥ विश्वास तो पायांवरि । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥ जाणत चि दुजें नाहीं । आणीक कांहीं प्रकार ॥२॥ तुका म्हणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥३॥
2848 " यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥१॥ चोरा धरितां सांगे कुठोर्याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥२॥ तुका म्हणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥३॥
2849 " यथार्थवादें तुज न वर्णवे कदा । बोलतों ते निंदा करितों तुझी । वेदश्रुति तुज नेणती कोणी । चोवीस ठेंगणीं धांडोळितां॥१॥ आतां मज क्षमा करावें देवा । सलगी ते केशवा बोलियेलों ॥ध्रु.॥ सगुण कीं साकार निर्गुण कीं निराकार । न कळे हा पार वेदां श्रुतीं । तो आम्ही भावें केलासी लहान । ठेवूनियां नांवें पाचारितों ॥२॥ सहजरमुखें शेष सीणला स्तवितां । पार न कळतां ब्रम्हा ठेला । तेथें माझी देहबुद्धि तें काईं । थोर मी अन्यायी तुका म्हणे ॥३॥
2850 " यम सांगे दूतां तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥ नका जाऊं तया गांवां नामधारकाच्या शिवां । सुदर्शन येवा घरटी फिरे भोंवती ॥ध्रु.॥ चक्र गदा घेउनी हरि उभा असे त्यांचे द्वारीं । लIमी कामारी रिद्धिसिद्धीसहित ॥२॥ ते बिळयाशिरोमणी हरिभक्त ये मेदिनी । तुका म्हणे कानीं यम सांगे दूतांचे ॥३॥
2851 " यमधर्म आणिक ब्रम्हादिक देव । त्यांचा पूर्ण भाव तुझे पायीं ॥१॥ करिती स्मरण पार्वतीशंकर । तेथें मी किंकर कोणीकडे ॥ध्रु.॥ सहजरमुखेंसी घोष फणिवराचा । मज किंकराचा पाड काय ॥२॥ चंद्र सूर्य आणि सर्व तारांगणें । करिती भ्रमण प्रदक्षिणा ॥३॥ तुका म्हणे त्यांसी स्वरूप कळेना । तेथें मज दीना कोण पुसे ॥४॥
2852 " यमपुरी त्यांणीं वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥१॥ अवघड कोणी न करी सांगतां । सुलभ बहुतां गोड वाटे ॥ध्रु.॥ काय ते नेणते होते मागें ॠषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥२॥ द्रव्य दारा कोणें स्थापियेलें धन । पिंडाचें पाळण विषयभोग ॥३॥ तुका म्हणे दोहीं ठायीं हा फजित । पावे यमदूतजना हातीं ॥४॥
2853 " यमाचे हे पाश नाटोपती कोणातें । आम्हां दिनानाथें रक्षियेलें ॥१॥ यम नेतां तुम्हां रक्षील हें कोण । तुम्हां धन्यधन्य कोण म्हणती ॥ध्रु.॥ संतसज्जनमेळा पवित्र संतकीर्ति । त्यांनीं उत्तम स्थिति सांगितली ॥२॥ तें चि धरोनि चित्ती तुका हित करी। यमासि पांपरी हाणे आतां ॥३॥
2854 " या चि नांवें दोष । राहे अंतरीं किल्मिष ॥१॥ मना अंगीं पुण्य पाप । शुभ उत्तम संकल्प ॥ध्रु.॥ बिजाऐसीं फळें । उत्तम कां अमंगळें ॥२॥ तुका म्हणे चित्त । शुद्ध करावें हे नित ॥३॥
2855 " या चि हाका तुझे द्वारीं । सदा देखों रिणकरी ॥१॥ सदा करिसी खंड दंड । देवा बहु गा तूं लंड ॥ध्रु.॥ सुखें गोविसी भोजना । लपवूनियां आपणां ॥२॥ एकें एक बुझाविसी । तुका म्हणे ठक होसी ॥३॥
2856 " या रे नाचों अवघेजण । भावें प्रेमें परिपूर्ण ॥१॥ गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊनिं संतजना ॥ध्रु.॥ सुख साधु सुखासाटीं । नाम हरिनाम बोभाटीं ॥२॥ प्रेमासाटीं तो उदार । देतां नाहीं सानाथोर ॥३॥ पापें पळालीं बापुडीं । काळ झाला देशधडी ॥४॥ तुका म्हणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥४॥
2857 " या रे हरिदासानो जिंकों कळिकाळा । आमुचिया बळा पुढें किती बापुडें ॥१॥ रंग सुरंग घमंडी नाना छंदें । हास्यविनोदें मनाचिये आवडी ॥ध्रु.॥ येणें तेणें प्रकारें बहुतां सुख जोडे । पूजन तें घडे नारायणा अंतरीं ॥२॥ वांकड्या माना बोल बोलावे आर्ष । येईंल तो त्यांस छंद पढीयें गोविंदा ॥३॥ आपुलालें आवडी एकापुढें एक नटा । नाहीं थोर मोठा लहान या प्रसंगीं ॥४॥ तुका म्हणे येथें प्रेम भंगूं नये कोणीं । देव भक्त दोन्ही निवडितां पातक ॥५॥
2858 " यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला ॥१॥ खेळविला जिंहीं अंतर्बाह्यसुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥२॥ दिलें त्यांसी सुख अंतरीचें देवें । जिंहीं एका भावें जाणितला ॥३॥ जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥४॥ ज्यांचें कृष्णीं तन मन जालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥ विष तयां जालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥६॥ एकांतीं त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥ वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणें इच्छाभोग ॥८॥ भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासीं । तुका म्हणे जैसी स्पटिकशिळा ॥९॥
2859 " यांसि समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा म्हणे देव ॥१॥ देव राखे तया आडलिया काळें । देव सुखफळें देतो दासां ॥२॥ दासां दुःख देखों नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळतां ॥३॥ नाहीं मेघ येतां जातां देखियेला । धारीं वरुषला शिळांचिये ॥४॥ एवढें भक्तांचें सांकडें अनंता । होय निवारिता तुका म्हणे ॥५॥
2860 " याचा तंव हा चि मोळा । देखिला डोळा उदंड ॥१॥ नेदी मग फिरों मागें । अंगा अंगें संचरे ॥ध्रु.॥ कां गा याची नेणां खोडी । जीभा जोडी करितसां ॥२॥ पांघरे तें बहु काळें । घोंगडें ही ठायींचें ॥३॥ अंगीं वसे चि ना लाज । न म्हणे भाज कोणाची ॥४॥ सर्वसाक्षी अबोल्यानें । दुश्चित कोणें नसावें ॥५॥ तुका म्हणे धरिला हातीं । मग निश्चिंतीं हरीनें ॥६॥
2861 " याचिया आधारें राहिलों निश्चिंत । ठेवूनियां चित्ती पायीं सुखें ॥१॥ माझें सुखदुःख जाणे हित फार । घातलासे भार पांडुरंगा ॥ध्रु.॥ कृपेचीं पोसणीं ठायींचीं अंखिलीं । म्हणऊनि लागली यास चिंता ॥२॥ मन राखे हातीं घेऊनियां काठी । इंद्रियें तापटीं फांकों नेदी ॥३॥ तुका म्हणे यासी अवघड नाहीं । शरणागता कांहीं रक्षावया ॥४॥
2862 " याची कोठें लागली चट । बहु तट जालेंसे ॥१॥ देवपिसीं देवपिसीं । मजऐसीं जग म्हणे ॥ध्रु.॥ एकांताचें बाहेर आलें । लपविलें झांकेना ॥२॥ तुका म्हणे याचे भेटी । जाली तुटी आपल्यांसी ॥३॥
2863 " याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥१॥ परतें न सरवे दुरी । क्षण हरीपासूनि ॥ध्रु.॥ जालें तरी काय तंट । आतां चट न संटे ॥२॥ तुका म्हणे चक्रचाळे । वेळ बळें लाविलें ॥३॥
2864 " याजसाटीं केला होता आटाहास्ये । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥ कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥ म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥
2865 " याति गुणें रूप काय ते वानर । तयांच्या विचारें वर्ते राम ॥१॥ ब्रम्हहत्यारासि पातकी अनेक । तो वंद्य वाल्मीक तिहीं लोकीं ॥२॥ तुका म्हणे नव्हे चोरीचा व्यापार । म्हणा रघुवीर वेळोवेळां ॥३॥
2866 " यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥१॥ काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥ द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जयामधीं होता गांठी ॥२॥ तुका म्हणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥३॥
2867 " याती मतिहीन रूपें लीन दीन । आणीक अवगुण जाणोनियां ॥१॥ केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ध्रु.॥ जें कांहीं करितों तें माझे स्वहित । आली हे प्रचित कळों चित्ता ॥२॥ जालें सुख जीवा आनंद अपार । परमानंदें भार घेतला माझा ॥३॥ तुका म्हणे यासी नांवाचा अभिमान । म्हणोनि शरण तारी बळें ॥४॥
2868 " याती हीन मति हीन कर्म हीन माझें । सांडोनियां सर्व लज्जा शरण आलों तुज ॥१॥ येई गा तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीण जाला क्षीण जाली काया ॥ध्रु.॥ दिनानाथ दीनबंधू नाम तुज साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे॥२॥ विटेवरि वीट उभा कटावरी कर । तुका म्हणे हें चि आम्हां ध्यान निरंतर ॥३॥
2869 " यालागीं आवडी म्हणा राम कृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥१॥ सोपें हें साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरि ॥ध्रु.॥ न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥२॥ न लगे तप तीर्थ करणें महादान । केल्या एक मन जोडे हरि ॥३॥ तुका म्हणे कांहीं न वेचितां धन । जोडे नारायण नामासाटीं ॥४॥
2870 " यावरि न कळे संचित आपुलें । कैसें वोडवलें होइल पुढें ॥१॥ करील विक्षेप धाडितां मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥ध्रु.॥ जोंवरी हे डोळां देखें वारकरी । तों हें भरोवरी करी चित्ती ॥२॥ आस वाढविते बुद्धीचे तरंग । मनाचे ही वेग वावडती ॥३॥ तुका म्हणे तेव्हां होतील निश्चळ । इंद्रियें सकळ निरोपानें ॥४॥
2871 " यासाटीं करितों निष्ठ भाषण । आहेसी तूं जाण सर्वदाता ॥१॥ ऐसें दुःख कोण आहे निवारिता । तें मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥ बैसलासे केणें करुनि एक घरीं । नाहीं येथें उरी दुसर्याची ॥२॥ तुका म्हणे आलें अवघें पायांपें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥३॥
2872 " यासी कोणी म्हणे निंदेचीं उत्तरें । नागवला खरें तो चि एक ॥१॥ आड वाटे जातां लावी नीट सोईं । धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥ध्रु.॥ नाइकता सुखें करावें ताडण । पाप नाहीं पुण्य असे फार ॥२॥ जन्म व्याधि फार चुकतील दुःखें । खंडावा हा सुखें मान त्याचा ॥३॥ तुका म्हणे निंब दिलियावांचून । अंतरींचा सीण कैसा जाय ॥४॥
2873 " युिक्त तंव जाल्या कुंटित सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥१॥ संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें ॥ध्रु.॥ जाणपणें नेणें कांहीं चि प्रकार । साक्षी तें अंतर अंतरासी ॥२॥ तुका म्हणे तुम्ही केलें अभयदान । जेणें समाधान राहिलेंसे ॥३॥
2874 " ये गा महाविष्णु अनंतभुजाच्या । आम्हां अनाथांच्या माहेरा ये ॥१॥ भेटावया तुज ओढे माझा जीव । एकवेळा पाय दावीं डोळां ॥ध्रु.॥ आणीक हे आर्त नाहीं नारायणा । ओढे हे वासना भेटावया ॥२॥ वाटे चित्ती काय करावा विचार । चरण सुंदर पहावया ॥३॥ तुका म्हणे माझे पुरवीं मनोरथ । येईं गा न संवरीत पांडुरंगा ॥४॥
2875 " ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे ॥१॥ हें सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥२॥ आहे तुका म्हणे धर्म संस्थापणें । केला नारायणें अवतार ॥३॥
2876 " येइल घरा देव न धरीं संदेहा । फकिराचा यावा व्हावा जेव्हां ॥१॥ होइल फकीर योगी महानुभाव । घडीघडी देव सांभाळील ॥२॥ तुका म्हणे ऐसें बोलती बहुत । येणे गुणें संत जाले राम ॥३॥
2877 " येइल तुझ्या नामा । जाल म्हणों पुरुषोत्तमा ॥१॥ धीर राहिलों धरूनि । त्रास उपजला मनीं ॥ध्रु.॥ जगा कथा नांव । निराशेनें नुपजे भाव ॥२॥ तुम्ही साक्षी कीं गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥
2878 " येई गे विठ्ठले विश्वजीवनकले । सुंदर घननीळे पांडुरंगें ॥१॥ येई गे विठ्ठले करुणाकल्लोळे । जीव कळवळे भेटावया ॥ध्रु.॥ न लगती गोड आणीक उत्तरें । तुझें प्रेम झुरे भेटावया ॥२॥ तुका म्हणे धांव घालीं कृष्णाबाईं । क्षेम चाहूंबाही देई मज ॥३॥
2879 " येईवो येईवो येईधांवोनियां । विलंब कां वायां लाविला कृपाळे ॥१॥ विठाबाईं विश्वंभरे भवच्छेदके । कोठें गुंतलीस अगे विश्वव्यापके ॥ध्रु.॥ न करीं न करीं न करीं आतां अळस अव्हेरु । व्हावया प्रकट कैंचें दूरि अंतरु ॥२॥ नेघें नेघें नेघें माझी वाचा विसांवा । तुका म्हणे हांवा हांवा हांवा साधावा ॥३॥
2880 " येउनि संसारीं । मी तों एक जाणें हरी ॥१॥ नेणें आणिक कांहीं धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥ध्रु.॥ कामक्रोधलोभस्वार्थ । अवघा माझा पंढरिनाथ ॥२॥ तुका म्हणे एक । धणी विठ्ठल मी सेवक ॥३॥
2881 " येउनी जाउनी पाहें तुजकडे । पडिल्या सांकडें नारायणा ॥१॥ आणीक कोणाचा मज नाहीं आधार । तुजवरि भार जीवें भावें ॥ध्रु.॥ निष्ठ अथवा होई तूं कृपाळ । तुज सर्वकाळ विसरेंना ॥२॥ आपुलें वचन राहावें सांभाळून । तुम्हां आम्हां जाण पडिपाडु ॥३॥ ज्याच्या वचनासी अंतर पडेल । बोल तो होईंल तयाकडे ॥४॥ तुम्हां आम्हां तैसें नाहीं म्हणे तुका । होशील तूं सखा जीवलगा ॥५॥
2882 " येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥ उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥ बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढें नाहीं ऐसा लाभ मग ॥२॥ तुका म्हणे जाऊं सादावीत वाट । भेटे तरी भेटो कोणी तरी ॥३॥
2883 " येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमार्गा ॥१॥ चंचळ चत्तिासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥ भावाचा पैं हात धरावा नश्चियें । तेणें भवभय देशधडी ॥२॥ नामापरतें जगीं साधन सोपें नाहीं । आवडीनें गाई सर्वकाळ ॥३॥ तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा । ऐसा नश्चियाचा मेरु जाला ॥४॥
2884 " येऊनि संसारा काय हित केलें । आयुष्य नासिलें शिश्नोदरा ॥१॥ विषय सेवितां कोण तृप्त जाला । इंधनीं निवाला अग्नि कोठें ॥ध्रु.॥ देखोनी मृगजळ भांबावलीं वेडीं । विचाराची थडी न टाकिती ॥२॥ ऐसियां जीवांसी सोय न लाविसी । निष्ठ कां होसी कृपाळुवा ॥३॥ तुका म्हणे देवा अगाध पैं थोरी । सर्वांचे अंतरीं पुरलासी ॥४॥
2885 " येगा येगा पांडुरंगा । घेईं उचलुनि वोसंगा ॥१॥ ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥ उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥२॥ तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥३॥ तुका म्हणे हृषीकेशी । काय उशीर लाविसी ॥४॥
2886 " येणें जाणें तरी । राहे देव कृपा करी ॥१॥ ऐसें तंव पुण्य नाहीं । पाहातां माझे गांठी कांहीं ॥ध्रु.॥ भय निवारिता कोण वेगळा अनंता ॥२॥ तुका म्हणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥३॥
2887 " येणें जाला तुमचे पोतडीचा झाडा । केलासी उघडा पांडुरंगा ॥१॥ भरूनियां घरीं राहिलों वाखती । आपुली निश्चिंती आपल्यापें ॥ध्रु.॥ आतां काय उरी उरली ते सांगा । आणिलेति जगाचिये साक्षी ॥२॥ तुका म्हणे कोठें पाहोंजासी आतां । माझी जाली सत्ता तुम्हांवरि ॥३॥
2888 " येणें पांगें पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥१॥ सांगितली करीन सेवा । सकळ देवा दास्यत्व ॥ध्रु.॥ बंधनाची तुटली बेडी । हे चि जोडी मग आम्हां ॥२॥ तुका म्हणे नव्हें क्षण । पायांविण वेगळा ॥३॥
2889 " येणें बोधें आम्ही असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥१॥ आम्ही भूमीवरी एक देवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥ तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥२॥ न चळे हा मंत्र न म्हणों यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥३॥ तुका म्हणे माझा विठ्ठल विसांवा । सांटवीन हांवा हृदयांत ॥४॥
2890 " येणें मागॉ आले । त्यांचें निसंतान केलें ॥१॥ ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ॥ध्रु.॥ नागविल्या थाटी । उरों नेदी च लंगोटी ॥२॥ तुका म्हणे चोर । तो हा उभा कटिकर ॥३॥
2891 " येणें मुखें तुझे वर्णि गुण नाम । तें चि मज प्रेम देई देवा ॥१॥ डोळे भरूनियां पाहें तुझें मुख । तें चि मज सुख देई देवा ॥ध्रु.॥ कान भरोनियां ऐकें तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देईं देवा ॥२॥ वाहें रंगीं टाळी नाचेन उदास । हें देई हातांस पायां बळ ॥३॥ तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चिंतूं यासी ॥४॥
2892 " येती वारकरी । वाट पाहातों तोंवरी ॥१॥ घालूनियां दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥ध्रु.॥ पत्र हातीं दिलें । जया जेथें पाठविलें ॥२॥ तुका म्हणे येती । जाइन सामोरा पुढती ॥३॥
2893 " येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥१॥ आतां माझा जीव घेउनियां बळी । बैसवावें वोळी संतांचिये ॥ध्रु.॥ विस्तारिली वाचा फळेंविण वेल । कोरडे चि बोल फोस वांझे ॥२॥ तुका म्हणे आलों निर्वाणा च वरी । राहों नेदीं उरी नारायणा ॥३॥
2894 " येथील जें एक घडी । तये जोडी पार नाहीं ॥१॥ ती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥ध्रु.॥ अवघे दिवस गेले कामा । हीं जन्मा खंडण ॥२॥ तुका म्हणे रतल्या जनीं । सोडा झणी कान्होबा ॥३॥
2895 " येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे ॥१॥ दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ध्रु.॥ भूक भुके चि खाउनि धाय । नाहीं हाय अन्नाची ॥२॥ तुका म्हणे सुख जालें । अंतर धालें त्यागुणें ॥३॥
2896 " येथूनियां ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥१॥ उंची देवाचे चरण । तेथें जालें अधिष्ठान ॥ध्रु.॥ आघातावेगळा । असे ठाव हा निराळा ॥२॥ तुका म्हणे स्थळ । धरूनि राहिलों अचळ ॥३॥
2897 " येथें आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हें चि जालें ॥१॥ गाऊं नाचों टाळी गाऊं गाऊं गीत छंदें । डोलवूं विनोदें अंग तेणें ॥ध्रु.॥ मथुनियां सार काढिलें बाहेरी । उपाधि ते येरी निवडिली ॥२॥ तुका म्हणे जगा लाविली शिराणी । सेवितां हे धणी होत नाहीं ॥३॥
2898 " येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥१॥ तो चि ध्यावा एका चित्तें । करूनि रितें किळवर ॥ध्रु.॥ षडउर्मी हृदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥२॥ तुका म्हणे खुंटे आस । तेथें वास करी तो ॥३॥
2899 " येथें बोलोनियां काय । व्हावा गुरू तरि जाय ॥१॥ मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ध्रु.॥ ऐकोनि मरसी कथा। जंव आहेसि तुं जीता ॥२॥ हुरमतीची चाड । तेणें न करावी बडबड ॥३॥ पुसेल कोणी त्यास । जा रे करीं उपदेश ॥४॥ आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडूं कळिकाळाचें शीर ॥५॥ घेऊं पुढती जन्म । वाणूं कीर्त मुखें नाम ॥६॥ तुका म्हणे मुक्ती । नाहीं आस चि ये चित्ती ॥७॥
2900 " येहलोकीं आम्हां वस्तीचें पेणें । उदासीन तेणें देहभावीं ॥१॥ कार्यापुरतें कारण मारगीं । उलंघूनि वेगीं जावें स्थळा ॥ध्रु.॥ सोंगसंपादणी चालवितों वेव्हार । अत्यंतिक आदर नाहीं गोवा ॥२॥ तुका म्हणे वेंच लाविला संचिता । होइल घेतां लोभ कोणां ॥३॥
2901 " योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभयलोकीं कीर्ति सोहळा मान ॥१॥ येरयेरांवरी जायांचें उसिणें । भाग्यस्थळीं देणें झाडावेसीं ॥ध्रु.॥ केलिया फावला ठायींचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काव्हवितो ॥२॥ तुका म्हणे लाभ अकर्तव्या नांवें । शिवपद जीवें भोगिजेल ॥३॥
2902 " रंगलें या रंगें पालट न घरी । खेवलें अंतरीं पालटेना ॥१॥ सावळें निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगें कैसे शोभा देती ॥ध्रु.॥ पवित्र जालें तें न लिंपे विटाळा । नैदी बैसों मला आडवरी ॥२॥ तुका म्हणे काळें काळें केलें तोंड । प्रकाश अभंड देखोनियां ॥३॥
2903 " रंगीं रंगें नारायण । उभा करितों कीर्त्तन ॥१॥ हातीं घेउनियां वीणा । कंठीं राहें नारायणा ॥ध्रु.॥ देखिलीसे मूर्ती । माझ्या हृदयाची विश्रांति ॥२॥ तुका म्हणे देवा । देई कीर्तनाचा हेवा ॥३॥
2904 " रंगीं रंगें रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगें ॥१॥ शरीर जायांचें ठेवणें । धरिसी अभिळास झणें ॥ध्रु.॥ नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥२॥ अंतकाळींचा सोइरा । तुका म्हणे विठो धरा ॥३॥
2905 " रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥१॥ तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि जाली । कल्पना निवाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥ देशकालवस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥ न जाला प्रपंच आहे परब्रम्ह । अहंसोहं ब्रम्ह आकळलें ॥३॥ तत्वमसि विद्या ब्रम्हानंद सांग । तें चि जाला अंगें तुका आतां ॥४॥
2906 " रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनि गोमटीं नानारत्नें ॥१॥ रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥ कळा सकळ ही गोविंदाचे हातीं । मंदिरें निगुतीं उभारिलीं ॥३॥ उभारिलीं दुगॉ दारवंठे फांजी । कोटी चर्या माजी शोभलिया ॥४॥ शोभलें उत्तम गांव सागरांत । सकळांसहित आले हरि ॥५॥ आला नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणि ॥६॥ निवडीना याति समान चि केलीं । टणक धाकुलीं नारायणें ॥७॥ नारायणें दिलीं अक्षईं मंदिरें । अभंग साचारें सकळांसि ॥८॥ सकळ ही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरक्त नारीनर ॥९॥ रचिलें तें देवें न मोडे कवणा । बळियांचा राणा नारायण ॥१०॥ बळबुद्धीनें तीं देवा च सारिखीं । तुका म्हणे मुखीं गाती ओंव्या ॥११॥
2907 " रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्ती । दोरी दोघां सारिखी ॥१॥ तुम्हांआम्हांमध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव पाहों तरावय ॥ध्रु.॥ सरी चिताक भोंवरी । अळंकाराचिया परी । नामें जालीं दुरी । एक सोनें आटितां ॥२॥ पिसांचीं पारवीं । करोनि बाजागिरी दावी । तुका म्हणे तेवीं । मज नको चाळवूं ॥३॥
2908 " रज्जुसर्पाकार । भासयेलें जगडंबर ॥१॥ म्हणोनि आठवती पाय । घेतों आलाय बलाय ॥ध्रु.॥ द्रुश द्रुमाकार लाणी । केलों सर्व सासी धणी ॥२॥ तुकीं तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥३॥
2909 " रणीं निघतां शूर न पाहे माघारें । ऐशा मज धीरें राख आतां ॥१॥ संसारा हातीं अंतरलों दुरी । आतां कृपा करीं नारायणा ॥ध्रु.॥ वागवितों तुझिया नामाचें हत्यार । हा चि बडिवार मिरवितों ॥२॥ तुका म्हणे मज फिरतां माघारें । तेथें उणें पुरें तुम्ही जाणां ॥३॥
2910 " रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें ॥१॥ जातिस्वभाव आला डोळ्यां आड । तया घडे नाड न कळतां ॥ध्रु.॥ कामधेनु देखे जैशा गाईंम्हैसी । आणिकांतें ऐसी करोनियां ॥२॥ तुका म्हणे काय बोलोनियां फार । जयाचा वेव्हार तया साजे ॥३॥
2911 " रवि दीप हीरा दाविती देखणे । अदृश्य दर्षने संतांचे नी ॥१॥ त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर । न कळे तो साचार ब्रम्हादिकां ॥ध्रु.॥ तापली चंदन निववितो कुडी । त्रिगुण तो काढी संतसंग ॥२॥ मायबापें पिंड पाळीला माया । जन्ममरण जाया संतसंग ॥३॥ संतांचें वचन वारी जन्मदुःख । मिष्टान्न तें भूकनिवारण ॥४॥ तुका म्हणे जवळी न पाचारितां जावें । संतचरणीं भावें रिघावया ॥५॥
2912 " रवीचा प्रकाश । तो चि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥१॥ आतां हा चि वसो जीवीं । माझे अंतरी गोसावीं । होऊं येती ठावीं । काय वर्में याच्यानें ॥ध्रु.॥ सवें असतां धणी । आड येऊं न सके कोणी । न लगे विनवणी । पृथकाची करावी ॥२॥ जन्माचिया गति । येणें अवघ्या खुंटती । कारण ते प्रीति । तुका म्हणे जवळी ॥३॥
2913 " राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥१॥ न करी स्नान संध्या म्हणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्निशी ॥ध्रु.॥ देवाब्राम्हणासी जाईंना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥२॥ सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुगपधीशीं अतिआदरें ॥३॥ तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥४॥
2914 " राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥१॥ कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ध्रु.॥ वाइले तें सुनें खांदीं । चाले पदीं बैसविलें ॥२॥ तुका म्हणे विश्वंभरें । करुणाकरें रिक्षलें ॥३॥
2915 " रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥१॥ जीवा ही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य करी ॥२॥ तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळें । अवघीयांचें काळें केलें तोंड ॥३॥
2916 " राम कहे सो मुख भला रे । बिन रामसें बीख । आव न जानूं रमते बेरों । जब काल लगावे सीख ॥१॥
2917 " राम कहे सो मुख भलारे । खाये खीर खांड । हरिबिन मुखमो धूल परी रे । क्या जनि उस रांड ॥१॥
2918 " राम कहो जीवना फल सो ही । हरिभजनसुं विलंब न पाईं ॥ध्रु.॥ कवनका मंदर कवनकी झोपरी । एकारामबिन सब हि फुकरी ॥१॥ कवनकी काया कवनकी माया । एकरामबिन सब हि जाया ॥२॥ कहे तुका सब हि चेलक्तहार । एकारामविन नहिं वासार ॥३॥
2919 " राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें ॥१॥ काय घडेल तें घडो ये सेवटीं । लाभ हाणी तुटी देव जाणे ॥ध्रु.॥ चिंता मोह आशा ठेवुनि निराळीं । देईन हा बळी जीव पायीं ॥२॥ तुका म्हणे कांहीं उरों नेदीं उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनी ॥३॥
2920 " राम कृष्ण गोविंद नारायण हरी । केशवा मुरारी पांडुरंगा ॥१॥ लक्ष्मीनिवासा पाहें दिनबंधु । तुझा लागो छंदु सदा मज ॥२॥ तुझे नामीं प्रेम देई अखंडित । नेणें तप व्रत दान कांहीं ॥३॥ तुका म्हणे माझें हें चि गा मागणें । अखंड ही गाणें नाम तुझें ॥४॥
2921 " राम म्हणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥१॥ राम म्हणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नास ही ॥ध्रु.॥ राम म्हणे जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥२॥ राम म्हणतां यम शरणागत बापुडें । आढळ पद पुढें काय तेथें ॥३॥ राम म्हणतां धर्म घडतील सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥४॥ राम म्हणतां म्हणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥५॥
2922 " राम म्हणतां तरे जाणता अणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥१॥ राम म्हणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ध्रु.॥ राम म्हणे तया जवळी नये भूत । कैचा यमदूत म्हणतां राम ॥२॥ राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणतां राम ॥३॥ तुका म्हणें हें सुखाचें हें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥४॥
2923 " राम म्हणतां राम चि होइजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥१॥ ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥२॥ तुका म्हणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥३॥
2924 " राम म्हणे ग्रासोग्रासीं । तो चि जेविला उपवासी ॥१॥ धन्यधन्य तें शरीर । तीर्थांव्रतांचे माहेर ॥ध्रु.॥ राम म्हणे करितां धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥२॥ राम म्हणे वाटे चाली । यज्ञ पाउलापाउलीं ॥३॥ राम म्हणें भोगीं त्यागीं । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥४॥ ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे जीवन्मुक्त ॥५॥
2925 " राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एक चि सकळ दुजें नाहीं ॥१॥ मंगळावांचूनि उमटेना वाणी । अखंड चि खाणी एकी रासी ॥ध्रु.॥ मोडलें हें स्वामी ठावाठाव सेवा । वाढवा तो हेवा कोणा अंगें ॥२॥ तुका म्हणे अवघें दुमदुमिलें देवें । उरलें तें गावें हें चि आतां ॥३॥
2926 " रामनाम हा चि मांडिला दुकान । आहे वानोवाण घ्यारे कोणी ॥१॥ नका कोणी करूं घेता रे आळस । वांटितों तुम्हांस फुकाचें हें ॥ध्रु.॥ संचितासारिखे पडे त्याच्या हाता । फारसें मागतां तरी न ये ॥२॥ तुका म्हणे आम्हीं सांठविलें सार । उरलिया थार विचारितां ॥३॥
2927 " रामनामाचे पवाडे । अखंड ज्याची वाचा पढे ॥१॥ धन्य तो एक संसारीं । रामनाम जो उच्चारी ॥ध्रु.॥ रामनाम गर्जे वाचा । काळ आज्ञाधारक त्याचा ॥ २ ॥ तुका म्हणे रामनामीं । कृतकृत्य जालों आम्हीं ॥३॥
2928 " रामभजन सब सार मिठाईं । हरि संताप जनमदुख राईं ॥ध्रु.॥ दुधभात घृत सकरपारे । हरते भुक नहि अंततारे ॥१॥ खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पचतावे ॥२॥ कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥३॥
2929 " रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥१॥ कैसीं तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥ध्रु.॥ हा चि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥२॥ जुन्हाट नागर नीच नवें । तुका म्हणें म्यां धरिलें जीवें भावें ॥३॥
2930 " रामराम कहे रे मन । औरसुं नहिं काज । बहुत उतारे पार । आघे राख तुकाकी लाज ॥१॥
2931 " रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥१॥ राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी । राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥ध्रु.॥ अयोध्येचे लोक । राम जाले सकळीक ॥२॥ स्मरतां जानकी । रामरूप जाले कपि ॥३॥ रावणेसी लंका । राम आपण जाला देखा ॥४॥ ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥५॥
2932 " रामें स्नानसंध्या केलें क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ॥१॥ आणिकें दुरावलीं करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥ध्रु.॥ रामनामीं जिंहीं धरिला विश्वास । तिंहीं भवपाश तोडियेले ॥२॥ तुका म्हणे केलें कळिकाळ ठेंगणें । नामसंकीर्तनें भाविकांनीं ॥३॥
2933 " रायाचें सेवक । सेवटीचें पीडी रंक ॥१॥ हा तों हिणाव कवणा । कां हो नेणां नारायणा ॥ध्रु.॥ परिसेंसी भेटी । नव्हे लोहोपणा तुटी ॥२॥ तुझें नाम कंठीं । तुक्या काळासवें भेटी ॥३॥
2934 " राहाणें तें पायांपाशी । आणिकां रसीं विटोनि ॥१॥ ऐसा धीर देई मना । नारायणा विनवितों ॥ध्रु.॥ अंतरीं तों तुझा वास । आणिकां नास कारण ॥२॥ तुका म्हणे शेवटींचें । वाटे साचें राखावें ॥३॥
2935 " राहिलों निराळा । पाहों कवतुक डोळां ॥१॥ करूं जगाचा विनोद । डोळां पाहोनियां छंद ॥ध्रु.॥ भुललिया संसारें । आलें डोळ्यासी माजिरें ॥२॥ तुका म्हणे माथा । कोणी नुचली सर्वथा ॥३॥
2936 " राहे उभा वादावादीं । तरी फंदीं सांपडे ॥१॥ लव्हाळ्यासी कोठें बळ । करिल जळ आपुलें ॥ध्रु.॥ कठिणासी बळजोडा । नम्र पीडा देखेना ॥२॥ तुका म्हणे सर्वरसीं । मिळे त्यासी गोत तें ॥३॥
2937 " राहो ये चि ठायीं । माझा भाव तुझे पायीं ॥१॥ करीन नामाचें चिंतन । जाऊं नेदीं कोठें मन ॥ध्रु.॥ देईंन ये रसीं । आतां बुडी सर्वविशीं ॥२॥ तुका म्हणे देवा । साटी करोनियां जीवा ॥३॥
2938 " रिकामें तूं नको मना । राहों क्षणक्षणा ही ॥१॥ वेळोवेळां पारायण । नारायण हें करीं ॥ध्रु.॥ भ्रमणांच्या मोडीं वाटा । न भरें फाटा आडरानें ॥२॥ तुका म्हणे माझ्या जीवें । हें चि घ्यावें धणीवरी ॥३॥
2939 " रिण वैर हत्या । हें तों न सुटे नेंदितां ॥१॥ हें कां नेणां पांडुरंगा । तुम्ही सांगतसां जगा ॥ध्रु.॥ माझा संबंध तो किती । चुकवा लोकाची फजिती ॥२॥ तुका म्हणे या चि साठीं । मज न घेतां नये तुटी ॥३॥
2940 " रिद्धीसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥१॥ लोडें वालिस्तें पलंग सुपति । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥ध्रु.॥ पुसाल तरि आम्हां वैकुंठींचा वास । परि नाहीं राह्यास ठाव कोठें ॥२॥ तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे । परि नाहीं कोणाचें उणे पुरें ॥३॥
2941 " रुची रुची घेऊं गोडी । प्रेमसुखें जाली जोडी ॥१॥ काळ जाऊं नेदूं वांयां । चिंतितां विठोबाच्या पायां ॥ध्रु.॥ करूं भजन भोजन । धणी घेऊं नारायण ॥२॥ तुका म्हणे जीव धाला । होय तुझ्यानें विठ्ठला ॥३॥
2942 " रुचे सकळा मिष्टान्न । रोग्या विखाच्या समान ॥१॥ तरि कां तया एकासाटीं । काम अवघें करणें खोटीं ॥ध्रु.॥ दर्पण नावडे एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥२॥ तुका म्हणे खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥
2943 " रुळें महाद्वारीं । पायांखालील पायरी ॥१॥ तैसें माझें दंडवत । सांगा निरोप हा संत ॥ध्रु.॥ पडे दंडकाठी । देह भलतीसवा लोटी ॥२॥ तुका म्हणे बाळ । लोळे न धरितां सांभाळ ॥३॥
2944 " रुसलों आम्हीं आपुलिया संवसारा । तेथें जनाचारा काय पाड ॥१॥ आम्हां इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाहीं या दुसरें देवाविण ॥ध्रु.॥ दुराविले बंधु सखे सहोदर । आणीक विचार काय तेथें ॥२॥ उपाधिवचन नाइकती कान । त्रासलें हें मन बहु माझें ॥३॥ तुका म्हणे करा होईंल ते दया । सुख दुःख वांयां न धरावें ॥४॥
2945 " रुसलों संसारा । आम्ही आणीक व्यापारा ॥१॥ म्हणऊनि केली सांडी । देउनि पडिलों मुरकंडी ॥ध्रु.॥ परते चि ना मागें । मोहो निष्ठ जालों अंगें ॥२॥ सांपडला देव । तुका म्हणे गेला भेव ॥३॥
2946 " रूप नांवें माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयावरि ॥१॥ सींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवीं समजती ॥ध्रु.॥ पोटा आलें तिच्या लोळे मांड्यांवरि । पारखी न करी खंतीं चित्तीं ॥२॥ तुका म्हणे भक्तीसाटीं हरिहर । अरूपीचें क्षरविभाग हें ॥३॥
2947 " रूपीं जडले लोचन । पायीं स्थिरावलें मन ॥१॥ देहभाव हरपला । तुज पाहातां विठ्ठला ॥ध्रु.॥ कळों नये सुखदुःख । तान हरपली भूक ॥२॥ तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥३॥
2948 " रूपें गोविलें चित्ती । पायीं राहिलें निश्चिंत ॥१॥ तुम्हीं देवा अवघे चि गोमटे । मुख देखतां दुःख न भेटे ॥ध्रु.॥ जाली इंद्रियां विश्रांति । भ्रमतां पीडत ते होतीं ॥२॥ तुका म्हणे भेटी । सुटली भवबंदाची गांठी ॥३॥ स्वामींनीं तेरा दिवस निद्रा केली. मग भगवंतें येऊन समाधान केलें कीं,कवित्व कोरडें आहे तें काढणें उदकांतून
2949 " रोगिया मिष्टान्न मर्कटा चंदन । कागासी लेपन कर्पूराचें ॥१॥ निर्नासिका जैसा नावडे आरिसा । मूर्खालागीं तैसा शास्त्रबोध ॥ध्रु.॥ दास तुका म्हणे विठ्ठलउदारें । अज्ञानअंधारें दूरी केलें ॥२॥
2950 " रोजकीर्दी जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी ॥१॥ नाहीं होत झाड्यापाड्याचें लिगाड । हुजराती ते गोड सेवा रूजू ॥ध्रु.॥ चोरासाटीं रदबदल आटा हाश । जळो जिणे दाश बहुताचें ॥२॥ सावधान तुका निर्भर मानसीं । सालझाड्यापाशी गुंपों नेणे ॥३॥
2951 " लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसीतैसी ॥१॥ पांच लक्ष घरें पाषाणांचीं जेथें । सात लक्ष तेथें विटेबंदी ॥ध्रु.॥ कोटि घरें जेथें कांशा आणि तांब्याचीं । शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ॥२॥ तुका म्हणे ज्याची संपदा एवढी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥३॥
2952 " लक्ष्मीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥१॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायीं ॥ध्रु.॥ माझी अल्प हे वासना । तूं तो उदाराचा राणा ॥२॥ तुका म्हणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥३॥
2953 " लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥१॥ वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥ध्रु.॥ समय न कळे वेडगळ बुद्धि । विजाती ते शुद्धि चांच चाट ॥२॥ तुका म्हणे याचा धिक्कार चि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥३॥
2954 " लटिका चि केला । सोंग पसारा दाविला ॥१॥ अवघा बुडालासी ॠणें । बहुतांचे देणें घेणें ॥ध्रु.॥ लावियेलीं चाळा । बहू दावूनि पुतळा ॥२॥ तुका म्हणे हात । आम्ही अवरिली मात ॥३॥
2955 " लटिका तो प्रपंच एक हरि साचा । हरिविण आहाच सर्व इंद्रियें ॥१॥ लटिकें तें मौन्य भ्रमाचें स्वप्न । हरिविण ध्यान नश्वर आहे ॥ध्रु.॥ लटिकिया विपत्ति हरिविण करिती । हरि नाहीं चित्ती तो शव जाणा ॥२॥ तुका म्हणे हरि हें धरिसी निर्धारीं । तरीं तूं झडकरी जासी वैकुंठा ॥३॥
2956 " लटिका प्रपंच वांजेची संतति । तत्वज्ञा हे भ्रांति बाधूं नेणे ॥१॥ सूर्यबिंबीं काय अंधार रिघेल । मृगजळें तिंबेल नभ काईं ॥ध्रु.॥ तैसा दृश्यभास नाडळे चि डोळा । प्रकाशसोहळा भोगीतसे ॥२॥ भोग भोग्य भोक्ता नाडळे चि कांहीं । चैतन्यविग्रहीं पूर्णकाम ॥३॥ तुका ब्रम्हानंदीं आहे तुकब्रम्ह । प्रपंचाचें बंड न देखे डोळां ॥४॥
2957 " लटिकी ग्वाही सभेआंत । देतां पतित आगळा ॥१॥ कुंभपाकीं वस्ती करूं । होय धुरु कुळेसी ॥ध्रु.॥ रजस्वला रुधिर स्रवे । तें चि घ्यावें तृषेसी ॥२॥ तुका म्हणे जन्मा आला । काळ जाला कुळासी ॥३॥
2958 " लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान । जरि हरिकिर्तन प्रिय नाहीं ॥१॥ लटिकें चि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाटीं ॥ध्रु.॥ लटिकें चि केलें वेदपारायण । जरि नाहीं स्फुंदन प्रेम कथे ॥२॥ लटिकें तें तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळीं ॥३॥ नाम नावडे तो करील बाहेरी । नाहीं त्याची खरी चित्तशुद्धि ॥४॥ तुका म्हणे ऐसीं गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिला ही ॥५॥
2959 " लटिकें तें रुचे । साच कोणां ही न पचे ॥१॥ ऐसा माजल्याचा गुण । भोगें कळों येइल सीण ॥ध्रु.॥ वाढवी ममता । नाहीं वरपडला तो दूतां ॥२॥ कांहीं न मनी माकड । तुका उपदेश हेकड ॥३॥
2960 " लटिकें हासें लटिकें रडें । लटिकें उडें लटिक्यापें॥१॥ लटिकें माझें लटिकें तुझें । लटिकें ओझें लटिक्याचें ॥ध्रु.॥ लटिकें गायें लटिकें ध्यायें । लटिकें जायें लटिक्यापें ॥३॥ लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥३॥ लटिका तुका लटिक्या भावें । लटिकें बोले लटिक्यासवें ॥४॥
2961 " लटिक्याचे वाणी चवी ना संवाद । नांहीं कोणां वाद रुचों येत ॥१॥ अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली ॥ध्रु.॥ अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीनें मन लाहो साधी ॥२॥ तुका म्हणे दोष आणि अवकळा । न पडतां ताळा घडे तसे ॥३॥
2962 " लटिक्याचें आंवतणें जेविलिया साच । काय त्या विश्वास तो चि खरा ॥१॥ कोल्हांटिणी लागे आकाशीं खेळत । ते काय पावत अमरपद ॥ध्रु.॥ जळमंडपयाचे घोडे राउत नाचती । ते काय तडवती युद्धालागीं ॥२॥ तुका म्हणे तैसें मतवादीयांचें जिणें । दिसे लाजिरवाणें बोलतां चि ॥३॥
2963 " लडिवाळ म्हणोनी निष्ठ न बोला । परी सांभाळिला लागे घात ॥१॥ बहु वागवीत आणिलें दुरूनि । दासांची पोसनी बहु आहे ॥ध्रु.॥ नाहीं लागों दिला आघाताचा वारा । निष्ठ उत्तरा कोमेजतों ॥२॥ तुका म्हणे तुम्ही कृपावंत हरि । शांतवा उत्तरीं अमृताच्या ॥३॥
2964 " लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें ॥१॥ हें तों असाध्य जी सर्वत्र या जना । भलें नारायणां आळवितां ॥ध्रु.॥ कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्वविषयजात ॥२॥ कर्म उसंतावें चालत पाउलीं । होय जों राहिली देहबुद्धि ॥३॥ भक्ति तें नमावें जीवजंतुभूत । शांतवूनि ऊत कामक्रोध ॥४॥ तुका म्हणे साध्य साधन अवघडें । देतां हें सांकडें देह बळी ॥५॥
2965 " लय लक्षूनियां जालों म्हणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥१॥ जालों बहुश्रुत न लगे आतां कांहीं । नको राहूं ते ही निश्चिंतीनें ॥ध्रु.॥ तपें दान काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढें ॥२॥ कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथें ॥३॥ तुका म्हणे जरी होईंल निष्काम । तरि च होय राम देखे डोळां ॥४॥
2966 " लवण मेळवितां जळें । काय उरलें निराळें ॥१॥ तैसा समरस जालों । तुजमाजी हरपलों ॥ध्रु.॥ अग्निकर्पुराच्या मेळीं । काय उरली काजळी ॥२॥ तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योती ॥३॥
2967 " लवविलें तया सवे लवे जाती । अभिमाना हातीं सांपडेना ॥१॥ भोळिवेचें लेणें विष्णुदासां साजे । तेथें भाव दुजे हारपती ॥ध्रु.॥ अर्चन वंदन नवविधा भक्ति । दया क्षमा शांति ठायीं ॥२॥ तये गांवीं नाहीं दुःखाची वसती । अवघा चि भूतीं नारायण ॥३॥ अवघें चि जालें सोंवळें ब्रम्हांड । विटाळाचें तोंड न देखती ॥४॥ तुका म्हणे गाजे वैकुंठीं सोहळा । याही भूमंडळामाजी कीर्ति ॥५॥
2968 " लांब धांवे पाय चोरी । भरोवरी जनाच्या ॥१॥ आतां कैसें होय याचें । सिजतां काचें राहिलें ॥ध्रु.॥ खाय ओकी वेळोवेळां । कैसी कळा राहेल ॥२॥ तुका म्हणे भावहीण । त्याचा सीण पाचावा ॥३॥
2969 " लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥१॥ खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥ध्रु.॥ सेवी भांग अफू तमाखू उदंड । परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥२॥ तुका म्हणे ऐसा सर्वस्वें बुडाला । त्यासी अंतरला पांडुरंग ॥३॥
2970 " लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥१॥ सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥२॥ तुका म्हणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्यावाद ॥३॥
2971 " लागपाठ केला । आतां वांटा नित्य त्याला ॥१॥ करा जोडीचा हव्यास । आलें दुरील घरास ॥ध्रु.॥ फोडिलीं भांडारें । मोहोरलीं एकसरें ॥२॥ अवघियां पुरतें । तुका म्हणे घ्यावें हातें ॥३॥
2972 " लागलें भरतें । ब्रम्हानंदाचें वरतें ॥१॥ जाला हरिनामाचा तारा । सीड लागलें फरारा ॥ध्रु.॥ बैसोनि सकळ । बाळ चालिले गोपाळ ॥२॥ तुका म्हणे वाट । बरवी सांपडली नीट ॥३॥
2973 " लागो तुझी सोय ऐसे कोणी करी । माझे विठाबाईं जननिये ॥१॥ पतितपावन म्हणविसी जरी । आवरण करीं तरी माझें ॥ध्रु.॥ नाहीं तरी ब्रीद टाकीं सोडूनियां । न धरिसी माया जरी माझी ॥२॥ बोलिला तो बोल करावा साचार । तरि लोक बरें म्हणतील ॥३॥ करावा संसार लोक लाजे भेणें । वचनासी उणें येऊं नेदीं ॥४॥ तुम्हां आम्हां तैसें नाहीं म्हणे तुका । होशील तूं सखा जीवलग ॥५॥
2974 " लागों दिलें अंगा । ऐसें कां गा सन्निध ॥१॥ कोण्या पापें उदो केला । तो देखिला प्रळय ॥ध्रु.॥ न देखवे पिडला सर्प । दया दर्प विषाचा ॥२॥ तुका म्हणे भलें । मज तो न वजे साहिलें ॥३॥
2975 " लागों नेदीं बोल पायां तुझ्या हरी । जीव जावो परि न करीं आण ॥१॥ परनारी मज रखुमाईंसमान । वमनाहूनि धन नीच मानीं ॥२॥ तुका म्हणे याची लाज असे कोणा । सहाकारी दीना ज्याची तया ॥३॥
2976 " लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥ध्रु.॥ कृष्ण विष्णु हरि गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥ सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरिनामें ॥३॥ तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ति । ऐसें बहुग्रंथीं बोलियेलें ॥४॥
2977 " लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संसारि नानापरिचीं लाघवें ॥१॥ पुरोनि पंढरिये उरलें भक्तिसुखें लांचावलें । उभें चि राहिलें कर कटीं न बैसे ॥ध्रु.॥ बहु काळें ना सावळें बहु कठिण ना कोंवळें । गुणत्रया वेगळें बहुबळें आथीलें ॥२॥ असोनि नसे सकळांमधीं मना अगोचर बुद्धी । स्वामी माझा कृपानिधि तुका म्हणे विठ्ठल ॥३॥
2978 " लाज ना विचार । बाजारी तूं भांडखोर ॥१॥ ऐसें ज्याणें व्हावें । त्याची गांठी तुजसवें ॥ध्रु.॥ फेडिसी लंगोटी । घेसी सकळांसी तुटी ॥२॥ तुका म्हणे चोरा । तुला आप ना दुसरा ॥३॥
2979 " लाज वाटे पुढें तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशी ॥१॥ चुकलिया काम मागतों मुशारा । लाज फजितखोरा नाहीं मज ॥ध्रु.॥ पाय सांडूनिया फिरतों बासर । स्वामिसेवे चोर होऊनियां ॥२॥ तुका म्हणे मज पाहिजे दंडिलें । पुढें हे घडलें न पाहिजे ॥३॥
2980 " लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥१॥ मजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥ कोमळ कंटक तीक्षण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥२॥ चित्रींचे लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप त्याचें ॥३॥ तुका म्हणे दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥४॥
2981 " लाजती पुराणें । वेदां येऊं पाहे उणें ॥१॥ आम्ही नामाचे धारक । किविलवाणीं दिसों रंक ॥ध्रु.॥ बोलिले ते संतीं । बोल वायांविण जाती ॥२॥ तुका म्हणे देवा । रोकडी हे मोडे सेवा ॥३॥
2982 " लाजोनियां काळें राहिलें लिखित । नेदितां ही चित्त समाधान ॥१॥ कैसें सुख वाटे वचनाचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥ध्रु.॥ एकाचिये भेटी एकाचा कोंपर । मावेचा पदर कळों येतो ॥२॥ होत्या आपल्या त्या वेचूनियां शक्ती । पुढें जालों युक्तिकळाहीन ॥३॥ तुका म्हणे तुम्ही समर्थ जी देवा । दुर्बळाची सेवा कोठें पावे ॥४॥
2983 " लाडाच्या उत्तरीं वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥ तमाचे शरीरीं विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥ध्रु.॥ कवतुकें घ्यावे लेंकराचे बोल । साहिलिया मोल ऐसें नाहीं ॥२॥ तुका म्हणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा खतें धुंडी ॥३॥
2984 " लाडें भाकितों करुणा । तूं रे उदाराचा राणा ॥१॥ करिसी आमुचा सांभाळ । तूं रे माउली स्नेहाळ ॥ध्रु.॥ नाहीं चिंता रे आम्हांसी । तूं चि भार चालविसी ॥२॥ आम्ही जालों उदासीन । तूं चि करिसी जतन ॥३॥ आम्हां नाहीं जीवनास । तूं चि पुरविसी घास ॥४॥ तुका म्हणे भलते सवें । जातां मागें मागें धांवे ॥५॥
2985 " लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुह्य भाव शुद्ध बोला ॥१॥ अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥२॥ तुका म्हणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चत्ति शुद्धभावें ॥३॥
2986 " लाभ खरा नये तुटी । नाहीं आडखळा भेटी ॥१॥ जाय अवघिया देशा । येथें संचलाची तैसा ॥ध्रु.॥ मग न लगे पारखी । अवघीं सकट सारखीं ॥२॥ तुका म्हणे वोळे । रूपें भुलविले डोळे ॥३॥
2987 " लाभ जाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी । मनुष्यदेहा ऐसी । उत्तमजोडी जोडिली ॥१॥ घेई हरिनाम सादरें । भरा सुखाचीं भांडारें । जालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा ॥ध्रु.॥ घेउनि माप हातीं । काळ मोवी दिवस राती । चोर लाग घेती । पुढें तैसें पळावें ॥२॥ हित सावकासें । म्हणे करीन तें पिसें । हातीं काय ऐसें । तुका म्हणे नेणसी ॥३॥
2988 " लाभ पुढें करी । घात नारायण वारी ॥१॥ ऐसी भक्ताची माउली । करी कृपेची साउली ॥ध्रु.॥ माय बाळकासी । जीव भाव वेची तैसी ॥२॥ तुका म्हणे नाड । नाहीं शरणागता आड ॥३॥
2989 " लाल कमलि वोढे पेनाये । मोसु हरिथें कैसें बनाये ॥ध्रु.॥ कहे सखि तुम्हें करति सोर । हिरदा हरिका कठिन कठोर ॥१॥ नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥२॥ और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥३॥
2990 " लालुचाईंसाटीं बळकाविसी भावा । परी मी जाण देवा जिरों नेदीं ॥१॥ असों द्या निश्चय हा मनीं मानसीं । घातली येविशीं दृढ कास ॥ध्रु.॥ मज आहे बळ आळीचें सबळ । फोडीन अंत्राळ हृदय तुझें ॥२॥ करुणारसें तुकयाबंधु म्हणे भुलवीन । काढूनि घेईंन निज वस्तु ॥३॥
2991 " लावुनियां गोठी । चुकवूं आदरिली दिठी । देउनियां मिठी । पळे महिमा थुलिया ॥१॥ पुढें तो चि करी आड । तिचा लोभ तिसी नाड । लावुनि चरफड । हात गोऊनि पळावें ॥ध्रु.॥ आधीं काकुलती । मोहो घालावा पुढती । तोंडीं पडे माती । फिरतां मागें कैचा तो ॥२॥ तुका म्हणे देवा । यासी रडवी याचा हेवा । भावें कां हे सेवा । सुखें तुम्हां नार्पिती ॥३॥
2992 " लावूनि कोलित । माझा करितील घात ॥१॥ ऐसे बहुतांचे संधी । सांपडला खोळेमधीं ॥ध्रु.॥ पाहातील उणें । तेथें देती अनुमोदनें ॥२॥ तुका म्हणे रिघे । पुढें नाहीं जालें धींगे ॥३॥
2993 " लावूनियां पुष्टी पोरें । आणि करकर कथेमाजी ॥१॥ पडा पायां करा विनंती । दवडा हातीं धरोनियां ॥ध्रु.॥ कुर्वाळूनि बैसे मोहें । प्रेम कां हे नासीतसे ॥२॥ तुका म्हणे वाटे चित्ती । करा फजित म्हणऊनि ॥३॥
2994 " लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाटीं देशोदेशीं ॥१॥ नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥२॥ तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥३॥
2995 " लाहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥ ऐरावत रत्न थोर । तया अंकुशाचा मार ॥ध्रु.॥ ज्याचे अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥२॥ तुका म्हणे जाण । व्हावें लाहनाहुनि लाहन ॥३॥
2996 " लीलाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥ मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनियां करी स्तनपान ॥२॥ नभाचा ही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हातें त्यासि ॥३॥ हातें कुर्वाळुनी मुखीं घाली घांस । पुरे म्हणे तीस पोट धालें ॥४॥ पोट धालें मग देतसे ढेंकर । भक्तीचें तें फार तुळसीदळ ॥५॥ तुळसीदळ भावें सहित देवापाणी । फार त्याहुनि क्षीरसागरा ॥६॥ क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचें तें जळ गोड देवा ॥७॥ देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्याठायीं ॥८॥ त्यांचा हा अंकित सर्व भावें हरि । तुका म्हणे करी सर्व काज ॥९॥
2997 " लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी ॥१॥ कृपेचें पोसणें तुमचें मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ध्रु.॥ आरुषा उत्तरीं संतोषे माउली । कवळूनि घाली हृदयात ॥२॥ पोटा आलें त्याचे नेणे गुणदोष । कल्याण चि असे असावें हें ॥३॥ मनाची ते चाली मोहाचिये सोईं । ओघें गंगा काईं परतों जाणे ॥४॥ तुका म्हणे कोठें उदार मेघां शिक्त । माझी तृषा किती चातकाची ॥५॥
2998 " लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥ ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभेंविण प्रीती ॥ध्रु.॥ पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्व ही साहे ॥२॥ तुका म्हणे माझें । तैसे तुम्हां संतां ओझें ॥३॥
2999 " लेकराची आळी न पुरवी कैसी । काय तयापाशीं उणें जालें ॥१॥ आम्हां लडिवाळां नाहीं तें प्रमाण । कांहीं ब्रम्हज्ञान आत्मस्थिती ॥ध्रु.॥ वचनाचा घेईन अनुभव पदरीं । जें हें जनाचारीं मिरवलें ॥२॥ तुका म्हणे माझी भोळिवेची आटी । दावीन शेवटीं कौतुक हें ॥३॥
3000 " लेखिलें कवित्व माझे सहज बोल । न लगे चि ओल जिव्हाळ्याची ॥१॥ नये चि उत्तर कांहीं परतोनि । जालों नारायणीं न सरतें ॥ध्रु.॥ लाजिरवाणी कां वदली हे वाचा । नव्हे च ठायींचा मननशीळ ॥२॥ तुका म्हणे फळ नव्हे चि सायासा । पंढरीनिवासा काय जालें ॥३॥
3001 " लेखी दुखण्यासमान । वेचला नारायणीं क्षण । उद्यांचें आजि च मरण । आणोनि म्हणे हरि भोक्ता ॥१॥ नाहीं कांहीं पडों येत तुटी । जाणें तो आहे सेवटीं । लाभ विचारोनि पोटीं । होई सेवटीं जागृत ॥ध्रु.॥ आहे ते उरे कटा । लावुनि चळ आपुला फाटा । पुरे हें न पुरे सेवटा । तरण्या बळकटा सदा वास ॥२॥ म्हणोनि मोडावा कांटाळा । अविद्यात्मक कोंवळा । होतील प्रबळा । आशा तृष्णा माया ॥३॥ क्षण या देहाच्या अंतीं । जड होउनि राहेल माती । परदेश ते परवर होती । चिळसविती नाकडोळे ॥४॥ जंव या नाहीं पातल्या विपत्ति । आयुष्य भविष्य आहे हातीं । लाभ विचारोनि गुंती । तुका म्हणे अंतीं सर्व पिसुनें ॥५॥
3002 " लोक फार वाखा अमंगळ जाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा ॥१॥ विषयां वंचलों मीपणा मुकलों । शरण तुज आलों पांडुरंगा ॥ध्रु.॥ घर दार अवघीं तजिलीं नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥२॥ तुका म्हणे पडिलों पुंडलिकापाशीं । धांव हृषीकेशी आळिंगीं मज ॥३॥
3003 " लोक म्हणती मज देव । हा तों अधर्म उपाव ॥१॥ आतां कळेल तें करीं । सीस तुझे हातीं सुरी ॥ध्रु.॥ अधिकार नाहीं । पूजा करिती तैसा कांहीं ॥२॥ मन जाणे पापा । तुका म्हणे मायबापा ॥३॥
3004 " लोकमान देहसुख । संपत्तिउपभोग अनेक । विटंबना दुःख । तुझिये भेटीवांचूनि ॥१॥ तरी मज ये भेट ये भेट । काय ठाकलासी नीट । थोर पुण्यें वीट । तुज दैवेंचि लाधली ॥ध्रु.॥ काय ब्रम्हज्ञान करूं कोरडें । रितें मावेचें मापाडें । भेटीविण कुडें । तुझिये अवघें मज वाटे ॥२॥ आत्मस्थितीचा विचार । काय करूं हा उद्धार। न देखतां धीर । चतुर्भुज मज नाहीं ॥३॥ रिद्धीसिद्धी काय करूं । अथवा अगम्य विचारू । भेटीविण भारु । तुझिये वाटे मज यांचा ॥४॥ तुजवांचूनि कांहीं व्हावें । ऐसें नको माझिया जीवें । तुका म्हणे द्यावें । दरुषण पायांचें ॥५॥
3005 " लोकां कळों आला देव आम्हांमधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥१॥ शंका नाहीं थोरां लाहानां जीवांसि । कळला हा हृषीकेशी मग ॥२॥ मग मनीं जाले निर्भर सकळ । संगें लोकपाळ कृष्णाचिया ॥३॥ कृष्णाचिया ओंव्या गाणें गाती गीत । कृष्णमय चत्ति जालें त्यांचें ॥४॥ त्यांसि ठावा नाहीं बाहेरिल भाव । अंतरीं च वाव सुख जालें ॥६॥ सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥६॥ चिंतनें चि धालीं न लगे अन्नपाणी । तुका म्हणे मनीं समाधान ॥७॥
3006 " लोखंडाचे न पाहे दोष । शिवोन परीस सोनें करी ॥१॥ जैसी तैसी तरीं वाणी । मना आणी माउली ॥ध्रु.॥ लेकराचें स्नेहे गोड । करी कोड त्यागुणें ॥ ॥ मागें पुढें रिघे लोटी । साहे खेटी करी तें ॥३॥ तुका विनंती पांडुरंगा । ऐसें सांगा आहे हें ॥४॥
3007 " लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत ॥१॥ त्याच्या पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥ध्रु.॥ कोटिगोहत्यापातक । त्यासी घडेल निष्टंक ॥२॥ मासां श्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरां ॥३॥ तुका म्हणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥४॥
3008 " लोभीकें चित धन बैठे । कामीन चित्त काम । माताके चित पुत बैठें । तुकाके मन राम ॥१॥
3009 " लोह कफ गारा सद्धि हे सामुग्री । अग्नि टणत्कारी दिसों येतो ॥१॥ सांगावें तें काईं सांगावें तें काईं । चत्तिा होय ठायीं अनुभव तो ॥ध्रु.॥ अन्नें सांगों येतो तृप्तीचा अनुभव । करूनि उपाव घेऊं हेवा ॥२॥ तुका म्हणे मिळे जीवनीं जीवन । तेथें कोणा कोण नांव ठेवी ॥३॥
3010 " लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥१॥ म्हणऊनि करीं पायांसवें आळी । आणीक वेगळी नेणें परी ॥ध्रु.॥ एकविध आम्ही स्वामिसेवेसाटीं । वरी तो चि पोटीं एकभाव ॥२॥ तुका म्हणे करीं सांगितलें काम । तुम्हां धर्माधर्म ठावे देवा ॥३॥
3011 " लौकिकासाटीं या पसार्याचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागों येत ॥१॥ ठेवावा माथा तो नुचलावा पायीं । ठांयींचिये ठांयीं हालों नये ॥ध्रु.॥ डव्हळिल्या मनें वितळिलें रूप । नांवऐसें पाप उपाधीचें ॥२॥ तुका म्हणे देव प्रीतीनें कवळी । ठेवील जवळी उठवूनि ॥३॥
3012 " वंचुनियां पिंड । भाता दान करी लंड ॥१॥ जैसी याची चाली वरी । तैसा अंतरला दुरी ॥ध्रु.॥ मेला राखे दिस । ज्यालेपणें जालें वोस ॥२॥ तुका म्हणे देवा । लोभें न पुरे चि सेवा ॥३॥
3013 " वंदिलें वंदावें जीवाचिये साटीं । किंवा बरी तुटी आरंभीं च ॥१॥ स्वहिताची चाड ते ऐका हे बोल । अवघें चि मोल धीरा अंगीं ॥ध्रु.॥ सिंपिलें तें रोंप वरीवरी बरें । वाळलिया वरी कोंभ नये ॥२॥ तुका म्हणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥३॥
3014 " वचन तें नाहीं तोडीत शरीरा । भेदत अंतरा वज्रा-ऐसें ॥१॥ कांहीं न सहावें काशा करणें । संदेह निधान देह बळी ॥ध्रु.॥ नाहीं शब्द मुखीं लागत तिखट । नाहीं जड होत पोट तेणें ॥२॥ तुका म्हणे जरी गिळेअहंकार । तरी वसे घर नारायण ॥३॥
3015 " वचना फिरती अधम जन । नारायण तो नव्हे ॥१॥ केला आतां अंगीकार । न मनी भार समर्थ ॥ध्रु.॥ संसाराचा नाहीं पांग । देव सांग सकळ ॥२॥ तुका म्हणे कीर्त वाणूं । मध्यें नाणूं संकल्प ॥३॥
3016 " वचनांचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे ॥१॥ जातां घरा मागें । उरों नेणें खंती । मिळाल्या बहुतीं फांकलिया ॥ध्रु.॥ उदयीं च अस्त उदयो संपादला । कल्पनेचा केला जागेपणें ॥२॥ जाणवूनि गेला हांडोरियां पोरां । सावध इतरां करुनी तुका ॥३॥ स्वामीस संतांनीं पुसलें कीं तुम्हांस वैराग्य कोण्या प्रकारें जालें तें सांगा - ते अभंग ॥ ३ ॥ १३२८ याति शूद्र वैश केला वेवसाव । आदि तो हा देव कुळपूज्य ॥१॥ नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुम्हीं संतीं ॥ध्रु.॥ संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥२॥ दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥३॥ लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥४॥ देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥५॥ आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥६॥ कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें । विश्वासें आदरें करोनियां ॥७॥ गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥८॥ संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥९॥ टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥१०॥ वचन मानिलें नाहीं सहुर्दाचें । समूळ प्रपंचें वीट आला ॥११॥ सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१२॥ मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥१३॥ यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥१४॥ निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१५॥ बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥१६॥ विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥१७॥ आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥ भक्ति नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥ तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले पांडुरंगें ॥२०॥
3017 " वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज ॥१॥ परि हें न कळे अभाविकां । जडलोकां जिवांसी ॥ध्रु.॥ अश्रुत हे प्रसादिक । कृपा भीक स्वामीची ॥२॥ तुका म्हणे वरावरी । जातों तरी सांगत ॥३॥
3018 " वचनें चि व्हावें आपण उदार । होइल विश्वंभर संपुष्ट चि ॥१॥ सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐसीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु.॥ वंचिलिया काया येतसे उपेगा । शरीर हें नरकाचें चि आळें ॥२॥ तुका म्हणे जीव जितां थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥३॥
3019 " वटवट केली । न विचारितां मना आली ॥१॥ मज कराल तें क्षमा । कैसें नेणों पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥ उचित न कळे । जिव्हा भलतें चि बरळे ॥२॥ तुका म्हणे कांहीं । लौकिकाची चाड नाहीं ॥३॥
3020 " वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून ॥१॥ अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरीं ॥ध्रु.॥ उभयकुल समवेत । नर्का प्रवेश अद्भुत ॥२॥ तप्तलोहें भेटी । तुका म्हणे कल्पकोटी ॥३॥
3021 " वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्प संतां समर्पीशी ॥१॥ सर्वसंकटाचा तुम्हां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥ एकसरें चिंता ठेवूनियां पायीं । जालों उतराईं होतों तेणें ॥२॥ तुका म्हणे येथें जालें अवसान । काया वाचा मन वेचूनियां ॥३॥
3022 " वदे साक्षत्वेंसीं वाणी । नारायणीं मिश्रित ॥१॥ न लगे कांहीं चाचपावें । जातों भावें पेरीत ॥ध्रु.॥ भांडार त्या दातियाचें । मी कैचें ये ठायीं ॥२॥ सादावीत गेला तुका । येथें एकाएकीं तो ॥३॥
3023 " वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड ॥१॥ राग आळवितो नाना । गातो काय तें कळेना ॥ध्रु.॥ आशा धरोनि मनीं । कांहीं देईंल म्हणऊनि ॥२॥ पोटा एका साटीं । तुका म्हणे जाले कष्टी ॥३॥
3024 " वरिवरि बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाहीं जाली ॥१॥ पराव्याचे भार पाहुनियां दृष्टी । कांपतसे पोटीं थरथरां ॥ध्रु.॥ मनाचा उदार रायांचा जुंझार । फिरंगीचा मार मारीतसे ॥२॥ धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगीं अनुताप हरिनामें ॥३॥ तुका म्हणे साधु बोले खर्गधार । खोचती अंतरें दुर्जनाचें ॥४॥
3025 " वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥१॥ उदंड चि जाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक ॥ध्रु.॥ त्यांचें नाम कोणी नेघे चराचरीं । साही वेद चारी वर्णिताती ॥२॥ अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावें ॥३॥ तुका म्हणे तुझी विठ्ठल चित्ती ध्यातां । जन्ममरण व्यथा दूर होती ॥४॥
3026 " वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥१॥ विश्वासिया घडे लाभ । देइल तरी पद्मनाभ ॥ध्रु.॥ भाव शुद्ध तरी । सांगितलें काम करी ॥२॥ तुका म्हणे भोळा देव । परि हा नागवी संदेह ॥३॥
3027 " वर्त्ततां बासर । काय करावें शरीर ॥१॥ ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे पायीं मन ॥ध्रु.॥ नेदाविया वृत्ती । कोठें फांकों चि श्रीपती ॥२॥ तुका म्हणे भले । जन्मा येऊनियां जाले ॥३॥
3028 " वसनें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥ नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ध्रु.॥ फुगातें काउळें । म्हणे मी राजहंसा आगळें ॥२॥ गजाहूनि खर । म्हणे चांगला मी फार ॥३॥ मुलाम्याचें नाणें । तुका म्हणे नव्हे सोनें ॥४॥
3029 " वांजा गाईं दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥ ऐसें मागत नाहीं तुज । चरण दाखवावे मज ॥ध्रु.॥ चातक पाखरूं । त्यासी वर्षे मेघधारु ॥ पक्षी राजहंस । अमोलिक मोतीं त्यास॥३॥ तुका म्हणे देवा । कां गा खोचलासी जीवा ॥४॥
3030 " वांझेनें दाविलें ग†हवार लक्षणें । चिरगुटें घालून वाथयाला ॥१॥ तेवीं शब्दज्ञानी करिती चावटी । ज्ञान पोटासाटीं विकूनियां ॥ध्रु.॥ बोलाचि च कढी बोलाचा चि भात । जेवुनियां तृप्त कोण जाला ॥२॥ कागदीं लिहितां नामाची साकर । चाटितां मधुर गोडी नेदी ॥३॥ तुका म्हणे जळो जळो ते महंती । नाहीं लाज चित्तीं आठवण ॥४॥
3031 " वांयां ऐसा जन्म गेला । हें विठ्ठला दुःख वाटे ॥१॥ नाहीं सरता जालों पायीं । तुम्ही जई न पुसा ॥ध्रु.॥ कां मी जीतों संवसारीं । अद्यापवरी भूमिभार ॥२॥ तुका म्हणे पंढरिनाथा । सबळ व्यथा भवरोग ॥३॥
3032 " वांयां जातों देवा । नेणें भक्ती करूं सेवा ॥१॥ आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ध्रु.॥ करावें तें काय । न कळें अवलोकितों पाय ॥२॥ तुका म्हणे दान । दिलें पदरीं घेईंन ॥३॥
3033 " वांयां जाय ऐसा । आतां उगवावा फांसा ॥१॥ माझें परिसावें गार्हाणें । सुखदुःखाचीं वचनें ॥ध्रु.॥ हा चि आम्हां ठाव। पायीं निरोपाया भाव ॥२॥ तुका म्हणे जार । तुझा तुज देवा भार॥३॥
3034 " वांयां तैसे बोल हरिशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥१॥ भेदभय गेलें नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा जाली ॥२॥ जाली भेटी कंसा हरिशीं निकट । सन्मुख चि नीट येरयेरां ॥३॥ येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं । त्याचें शस्त्र अंगीं हाणितलें ॥४॥ त्याचें वर्म होतें ठावें या अनंता । तुका म्हणे सत्तानायक हा ॥५॥
3035 " वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥१॥ नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ध्रु.॥ शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबे चि ना ॥२॥ जालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥ तुका म्हणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥४॥
3036 " वाइटानें भलें । हीनें दाविलें चांगलें ॥१॥ एकाविण एका । कैचें मोल होतें फुका ॥ध्रु.॥ विषें दाविलें अमृत । कडू गोड घातें हित ॥२॥ काळिमेनें ज्योती । दिवस कळों आला राती ॥३॥ उंच निंच गारा । हिरा परिस मोहरा ॥४॥ तुका म्हणे भले । ऐसे नष्टांनीं कळले ॥५॥
3037 " वाघाचा काळभूत दिसे वाघाऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं ॥१॥ बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणें भेटी आपेआप ॥ध्रु.॥ सिकविलें तैसें नाचावें माकडें । न चले त्यापुढें युक्ति कांहीं ॥२॥ तुका म्हणे करी लटिक्याचा सांटा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥३॥
3038 " वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला ॥१॥ अंतीं मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥ येरू म्हणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें जाला ॥२॥ देह तंव जाणार । घडेल हा उपकार ॥३॥ येरू म्हणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥४॥ गांठी पडली ठका ठका । त्याचा धर्म बोले तुका ॥५॥
3039 " वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥१॥ म्हणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें ॥ध्रु.॥ पूज्य जालों अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबलें ॥२॥ तुका म्हणे खूण न कळे चि निरुती । सांपडलों हातीं अहंकाराचे ॥३॥
3040 " वाचाळ लटिके अक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखाणीती ॥१॥ बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥२॥ आसुडिल्या माना हात पाय नेटें । तंव भार बोटें उचलिला ॥३॥ लटिका चि आम्हीं सीण केला देवा । कळों आलें तेव्हां सकळांसि ॥४॥ आलें कळों तुका म्हणे अनुभवें । मग अहंभावें सांडवलीं ॥५॥
3041 " वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥१॥ धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥ध्रु.॥ न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥२॥ जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥३॥ हरिभक्तीविण । त्याचें जळो शाहाणपण ॥४॥ तुका म्हणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥५॥
3042 " वाचेचिया आळा कवळिलें ब्रम्ह । चुकविला श्रम पृथक तो ॥१॥ सुलभ जालें सुलभ जालें । जवळी आलें पंढरिये ॥ध्रु.॥ नामरूपाचें बांधलें मोटळें । एक एका वेळे सारियेलें ॥२॥ तुका म्हणे वाटे चुकली वसती । उद्धार तो हातीं आणियेला ॥३॥
3043 " वाट दावी त्याचें गेलें काय । नागवला जो वारितां जाय ॥१॥ ऐसीं मागें ठकलीं किती । सांगतां खाती विषगोळा ॥ध्रु.॥ विचारोनि पाहे त्यास । न वजे जीवें नव्हे नास ॥२॥ तुका म्हणे जो रुसला जीवा । तयासी केशवा काय चाले ॥३॥
3044 " वाट पाहें हरि कां नये आझूनि । निष्ठ कां मनीं धरियेलें ॥१॥ काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥ध्रु.॥ नाहीं माझा धांवा पडियेला कानीं । कोठें चक्रपाणी गुंतलेती ॥२॥ नाही आलें कळों अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतो ॥३॥ बहुता दिसांचें राहिलें भातुकें । नाहीं कवतुकें कृवाळिलें ॥४॥ तुका म्हणे देई एकवेळा भेटी । शीतळ हें पोटीं होइल मग ॥५॥
3045 " वाटीभर विष दिलें प्रल्हादासी । निर्भय मानसीं तुझ्याबळें ॥१॥ भोक्ता नारायण केलें तें प्राशन । प्रतापें जीवन जालें तुझ्या ॥ध्रु.॥ नामाच्या चिंतनें विषाचें तें आप । जाहालें देखत नारायणा ॥२॥ तुका म्हणे ऐसे तुझे बडिवार । सिणला फणीवर वर्णवेना ॥३॥
3046 " वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा ॥१॥ कोण दम ऐसा आहे यांचे पोटीं । येईल शेवटीं कोण कामा ॥ध्रु.॥ काय मानुनियां राहिले निश्चिंती । काय जाब देती यमदूतां ॥२॥ कां हीं विसरलीं मरण बापुडीं । काय यांसी गोडी लागलीसे ॥३॥ काय हातीं नाहीं करील तयासी । काय जालें यांसी काय जाणों ॥४॥ कां हीं नाठविती देवकीनंदना । सुटाया बंधनापासूनियां ॥५॥ काय मोल यासी लागे धन वित्त । कां हें यांचें चित्त घेत नाहीं ॥६॥ तुका म्हणे कां हीं भोगितील खाणी । कां त्या चक्रपाणी विसरलीं ॥७॥
3047 " वाढलियां मान न मनावी निश्चिती । भूतांचिये प्रीती भूतपण ॥१॥ म्हणऊनि मना लावावी कांचणी । इंद्रियांचे झणी ओढी भरे ॥ध्रु.॥ एका एकपणें एकाचिये अंगीं । लागे रंग रंगीं मिळलिया ॥२॥ तुका म्हणे देव निष्काम निराळा । जीवदशे चाळा चळणांचा ॥३॥
3048 " वाढवावा पुढें आणीक प्रकार । एक चि तें फार रुचि नेदी ॥१॥ निंच नवें लेणें देह हा पवाडा । पालट रोकडा वरावरी ॥ध्रु.॥ दिसे शोभिवंत सेवेनें सेवक । स्वामीची ते लोकत्रयीं कीर्ति ॥२॥ तुका म्हणे आजी पाववा संतोष । करुनि कीर्तिघोष नाचईंन ॥३॥
3049 " वाढविलें कां गा । तुम्ही एवढें पांडुरंगा ॥१॥ काय होती मज चाड । एवढी करावया बडबड ॥ध्रु.॥ ब्रम्हसंतर्पण । लोकीं करावें कीर्तन ॥२॥ निमित्याचा धणी । तुका म्हणे नेणे कोणी ॥३॥
3050 " वारंवार तुज द्यावया आठव । ऐक तो भाव माझा कैसा ॥१॥ गेले मग नये फिरोन दिवस । पुडिलांची आस गणित नाहीं ॥ध्रु.॥ गुणां अवगुणांचे पडती आघात । तेणें होय चित्त कासावीस ॥२॥ कांहीं एक तुझा न देखों आधार । म्हणऊनी धीर नाहीं जीवा ॥३॥ तुका म्हणे तूं ब्रम्हांडाचा जीव । तरी कां आम्ही कींव भाकीतसों ॥४॥
3051 " वारंवार हा चि न पडावा विसर । वसावें अंतर तुमच्या गुणीं ॥१॥ इच्छेचा ये दाता तूं एक समर्था । अगा कृपावंता मायबापा ॥ध्रु.॥ लाभाचिये वोढी उताविळे मन । त्यापरि चिंतन चरणाचें ॥२॥ तुका म्हणे जीवी जीवन ओलावा । पांडुरंगे दावा शीघ्र आतां ॥३॥
3052 " वारकरी पायांपाशीं । आले त्यांसी विनविलें ॥१॥ काय काय तें आइका । विसरों नका रंकासी ॥ध्रु.॥ चिंतावोनि चिंता केली । हे राहिली अवस्था ॥२॥ तुका म्हणे संसारा । रुसलों खरा यासाठीं ॥३॥
3053 " वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥१॥ पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेका ॥२॥ तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम न ये ॥३॥
3054 " वाराणसीपयपत असों सुखरूप । सांगावा निरोप संतांसी हा ॥१॥ येथूनियां आम्हां जाणें निजधामा । सवें असे आम्हां गरुड हा ॥२॥ कृपा असों द्यावी मज दीनावरी । जातोंसों माहेरी तुका म्हणे ॥३॥
3055 " वारिलें लिगाड । बहुदिसांचें हें जाड ॥१॥ न बोलावें ऐसें केलें । काहीं वाउगें तितुलें ॥ध्रु.॥ जाला चौघांचार । गेला खंडोनि वेव्हार ॥२॥ तुका म्हणे देवा । करीन ते घ्यावी सेवा ॥३॥
3056 " वाळूनियां जन सांडी मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं ॥१॥ आठवीन पाय धरूनि अनुताप । वाहे जळ झोंप नाहीं डोळां ॥ध्रु.॥ नावडती जीवा आणीक प्रकार । आवडी ते फार एकांताची ॥२॥ तुका म्हणे ऐसी धरितों वासना । होई नारायणा साई मज ॥३॥
3057 " वास नारायणें केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायीं ॥१॥ ठायीं पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोकां ॥२॥ लोकां दुःख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणीं ॥३॥ देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥४॥ येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥५॥ काया वाचा मन कृष्णीं रत जालें । सकळां लागलें कृष्णध्यान ॥६॥ ध्यान गोविंदाचें लागलें या लोकां । निर्भर हे तुका म्हणे चित्ती ॥७॥
3058 " वाहवितों पुरीं । आतां उचित तें करीं ॥१॥ माझी शक्ति नारायणा । कींव भाकावी करुणा ॥ध्रु.॥ आम्हां ओढी काळ । तुझें क्षीण झालें बळ ॥२॥ तुका म्हणे गोडी । जीवा मातेचिया ओढी ॥३॥
3059 " विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगीं ॥१॥ केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥ध्रु.॥ मधुरा उत्तरीं । रांवा खेळे उरावरी ॥२॥ तुका म्हणे रेडा । सुखें जाती ऐशा पीडा ॥३॥
3060 " विकल तेथें विका । माती नांव ठेवूनि बुका ॥१॥ हा तो निवाड्याचा ठाव । खर्या खोट्या निवडी भाव ॥ध्रु.॥ गर्हवारे हा विधि । पोट वाढविलें चिंधीं ॥२॥ लावूं जाणे विल्हे। तुका साच आणिक कल्हे ॥३॥
3061 " विचा केला ठोबा । म्हणोनि नांव तो विठोबा ॥१॥ कां रे नेणां त्याचें नांव । काय वेदासि नाहीं ठाव ॥ध्रु.॥ शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग जाला ॥२॥ तुका म्हणे सत्ता । ज्याची काळाचिये माथा ॥३॥
3062 " विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥१॥ एकांत एकल्या एका च सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्यांला ॥२॥ तर्कवितर्किणी दुराविल्या दुरी । मौन त्या परिचारी आरंभिलें ॥३॥ कुशळा कवित्या कथित्या लोभिका । त्या ही येथें नका आम्हांपाशीं ॥४॥ बोलक्या वाचाळा कृष्णरता नाहीं । यां चोरोनि तींहीं खेट केली ॥५॥ भेऊनियां जना एकी सवा जाल्या । वाती विझविल्या दाटोबळें ॥६॥ कृष्णसुख नाहीं कळलें मानसीं । निंदिती त्या त्यासी कृष्णरता ॥७॥ तो नये जवळी देखोनि कोल्हाळ । म्हणउनि समेळ मेळविला ॥८॥ अंतरीं कोमळा बाहेरी निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानीं ॥९॥ हरिरूपीं दृष्टि कानीं त्या च गोष्टी । आळंगिती कंठीं एका एकी ॥१०॥ न साहे वियोग करिती रोदना । भ्रमष्टि भावना देहाचिया ॥११॥ विसरल्या मागें गृह सुत पती । अवस्था याचिती गोविंदाची ॥१२॥ अवस्था लागोनि निवळ चि ठेल्या । एका एकी जाल्या कृष्णरूपा ॥१३॥ कृष्णा म्हणोनियां देती आलिंगन । विरहताप तेणें निवारेना ॥१४॥ ताप कोण वारी गोविंदावांचूनि । साच तो नयनीं न देखतां ॥१५॥ न देखतां त्यांचा प्राण रिघों पाहे । आजि कामास ये उसिर केला ॥१६॥ रित्या ज्ञानगोष्टी तयां नावडती । आळिंगण प्रीती कृष्णाचिया ॥१७॥ मागें कांहीं आम्ही चुकलों त्याची सेवा । असेल या देवा राग आला ॥१८॥ आठविती मागें पापपुण्यदोष । परिहार एकीस एक देती ॥१९॥ अनुतापें जाल्या संतप्त त्या बाळा । टाकुनि विव्हळा धरणी अंग ॥२०॥ जाणोनि चरित्र जवळी च होता । आली त्या अनंता कृपा मग ॥२१॥ होउनी प्रगट दाखविलें रूप । तापत्रय ताप निवविले ॥२२॥ निवालेया देखोनि कृष्णाचें श्रीमुख । शोक मोह दुःख दुरावला ॥२३॥ साच भाव त्यांचा आणुनियां मना । आळंगितो राणा वैकुंठींचा ॥२४॥ हरिअंगसंगें हरिरूप जाल्या । बोलों विसरल्या तया सुखा ॥२५॥ व्यभिचारभावें भोगिलें अनंता । वर्तोनि असतां घराचारी ॥२६॥ सकळा चोरोनि हरि जयां चित्ती । धन्य त्या नांदती तयामध्यें ॥२७॥ उणें पुरें त्यांचें पडों नेंदी कांहीं । राखे सर्वां ठायीं देव तयां ॥२८॥ न कळे लाघव ब्रम्हादिकां भाव । भक्तिभावें देव केला तैसा ॥२९॥ तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार । साधिलें अपार निजसुख ॥३०॥
3063 " विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥१॥ वादावाद करणें त्यासी तों च वरी । गुखाडीची चाड सरे तों च बाहेरी ॥ध्रु.॥ सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । चिकरूनि सांडी पायां लागली ते विष्ठ ॥२॥ नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥३॥
3064 " विचारिलें आधीं आपुल्या मानसीं । वांचों येथें कैसीं कोण्या द्वारें ॥१॥ तंव जाला साहए हृदयनिवासी । बुद्धि दिली ऐसी नास नाहीं ॥ध्रु.॥ उद्वेगाचे होतों पडिलों समुद्रीं । कोण रीती तरी पाविजेल ॥२॥ तुका म्हणे दुःखें आला आयुर्भाव । जाला बहु जीव कासावीस ॥३॥
3065 " विटंबिलें भट । दिला पाठीवरी पाट ॥१॥ खोटें जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥ध्रु.॥ तें चि करी दान । जैसें आइके वचन ॥२॥ तुका म्हणे देवें । पूतना शोषियेली जीवें ॥३॥
3066 " विटेवरी समचरण । तो हा रुक्मिणीरमण ॥१॥ वेदशास्त्रा माहेर । केले दासा उपकार ॥ध्रु.॥ नामापाशीं चारी मुक्ति । पहा हृदयीं प्रतीति ॥२॥ तुका म्हणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥३॥
3067 " विठोबाचे पायीं जीव म्यां ठेविला । भक्तीभावें केला देव ॠणी ॥१॥ देव माझा ॠणी आहे सहाकारी । परसपरवारि भवभय ॥ध्रु.॥ भवभयडोहीं बुडों नेदी पाहीं । धरूनियां बाही तारी मज ॥२॥ तारियेले दास पडिल्या संकटीं । विष केलें पोटीं अमृतमय ॥३॥ अमृतातें सेवीतसे नामरसा । तोडियेला फांसा बंधनाचा ॥४॥ बंधनाचा फांसा आम्हीं कांहीं नेणों । पाय तुझे जाणों पद्मनाभा ॥५॥ पद्मनाभा नाभिकमळीं ब्रम्हादिक । त्रैलोक्यनायक म्हणविसी ॥६॥ म्हणविसी देवा दासाचा अंकित । मनाचा संकेत पाहोनियां ॥७॥ पाहोनियां दृढ निश्चय तयाचा । तो चि दास साचा जवळीक ॥८॥ जवळीक जाली ब्रम्हीं सुखावले । मार्ग दाखविले मूढा जना ॥९॥ मूढा जनामाजी दास तुझा मूढ । कास तुझी दृढ धरियेली ॥१०॥ धरियेले तुझे पाय रे विठ्ठला । तुका सुखी जाला तुझ्या नामें ॥११॥
3068 " विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरिलि ॥१॥ विठ्ठलविठ्ठल भावें म्हणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंसी ॥ध्रु.॥ बहुत तारिले सांगों किती आतां । ऐसा कोणी दाता दुजा नाहीं ॥२॥ तुका म्हणे म्यां ही ऐकोनियां कीर्ती । धरिला एकांतीं हृदयामाजी ॥३॥
3069 " विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा ॥१॥ मायबाप चुलता बंधु । अवघा तुजशीं संबंधु ॥ध्रु.॥ उभयकुळींसाक्ष । तूं चि माझा मातुळपक्ष ॥२॥ समपिऩली काया । तुका म्हणे पंढरिराया ॥३॥
3070 " विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे म्हणती ॥१॥ तें चि सुकृताचें फळ । वाचा रामनामें निखळ ॥ध्रु.॥ बैसोनि हरिकथेसी । होय सावध चित्तासी ॥२॥ तुका म्हणे त्याचा जन्म । सुफळ जाला भवक्रम ॥३॥
3071 " विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥१॥ विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥ विठ्ठल जागृतिस्वप्नी सुषुप्ति । आन दुजें नेणती विठ्ठलेंविण ॥२॥ भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥३॥ तुका म्हणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥४॥
3072 " विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥ विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥ विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥ विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥३॥
3073 " विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥ विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारु भवनदीचा ॥ध्रु.॥ विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ॥२॥ विठ्ठल हे जन विठ्ठल माझें मन । सोयरा सज्जन विठ्ठल माझा ॥३॥ तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । नश्वरित गांवा जाइन त्याच्या ॥४॥
3074 " विठ्ठल माझी माय । आम्हां सुखा उणें काय ॥१॥ घेतों अमृताची धनी । प्रेम वोसंडलें स्तनीं ॥ध्रु.॥ क्रीडों वैष्णवांच्या मेळीं । करूं आनंदाच्या जळीं ॥२॥ तुका म्हणे कृपावंत । ठेवीं आम्हांपाशीं चत्ति ॥३॥
3075 " विठ्ठल मुक्तिदाता । नव्हे मरो हें बोलता ॥१॥ मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥ हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥२॥ सुना काळतोंडा । जो या देवा म्हणे धोंडा ॥३॥ अहं म्हणे ब्रम्ह । नेणे भक्तीचें तें वर्म ॥४॥ तुका म्हणे क्षण । नको तयाचें दर्षण ॥५॥
3076 " विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥१॥ भाग्यवंता छंद मनीं । कोडें कानीं ऐकती ॥ध्रु.॥ विठ्ठल हें दैवत भोळें । चाड काळें न धरावी ॥२॥ तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्ती ते शुद्ध ॥३॥
3077 " विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रम्हानंदें गर्जावें ॥१॥ वाये टाळ टाळ्याटाळी । होइल होळी विघ्नांची ॥ध्रु.॥ विठ्ठल आद्ये अवसानीं । विठ्ठल मनीं स्मरावा ॥२॥ तुका म्हणे विठ्ठलवाणी । वदा कानीं आईंका ॥३॥
3078 " विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥ सीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे ॥ध्रु.॥ माय माउलिया बंधुवर्गा जना । भाकीन करुणा सकळिकांसी ॥२॥ संत महंत सद्धि महानुभाव मुनि । जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥३॥ माझिये माहेरीं सुखा काय उणें । न लगे येणें जाणें तुका म्हणे ॥४॥
3079 " विठ्ठल हा चित्ती । गोड लागे गातां गीतीं ॥१॥ आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपळिया धन ॥ध्रु.॥ विठ्ठल हे वाणी । अमृत हे संजिवनी ॥२॥ रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥३॥
3080 " विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥१॥ तयासी बोलतां होईंल विटाळ । नेव जाये तो जळस्नान करितां ॥ध्रु.॥ विठ्ठलनामाची नाहीं ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥२॥ तुका म्हणे मज विठोबाची आण। जरी प्रतिवचन करिन त्यासी ॥३॥
3081 " विठ्ठला रे तुझे वर्णितां गुणवाद । विठ्ठला रे दग्ध जालीं पापें ॥१॥ विठ्ठला रे तुझें पाहातां श्रीमुख । विठ्ठला रे सुख जालें नयना ॥ध्रु.॥ विठ्ठला रे तुज देतां आलिंगन । विठ्ठला तनमन निवाल्या बाह्या ॥२॥ विठ्ठला रे तुझी ऐकतां कीर्ति । विठ्ठल हे विश्रांति पावले स्मरणें ॥३॥ विठ्ठला रे तुकयाबंधु म्हणे देहभाव । विठ्ठला जीवीं पाव धरितां गेला ॥४॥
3082 " विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला ॥१॥ कई कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥ जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥२॥ तुका म्हणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥३॥
3083 " विठ्ठलावांचोनि ब्रम्ह जें बोलती । वचन तें संतीं मानूं नये ॥१॥ विठ्ठलावांचूनि जेजे उपासना । अवघा चि जाणा संभ्रमु तो ॥ध्रु.॥ विठ्ठलावांचूनि सांगतील गोष्टी । वांयां ते हिंपुटी होत जाणा ॥२॥ विठ्ठलांवाचूनि जें कांहीं जाणती । तितुल्या वित्पित्त वाउगीया ॥३॥ तुका म्हणे एक विठ्ठल चि खरा । येर तो पसारा वाउगा चि ॥४॥
3084 " वितीयेवढेंसें पोट । केवढा बोभाट तयाचा ॥१॥ जळो याची विटंबना । भूक जना नाचवी ॥ध्रु.॥ अभिमान सिरीं भार । जाले खर तृष्णेचे ॥२॥ तुका म्हणे नरका जावें । हा चि जीवें व्यापार ॥३॥
3085 " विधवेसि एक सुत । अहर्निशीं तेथें चत्ति ॥१॥ तैसा तूं मज एकला । नको मोकलूं विठ्ठला ॥ध्रु.॥ सुपुत्रालागीं बाप । अवघे तेथें चि संकल्प ॥२॥ तुका म्हणे चित्ती । पतिव्रते जैसा पति ॥३॥
3086 " विनवितों चतुरा तुज विश्वंभरा । परियेसी दातारा पांडुरंगा ॥१॥ तुझे दास ऐसें जगीं वाखाणिलें । आतां नव्हे भलें मोकलितां ॥ध्रु.॥ माझे गुणदोष कोण जाणे मात । पावनपतित नाम तुझें ॥२॥ लोभ मोह माया आम्हां बांधवितां । तरि हा अनंता बोल कोणा ॥३॥ तुका म्हणे मी तों पतित चि खरा । परि आलों दातारा शरण तुज ॥४॥
3087 " विनवितों तरी आणितोसि परी । याचकानें थोरी दातयाची ॥१॥ आमुचे ही कांहीं असों द्या प्रकार । एकल्यानें थोर कैचे तुम्ही ॥ध्रु.॥ नेघावी जी कांहीं बहु साल सेवा । गौरव तें देवा यत्न कीजे ॥२॥ तुका म्हणे नाहीं आमुची मिरासी । असावेंसें ऐसीं दुर्बळें चि ॥३॥
3088 " विनवितों सेवटीं । आहे तैसें माझे पोटीं ॥१॥ कंठीं राहावें राहावें । हें चि मागतसें भावें ॥ध्रु.॥ पुरली वासना । येणें होईंल नारायणा ॥२॥ तुका म्हणे जो देहाडा । तो चि वर्णी पवाडा ॥३॥
3089 " विनवीजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरि ॥१॥ आतां असो पंढरीनाथा । पायीं माथा तुमचिये ॥ध्रु.॥ मागें सारियेली युHी । कांहीं होती जवळी ते ॥२॥ निराशेची न करी आस । तुका दास माघारी ॥३॥
3090 " विनवीजे ऐसें भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥१॥ धीटपणें पत्र लिहिलें आवडी । पार नेणे थोडी मति माझी ॥ध्रु.॥ जेथें देवा तुझा न कळे चि पार । तेथें मी पामर काय वाणूं ॥२॥ जैसे तैसे माझे बोल अंगीकारीं । बोबड्या उत्तरीं गौरवितों ॥३॥ तुका म्हणे विटेवरि जी पाउलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ॥४॥
3091 " विभ्रंशिली बुद्धि देहांत जवळी । काळाची अकाळीं वायचाळा ॥१॥ पालटलें जैसें देंठ सोडी पान । पिकलें आपण तयापरी ॥ध्रु.॥ न मारितां हीन बुद्धि दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥२॥ तुका म्हणे गळ लागलिया मत्स्या । तळमळेचा तैसा लवलाहो ॥३॥
3092 " वियोग न घडे सन्निध वसलें । अखंड राहिलें होय चित्ती ॥१॥ विसरु न पडे विकल्प न घडे । आलें तें आवडे तया पंथें ॥ध्रु.॥ कामाचा विसर नाठवे शरीर । रसना मधुर नेणे फिकें ॥२॥ निरोपासी काज असो अनामिक । निवडितां एक नये मज ॥३॥ तुका म्हणे हित चित्ते ओढियेलें । जेथें तें उगलें जावें येणें ॥४॥
3093 " विशमाची शंका वाटे । सारिखें भेटे तरी सुख ॥१॥ म्हणऊनि चोरिलें जना । आल्या राणां एकांतीं ॥ध्रु.॥ दुजियासी कळों नये । जया सोय नाहीं हे ॥२॥ तुका म्हणे मोकळें मन । नारायण भोगासी ॥३॥
3094 " विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे ॥१॥ जेथें असे तेथें देखे । मागितलें तें आइके ॥ध्रु.॥ जें जें वाटे गोड । तैसें पुरवितो कोड ॥२॥ तुका म्हणे भेटी । कांहीं पडों नेदी तुटी ॥३॥
3095 " विश्वास तो देव । म्हणुनि धरियेला भाव ॥१॥ माझी वदवितो वाणी । ज्याणें धरिली धरणी ॥ध्रु.॥ जोडिलीं अक्षरें । नव्हेती बुद्धीचीं उत्तरें ॥२॥ नाहीं केली आटी । कांहीं मानदंभासाटीं॥३॥ कोणी भाग्यवंत । तया कळेल उचित ॥४॥ तुका म्हणे झरा । आहे मुळींचा चि खरा ॥५॥
3096 " विश्वास धरूनि राहिलों निवांत । ठेवूनियां चित्त तुझे पायीं ॥१॥ तरावें बुडावें तुझिया वचनें । निर्धार हा मनें केला माझा ॥ध्रु.॥ न कळे हें मज साच चाळविलें । देसी तें उगलें घेइन देवा ॥२॥ मागणें तें सरे ऐसें करीं देवा । नाहीं तरी सेवा सांगा पुढें ॥३॥ करावें कांहीं कीं पाहावें उगलें । तुका म्हणे बोलें पांडुरंगा ॥४॥
3097 " विश्वासिया नाहीं लागत सायास । रंग अनायासें अंगा येतो ॥१॥ लेंकराच्या हातें घास मागे माता । वोरसोनि चित्ता सुख पावे ॥ध्रु.॥ गौरव त्या मानी आरुषा वचनीं । भूषण ते वाणी मिरवावी ॥२॥ तुका म्हणे आहेस सकळ ही साक्षी । माझा कई पक्षी पांडुरंग ॥३॥
3098 " विश्वीं विश्वंभर । बोले वेदांतींचा सार ॥१॥ जगीं जगदीश । शास्त्रें वदती सावकास ॥ध्रु.॥ व्यापिलें हें नारायणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥२॥ जनीं जनार्दन । संत बोलती वचनें ॥३॥ सूर्याचिया परी । तुका लोकीं क्रीडा करी ॥४॥
3099 " विष पोटीं सर्वा । जन भीतें तया दर्पा ॥१॥ पंच भूतें नाहीं भिन्न । गुण दुःख देती शीण ॥ध्रु.॥ चंदन प्रिय वासें । आवडे तें जातीऐसें ॥२॥ तुका म्हणे दाणा । कुचर मिळो नये अन्ना ॥३॥
3100 " विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाहीं उरली भयाची ॥१॥ मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हातीं गोड । सरलिया चाड । मग कैचे उद्वेग ॥ध्रु.॥ होता पहिला अभ्यास । समयीं घालावया कास । तेव्हां लटिके दोष । योगें अनुतापाच्या ॥२॥ तुका म्हणे आहे । बुद्धी केलियानें साहे । जवळी च पाहें । देव वाट स्मरणाची ॥३॥
3101 " विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥१॥ शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥ध्रु.॥ अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥२॥ तुका म्हणे ग्यानगड । सुखें देवा पावेना नाड ॥३॥
3102 " विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥१॥ न सरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावें ॥ध्रु.॥ शिखासूत्र सोंग वरि । दुराचारी दंड पावे ॥२॥ तुका म्हणे अभिमाना । नारायणा न सोसे ॥३॥
3103 " विषयीं अद्वये । त्यासी आम्हां सिवो नये ॥१॥ देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥ध्रु.॥ वासनेची बुंथी । तेथें कैची ब्रम्हस्थिति ॥२॥ तुका म्हणे असतां देहीं । तेथें नाही जेमेतीं ॥३॥
3104 " विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥ माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥ लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥ तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मि एकमय ॥३॥
3105 " विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळ चि सखें वोंगळाचें ॥१॥ नये पाहों कांहीं गोर्हावाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥ध्रु.॥ भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणें ॥२॥ तुका म्हणे छी थूं जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥३॥
3106 " विष्णुदासां भोग । जरी आम्हां पीडी रोग ॥१॥ तरि हें दिसे लाजिरवाणें । काय तुम्हांसी सांगणें ॥ध्रु.॥ आम्हां काळें खावें । बोलिलें तें वांयां जावें ॥२॥ तुका म्हणे दास । आम्ही भोगूं गर्भवास ॥३॥
3107 " विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥१॥ साधनें संकटें सर्वांलागीं सीण । व्हावा लागे क्षीण अहंमान ॥ध्रु.॥ भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥२॥ तुका म्हणे वर्म भजनें चि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥३॥
3108 " वीर विठ्ठलाचे गाढे । किळकाळ पायां पडे ॥१॥ करिती घोष जेजेकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥ क्षमा दया शांति । बाण अभंग ते हातीं ॥२॥ तुका म्हणें बळी । ते चि एक भूमंडळीं ॥३॥
3109 " वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥ आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥२॥ कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवश्वरु ॥३॥ हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥४॥ तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥५॥
3110 " वृत्तीवरि आम्हां येणें काशासाटीं । एवढी हे आटी सोसावया ॥१॥ जाणतसां परी नेणते जी देवा । भ्रम चि बरवा राखावा तो ॥ध्रु.॥ मोडूनि क्षरलों अभेदाची मूस । तुम्हां कां अळस वोडवला ॥२॥ तुका म्हणे होई लवकरि उदार । लांबणीचें फार काम नाहीं ॥३॥
3111 " वृद्धपणी न पुसे कोणी । विटंबणी देहाची ॥१॥ नव द्वारें जाली मोकळीक । गांड सरली वाजती ॥ध्रु.॥ दंत दाढा गळे थुंका । लागे नाका हनुवटी ॥२॥ शब्द नये मुखावाटा । करिती चेष्टा पोरें ती ॥३॥ तुका म्हणे अजूनि तरी । स्मरें श्रीहरी सोडवील ॥४॥
3112 " वृद्धपणीं आली जरा । शरीर कांपे थरथरा ॥१॥ आयुष्य गेलें हें कळेना । स्मरा वेगीं पंढरिराणा ॥ध्रु.॥ दांत दाढा पडिल्या ओस । हनुवटि भेटे नाकास ॥२॥ हात पाय राहिलें कान । नेत्रा पाझर हाले मान ॥३॥ अंगकांति परतली । चिरगुटा ऐसी जाली ॥४॥ आड पडे जिव्हा लोटे । शब्द नये मुखा वाटे॥५॥ लांब लोंबताती अंड । भरभरा वाजे गांड ॥६॥ तुका म्हणे आतां तरी । स्मरा वेगीं हरी हरी ॥७॥
3113 " वें माहेरास । हे च सर्वकाळ आस ॥१॥ घ्यावी उच्छिष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ध्रु.॥ भोग उभा आड । आहे तोंवरी च नाड ॥२॥ तुका म्हणे देवें । माझें सिद्धी पाववावें ॥३॥
3114 " वेचावें तें जीवें । पूजा घडे ऐशा नावें ॥१॥ बिगारीची ते बिगारी । साक्षी अंतरींचा हरी ॥ध्रु.॥ फळ बीजाऐसें । कार्यकारणासरिसें ॥२॥ तुका म्हणे मान । लवणासारिखें लवण ॥३॥
3115 " वेठी ऐसा भाव । न करी अहाच उपाव ॥१॥ रूप डसवी न जिवा । अवघा ये च ठायीं हेवा ॥ध्रु.॥ कृपणाचेपरि । लेखा पळनिमिषेवरि ॥२॥ तुका म्हणे आस । संनिध चि जगदीशा ॥३॥
3116 " वेडावलीं काय करावें या काळीं । म्हणे वनमाळी गोपाळांसि ॥१॥ शिरी धरूं गोवर्धन उचलूनि । म्हणे तुम्ही कोणी भिऊं नका ॥२॥ नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाका आरोळिया ॥३॥ अशंकित चित्ते न वटे त्यां खरें । धाकें च ते बरें म्हणती चला ॥४॥ चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका म्हणे घात होऊं नेदी ॥५॥
3117 " वेडिया उपचार करितां सोहळे । काय सुख कळे तयासी तें । अंधापुढें दीप नाचती नाचणें । भक्तिभावेंविण भक्ति तैसी ॥१॥ तिमाणें राखण ठेवियेलें सेता । घालुनियां माथां चुना तया । खादलें म्हणोनि सेवटीं बोबाली । ठायींची भुली कां नेणां रया ॥ध्रु.॥ मुकियापासाव सांगतां पुराण । रोगिया मिष्टान्न काईं होय । नपुंसका काय करील पद्मिणी । रुचिविण वाणी तैसे होय ॥२॥ हात पाय नाहीं करिल तो काईं । वृक्षा फळ आहे अमोलिक । हातां नये तैसा वांयां च तळमळी । भावेंविण भोळीं म्हणे तुका ॥३॥
3118 " वेडीं तें वेडीं बहुत चि वेडीं । चाखतां गोडी चवी नेणे ॥ध्रु.॥ देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥१॥ कडिये मूल भोंवतें भोंये । मोकलुनि रडे धाये ॥२॥ लेंकरें वत्ति पुसे जगा । माझा गोहो कोण तो सांगा ॥३॥ आपुली शुद्धि जया नाहीं । आणिकांची ते जाणे काईं ॥४॥ तुका म्हणे ऐसे जन । नर्का जातां राखे कोण ॥५॥
3119 " वेडें वांकडें गाईंन । परि मी तुझा चि म्हणवीन॥१॥ मज तारीं दिनानाथा । ब्रीदें साच करीं आता ॥ध्रु.॥ केल्या अपराधांच्या राशीं । म्हणऊनि आलों तुजपाशीं ॥२॥ तुका म्हणे मज तारीं । सांडीं ब्रीद नाहींतरी ॥३॥
3120 " वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमातिरीं ॥१॥ चलाचला संत जन । करा देवासी भांडण ॥ध्रु.॥ लुटालुटा पंढरपूर । धरा रखुमाईचा वर ॥२॥ तुका म्हणे चला । घाव निशानी घातला ॥३॥
3121 " वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनष्टि नाम गावें ॥ध्रु.॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतका चि निर्धार ॥२॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हा चि हेत ॥३॥
3122 " वेद जया गाती । आम्हां तयाची संगति ॥१॥ नाम धरियेलें कंठीं । अवघा सांटविला पोटीं ॥ध्रु.॥ ॐकाराचें बीज । हातीं आमुचे तें निज ॥२॥ तुका म्हणे बहु मोटें । अणुरणियां धाकुटें ॥३॥
3123 " वेद नेलें शंखासुरें । केलें ब्रम्ह्यानें गार्हाणें ॥१॥ धांव धांव झडकरी । ऐसें कृपाळुवा हरी ॥ध्रु.॥ गजेंद्र नाडियें गांजिला । तेणें तुझा धांवा केला ॥२॥ तुका म्हणे पद्मनाभा । जेथें पाहें तेथें उभा ॥३॥
3124 " वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका ॥१॥ तार्कियाचें अंग आपणा पारिखें । माजिर्यासारिखें वाईंचाळे ॥ध्रु.॥ माता निंदी तया कोण तो आधार । भंगलें खपर याचे नावें ॥२॥ तुका म्हणे आडराणें ज्याची चाली । तयाची ते बोली मिठेंविण ॥३॥
3125 " वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाखविलें ॥१॥ तुझीं वर्में तूं चि दावूनि अनंता । होतोसी नेणता कोण्या गुणें ॥ध्रु.॥ यज्ञाचा भोक्ता तरि कां नव्हे सांग । उणें पडतां अंग क्षोभ घडे ॥२॥ वससी तूं या भूतांचे अंतरीं । तरि कां भेद हरी दावियेला ॥३॥ तपतिर्थाटणें तुझे मूर्तिदान । तरि कां अभिमान आड येतो ॥४॥ आतां क्षमा कीजे विनवितो तुका । देऊनियां हाका उभा द्वारीं ॥५॥ लोहागांवीं स्वामींच्या अंगावर ऊन पाणी घातलें - तो अभंग ॥१॥ १३१३ जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा ॥१॥ पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें ॥ध्रु.॥ फुटोनियां दोन्ही भाग होऊं पाहे । पाहातोसी काय हृदय माझें ॥२॥ घेऊनि जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें काहींहीं न चले येथें ॥३॥ तुका म्हणे माझी तूं होसी जननी । आणीक निर्वाणीं कोण राखे ॥४॥
3126 " वेदविहित तुम्ही आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥१॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥ प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥२॥ आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अग्नि एक ॥३॥ तुका म्हणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥४॥
3127 " वेदाचा तो अर्थ आम्हांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥१॥ खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं । भार धन वाही मजुरीचें ॥ध्रु.॥ उत्पत्तिपाळणसंहाराचें निज । जेणें नेलें बीज त्याचे हातीं ॥२॥ तुका म्हणे आलें आपण चि फळ । हातोहातीं मूळ सांपडलें ॥३॥
3128 " वेरझारीं जाला सीण । बहु केलें क्षीदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथें फावला ॥१॥ आतां काय भीड भार । धरूनियां लोकचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥ध्रु.॥ आलें बहुतांच्या मना । कां रे न होसी शाहाणा । मुळींच्या वचना । आम्ही जागों आपुल्या ॥२॥ तुका म्हणे चौघांमधीं । तुज नेलें होतें आधीं । आतां नामधीं । उरी कांहीं राहिली ॥३॥
3129 " वेळोवेळां हें चि सांगें । दान मागें जगासि ॥१॥ विठ्ठल हे मंगळवाणी । घेऊं धणी पंगती ॥ध्रु.॥ वेचतसे पळें पळ । केलें बळ पाहिजे ॥२॥ तुका म्हणे दुश्चित नका । राहों फुका नाड हा ॥३॥
3130 " वेश वंदाया पुरते । कोण ब्राम्हण निरुते ॥१॥ ऐसें सांगा मजपाशीं । संतां निरवितों येविशीं ॥ध्रु.॥ असा जी प्रवीण । ग्रंथीं कळे शुद्धहीण ॥२॥ तुका म्हणे लोपें । सत्याचिया घडती पापें ॥३॥
3131 " वैकुंठींचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक ॥१॥ धारष्टि धैर्याचा वरिष्ठ भक्तांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥ध्रु.॥ पितृसेवा पुण्यें लाधला निधान । ब्रम्ह सनातन अंगसंगें ॥२॥ अंगसंगें रंगें क्रीडा करी जाणा । ज्या घरीं पाहुणा वैकुंठींचा ॥३॥ धन्य त्याची शक्ति भक्तीची हे ख्याति । तुका म्हणे मुक्ति पायीं लोळे ॥४॥
3132 " वैकुंठींचें सुख पंढरिये आलें । अवघें पुंडलिकें सांटविलें ॥१॥ घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेउनि खरें माप। करा एक खेप । मग करणें न लगे ॥ध्रु.॥ विषय गुंडोनी ठेवीं पसारा । मग धांव घ्या पंढरपुरा ॥२॥ जंव आहे आयुष्याचा लेश । तंव करीं पंढरीचा वास ॥३॥ अळस न करीं लाभाचा । तुका विनवी कुणबियाचा ॥४॥
3133 " वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥१॥ समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चत्तिवत्ति समर्पिलें ॥२॥ समर्था तीं गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥ रामकृष्णें केलें कौतुक गोकुळीं । गोपाळांचे मेळीं गाईं चारी ॥४॥ गाईं चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळीचें ॥५॥ काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या म्हैसी गाईं पशु ॥६॥ सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका गोपाळीं धणीवरि ॥७॥ धणीवरि त्यांसी सांगितली मात । जयाचें जें आर्त तयापरी ॥८॥ परी याचि तुम्ही आइका नवळ । दुर्गम जो खोल साधनासि ॥९॥ शिक लावूनियां घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवें चि तो ॥१०॥ तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें । शिव्या देतां सुखें हासतुसे ॥११॥ हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥१२॥ तो जेंजें करिल तें दिसे उत्तम । तुका म्हणे वर्म दावी सोपें ॥१३॥
3134 " वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥१॥ रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥ध्रु.॥ नेदी रुका वेचों मोल । पोहे बोल प्रीतीचे ॥२॥ तुका म्हणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥३॥
3135 " वैभव राज्य संपत्ती टाकावी । उदरार्थ मागावी माधोकरी ॥१॥ आपुलें तें आधीं करावें स्वहित । ऐसी आहे नीत स्वधर्माची ॥ध्रु.॥ वर्ण कुळ जाति याचा अभिमान । तजावा सन्मान लौकिकाचा ॥२॥ तुका म्हणे राहे एकाकी निःशंक । देउनियां हाक कंठीं काळ ॥३॥
3136 " वैभवाचे धणी सकळां शरणागत । सत्यभावें चत्ति अर्पिलें तें ॥१॥ नेदी उरों देव आपणावेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥ जाणोनि नेणोनि अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणच ॥२॥ तुका म्हणे बरें धाकट्याचें जिणें । माता स्तनपानें वाढवते ॥३॥
3137 " वैभवाचे धनी सकळ शरणागत । सत्यभावें चित्त अर्पिलें तें ॥१॥ नेदी उरों देव आपणांवेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥ जाणोनि नेणती अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणे चि ॥२॥ तुका म्हणे बरे धाकट्याचें जिणें । माता स्तनपानें वाढविते ॥३॥
3138 " वैरागरापाशीं रत्नाचिया खाणी । हे चि घ्यावी धणी फावेल तों ॥१॥ येथें नाहीं तर्कवितर्काची चाड । होतसे निवाड खर्या खोट्यां ॥ध्रु.॥ उगा च सारावा वाढिला तो ठाव । वाढितिया भाव कळतसे ॥२॥ तुका म्हणे टांचणीचें पाणी । येथें झरवणी जैशातैसें ॥३॥
3139 " वैराग्याचा अंगीं जालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया ॥१॥ कां जी याचें करूं नये समाधान । वियोगानें मन सिणतसे ॥ध्रु.॥ नये चि यावया पंढरीचें मूळ । न देवे चि माळ कंठींची ही ॥२॥ तुका म्हणे जालें अप्रीतीचें जिणें । लाजिर हें वाणें सेवा करी ॥३॥
3140 " वैराग्याचें भाग्य । संतसंग हा चि लाग ॥१॥ संतकृपेचे हे दीप । करी साधका निष्पाप ॥ध्रु.॥ तो चि देवभक्त । भेदाभेद नाहीं ज्यांत ॥२॥ तुका प्रेमें नाचे गाये । गाणियांत विरोन जाये ॥३॥
3141 " वैष्णवमुनिविप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये ॥१॥ प्रभु जाला तरी संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥२॥ तुका म्हणे हे आशीर्वादें बळी । जाईंल तो छळी नरकायासीं ॥३॥
3142 " वैष्णवां संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥१॥ गायें नाचें उडें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें ॥ध्रु.॥ लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरतें ॥२॥ तुका म्हणे आतां आपुल्या सायासें । आम्हां जगदेशें सांभाळावें ॥३॥
3143 " वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही अठरांजणीं चहूं वेदीं ॥१॥ ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धार्मिक पुण्यशील ॥ध्रु.॥ आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर । शुका ऐसा थोर आणिक नाहीं ॥२॥ तुका म्हणे मुगुटमणी हे भक्ति । आणीक विश्रांति अरतिया ॥३॥
3144 " वैष्णवें चोरटीं । आलीं घरासी करंटीं ॥१॥ आजि आपुलें जतन । करा भांडें पांघुरण ॥ध्रु.॥ ज्याचे घरीं खावें । त्याचें सर्वस्वें ही न्यावें ॥२॥ तुका म्हणे माग । नाहीं लागों देत लाग ॥३॥
3145 " वोखटा तरी मी विटलों देहासी । पुरे आतां जैसी जोडी पुन्हां ॥१॥ किती मरमर सोसावी पुढती । राहिलों संगती विठोबाचे ॥ध्रु.॥ आतां कोण याचा करील आदर । जावो कळिवर विटंबोनि ॥२॥ तुका म्हणे आतां सांडि तें चि सांडि । कोण फिरे लंडी यासी मागें ॥३॥
3146 " वोडविलें अंग । आतां करूनि घ्यावें सांग ॥१॥ काय पूजा ते मी नेणें । जाणावें जी सर्वजाणें ॥ध्रु.॥ पोटा आलें बाळ । त्याचें जाणावें सकळ ॥२॥ चुका म्हणे हरी । वाहावें जी कडियेवरी ॥३॥
3147 " वोनव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥१॥ तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ध्रु.॥ चोरासवें वाट । चालोनि केलें तळपट ॥ २॥ डोळे झांकुनि राती । कूर्पी पडे दिवसा जोती ॥३॥ पोसी वांज गाय । तेथें कैची दुध साय ॥४॥ फुटकी सांगडी । तुका म्हणे न पवे थडी ॥५॥
3148 " वोरसोनि येती । वत्सें धेनुवेच्या चित्ती ॥१॥ माझा कराया सांभाळ । वोरसोनियां कृपाळ ॥ध्रु.॥ स्नेहें भूक तान । विसरती जाले सीण ॥२॥ तुका म्हणे कौतुकें । दिलें प्रेमाचें भातुकें ॥३॥
3149 " व्यभिचारिणी गणिका कुंटणी । विश्वास चि मनीं राघोबाचा ॥१॥ ऐसी ही पापिणी वाइली विमानी । अचळ भुवनीं टेवियेली ॥ध्रु.॥ पतितपावन तिहीं लोकीं ठसा । कृपाळू कोंवसा अनाथांचा ॥२॥ तुका म्हणे विठोबाची धरा सोय । आणिक उपाय नेणों किती ॥३॥
3150 " व्यवहार तो खोटा । आतां न वजों तुझ्या वाटा ॥१॥ एका नामा नाहीं ताळ । केली सहजरांची माळ ॥ध्रु.॥ पाहों जातां घाईं । खेळसी लपंडाईं ॥२॥ तुका म्हणे चार । बहु करितोसी फार ॥३॥
3151 " व्यापक हा विश्वंभर । चराचर याचेनी ॥१॥ पंढरिराव विटेवरि । त्याचींच धरीं पाउलें ॥ध्रु.॥ अवघियांचा हा चि ठाव । देवोदेवीं सकळ ॥२॥ तुका म्हणें न करीं सोस । भेदें दोष उफराटे ॥३॥
3152 " व्यापिलें सर्वत्र । बाहेरी भीतरीं अंत ॥१॥ ऐसें गोविंदें गोविलें । बोलें न वजाये बोलिले ॥ध्रु.॥ संचिताची होळी । करूनि जीव घेतला बळी ॥२॥ तुकयाबंधु म्हणे नाहीं । आतां संसारा उरी कांहीं ॥३॥
3153 " व्हावया भिकारी हें आम्हां कारण । अंतरोनि जन जावें दुरी ॥१॥ संबंध तुटावा शब्दाचा ही स्पर्श । म्हणऊनि आस मोकलिली ॥२॥ तुका म्हणे दुःखें उबगला जीव । म्हणऊनी कीव भाकीं देवा ॥३॥
3154 " शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥१॥ ना भी ना भी भक्तराया । वेगीं पावलों सखया ॥ध्रु.॥ दुरूनि येतां दिसे दृष्टी । धाकें दोष पळती सृष्टी ॥२॥ तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरि आला ॥३॥
3155 " शकुनानें लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥१॥ भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥ प्रीत कळे आलिंगनीं । संपादनीं अत्यंत ॥२॥ तुका म्हणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें ॥३॥
3156 " शक्ती द्याव्या देवा । नाहीं पदार्थी सेवा ॥१॥ मुख्य आहे ऐसा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥ध्रु.॥ मना पोटीं देव । जाणे जैसा तैसा भाव ॥२॥ तुका म्हणे सोसें । लागे लाविल्याचें पिसें ॥३॥
3157 " शब्दज्ञानी येऊं नेदीं दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्त ते ॥१॥ जळो ते जाणींव जळो त्याचे दंभ । जळो त्याचें तोंड दुर्जनाचें ॥२॥ तुका म्हणे येती दाटूनि छळाया । त्यांच्या बोडूं डोया न धरूं भीड ॥३॥
3158 " शरण आलें त्यासी न दावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥१॥ अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ध्रु.॥ गांजिलियाचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥२॥ भागलियाचा होई रे विसांवा । परिसावी केशवा विज्ञापना ॥३॥ अंकिताचा भार वागवावा माथां । परिसावी अनंता विज्ञापना ॥४॥ तुका म्हणे आम्हां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥५॥
3159 " शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥१॥ स्तुती न पुरे हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ध्रु.॥ देह सांभाळून । पायांवरी लोटांगण ॥२॥ विनवी संता तुका दीन । नव्हे गोरवें उत्तीर्ण ॥३॥
3160 " शरणागत जालों । तेणें मीपणा मुकलों ॥१॥ आतां दिल्याची च वाट । पाहों नाहीं खटपट ॥ध्रु.॥ नलगे उचित । कांहीं पाहावें संचित ॥२॥ तुका म्हणे सेवा । माने तैसी करूं देवा ॥३॥
3161 " शादीचें तें सोंग । संपादितां जरा वेंग ॥१॥ पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥ध्रु.॥ दिसतें तें लोपी । झिंज्या बोडुनियां पापी ॥२॥ सिंदळी त्या सती । तुका म्हणे थुंका घेती ॥३॥
3162 " शास्त्रज्ञ हो ज्ञाते असती बहुत । परि नाहीं चित्त हाता आलें ॥१॥ क्षणा एका साटीं न धरवे धीर । तेणें हा रघुवीर अंतरतो ॥ध्रु.॥ तोळाभर सोनें रतिभार राई । मेळविल्या पाहीं नास होतो ॥२॥ हरीचे अंकित असती विरळागत । तयांसी अच्युत कृपा करी ॥३॥ तुका म्हणे काय धुडवण्या गोष्टी । जंव नाहीं गांठी चित्त आलें ॥४॥
3163 " शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥१॥ कैसें येथें कैसें तेथें । शहाणे ते जाणती ॥ध्रु.॥ यज्ञमुखें खोडी काढी । कोण गोडी बोरांची ॥२॥ तुका म्हणे भावाविण । अवघा सीण केला होय ॥३॥
3164 " शाहाणियां पुरे एक चि वचन । विशारती खुण ते चि त्यासी ॥१॥ उपदेश असे बहुतांकारणें । घेतला तो मनें पाहिजे हा ॥ध्रु.॥ फांसावेना तरिं दुःख घेतें वाव । मग होतो जीव कासावीस ॥२॥ तुका म्हणे नको राग धरूं झोंडा । नुघडितां पीडा होइल डोळे ॥३॥
3165 " शिकल्या शब्दाचें उत्पादितों ज्ञान । दरपणींचें धन उपर वाया ॥१॥ अनुभउ कइं होईंन भोगिता । सांकडें तें आतां हें चि आलें ॥ध्रु.॥ गायें नाचें करीं शरीराचे धर्म । बीजकळावर्म तुमचें दान ॥२॥ तुका म्हणे केला उशीर न साहे । द्याल तरी आहे सर्व सद्धि ॥३॥
3166 " शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥१॥ निरयगांवीं भोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥ध्रु.॥ अवगुणांचा सांटा करी । ते चि धरी जीवासी ॥२॥ तुका म्हणे जडबुद्धि । कर्मशुद्धी सांडवीं ॥३॥
3167 " शिकवणेसाटीं वाटते तळमळ । पुढें येईंल काळा फोडों डोईं ॥१॥ तेव्हां त्यासि काय देशील उत्तर । मेळउनि अंतर ठेवितोसि ॥ध्रु.॥ येथींचिया सोंगें भोरपियाचे परि । होईंल तें दुरि शृंगारिलें ॥२॥ तुका म्हणे कां रे राखिलें खरकटें । रागेल्याचे तंट रागेलें का ॥३॥
3168 " शिकविले बोल । बोलें तैसी नाहीं ओल ॥१॥ आतां देवा संदेह नाहीं । वांयां गेलों यासी कांहीं ॥ध्रु.॥ एकांताचा वास । नाहीं संकल्पाचा नास ॥२॥ बुद्धि नाहीं स्थिर । तुका म्हणे शब्दा धीर ॥३॥
3169 " शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल ॥१॥ आपणियां रंजविलें । बापें माझिया विठ्ठलें ॥ध्रु.॥ हातीं प्रेमाचें भातुकें । आम्हां देऊनियां निकें ॥२॥ तुका करी टाहो । पाहे रखुमाईंचा नाहो ॥३॥
3170 " शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ॥१॥ त्याग करूं नये खरें । ऐसें विचारावें बरें ॥ध्रु.॥ तुमचिया तोंडें । धर्माधर्म चि खंडे ॥२॥ मजसाटीं देवा । कां हो लपविला हेवा ॥३॥ जाला सावधान । त्यासी घालावें भोजन ॥४॥ तुका म्हणे पिता । वरी बाळाच्या तो हिता ॥५॥
3171 " शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरि तूं जाण श्रुतिदास ॥१॥ त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥ बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुकों नको ॥२॥ शिखा सूत्र याचा तोडीं तूं संबंध । मग तुज बाध नाहींनाहीं ॥३॥ तुका म्हणे तरि वत्तूऩिन निराळा । उमटती कळा ब्रम्हींचिया ॥४॥
3172 " शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ ॥१॥ ऐसा वारावा तो श्रम । अतिशयीं नाहीं काम ॥ध्रु.॥ सांभाळावें वर्म । उचिताच्या काळें धर्म ॥२॥ तुका म्हणे कळे । ऐसें कारणाचे वेळे ॥३॥
3173 " शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव ॥१॥ होय जतन तें गोड । अंतरा येती नाड ॥ध्रु.॥ देव जोडे भावें । इच्छेचें तें प्रेम घ्यावें ॥२॥ तुका म्हणे मोड दावी । तैशीं फळें आलीं व्हावीं ॥३॥
3174 " शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाउनियां छंदे जैसी तैसी ॥१॥ जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥ फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥ मायबापा सोडविलें बंदीहुनि । चाणूर मर्दुनी कंसादिक ॥४॥ दिक नाहीं देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥ मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥ पाप कोठें राहे हरी आठवितां । भक्ती द्वेषें चिंता जैसा तैसा ॥७॥ साक्षी तयापाशीं पूर्वीलकर्माच्या । बांधला सेवेच्या रुणी देव ॥८॥ देव भोळा धांवे भक्ता पाठोवाठी । उच्चारितां कंठीं मागेंमागें ॥९॥ मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी । धांवे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥
3175 " शिव शक्ति आणि सूर्य गणपति । एक चि म्हणती विष्णूस ही ॥१॥ हिरा गार दोनी मानिती समान । राजस भजनें वांयां जाती ॥ध्रु.॥ अन्य देवतांसि देव म्हणऊन । तामस जीवन तमोयोग्या ॥२॥ वांयां जायासाठीं केलासे हव्यास । अन्य देवतांस देवपण ॥३॥ आपुलिया मुखें सांगतसे धणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥४॥ धन्य ते वैष्णव भजती केशव । साित्वक हे जीव मोक्षा योग्य ॥५॥ तुका म्हणे मोक्ष नाहीं कोणापासीं । एका गोविंदासी शरण व्हा रे ॥६॥
3176 " शिष्या सांगे उपदेश । गुरुपूजा हे विशेष ॥१॥ दावी आचार सोवळे । दंड कमंडलु माळे ॥ध्रु.॥ छाटी भगवी मानसीं । व्यर्थ म्हणवी संन्यासी ॥२॥ तुका म्हणे लोभ । न सुटे नाहीं लाभ ॥३॥
3177 " शिष्यांची जो नेघे सेवा । मानी देवासारिखें ॥१॥ त्याचा फळे उपदेश । आणिकां दोष उफराटे ॥ध्रु.॥ त्याचें खरें ब्रम्हज्ञान । उदासीन देहभावीं ॥२॥ तुका म्हणे सत्य सांगें । योत रागें येती ते ॥३॥
3178 " शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी चरणींचें ॥१॥ सेवन हे शिरसा धरीं । अंतरीं हीं वरदळा ॥ध्रु.॥ अवघें चि नासी पाप । तीर्थ बाप माझ्याचें ॥२॥ बैसोनियां तुका तळीं । त्या कल्लोळीं डौरला ॥३॥
3179 " शीतळ साउली आमुची माउली । विठाईं वोळली प्रेमपान्हा ॥१॥ जाऊनि वोसंगा वोरस । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥ कृपा तनु माझा सांभाळी दुभूनि । अमृतजीवनी लोटलीसे ॥२॥ आनंदाचा ठाव नाहीं माझा चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥३॥ सैर जाये पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आस ॥४॥ तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाईंचें ॥५॥ रामचरित्र - अभंग ॥१४॥ १०९० रामा वनवास । तेणें वसे सर्व देश ॥१॥ केलें नामाचें जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ध्रु.॥ वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥२॥ तुका म्हणें ॠषिनेम । ऐसा कळोनि कां भ्रम ॥३॥
3180 " शुद्ध ऐसें ब्रम्हज्ञान । करा मन सादर ॥१॥ रवि रसां सकळां शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ध्रु.॥ कोणासवें नाहीं चोरी । सकळांवरी समत्व ॥२॥ सत्य तरी ऐसें आहे । तुका पाहे उपदेशीं ॥३॥
3181 " शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं ॥१॥ कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥ध्रु.॥ उदक भिन्न असे काईं । वाहाळ बावी सरिता नईं ॥२॥ सूर्य तेजें निवडी काय । रश्मी रसा सकळा खाय ॥३॥ वर्णां भिन्न दुधा नाहीं । सकळा गाई सारखें ॥४॥ करितां भिन्न नाहीं माती । मडक्या गति भिन्न नांवें ॥५॥ वर्त्ते एकविध अग्नि । नाहीं मनीं शुद्धाशुद्ध ॥६॥ तुका म्हणे पात्र चाड । किंवा विसें अमृत गोड ॥७॥
3182 " शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ । अशुभ मंगळ मंगळाचें ॥१॥ हातींचिया दीपें दुराविली निशी । न देखिजे कैसी आहे ते ही ॥ध्रु.॥ सुख दुःखाहूनि नाहीं विपरीत । देतील आघात हितफळें ॥२॥ तुका म्हणे आतां आम्हांसी हें भलें । अवघे चि जाले जीव जंत ॥३॥
3183 " शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥१॥ आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥२॥ हरुषलीं माता केलें निंबलोण । गोपाळांवरून कुरवंडी ॥३॥ गोपाळां भोवतें मिळालें गोकुळ । अवघीं सकळ लहान थोरें ॥४॥ थोर सुख जालें ते काळीं आनंद । सांगती गोविंद वरि आला ॥५॥ आले वरि बैसोनियां नारायण । काळया नाथून वहन केलें ॥६॥ नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥७॥ नारायणापुढें गोपाळ चालती । आनंदें नाचती गाती गीत ॥८॥ तंव तो देखिला वैकुंठींचा पती । लोटांगणीं जाती सकळ ही ॥९॥ सकळ ही एका भावें आलिंगिले । अवघियां जाले अवघे हरि ॥१०॥ हरि आलिंगनें हरिरूप जालीं । आप विसरलीं आपणास ॥११॥ सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबापां भावें लोकपाळां ॥१२॥ मायबाप देवा नाहीं लोकपाळ । सारिखीं सकळ तुका म्हणे ॥१३॥
3184 " शूद्रवंशी जन्मलों । म्हणोनि दंभें मोकलिलों ॥१॥ अरे तूं चि माझा आतां । मायबाप पंढरीनाथा ॥ध्रु.॥ घोकाया अक्षर । मज नाहीं अधिकार ॥२॥ सर्वभावें दीन । तुका म्हणे यातिहीन ॥३॥
3185 " शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥१॥ केला न संडी कैवाड । जीवेंसाटीं तों हे होड ॥ध्रु.॥ धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥२॥ तुका म्हणे हरि । दासां रक्षितो निर्धारीं ॥३॥
3186 " शूरां साजती हतियारें । गांढव्या हासतील पोरें ॥१॥ काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ध्रु.॥ पतिव्रते रूप साजे । सिंदळ काजळ लेतां लाजे ॥२॥ दासी पत्नी सुता । नव्हे सरी एक पिता ॥३॥ मान बुद्धीवंतां । थोर न मनिती पिता ॥४॥ तुका म्हणे तरी । आंत शुद्ध दंडे वरी ॥५॥
3187 " शृंगारिक माझीं नव्हती उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥१॥ न घलावा मधीं कामाचा विलंब । तुम्ही तों स्वयंभ करुणामूर्ति ॥२॥ तुका म्हणे केलें सन्मुख वदन । देखतां चरण पोटाळीन ॥३॥
3188 " शेवटींची विनंती । ऐका ऐका कमळापती ॥१॥ काया वाचा मन । चरणीं असे समर्पण ॥ध्रु.॥ जीवपरमात्मा ऐक्यासि । सदा वसो हृदयेंसीं ॥२॥ तुका म्हणे देवा । कंठीं वसावें केशवा॥३॥
3189 " शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणों पोटीं आहे ॥१॥ तरी च नेदा जी उत्तर । दुःखी राखिलें अंतर ॥ध्रु.॥ जावें वनांतरा । येणें उद्देशें दातारा ॥२॥ तुका म्हणे गिरी । मज सेववावी दरी ॥३॥
3190 " शोधितां चि नये । म्हणोनि वोळगतों पाये ॥१॥ आतां दिसों नये जना । ऐसें करा नारायणा ॥ध्रु.॥ परतोनि मन । गेलें ठायीं चि मुरोन ॥२॥ विसरला तुका । बोलों चालों जाला मुका ॥३॥
3191 " शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥१॥ म्हणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥ एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहाताच्या ध्वनी गगन गर्जे ॥२॥ तुकया स्वामी स्थापी निजपदीं दासा । करूनि उल्हासा सप्रेमता ॥३॥
3192 " श्रमपरिहारा । मूळ हें जालें दातारा ॥१॥ देह निवेदूनि पायीं । जालों रिकामा उतराईं ॥ध्रु.॥ आपली ते सत्ता । येथें असों नेदीं आतां ॥२॥ राहिला निराळा । तुका कटकटे वेगळा ॥३॥
3193 " श्रीपंढरीशा पतितपावना । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥ अनाथां जीवांचा तूं काजकैवारी । ऐसी चराचरीं ब्रिदावळी ॥ध्रु.॥ न संगतां कळे अंतरीचें गुज । आतां तुझी लाज तुज देवा ॥२॥ आळिकर ज्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देऊनियां ॥३॥ तुका म्हणे तूं चि खेळें दोहीं ठायीं । नसेल तो देई धीर मना ॥४॥
3194 " श्रीमुख वोणवा गिळीत चालिलें । भ्यासुर वासिलें वदनांबुज ॥१॥ विक्राळ त्या दाढा भ्यानें पाहावेना । धाउनी रसना ज्वाळ गिळी ॥ध्रु.॥ जिव्हा लांब धांवे गोळा करी ज्वाळ । मोटें मुखकमळ त्यांत घाली ॥ २॥ तुका म्हणे अवघा वोणवा गीळिला। आनंद जाहाला गोपाळांसी ॥३॥
3195 " श्रीराम सखा ऐसा धरीं भाव । मीपणाचा ठाव पुसीं मना ॥१॥ शरण निरंतर म्हण तूं गोविंदा । वाचे लावीं धंदा नारायण ॥ध्रु.॥ यापरि सोपान नाहीं रे साधन । वाहातसें आण तुझी मना ॥२॥ नको कांहीं करूं अळस अंतरीं । जपें निरंतर रघुपती ॥३॥ तुका म्हणे मोठा लाभ नरदेहीं । देहीं च विदेही होती नामें ॥४॥
3196 " श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करीं दंडवत ॥१॥ विश्रांती पावलों सांभाळउत्तरीं । वाढलें अंतरीं प्रेमसुखें ॥ध्रु.॥ डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥२॥ तुका म्हणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा वोडवला ॥३॥
3197 " श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोंवे ॥१॥ तैसी जाली मज परी । वसे निकट सेजारीं ॥ध्रु.॥ जेवितां जवळी । येऊनियां पुंस घोळी ॥२॥ कोपेल तो घनी । तुका म्हणे नेणें मनीं ॥३॥
3198 " श्वानाचियापरी लोळें तुझ्या दारीं । भुंकों हरिहरि नाम तुझें ॥१॥ भुंकीं उठीं बैसें न वजायें वेगळा । लुडबुडीं गोपाळा पायांपाशीं ॥२॥ तुका म्हणे आम्हां वर्म आहे ठावें । मागेन ते द्यावें प्रेमसुख ॥३॥
3199 " षडधसीं रांधिलें खापरीं घातलें । चोहोटा ठेविलें मध्यरात्रीं ॥१॥ त्यासी सदाचारी लोक न शिवती । श्वानासी निश्चिती फावलें तें ॥ध्रु.॥ तैसें दुष्टकर्म जालें हरिभक्ता । त्यागिली ममता विषयासक्ति ॥२॥ इहपरलोक उभय विटाळ । मानिती केवळ हरिचे दास ॥३॥ तुका म्हणे देवा आवडे हे सेवा । अनुदिनीं व्हावा पूर्ण हेतु ॥४॥
3200 " संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें ॥१॥ अवघियांचें पुरे कोड । फिडे जड देहत्व ॥ध्रु.॥ उभय लोकीं उत्तम कीर्ति । देव चित्तीं राहिलिया ॥२॥ तुका म्हणे जीव धाय । नये हाय जवळी ॥३॥
3201 " संकिल्पला तुज सकळ ही भाव । कोण एक ठाव उरला तेथें ॥१॥ इंद्रियव्यापार जेंजें कांहीं कर्म । करितों ते धर्म सकळ तुझे ॥ध्रु.॥ माझें हित फार लागला विचार । तुज सर्व भार चालवणें ॥२॥ जो कांहीं लौकिक करिसी तो तुझा । अपमान पूजा कांहींतरि ॥३॥ तुका म्हणे मी तों राहिलों निश्चिंत । तुज कळे हित तैसें करीं ॥४॥
3202 " संकोचतो जीव महत्वाच्या भारें । दासत्व चि बरें बहु वाटे ॥१॥ कळावी जी माझी आवडी हे संतां । देणें तरि आतां हें चि द्यावें ॥ध्रु.॥ तुमचे चरण पावविलों सेवा । म्हणउनि हेवा हा चि करीं ॥२॥ विनउनी तुका वंदितो चरण । लेखा रजरेण चरणींचें ॥३॥
3203 " संकोचोनि काय जालासी लहान । घेई अपोशण ब्रम्हांडाचें ॥१॥ करोनि पारणें आंचवें संसारा । उशीर उशिरा लावूं नको ॥ध्रु.॥ घरकुलानें होता पडिला अंधार । तेणें केलें फार कासावीस ॥२॥ झुगारूनि दुरी लपविलें काखे । तुका म्हणे वाखे कौतुकाचे ॥३॥
3204 " संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥१॥ जैसीं तैसीं असों पुढिलांचे सोईं । धरिती हातीं पायीं आचारिये ॥ध्रु.॥ उपकारी नाहीं देखत आपदा । पुढिलांची सदा दया चित्तीं ॥२॥ तुका म्हणे तरीं सज्जनाची कीतिऩ । पुरवावी आर्ति निर्बळांची ॥३॥
3205 " संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥१॥ याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ध्रु.॥ एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥२॥ शब्दज्ञानी हित नेणती आपुलें । आणीक देखिलें नावडे त्या ॥३॥ तुका म्हणे आतां एकलें चि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥४॥
3206 " संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां परि त्याचें ॥१॥ त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईंवरी आणिक गाईं ॥२॥ गाईं दवडुनि घालिती बाहेरी । तंव म्हणे हरि बांधा त्या ही ॥३॥ त्याही तुम्ही बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाड्यातुनि ॥४॥ पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥ नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥६॥ मेलीं हीं शाहाणीं करितां सायास । नाहीं सुखलेश तुका म्हणे ॥७॥
3207 " संचित तैशी बुद्धि उपजे मनामधीं । सांगितलें सिद्धि नव जाय ॥१॥ ज्याचा जैसा ठेवा तो त्यापाशीं धांवे । न लगती करावे उपदेश ॥२॥ घेऊन उठती आपुलाले गुण । भविष्याप्रमाणें तुका म्हणे ॥३॥
3208 " संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघा जाला नारायण ॥१॥ नाहीं आम्हांसी संबंधु । जरा मरण कांहीं बाधु ॥ध्रु.॥ द्वैताद्वैतभावें । अवघें व्यापियेलें देवें ॥२॥ तुका म्हणे हरि । आम्हांमाजी क्रीडा करी ॥३॥
3209 " संचितावांचून । पंथ न चलवे कारण ॥१॥ कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥ धन वित्त जोडे । देव ऐसें तों न घडे ॥२॥ तुका म्हणे आड । स्वहितासी बहु नाड ॥३॥
3210 " संचितें चि खावें । पुढें कोणाचें न घ्यावें ॥१॥ आतां पुरे हे चाकरी । राहों बैसोनियां घरीं ॥ध्रु.॥ नाहीं काम हातीं । आराणूक दिसराती ॥२॥ तुका म्हणे सत्ता । पुरे पराधीन आतां ॥३॥
3211 " संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥१॥ कासयानें पूजा करूं । चरण हृदयीं च धरूं ॥ध्रु.॥ काया कुरवंडी । करुन ओंवाळून सांडी ॥२॥ तुका म्हणे भावें । हात जोडीं असो ठावें ॥३॥
3212 " संत गाती हरिकीर्त्तनीं । त्यांचें घेइन पायवणी ॥१॥ हें चि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥ काया कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥२॥ संत महंत माझी पूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥३॥ तुका म्हणे नेणें कांहीं । अवघें आहे संतापायीं ॥४॥
3213 " संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥१॥ वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥ कथेमाजी निज वाटे नित्यक्षणीं । स्त्रियेचे कीर्तनीं प्रेमें जागे ॥२॥ तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥
3214 " संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं ॥१॥ माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥ केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥२॥ तुमचे पायीं पाइतन । मोचे माझे तन मन ॥३॥ तांबुलाची पिकधरणी । ते मी असें मुख पसरूनि ॥४॥ तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥५॥ लागती पादुका । ते मी तळील मृत्तिका ॥६॥ तुका म्हणे पंढरिनाथा । दुजें न धरावें सर्वथा ॥७॥
3215 " संत परत आले त्यांची भेट झाली ते अभंग ११ भागलेती देवा । माझा नमस्कार घ्यावा ॥१॥ तुम्ही क्षेम कीं सकळ । बाळ अवघे गोपाळ ॥ध्रु.॥ मारगीं चालतां । श्रमलेती येतां जातां ॥२॥ तुका म्हणे कांहीं । कृपा आहे माझ्या ठायीं ॥३॥
3216 " संत मानितील मज । तेणें वाटतसे लाज ॥१॥ तुम्ही कृपा केली नाहीं । चित्त माझें मज ग्वाही ॥ध्रु.॥ गोविलों थोरिवां । दुःख वाटतसे जीवा ॥२॥ तुका म्हणे माया । अवरा हे पंढरिराया ॥३॥
3217 " संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥ काय करावीं साधनें । काय नव्हे एक तेणें ॥ध्रु.॥ शेष घेईंन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥२॥ तुका म्हणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥३॥
3218 " संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥१॥ मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥ध्रु.॥ कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप ॥२॥ तुका म्हणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥३॥
3219 " संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥१॥ पडिले दुःखाचे सागरीं । वहावले ते भवपुरीं ॥ध्रु.॥ कामक्रोधलोभ चित्तीं । वरिवरि दाविती विरक्ती ॥२॥ आशापाशीं बांधोनि चित्त । म्हणती जालों आम्ही मुक्त ॥३॥ त्यांचे लागले संगती । जाली त्यांसी ते चि गति ॥४॥ तुका म्हणे शब्दज्ञानें । जग नाडियेलें तेणें ॥५॥
3220 " संतजना माझी यावया करुणा । म्हणउनी दीन हीन जालों ॥१॥ नेणें योग युक्ती नाहीं ज्ञान मति । गातसें या गीती पांडुरंगा ॥ध्रु.॥ भाव भक्ती नेणें तप अनुष्ठान । करितों कर्तिन विठ्ठलाचें ॥२॥ ब्रम्हज्ञान ध्यान न कळे धारणा । एका नारायणा वांचूनियां ॥३॥ तुका म्हणे माझा विटोबासी भार । जाणे हा विचार तो चि माझा ॥४॥
3221 " संतन पन्हयां लें खडा । राहूं ठाकुरद्वार । चलत पाछेंहुं फिरों । रज उडत लेऊं सीर ॥१॥
3222 " संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥१॥ त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥ संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥२॥ तुका म्हणे तो नष्ट । जाणा गाढव तो स्पष्ट ॥३॥
3223 " संतपाउलें साजिरीं । गंगा आली आम्हांवरी ॥१॥ जेथें पडे रजधुळी । तेथें करावी अंघोळी ॥ध्रु.॥ स्वेतबंद वाराणसी । अवघीं तीथॉ तयापासीं ॥२॥ तुका म्हणे धन्य जालों । संतसागरीं मिळालों ॥३॥
3224 " संतसंगतीं न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥१॥ मग तया दोषा नाहीं परिहार । होय अपहार सुकृताचा ॥२॥ तुका म्हणे नमस्कारावे दुरून । अंतरीं धरून राहें रूप ॥३॥
3225 " संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तिमंत ॥१॥ घालूनियां काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरीं वास दिला ॥ध्रु.॥ आपुलेसें जिंहीं नाहीं उरों दिलें । चोजवितां भलें ऐसीं स्थळें ॥२॥ तुका म्हणे नाही झांकत परिमळ । चंदनाचें स्थळ चंदन चि ॥३॥
3226 " संतसेवेसि अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥१॥ ऐसियासी व्याली रांड । जळो जळो तिचें तोंड ॥ध्रु.॥ संतचरणीं ठेवितां भाव । आपेंआप भेटे देव ॥२॥ तुका म्हणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥३॥
3227 " संतां आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ ॥१॥ परिसतां तेथें नाहीं एकविणें । मोहें न पवे सीण ऐसें राखे ॥ध्रु.॥ केले अन्याय ते सांडवी उपचारें । न देखें दुसरें नासा मूळ ॥२॥ तुका म्हणे मुख्य कल्पतरुछाया । काय नाहीं दया तये ठायीं ॥३॥
3228 " संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥१॥ ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥ घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥२॥ तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम ॥३॥
3229 " संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥१॥ हे चि थोर चिंता लागली मनासी । निजतां निद्रेसी न लगे डोळा ॥ध्रु.॥ जेवितां जेवणीं न लगे गोड धड । वाटतें काबाड विषयसुख ॥२॥ ऐसिया संकटीं पाव कृपानिधी । लावीं संतपदीं प्रेमभावें ॥३॥ तुका म्हणे आम्हीं नेणों कांहीं हित । तुजविण अनाथ पांडुरंगा ॥४॥
3230 " संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें ॥१॥ बहु धड जरी जाली म्हैस गाय । तरी होईंल काय कामधेनु ॥२॥ तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरी च महिमान येईंल कळों ॥३॥
3231 " संतांचिया पायीं माझा विश्वास । सर्वभावें दास जालों त्यांचा ॥१॥ ते चि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ध्रु.॥ भागलिया मज वाहतील कडे । यांचियातें जोडे सर्व सुख ॥२॥ तुका म्हणे शेष घेईंन आवडी । वचन न मोडीं बोलिलों तें ॥३॥
3232 " संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥१॥ तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक ते चि मज ॥ध्रु.॥ संतांचिये गांवीं वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥२॥ संतांचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥३॥ संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साटीं घेती देती ॥४॥ तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परी । म्हणोनि भिकारी जालों त्यांचा ॥५॥
3233 " संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें ॥१॥ संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्ती । फाकों नये वृत्ति अखंडित ॥ध्रु.॥ दास्यत्व तें असे एकविध नांवें । उरों नये जीवें भिन्नत्वासी ॥२॥ निज बीजा येथें तुका अधिकारी । पाहिजे तें पेरी तये वेळे ॥३॥
3234 " संतांचे घरींचा दास मी कामारी । दारीं परोपरीं लोळतसें ॥१॥ चरणींचे रज लागती अंगांस । तेण बेताळीस उद्धरती ॥ध्रु.॥ उच्छष्टि हें जमा करुनि पत्रावळी । घालीन कवळी मुखामाजी ॥२॥ तुका म्हणे मी आणीक विचार । नेणें हे चि सार मानीतसें ॥३॥
3235 " संतांचें सुख जालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥ तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥ निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥ तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥ अष्टमा सिद्धींचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥ तुका म्हणे ते बिळया शिरोमणी । राहिलों चरणीं निकटवासें ॥५॥
3236 " संतांच्या धीकारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु तेणें सांडी परि ॥१॥ कुळ आणि रूप वांयां संवसार । गेला भरतार मोकलितां ॥ध्रु.॥ मूळ राखे तया फळा काय उणें । चतुर लक्षणें राखों जाणे ॥२॥ तुका म्हणे सायास तो एके ठायीं । दीप हातीं तई अवघें बरें ॥३॥
3237 " संतांच्या पादुका घेईन मोचे खांदीं । हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें ॥१॥ भजनविधी नेणें साधन उपाय । सकळ सिद्धी पाय हरिदासांचे ॥ध्रु.॥ ध्यानगति मति आसन समाधि । हरिनाम गोविंदीं प्रेमसुख ॥२॥ नेणता निर्लज्ज नेणें नादभेद । सुखें हा गोविंद गाऊं गीतीं ॥३॥ सर्व जोडी मज गोत आणि वित्त । तुका म्हणे संतमहंतपाय ॥४॥
3238 " संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥१॥ भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥ध्रु.॥ संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विठाळ बहु त्याचा ॥२॥ तुका म्हणे केली प्रज्ञा या च साटीं । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥३॥
3239 " संतांनीं सरता केलों तैसेपरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली ॥१॥ गुण दोष याती न विचारितां कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥२॥ तुका म्हणे आलें समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥३॥
3240 " संतांपायीं विन्मुख जाला । तो जरि संगति मागों आला ॥१॥ तरि त्याहुनि दुरी जावें । सुखें एकांतीं बैसावें ॥ध्रु.॥ आत्मचर्चा नाहीं जेथें । अगी लावुनि द्यावी तेथें ॥२॥ तुका म्हणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥३॥
3241 " संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारें । त्याचें नव्हें बरें उभयलोकीं ॥१॥ देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥ध्रु.॥ संतांपाशीं ज्याचा नुरे चि विश्वास । त्याचे जाले दोष बळिवंत ॥२॥ तुका म्हणे क्षीर वासराच्या अंगें । किंवा धांवे लागें विषमें मारूं ॥३॥
3242 " संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥१॥ म्हणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥ भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥२॥ तुका म्हणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणें अनुचित ॥३॥
3243 " संताचे उपदेश आमुचे मस्तकीं । नाहीं मृतेलोकीं राहाणेसा ॥१॥ म्हणऊनि बहु तळमळी चित्ती । येईवो धांवत पांडुरंगे ॥ध्रु.॥ उपजली चिंता लागला उसीर । होत नाहीं धीर निढळ वाटे ॥२॥ तुका म्हणे पोटीं रिघालेंसे भय । करूं आतां काय ऐसें जालें ॥३॥
3244 " संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥१॥ वासर तो भुंके गाढवाचेपरी । उडे पाठीवरि दंड तेणें ॥ध्रु.॥ समय नेणें तें वेडें चाहाटळ । अवगुणाचा ओंगळ मान पावे ॥२॥ तुका म्हणे काय वांयां चाळवणी । पिटपिटघाणी हागवणेची ॥३॥
3245 " संतीं केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥१॥ कांहीं ठेविलें चरणीं । घेतीं तें चि पुरवूनि । तुका पायवणी । घेऊनियां निराळा ॥ध्रु.॥ नसतां कांहीं संचित । भेटी जाली अवचित ॥२॥ देव मिळोनियां भक्त । तुका केलासे सनाथ ॥३॥
3246 " संतोषे माउली आरुषा वचनी । वोरसोनि स्तनीं लावी बाळा ॥१॥ तैसे परिमळाचें अवघें चि गोड । पुरवितो कोड पांडुरंग ॥ध्रु.॥ सेवा करी साहे निष्ठ उत्तरें । त्याचें वाहे मनीं तेंच बरें ॥२॥ तुका म्हणे इच्छावसे खेळ खेळें । चिंता ते सकळ कांहीं नेणें ॥३॥
3247 " संदेह बाधक आपआपणयांतें । रज्जुसर्पवत भासतसे । भेऊनियां काय देखिलें येणें । मारें घायेंविण लोळतसे ॥१॥ आपणें चि तारी आपण चि मारी । आपण उद्धरी आपणयां । शुकनळिकेन्यायें गुंतलासी काय । विचारूनि पाहें मोकळिया ॥ध्रु॥ पापपुण्य कैसे भांजिले अख । दशकाचा एक उरविला । जाणोनियां काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाहीं नाहीं ॥२॥ दुरा दृष्टी पाहें न्याहाळूनि । मृगजला पाणी न म्हणें चाडा । धांवतां चि फुटे नव्हे समाधान । तुका म्हणे जाण पावे पीडा ॥३॥
3248 " संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥१॥ किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें ॥ध्रु.॥ माजल्या न कळे उचित तें काय । नेघावें तें खाय घ्यावें सांडी ॥२॥ तुका म्हणे घेती भिंती सवें डोकें । वावसी तें एकें अंधारलीं ॥३॥
3249 " संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम उच्चारितां । न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥१॥ ऐसें हे सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया ॥ध्रु.॥ पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा । अनाथांच्या नाथें घातला विमानीं । नेला उचलूनि परलोका ॥२॥ अंतकाळीं गणिका पक्षियाच्या छंदें । राम राम उच्चारिलें । तंव त्या दिनानाथा कृपा आली । त्यानें तयेसी वैकुंठा नेलें ॥३॥ अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्ती जवळी असे । तुका म्हणे भावें स्मरा राम राम । कोण जाणे तये दशे ॥४॥
3250 " संपदा सोहळा नावडे मनाला । करी तें टकळा पंढरीचा ॥१॥ जावें पंढरिसी आवडी मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥ तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥
3251 " संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥ गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिलें ॥२॥ उतरूनि हातें धरि हनूवठी । ओवाळूनि दिठी सांडियेली ॥३॥ दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥४॥ लहान हा थोर जीवजंत भूतें । आपण दैवतें जाला देवी ॥५॥ देवी म्हैसासुर मुंजिया खेचर । लहान हि थोर देव हरि ॥६॥ हरि तुका म्हणे अवघा एकला । परि या धाकुला भक्तासाटीं ॥७॥
3252 " संवसारसांते आले हो आइका । तुटीचें ते नका केणें भरूं ॥१॥ लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साह्य येथें ॥ध्रु.॥ शृंगारिलें दिसे न कळें अंतर । गोविला पदर उगवेना ॥२॥ तुका म्हणे खोटें गुंपतां विसारें । हातिंचिया खरें हातीं घ्यावें ॥३॥
3253 " संसार करिती मोठ्या महत्वानें । दिसे लोका उणें न कळे त्या ॥१॥ पवित्रपण आपुलें घरच्यासी च दिसे । बाहेर उदास निंदिताती ॥ध्रु.॥ आपणा कळेना आपले अवगुण । पुढिलाचे दोषगुण वाखाणिती ॥२॥ विषयाचे ध्यासें जग बांधियेलें । म्हणोनि लागले जन्ममृत्यु ॥३॥ तुका म्हणे माझें संचित चि असें । देवाजीचें पिसे सहजगुण ॥४॥
3254 " संसार तो कोण देखे । आम्हां सखे हरिजन ॥१॥ काळ ब्रम्हानंदें सरे । आवडी उरे संचली ॥ध्रु.॥ स्वप्नीं ते ही नाहीं चिंता । रात्री जातां दिवस ॥२॥ तुका म्हणे ब्रम्हरसें । होय सरिसें भोजन ॥३॥
3255 " संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥१॥ हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥ ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥२॥ तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटीं विचार त्या ॥३॥
3256 " संसारसोहळे भोगितां सकळ । भक्तां त्याचें बळ विटोबाचें ॥१॥ भय चिंता धाक न मनिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥ध्रु.॥ पापपुण्य त्यांचें धरूं न शके अंग । भक्तांसी श्रीरंग सर्वभावे ॥२॥ नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव भक्तां भार सर्व वाहे ॥३॥ तुका म्हणे देव भक्तां वेळाईंत । भक्त ते निश्चिंत त्याचियानें ॥४॥
3257 " संसारा आलिया एक सुख आहे । आठवावे पाय विठोबाचे ॥१॥ येणें होय सर्व संसार सुखाचा । न लगे दुःखाचा लेश कांहीं ॥ध्रु.॥ घेईल तयासी सोपें आहे सुख । बोलियेलें मुखें नारायण ॥२॥ सांगितली सोय करुणासागरें । तुम्हां कांहो बरें न वाटतें ॥३॥ तुका म्हणे तेणें उपकार केला । भोऑया भाविकाला तरावया ॥४॥
3258 " संसाराची कोण गोडी । दिली जोडी करूनि ॥१॥ निष्ठ तूं बहु देवा । पुरे हेवा न म्हणवी ॥ध्रु.॥ पाहोनियां कर्म डोळां । निराळा तो वर्जीना ॥२॥ तुका म्हणे तुज माझें । म्हणतां ओझें फुकट ॥३॥
3259 " संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आम्ही या कीर्तनें शुद्ध जालों ॥१॥ आतां हें सोंवळें जालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ध्रु.॥ ब्रम्हपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥२॥ तुका म्हणे आम्हां एकांताचा वास । ब्रम्हीं ब्रम्हरस सेवूं सदा ॥३॥
3260 " संसाराचें धांवे वेठी । आवडी पोटीं केवढी ॥१॥ हागों जातां दगड सांची । अंतरीं ही संकल्प ॥ध्रु.॥ लाज तेवढी नारायणीं। वांकडी वाणी पोरांपें ॥२॥ तुका म्हणे बेशरमा । श्रमावरी पडिभरू ॥३॥
3261 " संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥१॥ हरिभजनें हें धवळिलें जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥ध्रु.॥ कोणां ही नलगे साधनांचा पांग । करणें केला त्याग देहबुद्धी ॥२॥ तुका म्हणे सुख समाधि हरिकथा । नेणें भववेथा गाईंल तो ॥३॥
3262 " संसाराच्या भेणें । पळों न लाहेसें केलें ॥१॥ जेथें तेथें आपण आहे । आम्हीं करावें तें काये ॥ध्रु.॥ एकांतींसी ठाव । तिहीं लोकीं नाहीं वाव ॥२॥ गांवा जातों ऐसें । न लगे म्हणावें तें कैसें ॥३॥ स्वप्नाचे परी । जागा पाहे तंव घरीं ॥४॥ तुका म्हणे काये । तुझे घेतले म्यां आहे ॥५॥
3263 " संसारापासूनि कैसें सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जाणें । करितां न सरे अधिक वाट पाहीं । तृष्णा देशधडी केलों । भक्तिभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों । मागें पुढें रीग न पुरे चि पाहातां । अवघा अवघीं वेष्टिलों ॥१॥ आतां माझी लाज राखें नारायणा । हीन हीन लीन याचकाची । करितां न कळे कांहीं असतील गुण दोष । करीं होळी संचिताची ॥ध्रु.॥ इंद्रियें द्वारें मन धांवे सैरें । नांगवे करितां चि कांहीं । हात पाय कान मुख लिंगस्थान । नेत्र घ्राणद्वारें पाहीं । जया जैसी सोय तया तैसें होय। क्षण एक स्थिर नाहीं । करिती ताडातोडी ऐसी यांची खोडी । न चले माझें यास कांहीं ॥२॥ शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु । धन लोभ मायावंत । जन लोकपाळ मैत्र हे सकळ । सोइरीं सज्जनें बहुतें । नाना कर्म डाय करिती उपाय । बुडावया घातपातें । तुका म्हणे हरी राखे भलत्या परी । आम्ही तुझीं शरणागतें ॥३॥
3264 " संसारीं असतां हरिनाम घेसी । तरीं च उद्धरसी पूर्वजेंसी ॥१॥ अवघीं च इंद्रियें न येती कामा । जिव्हे रामनामा उच्चारीं वेगीं ॥ध्रु.॥ शरीरसंपित्त नव्हे रे आपुली । भ्रांतीची माउली अवघी व्यर्थ ॥२॥ तुका म्हणे सार हरिनामउच्चार । येर्हवी येरझार हरीविण ॥३॥
3265 " संसारींचें ओझें वाहता वाहाविता । तुजविण अनंता नाहीं कोणी ॥१॥ गीतेमाजी शब्द दुंदुभीचा गाजे । योगक्षेमकाज करणें त्याचें ॥ध्रु.॥ चतुर्भुजा करीं वारू शृंगारावे । सारथ्य करावें अर्जुनाचें ॥२॥ श्वपच अंत्यज भक्तिस्नेहें जाला । अचळपदीं केला ध्रुव तुका ॥३॥
3266 " सकलगुणें संपन्न । एक देवाचें लक्षण ॥१॥ वरकड कोठें कांहीं । एक आहे एक नाहीं ॥ध्रु.॥ षड्गुण ऐश्वर्य संपन्न । एक भगवंतीं जाण ॥२॥ तुका म्हणे जेंजें बोला । तेंतें साजे या विठ्ठला ॥३॥
3267 " सकळ तुझे पायीं मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज ॥१॥ जीवीं गातां गोड आइकतां कानीं । पाहातां लोचनीं मूर्ती तुझी ॥ध्रु.॥ मन स्थिर माझें जालेंसे निश्चळि । वारिलीं सकळ आशापाश ॥२॥ जन्मजराव्याधि निवारिलें दुःख । वोसंडलें सुख प्रेम धरी ॥३॥ तुका म्हणे मज जाला हा निर्धार । आतां वांयां फार काय बोलों ॥४॥
3268 " सकळ देवांचें दैवत । उभें असे रंगा आंत ॥१॥ रंगा लुटा माझे बाप । शुद्ध भाव खरें माप ॥ध्रु.॥ रंग लुटिला बहुतीं । शुक नारदादि संतीं ॥२॥ तुका लुटितां हे रंग । साह्य जाला पांडुरंग ॥३॥
3269 " सकळ पूजा स्तुति । करावी ते व्होवें याती ॥१॥ म्हणऊनि वारा जन । संतपूजा नारायण ॥ध्रु.॥ सेवावें तें वरी । दावी उमटूनि ढेंकरीं ॥२॥ तुका म्हणे सुरा । दुधा म्हणतां केवीं बरा॥३॥
3270 " सकळ सत्ताधारी । व्हावें ऐसें काय हरी ॥१॥ परि या कृपेच्या वोरसें । कुढावयाचें चि पिसें ॥ध्रु.॥ अंगें सर्वोत्तम । अवघा चि पूर्णकाम ॥२॥ तुका म्हणे दाता । तरि हा जीव दान देता ॥३॥
3271 " सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुम्हीं ॥१॥ कर्मधर्में तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ध्रु.॥ वाढवूनि दिलों एकाचिये हातीं । सकळ निश्चिंती जाली तेथें ॥२॥ आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । माझिया भावें अनुसरलों ॥३॥ वाढवितां लोभ होईंल उसीर । अवघींच स्थिर करा ठायीं ॥४॥ धर्म अर्थ काम जाला एके ठायीं । मेळविला जिंहीं हाता हात ॥५॥ तुका म्हणे आतां जाली हे चि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥६॥
3272 " सकळ हे माया नागवे कवणा । भांबाविलें जना दाही दिशा ॥१॥ आशा तृष्णा दंभ लागलीं हीं पाठी । नेदी बैसों हाटीं मोह ठायीं ॥ध्रु.॥ काम क्रोध घरा लावितील आगी । निंदा हिंसा दोघी पळतां खाती ॥२॥ लाज पुढें उभी राहिली आडवी । ते करी गाढवी थोर घात ॥३॥ तुका म्हणे चिंता घाली गर्भवासीं । ओढोनियां पाशीं चहूंकडे ॥४॥
3273 " सकळतीर्थांहूनि । पंढरीनाथ मुगुटमणी ॥१॥ धन्यधन्य पंढरी । जे मोक्षाची अक्षय पुरी ॥ध्रु.॥ विश्रांतीचा ठाव । तो हा माझा पंढरीराव ॥२॥ तुका म्हणे सांगतों स्पष्ट । दुजी पंढरी वैकुंठ ॥३॥
3274 " सकळतीर्थाहुनि । पंढरी हें मुगुटमणि ॥१॥ काय सांगों तेथिल शोभा । रमावल्लभ जेथें उभा ॥ध्रु.॥ न लभे व्रततीर्थदानीं । तें या विठ्ठलदर्शनीं ॥२॥ साधु संत गाती नाम । सकळ भूतांचा विश्राम ॥३॥ तुका म्हणे स्तुती । करूं काय सांगों किती ॥४॥
3275 " सकळिकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥१॥ रूप दाखवीं रे आतां । सहजरभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥ शंखचक्रपद्मगदा । गरुडासहित ये गोविंदा ॥२॥ तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ॥३॥
3276 " सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ । झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरवलिं मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥१॥ जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमाईंवरा । आरती करीन काया । ओंवाळिन सुंदरा । जय. ॥ध्रु.॥ गोजिरें ठाणमाण भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी । हृदयीं ब्रम्हपद बाणलें शृंगारीं । गर्जति चरणीं वांकी कंठ कोकळिास्वरीं ॥२॥ घवघवित उटी अंगीं बावन चंदनांची । लल्हाट कस्तुरिचा कास पितांबरीची । कटिसूत्र वरि साजिरें प्रभा वर मोतियांची । संगीत सकळ मुद्रा पाउलें कुंकुमाचीं ॥३॥ सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सळ विश्व लाविलें ध्यानीं । आश्चर्य देव करिती ॠषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥४॥ वर्णितां ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती । उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूर्ति । तुकयाबंधु म्हणे स्तवूं मी काय किती ॥५॥
3277 " सख्यत्वासी गेलों करीत सलगी । नेणें चि अभागी महिमा तुझा ॥१॥ पावलों आपुलें केलें लाहें रास । निर्दैवां परिस काय होय ॥ध्रु.॥ कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं । अद्यापिवरि तरि उपदेशीं ॥२॥ उचित अनुचित सांभाळिलें नाहीं । कान्हा म्हणे कांहीं बोलों आतां ॥३॥
3278 " सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥१॥ एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥ भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥२॥ परउपकार घडे तो भला । नाठ्याळ तया दया नाहीं ॥३॥ जाणीवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा ॥४॥ हित तें अनहित केलें कैसें । तुका म्हणे पिसें लागलें यास ॥५॥
3279 " सतीचें तें घेतां वाण । बहु कठीण परिणामीं ॥१॥ जिवासाटीं गौरव वाढे । आहाच जोडे तें नव्हे ॥ध्रु.॥ जरि होय उघडी दृष्टि । तरि गोष्टी युद्धाच्या ॥२॥ तुका म्हणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची ॥३॥
3280 " सत्ताबळें येतो मागतां विभाग । लावावया लाग निमित्य करूं ॥१॥ तुझीं ऐसीं मुखें करूं उच्चारण । बोलें नारायण सांपडवूं ॥ध्रु.॥ आसेविण नाहीं उपजत मोहो । तरि च हा गोहो न पडे फंदीं ॥२॥ तुका म्हणे आतां व्हावें याजऐसें । सरिसें सरिसें समागमें ॥३॥
3281 " सत्तावर्त्ते मन । पाळी विठ्ठलाची आन ॥१॥ आज्ञा वाहोनियां शिरीं । सांगितलें तें चि करीं ॥ध्रु.॥ सरलीसे धांव । न लगे वाढवावी हांव ॥२॥ आहे नाहीं त्याचें । तुका म्हणे कळे साचें ॥३॥
3282 " सत्तेचें भोजन समयीं आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी ॥१॥ वर्में श्रम नेला जालें एकमय । हृदयस्थीं सोय संग जाला ॥ध्रु.॥ कोथळीस जमा पडिलें संचित । मापल्याचा वित्त नेम जाला ॥२॥ तुका म्हणे धणी ऐसा जालों आतां । करीन ते सत्ता माझी आहे ॥३॥
3283 " सत्य आठवितां देव । जातो भेंव पळोनि ॥१॥ न लगे कांहीं करणे चिंता । धरी सत्ता सर्व तो ॥ध्रु.॥ भावें भाव राहे पायीं । देव तैं संनिध ॥२॥ तुका म्हणे कृष्णनामें । शीतळ प्रेम सर्वांसी ॥३॥
3284 " सत्य आम्हां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी ॥१॥ ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥ देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥२॥ तुका म्हणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें ॥३॥
3285 " सत्य तूं सत्य तूं सत्य तूं विठ्ठला । कां गा हा दाविला जगदाकार ॥१॥ सांभाळीं आपुली हाक देतो माया । आम्हांसी कां भयाभीत केलें ॥ध्रु.॥ रूप नाहीं त्यासी ठेवियेलें नाम । लटका चि श्रम वाढविला ॥२॥ तुका म्हणे कां गा जालासी चतुर । होतासी निसुर निर्विकार ॥३॥
3286 " सत्य त्यागा चि समान । नलगे वेचावें वचन ॥१॥ नारायणा ऐसे दास । येरयेरांची च आस ॥ध्रु.॥ मळ नाहीं चित्ता । तेथें देवाची च सत्ता ॥२॥ तुका म्हणे जाण । तें च भल्याचें वचन ॥३॥
3287 " सत्य सत्यें देतें फळ । नाहीं लागत चि बळ ॥१॥ ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ध्रु.॥ करावी च चिंता । नाहीं लागती तत्वता ॥२॥ तुका म्हणे भावें । शरण म्हणवितां बरवें ॥३॥
3288 " सत्यत्वेंशीं घेणें भक्तीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसें ॥१॥ मग तें अवीट न भंगे साचारें । पावलें विस्तारें फिरों नेणे ॥ध्रु.॥ वाणी वदे त्याचा कोणांसी विश्वास । अभयें करें दास सत्य तई ॥२॥ तुका म्हणे आधीं न करीं तांतडी । पायीं जाली जोडी तेणें शुद्ध ॥३॥
3289 " सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥ येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचेंतें ॥ध्रु.॥ अंतरींचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रम्हांडाचा ॥२॥ तुका म्हणे नाहीं चालत तांतडी । प्राप्तकाळघडी आल्याविण ॥३॥
3290 " सत्या माप वाढे । गबाळाची चाली खोडे ॥१॥ उतरे तें कळें कसी । विखरोणें सर्वदेशीं ॥ध्रु.॥ घरामध्ये राजा । नव्हे हो वा पाटपूजा ॥२॥ तुका म्हणे साचें । रूप तें दर्पणाचें ॥३॥
3291 " सदा नामघोष करूं हरिकथा । तेणें सदा चित्ति समाधान ॥१॥ सर्वसुख ल्यालों सर्व अलंकार । आनंदें निर्भर डुलतसों ॥ध्रु.॥ असों ऐसा कोठें आठव ही नाहीं । देहीं च विदेही भोगूं दशा ॥२॥ तुका म्हणे आम्ही जालों अग्निरूप । लागों नेदूं पापपुण्य आतां ॥३॥
3292 " सदा सर्वकाळ अंतरीं कुटिल । तेणें गळां माळ घालूं नये ॥१॥ ज्यासी नाहीं दया क्षमा शांति । तेणें अंगीं विभूती लावूं नये ॥ध्रु.॥ जयासी न कळे भक्तीचें महिमान । तेणें ब्रम्हज्ञान बोलों नये ॥२॥ ज्याचें मन नाहीं लागलें हातासी । तेणें प्रपंचासी टाकुं नये ॥३॥ तुका म्हणे ज्यासी नाहीं हरिभक्ति । तेणें भगवें हातीं धरूं नये ॥४॥
3293 " सदैव हे वारकरी । जे पंढरी देखती । पदोपदीं विठ्ठल वाचे । त्यांसी कैचा संसार ॥१॥ दोष पळाले दोष पळाले । पैल आले हरिदास ॥ध्रु.॥ प्रेमभातें भरलें अंगीं । निर्लज्ज रंगीं नाचती । गोपीचंदनाची उटी । तुळसी कंठीं मिरवती ॥२॥ तुका म्हणे देव चित्तीं । मोक्ष हातीं रोकडा । दुर्बळा या शक्तिहीना । त्या ही जना पुरता ॥३॥
3294 " सद्गदित कंठ दाटो । येणें फुटो हृदय ॥१॥ चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥ध्रु.॥ नेत्रीं जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच ॥२॥ तुका म्हणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥३॥
3295 " सद्गूचे चरणीं ठेविला मस्तक । देउनियां हस्तक उठविलें ॥१॥ उठविलें मज देऊनियां प्रेम । भावाथॉ सप्रेमे नमस्कारीं ॥२॥ नमस्कारीं त्याला सद्गुरायाला । तुका म्हणे बोला नाम वाचें ॥३॥
3296 " सद्गूने मज आशीर्वाद दिला । हरुष भरला हृदयीं माझे ॥१॥ हृदयींचा भाव कळला गुरूसी । आनंदउल्हासीं बोले मज ॥२॥ बोले मज गुरू कृपा तो करूनि । तुका म्हणे मनीं आनंदलों ॥३॥
3297 " सद्गूवांचूनि प्रेतरूप वाणी । बोलती पुराणीं व्यासॠषि ॥१॥ म्हणोनि तयाचें पाहूं नये तोंड । निगुरा अखंड सुतकाळा ॥ध्रु.॥ कोणे परी तया नव्हे चि सुटका । देह त्याचा लटिका जाणा तुम्ही ॥२॥ तुका म्हणे ऐसीं बोलती पुराणें । संतांचीं वचनें मागिलां हो ॥३॥
3298 " सन्मुख चि तुम्हीं सांगावी जी सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ ॥१॥ निघों आम्ही कांहीं चित्तवित्त घरें । आपुल्या उदारें जीवावरी ॥ध्रु.॥ बोल परस्परें वाढवावें सुख । पाहावें श्रीमुख डोळेभरी ॥२॥ तुका म्हणे सत्य बोलतों वचन । करुनी चरण साक्ष तुझे ॥३॥
3299 " समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥१॥ कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ध्रु.॥ प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥२॥ तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥३॥
3300 " समर्थ या नांवें दिनांचा कृपाळ । हें तंव सकळ स्वामीअंगीं ॥१॥ मज काय लागे करणें विनवणी । विदित चरणीं सकळ आहे ॥ध्रु.॥ दयासिंधु तुम्हां भांडवल दया । सिंचावें आतां या कृपापीयूषें ॥२॥ तुका म्हणे अवो पंढरिनिवासे । बहु जीव आसे लागलासे ॥३॥
3301 " समर्थपणें हे करा संपादणी । नसतें चि मनीं धरिल्याची ॥१॥ दुसर्याचें येथें नाहीं चालों येत । तरि मी निवांत पाय पाहें ॥ध्रु.॥ खोटियाचें खरें खरियाचें खोटें । मानलें गोमटें तुम्हांसी तें ॥२॥ तुका म्हणे तुम्हां सवें करितां वाद । होईंजेतें निंद जनीं देवा ॥३॥
3302 " समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥१॥ पावलें घेईंन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं दाऊं ॥ध्रु.॥ न लगे पाहावी उचिताची वेळ । अयाचित काळ साधला तो ॥२॥ तुका म्हणे पोट धालिया उपरी । गौरवा उत्तरीं पूजूं देवा ॥३॥
3303 " समर्थाची धरिली कास । आतां नाश काशाचा ॥१॥ धांव पावें करीन लाहो । तुमच्या आहो विठ्ठला ॥ध्रु.॥ न लगे मज पाहाणें दिशा । हाकेसरिसा ओढसी ॥२॥ तुका म्हणे नव्हे धीर । तुम्हां स्थिर दयेनें ॥३॥
3304 " समर्थाचे पोटीं । आम्ही जन्मलों करंटीं ॥१॥ ऐसी जाली जगीं कीर्ति । तुझ्या नामाची फजिती ॥ध्रु.॥ येथें नाहीं खाया । न ये कोणी मूळ न्याया ॥२॥ तुका म्हणे जिणें । आतां खोटें जीवपणें ॥३॥
3305 " समर्थाचे सेवे कोठें नाहीं घात । पाहों नये अंत पांडुरंगा ॥१॥ आहे तैसी नीत विचारावी बरी । येऊनी भीतरी वास करा ॥ध्रु.॥ निढळ राखिलें तरी भयाभीत । हर्षामर्ष चित्त पावतसे ॥२॥ तुका म्हणे तरी कळेल निवाड । दर्शनाची चाड शुभकीर्ति ॥३॥
3306 " समर्थाचे सेवे बहु असे हित । विचार हृदयांत करुनी पाहें ॥१॥ वरकडोऐसा नव्हे हा समर्थ । क्षणें चि घडित सृष्टी नाशें ॥ध्रु.॥ ज्याची कृपा होतां आपणा ऐसें करी । उरों नेदी उरी दारिद्राची ॥२॥ ऐशालागीं मन वोळगे अहर्निशीं । तेणें वंद्य होशी ब्रम्हांदिकां ॥३॥ तुका म्हणे हें चि आहे पैं मुद्दल । सत्य माझा बोल हा चि माना ॥४॥
3307 " समर्थाचें केलें । कोणां जाईंल मोडिलें ॥१॥ वांयां करावी ते उरे । खटपटें सोस पुरे ॥ध्रु.॥ ठेविला जो ठेवा । आपुलाला तैसा खावा ॥२॥ ज्याचें त्याचें हातीं । भुके तयाची फजिती ॥३॥ तुका म्हणे कोटी । बाळे जाले शूळ पोटी ॥४॥
3308 " समर्थाचें बाळ कीविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥१॥ अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥२॥ तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥३॥
3309 " समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हसती सकळ लोक कोणा ॥१॥ समर्थासी लाज आपुल्या नांवाची । शरण आल्याची लागे चिंता ॥२॥ जरी तुज कांहीं होईंल उचित । तरी हा पतित तारीं तुका ॥३॥
3310 " समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सद्धि घरीं ॥१॥ आदराचे ठायीं बहु च आदर । मागितलें फार तेथें वाढी ॥ध्रु.॥ न म्हणे सोइरा सुहुर्द आवश्यक । राजा आणि रंक सारिखा चि ॥३॥ भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळें चि ॥३॥ कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥४॥ तुका म्हणे पोट भरुनी उरवी । धालें ऐसें दावी अनुभवें ॥५॥
3311 " समर्थासी लाज आपुल्या नामाची । शरण आल्याची लागे चिंता ॥१॥ न पाहे तयाचे गुण दोष अन्याय । सुख देउनि साहे दुःख त्याचें ॥ध्रु.॥ मान भलेपण नाहीं फुकासाटीं । जयावरि गांठी झीज साहे ॥२॥ तुका म्हणे हें तूं सर्व जाणसी । मज अधिरासी धीर नाहीं ॥३॥
3312 " समर्पक वाणी । नाहीं ऐकिजेसी कानीं ॥१॥ आतां भावें करूनि साचा । पायां पडिलों विठोबाच्या ॥ध्रु.॥ न कळे उचित । करूं समाधान चित्ती ॥२॥ तुका म्हणे विनंती । विनविली धरा चित्ती ॥३॥
3313 " समर्पिली वाणी । पांडुरंगीं घेते धणी ॥१॥ पूजा होते मुक्ताफळीं । रस ओविया मंगळीं ॥ध्रु.॥ धार अखंडित । ओघ चालियेला नित ॥२॥ पूर्णाहुति जीवें । तुका घेऊनि ठेला भावें ॥३॥
3314 " समश्रुळित असतां वाचा । घोष न करिसी कां नामाचा ॥१॥ कां रे वैष्णव नव्हेसी । कवण्या दंभें नागवलासी ॥ध्रु.॥ हरि हरि म्हणतां लाजसी । गर्वें फुगोनि चालसी ॥२॥ तारुण्यें उताणा । पुंसेंविण बांडा सुना ॥३॥ जालेंसि महिमेचे वेडें । नाचों लाजसी दिंडीपुढें ॥४॥ अळंकारांच्यानि बळें । वंचलासी तुळसीमाळें ॥५॥ कैसा सकुमार जालासी । म्हणसी न टकें एकादशी ॥६॥ स्नान न करिसी आंघोळी । विभुती न लाविसी कपाळीं ॥७॥ वरिवरि न्याहाळिसी त्वचा । उपेग नाहीं मांसाचा ॥८॥ पद्मनाभी विश्वनाथ । तुका अझून रडत ॥९॥
3315 " समागमें असे हरि नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥१॥ अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकळिकां ॥२॥ सकळही जन आले गोकुळासि । आनंद मानसीं सकळांच्या ॥३॥ सकळांचा केला अंगीकार देवें । न कळतां भावें वांचवी त्यां ॥४॥ त्यां जाला निर्धार हरि आम्हांपासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥५॥ निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकळिक नारायणें ॥६॥ नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका म्हणे नांवा अनुसरे त्या ॥७॥
3316 " समाधान त्यांचीं इंद्रियें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥१॥ गोविंदाचा जाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काज ॥२॥ काज काम त्यांचें सरले व्यापार । नाहीं आप पर माझें तुझें ॥३॥ माया सकळांची सकळां ही वरी । विषय तें हरि दिसों नेदी ॥४॥ दिसे तया आप परावें सारिखें । तुका म्हणे सुखें कृष्णाचिया ॥५॥
3317 " समुद्र हा पिता बंधु हा चंद्रमा । भगिनी ते रमा शंखाची या ॥१॥ मेहुणा जयाचा द्वारकेचा हरि । शंख दारोदारीं भीक मागे ॥२॥ दुष्ट हें जाणावें आपुलें स्वहित । तुका म्हणे मात ऐसी आहे ॥३॥
3318 " समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करितां समान न ये नामा ॥१॥ म्हणऊनि कोणीं न करावा आळस । म्हणा रात्रीदिवस रामराम ॥ध्रु.॥ सकळ ही शास्त्रें पठण करतां वेद । सरी नये गोविंदनाम एकें ॥२॥ सकळ ही तीर्थी प्रयाग काशी । करितां नामाशीं तुळेति ना ॥३॥ कर्वतीं कर्मरीं देहासी दंडण । करितां समान नये नामा ॥४॥ तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । नाम हें चि सार विठोबाचें ॥५॥
3319 " सरतें माझें तुझें । तरि हें उतरतें ओझें ॥१॥ न लगे सांडावें मांडावें । आहे शुद्ध चि स्वभावें ॥ध्रु.॥ घातला तो आशा । मोहोजाळें गळां फासा ॥२॥ सुखदुःखाचा तो मान । नाहीं दुःखाचा तो शीण ॥३॥ करितां नारायण । एवढें वेचितां वचन ॥४॥ लाभ हानि हे समान । तैसा मान अपमान ॥५॥ तुका म्हणे याचें । नांव सोंवळें साचें ॥६॥
3320 " सरलियाचा सोस मनीं । लाजोनियां राहिलों ॥१॥ आवडीनें बोलावितों । येथें तें तों लपावें ॥ध्रु.॥ माझें तें चि मज द्यावें । होतें भावें जोडिलें ॥२॥ तुका म्हणे विश्वंभरा । आळीकरा बुझावा ॥३॥
3321 " सरलें आतां नाहीं । न म्हणे वेळकाळ कांहीं ॥१॥ विठ्ठल कृपाळु माउली । सदा प्रेमें पान्हायेली ॥ध्रु.॥ सीण न विचारी भाग । नव्हे निष्ठ नाहीं राग ॥२॥ भेदाभेद नाहीं । तुका म्हणे तिच्याठायीं ॥३॥
3322 " सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरि बा गोविंदा रामकृष्णा ॥१॥ पुण्य पर्वकाळ तीर्थे ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥ अवघे चि लाभ बैसलिया घरा । येती भाव धरा एके ठायीं ॥२॥ सेळ्या मेंढ्या गाई सेवा घेती म्हैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥३॥ तुका म्हणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणतां सुलभ चि ॥४॥
3323 " सरे आम्हांपाशीं एक शुद्धभाव । नाहीं तरी वाव उपचार ॥१॥ कोण मानी वरी रसाळ बोलणें । नाहीं जाली मनें ओळखी तों ॥२॥ तुका म्हणे आम्हां जाणीवेचें दुःख । न पाहों त्या मुख दुर्जनाचें ॥३॥
3324 " सरे ऐसें ज्याचें दान । त्याचे कोण उपकार ॥१॥ नको वाढूं ऐसें काचें । दे वो साच विठ्ठला ॥ध्रु.॥ रडत मागें सांडी पोर । ते काय थोर माउली ॥२॥ तुका म्हणे कीर्ति वाढे । धर्म गाढे ते ऐसे ॥३॥
3325 " सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे। हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥१॥ तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडीं आतां । माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा तुज न करितां ॥ध्रु.॥ आविसें मिनु लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणउनियां । काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापुमाये कवण रया ॥२॥ पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें । मरण नेणें माया धांवोनि वोसरे । जीवित्व ना जालीं बाळें ॥३॥ गोडपणें मासी गुंतली लिगाडीं । सांपडे फडफडी अधिकाअधिक । तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं ॥४॥
3326 " सर्व काळ डोळां बैसो नारायण । नयो अभिमान आड मध्यें ॥१॥ धाड पडो तुझ्या थोरपणावरि । वाचे नरहरि उच्चारीना ॥ध्रु.॥ जळो अंतरींचें सर्व जाणपण । विवादवचन अहंतेचें ॥२॥ सकळां चरणीं गळित माझा जीव । तुका म्हणे भाव एकविध ॥३॥
3327 " सर्व भाग्यहीन । ऐसें सांभाळिलों दीन ॥१॥ पायीं संतांचे मस्तक । असों जोडोनि हस्तक ॥ध्रु.॥ जाणें तरि सेवा । दीन दुर्बळ जी देवा ॥२॥ तुका म्हणे जीव । समर्पून भाकीं कींव ॥३॥
3328 " सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥१॥ दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥ बहु जालों क्षीदक्षीण । येणें सीण तो नासे ॥२॥ तुका म्हणे गंगवास । बहु त्या आस स्थळाची ॥३॥
3329 " सर्वकाळ माझे चित्ती । हे चि खंती राहिली ॥१॥ बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥ वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥२॥ तुका म्हणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥३॥
3330 " सर्वथा ही खोटा संग । उपजे भंग मनासी ॥१॥ बहु रंगें भरलें जन । संपन्न चि अवगुणी ॥ध्रु.॥ सेविलिया निःकामबुद्धी । मदें शुद्धी सांडवी ॥२॥ त्रासोनियां बोले तुका । आतां लोकां दंडवत ॥३॥
3331 " सर्वपक्षीं हरि साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥१॥ सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥२॥ तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ॥३॥
3332 " सर्वभावें आलों तुज चि शरण । कायावाचामनेंसहित देवा ॥१॥ आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ध्रु.॥ माझिये वारचें कांहीं जडभारी । तुजविण वारी कोण एक ॥३॥ तुझे आम्ही दास आमुचा तूं ॠणी । चालत दूरूनी आलें मागें ॥३॥ तुका म्हणे आतां घेतलें धरणें । हिशोबाकारणें भेटी देई ॥४॥
3333 " सर्वरसीं मीनलें चित्त । अखंडित आनंदु ॥१॥ गोत पति विश्वंभरीं । जाला हरि सोयरा ॥ध्रु.॥ वोळखी ते एका नांवें । इतरभावें खंडणा ॥२॥ तुका म्हणे नांवें रूपें । दुसरीं पापें हारपलीं ॥३॥
3334 " सर्वविशीं आम्हीं हे चि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥१॥ पाहिलें चि नाहीं मागें परतोनी । जिंकिला तो क्षणीं क्षण काळ ॥ध्रु.॥ नाहीं पडों दिला विचाराचा गोवा । नाहीं पाठी हेवा येऊं दिला ॥२॥ केला लाग वेगीं अवघी चि तांतडी । भावना ते कुडी दुराविली ॥३॥ कोठें मग ऐसें होतें सावकास । जळो तया आस वेव्हाराची ॥४॥ तुका म्हणे लाभ घेतला पालवीं । आतां नाहीं गोवी कशाची ही ॥५॥
3335 " सर्वसुखा अधिकारी । मुखें उच्चारी हरिनाम ॥१॥ सर्वांगें तो सर्वोत्तम । मुखीं नाम हरीचें ॥ध्रु.॥ ऐशी उभारिली बाहे। वेदीं पाहें पुराणीं ॥२॥ तुका म्हणे येथें कांही । संदेह नाहीं भरवसा ॥३॥
3336 " सर्वस्वा मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग ॥१॥ मोह ममता माया चाड नाहीं चिंता । विषयकंदुवेथा जाळूनियां ॥ध्रु.॥ लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशधडी ॥२॥ शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी त्यांसी ॥३॥ तुका म्हणे याती अक्षरें अभिमान । सांडोनिया शरण रिघें संतां ॥४॥
3337 " सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अग्नि जैसा ॥१॥ सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥ध्रु.॥ घडे ज्या उपकार भूतांची दया । आत्मस्थिती तया अंगीं वसे ॥२॥ नो बोले गुणदोष नाइके जो कानीं । वर्तोनि तो जनीं जनार्दन ॥३॥ तुका म्हणे वर्म जाणितल्याविण । पावे करितां सीण सांडीमांडी ॥४॥
3338 " सर्वस्वाची साटी । तरि च देवासवें गांठी ॥१॥ नाहीं तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥ध्रु.॥ द्यावें तें चिं घ्यावें । म्हणउनि घ्यावें जीवें ॥२॥ तुका म्हणे उरी । मागें उगवितां बरी ॥३॥
3339 " सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥१॥ पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतलें ॥ध्रु.॥ भूमी पाहातां नाहीं वेगळी । माळ बरड एक काळी । उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ॥२॥ म्हणोनि विवेकें । कांहीं करणें निकें । तुका म्हणे फिकें । रुची नेदी मिष्टान्न ॥३॥
3340 " सर्वात्मकपण । माझें हिरोनि नेतो कोण ॥१॥ मनीं भक्तीची आवडी । हेवा व्हावी ऐशी जोडी ॥ध्रु.॥ घेईंन जन्मांतरें । हें चि करावया खरें ॥२॥ तुका म्हणे देवा । ॠणी करूनि ठेवूं सेवा॥३॥
3341 " सर्वापरी तुझे गुण गाऊं उत्तम । तुझेठायीं प्रेम राहो माझें ॥१॥ माउलीपरिस आहेसी उदार । तरि कां निष्ठ मन केलें ॥ध्रु.॥ गजेंद्राकारणें केलें त्वां धांवणें । तरि कां निर्वाण पाहातोसी ॥२॥ प्रल्हादास कष्टीं रिक्षलें तों देवा । तरि कां केशवा सांडी केली ॥३॥ अन्यायी अजामेळ तो जाला पावन । ऐसें हें पुराण हाका मारी ॥४॥ तुका म्हणे माझे थोर अपराध । नाम करी छेद क्षणमात्रें ॥५॥
3342 " सवंग जालें सवंग जालें । घरा आलें बंदरींचे ॥१॥ आतां हेवा करावा सोस । भक्तिरस बहु गोड ॥ध्रु.॥ पाउल वेचे चिंता नाहीं । आड कांहीं मग नये ॥२॥ तुका म्हणे संचिताचें । नेणें काचें राहों तें ॥३॥
3343 " सहज पावतां भगवंतीं परि हीं विकल्पें परतीं । फुकाची हे चित्तीं वाठवण कां न धरिती ॥१॥ हरि व्यापक सर्वगत हें तंव मुख्यत्वें वेदांत । चिंतनासी चित्त असों द्यावें सावध ॥ध्रु.॥ विरजाहोम या चि नांवें देह नव्हे मी जाणावें । मग कां जी यावें वरी लागे संकल्पा ॥२॥ कामक्रोधे देह मळिण स्वाहाकारीं कैंचें पुण्य । मंत्रीं पूजियेला यज्ञ मनमुंडण नव्हे चि ॥३॥ अनन्यभक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय । ध्याइल तो काय जाणे चुकों मारग ॥४॥ आतां सांगे तुका एक तुम्ही चुकों नका । सांडीमांडी धोका शरण रिघतां गोमटें ॥५॥
3344 " सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें जालें ॥१॥ उपक्रमें वदे निशब्दाची वाणी । जे कोठें बंधनीं गुंपों नेणें ॥ध्रु.॥ तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन ॥२॥ तुका म्हणे येथें गेला अतिशय । आतां पुन्हा नये तोंड दावूं ॥३॥
3345 " सांखळिलों प्रीती गळां । भुंके वेळा जाणोनियां ॥१॥ तुमचें मी केशीराजा । सुनें या काजा पाळिलों ॥ध्रु.॥ आलें गेलें कळे वाटा । कोण निटा वाकडिया ॥२॥ तुका म्हणे आलें वारी । दुरितें दुरी नातळतां ॥३॥
3346 " सांग त्वां कोणासी तारिलें । संतांवेगळें उद्धरिलें ॥१॥ संत शब्द उपदेशी । मग तूं हो म्हणशी ॥२॥ तुका म्हणे नाहीं तुझा उपकार । करूं संतांचा उच्चार ॥३॥
3347 " सांग पांडुरंगा मज हा उपाव । जेणें तुझे पाव आतुडति ॥१॥ न कळे हा निर्धार ब्रम्हादिकां पार । कायसा विचार माझा तेथें ॥२॥ तुका म्हणे आतां धरुनियां धीर । राहूं कोठवर मायबापा ॥३॥
3348 " सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥१॥ सुख जालें सुख जालें । नये बोले बोलतां ॥ध्रु.॥ अंतर तें नये दिसों । आतां सोस कासया ॥२॥ तुका म्हणे जतन करूं । हें चि धरूं जीवेंसी ॥३॥
3349 " सांगतां दुर्लभ ज्ञानाचिया गोष्टी । अनुभव तो पोटीं कैचा घडे ॥१॥ भजनाचे सोई जगा परिहार । नेणत्यां सादर चित्त कथे ॥ध्रु.॥ नाइकवे कानीं साधन उपाय । ऐकतो गाय हरुषें गीत ॥२॥ नव्हे आराणूक जावयासी वना । वेध कामिमना हरिकथेचा ॥३॥ काळाच्या साधना कोणा अंगीं बळ । चिंतना मंगळ अष्टप्रहर ॥४॥ तुका म्हणे आम्ही खेळों भातुकुलें । विभागासी मुलें भोळीं येथें ॥५॥
3350 " सांगतों तरि तुम्ही भजा रे विठ्ठला । नाहीं तरि गेला जन्म वांयां ॥१॥ करितां भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरीं वाहावसी ॥२॥ कांहीं न लगे एक भाव चि कारण । तुका म्हणे आण विठ्ठलाची ॥३॥
3351 " सांगतों या मना तें माझें नाइके । घातावरी टेंके चांडाळ हें ॥१॥ म्हणऊनि पाहे तरतें बुडतें । न ल्हाये पुरतें बळ करूं ॥ध्रु.॥ काय तें संचित न कळे पाहातां । मतिमंद चित्ती उपजतें ॥२॥ तुका म्हणे ऐसें बळ नाहीं अंगी । पाहोनियां वेगीं पार टाकीं ॥३॥
3352 " सांगा दास नव्हें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनि ॥१॥ कोणासाटीं केली प्रपंचाची होळी । या पायां वेगळी मायबापा ॥ध्रु.॥ नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर । नये भाजूं हीर उफराटे ॥२॥ तुका म्हणे आम्हां आहिक्य परत्रीं । नाहीं कुळगोत्रीं दुजें कांहीं ॥३॥
3353 " सांगावें तें बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुद्धी मग ॥१॥ आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥ नाहीं मागें येत बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग ॥२॥ तुका म्हणे बहु भ्यालों खटपटे । आतां देवा खोटे शब्द पुरे ॥३॥ वाराणसीस यात्रा चालली तेव्हां स्वामींनीं भागीरथीस पत्र धाडिलें - ते अभंग ॥ ४ ॥ १६५० परिसें वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ भागीरथी महादोष निवारणी । सकळां स्वामिणी तीर्थांचिये ॥ध्रु.॥ जीतां भुक्ति मोक्ष मरणें तुझ्या तिरीं । अहिक्यपरत्री सुखरूप ॥२॥ तुका विष्णुदास संतांचें पोसनें । वागपुष्प तेणें पाठविलें ॥३॥
3354 " सांगों जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥१॥ त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहों नावडती डोळां ॥ध्रु.॥ रिद्धिसिद्धींचे साधक । वाचासद्धि होती एक ॥२॥ तुका म्हणे जाती । पुण्यक्षयें अधोगती ॥३॥
3355 " सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं ॥१॥ लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण म्हणे भलें ॥२॥ भला आजि तुम्ही केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥३॥ लागती चरणा सकळ ते काळीं । आम्हांमध्यें बळी तूं चि एक ॥४॥ एका तुजविण न यों आम्ही कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥५॥ आजिवरि आम्हां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥६॥ तुझा पार आम्ही नेणों नारायणा । नखीं गोवर्धना राखियेलें ॥७॥ राखियेलें गोकुळ आम्हां सकळांसि । दगडाच्या राशी वरुषतां ॥८॥ वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकळिक ॥९॥ सकळ ही तान विसरलीं भूक । सकळ ही सुख दिलें त्यांसि ॥१०॥ त्यासि कळों आला वैकुंठनायका । तुका म्हणे लोक निर्भर ते ॥११॥
3356 " सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें ॥१॥ ऐसे तंव तुम्ही नाहीं जी दिसत । कां हें अनुचित वदलेत ॥ध्रु.॥ फांटा जाला त्यासी नाहीं वोढा वारा । वेरसा चि खरा हाटो गुण ॥२॥ तुका म्हणे नाहीं ज्याच्या बापा ताळा । तो देखे विटाळा संतां अंगीं ॥३॥
3357 " सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुद्ध ॥१॥ उष्ण तान भूक एवढिये आकांतीं । ओसंगा लाविती काय म्हुण ॥ध्रु.॥ खांद्यावरि शूळ मरणाचिये वाटे । अन्याय ही मोठे केले साच ॥२॥ हातींचा हिरोनि घातला पोटासी । तुका म्हणे ऐसी परी जाली ॥३॥
3358 " सांडियेली काया । वरी ओंवाळूनी पायां ॥१॥ शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना ॥ध्रु.॥ आलों लोटांगणीं । रुळें तुमचे चरणीं ॥२॥ तुका म्हणे कई । डोईं ठेवीन हे पायीं ॥३॥
3359 " सांडियेलें रूप विक्राळ भ्यासुर । झालें सकुमार कोडिसवाणें ॥१॥ शाम चतुर्भुज मुकुट कुंडलें । सुंदर दंडलें नव बाळ ॥ध्रु.॥ गोपाळ म्हणती कैसें रे बा कृष्णा । रूप नारायणा धरियेलें ॥२॥ कैसा वाढलासी विक्राळ जालासी । गटगटा ज्वाळांसी गिळियेलें ॥३॥ तुका म्हणे भावें पुसती गोपाळ । अनाथवत्सल म्हणोनियां ॥४॥
3360 " सांडुनि सुखाचा वांटा । मुक्ति मागे तो करंटा ॥१॥ कां रे न घ्यावा जन्म । प्रेम लुटावें नाम ॥ध्रु.॥ येथें मळितो दहीं भात । वैकुंठीं ते नाहीं मात ॥२॥ तुका म्हणे आतां । मज न लगे सायुज्यता ॥३॥
3361 " सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भिक्तभावें ॥१॥ पाहूनियां झाडें वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावें ॥ध्रु.॥ वेंचूनियां चिंध्या भरूनियां धागा । गुंडाळूनि ढुंगा आळवावें ॥२॥ तुका म्हणे ऐसें मांडिल्या निर्वाण । तया नारायण उपेक्षीना ॥३॥
3362 " सांडूनि कीर्तन न करीं आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगीं ॥१॥ आवडीचें आर्त पुरवीं पंढरिराया । शरण तुझ्या पायां या चि लागीं ॥ध्रु.॥ टाळी वाहूनियां विठ्ठल म्हणेन । तेणें निवारीन भवश्रम ॥२॥ तुका म्हणे देवा नुपेक्षावें आम्हां । न्यावें निजधामा आपुलिया ॥३॥
3363 " सांडोनी दों अक्षरां । काय करूं हा पसारा । विधिनिषेधाचा भारा । तेणें दातारा नातुडेसी ॥१॥ म्हणोनि बोबडा उत्तरीं । वाचें जपें निरंतरीं । नाम तुझें हरी । भवसागरीं तारूं तें ॥ध्रु.॥ सर्वमय ऐसें वेदांचें वचन । श्रुति गर्जती पुराणें । नाहीं आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥२॥ शेवटीं ब्रम्हार्पण । या चि मंत्राचें कारण । काना मात्र वांयांविण । तुका म्हणे बिंदुलीं ॥३॥
3364 " सांता पांचां तरीं वचनां सेवटीं । निरोप कां भेटी एक तरी ॥१॥ कां नेणें निष्ठ केलें नारायणा । न देखें हें मना येतां कांहीं ॥२॥ तुका म्हणे ऐसा न देखें निवाड । कडू किंवा गोड फळ पोटीं ॥३॥
3365 " सांपडला हातीं । तरी जाली हे निश्चिंती ॥१॥ नाहीं धांवा घेत मन । इंद्रियांचें समाधान ॥ध्रु.॥ सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥२॥ तुका म्हणे काम । निरसुनियां घेतों नाम ॥३॥
3366 " सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें । केली नारायणें । कृपा पुण्यें पूर्वाचिया ॥१॥ सुखें आनंदरूप आतां । आम्ही आहों याकरितां । निवारली चिंता । देणें घेणें चुकलें ॥ध्रु.॥ जालें भांडवल घरिंचें । अमुप नाम विठ्ठलाचें । सुकृत भावाचें । हें तयानें दाविलें ॥२॥ तुकयाबंधु म्हणे फिटला । पांग नाहीं बोलायाला । चाड दुसरी विठ्ठ्ला । वांचूनियां आणीक ॥३॥ ॥३७॥
3367 " सांवळें रूपडें चोरटें चित्ताचें । उभें पंढरीचे विटेवरी ॥१॥ डोळियांची धणी पाहातां न पुरे । तया लागीं झुरे मन माझें ॥ध्रु.॥ आन गोड कांहीं न लगे संसारीं । राहिले अंतरीं पाय तुझे ॥२॥ प्राण रिघों पाहे कुडी हे सांडुनी । श्रीमुख नयनीं न देखतां ॥३॥ चित्त मोहियेलें नंदाच्या नंदनें । तुका म्हणे येणें गरुडध्वजें ॥४॥
3368 " सांवळें सुंदर पाहे दृष्टिभरि । ऐसें कांहीं करीं मन माझें ॥१॥ मना तुज ठाव दिला त्याचे पायीं । राहें विठाबाईंसवें सदा ॥ध्रु.॥ मना नको धरूं आणिकांचा संग । नाहीं पांडुरंग जयां मनीं ॥२॥ वरपंग भाव नको म्हणे तुका । करीं प्राणसखा नारायणा ॥३॥
3369 " साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आम्हां जोडी वैष्णवांची ॥१॥ मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥ भोजनाची चिंता माय वाहे बाळा । आम्हांसि तरी खेळावरि चित्त ॥२॥ तुका म्हणे आम्ही देहउपकारें । गाऊं निरंतर नाचों लागों ॥३॥
3370 " साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी । तयासी सेवटीं करबाडें ॥१॥ मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥ध्रु.॥ वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती यमा हातीं ॥२॥ ज्यासी असे लाभ तो चि जाणे गोडी । येर तीं बापुडीं सिणलीं वांयां ॥३॥ तुका म्हणे शहाणा होई रे गव्हारा । चोर्यासीचा फेरा फिरों नको ॥४॥
3371 " साकरेच्या योगें वर्ख । राजा कागदातें देखे ॥१॥ तैसें आम्हां मानुसपण । रामनाम केण्यागुणें ॥ध्रु.॥ फिरंगीच्या योगें करी । राजा काष्ठ हातीं धरी ॥२॥ रत्नकनका योगें लाख । कंठीं धरिती श्रीमंत लोक ॥३॥ देवा देवपाट देव्हार्यावरी बैसे स्पष्ट ॥४॥ ब्रम्हानंदयोगें तुका । पढीयंता सज्जन लोकां ॥५॥
3372 " साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥१॥ करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥ शुद्ध माझा भाव होइल तुझे पायीं । तरि च हें देई निवडूनि ॥२॥ उचित अनुचित कळों आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे मज पायांसवे चाड । सांगसी तें गोड आहे मज ॥४॥
3373 " साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले ॥१॥ साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥२॥ तुका म्हणे घेती साच साच भावें । लटिकें वर्म ठावें नाहीं त्यांसी ॥३॥
3374 " साजे अळंकार । तरि भोगितां भ्रतार ॥१॥ व्यभिचारा टाकमटिका । उपहास होती लोकां ॥ध्रु.॥ शूरत्वाची वाणी । रूप मिरवे मंडणीं ॥२॥ तुका म्हणे जिणें । शर्त्तीविण लाजिरवाणें ॥३॥
3375 " सातादिवसांचा जरी जाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥१॥ फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥ शरीराचे होत दोनी ते ही भाग । परि कीर्तनाचा रंग सोडों नये ॥२॥ तुका म्हणे ऐसा नामीं ज्या निर्धार । तेथें निरंतर देव असे ॥३॥
3376 " सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥१॥ आतां आवडीचे हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ध्रु.॥ मोकळी च पोतीं । नाहीं पुसायाची गुंती ॥२॥ तुका म्हणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥३॥
3377 " साधक जाले कळी । गुरुगुडीची लांब नळी ॥१॥ पचीं पडे मद्यपान । भांगभुर्का हें साधन ॥ध्रु.॥ अभेदाचें पाठांतर । अति विषयीं पडिभर ॥२॥ चेल्यांचा सुकाळ । पिंड दंड भंगपाळ ॥३॥ सेवा मानधन । बरे इच्छेनें संपन्न ॥४॥ सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनियां सोडी ॥५॥
3378 " साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाही ॥१॥ लोलुपता काय नद्रिेतें जिणावें । भोजन करावें परमित ॥ध्रु.॥ एकांती लोकांतीं स्त्रियांशीं वचन । प्राण गेल्या जाण बोलों नये ॥२॥ संग सज्जनाचा उच्चार नामाचा । घोष कीर्तनाचा अहर्निशीं ॥३॥ तुका म्हणे ऐसा साधनीं जो राहे । तो चि ज्ञान लाहे गुरुकृपा ॥४॥
3379 " साधन संपत्ति हें चि माझें धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥ शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळी च नीट सुखरूप ॥ध्रु.॥ वैष्णवांचा संग रामगाणें गाणें । मंडित भूषण अळंकार ॥२॥ भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडी च चाली जावें पायी ॥३॥ मायबाप दोघें पाहातील वाट । ठेवूनिया कटीं कर उभी ॥४॥ तुका म्हणे केव्हां देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥५॥
3380 " साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचें ॥१॥ पक्षियासी नाहीं मारगीं आडताळा । अंतराक्षी फळासी चि पावे ॥ध्रु.॥ भक्तिची जोडी ते उखत्या चि साटीं । उणें पुरें तुटी तेथें नाहीं ॥२॥ तुका म्हणे आलें सांचत सांचणी । आजि जाली क्षणी एकसरें ॥३३॥
3381 " साधनाचे कष्ट मोटे । येथें वाटे थोर हें ॥१॥ मुखें गावें भावें गीत । सर्व हित बैसलिया ॥ध्रु.॥ दासा नव्हे कर्म दान । तन मन निश्चळि ॥२॥ तुका म्हणे आत्मनष्टि । भागे चेष्ट मनाची ॥३॥
3382 " साधनें आमुचीं आज्ञेचीं धारकें । प्रमाण सेवकें स्वामिसत्ता ॥१॥ प्रकाशिलें जग आपुल्या प्रकाशें । रवि कर्मरसें अलिप्त त्या ॥ध्रु.॥ सांगणें तें तें नाहीं करणें आपण । मोलही वचन बाध जालें ॥२॥ तुका म्हणे आम्हां भांडवल हातीं । येरझारा खाती केवढियें ॥३॥
3383 " साधावया भक्तिकाज । नाहीं लाज हा धरीत ॥१॥ ऐसियासी शरण जावें । शक्ती जीवें न वंची ॥ध्रु.॥ भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ॥२॥ तुका म्हणे साक्ष हातीं । तो म्यां चित्ती धरियेला ॥३॥
3384 " साधावा तो देव सर्वस्वाचेसाटीं । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥१॥ मग कासयानें पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥ध्रु.॥ जिणें दिल्हें त्यासी द्यावा पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावें ॥२॥ तुका म्हणे निज भोगईंल निजता । नाहीं होइल सत्ता दुजियाची ॥३॥
3385 " साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥ वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥२॥ तुका म्हणे आतां लाज धरीं बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥३॥
3386 " सापें ज्यासी खावें । तेणें प्राणासी मुकावें ॥१॥ काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंकी जन ॥ध्रु.॥ विंचु हाणें नांगी । अग्न लावी आणिकां अंगीं ॥२॥ तुका म्हणे जाती । नरका पाउलीं चालती ॥३॥ स्वामींनीं स्त्रीस उपदेश केला ते अभंग ॥ ११ ॥
3387 " सामावे कारण । नाहीं सोसत धरणें ॥१॥ लादी थींके लाजिरवाणी । हीनकमाईंची घाणी ॥ध्रु.॥ पुष्प जवळी नाका । दुगपधीच्या नांवें थुंका ॥२॥ तुका म्हणे किती । उपदेशहीन जाती ॥३॥
3388 " सारावीं लिगाडें धरावा सुपंथ । जावें उसंतीत हळूहळू ॥१॥ पुढें जातियाचे उमटले माग । भांबावलें जग आडरानें ॥ध्रु.॥ वेचल्याचा पाहे वरावरि झाडा । बळाचा निधडा पुढिलिया ॥२॥ तुका म्हणे जैसी दाखवावी वाणी । ते द्यावी भरोनी शेवट तों ॥३॥
3389 " सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें ॥१॥ तयाच्या चिंतनें निरसलें संकट । तरलों दुर्घट भवसिंधु ॥ध्रु.॥ जन्मोनियां कुळीं वाचे स्मरे राम । धरी हा चि नेम अहिर्निशीं ॥२॥ तुका म्हणे कोटी कुळें तीं पुनीत । भावें गातां गीत विठोबाचे ॥३॥
3390 " सारीन तें आतां एकाचि भोजनें । वारीन मागणें वेळोवेळां ॥१॥ सेवटींच्या घासें गोड करीं माते । अगे कृपावंते पांडुरंगे ॥ध्रु.॥ वंचूं नये आतां कांहीं च प्रकार । धाकल्याचें थोर जाल्यावरी ॥२॥ तुका म्हणे आतां बहु चाळवावें । कांहीं नेदीं ठावें उरों मागें ॥३॥
3391 " सालोमालो हरिचे दास । म्हणउन केला अवघा नास ॥१॥ अवघें बचमंगळ केलें । म्हणती एकांचें आपुले ॥ध्रु.॥ मोडूनि संतांचीं वचनें । करिती आपणां भूषणें ॥२॥ तुका म्हणे कवी । जगामधीं रूढ दावी ॥३॥
3392 " सावधान ऐसें काय तें विचारा । आले हो संसारा सकळ ही ॥१॥ अंतीं समयाचा करणें विचार । वेचती सादर घटिका पळें ॥ध्रु.॥ मंगळ हें नोहे कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥२॥ तुका म्हणे देव अंतरला दुरी । डोळिया अंधारी पडलीसे ॥३॥
3393 " सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥ आणीक कांहीं इच्छा आम्हां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥ जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आम्हांसी सहज द्यावें आतां ॥२॥ तुका म्हणे तुज ऐसे दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आम्हां ॥३॥
3394 " सावित्रीची विटंबण । रांडपण करीतसे ॥१॥ काय जाळावें तें नांव । अवघें वाव असे तें ॥ध्रु.॥ कुबिर नांव मोळी वाहे । कैसी पाहें फजिती ॥२॥ तुका म्हणे ठुणगुण देखें । उगीं मूर्ख फुंदता ॥३॥
3395 " साही शास्त्रां अतिदुरी तो परमात्मा श्रीहरि । तो दशरथाचे घरीं क्रीडतो राम ॥१॥ शिवाचें निजदेह वाल्मीकाचें निजगुहे । तो भिल्लटीचीं फळें खाय श्रीराम तो ॥ध्रु.॥ योगियांचे मनीं नातुडे चिंतनीं । वानरांचे कानीं गोष्टी सांगे ॥२॥ चरणीं शिळा उद्धरी नामें गणिका तारी । तो कोळिया घरीं पाहुणा राम ॥३॥ क्षण एक सुरवरा नातुडे नमस्कारा । तो रिसा आणि वानरा क्षम दे राम ॥४॥ राम सांवळा सगुण राम योगियाचें ध्यान । राम राजीवलोचन तुका चरण वंदितो ॥५॥
3396 " साहोनियां टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें ॥१॥ तया रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥ध्रु.॥ बाण शस्त्र साहे गोळी । सुरां ठाव उंच स्थळीं ॥२॥ तुका म्हणे सती । अग्न न देखे ज्या रीती ॥३॥
3397 " साहोनियां टोले उरवावें सार । मग अंगीकार खर्या मोलें ॥१॥ भोगाचे सांभाळीं द्यावें किळवर । संचित चि थार मोडूनियां ॥ध्रु.॥ महत्वाचे ठायीं भोगावी अप्रतिष्ठा । विटवावें नष्टां पंचभूतां ॥२॥ तुका म्हणे मग कैंचा संवसार । जयाचा आदर तें चि व्हावें ॥३॥
3398 " सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ ॥१॥ नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ध्रु.॥ पाणचोर्याचें दार । वरिल दाटावें तें थोर ॥२॥ वस्व जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥३॥ एक चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥४॥ तुका म्हणे धांवा । आहे पंढरिये विसांवा ॥५॥
3399 " सिंदळीचे सोर चोराची दया । तो ही जाणा तया संवसर्गी ॥१॥ फुकासाटीं भोगे दुःखाचा वाटा । उभारोनी कांटा वाटेवरी ॥ध्रु.॥ सर्प पोसूनियां दुधाचा नास । केलें थीता विष अमृताचें ॥२॥ तुका म्हणे यासी न करितां दंडण । पुढिल खंडण नव्हे दोषा ॥३॥
3400 " सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । सांटविल्याबीजास काय करी ॥१॥ अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देइल कोण काका त्याचा ॥२॥ तुका म्हणे नाहीं खायाची ते चाड । तरि कां लिगाड करुनी घेतोस ॥३॥
3401 " सिकविला तैसा पढों जाणे पुसा । कैंची साच दशा तैसी अंगीं । स्वप्नींच्या सुखें नाहीं होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥१॥ कासया हा केला जिहुवे अळंकार । पायांसी अंतर दिसतसे ॥ध्रु.॥ दर्पणींचें धन हातीं ना पदरीं । डोळां दिसें परी सत्याचिये । आस केली तरी लाळ चि घोंटावी । ठकाठकी तेवीं दिसतसे ॥२॥ कवित्वें रसाळ वदविली वाणी । साक्ष ही पुराणीं घडे ऐसी । तुका म्हणे गुरें राखोनि गोंवारी । माझीं म्हणे परि लाभ नाहीं ॥३॥
3402 " सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥१॥ न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥ मायबापें माझीं जीवाचीं सांगाती । तीं देतील हातीं काळाचिया ॥२॥ पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनिया ॥३॥ पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां ॥४॥ जन साहेभूत असे या सकळां । मी एक निराळा परदेशी ॥५॥ कोणा काकुलती नाहीं कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥६॥ तुका म्हणे मज तुझाची भरवसा । म्हणऊनि आशा मोकलिली ॥७॥
3403 " सिद्धीचा दास नव्हें श्रुतीचा अंकिला । होईंन विठ्ठला सर्व तुझा ॥१॥ सर्वकाळ सुख आमच्या मानसीं । राहिलें जयासी नास नाहीं ॥ध्रु.॥ नेणें पुण्य पाप न पाहें लोचनीं । आणिका वांचूनि पांडुरंगा ॥२॥ न करीं आस मुक्तीचे सायास । भक्तिप्रेमरस सांडूनियां ॥३॥ गर्भवासीं धाक नाहीं येतां जातां । हृदयीं राहतां नाम तुझें ॥४॥ तुका म्हणे जालों तुझा चि अंकिला । न भें मी विठ्ठला कळिकाळासी ॥५॥
3404 " सिळे खातां आला वीट । सुनें धीट पावि धरी ॥१॥ कान्होबा ते जाणे खूण । उन उन घास घाली ॥ध्रु.॥ आपुलिये ठायींचे घ्यावें । लाड भावें पाळावा ॥२॥ तुका म्हणे मी जुनाट । मोहो आट परतला ॥३॥
3405 " सीण भाग हरे तेथींच्या निरोपें । देखिलिया रूप उरी नुरे ॥१॥ इंद्रियांची धांव होईंल कुंटित । पावेल हें चित्ती समाधान ॥ध्रु.॥ माहेर आहेसें लौकिकीं कळावें । निढळ बरवें शोभा नेदी ॥२॥ आस नाहीं परी उरी बरी वाटे । आपलें तें भेटे आपणासी ॥३॥ तुका म्हणे माझी अविट आवडी । खंडण तांतडी होऊं नेदीं ॥४॥
3406 " सुंदर अंगकांती मुखें भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरी रेख । मस्तकीं मुगुट कानीं कुंडलां तेज फांके । आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥१॥ जय देवा चुतर्भुजा जया लावण्यतेजा । आरती ओवाळीन भवतारिया हा वोजा । जय. ॥ध्रु.॥ उदार जुंझार हा जया वाणिती श्रुति । परतल्या नेति म्हणती तयां न कळे गति । भाट हा चतुर्मुखें अनुवाद करिती । पांगलीं साही अठरा रूप न गति ॥२॥ ऐकोनि रूप ऐसें तुजलागीं धुंडिती । बोडके नग्न एक निराहार ईति । साधनें योग नाना तपें दारुण किती । सांडिलें सुख दिली संसारा शांती ॥३॥ भरूनि माजी लोकां तिहीं नांदसि एक । कामिनी मनमोहना रूप नाम अनेक । नासति नाममात्रें भवपातकें शोक । पाउलें वंदिताती सिद्ध आणि साधक ॥४॥ उपमा द्यावयासी दुजें काय हें तुज । तत्वासि तत्वसार मूळ जालासी बीज । खेळसि बाळलीळा अवतार सहज । विनवितो दास तुका कर जोडोनि तुज ॥५॥
3407 " सुकलियां कोमां अत्यंत जळधर । तेणें च प्रकार न्याय असे ॥१॥ न चलें पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचें हो मन त्वरेलागीं ॥२॥ तुका म्हणे भूक न साहावे बाळा । जीवनांची कळा ओढलीसे ॥३॥
3408 " सुकाळ हा दिवसरजनी । नीत धणी नवी च ॥१॥ करुण सेवूं नानापरी । राहे उरी गोडीनें ॥ध्रु.॥ सरे ऐसा नाहीं झरा । पंक्ती करा समवेत ॥२॥ तुका म्हणे बरवा पान्हा । कान्हाबाईं माउलीचा ॥३॥
3409 " सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांया हांवभरी होऊं नका ॥१॥ दुःखबांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥ध्रु.॥ चवदा कल्पेंवरी आयुष्य जयाला । परी तो राहिला ताटीखालीं ॥२॥ तुका म्हणे वेगीं जाय सुटोनियां । धरूनि हृदयामाजी हरि ॥३॥
3410 " सुख वाटे परी वर्म । धर्माधर्म न कळे ॥१॥ गायें नाचें एवढें जाणें । विठ्ठल म्हणे निर्लज्ज ॥ध्रु.॥ अवघें माझें एवढें धन । साधन ही सकळ ॥२॥ तुका म्हणे, पायां पडें । तुमच्या कोडें संतांच्या ॥३॥
3411 " सुख सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे ॥१॥ रविरिश्मकळा । नये घालितां पैं डोळां ॥ध्रु.॥ दुरि तें जवळी । स्नेहें आकाशा कवळी ॥२॥ तुका म्हणे चत्ति । माझें पायीं अखंडित ॥३॥
3412 " सुख सुखा विरजण जालें । तें मथलें नवनीत ॥१॥ हाले डोले हरुषे काया । निवती बाह्या नयन ॥ध्रु.॥ प्रबल तो नारायण । गुणें गुण वाढला ॥२॥ तुका म्हणे भरली सीग । वरी मग वोसंडे ॥३॥
3413 " सुख हें नावडे आम्हां कोणा बळें । नेणसी अंधळें जालीशी तूं ॥१॥ भूक तान कैसी राहिली निश्चळ । खुंटलें चपळ मन ठायीं ॥ध्रु.॥ द्रव्य जीवाहूनि आवडे या जना । आम्हांसी पाषाणाहूनि हीन ॥२॥ सोइरे सज्जन जन आणि वन । अवघें समान काय गुणें ॥३॥ तुका म्हणे आम्हां जवळी च आहे । सुख दुःख साहे पांडुरंग ॥४॥
3414 " सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगा सारिकें तें ॥१॥ न लगे हिंडणें मुंडणें ते कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी ॥ध्रु.॥ चंद्रभागे स्नान विध तो हरिकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥२॥ तुका म्हणे काला वैकुंठीं दुर्लभ । विशेष तो लाभ संतसंग ॥३॥
3415 " सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ॥१॥ बाळगोपाळाची वाट । सेवे सेवकता नीट ॥ध्रु.॥ जरी झाला श्रम । तरी पडों नये भ्रम ॥२॥ तुका म्हणे दासां । देव सरिसासरिसा ॥३॥
3416 " सुखवाटे ये चि ठायी । बहु पायीं संतांचें ॥१॥ म्हणऊनि केला वास । नाहीं नास ते ठायीं ॥ध्रु.॥ न करवे हाली चाली । निवारिली चिंता हे ॥२॥ तुका म्हणे निवे तनु । रजकणु लागती ॥३॥
3417 " सुखाची वसति जाली माझे जीवीं । तुमच्या गोसावी कृपादानें ॥१॥ रूप वेळावेळां आठवीं अंतरीं । बैसोनि जिव्हारीं राहिलें तें ॥ध्रु.॥ विसांवलें मन विठ्ठलें प्रपंचा । गोडावली वाचा येणें रसें ॥२॥ तुका म्हणे कांहीं नाठवेसें केलें । दुसरें विठ्ठलें मज आतां ॥३॥
3418 " सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥१॥ संगती पंगती देवासवें घडे । नित्यानित्य पडे तें चि सांचा ॥ध्रु.॥ समर्थचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कदा कासयाची ॥२॥ तुका म्हणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥३॥
3419 " सुखाचें ओतलें । दिसे श्रीमुख चांगलें ॥१॥ मनेंधरिला अभिळास । मिठी घातली पायांस ॥ध्रु.॥ होतां दृष्टादृष्टी । तापगेला उठाउठी ॥२॥ तुका म्हणे जाला । लाभें लाभ दुणावला ॥३॥
3420 " सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन ॥१॥ त्याचें दिलें त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥ध्रु.॥ आहे हा आधार । नाम त्याचें विश्वंभर ॥२॥ नाही रिता ठाव । तुका म्हणे पसरीं भाव ॥३॥
3421 " सुखें घेऊं जन्मांतरें । एक बरें इहलोकीं ॥१॥ पंढरीचे वारकरी । होतां थोरी जोडी हे ॥ध्रु.॥ हरिदासांचा समागम । अंगीं प्रेम विसांवे ॥२॥ तुका म्हणे हें चि मन । इच्छादान मागतसे ॥३॥
3422 " सुखें न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण ॥१॥ हें कां ठायींचें न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥ध्रु.॥ चालोनि आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥२॥ तुका म्हणे कोणा । बोल ठेवितो शाहाणा ॥३॥
3423 " सुखें होतो कोठें घेतली सुती । बांधविला गळा आपुले हातीं ॥१॥ काय करूं बहु गुंतलों आतां । नये सरतां मागें पुढें ॥ध्रु.॥ होतें गांठी तें सरलें येतां । आणीक माथां रीण जालें ॥२॥ सोंकरिलियाविण गमाविलें पिक । रांडापोरें भिके लावियेलीं ॥३॥ बहुतांचीं बहु घेतलीं घरें । न पडे पुरें कांहीं केल्या ॥४॥ तुका म्हणे कांहीं न धरावी आस । जावें हें सर्वस्व टाकोनियां ॥५॥
3424 " सुगरणीबाईं थिता नास केला । गुळ तो घातला भाजीमध्यें ॥१॥ क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । थितें चि वोंगळ कैसें केलें ॥ध्रु.॥ दळण दळोनी भरूं गेली पाळी । भरडोनि वोंगळी नास केला ॥२॥ कापुराचे सांते आणिला लसण । वागवितां सीण दुःख होय ॥३॥ रत्नाचा जोहारी रत्न चि पारखी । येर देखोदेखीं हातीं घेती ॥४॥ तुका म्हणे जरी योग घडे निका । न घडतां थुंका तोंडावरी ॥५॥
3425 " सुटायाचा कांहीं पाहातों उपाय । तों हे देखें पाय गोवियेले ॥१॥ ऐसिया दुःखाचे सांपडलों संदी । हारपली बुद्धि बळ माझें ॥ध्रु.॥ प्रारब्ध क्रियमाण संचिताचें । वोढत ठायींचे आलें साचें ॥२॥ विधिनिषेधाचे सांपडलों चपे । एकें एक लोपे निवडेना ॥३॥ सारावें तें वाढे त्याचिया चि अंगें । तृष्णेचिया संगें दुःखी जालों ॥४॥ तुका म्हणे आतां करीं सोडवण । सर्वशक्तिहीन जालों देवा ॥५॥
3426 " सुधारसें ओलावली । रसना धाली न धाय ॥१॥ कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्णता ॥ध्रु.॥ आवडे तें तें च यासी । ब्रम्हरसीं निरसें ॥२॥ तुका म्हणे बहुतां परी । करूनि करीं सेवन ॥३॥
3427 " सुनियांचा हा चि भाव । आपला ठाव राखावा ॥१॥ दुजियाचा येऊं वारा । नेदूं घरावरी देऊं ॥ध्रु.॥ केली याची फाडाफाडी। तडामोडी क्षेत्राची ॥२॥ पातेजत नाहीं लोकां । तुका देवावांचूनि ॥३॥
3428 " सुनियांची आवडी देवा । घेत सेवा नाहीं कांहीं ॥१॥ सिकविलें जवळी बैसों । जेथें असों तेथें चि ॥ध्रु.॥ नेदी दुजें बोलों करूं । गुरुगुरु न साहे ॥२॥ तुका म्हणे कृवाळितां । अंग सत्ता संगाची ॥३॥
3429 " सुरवर येती तीर्थे नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥१॥ साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥ पंचक्रोशीमाजी रीग नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥२॥ निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं ब्रम्हानंदु ॥३॥ तु का म्हणे ज्यापें नाहीं पुष्पलेश । जा रे पंढरीस घेई कोटि ॥४॥
3430 " सुराणीचीं जालों लाडिकीं एकलीं । वडील धाकुलीं आम्ही देवा ॥१॥ म्हणऊनि कांहीं न घडे अव्हेर । गोमटें उत्तर भातुकें ही ॥ध्रु.॥ कांहीं एक नाहीं वंचिलें वेगळें । मुळीचिया मुळें स्थिराविलें ॥२॥ लेवविलीं अंगीं आपुलीं भूषणें । अळंकार लेणें सकळ ही ॥३॥ सारितां न सरे आमुप भांडार । धना अंतपार नाहीं लेखा ॥४॥ तुका म्हणे आम्ही आळवूं आवडी । म्हणऊनी जोडी दाखविली ॥५॥
3431 " सुलभ कीर्तनें दिलें ठसावूनि । करितां धरणी उरी कोण ॥१॥ आतां न टळावें केलिया नेमासी । उदाराचा होसी हीन काय ॥ध्रु.॥ एका नेमें कोठें दुसरा पालट । पादिर तो धीट म्हणती त्यासी ॥२॥ तुका म्हणे किती बोलसी उणें । एकाच वचनें खंड करीं ॥३॥
3432 " सेंकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥१॥ स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥ध्रु.॥ सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं ज्ञानपणाची मस्ती ॥२॥ तुका म्हणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें ठोका ॥३॥
3433 " सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥१॥ राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥ भेणें झडपणी नाहीं येथें दुजें । पादरधिटा ओझें हतियारें ॥२॥ तुका म्हणे मज नाहीं जी भरवसा । तोवरि सहसा निवाडु तो ॥३॥
3434 " सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥१॥ सोंकरीं सोंकरीं विसावा तों वरा । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥ गोफणेसी गुंडा घालीं पागोर्याच्या नेटें । पळती हाहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥२॥ पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मान बळ बुद्धि व्हावीं दोनी ॥३॥ खळे दानें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग देई त्यासी ॥४॥ तुका म्हणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥५॥
3435 " सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥१॥ नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा । सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु.॥ जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥२॥ कर्म कुळवणी । न लगे धर्मपाळी दोन्ही ॥३॥ ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥४॥ बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचे ॥५॥ नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागोर्याच्या नेटें ॥६॥ पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥७॥ सराये सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥८॥ प्रेम पिकलें अपार । नाहीं सांटवावया थार ॥९॥ ऐसीये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥१०॥
3436 " सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥१॥ मनाचिये मुळीं रहावें बैसोन । आक्रशावे गुण पायांपाशीं ॥ध्रु.॥ भेटीचे तांतडी करीतसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसें वाटे ॥३॥ तुका म्हणे माझें करावें कारण । आपुलें जतन ब्रीद कशाला ॥४॥
3437 " सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥ आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं टळों नये ॥ध्रु.॥ समय सांभाळूनि आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तपायरी ॥२॥ तुका म्हणे तरी म्हणवावें सेवक । खादलें तें हाक अन्न होय ॥३॥
3438 " सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥ काय देवा नेणों आलें गांढेपण । तुम्ही शक्तिहीन जाले दिसां ॥ध्रु.॥ विष्णुदास आम्ही निर्भर ज्याबळें । तें दिसे या काळें अव्हेरिलें ॥२॥ तुका म्हणे मूळ पाठवा लौकरी । किंवा करूं हरी काय सांगा ॥३॥
3439 " सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥ घेईंल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्ती सांदी जनां ॥ध्रु.॥ खद्योतें दावावी रवी केवीं वाट । आपुलें चि नीट उसंतावें ॥२॥ तुका म्हणे तो ज्ञानाचा सागर । परि नेंदी अगर भिजों भेदें ॥३॥
3440 " सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥१॥ आलों निजांच्या माहेरा । भेटों रखुमाईंच्या वरा ॥ध्रु.॥ परिहार जाला । अवघ्या दुःखाचा मागिल्या ॥२॥ तुका म्हणे वाणी । गेली आतां घेऊं धणी ॥३॥
3441 " सेवट तो होती तुझियानें गोड । म्हणऊनि चाड धरीतसों ॥१॥ देऊं भोगाभोग कलिवरचा भार । साहों तुज थार त्याचमधीं ॥ध्रु.॥ तुझ्या बळें कांहीं खटपट काम । वाढवावा श्रम न लगे तो ॥२॥ तुका म्हणे आम्ही चेंपलों या भारें । तुमचें तें खरें देवपण ॥३॥
3442 " सेवटासी जरी आलें । तरी जालें आंधळें ॥१॥ स्वहिताचा लेश नाहीं । दगडा कांहीं अंतरीं ॥ध्रु.॥ काय परिसासवें भेटी । खापरखुंटी जालिया ॥२॥ तुका म्हणे अधम जन । अवगुणें चि वाढवी ॥३॥
3443 " सेवटींची हे विनंती । पाय चित्तीं रहावे ॥१॥ ऐसे करा कृपादान । तुम्हां मन सन्निध ॥ध्रु.॥ भाग्याविण कैंची भेटी । नव्हे तुटी चिंतनें ॥२॥ तुका म्हणे कळसा आलें । हें विठ्ठलें परिसावें ॥३॥
3444 " सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥१॥ न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥ देवाचीं च नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारीं समर्पावीं ॥२॥ तुका म्हणे आहे भावें चि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥३॥
3445 " सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन जोडा ॥१॥ ऐसें जन्म आतां मज देई देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥ त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीत ते शिरीं जाइन मागें ॥२॥ तुका म्हणे येथें राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनियां ॥३॥
3446 " सैन्य जन हांसे राया जालें काईं । वासपे तो ठायीं आपणासि ॥१॥ आपणा आपण जयास तीं तैसीं । वैरभाव ज्यांसि भक्ति नाहीं ॥२॥ नाहीं याचा त्याचा भाव एकविध । म्हणउनि छंद वेगळाले ॥३॥ वेगळाल्या भावें ती तया हांसती । तयास दिसती अवघीं हरि ॥४॥ हरिला कंसाचा जीव भाव देवें । द्वेषाचिया भावें तुका म्हणे ॥५॥
3447 " सोंगें छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥१॥ सारा अवघें गाबाळ । डोळ्या आडील पडळ ॥ध्रु.॥ शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥२॥ तुका म्हणे कळे । परि होताती अंधळे ॥३॥
3448 " सोंवळा होऊं तों वोंवळें जडलें । सांडीमांडी बोलतोंडीं बीजीं ॥१॥ एकसरीं केलीं कळिवरें साटी । आतां नका तुटी पायांसवें ॥ध्रु.॥ संकल्पीं विकल्प पापाचा सुकाळ । रज्जुसर्प मूळ मरणाचें ॥२॥ तुका म्हणे हें तूं ब्रम्हांड चाळिता । मी कां करूं चिंता पांडुरंगा ॥३॥
3449 " सोइरे धाइरे दिल्याघेतल्याचे । अंत हें काळीचें नाहीं कोणी ॥१॥ सख्या गोत्रबहिणी सुखाचे संगती । मोकलुनी देती अंतकाळीं ॥ध्रु.॥ आपुलें शरीर आपुल्यासी पारिखें । परावीं होतील नवल काई ॥२॥ तुका म्हणे आतां सोड यांची आस । धरीं रे या कास पांडुरंगा ॥३॥
3450 " सोइर्यासी करी पाहुणेर बरा । कांडितो ठोंबरा संता साटीं ॥१॥ गाईंसी देखोनी बदबदा मारी । घोडएाची चाकरी गोड वाटे ॥ध्रु.॥ पान फुल नेतो वेश्येसी उदंड । ब्राम्हणासी खांड देऊं नेदी ॥२॥ पर्वकाळीं धर्म न करी नासरी । वेची राजद्वारीं उदंड चि ॥३॥ कीर्त्तना जावया होतसे हींपुष्टी । खेळतो सोंकटीं रात्रंदिवस॥४॥ बाइलेच्या गोता आवडीनें पोसी । मातापितियासाठी दवडितो ॥५॥ तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥६॥
3451 " सोडियेल्या गांठी । दरुषणें कृष्णभेटी ॥१॥ करिती नारी अक्षवाणें । जीवभाव देती दानें ॥ध्रु.॥ उपजल्या काळें । रूपें मोहीलीं सकळें ॥२॥ तुका तेथें वारी । एकी आडोनि दुसरी ॥३॥
3452 " सोडियेल्या गाईं नवलक्ष गोपाळीं । सवें वनमाळी चालियेला ॥१॥ सुदीन समय भाग्याचा उदय । चारावया गाईं वनामाजी ॥ध्रु.॥ गाईंगोपाळांच्या संगें चाली हरि । क्रीडा नानापरि खेळताति ॥२॥ काठी कांबळीया मोहरीया पोंवा । सिदोरी गांजिवा खांद्यावरि ॥३॥ गोधनें संवगडे खेळे नानापरी । आले भीमातीरीं वेणुनादा ॥४॥ तेथें उभा ठेला गोपाळांसहित । सिदोरिया सोडीत बैसे तेथें ॥५॥ तुका म्हणे ज्यांनीं आणिल्या भाकरी । नेऊनियां हरीपुढें देती ॥६॥
3453 " सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥१॥ काय करावें प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ध्रु.॥ मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा सांट ॥२॥ तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥३॥
3454 " सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥१॥ परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न सरती ॥ध्रु.॥ अमृतें सागर भरवे ती गंगा । म्हणवेल उगा राहें काळा ॥२॥ भूत भविष्य कळों येईंल वर्तमान । करवती प्रसन्न रिद्धिसिद्धी ॥३॥ स्थान मान कळों येती योगमुद्रा । नेववेल वारा ब्रम्हांडासी ॥४॥ तुका म्हणे मोक्ष राहे आलीकडे । इतर बापुडें काय तेथें ॥५॥
3455 " सोपें वर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेउनि नाचा ॥१॥ समाधीचें सुख सांडा ओंवाळून । ऐसें हें कीर्तन ब्रम्हरस ॥ध्रु.॥ पुढती घडे चढतें सेवन आगळें । भक्तिभाग्यबळें निर्भरता ॥२॥ उपजों चि नये संदेह चित्तासी । मुक्ति चारी दासी हरिदासांच्या ॥३॥ तुका म्हणे मन पावोनि विश्रांती । त्रिविध नासती ताप क्षणें ॥४॥
3456 " सोळा सहस्र होऊं येतें । भरलें रितें आम्हापें ॥१॥ ऐसे तुम्हां ठायाठाव । देव म्हुण संपादे ॥ध्रु.॥ कैची चिरामध्यें चिरे । मना बरें आलें तें ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । अंगलगा भिन्न करा ॥३॥
3457 " सोवळा तो जाला । अंगीकार देवें केला ॥१॥ येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥ध्रु.॥ चुकला हा भार । तयाची च येरझार ॥२॥ तुका म्हणे दास । जाला तया नाहीं नास ॥३॥
3458 " सोसियेला आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥१॥ वाहोनि सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥२॥ नेदी काळाचिये हातीं सेवकांसि । तुका म्हणे ऐसी ब्रिदावळी ॥३॥
3459 " सोसें बहुगर्भवासीं । मेलों असों उपवासीं । नाहीं सखीं ऐसीं । तेथें कोणी भेटलीं ॥१॥ करीं करीं रे स्वहित । देह तंव हे अनित्य । नाहीं दिलें चित्त । सोडवूं मोहापासोनि ॥ध्रु.॥ पाळी तोंडीचिया घांसें । तें चि होय अनारिसें । ज्या नव्हे ऐसें । खेदी परि सोडवीना ॥२॥ तुका म्हणे धनमानें । माझ्या बाटलों मीपणें । नाहीं दिला जनें । देखों लाभें हा लाभ ॥३॥
3460 " सोसें वाढे दोष । जाला न पालटे कस ॥१॥ ऐसें बरवें वचन । करितां तें नारायण ॥ध्रु.॥ असे प्रारब्ध नेमें । श्रमुचि उरे श्रम ॥२॥ सुख देते शांती । तुका म्हणे धरितां चित्तीं ॥३॥
3461 " सोसें सोसें मारूं हाका । होइल चुका म्हणऊनि ॥१॥ मागें पुढें क्षणभरी । नव्हे दुरी अंतर ॥ध्रु.॥ नाम मुखीं बैसला चाळा । वेळोवेळां पडताळीं ॥२॥ तुका म्हणे सुखी केलें । या विठ्ठलें बहुतांसी ॥३॥
3462 " स्तवूनियां नरा । केला आयुष्याचा मातेरा ॥१॥ नारायणचिया लोपें । घडलीं अवघीं चि पापें ॥ध्रु.॥ जीव ज्याचें दान । त्याचा खंडूनियां मान ॥२॥ तुका म्हणे वाणी । आइके त्या दोष कानीं ॥३॥
3463 " स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥१॥ तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥ रामकृष्णहरि मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥२॥ तुका म्हणे तुमचें सेवितों उच्चिष्ट । क्षमा करीं धीट होऊनियां ॥३॥
3464 " स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥१॥ आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥ध्रु.॥ इह लोकीं थुंका उडे तोंडावरी । करणें अघोरी वास लागे ॥२॥ तुका म्हणे माप वाचेऐसें निकें । भरलें नरकें निंदेसाटीं ॥३॥
3465 " स्तुती तरि करूं काय कोणापासीं । कीर्त तरि कैसी वाखाणावी ॥१॥ खोट्या तंव नाहीं अनुवादाचें काम । उरला भ्रम वरि बरा ॥ध्रु.॥ म्हणवावें त्याची खुण नाहीं हातीं । अवकळा फजिती सावकाशें ॥२॥ तुका म्हणे हेंगे तुमचें माझें तोंड । होऊनिया लंड आळवितों ॥३॥
3466 " स्त्रिया धन बा हें खोटें । नागवले मोठे मोठे ॥१॥ म्हणोनि सांडा दोनी । सुख पावाल निदानीं ॥ध्रु.॥ सर्वदुःखासी कारण । हीं च दोन्हीचीं प्रमाण ॥२॥ आशा सर्वस्वें सांडावी । तेणें निजपदवी पावावी ॥३॥ देह लोभें नाडला । घाला यमाचा पडला ॥४॥ तुका म्हणे निरापेक्षा । कांहीं न धरावी अपेक्षा ॥५॥
3467 " स्त्रिया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥१॥ यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥२॥ ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका म्हणे ॥३॥
3468 " स्थिरावली वृित्त पांगुळला प्राण । अंतरींची खुण पावूनियां ॥१॥ पुंजाळले नेत्र जाले अर्धोन्मीळित । कंठ सद्गदित रोमांच आले ॥ध्रु.॥ चित्त चाकाटलें स्वरूपा माझारी । न निघे बाहेरी सुखावलों ॥२॥ सुनीळ प्रकाश उदैजला दिन । अमृताचें पान जीवनकळा ॥३॥ शशिसूर्या जाली जीवें ओंवाळणी । आनंदा दाटली आनंदाची ॥४॥ तुका म्हणे सुखें प्रेमासी डुलत । वीरालों निश्चिंत निश्चिंतीनें ॥५॥
3469 " स्मरणाचे वेळे । व्हावें सावध न कळे ॥१॥ पडिलों विषयांचे ओढीं । कोणी न दिसेसें काढी ॥ध्रु.॥ भांडवल माझें । वेच जालें भूमी ओझें ॥२॥ तुका म्हणे कळे । तूं चि धावें ऐसें वेळे ॥३॥
3470 " स्मरतां कां घडे नास । विष्णुदास यावरी ॥१॥ ऐसी सीमा जाली जगीं । तरी मी वेगीं अनुसरलों ॥ध्रु.॥ धरिलें तें निवडे आतां । न घडे चित्तावेगळें ॥२॥ तुका म्हणे नाश नाहीं । पुराणें ही गर्जती ॥३॥
3471 " स्मशानीं आम्हां न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा ॥१॥ नाहीं तरीं वांयां अवघें निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥ध्रु.॥ झाडें झुडें जीव सोइरे पाषाण । होती तई दान तुम्हीं केलें ॥२॥ तुका म्हणे आतां पाहे अनुभव । घेऊनि हातीं जीव पांडुरंगा ॥३॥
3472 " स्वगाअचे अमर इच्छिताति देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हां ॥१॥ नारायणनामें होऊं जिवनमुक्त । कर्तिनीं अनंत गाऊं गीती ॥ध्रु.॥ वैकुंठींचे जन सदा चिंतिताति । कइं येथें येती हरिचे दास ॥२॥ यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनियां कर तिष्ठतसे ॥३॥ तुका म्हणे पावावया पैल पार । नामंत्र सार भाविकासि ॥४॥
3473 " स्वप्नींचें हें धन हातीं ना पदरीं । प्रत्यक्ष कां हरि होऊं नये ॥१॥ आजुनि कां करा चाळवाचाळवी । सावकाशें द्यावी सत्य भेटी ॥ध्रु.॥ बोलोनियां फेडा जीवींची काजळी । पाहेन कोमळीं चरणांबुजें ॥२॥ तुका म्हणे माझ्या जीवींचिया जीवा । सारूनियां ठेवा पडदा आतां ॥३॥
3474 " स्वप्नींच्या व्यवहारा काळांतर लेखा । जागृतीसि रुका गांठ नाहीं ॥१॥ तेवीं शब्दज्ञानें करिती चावटी । ज्ञान पोटासाटीं विकों नये ॥ध्रु.॥ बोलाची च कढी बोलाचा ची भात । जेवूनियां तृप्त कोण जाला ॥२॥ कागदीं लिहिली नांवाची साकर । चाटितां मधुर केवीं लागे ॥३॥ तुका म्हणे जळो जळो त्याचें ज्ञान। यमपुरी कोण दंड साहे ॥४॥
3475 " स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥१॥ सेकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥ध्रु.॥ सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं ज्ञानपणाची मस्ती ॥२॥ तुका म्हणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें ठोका ॥३॥
3476 " स्वयें पाक करी । संशय तो चि धरी । संदेहसागरीं । आणीक परी बुडती ॥१॥ जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख । देखिले बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ध्रु.॥ तो चि जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें । नाचती पाल्हाळें । जे विटाळें कोंडिले ॥२॥ तो चि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी । वेठी आणि करियेले ॥३॥ अखंड ते ध्यान । समबुद्धी समाधान । सोंग वांयांविण । ते झांकून बैसती ॥४॥ करणें जयासाटीं । जो नातुडे कवणे आटी । तुका म्हणे साटी । चित्तवित्तेवांचूनि ॥५॥
3477 " स्वल्प वाट चला जाऊं । वाचे गाऊं विठ्ठल ॥१॥ तुम्ही आम्ही खेळीमेळीं । गदा रोळी आनंदें ॥ध्रु.॥ ध्वजा कुंचे गरुडटके । शृंगार निके करोनि ॥२॥ तुका म्हणे हें चि नीट । जवळी वाट वैकुंठा ॥३॥
3478 " स्वामिकाज गुरुभक्ति । पितृवचन सेवा पति ॥१॥ हे चि विष्णूची महापूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥ सत्य बोले मुखें । दुखवे आणिकांच्या दुःखें ॥२॥ निश्चयाचें बळ । तुका म्हणे तें च फळ ॥३॥
3479 " स्वामित्वाचीं वर्में असोनि जवळी । वाहों जावें मोळी गुणांसवें ॥१॥ काबाडापासूनि सोडवा दातारा । कांहीं नका भारा पात्र करूं ॥ध्रु.॥ धनवंत्याचिये अंगीं सत्ताबळ । व्याधि तो सकळ तोडावया ॥२॥ तुका म्हणे आलें मोड्यासी कोंपट । सांडव्याची वाट विसरावी ॥३॥
3480 " स्वामिसेवा गोड । माते बाळकाचें कोड ॥१॥ जेंजें मागावें भातुकें । तेंतें पुरवी कौतुकें ॥ध्रु.॥ खेळविलें कोडें । हरुषें बोले कीं बोबडें ॥२॥ तुका म्हणे लाड । तेथें पुरे माझें कोड ॥३॥
3481 " स्वामी तूं ही कैसा न पडसी डोळां । सुंदर सांवळा घवघवीत ॥१॥ चतुर्भुज माळा रुळे एकावळी । कस्तुरी निडळीं रेखिलीसे ॥ध्रु.॥ शंख चक्रा गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती श्रवणीं दोन्ही ॥२॥ तुका म्हणे स्वामी आतां दावीं पाय । पांडुरंग माय कृपावंते ॥३॥
3482 " स्वामीचिया सत्ता । आधीं वर्म येतें हाता । पुढती विशेषता । लाभें लाभ आगळा ॥१॥ करीं कवतुकाचे बोल । परि जिव्हाळ्याची ओल । आवडे रसाळ । मायबापा लाडाचें ॥ध्रु.॥ मनें मेळविलें मना । नाहीं अभावी शाहणा । अंतरींच्या खुणा । वरि दिल्या उमटोनि ॥२॥ नाहीं पराश्रमें काळा । अवघ्या जागविल्या वेळा । देवासी निराळा । तुका क्षण न सोडी ॥३॥
3483 " स्वामीचें हें देणें । येथें पावलों दर्षणें ॥१॥ करूं आवडीनें वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥ध्रु.॥ कळावया वर्म । हा तों पायांचा चि धर्म ॥२॥ तुका म्हणे सिद्धी । हे चि पाववावी बुद्धी ॥३॥
3484 " स्वामीच्या सामर्थ्या । चाले बोलिला पुरुषार्थ ॥१॥ पाठी देवाचें हें बळ । मग लाभे हातीं काळ ॥ध्रु.॥ देव ज्यासी साह्य । तेणें केलें सर्व होय ॥२॥ तुका म्हणे स्वामीसत्ता । मग नाहीं भय चित्ता ॥३॥
3485 " स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचें । काय त्या प्रेमाचें सुख मज ॥१॥ दुःखवीना चित्त तुझें नारायणा । कांहीं च मागेना तुजपासीं ॥ध्रु.॥ रिद्धि सिद्धि मोक्ष संपित्त विलास । सोडियेली आस याची जीवें ॥२॥ तुका म्हणे एके वेळे देई भेटी । वोरसोनि पोटीं आलिंगावें ॥३॥
3486 " हम दास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिईं लंका ॥ध्रु.॥ गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं फत्तरका ॥१॥ वैकुंठनायक काल कौंसासुरका । दैत डुबाय सब मंगाय गोपिका ॥२॥ स्तंभ फोड पेट चिरीया कसेपका । प्रल्हाद के लियें कहे भाईं तुकयाका ॥३॥ ॥ साख्या ॥ ३० ॥ ११६८ तुका बस्तर बिचारा क्यों करे रे । अंतर भगवा न होय । भीतर मैला केंव मिटे रे । मरे उपर धोय ॥१॥
3487 " हरि म्हणतां गति पातकें नासती । कळिकाळ कांपती हरि म्हणतां ॥१॥ हरि म्हणतां भक्ति हरि म्हणतां मुक्ति । चुके यातायाती हरि म्हणतां ॥ध्रु.॥ तपें अनुष्ठानें न लगती साधनें । तुटती बंधनें हरि म्हणतां ॥२॥ तुका म्हणे भावें जपा हरिचें नाम । मग काळयम शरण तुम्हा ॥३॥
3488 " हरि हरि तुम्हीं म्हणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटईल ॥१॥ आणिका नका कांहीं गाबाळाचे भरी । पडों येथें थोरी नागवण ॥ध्रु.॥ भावें तुळसीदळ पाणी जोडा हात । म्हणावा पतित वेळोवेळां ॥२॥ तुका म्हणे ही तंव कृपेचा सागर । नामासाटीं पार पाववील ॥३॥
3489 " हरिकथे नाहीं । विश्वास ज्याचे ठायीं ॥१॥ त्याची वाणी अमंगळ । कान उंदराचें बीळ ॥ध्रु.॥ सांडुनि हा रस । करिती आणीक सायास ॥२॥ तुका म्हणे पिसीं । वांयां गेलीं किती ऐसीं ॥३॥
3490 " हरिकथेची आवडी देवा । करितो सेवा दासांची॥१॥ म्हणोनि हिंडे मागें मागें । घरटी जागे घालितसे ॥ध्रु.॥ निर्लज्ज भोजें नाचत रंगीं । भरतें अंगीं प्रेमाचें ॥२॥ तुका म्हणे विकलें देवें । आपण भावें संवसाटी ॥३॥
3491 " हरिकथेवांचून इच्छिती स्वहित । हरिजन चित्ती न घला तेथें ॥१॥ जाईंल भंगोन आपुला विश्वास । होईंल या नास कारणांचा ॥ध्रु.॥ ज्याचिया बैसावे भोजनपंगती । त्याचिया संगती तैसे खावें ॥२॥ तुका म्हणे काय जालेसि जाणते । देवा ही परते थोर तुम्ही ॥३॥
3492 " हरिचिया भक्ता नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥१॥ न लगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥ असों द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळी च ॥२॥ तुका म्हणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणें एकें ॥३॥
3493 " हरिची हरिकथा नावडे जया । अधम म्हणतां तया वेळ लागे । मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥१॥ कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं । उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परिलाज लंड न धरी कांहीं ॥ध्रु.॥ ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी । देवधर्मांविण तो हा चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥२॥ राम म्हणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी । जन्मोजन्मींचा होईंल नरकीं । तुका म्हणे चुकी जरी यासी ॥३॥
3494 " हरिच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये ॥१॥ राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ध्रु.॥ हरिच्या दासां चिंता । अघटित हे वार्ता ॥२॥ खावे ल्यावें द्यावें । तुका म्हणे पुरवावें ॥३॥
3495 " हरिच्या दासां सोपें वर्म । सर्व धर्म पाउलें ॥१॥ कडिये देव बाहेर खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥ध्रु.॥ सरती येणें आटाआटी । नाहीं तुटी लाभाची ॥२॥ तुका म्हणे समाधान । सदा मन आमुचें ॥३॥
3496 " हरिजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥१॥ रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तां अभयंकर खळां कष्ट ॥ध्रु.॥ दुर्वास हा छळों आला आंबॠषी । सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥२॥ द्रौपदीच्या क्षोभें कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साहे केलें ॥३॥ न साहे चि बब्रु पांडवां पारिखा । धुडाविला सखा बळिभद्र ॥४॥ तुका म्हणे अंगीं राखिली दुर्गंधि । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥५॥
3497 " हरिजनीं प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरीं जालों ॥१॥ म्हणियें सत्वर करीन सांगतां । घेईन मी देतां शेष त्यांचें ॥ध्रु.॥ आस करूनियां राहेन अंगणीं । उश्चिष्टाची धणी घ्यावयासी ॥२॥ चालतां ते मार्गा चरणीचे रज । उडती सहज घेइन आतां ॥३॥ दुरि त्यांपासूनि न वजें दवडितां । तुका म्हणे लाता घेइन अंगीं ॥४॥
3498 " हरिदासाचिये घरीं । मज उपजवा जन्मांतरीं ॥१॥ म्हणसी कांहीं मागा । हें चि देगा पांडुरंगा ॥ध्रु.॥ संतां लोटांगणीं । जातां लाजों नको मनीं ॥२॥ तुका म्हणे अंगीं । शक्ती देई नाचें रंगीं ॥३॥
3499 " हरिनामवेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार बोल्हावला ॥१॥ तेथें माझ्या मना होई पक्षिराज । साधावया काज तृप्तीचें या ॥ध्रु. ॥ मुळऴिचया बीजें दाखविली गोडी । लवकर चि जोडी जालियाची ॥२॥ तुका म्हणे क्षणक्षणां जातो काळ । गोडी ते रसाळ अंतरेल ॥३॥
3500 " हरिनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥१॥ फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥ हरिनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥२॥ हरिनामाचीं धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें कळिकाळ ॥३॥ येणें चि बळें सरते आम्ही । हरिचे नामें लोकीं तिहीं ॥४॥ तुका म्हणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥५॥
3501 " हरिनें माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरलें ॥१॥ आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ध्रु.॥ पारखियांसी सांगतां गोटी । घरची कुटी खातील ॥२॥ तुका म्हणे निवांत राहीं । पाहिलें पाहीं धणीवरि ॥३॥
3502 " हरिभक्त माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउले धरिन त्यांचे ॥१॥ अंतकाळीं येती माझ्या सोडवणे । मस्तक बैसणें देइन त्यांसी ॥ध्रु.॥ आणिक सोइरे सज्जन वो कोणी । वैष्णवांवांचोनि नाहीं मज ॥२॥ देइन आळिंगण धरीन चरण । संवसारसीण नासे तेणें ॥३॥ कंठीं तुळशीमाळा नामाचे धारक । ते माझे तारक भवनदीचे ॥४॥ तयांचे चरणीं घालीन मी मिठी । चाड हे वैकुंठीं नाहीं मज ॥५॥ अळसें दंभें भावें हरिचें नाम गाती । ते माझे सांगाती परलोकींचे ॥६॥ कायावाचामनें देइन क्षेम त्यासी । चाड जीवित्वासी नाहीं मज ॥७॥ हरिचें नाम मज म्हणविती कोणी । तया सुखा धणी धणी वरी ॥८॥ तुका म्हणे तया उपकारें बांधलों । म्हणऊनि आलों शरण संतां ॥९॥
3503 " हरिसुं मिल दे एक हि बेर । पाछे तूं फिर नावे घर ॥१॥ मात सुनो दुति आवे मनावन । जाया करति भर जोबन ॥ध्रु.॥ हरिसुख मोहि कहिया न जाये । तव तूं बुझे आगोपाये ॥२॥ देखहि भाव कछु पकरि हात । मिलाइ तुका प्रभुसात ॥३॥
3504 " हरी तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥१॥ अंतरीं विश्वास अखंड नामाचा । कायामनेंवाचा देई हें चि ॥२॥ तुका म्हणे आतां देई संतसंग । तुझे नामीं रंग भरो मना ॥३॥
3505 " हरीविण जिणें व्यर्थ चि संसारीं । प्रेत अळंकारीं मिरवत ॥१॥ देवाविण शब्द व्यर्थ चि कारण । भांड रंजवण सभेसि गा ॥ध्रु.॥ आचार करणें देवाविण जो गा । सर्पाचिया अंगा मृदुपण ॥२॥ तुका म्हणे काय बहु बोलों फार । भक्तीविण नर अभाग्य कीं ॥३॥
3506 " हळूहळू जाड । होत चालिलें लिगाड । जाणवेल निवाड । न करिसी परी पुढें ॥१॥ मी तों सांगून उतराईं । जालों आतां तुज काईं । कळों येईंल भाईं । तैसा करीं विचार ॥ध्रु.॥ मागें युगें अठ्ठाविस । जालीं दिवसाचा दिवस । मुदल व्याज कासावीस । होसी देवा ये कामें ॥२॥ तुकयाबंधु म्हणे राखें । आतां टाकीं तुझीं तीं सुखें । जगजाहिर ठाउकें । जालें नाहीं खंडलेंसें ॥३॥
3507 " हा गे आलों कोणी म्हणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे ॥१॥ तुम्ही तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों बाळ अभयकरें ॥ध्रु.॥ भुकेलियां आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ॥२॥ तुका म्हणे दिली चिंतामणीसाटीं । उचित कांचवटी दंडवत ॥३॥
3508 " हा गे माझा अनुभव । भक्तिभाव भाग्याचा ॥१॥ केला ॠणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥ध्रु.॥ घालोनियां भार माथा। अवघी चिंता वारली ॥२॥ तुका म्हणे वचन साटीं । नाम कंठीं धरोनि ॥३॥
3509 " हा गे हा चि आतां लाहो । माझा अहो विठ्ठला ॥१॥ दंडवत दंडवत । वेगळी मात न बोलें ॥ध्रु.॥ वेगळाल्या कोठें भागें । लाग लागें लावावा ॥२॥ तुका म्हणे केल्या जमा । वृत्तितमा भाजूनि ॥३॥
3510 " हा चि माझा नेम धरिला हो धंदा । यावरि गोविंदा भेटी द्यावी ॥१॥ हा चि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ध्रु.॥ डोळियांची भूक पहातां श्रीमुख । आलिंगणे सुख निवती भुजा ॥२॥ बहु चित्त ओढे तयाचिये सोई । पुरला हाकांहीं नवस नेणें ॥३॥ बहुबहु काळ जालों कासावीस । वाहिले बहुवस कळेवर ॥४॥ तुका म्हणे आतां पाडावें हें ओझें । पांडुरंगा माझें इयावरि ॥५॥
3511 " हा तों नव्हता दीन । टाळायाच्या ऐसा क्षण ॥१॥ कां जी नेणों राखा हात । कैसें देखावें रडत ॥ध्रु.॥ दावूनियां आस । दूर पळविता कास ॥२॥ तुका म्हणे धांव । घेतां न पुरे चि हांव ॥३॥
3512 " हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥१॥ विश्वंभरें विश्व सामाविलें पोटी । तेथें चि सेवटीं आम्ही असों ॥ध्रु.॥ नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरीं उमटेल ॥२॥ तुका म्हणे माझा स्वामी अबोलणा । पुरवूं खुणे खुणा जाणतसों ॥३॥
3513 " हागतां ही खोडी । चळण मोडवितें काडी ॥१॥ ऐसे अनावर गुण । आवरावे काय म्हुण ॥ध्रु.॥ नाहीं जरी संग । तरी बडबडविती रंग ॥२॥ तुका म्हणे देवा । तुमची न घडे चि सेवा ॥३॥
3514 " हागिल्याचे सिंके वोणवा चि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥१॥ अत्यंत समय नेणतां अवकळा । येऊं नये बळा सिक धरा ॥ध्रु.॥ भोजनसमयीं ओकाचा आठव । ठकोनियां जीव कष्टी करी ॥२॥ तुका म्हणे किती सांगों उगवून । अभाग्याचे गुण अनावर ॥३॥
3515 " हातपाय मिळोनि मेळा । चला म्हणती पाहों डोळां ॥१॥ देखणी नव्हे देखती कैसे । सकळांचा देखणा डोळा चि असे ॥२॥ डोऑयाचा डोळा पाहों गेला । तुका म्हणे तो पाहों ठेला ॥३॥
3516 " हातीं घेऊनियां काठी । तुका लागला किळवरा पाठी ॥१॥ नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी ते ठाकणीं ॥ध्रु.॥ काडिलें तें ओढें । मागील उपचाराचें पुढें ॥२॥ नाहीं वाटों आला भेव । सुख दुःख भोगिता देव ॥३॥ याजसाटीं हें निर्वाण । केलें कसियेलें मन ॥४॥ तुका म्हणे अनुभव बरा । नाहीं तरी सास्त होय चोरा ॥५॥
3517 " हातीं धरिलियाची लाज । देवा असोंदे गा तुज ॥१॥ आहें अमंगळ दुर्बळ । होई दीन तूं दयाळ ॥ध्रु.॥ बाळ सेंबडें मातेसि । काय नावडे तियेसि ॥२॥ तुका म्हणे जाणें । करोनि देहाचें सांडणें ॥३॥
3518 " हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें ॥१॥ ऐसा कां हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ध्रु.॥ देव ना संसार । दोहीं ठायीं नाहीं थार ॥२॥ तुका म्हणे पीक । भूमि न दे न मिळे भीक ॥३॥
3519 " हारपल्याची नका चित्ती । धरूं खंती वांयां च ॥१॥ पावलें तें म्हणा देवा । सहज सेवा या नांवें ॥ध्रु.॥ होणार तें तें भोगें घडे । लाभ जोडे संकल्पें ॥२॥ तुका म्हणे मोकळें मन । अवघें पुण्य या नांवें ॥३॥
3520 " हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखों ॥१॥ नारायणीं वसलें घर । निरंतर आनंद ॥ध्रु.॥ अवघा रुधविला ठाव । नेला वाव मी माझें ॥२॥ तुका म्हणे एके ठावीं । असूं नाहीं सीनाभिन्न ॥३॥
3521 " हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट ॥१॥ मग तयाच्या आधारें । करणें अवघें चि बरें ॥ध्रु.॥ सुख दुःख साहे । हर्षामर्षी भंगा नये ॥२॥ तुका म्हणे जीवें । आधीं मरोनि राहावें ॥३॥
3522 " हित जाणे चित्त । कळों येतसे उचित ॥१॥ परिहार ते संपादनी । सत्य कारण कारणीं ॥ध्रु.॥ वरदळ तें नुतरे कसीं । आगीमध्यें तें रसीं ॥२॥ तुका म्हणे करुनी खरें । ठेवितां तें पुढें बरें ॥३॥
3523 " हित तें हें एक राम कंठीं राहे । नाठविती देहभाव देही ॥१॥ हा चि एक धर्म निज बीजवर्म । हें चि जाळी कर्में केलीं महा ॥ध्रु.॥ चित्ती राहे पायीं रूप बैसे डोळां । जीवें कळवळा आवडीचा ॥२॥ अखंड न खंडे अभंग न भंगे । तुका म्हणे गंगे मिळणी सिंधु ॥३॥
3524 " हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥१॥ आवडी विठ्ठल गाईंजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥ आणीकां अंतरीं निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥२॥ तुका म्हणे बाण हा चि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥३॥
3525 " हित सांगे तेणें दिलें जीवदान । घातकी तो जाण मनामागें ॥१॥ बळें हे वारावे अधर्म करितां । अंधळें चालतां आडरानें ॥ध्रु.॥ द्रव्य देऊनियां धाडावें तीर्थासी । नेदावें चोरासी चंद्रबळ ॥२॥ तुका म्हणे ऐसें आहे हें पुराणीं । नाहीं माझी वाणी पदरींची ॥३॥
3526 " हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें ॥१॥ नव्हे विनोदउत्तर । केले रंजवाया चार ॥ध्रु.॥ केली अटाअटी । अक्षरांची देवासाटीं ॥२॥ तुका म्हणे खिजों । नका जागा येथें निजों ॥३॥
3527 " हिरण्याक्ष दैत्य मातला जे काळीं । वरदानें बळी शंकराच्या ॥१॥ इंद्रपदराज्य घेतलें हिरोनी । देवा चक्रपाणी म्हणती धांव ॥ध्रु.॥ तइं पांडुरंगा शूकर जालेती । तया दैत्यपती मारविले ॥२॥ तुका म्हणे ज्यांचीं राज्यें त्यांसी दिलीं । ऐसी तूं माउली पांडुरंगा ॥३॥
3528 " हिरा ठेवितां काळें गाहाण । मोल न तुटे दुकाळीं जाण ॥१॥ तैसे संतजन पाहीं । विनटले श्रीहरिपायीं ॥२॥ तुका म्हणे तैसे भक्त । तयांसी जन हें निंदित ॥३॥
3529 " हीं पाइतन भूपतीशीं दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥१॥ मुंगियांच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवें ॥२॥ तुका म्हणे आधीं करावा विचार । शूरपणें तीर मोकलावा ॥३॥
3530 " हीन माझी याति । वरी स्तुती केली संतीं ॥१॥ अंगीं वसूं पाहे गर्व । माझें हरावया सर्व ॥ध्रु.॥ मी एक जाणता । ऐसें वाटतसे चित्ता ॥२॥ राख राख गेलों वांयां । तुका म्हणे पंढरीराया ॥३॥
3531 " हीनवर बीजवर दोघी त्या गडणी । अखंड कहाणी संसाराची ॥१॥ माझे पति बहु लहान चि आहे । खेळावया जाय पोरांसवें ॥ध्रु.॥ माझें दुःख जरी ऐकशील सईं । म्हातारा तो बाईं खोकतसे ॥२॥ खेळे सांजवरी बाहेरी तो राहे । वाट मी पाहें सेजेवरी ॥३॥ पूर्व पुण्य माझें नाहीं वा नीट । बहु होती कष्ट सांगो कांही ॥४॥ जवळ मी जातें अंगा अंग लावूं । नेदी जवळ येऊं कांटाळतो ॥५॥ पूर्व सुकृताचा हा चि बाईं ठेवा । तुका म्हणे देवा काय बोल ॥६॥
3532 " हीनसुरबुद्धीपासी । आकृतीसी भेद नाहीं ॥१॥ एक दांडी एक खांदी । पदीं पदीं भोगणें ॥ध्रु.॥ एकाऐसें एक नाहीं । भिन्न पाहीं प्रकृती ॥२॥ तुका म्हणे भूमी खंडे । पीक दंडे जेथें तें ॥३॥
3533 " हुंदकी पिसवी हलवी दाढी । मणी वोढी निंदेचे ॥१॥ त्याचें फळ पाकीं यमाचे दंड । घर केलें कुंड कुंभपाक ॥ध्रु.॥ क्रोध पोटीं मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥२॥ तुका म्हणे स्नान केलें मळमूत्रें । जेवविलीं पितरें अमंगळें ॥३॥
3534 " हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥१॥ गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥ चोरोनियां खाये दुध दहीं लोणी । भावें चक्रपाणि गोविला तो ॥२॥ निष्काम तो जाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥३॥ जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥४॥ तुका म्हणे हें चि चैतन्यें सावळें । व्यापुनि निराळें राहिलेंसे ॥५॥
3535 " हे चि थोर भक्ति आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविलें अनंतें तैसें चि राह वें । चित्ती असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥ वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥ तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥
3536 " हे चि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपें ॥१॥ सुखाचें भातुकें करावें जतन । सेविल्या ताहान भूक जाय ॥ध्रु.॥ दुरील जवळी आपण चि होतें । कवळिलें चित्ते जिवापासीं ॥२॥ तुका म्हणे नाम घेतों वेळोवेळां । होतील सकळा शीतळा नाडी ॥३॥
3537 " हे चि माझे चित्ती । राहो भावप्रीति । विठ्ठल सुषुप्ती । जागृति स्वप्नासी ॥१॥ आणिक नाहीं तुज मागणें । राज्यचाड संपत्ति धन । जिव्हे सुख तेणें । घेतां देहीं नाम तुझें ॥ध्रु॥ तुझें रूप सर्वाठायीं । देखें ऐसें प्रेम देई । न ठेवावा ठायीं । अनुभव चित्तीचा ॥२॥ जन्ममरणाचा बाध । समुळूनि तुटे कंद । लागो हा चि छंद । हरि गोविंद वाचेसी ॥३॥ काय पालटे दरुषणें । अवघें कोंदाटे चैतन्य । जीवशिवा खंडण । होय ते रे चिंतितां ॥४॥ तुका म्हणे या चि भावें । आम्हीं धालों तुझ्या नामें । सुखें होत जन्म । भलते याती भलतैसीं ॥५॥
3538 " हे चि वेळ देवा नका मागें घेऊं । तुम्हांविण जाऊं शरण कोणा ॥१॥ नारायणा ये रे पाहें विचारून । तुजविण कोण आहे मज ॥ध्रु.॥ रात्रहि दिवस तुज आठवूनि आहें । पाहातोसी काये सत्व माझें ॥२॥ तुका म्हणे किती येऊं काकुलती । कांहीं माया चित्ती येऊं द्यावी ॥३॥
3539 " हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥१॥ याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥ देऊनियां जीव । बळी साधिला हा ठाव ॥२॥ तुका म्हणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥३॥
3540 " हें आम्हां सकळा । तुझ्या नामाचें चि बळ ॥१॥ करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥ जयाचा जो भोग । सुख दुःख पीडी रोग ॥२॥ तुका म्हणे देवा । तुझे पायीं माझा हेवा ॥३॥
3541 " हें का आम्हां सेवादान । देखों सीण विषमाचा ॥१॥ सांभाळा जी ब्रीदावळी । तुम्हीं कां कळीसारिखे ॥ध्रु.॥ शरणागत वैर्या हातीं । हे निश्चिंती देखिली ॥२॥ तुका म्हणे इच्छीं भेटी । पाय पोटीं उफराटे ॥३॥
3542 " हें चि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो॥१॥ आणीक कांहीं न घलीं भार । बहुत फार सांकडें ॥ध्रु.॥ घ्यावी माझ्या हातें सेवा । हे चि देवा विनवणी ॥२॥ तुका तुमचा म्हणवी दास । तेणें आस पुरवावी ॥३॥
3543 " हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥ गुण गाईंन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥ न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥२॥ तुका म्हणे गर्भवासीं । सुखें घालावें आम्हासी ॥३॥
3544 " हें चि मागणें विठाबाईं । पायीं ठेवूनियां डोईं ॥१॥ शांति दया अंतःकरणीं । रंगो रामनामीं वाणी ॥ध्रु.॥ मूळ द्वंद्वाचें विघडो । निजानंदीं वृत्ति जडो ॥२॥ तुका म्हणे हरी । आतां आपुलेंसें करीं ॥३॥
3545 " हें चि माझें तप हें चि माझें दान । हें चि अनुष्ठान नाम तुझें ॥१॥ हें चि माझें तीर्थ हें चि माझें व्रत । सत्य हें सुकृत नाम तुझें ॥ध्रु.॥ हा चि माझा धर्म हें चि माझें कर्म । हा चि नित्यनेम नाम तुझें ॥२॥ हा चि माझा योग हा चि माझा यज्ञ । हें चि जपध्यान नाम तुझें ॥३॥ हें चि माझें ज्ञान श्रवण मनन । हें चि निजध्यासन नाम तुझे ॥४॥ हा चि कुळाचार हा चि कुळधर्म । हा चि नित्यनेम नाम तुझें ॥५॥ हा माझा आचार हा माझा विचार । हा माझा निर्धार नाम तुझें ॥६॥ तुका म्हणे दुजें सांगायासि नाहीं । नामेंविण कांहीं धनवित्त ॥७॥
3546 " हें चि याच्या ऐसें मागावें दान । वंदूनि चरण नारायणा ॥१॥ धीर उदारींव निर्मळ निर्मत्सर । येणें सर्वेश्वर ऐसें नांव ॥ध्रु.॥ हा चि होईंजेल याचिया विभागें । अनुभववी अंगें अनुभववील ॥२॥ जोडे तयाचे कां न करावे सायास । जाला तरि अळस दीनपणे ॥३॥ पावल्यामागें कां न घलावी धांव । धरिल्या तरि हांव बळ येतें ॥४॥ तुका म्हणे घालूं खंडीमध्ये टांक । देवाचें हें एक करुनी घेऊं ॥५॥
3547 " हें चि वारंवार । पडताळुनी उत्तर ॥१॥ करितों पायांसी विनंती । नुपेक्षावें कमळापती ॥ध्रु.॥ गंगोदकें गंगे । अर्घ्य द्यावें पांडुरंगे ॥२॥ जोडोनियां हात । करी तुका प्रणिपात ॥३॥
3548 " हें चि सर्वसुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वांयां ॥१॥ हें चि एक सर्वसाधनांचें मूळ । आतुडे गोपाळ येणें पंथें ॥ध्रु.॥ न लगती कांहीं तपांचिया रासी । करणें वाराणसी नाना तीर्थी ॥२॥ कल्पना हे तळि देहीं अभिमान । नये नारायण जवळी त्यांच्या ॥३॥ तुका म्हणे नामें देव नेदी भेटी । म्हणे त्याचे होंटीं कुष्ट होय ॥४॥
3549 " हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥१॥ जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥ दुजा भाव आड येऊं नेदीं चत्तिा । करावा अनंता नास त्याचा ॥२॥ अभय देऊनि करावें सादर । क्षण तो विसर पडों नेदीं ॥३॥ तुका म्हणे आम्ही जेजे इच्छा करूं । ते ते कल्पतरू पुरविसी ॥४॥
3550 " हें तों एक संतांठायीं । लाभ पायीं उत्तम ॥१॥ म्हणवितां त्याचे दास । पुढें आस उरेना ॥ध्रु.॥ कृपादान केलें संतीं । कल्पांतीं ही सरेना ॥२॥ तुका म्हणे संतसेवा । हा चि हेवा उत्तम॥३॥
3551 " हें तों टाळाटाळीं । परि भोवताहे कळी ॥१॥ बरें नव्हेल शेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥ मुरगाळिला कान । समांडिलें समाधान ॥२॥ धन्य म्हणे आतां । येथें नुधवा माथां ॥३॥ अबोलणा तुका । ऐसें कांहीं लेखूं नका ॥४॥
3552 " हें तों वाटलें आश्चर्य । तुम्हां न धरवे धीर ॥१॥ माझा फुटतसे प्राण । धांवा धांवा म्हणऊन ॥ध्रु.॥ काय नेणों दिशा । जाल्या तुम्हांविण ओशा ॥२॥ तुका म्हणे कां गा । नाइकिजे पांडुरंगा ॥३॥
3553 " हें ही ऐसें तें ही ऐसें । उभय पिसें अविचार ॥१॥ अभिमानाचे ठेलाठेलीं । मधीं जाली हिंपुष्टी ॥ध्रु.॥ धीरा शांती ठाव नुरे । हा चि उरे आबाळ्या ॥२॥ कौतुक हें पाहे तुका । कढतां लोकां अधनि ॥३॥
3554 " हेंदर्याचें भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥१॥ नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं ॥ध्रु.॥ अवगुणी वाटलें चित्त । तया हित आतळे ना ॥२॥ तुका म्हणे फजितखोरा । म्हणतां बरा उगा रहा ॥३॥
3555 " हेचि वादकाची कळा । नाहीं येऊं येत बळा ॥१॥ धीर करावा करावा । तरी तो आहे आम्हां देवा ॥ध्रु.॥ रिघावें पोटांत । पायां पडोन घ्यावा अंत ॥२॥ तुका म्हणे वरि । गोडा आणावा उत्तरीं ॥३॥
3556 " हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरि ॥१॥ ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥ ज्याचें अंतर निर्मळ । त्याचें सबाह्य कोमळ ॥२॥ तुका म्हणे भावें । जिव्हें प्रेम वोसंडावें ॥३॥
3557 " होइन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणीं लागेन ॥१॥ आणीक काय दुजें । म्या मागणें तुजपासीं । अविट तें सुख । भय नास नाहीं ज्यासी ॥ध्रु.॥ होइन मोचे वाहणा । पायीं सकळां संतजनां । मांजर सुकर सुणा । जवळी शेष घ्यावया ॥२॥ सांडोवा पायरी । वाहळ बावी गंगातिरी । होइन तयावरी । संतसज्जन चालती ॥३॥ लागें संतां पांयीं । ऐसा ठेवीं भलता ठायीं । तुका म्हणे देई । धाक नाहीं जन्माचा ॥४॥
3558 " होइल कृपादान । तरी मी येईंन धांवोन ॥१॥ होती संतांचिया भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥ध्रु.॥ रिघेन मातेपुढें । स्तनपान करीन कोडें ॥२॥ तुका म्हणे ताप । हरती देखोनियां बाप ॥३॥
3559 " होइल तरि पुसापुसी । उत्तर त्यासी योजावें ॥१॥ तोंवरि मी पुढें कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ध्रु.॥ जाणेनियां अंतर देव । जेव्हां भेव फेडील ॥२॥ तुका म्हणे धरिला हातीं । करील खंतीवेगळें ॥३॥
3560 " होइल माझी संतीं भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनीं बैसे ॥१॥ शृंगारूनि माझीं बोबडीं उत्तरें । होतील विस्तारें सांगितलीं ॥ध्रु.॥ क्षेम आहे ऐसें होइल सांगितलें । पाहिजे धाडिलें शीघ्र मूळ ॥२॥ अवस्था जे माझी ठावी आहे संतां । होइल कृपावंता निरोपिली ॥३॥ तुका म्हणे सवें येईंल मुर्हाळी । किंवा कांहीं उरी राखतील ॥४॥
3561 " होई आतां माझ्या भोगाचा भोगिता । सकळ अनंता शुभाशुभ ॥१॥ आठवुनी पाय राहिलों हृदयीं । निवारली तई सकळ चिंता ॥ध्रु.॥ अचळ न चळे देहाचें चळण । आहे हें वळण प्रारब्धें चि ॥२॥ तुका म्हणे जालें एक चि वचन । केलिया कीर्तन आराणुक ॥३॥
3562 " होईंल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥ धाला आणिकांची नेणे तान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥ तुका म्हणे येथें पाहिजे अनुभव । शब्दाचें गौरव कामा नये ॥३॥
3563 " होईंल तो भोग भोगीन आपुला । न घलीं विठ्ठला भार तुज ॥१॥ तुम्हांपासाव हें इच्छीतसें दान । अंतरींचें ध्यान मुखीं नाम ॥ध्रु.॥ नये काकुलती गर्भवासांसाटीं । न धरीं हें पोटीं भय कांहीं ॥२॥ तुका म्हणे मज उदंड एवढें । न वांचावें पुढें मायबापा ॥३॥
3564 " होईंल निरोप घेतला यावरी । राउळाभीतरीं जाऊनियां ॥१॥ करूनियां दधिमंगळभोजन । प्रयाण शकुनसुमुहूर्तें ॥ध्रु.॥ होतील दाटले सद्गदित कंठीं । भरतें या पोटीं वियोगाचें ॥२॥ येरयेरां भेटी क्षेम आलिंगनें । केलीं समाधान होतीं संतीं ॥३॥ तुका म्हणे चाली न साहे मनास । पाहाती कळस परपरतों ॥४॥
3565 " होउनि कृपाळ । भार घेतला सकळ ॥१॥ तूं चि चालविसी माझें । भार सकळ ही ओझें ॥ध्रु.॥ देह तुझ्या पायीं । ठेवुनि झालों उतराईं ॥२॥ कायावाचामनें । तुका म्हणे दुजें नेणें ॥३॥
3566 " होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥१॥ शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥२॥ तुका म्हणे त्यासी नाहीं शिवभक्ती । व्यापार करिती संसाराचा ॥३॥
3567 " होऊं नको कांहीं या मना आधीन । नाइकें वचन याचें कांहीं ॥१॥ हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोईं ही धरावी विठोबाची ॥ध्रु.॥ आपुले आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरि जीवा घातक हें ॥२॥ तुका म्हणे जाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥३॥
3568 " होऊं शब्दस्पर्श नये माझा तुम्हां । विप्रवृंदा तुम्हां ब्राम्हणांसी ॥१॥ म्हणोनियां तुम्हां करितों विनंती । द्यावें शेष हातीं उरलें तें ॥ध्रु.॥ वेदीं कर्म जैसें बोलिलें विहित । करावी ते नीत विचारूनि ॥२॥ तुमचा स्वधर्म माझा अधिकार । भोजन उत्तर तुका म्हणे ॥३॥
3569 " होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥१॥ निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥२॥ तुका म्हणे ऐसें दांभिक भजन । तया जनार्दन भेटे केवीं ॥३॥
3570 " होतीं नेणों जालीं कठिणें कठीण । जवळी च मन मनें ग्वाही ॥१॥ आम्ही होतों सोईं सांडिला मारग । घडिलें तें मग तिकून ही ॥ध्रु.॥ निश्चिंतीनें होते पुढिलांची सांडी । न चाले ते कोंडी मायबापा ॥२॥ आम्हां नाहीं त्यांचा घडिला आठव । त्यांचा बहु जीव विखुरला ॥३॥ तुका म्हणे जालें धर्माचें माहेर । पडिलें अंतर आम्हांकूनि ॥४॥
3571 " होतें तैसें पायीं केलें निवेदन । अंतरलों दिन बहुत होतों ॥१॥ संबोखुनी केलें समाधान चित्त । वोगरुणि भात प्रेमरस ॥ध्रु.॥ नामरत्नमणी करूनी भूषण । अळंकारमंडण माळा दिली ॥२॥ तुका म्हणे सुखें जालों निरामय । नामीं नामसोय निमग्नता ॥३॥
3572 " होतों सांपडलों वेठी । जातां भेटी संसारा ॥१॥ तों या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोबासी ॥ध्रु.॥ होता भार माथां माझे । बहु ओझें अमुप ॥२॥ तुका म्हणे केली चिंता । कोण दाता भेटेल ॥३॥