Sant Tukaram Abhang Malika Bhag - 2

1401 " ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥१॥ पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥ नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपालें ॥२ ॥ तुका म्हणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥३॥

1402 " ठाकलोंसें द्वारीं । उभें याचक भीकारी ॥१॥ मज भीक कांहीं देवा । प्रेमभातुकें पाठवा ॥ध्रु.॥ याचकाचा भार । नये घेऊं येरझार ॥२॥ तुका म्हणे दान । सेवा घेतल्यावांचून ॥३॥ सदाशिवावर अभंग ॥ २ ॥

1403 " ठाव तुम्हांपाशीं । जाला आतां हृषीकेशी ॥१॥ न लगे जागावें सतत । येथें स्वभावें हे नीत ॥ध्रु.॥ चोरट्यासी थारा । येथें कैंचा जी दातारा ॥२॥ तुका म्हणे मनें । आम्हां जालें समाधान ॥३॥

1404 " ठाव देऊनिया राखें पायापासीं । मी तों आहें रासी पातकाची ॥१॥ पातकाची रासी म्हणतां लागे वेळ । ऐके तो कृपाळ नारायण ॥ध्रु.॥ नारायणनामें अवघें सांग जालें । असंग चि केलें एकमय ॥२॥ एकमय जालें विठोबाच्या नामें । भेदाभेद कर्म आणिक कांहीं ॥३॥ तुका म्हणे चित्तीं चिंतिलें जें होतें । तें होय आपैतें नामें याच्या ॥४॥

1405 " ठाव नाहीं बुड । घरें वसविसी कुड ॥१॥ भलते ठायीं तुझा वास । सदा एरवी उदास ॥ध्रु.॥ जागा ना निजेला । धाला ना भुकेला ॥२॥ न पुसतां भलें । तुका म्हणे बुझें बोलें ॥३॥

1406 " ठेवा जाणीव गुंडून । येथें भाव चि प्रमाण ॥१॥ एका अनुसरल्या काज । अवघें जाणें पंढरिराज ॥ध्रु.॥ तर्कविर्कासी वाव । न लागे सायासीं ॥२॥ तुका म्हणे भावेंविण । अवघा बोलती तो सीण ॥३॥

1407 " ठेविलें जतन । करूनियां निज धन ॥१॥ जयापासाव उत्पित्त । तें हें बीज धरिलें हातीं ॥ध्रु.॥ निवडिलें वरळा भूस । सार आइन जिनस ॥२॥ तुका म्हणे नारायण । भाग संचिताचा गुण ॥३॥

1408 " ठेवूनि इमान राहिलों चरणीं । म्हणउनि धणी कृपा करी ॥१॥ आम्हांसी भांडार करणें जतन । आलें गेलें कोण उंच निंच ॥ध्रु.॥ करूनि सांभाळीं राहिला निराळा । एक एक वेळा आज्ञा केली ॥२॥ तुका म्हणे योग्यायोग्य विनीत । देवा नाहीं चित्त येथें देणें ॥३॥

1409 " ठेवूनियां डोईं । पायीं जालों उतराईं ॥१॥ कारण तें तुम्हीं जाणां । मी तराळ नारायणा ॥ध्रु.॥ प्रसंगीं वचन । दिलें तें चि खावें अन्न ॥२॥ तुका म्हणे भार । तुम्ही जाणां थोडा फार ॥३॥

1410 " डगमगी मन निराशेच्या गुणें । हें तों नारायणें सांतवीजे ॥१॥ धीरें तूं गंभीर जीवनें जगाचें । जळो विभागाचें आत्रीतत्या ॥ध्रु.॥ भेईंल जीव हें देखोनि कठिण । केला जातो सीण तो तो वांयां ॥२॥ तुका म्हणे आवश्यक हें वचन । पाळावें चि वान समयो आहे ॥३॥

1411 " डळमळिला मेरु आणि तो मांदार । पाताळीं फणिवर डोईं झाडी ॥१॥ लोपे तेजें सूर्य आणीक हा चंद्र । कांपतसे इंद्र थरथरां ॥ध्रु.॥ ऐसें रूप उग्र हरीनें धरिलें । दैत्या मारियेलें मांडीवरी॥२॥ तुका म्हणे भक्तांकारणें श्रीहरि । बहु दुराचारी निर्दाळिले ॥३॥

1412 " डिवेना डसेना बुझेना निर्मळ । परि अमंगळ स्वीकारीना ॥१॥ परंतु गर्धब अपवित्र जाणा । पर्वकाळीं दाना देऊं नये ॥ध्रु.॥ डिवी लात्री बुजे बहु नेदी दुध । मुखीं नाहीं शुद्ध विष्ठा खाय ॥२॥ परंतु ते गाय पवित्र हो जाणा । पर्वकाळीं दाना देऊजेते ॥३॥ ब्राम्हणें ब्राम्हणा सद्ग‍ू करावा । परि न करावा शूद्रादिक ॥४॥ तुका म्हणे देवें सांगितली सोय । म्हणोनि त्याचे पाय धरिले जीवें ॥५॥

1413 " डोळां भरिलें रूप । चित्ता पायांपें संकल्प ॥१॥ अवघी घातली वांटणी । प्रेम राहिलें कीर्तनी ॥ध्रु.॥ वाचा केली माप । रासीं हरिनाम अमुप ॥२॥ भरूनियां भाग । तुका बैसला पांडुरंग ॥३॥

1414 " डोळियां पाझर कंठ माझा दाटे । येऊं देई भेटे पांडुरंगे ॥१॥ बहु दिस टाकिले निरास कां केलें । कोठें वो गुंतलें चत्ति तुझें ॥ध्रु.॥ बहु धंदा तुज नाहीं वो आठव । राहिलासे जीव माझा कंठीं ॥२॥ पंढरीस जाती वारकरी संतां । निरोप बहुतां हातीं धाडीं ॥३॥ तुजविण कोण सांवा धांवा करी । ये वो झडकरी पांडुरंगे ॥४॥ काय तुझी वाट पाहों कोठवरी । कृपाळु कांपरी विसरलासी ॥५॥ एक वेळ माझा धरूनि आठव । तुका म्हणे ये वो न्यावयासी ॥६॥

1415 " डोळियांचें दैव आजि उभें ठेलें । निधान देखिलें पंढरीये ॥१॥ काय ते वानावें वाचेचे पालवें । वेदा न बोलवे रूप ज्याचें ॥ध्रु.॥ आनंदाच्या रसें ओंतीव चांगलें । देखतां रंगलें चित्त माझें ॥२॥ तुका म्हणे मी तों सगळाच विरालों । विठ्ठल चि जालों दर्शनानें ॥३॥

1416 " डोळ्यामध्यें जैसें कणु । अणु तें हि न समाये ॥१॥ तैसें शुद्ध करीं हित । नका चित्ती बाटवूं ॥ध्रु.॥ आपल्याचा कळवळा। आणिका बाळावरि न ये ॥२॥ तुका म्हणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या ॥३॥

1417 " डौरलों भक्तिसुखें । सेवूं अमृत हें मुखें ॥१॥ संतसंगें सारूं काळ । प्रेमसुखाचा कल्लोळ ॥ध्रु.॥ ब्रम्हादिकांसी सुराणी । तो हा आनंद मेदिनी ॥२॥ नाहीं वैकुंठींचा पांग । धांवे कथे पांडुरंग ॥३॥ मुक्त व्हावें काशासाठीं । कैची येणें रसें भेटी ॥४॥ तुका म्हणे गोड । हें चि पुरे माझें कोड ॥५॥

1418 " ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे जुंझणार कैसा जुंझे ॥१॥ पेटी पडदळे सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥ बैसविलें मला येणें अश्वावरी । धावूं पळूं तरी कैसा आतां ॥२॥ असोनि उपाय म्हणे हे अपाय । म्हणे हायहाय काय करूं ॥३॥ तुका म्हणे हा तों स्वयें परब्रम्ह । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥४॥

1419 " ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥१॥ ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥ डांकाचे संगती सोनें हीन जालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी ॥२॥ विषानें पक्वान्नें गोड कडू जालीं । कुसंगानें केली तैसी परी ॥३॥ भावें तुका म्हणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौर्‍याशीचा ॥४॥

1420 " ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी ॥१॥ होता तैसा कळों भाव । आला वाव अंतरींचा ॥ध्रु.॥ बोरामध्यें वसे अळी । अठोळीच भोंवती ॥२॥ पोटासाटीं वेंची चणे । राजा म्हणे तोंडें मी ॥३॥ बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर ॥४॥ तुका म्हणे ऐसें आहे । काय पाहे त्यांत तें ॥५॥

1421 " तक्र शिष्या मान । दुग्धा म्हणे नारायण ॥१॥ ऐशीं ज्ञानाचीं डोबडें । आशा विटंबिलीं मूढें ॥ध्रु.॥ उपदेश तो जगा । आपण सोंवळा इतका मांगा ॥२॥ रसनाशिश्नाचे अंकित । तुका म्हणे वरदळ स्पित ॥३॥

1422 " तजिलें भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥ आळवावें देवा भाकूनि करुणा । आपुलिया मना साक्ष करीं ॥ध्रु.॥ नाहीं जावें यावें दुरूनि लागत । आहे साक्षभूत अंतरींचा ॥२॥ तुका म्हणे हा आहे कृपासिंधु । तोडी भवबंधु तात्काळिक ॥३॥

1423 " तटाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लाहान नेणे ॥१॥ परी तो त्या विशेष मानुष होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु.॥ बेरसा गाढव माया ना बहीण । भुंके चवीविण भलतें चि ॥२॥ तुकयाबंधु म्हणे बोकड मातलें । न विचारी आपुले तोंडीं मुते ॥३॥

1424 " तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥१॥ जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥ध्रु.॥ दाविल्या सारिखें । मागें नसावें पारिखें ॥२॥ मागें पुढें ॠण । तुका म्हणे फिटे हीण ॥३॥

1425 " तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥१॥ अर्थचाड चिंता नाहीं मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥२॥ तुका म्हणे एक विठोबाचें नाम । आहे जवळी दाम नाहीं रुका ॥३॥

1426 " तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरिगुण वारूं नये ॥१॥ कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रम्हहत्या ॥ध्रु.॥ आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥२॥ व्हावें साह्य तया न घलावें भय । फुकासाटीं पाहे लाभ घात ॥३॥ तुका म्हणे हित माना या वचना । सुख दुःख जाणा साधे फुका ॥४॥

1427 " तपाचे सायास । न लगे घेणें वनवास ॥१॥ ऐसें कळलें आम्हां एक । जालों नामाचे धारक ॥ध्रु.॥ जाळीं महाकर्में । दावीं निजसुख धर्में ॥२॥ तुका म्हणे येणें । कळिकाळ तें ठेंगणें ॥३॥

1428 " तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंद्रियांचा ॥१॥ म्हणोनि कीर्तन आवडलें मज । सांडोनियां लाज हें चि करी ॥ध्रु.॥ पाहातां आगमनिगमाचे ठाव । तेथें नाहीं भाव एकविध ॥२॥ तुका म्हणे येथें नाहीं वो विकार । नाम एक सार विठोबाचें ॥३॥

1429 " तया घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम ॥१॥ कांहीं न लगे सिणावें । आणिक वेगळाल्या भावें । वाचे उच्चारावें । रामकृष्णगोविंदा ॥ध्रु.॥ फळ पावाल अवलिळा । भोग वैकुंठ सोहळा ॥२॥ तुका म्हणे त्याच्या नांवें । तो चि होइजेल स्वभावें ॥३॥

1430 " तयांसवें करी काला दहींभात । सिदोर्‍या अनंत मेळवुनी ॥१॥ मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥२॥ नेदी चोरी करूं जाणे अंतरींचें । आपलें हीं साचें द्यावें तेथें ॥३॥ द्यावा दहींभात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडवावा ॥४॥ वांटी सकळांसि हातें आपुलिया । जैसें मागे तया तैसें द्यावें ॥५॥ द्यावें सांभाळुनी सम तुकभावें । आपण हि खावें त्यांचें तुक ॥६॥ तुक सकळांचे गोविंदाचे हातीं । कोण कोणे गति भला बुरा ॥७॥ राखे त्यासि तैसें आपलाल्या भावें । विचारुनि द्यावें जैसें तैसें ॥८॥ तैसें सुख नाहीं वैकुंठींच्या लोकां । तें दिलें भाविकां गोपाळांसि ॥९॥ गोपाळांचे मुखीं देउनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥१०॥ त्यांचिये मुखींचे काढूनियां घांस । झोंबतां हातांस खाय बळें ॥११॥ बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तयातें गोपाळ पाडितील ॥१२॥ पाठी उचलूनि वाहातील खांदीं । नाचतील मांदीं मेळवुनी ॥१३॥ मांदीं मेळवुनी धणी दिली आम्हां । तुका म्हणे जमा केल्या गाईं ॥१४॥

1431 " तयासी नेणतीं बहु आवडती । होय जयां चित्तीं एक भाव ॥१॥ उपमन्यु धुरु हें काय जाणती । प्रल्हादाच्या चित्तीं नारायण ॥ध्रु.॥ कोळें भिल्लें पशु श्वापदें अपारें । कृपेच्या सागरें तारियेलीं ॥२॥ काय तें गोपाळें चांगलीं शाहाणीं । तयां चक्रपाणी जेवी सवें ॥३॥ तुका म्हणे भोळा भाविक हा देव । आम्ही त्याचे पाव धरूनी ठेलों ॥४॥

1432 " तरले ते मागें आपुलिया सत्ता । कमाईं अनंता करूनियां ॥१॥ उसनें फेडितां धर्म तेथें कोण । ते तुज अनन्ये तुम्ही त्यांसी ॥ध्रु.॥ मज ऐसा कोण सांगा वांयां गेला । तो तुम्ही तारिला पांडुरंगा ॥२॥ तुका म्हणे नांवासारिखी करणी । न देखें हें मनीं समजावें ॥३॥

1433 " तरलों म्हणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ जाला फांटा ॥१॥ वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥ ग्वाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत्र ॥२॥ तुका म्हणे ऐसीं किती । नरका गेलीं अधोगती ॥३॥

1434 " तरि कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शक्तिहीन ॥१॥ कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरां वाणीत ना ॥ध्रु.॥ तरि च म्हणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखीं गुण ॥२॥ चांगलेपण हें निरुपायता अंगीं । बाणलें श्रीरंगा म्हणऊनि ॥३॥ तरि च हा थोर सांगितलें करी । अभिमान हरीपाशीं नाहीं ॥४॥ तुका म्हणे तरि करिती याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥५॥

1435 " तरि कां मागें वांयां कीर्ती वाढविली । जनांत आपुली ब्रिदावळी ॥१॥ साच करितां आतां फिरसी माघारा । ठायींचें दातारा नेणवेचि ॥ध्रु.॥ संतांसी श्रीमुख कैसें दाखविसी । पुढें मात त्यांसी सांगईंन ॥२॥ घेईंन डांगोरा तुझिया नामाचा । नव्हे अनाथांचा नाथ ऐसा ॥३॥ तुका म्हणे आधीं राहिलों मरोनि । तूं कां होसी धनी निमित्याचा ॥४॥

1436 " तरि च जन्मा यावें । दास विठ्ठलाचें व्हावें ॥१॥ नाहीं तरि काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ॥ध्रु.॥ ज्याल्याचें तें फळ । अंगीं लागों नेदी मळ ॥२॥ तुका म्हणे भले । ज्याच्या नावें मानवलें ॥३॥

1437 " तरि च हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुम्हां सोईं ॥१॥ एके जातीविण नाहीं कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥ध्रु.॥ फुटतसे प्राण क्षणांच्या विसरें । हें तों परस्परें सारिखें चि ॥२॥ तुका म्हणे चित्तीं राखिला अनुभव । तेणें हा संदेह निवारला ॥३॥

1438 " तरि च होय वेडी । नग्न होय धडफुडी ॥१॥ काय बोलाचें गौरव । आंत वरी दोन भाव ॥ध्रु.॥ मृगजळा न्याहाळितां । तान न वजाये सेवितां ॥२॥ न पाहे आणिकांची आस । शूर बोलिजे तयास ॥३॥ तुका म्हणे हें लक्षण । संत अळंकार लेणें ॥४॥

1439 " तरी कां वोळगणे । राजद्वारीं होती सुने ॥१॥ अंगीं दावुनि निष्कामता । पोकळ पोकळी ते वृथा ॥ध्रु.॥ कासया मोकळ । भोंवतें शिष्यांचे गाबाळ ॥२॥ तुका म्हणे ढाळे । बाहेर गुदे तें निराळें ॥३॥

1440 " तरी च हीं केलीं । दानें वाईंट चांगलीं ॥१॥ येक येक शोभवावें । केलें कवतुक देवें ॥ध्रु.॥ काय त्याची सत्ता । सूत्र आणीक चाळिता ॥२॥ तुका म्हणे धुरें । डोळे भरिले परि खरें ॥३॥

1441 " तरी सदा निर्भर दास । चिंताआसविरहित ॥१॥ अवघा चि एकीं ठाव । सर्व भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥ निरविलें तेव्हां त्यास । जाला वास त्यामाजी ॥२॥ तुका म्हणे रूप ध्यावें । नाहीं ठावे गुणदोष ॥३॥

1442 " तरी हांव केली अमुपा व्यापारें । व्हावें एकसरें धनवंत ॥१॥ जालों हरिदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांची ॥ध्रु.॥ जनावेगळें हें असे अभिन्नव । बळी दिला जीव म्हणऊनि ॥२॥ तुका म्हणे तरी लागलों विल्हेसी । चालतिया दिसीं स्वामी ॠणी ॥३॥

1443 " तरीं आम्ही तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥१॥ आगा पंढरीच्या उभ्या विटेवरी । येई लवकरी धांवें नेटे ॥ध्रु.॥ पालवितों तुज उभी करोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥२॥ तुका म्हणे तुज बहु कान डोळे । कां हे माझे वेळे ऐसी परी ॥३॥

1444 " तरीं च म्यां देवा । साटी करूनियां जीवा ॥१॥ येथें बैसलों धरणें । दृढ कायावाचामनें ॥ध्रु.॥ आवरिल्या वृित्त । मन घेउनियां हातीं ॥२॥ तुका म्हणे जरा । बाहेर येऊं नेदीं घरा ॥३॥

1445 " तरीं भलें वांयां गेलों । जन्मा आलों मागुता । म्हणऊनि ठेलों दास । सावकास निर्भयें ॥१॥ उणें पुरें काय माझें । त्याचें ओझें तुम्हांसी ॥ध्रु.॥ सांभाळावें तें म्या काईं । अवो आईं विठ्ठले । मागें जया जाईं नें स्थळा । तुज गोपाळा विसरेंना ॥२॥ आपलें म्यां एकसरें । करुनि बरें घेतलें । तुका म्हणे नारायणा । आतां जाणां आपुलें ॥३॥

1446 " तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा सेवटीं ॥१॥ तैसें तुम्हां आम्हां जालें । एकीं एक सामावलें ॥ध्रु.॥ उदकावरील तरंग । तरंग उदकाचें अंग ॥२॥ तुका म्हणे बिंबच्छाया । ठायीं पावली विलया ॥३॥

1447 " तळमळी चित्ती दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥१॥ वचनीं च संत पावले स्वरूप । माझें नेदी पाप योगा येऊं ॥ध्रु.॥ वेठीऐसा करीं भक्तिवेवसाव । न पवे चि जीव समाधान ॥२॥ तुका म्हणे कईं देसील विसांवा । पांडुरंगे धांवा घेतें मन ॥३॥

1448 " तळि एक अर्ध राई । सीतबुंद पावे काई । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां ॥१॥ म्हणउनी करा लाहो । नका मागें पुढें पाहों । अवघ्यामध्यें आहों । सावचित्त तों ॥ध्रु.॥ तीथॉ न येती तुळणी । आजिया सुखाची धणी । जे कासी गयेहुनी । जीं आगळीं असती ॥३॥ येथें धरी लाज । वर्ण अभिमान काज । नाडला सहज । तुका म्हणे तो येथें ॥३॥

1449 " तांतडीनें आम्हां धीर चि न कळे । पाळावे हे लळे लवलाहीं ॥१॥ नका कांहीं पाहों सावकाशीं देवा । करा एक हेवा तुमचा माझा ॥ध्रु.॥ वोरसाचा हेवा सांभाळावी प्रीत । नाहीं राहों येत अंगीं सदा ॥२॥ तुका म्हणे मज नका गोवूं खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥३॥

1450 " तांबगी हें नाणें न चले खर्‍या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं ॥१॥ करणीचें कांहीं न मने सज्जना । यावें लागे मना वृद्धांचिया ॥ध्रु.॥ हिरयासारिका दिसे शिरगोळा । पारखी ते डोळां न पाहाती ॥२॥ देऊनियां भिंग कामाविलें मोतीं । पारखिया हातीं घेतां नये ॥३॥ तुका म्हणे काय नटोनियां व्यर्थ । आपुलें हें चित्त आपणा ग्वाही ॥४॥

1451 " ताकें कृपण तो जेवूं काय घाली । आहाच ते चालीवरुनि कळे ॥१॥ काय तुम्हां वेचे घातलें सांकडें । माहें आलें कोडें आजिवरि ॥ध्रु.॥ सेवेंविण आम्ही न लिंपों काया । जाला देवराया निर्धार हा ॥२॥ तुका म्हणे तुझीं राखावया ब्रीदें । येणें अनुवादें कारियासी ॥३॥

1452 " तातडीची धांव अंगा आणि भाव । खोळंबा तो मग निश्चियाचा ॥१॥ म्हणउनि बरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥ध्रु.॥ कोरडें वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगींचें तें ॥२॥ तुका म्हणे बरी झर्‍याची ते चाली । सांचवण्या खोली कैसीयांची ॥३॥

1453 " तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥१॥ जेथें तें च नाहीं जालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥ध्रु.॥ वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥२॥ शेष उरला तुका । जीवा जीवीं जाला चुका ॥३॥

1454 " तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनियां सार उरलें तें ॥१॥ मग कदाकाळीं नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र ते चि ॥ध्रु.॥ किळवर बरें भोगूं द्यावें भोगा । फांसिलें तें रोगा हातीं सुटे ॥२॥ तुका म्हणे मन करावें पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरि ॥३॥

1455 " तामसाचीं तपें पापाची सिदोरी । तमोगुणें भरी घातले ते ॥१॥ राज्यमदा आड सुखाची संपत्ति । उलंघूनि जाती निरयगांवा ॥ध्रु.॥ इंद्रियें दमिलीं इच्छा जिती जीवीं । नागविती ठावीं नाहीं पुढें ॥२॥ तुका म्हणे हरिभजनावांचून । करिती तो सीण पाहों नये ॥३॥

1456 " तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां ॥१॥ नेणतां सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाटीं ॥ध्रु.॥ जन्म नांव धरी भक्तीच्या पाळणा । आकार कारणा या च साटीं ॥२॥ असुरीं दाटली पाप होतां फार । मग फेडी भार पृथिवीचा ॥३॥ तुका म्हणे देव भक्तपण सार । कवतुक वेव्हार तयासाटीं ॥४॥

1457 " तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥१॥ तो हा न करी तें काईं । कां रे लीन नव्हां पायीं ॥ध्रु.॥ सीळा मनुष्य जाली । ज्याच्या चरणाचे चाली ॥२॥ वानरां हातीं लंका । घेवविली म्हणे तुका ॥३॥

1458 " तारुण्याच्या मदें न मनी कोणासी । सदा मुसमुसी खूळ जैसा ॥१॥ अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे म्हैसा जनामधीं ॥ध्रु.॥ हातीं दीडपान वरती च मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥२॥ श्वानाचिया परी हिंडे दारोदारीं । पाहे परनारी पापदृष्टी ॥३॥ तुका म्हणे ऐसा थोर हा गयाळी । करितां टवाळी जन्म गेला ॥४॥

1459 " तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥ लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥ जाला हरिनामाचा तारा । सीड लागलें फरारा ॥२॥ तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥३॥

1460 " तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसिद्धि केणें तये घरीं ॥१॥ पंढरीचोहोटां घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥ध्रु.॥ आषाढी कार्तिकी भरियेले हाट । इनाम हे पेंठ घेतां देतां ॥२॥ मुक्ति कोणी तेथें हातीं नेघे फुका । लुटितील सुखा प्रेमाचिया ॥३॥ तुका म्हणे संतसज्जन भाग्याचें । अनंतां जन्मींचे सांटेकरी ॥४॥

1461 " तिहीं ताळीं हेचि हाक । म्हणती पांढरा स्फटिक । अवघा बुडविला लौकिक । सुखें चि भीके लाविलीं ॥१॥ थोंटा नांव शिरोमणी । नाहीं जोडा त्रिभुवनीं । म्हणोनि शाहाणे ते कोणी । तुझे दारीं बैसतिना ॥ध्रु.॥ निर्गुण निलाजिरा निनांवा । लंड झोंड कुडा देवा । नागवणा या नांवा । वांचूनि दुजा नाइकों ॥२॥ सर्वगुणें संपन्न । कळों आलासी संपूर्ण । तुकयाबंधु म्हणे चरण । आतां जीवें न सोडीं ॥३॥

1462 " तिहीं त्रिभुवनीं । आम्ही वैभवाचे धनी ॥१॥ हातां आले घाव डाव । आमचा मायबाप देव ॥ध्रु.॥ काय त्रिभुवनीं बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥२॥ तुका म्हणे सत्ता । अवघी आमुची च आतां ॥३॥

1463 " तीथाअची अपेक्षा स्थळीं वाढे धर्म । जाणावें तें वर्म बहु पुण्य ॥१॥ बहु बरी ऐसी भाविकांची जोडी । काळ नाहीं घडी जात वांयां ॥ध्रु.॥ करूनी चिंतन करवावें आणिकां । तो या जाला लोकां नाव जगीं ॥२॥ तुका म्हणे ऐसे परउपकारी । त्यांच्या पायांवरी डोईं माझी ॥३॥

1464 " तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठीं च कोल्हाळ करिताती ॥१॥ कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागें ॥२॥ मागें सरे माय पाउला पाउलीं । आपल्या च घाली धाकें अंग ॥३॥ अंग राखोनियां माय खेद करी । अंतरीचें हरी जाणवलें ॥४॥ जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका म्हणे कुडी भावना हे ॥५॥

1465 " तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसाऐसे ॥१॥ वांजेच्या मैथुनापरी गेलें वांयां । बांडेल्याचें जायां जालें पीक ॥ध्रु.॥ अभाविक सदा सुतकी चांडाळ । सदा तळमळ चुके चि ना ॥२॥ तुका म्हणे वरदळी ज्याची दृष्टी । देहबुद्धि कष्टी सदा दुःखी ॥३॥

1466 " तीर्थांचे मूळ व्रतांचें फळ । ब्रम्ह तें केवळ पंढरिये ॥१॥ तें आम्हीं देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणीं डोळियांचीं ॥ध्रु.॥ जीवांचें जीवन सुखाचें सेजार । उभें कटीं कर ठेवूनियां ॥२॥ जनाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभापार दुष्टां काळ ॥३॥ सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तें चि असे ॥४॥ तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें । आम्हां सांपडलें गीती गातां ॥५॥

1467 " तीर्थाचिये आस पंथ तो निट देव । पाविजेतो ठाव अंतराय ॥१॥ म्हणऊनि भलें निश्चळ चि स्थळीं । मनाचिये मुळीं बैसोनियां ॥ध्रु.॥ संकल्पारूढ तें प्रारब्धें चि जिणें । कार्य चि कारणें वाढतसे ॥२॥ तुका म्हणे कामा नाहीं एक मुख । जिरवितां सुख होतें पोटीं ॥३॥

1468 " तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥१॥ तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥ अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ॥२॥ तुका म्हणे विधिनिषधाचे डोहीं । पडिले त्यां नाहीं देव कधीं ॥३॥

1469 " तीर्थे फळती काळें जन्में आगळिया । संतदृष्टी पाया हेळामात्रें ॥१॥ सुखाचे सुगम वैष्णवांचे पाय । अंतरींचा जाय महाभेव ॥ध्रु.॥ काळें हि न सरे तपें समाधान । कथे मूढजन समाधिस्थ ॥२॥ उपमा द्यावया सांगतां आणीक । नाहीं तिन्ही लोक धुंडाळितां ॥३॥ तुका म्हणे मी राहिलों येणें सुखें । संतसंगें दुःखें नासावया ॥४॥

1470 " तुका इच्छा मीटइ तो । काहा करे चट खाक । मथीया गोला डारदिया तो । नहिं मिले फेरन ताक ॥१॥

1471 " तुका उतरला तुकीं । नवल जालें तिहीं लोकीं ॥१॥ नित्य करितों कीर्तन । हें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥ तुका बैसला विमानीं । संत पाहाती लोचनीं ॥२॥ देव भावाचा भुकेला । तुका वैकुंठासी नेला ॥३॥

1472 " तुका और मिठाईं क्या करूं रे । पाले विकारपिंड । राम कहावे सो भली रुखी । माखन खांडखीर ॥१॥

1473 " तुका कुटुंब छोरे रे । लरके जोरों सिर गुंदाय । जबथे इच्छा नहिं मुईं । तब तूं किया काय ॥१॥

1474 " तुका दास तिनका रे । रामभजन निरास । क्या बिचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥१॥

1475 " तुका दास रामका । मनमे एक हि भाव । तो न पालटू आव । ये हि तन जाव ॥१॥

1476 " तुका पंखिबहिरन मानुं । बोईं जनावर बाग । असंतनकुं संत न मानूं । जे वर्मकुं दाग ॥१॥

1477 " तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी राख । पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥१॥

1478 " तुका मार्य़ा पेटका । और न जाने कोये । जपता कछु रामनाम । हरिभगतनकी सोये ॥१॥

1479 " तुका मिलना तो भला । मनसुं मन मिल जाय । उपर उपर माटि घसनी । उनकि कोन बराईं ॥१॥

1480 " तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥१॥ दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥ याच्या मुखें नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥३॥ ताटस्थ राहिलें सकळ शरीर । इंद्रियें व्यापार विसरलीं ॥४॥ विसरल्या तान भुक घर दार । नाहीं हा विचार आहों कोठें ॥५॥ कोठें असों कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥ विसरल्या आम्हीं कोणीये जातीच्या । वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥७॥ एक जाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । निःशंकें भातुकें खेळतील ॥८॥ खेळता भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित चत्ति त्यांचें ॥९॥ चित्ती तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥१०॥ जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनियां ॥११॥ करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥१२॥ त्याणीं केला हरि सासुरें माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥१३॥ भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका म्हणे पायीं गोविंदाचे ॥१४॥

1481 " तुका म्हणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनि ध्वजा ॥१॥ करूनियां टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥ दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गातां छंद ताल नाहीं ॥३॥ नाही ताळ गातां नाचतां गोपाळां । घननीळ सावळा तयामध्यें ॥४॥ मधीं जयां हरि तें सुख आगळें । देहभाव काळें नाहीं तयां ॥५॥ तयांसि आळंगी आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणीं ॥६॥ निजभाव देखे जयांचिये अंगीं । तुका म्हणे संगीं क्रीडे तयां ॥७॥

1482 " तुका राम बहुत मिठा रे । भर राखूं शरीर । तनकी करूं नावरि । उतारूं पैल तीर ॥१॥

1483 " तुका रामसुं चित बांध राखूं । तैसा आपनी हात । धेनु बछरा छोर जावे । प्रेम न छुटे सात ॥१॥

1484 " तुका वेडा अविचार । करी बडबड फार ॥१॥ नित्य वाचे हा चि छंद । राम कृष्ण हरि गोविंद ॥ध्रु.॥ धरी पांडुरंगीं भाव। आणीक नेणें दुजा देव ॥२॥ गुरुज्ञान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥३॥ बोल नाईंके कोणाचे । कथे नागवा चि नाचे ॥४॥ संगउपचारें कांटाळे । सुखें भलते ठायीं लोळे ॥५॥ कांहीं उपदेशिलें नेणे । वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे ॥६॥ केला बहुतीं फजित । तरी हें चि करी नित्य ॥७॥ अहो पंडितजन । तुका टाकावा थुंकोन ॥८॥

1485 " तुका संगत तीन्हसें कहिये । जिनथें सुख दुनाये । दुर्जन तेरा मू काला । थीतो प्रेम घटाये ॥१॥

1486 " तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये । चोट साहे घनकि रे । हिरा नीबरे तोये ॥१॥

1487 " तुका सुरा बहुत कहावे । लडत विरला कोये । एक पावे उंच पदवी । एक खौंसां जोये ॥१॥

1488 " तुकाप्रभु बडो न मनूं न मानूं बडो । जिसपास बहु दाम । बलिहारि उस मुखकी । जीसेती निकसे राम ॥१॥

1489 " तुज करितां होती ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे॥१॥ परि वर्म नेणे तें कोणी । पीडाखाणी भोगितील ॥ध्रु.॥ उलंघितें पांगुळ गिरी । मुकें करी अनुवाद ॥२॥ पापी होय पुण्यवंत । न करी घात दुर्जन ॥३॥ अवघें हेळामात्रें हरि । मुक्त करी ब्रम्हांड ॥४॥ तुका म्हणे खेळे लीळा । पाहे वेगळा व्यापूनि ॥५॥

1490 " तुज करितां होय ऐसें कांहीं नाहीं । डोंगराची राईं रंक राणा ॥१॥ अशुभाचें शुभ करितां तुज कांही । अवघड नाहीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ सोळा सहजर नारी ब्रम्हचारी कैसा । निराहारी दुर्वासा नवल नव्हे ॥२॥ पंचभ्रतार द्रौपदी सती । करितां पितृशांती पुण्य धर्मा ॥३॥ दशरथा पातकें ब्रम्हहत्ये ऐसीं । नवल त्याचे कुशीं जन्म तुझा ॥४॥ मुनेश्वरा नाहीं दोष अनुमात्र । भांडवितां सुत्र वध होती ॥५॥ तुका म्हणे माझे दोष ते कायी । सरता तुझा पायीं जालों देवा ॥६॥

1491 " तुज काय करूं मज एक सार । अमृतसागर नाम तुझें ॥१॥ काय येणें उणें आम्हां तयापोटीं । गोवितां हे कंठीं कामधेनु ॥ध्रु.॥ नोळखे तानुलें माय ऐसी कोण । वोरसे देखून शोक त्याचा ॥२॥ जो नाहीं देखिला याचक नयनीं । तो पावे घेउनि लज्जा दान ॥३॥ नामासाटीं प्राण सांडियेला रणीं । शूर ते भांडणीं न फिरती ॥४॥ तुका म्हणे आम्ही गातां गीतीं भला । भेटूनी विठ्ठला काय चाड ॥५॥

1492 " तुज केलिया नव्हे ऐसें काईं । डोंगराची राईं क्षणमात्रें ॥१॥ मज या लोकांचा न साहे आघात । देखणें प्रचित जीव घेती ॥ध्रु.॥ सहज विनोदें बोलियेलों गोष्टी । अरंभी तों पोटीं न धरावी ॥२॥ दीनरूप मज करावें नेणता । याहुनी अनंता आहें तैसा ॥३॥ तुका म्हणे जेणें मज तूं भोगसी । तें करीं जनासीं चाड नाहीं ॥४॥

1493 " तुज घालोनियां पूजितों संपुष्टीं । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें ॥१॥ तुज नाचऊनि दाखवूं कौतुका । परी रूपरेखा नाहीं तुज ॥ध्रु.॥ तुजलागीं आम्ही गात असों गीत । परी तूं अतीत शब्दाहूनि ॥२॥ तुजलागीं आम्हीं घातियेल्या माळा । परि तूं वेगळा कतृऩत्वासी ॥३॥ तुका म्हणे आतां होऊनि परमित । माझें कांहीं हित विचारावें ॥४॥

1494 " तुज जाणें तानें नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥१॥ तुज ठावें होतें मी पातकी थोर । आधीं च कां थार दिधली पायीं ॥ध्रु.॥ अंक तो पडिला हरिचा मी दास । भेद पंगतीस करूं नये ॥२॥ तुका म्हणे आम्ही जिंतिलें तें खरें । आतां उणें पुरें तुम्हां अंगीं ॥३॥

1495 " तुज ते सवे आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें । परि ते आम्हांसवें । आतां न फावे कांहीं ॥१॥ नव्हों सोडायाचे धणी । कष्टें मेळविलें करोनि । पाहा विचारोनी । आढी धरोनि काम नाहीं ॥ध्रु.॥ अवघे राहिले प्रकार । जालों जीवासी उदार । असा हा निर्धार । कळला असावा असेल ॥२॥ आतां निदसुर नसावें । गाठ पडली कुणब्यासवें । तुकयाबंधु म्हणे राखावें । देवा महत्व आपुलें ॥३॥

1496 " तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥१॥ ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ध्रु.॥ बोलतों जें तोंडें । नाहीं अनुभविलें लंडें ॥२॥ दंड लाहें केला । तुका म्हणे जी विठ्ठला ॥३॥

1497 " तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव-वाचाकायामन ॥१॥ भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥ नेणतां सोसिली तयाची आटणी । नव्हतां ही कोणी कांहीं माझीं ॥२॥ वर्म नेणें दिशा हिंडती मोकट । इंद्रियें सुनाट दाही दिशा ॥३॥ वेरझारीफेरा सिणलों सायासीं । आतां हृषीकेशी अंगिकारीं ॥४॥ तुका म्हणे मन इंद्रियांचे सोईं । धांवे यासी काईं करूं आतां ॥५॥

1498 " तुज न करितां काय नव्हे एक । हे तों सकळिक संतवाणी ॥१॥ घेई माझा भार करीं कइवार । उतरीं हा पार भवसिंधु ॥ध्रु.॥ उचित अनुचित पापपुण्यकाला । हा तों नये मला निवडितां ॥२॥ कुंटित राहिली बोलतां बोलतां । पार न पवतां वाणी पुढें ॥३॥ पुसतां ही कोणां न कळे हें गुज । राखें आतां लाज पांडुरंगा ॥४॥ तुका म्हणे बहु पाहिलें या जीवें । वर्म जालें जी ठावें नाम तुझें ॥५॥

1499 " तुज न भें मी कळिकाळा । मज नामाचा जिव्हाळा ॥१॥ माझा बळिया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु.॥ शंख वधिला सागरीं । वेद घेउनि आला चारी ॥२॥ कूर्में दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटीं ॥३॥ वाराहरूप धरिलें गाढें । धरा प्रतापें धरिली दाढे ॥४॥ हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रक्षिला ॥५॥ वामन जाला दिनानाथ । बळी पाताळीं घातला दैत्य ॥६॥ छेदुनियां सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥७॥ शिळा प्रतापें सागरीं तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥८॥ मारोनियां कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥९॥ पांचाळीसी गांजितां वैरी । वस्त्रें आपण जाला हरी ॥१०॥ गजेंद्र स्मरे राम राम । त्यासी पाववी वैकुंठधाम ॥११॥ तुका म्हणे हरिरूप जाले । पुन्हा जन्मा नाहीं आले ॥१२॥

1500 " तुज नाहीं शक्ति । काम घेसी आम्हां हातीं ॥१॥ ऐसें अनुभवें पाहीं । उरलें बोलिजेसें नाहीं ॥ध्रु.॥ लपोनियां आड । आम्हां तुझा कैवाड ॥२॥ तुका म्हणे तुजसाठी । आम्हां संवसारें तुटी ॥३॥

1501 " तुज पाहातां समोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥ माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥ध्रु.॥ नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥२॥ तुका म्हणे बळी । जीव दिला पायांतळीं ॥३॥

1502 " तुज पाहावें हे धरितों वासना । परि आचरणा नाहीं ठाव ॥१॥ करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥ध्रु.॥ बाहिरल्या वेषें उत्तम दंडलें । भीतरी मुंडलें नाहीं तैसें ॥२॥ तुका म्हणे वांयां गेलों च मी आहे । जरि तुम्ही साहे न व्हा देवा ॥३॥

1503 " तुज मज ऐसी परी । जैसे तरंग सागरीं ॥१॥ दोहींमाजी एक जाणा । विठ्ठल पंढरीचा राणा ॥ध्रु.॥ देव भक्त ऐसी बोली । जंव भ्रांति नाहीं गेली ॥२॥ तंतु पट जेवीं एक । तैसा विश्वेंसीं व्यापक ॥३॥

1504 " तुज मज नाहीं भेद । केला सहज विनोद ॥१॥ तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥ध्रु.॥ मी तुजमाजी देवा । घेसी माझ्या अंगें सेवा ॥२॥ मी तुजमाजी अचळ । मजमाजी तुझें बळ ॥३॥ तूं बोलसी माझ्या मुखें । मी तों तुजमाजी सुखें ॥४॥ तुका म्हणे देवा । विपरीत ठायीं नांवा ॥५॥

1505 " तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥ आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥ आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥२॥ प्रेमरसपान्हा पाजीं माझे आई । धांवें वो विठाईं वोरसोनि ॥३॥ तुका म्हणे माझें कोण हरी दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥४॥

1506 " तुजऐसा कोणी न देखें उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥१॥ शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ देसी ॥ध्रु.॥ धांवसी आडणी ऐकोनियां धांवा । कइवारें देवा भक्तांचिया ॥२॥ दोष त्यांचे जाळी कल्पकोटिवरी । नामासाटीं हरि आपुलिया ॥३॥ तुका म्हणे तुज वाणूं कैशा परी । एक मुख हरी आयुष्य थोडें ॥४॥

1507 " तुजकरितां होतें आनाचें आन । तारिले पाषाण उदकीं देवा ॥१॥ कां नये कैवार करूं अंगीकार । माझा बहु भार चड जाला ॥ध्रु.॥ चुकलासी म्हणों तरी जीवांचा ही जीव । रिता नाहीं ठाव उरों दिला ॥२॥ तुका म्हणे ऐसें काय सत्ताबळ । माझे परी कृपाळ आहां तुम्ही ॥३॥

1508 " तुजलागीं माझा जीव जाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा ॥१॥ सांडिला वेव्हार माया लोकाचार । छंद निरंतर हा चि मनीं ॥ध्रु.॥ आइकिलें कानीं तें रूप लोचन । देखावया सीण करिताति ॥२॥ प्राण हा विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥३॥ तुका म्हणे आतां कोण तो उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥४॥

1509 " तुजवांचून कोणा शरण । जाऊं आतां कर जोडून ॥१॥ कोण करील माझें साहे । चित्ती विचारूनि पाहें ॥ध्रु.॥ तूं तंव कृपेचा सागर । दीनबंधु जगदोद्धार ॥२॥ तुका म्हणे निका । भवसिंधु तारक नौका ॥३॥

1510 " तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥१॥ ऐसा न देखें मी कोणी । तुजा तिहीं त्रिभुवनीं ॥ध्रु.॥ पाहिलीं पुराणें । धांडोळिलीं दरुषणें ॥२॥ तुका म्हणे ठायीं । जडून ठेलों तुझ्या पायीं ॥३॥

1511 " तुजविण चाड आणिकांची कांहीं । धरीन हें नाहीं तुज ठावें ॥१॥ तरणउपाय योगक्षेम माझा । ठेवियेला तुझ्या पायीं देवा ॥ध्रु.॥ कोण मज आळी काय हे तांतडी । सोनियाची घडी जाय दिस ॥२॥ तुझिया नामाचें ल्यालोंसें भूषण । कृपा संतजन करितील ॥३॥ तुका म्हणे जाला आनंदाचा वास । हृदया या नास नव्हे कधीं ॥४॥

1512 " तुजविण देवा । कोणा म्हणे माझी जिव्हा ॥१॥ तरि हे हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥ कांहीं इच्छेसाटीं । करिल वळवळ करंटी ॥२॥ तुका म्हणे कर । कटीं तयाचा विसर॥३॥

1513 " तुजविण सत्ता । नाहीं वाचा वदविता ॥१॥ ऐसे आम्ही जाणों दास । म्हणोनि जालों उदास ॥ध्रु.॥ तुम्ही दिला धीर। तेणें मन झालें स्थिर ॥२॥ तुका म्हणे आड । केलों मी हें तुझें कोड ॥३॥

1514 " तुजविणं कांहीं । स्थिर राहे ऐसें नाहीं ॥१॥ कळों आलें बहुता रीती । पांडुरंगा माझ्या चित्तीं ॥ध्रु.॥ मोकलिली आस । सर्वभावें जालों दास ॥२॥ तुका म्हणे तूं चि खरा । येर वाउगा पसारा ॥३॥

1515 " तुजवीण तीळभरी रिता ठाव । नाहीं ऐसें विश्व बोलतसे ॥१॥ बोलियेले योगी मुनी साधु संत । आहेसि या आंत सर्वांठायीं ॥ध्रु.॥ मी तया विश्वासें आलों शरणागत । पूर्वीचें अपत्य आहें तुझें ॥२॥ अनंत ब्रम्हांडें भरोनि उरलासि । मजला जालासि कोठें नाहीं ॥३॥ अंतपार नाहीं माझिया रूपासि । काय सेवकासि भेट देऊं ॥४॥ ऐसें विचारिलें म्हणोनि न येशी । सांग हृषीकेशी मायबापा ॥५॥ तुका म्हणे काय करावा उपाय । जेणें तुझे पाय आतुडति ॥६॥

1516 " तुजवीण मज कोण आहे देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥ जोडोनियां कर कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ साच करीं हरी आपुली ब्रिदावळी । कृपेनें सांभाळीं मायबापा ॥२॥ साहए होसी जरी जाती सहा वैरी । मग ध्यान करीं आवडीनें ॥३॥ सर्व अपराध क्षमा करीं माझा । लडिवाळ तुझा पांडुरंगा ॥४॥ कृपा करोनियां द्यावी क्षमा शांति । तेणें तुझी भक्ति घडेल देवा ॥५॥ ऐंसें तों सामर्थ्य नाहीं नारायणा । जरी तुज करुणा येइल कांहीं ॥६॥ तुका म्हणे आतां आपंगावें मज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥७॥

1517 " तुजशीं संबंध चि खोटा । परता परता रे थोंटा ॥१॥ देवा तुझें काय घ्यावें । आप आपणां ठकावें ॥ध्रु.॥ जेथें मुदल न ये हातां । व्याज मरावें लेखितां ॥२॥ तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं तुझा ठसा ॥३॥

1518 " तुजसवें आम्हीं अनुसरलों अबळा । नको अंगीं कळा राहों हरी हीन देऊं ॥१॥ सासुरवासा भीतों जीव ओढे तुजपाशीं । आतां दोहीविशीं लज्जा राखें आमुची ॥ध्रु.॥ न कळतां संग जाला सहज खेळतां । प्रवर्तली चिंता मागिलांचियावरि ॥२॥ तुका म्हणे असतां जैसें तैसें बरवें । वचन या भावें वेचुनियां विनटलों ॥३॥

1519 " तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करीं माझा ॥१॥ अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ध्रु.॥ माझें गुण दोष पाहातां न लगे अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥२॥ नेणें तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥३॥ तुका म्हणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥४॥

1520 " तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर ॥१॥ हें चि आतां लागे करावें जतन । तुझें थोरपण तुज देवा ॥ध्रु.॥ होउनी निर्भर राहिलों निश्चिंतें । पावनपतित नाम तुझें ॥२॥ करितां तुज होय डोंगराची राईं । न लगतां कांहीं पात्या पातें ॥३॥ तुका म्हणे तुज काय ते आशंका । तारितां मशका मज दीना ॥४॥

1521 " तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा ॥१॥ भवसागरसंकटीं । तारिशील जगजेठी ॥ध्रु.॥ नाम आदित्याचें झाड । त्याचा न पडे उजेड ॥२॥ सिलंगणीचें सोनें । त्यासीं गाहाण ठेवी कोण ॥३॥ तुका म्हणे देवा । ब्रिद सोडूनियां ठेवा ॥४॥

1522 " तुझा म्हणऊनि जालों उतराईं । त्याचें वर्म काईं तें मी नेणें ॥१॥ हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तें चि देवा ॥ध्रु.॥ देवभक्तपण करावें जतन । दोहीं पक्षीं जाण तूं चि बळी ॥२॥ अभिमानें तुज लागली हे लाज । शरणागतां काज करावया ॥३॥ तुका म्हणे बहु नेणता मी फार । म्हणऊनि विचार जाणविला ॥४॥

1523 " तुझा म्हणविलों दास । केली उच्छिष्टासी आस ॥१॥ मुखीं घालावा कवळ । जरी तूं होशील कृपाळ ॥२॥ सीण भाग माझा पुसें । तुका म्हणे न करीं हांसें ॥३॥

1524 " तुझा म्हणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें ॥१॥ तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥ काय शब्दीं चि ऐकिला । भेटी नव्हतां गा विठ्ठला ॥२॥ तुका म्हणे आतां । अभय देई पंढरिनाथा ॥३॥

1525 " तुझा म्हणोनियां दिसतों गा दीन । हा चि अभिमान सरे तुझा ॥१॥ अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु.॥ तैसा विठो तुजविण परदेशी । नको या दुःखासीं गोऊं मज ॥२॥ तुका म्हणे मज सर्व तुझी आशा । अगा जगदीशा पांडुरंगा ॥३॥

1526 " तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥१॥ जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥ कुश्चीळ इंद्रियें आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥२॥ पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥३॥ पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥४॥ तुका म्हणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥५॥

1527 " तुझा शरणागत जालों मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥१॥ पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥ अनाथाचा नाथ बोलतील संत । ऐकोनियां मात विश्वासलों ॥२॥ न करावी निरास न धरावें उदास । देई याचकास कृपादान ॥३॥ तुका म्हणे मी तों पातकांची रासी । देई पायापासीं ठाव देवा ॥४॥

1528 " तुझा संग पुरे संग पुरे । संगति पुरे विठोबा ॥१॥ आपल्या सारिखें करिसी दासां । भिकारिसा जग जाणे ॥ध्रु.॥ रूपा नाहीं ठाव नांवा । तैसें आमुचें करिसी देवा ॥२॥ तुका म्हणे तोयें आपुलें भेंडोळें । करिसी वाटोळें माझें तैसें ॥३॥

1529 " तुझाठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥१॥ झडलें उरलें किती । आम्ही धरियेलें चित्ती ॥ध्रु.॥ कळलासी नष्टा । यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥२॥ तुका म्हणे बोला । नाहीं ताळा गा विठ्ठला ॥३॥

1530 " तुझिया दासांचा हीन जालों दास । न धरीं उदास मायबापा ॥१॥ तुजविण प्राण कैसा राहों पाहे । वियोग न साहे क्षणभरि ॥ध्रु.॥ आणिक माझ्या जीवें मोकलिली आस । पाहे तुझी वास पांडुरंगा ॥२॥ सर्वभावें तुज आणिला उचित । राहिलों निश्चिंत तुझे पायीं ॥३॥ तुका म्हणे तुज असो माझा भार । बोलतों मी फार काय जाणें ॥४॥

1531 " तुझिया नामाचा विसर न पडावा । ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥१॥ सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा हें चि बोले ॥ध्रु.॥ उफराटें नाम वाल्मीक बोलीला । तो ही वंद्य केला नारायणें ॥२॥ तुका म्हणे मज तुझा चि भरवसा । धांवुनियां कैसा येसी देवा ॥३॥

1532 " तुझिया पाळणा ओढे माझें मन । गेलों विसरोन देहभाव ॥१॥ लागला पालट फेडणें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥२॥ तुका म्हणे माझा जीव जैसा ओढे । तैसा चि तिकडे पाहिजेल ॥३॥

1533 " तुझिया विनोदें आम्हांसी मरण । सोसियेला सीण बहु फेरे ॥१॥ आतां आपणें चि येसी तें करीन । नाम हें धरीन तुझें कंठीं ॥ध्रु.॥ वियोगें चि आलों उसंतीत वनें । संकल्प हे मनें वाहोनियां ॥२॥ तुका म्हणे वर्म सांपडलें सोपें । गोवियेलों पापें पुण्यें होतों ॥३॥

1534 " तुझी कीर्ती सांगों तुजपुढें जरी । ब्रम्हांडीं ही हरी माईना ते ॥१॥ मेरूची लेखणी सागराची शाई । कागद हा मही न पुरे चि ॥ध्रु.॥ अनंत अपार आपंगिले भक्त । माझें चि संचित ओडवेना ॥२॥ तुका म्हणे तुम्हां बोल नाहीं देवा । पामरें म्यां सेवा केली नाहीं ॥३॥

1535 " तुझी माझी आहे जुनी सोयरीक । आधीं बंधु लेंक मग जाले ॥१॥ वांटेकरी म्हणून पुसती आतां । परि आहे सत्ता करीन ते ॥ध्रु.॥ लेंकीचें लेंकरूं नातु जाल्यावरी । मंगळा ही दुरि अंतरलों ॥२॥ बाइलेचा भाऊ पिसुना सोयरा । म्हणउनि करा विनोद हा ॥३॥ आकुळीं तों करूं नये तें चि केलें । न बोलावें भलें तों चि आतां ॥४॥ न म्हणसी लेंकी माउसी बहिणी । आम्हां केलें धणी पापाचें त्या ॥५॥ बहु पांचांजणी केली विटंबना । नये दाऊं जना तोंड ऐसें ॥६॥ तुका म्हणे आधीं मूळ तें चि धरूं । मागील तें करूं उरी आतां ॥७॥

1536 " तुझीं वर्में आम्हां ठावीं नारायणा । परी तूं शाहाणा होत नाहीं ॥१॥ मग कालाबुली हाका देते वेळे । होतोसि परी डोळे नुघडिसी ॥ध्रु.॥ जाणोनि अज्ञान करावें मोहरें । खोटी खोडी हे रे तुझी देवा ॥२॥ तुकयाबंधु म्हणे कारण प्रचीति । पाहातों वेळ किती तेच गुण ॥३॥

1537 " तुझे दारींचा कुतरा । नको मोकलूं दातारा ॥१॥ धरणें घेतलें घरांत । नको धरून उठवूं हात ॥ध्रु.॥ घेतली मुरकुंडी । थोर जालों मी लंडी ॥२॥ तुका म्हणे जगजीवना । ब्रिदें पाहें नारायणा ॥३॥

1538 " तुझे नामें दिनानाथा । आम्ही उघडा घातला माथा ॥१॥ आतां न धरावें दुरी । बोल येईंल ब्रीदावरी ॥ध्रु.॥ पतित होतों ऐसा ठावा । आधीं कां न विचारावा ॥२॥ तुका म्हणे तुझे पायीं । आम्ही मिरास केली पाहीं ॥३॥

1539 " तुझे पाय माझी काशी । कोण जाय माझें काशी॥१॥ तुझें रूप तें चि ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥ तुझे चरण ते चि गया । जालें गयावर्जन देहा ॥२॥ तुका म्हणे सकळ तीथॉ । तुझें पायीं वसती येथें ॥३॥

1540 " तुझे पाय माझे राहियेले चित्ती । ते मज दाविती वर्म देवा ॥१॥ आम्हां अंधां तुझ्या पायांचा आधार । जाणसी विचार चाळवितां ॥ध्रु.॥ मन स्थिर ठेलें इंद्रियें निश्चळ । हें तों माझें बळ नव्हे देवा ॥२॥ पापपुण्य भेद नासिलें तिमिर । त्रिगुण शरीर सांडियेलें ॥३॥ तुका म्हणे तुझा प्रताप हा खरा । मी जाणें दातारा शरणागत ॥४॥

1541 " तुझे पाय माझें भाळ । एकत्रता सर्वकाळ ॥१॥ हें चिं देई विठाबाईं । पांडुरंगे माझे आईं ॥ध्रु.॥ नाहीं मोक्ष मुक्ति चाड । तुझी सेवा लागे गोड ॥२॥ सदा संग सज्जनांचा । नको वियोग पंढरीचा ॥३॥ नित्य चंद्रभागे स्नान । करीं क्षेत्रप्रदक्षण ॥४॥ पुंडलीक पाहोन दृष्टी । हर्षो नाचों वाळवंटीं ॥५॥ तुका म्हणे पांडुरंगा । तुझें स्वरूप चंद्रभागा ॥६॥

1542 " तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥१॥ करीं वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ध्रु.॥ अहंकार खोटे । वाटे श्वापदांची थाटे ॥२॥ तुका म्हणे आईं । हातीं धरूनि संग देईं ॥३॥

1543 " तुझे मजपाशीं मन । माझी येथें भूक तान ॥१॥ जिव्हा रतें एके ठायीं । दुजें बोलायाचें काईं ॥ध्रु.॥ माझिया कवतुकें । उभा पहासी भातुकें ॥२॥ तुका म्हणे साचें । तेथें मागील कईंचें ॥३॥

1544 " तुझे म्हणों आम्हां । मग उणें पुरुषोत्तमा ॥१॥ ऐसा धर्म काय । अमृतानें मृत्यु होय ॥ध्रु.॥ कल्पवृक्षा तळीं । गांठी बांधलिया झोळी ॥२॥ तुका म्हणे परीस । सांपडल्या उपवास ॥३॥

1545 " तुझें अंगभूत । आम्ही जाणतों समस्त ॥१॥ येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ध्रु.॥ ठावा थारा मारा । परचिया संव चोरा ॥२॥ तुका म्हणे भेदा । करुनि करितों संवादा ॥३॥

1546 " तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था ॥१॥ तुझ्या नामाचा विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥ तुझे नामीं विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥२॥ नाम घ्या रे कोणी फुका । भावें सांगतसे तुका ॥३॥

1547 " तुझें नाम गाया न सोपें डवळा । गाऊं कळवळा प्रेमाचिया ॥१॥ येइल आवडी जैसी अंतरींची । तैसी मनाची कीर्ती गाऊं ॥२॥ माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥३॥ अबद्ध चांगलें गाऊं जैसें तैसें । बाहे बाळ जैसें मायबापा ॥४॥ तुका म्हणे मज न लावीं वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥५॥

1548 " तुझें नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥१॥ रसना येरां रसां विटे । घेतां घोट अधिक हें ॥ध्रु.॥ आणिकां रसें मरण गांठी । येणें तुटी संसारें ॥२॥ तुका म्हणे आहार जाला । हा विठ्ठला आम्हांसी ॥३॥

1549 " तुझें नाम पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥१॥ दाहां नये विसां नये । पंनासां साटां नये ॥ध्रु.॥ शां नये सहस्रा नये । लक्षकोडीलागीं नये ॥२॥ तुका म्हणे पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥३॥

1550 " तुझें नाम माझे मुखी असो देवा । विनवितों राघवा दास तुझा ॥१॥ तुझ्या नामबळें तरले पतित । म्हणोनि माझें चत्ति तुझे पायीं ॥२॥ तुका म्हणे तुझें नाम हें सादर । गातां निरंतर सुख वाटे ॥३॥

1551 " तुझें नाम मुखीं तयासी विपत्ति । आश्चर्य हें चत्तिीं वाटतसे ॥१॥ काय जाणों काय होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ध्रु.॥ भवबंधनाचे तुटतील फांसे । तें कां येथें असे अव्हेरिलें ॥२॥ तुका म्हणे माझें दचकलें मन । वाटे वांयांविण श्रम केला ॥३॥

1552 " तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा ते चि घडी झडो माझी ॥१॥ हें मज देई हें मज देई । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥ बहिर कान तुझी कीर्ती नाइकतां । पाय न देखतां जात डोळे ॥३॥ मना तुझें ध्यान नाहीं नित्य काळ । धिग तें चांडाळ जळो जळो ॥३॥ हातपाय तेणें पंथ न चलतां । जावे ते अनंता गळोनियां ॥४॥ तुजविण जिणें नाहीं मज चाड । तुका म्हणे गोड नाम तुझें ॥५॥

1553 " तुझें प्रेम माझ्या हृदयीं आवडी । चरण न सोडीं पांडुरंगा ॥१॥ कासया सिनासि थोरिवां कारणें । काय तुझें उणें होइल देवा ॥ध्रु.॥ चातकाची चिंता हरली जळधरें । काय त्याचें सरे थोरपण ॥२॥ चंद्र चकोरांचा पुरवी सोहळा । काय त्याची कळा न्यून होय ॥३॥ तुका म्हणे मज अनाथा सांभाळीं । हृदयकमळीं स्थिर राहें ॥४॥

1554 " तुझें म्हणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥१॥ परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥ समूळीं संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥२॥ लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥३॥ मृत्तिका पाषाण तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥४॥ तुका म्हणे जालों देहासी उदार । आणीक विचार काय तेथें ॥५॥

1555 " तुझें रूप पाहतां देवा । सुख जालें माझ्या जीवा ॥१॥ हें तों वाचे बोलवेना । काय सांगों नारायणा ॥ध्रु.॥ जन्मोजन्मींचे सुकृत । तुझे पायीं रमे चित्त ॥२॥ जरी योगाचा अभ्यास । तेव्हां तुझा निजध्यास ॥३॥ तुका म्हणे भक्त । गोड गाऊं हरिचें गीत ॥४॥

1556 " तुझें वर्म आम्हां कळों आलें सुखें । संतांचिया मुखें पांडुरंगा ॥१॥ अवघा चि नट वाउगा पसारा । चेईला तूं खरा तूं चि एक ॥ध्रु.॥ म्हणउनि देहबुद्धि नासिवंता । नातळे या चित्ता नेदावया ॥२॥ सोय हे लागली पुढिलांची वाट । पावले जे नीट तुजपाशीं ॥३॥ तुका म्हणे नाहीं कोणासवें काज । बोलायाचें मज अंतरींचें ॥४॥

1557 " तुझें वर्म हातीं । दिलें सांगोनियां संतीं ॥१॥ मुखीं नाम धरीन कंठीं । अवघा सांटवीन पोटीं ॥ध्रु.॥ नवविधा वेढिन आधीं । सांपडलासी भावसंधी ॥२॥ तुका म्हणे बळिये गाढे । कळिकाळ पायां पडे ॥३॥

1558 " तुझ्या नामाची आवडी । आम्ही विठो तुझीं वेडीं ॥१॥ आतां न वजों अणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु.॥ काय वैकुंठ बापुडें । तुझ्या प्रेमासुखापुढें ॥२॥ संतसमागममेळे । प्रेमसुखाचा सुकाळ ॥३॥ तुका म्हणे तुझ्या पायीं । जन्ममरणा ठाव नाहीं ॥४॥

1559 " तुझ्या रूपें माझी काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एका रूपें भिन्नत्व ॥१॥ सुख पडिलें साटवण सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन चारी मार्ग उगवले ॥ध्रु.॥ वसो डोळ्यांची बाहुली कवळे भिन्न छाया आली । कृष्णांजन चाली नव्हे प्रति माघारी ॥२॥ जीव ठसावला शिवें मना आलें तेथें जावें । फांटा पडिला नांवें तुका म्हणे खंडलें ॥३॥

1560 " तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरि लागे छंदु हरिनामें ॥१॥ येर कर्म धर्म करितां ये कळी । माजी तरला बळी कोण सांगा ॥ध्रु.॥ न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥२॥ न साधवे योग न करवे वैराग्य । साधा भक्तिभाग्य संतसंगें ॥३॥ नव्हे अनुष्ठान न कळे ब्रम्हज्ञान । करावी सोपान कृष्णकथा ॥४॥ तुका म्हणे वर्म दावियेलें संतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥५॥

1561 " तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हा चि मज ॥१॥ नवविधा काय बोलिली जे भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥ तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें । उत्तरेन खरें भवनदी ॥३॥

1562 " तुमची तों भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडी च बोली ब्रम्हज्ञान ॥१॥ आतां न बोलावें ऐसें वाटे देवा । संग न करावा कोणांसवें ॥ध्रु.॥ तुम्हां निमित्यासी सांपडले अंग । नेदावा हा संग विचारिलें ॥२॥ तुका म्हणे माझी राहिली वासना । आवडी दर्शनाची च होती ॥३॥

1563 " तुमचे स्तुतियोग्य कोटें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ भिक्तभाग्य तरी नेदीं तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असें ॥ध्रु.॥ कैचें भाग्य ऐसें पाविजे संनिध । नेणें पाळूं विध करुणा भाकीं ॥२॥ संतांचे सेवटीं उच्छिष्टाची आस । करूनियां वास पाहातसें ॥३॥ करीं इच्छा मज म्हणोत आपुलें । एखादिया बोलें निमित्याच्या ॥४॥ तुका म्हणे शरण आलों हें साधन । करितों चिंतन रात्रदिवस ॥५॥

1564 " तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलों विसरोन आपणासी ॥१॥ लागेल पालटें फेडावें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥ध्रु.॥ तुमचे आवडी संबंधाचा त्याग । घेतला ये लाग जगनिंदेचा ॥२॥ तुका म्हणे जैसा माझा जीव ओढे । तैसें च तिकडे पाहिजेल ॥३॥

1565 " तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥१॥ माझें घोंगडें टाकुन देई । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥ विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥२॥ तुका म्हणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥३॥

1566 " तुम्हां आम्हां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥१॥ उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ध्रु.॥ नेणपणें आम्ही आळवूं वोरसें । बोलवितों रसें शब्दरत्नें ॥२॥ तुका म्हणे लळे पाळीं वो विठ्ठले । कां हे उरविले भेदाभेद ॥३॥

1567 " तुम्हां आम्हां तुटी होईंल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे ॥१॥ वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ध्रु.॥ सारिलें संचित होतें गांठी कांहीं । पुढें ॠण तें ही नेदी कोणी ॥२॥ जावें चि न लगे कोणांचिया घरा । उडाला पातेरा तुझ्या संगें ॥३॥ तुका म्हणे आम्हां हा चि लाभ जाला । मनुष्यधर्म गेला पांडुरंगा ॥४॥

1568 " तुम्हां आम्हां सरी । येथें कईंच्या या परी ॥१॥ स्वामिसेवा अळंकार । नाहीं आवडिये थार ॥ध्रु.॥ खुंटलिया वाचा । मग हा आनंद कइचा ॥२॥ तुका म्हणे कोडें । आम्ही नाचों तुज पुढें ॥३॥

1569 " तुम्हां आम्हांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥१॥ किती म्हणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥ बोलिल्याची आतां हे चि परचित । भीड भार थीत बुडवील ॥२॥ तुका म्हणे आली रोकडी प्रचिती । झांकणें तें किती कोठें देवा ॥३॥

1570 " तुम्हां उद्धरणें फार । मज दुसरी नाहीं थार ॥१॥ आतां जैसें तैसें सोसा । काय करणें हृषीकेशा ॥ध्रु.॥ बरें न दिसेल ओळी । एका अन्न एका गाळी ॥२॥ लावितो आभार । तुका विखरलेती फार ॥३॥

1571 " तुम्हां न पडे वेच । माझा सरेल संकोच ॥१॥ फुकासाटीं जोडे यश । येथें कां करा आळस ॥ध्रु.॥ कृपेचें भुकेलें । होय जीवदान केलें ॥२॥ तुका म्हणे शिकविलें । माझें ऐकावें विठ्ठलें ॥३॥

1572 " तुम्हां सांगतों कलयुगा फळ । पुढें होइल ब्रम्हगोळ ॥१॥ आम्हां म्हणतील कंटक । ऐसा पाडिती दंडक ॥ध्रु.॥ स्त्रिया पूजुनि सरे देती । भलते स्त्रियेसि भलते जाती ॥२॥ श्रेष्ठ वर्ण वेदविद्वांस । अंगीकारी मद्यमांस ॥३॥ चारी वर्ण अठरा याती । कवळ करिती एक पंक्ती ॥४॥ म्हणती अंबेचा क्रीडाकल्लोळ । शिवरूप प्राणी सकळ ॥५॥ ऐसें होइल शकुन देतों । अगोदर सांगुन जातों ॥६॥ तुका सद्गुरुदास्य करी । सिद्धि पाणी वाहे घरीं ॥७॥

1573 " तुम्हांआम्हांसी दरुषण । जालें दुर्लभ भाषण ॥१॥ म्हणऊनि करितों आतां । दंडवत घ्या समस्तां ॥ध्रु.॥ भविष्याचें माथां देह । कोण जाणें होइल काय ॥२॥ म्हणे तुकयाचा बंधव । आमचा तो जाला भाव ॥३॥

1574 " तुम्हांसाटीं आम्हां आपुला विसर । करितां अव्हेर कैसें दिसे ॥१॥ विचाराजी आतां ठायीचें हे देवा । आम्हां नये हेवा वाढवितां ॥ध्रु.॥ आलों टाकोनियां सुखाची वसती । पुढें माझ्या युक्ति खुंटलिया ॥२॥ तुका म्हणे जाला सकळ वृत्तांत । केला प्रणिपात म्हणऊनि ॥३॥

1575 " तुम्हांसी न कळे सांगा काय एक । असया संकल्प वागवूं मी ॥१॥ आहे तेथें सत्ता ठेविलें स्थापूनि । प्रमाणें चि वाणी वदे आज्ञा ॥ध्रु.॥ कृपा जाली मग न लगे अंगसंग । निजध्यासें रंग चढता राहे ॥२॥ तुका म्हणे मागें बोलिलों तें वाव । आतां हा चि भाव दृढ झाला ॥३॥

1576 " तुम्हांसी हें अवघें ठावें । किती द्यावें स्मरण ॥१॥ कां बा तुम्ही ऐसें नेणें । निष्ठ‍पणें टाळित असां ॥ध्रु.॥ आळवितां मायबापा । नये कृपा अझूनि ॥२॥ तुका म्हणे जगदीशा । काय असां निजेले ॥३॥

1577 " तुम्ही आम्ही भले आतां । जालों चिंता काशाची॥१॥ आपुलाले आलों स्थळीं । मौन कळी वाढेना ॥ध्रु.॥ सहज जें मनीं होतें । तें उचितें घडलें ॥२॥ तुका म्हणे नसतें अंगा । येत संगा सारिखें ॥३॥

1578 " तुम्ही कांटाळलां तरी । आम्हां न सोडणें हरी ॥१॥ जावें कवणिया ठाया । सांगा विनवितों पायां ॥ध्रु.॥ केली जिवा साटी । आतां सुखें लागा पाठी ॥२॥ तुका म्हणे ठाव । न सोडणें हा चि भाव ॥३॥

1579 " तुम्ही तों सदैव । आधरपणें माझी हांव ॥१॥ जळो आशेचें तें जिणें । टोंकतसावें दीनपणें ॥ध्रु.॥ येथूनि सोडवा । आतां अनुभवेंसी देवा ॥२॥ तुका म्हणे जालें । एक मग हें निमालें ॥३॥

1580 " तुम्ही पाय संतीं । माझे ठेवियेले चित्ती ॥१॥ आतां बाधूं न सके काळ । जालीं विषम शीतळ ॥ध्रु.॥ भय नाहीं मनीं । देव वसे घरीं रानीं ॥२॥ तुका म्हणे भये । आतां स्वप्नीं ही नये ॥३॥

1581 " तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे । आम्हां कां हे डोळे कान दिले ॥१॥ नाइकवे तुझी अपकीर्ति देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥ध्रु.॥ आपुले पोटीं तों राखियेला वाव । आम्हांसी कां भाव अल्प दिला ॥२॥ तुका म्हणे दुःखी असें हें कळों द्या । पुढिलिया धंद्या मन नेघे ॥३॥

1582 " तुम्ही माझा देवा करिजे अंगीकार । हा नाहीं विचार मजपाशीं ॥१॥ आतां दोहीं पक्षीं लागलें लक्षणें । देवभक्तपण लाजविलें ॥ध्रु.॥ एकांतीं एकलें न राहे निश्चळि । न राहे च पळ मन ठायीं ॥२॥ पायीं महत्वाची पडिली शंकळा । बांधविला गळा स्नेहा हातीं ॥३॥ शरीर सोकलें देखिलिया सुखा । कदान्न हें मुखा मान्य नाहीं ॥४॥ तुका म्हणे जाला अवगुणांचा थारा । वाढली हे निद्रा अळस बहु ॥५॥

1583 " तुम्ही येथें पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥१॥ आतां काय पुढें वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥ध्रु.॥ देवाचें उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करूनि गेला ॥२॥ तुका म्हणे सेवा समर्पूनि पायीं । जालों उतराईं ठावें असो ॥३॥

1584 " तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥१॥ कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥ काय उणें तुम्हांपाशीं । मी तों अल्पें चि संतोषी ॥२॥ तुका म्हणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥३॥

1585 " तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणूं ॥१॥ अवतार तुम्हां धराया कारणें । उद्धरावें जन जड जीव ॥ध्रु.॥ वाढविलें सुख भक्ति भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुम्ही जगीं संतजन ॥३॥

1586 " तुम्ही संतजनीं । माझी करावी विनवणी ॥१॥ काय तुक्याचा अन्याय । त्यासी अंतरले पाय ॥ध्रु.॥ भाका बहुतां रीती । माझी कीव काकुलती ॥२॥ न देखे पंढरी । तुका चरण विटेवरी ॥३॥

1587 " तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृपावंत ॥१॥ एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥ध्रु.॥ भाकूनि करुणा । विनवा वैकुंठींचा राणा ॥२॥ तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥३॥

1588 " तुम्ही साधु संत कैवल्यसागर । मोक्षाचे आगर तुम्हां घरीं ॥१॥ तेथें मतिमंद काय बोलों वाणी । अमृताचे धणी पाणी कां घ्या ॥ध्रु.॥ कोटी भानु तेजीं खद्योत बापुडें । तैसा तुम्हांपुढें काय बोलों ॥२॥ तुम्ही अवघे चिंतामणि कल्पतरूचीं वनें । त्यापुढें धांवणें मषकांनीं ॥३॥ वाराणशीक्षेत्र गंगा वाहे कोड । का तेथें पाड कोकणाचे ॥४॥ पल्लवाचा वारा हिमकरीं काय । गगनावरी छाय कोण करी ॥५॥ समुद्राची तृषा हरी ऐसा कोण । जगाची जी तान्ह निववितो ॥६॥ मेरूचा पाठार अवघी ते क्षिति । मषकाचे हातीं मुष्टि फावे ॥७॥ सिंहापुढें काय जंबूक आरोळी । मोतियांचे वोळी कांच काय ॥८॥ कापुरासि काय लावूनि उटावें । काय ओवाळावें दीपकासि ॥९॥ तैशी तुम्ही निरे ज्ञानाचे भरींव । तेथें म्यां बोलावें पाड काय ॥१०॥ कृपानिधि तुम्हीं बोलविलें बोला । सुखें न्याय केला तुमचा मीं ॥११॥ अज्ञान मी वेडें म्हणवितों बाळ । माझा प्रतिपाळ करणें तुम्हां ॥१२॥ बोबडें बोलणें न धरावा कोप । क्षमा करा बाप कृपासिंधु ॥१३॥ तुका म्हणे तुम्ही संत बापमाय । भयें धरिले पाय कृपानिधि ॥१४॥

1589 " तुळसीवृंदावनीं उपजला कांदा । नावडे गोविंदा कांहीं केल्या ॥१॥ तैसे वंशामध्यें जाले जे मानव । जाणावे दानव अक्त ते ॥ध्रु.॥ केवड्यामधील निगपध कणसें । तैशीं तीं माणसें भक्तिहीन ॥२॥ तुका म्हणे जेवीं वंदनांतिल आळी । न चढे निढळीं देवाचिया ॥३॥

1590 " तू आम्हां सोयरा सज्जन सांगाति । तुजलागीं प्रीति चालो सदा ॥१॥ तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग । होसी अंतरंग अंतरींचा ॥ध्रु.॥ गण गोत मित्र तूं माझें जीवन । अनन्यशरण तुझ्या पांयीं ॥२॥ तुका म्हणे सर्वगुणें तुझा दास । आवडे अभ्यास सदा तुझा ॥३॥

1591 " तूं कृपाळू माउली आम्हां दीनांची साउली । न संरित आली बाळवेशें जवळी ॥१॥ माझें केलें समाधान रूप गोजिरें सगुण । निवविलें मन आलिंगन देऊनी ॥ध्रु.॥ कृपा केली जना हातीं पायीं ठाव दिला संतीं । कळों नये चित्तीं दुःख कैसें आहे तें ॥२॥ तुका म्हणे मी अन्यायी क्षमा करीं वो माझे आईं । आतां पुढें काईं तुज घालूं सांकडें ॥३॥

1592 " तूं पांढरा स्पटिक मणी । करिसी आणिकां त्याहुनि ॥१॥ म्हणोनि तुझ्या दारा । न येत ठकती दातारा ॥ध्रु.॥ तुझी ठावी नांदनूक । अवघा बुडविला लोक ॥२॥ तुका म्हणे ज्याचें घेसी । त्यास हें चि दाखविसी ॥३॥

1593 " तूं माउलीहून मयाळ चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ कल्लोळ प्रेमाचा ॥१॥ देऊं काशाची उपमा दुजी तुज पुरुषोत्तमा । ओंवाळूनि नामा तुझ्या वरूनि टाकिलों ॥ध्रु.॥ तुवां केलें रे अमृता गोड त्या ही तूं परता । पांचां तत्वांचा जनिता सकळ सत्तानायक ॥२॥ कांहीं न बोलोनि आतां उगा च चरणीं ठेवितों माथा । तुका म्हणे पंढरिनाथा क्षमा करीं अपराध ॥३॥

1594 " तूं माझा कोंवसा । परी न कळे या धसां ॥१॥ कूट खाती मागें पुढें । जाती नरयेगांवा पुढें ॥ध्रु.॥ माझी म्हणती कवी । निषेधुनि पापी जीवीं ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । आतां कोण लेखी जगा ॥३॥

1595 " तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूं चि माझें हित करिता देवा ॥१॥ तूं चि माझा देव तूं चि माझा जीव । तूं चि माझा भाव पांडुरंगा ॥ध्रु.॥ तूं चि माझा आचार तूंचि माझा विचार । तूं चि सर्व भार चालविसी ॥२॥ सर्व भावें मज तूं होसी प्रमाण । ऐसी तुझी आण वाहातुसें ॥३॥ तुका म्हणे तुज विकला जीवभाव । कळे तो उपाव करीं आतां ॥४॥

1596 " तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे ॥१॥ तूं मज येकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥ तुका म्हणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें ओस सर्व दिशा ॥३॥

1597 " तूं श्रीयेचा पति । माझी बहु हीन याती ॥१॥ दोघे असों एके ठायीं । माझा माथा तुझे पायीं ॥ध्रु.॥ माझ्या दीनपणां पार । नाहीं बहु तूं उदार ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । मी ओहोळ तूं गंगा ॥३॥

1598 " ते काय पवाडे नाहीं म्यां ऐकिले । गोपाळ रक्षिले वनांतरीं ॥१॥ मावेचा वोणवा होऊनि राक्षस । लागला वनास चहूंकडे ॥ध्रु.॥ गगनासी ज्वाळा लागती तुंबळ । गोधनें गोपाळ वेडावलीं ॥२॥ तुका म्हणे तेथें पळावया वाट । नाहीं वा निपट ऐसें जालें ॥३॥

1599 " ते चि करीं मात । जेणें होइल तुझें हित ॥१॥ काय बडबड अमित । सुख जिव्हारीं सिणविसी ॥ध्रु.॥ जो मुळव्याधी पीडिला । त्यासी देखोन हांसे खरजुला ॥२॥ आराथकरी सोसी । त्यासि हांसे तो आळसी ॥३॥ क्षयरोगी म्हणे परता । सर रोगिया तूं आतां ॥४॥ वडस दोहीं डोळां वाढले । आणिकां कानें कोंचें म्हणे ॥५॥ तुका म्हणे लागों पायां । शुद्ध करा आपणियां ॥६॥

1600 " तें च किती वारंवार । बोलों फार बोलिलें ॥१॥ आतां माझें दंडवत । तुमच्या संत चरणांसी ॥ध्रु.॥ आवडी ते नीच नवी । जाली जीवीं वसती ॥२॥ तुका म्हणे बरवें जालें । घरा आलें बंदरीचें ॥३॥

1601 " तेणें वेशें माझीं चोरिलीं अंगें । मानावया जग आत्मैपणे । नाहीं चाड भीड संसाराचें कोड । उदासीन सर्व गुणें । भय मोह लज्जा निरसली शंका । अवघियां एक चि पणें । विठ्ठलाच्या पायीं बैसोनि राहिलीं । भागलीं नुटित तेणें ॥१॥ आतां त्यांसीं काय चाले माझें बळ । जालोंसें दुर्बळ सत्वहीन । दग्ध पट दिसे संगति बरवंट । काय त्याचें कारण ॥ध्रु.॥ आळसें दृष्टी न पाहे आपुलें । एक चि देखिलें सर्वरूप । मानामान तेथें खुंटोनि राहिलें । पिसुन तो कोण बाप । ज्योति ना अंधार अवघा एकंकार । तेथें काय पुण्यपाप । विठ्ठलावांचुनि कांहीं च नावडे । वेगळाल्या भावें रूप ॥२॥ बळबडिवार लौकिक वेव्हार । गेली आशा तृष्णा माया । सुखदुःखाची वार्ता नाइके । अंतरलों दुरी तया । मीतूंपणनिःकाम होऊनि । राहिलों आपुलिया ठायां । तुजविण आतां मज नाहीं कोणी । तुका म्हणे देवराया ॥३॥

1602 " तेणें सुखें माझें निवालें अंग । विठ्ठल हें जग देखियेलें ॥१॥ कवतुकें करुणा भाकीतसें लाडें । आवडी बोबडें बोलोनियां ॥ध्रु.॥ मज नाहीं दशा अंतरीं दुःखाची । भावना भेदाची समूळ गेली ॥२॥ तुका म्हणे सुख जालें माझ्या जीवा । रंगलें केशवा तुझ्या रंगे ॥३॥

1603 " तेथें सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । पताका झळकती । गर्जती हरिनामें ॥१॥ दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारीं । नाहीं उरी परताया ॥ध्रु.॥ विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रूप धरिलें गोजिरें ॥२॥ पोट सेवितां न धाये । भूक भुकेली च राहे । तुका म्हणे पाहे । कोण आस या मुक्तीची ॥३॥

1604 " तेरा दिवस जाले नश्चिक्र करितां । न पवसी अनंता मायबापा ॥१॥ पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी जालें तुज ॥ध्रु.॥ तुजवरी आतां प्राण मी तजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥ फार विठाबाईं धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे आतां मांडिलें निर्वाण । प्राण हा सांडीन तुजवरी ॥४॥

1605 " तेव्हां धालें पोट बैसलों पंगती । आतां आम्हां मुक्तिपांग काईं ॥१॥ धांवा केला आतां होईंल धांवणे । तया कायी करणें लागे सध्या ॥ध्रु.॥ गायनाचा आतां कोठें उरला काळ । आनंदें सकळ भरी आलें ॥२॥ देवाच्या सख्यत्वें विषमासी ठाव । मध्यें कोठें वाव राहों सके ॥३॥ तेव्हां जाली अवघी बाधा वाताहात । प्रेम हृदयांत प्रवेशलें ॥४॥ तुका म्हणे आम्हीं जिंतिलें भरवसा । देव कोठें दासा मोकलितो ॥५॥

1606 " तेव्हां होतों भोगाधीन । तुम्हां भिन्न पासूनि ॥१॥ आतां बोलों नये ऐसें । आनारिसें वेगळें ॥ध्रु.॥ सन्मुख जालों स्वामीकडे । भव औठडे निराळे ॥२॥ चिंतिलें तें चिंतामणी । फिटे धणी तों द्यावें ॥३॥ सहज स्थित आहे अंगीं । प्रसंगीं ते वंचेना ॥४॥ तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥५॥ तुका म्हणे जाणोनि वर्म । कर्माकर्में ठेविलीं ॥६॥

1607 " तैसे नहों आम्ही विठ्ठलाचे दास । यावें आणिकांस काकुलती ॥१॥ स्वामिचिया सत्ता ठेंगणें सकळ । आला कळिकाळ हाताखालीं ॥ध्रु.॥ अंकिताचा असे अभिमान देवा । समर्पूनि हेवा असों पायीं ॥२॥ तुका म्हणे आम्हां इच्छेचें खेळणें । कोड नारायणें पुरवावें ॥३॥

1608 " तो चि प्रसंग आला सहज । गुज धरितां नव्हे काज । न संडितां लाज । पुढें वोज न दिसे ॥१॥ तूं तर न होसी शाहाणा । नये सांगतों तें ही मना । आपण आपणा । आतां प्रयत्न देखावा ॥ध्रु.॥ न पुरवी पाहातां वाट । द्यावें प्रमाण चोखट । कास घालूनियां नीट । चौघाचार करावा ॥२॥ आतां श्रमाचें कारण । नव्हे व्हावें उदासीन । न पडे तयाविण । गांठी तुकयाबंधु म्हणे ॥३॥

1609 " तो चि लटिक्यामाजी भला । म्हणे देव म्यां देखिला ॥१॥ ऐशियाच्या उपदेशें । भवबंधन कैसें नासे । बुडवी आपणासरिसे । अभिमानें आणिकांस ॥ध्रु.॥ आणिक नाहीं जोडा । देव म्हणवितां या मूढा ॥२॥ आणिकांचे न मनी साचें । तुका म्हणे या श्रेष्ठांचें ॥३॥

1610 " तो बोले कोमळ निष्ठ‍ साहोनि । कोपतां गौळणी हास्य करी ॥१॥ करावया दास्य भक्तांचें निर्लज्ज । कवतुकें रज माथां वंदी ॥२॥ दिलें उग्रसेना मथुरेचें राज्य । सांगितलें काज करी त्याचें ॥३॥ त्यासि होतां कांहीं अरिष्टनिर्माण । निवारी आपण शरणागता ॥४॥ शरणागतां राखे सर्व भावें हरि । अवतार धरी तयांसाटीं ॥५॥ तयांसाटीं वाहे सुदर्शन गदा । उभा आहे सदा सांभाळित ॥६॥ तळमळ नाहीं तुका म्हणे चत्तिा । भक्तांचा अनंता भार माथां ॥७॥

1611 " तो या साच भावें न कळे चि इंद्रा । म्हणउनि धारा घाली सिळा ॥१॥ घाली धारा मेघ कडाडिला माथा । वरि अवचिता देखियेला ॥२॥ देखती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥३॥ विचार पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ म्हणती केला ॥४॥ लागलेंसे गोड न कळे ते काळीं । भेणें वनमाळी आठविती ॥५॥ आतां कायकैसा करावा विचार । गोधनासि थार आपणिया ॥६॥ यांचिया विचारें होणार ते काईं । तुका म्हणे ठायीं वेडावलीं ॥७॥

1612 " तों च हीं क्षुल्लकें सखीं सहोदरें । नाहीं विश्वंभरें वोळखी तों ॥१॥ नारायण विश्वंभर विश्वपिता । प्रमाण तो होतां सकळ मिथ्या ॥ध्रु.॥ रवि नुगवे तों दीपिकाचें काज । प्रकाशें तें तेज सहज लोपे ॥२॥ तुका म्हणे देहसंबंध संचितें । कारण निरुतें नारायणीं ॥३॥

1613 " तोंडें खाये फार । पादे बोचा करी मार ॥१॥ एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन तें नेणें ॥ध्रु.॥ कुले घालूनि उघडे । रागें पाहे लोकांकडे ॥२॥ खेळे जुतकर्म । मग बोंबली जुलूम ॥३॥ निजतां आला मोहो । वीतां म्हणे मेला गोहो ॥४॥ तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥५॥

1614 " तोंडें बोलावें तें तरी वाटे खरें । जीव येरेयेरें वंचिजे ना ॥१॥ हें तुम्हां सांगणें काय उगवूनि । जावें समजोनि पांडुरंगा ॥ध्रु.॥ जेवित्याची खूण वाढित्या अंतरीं । प्रीतीनें हे धरी चाली तेथें ॥२॥ तुका म्हणे बहु परीचे आदर । अत्यंत वेव्हारसंपादणी ॥३॥

1615 " तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥१॥ तोंवरि तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राम्हणा देखिलें नाहीं ॥ध्रु.॥ तोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥२॥ तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाईंचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ॥३॥ तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं ॥४॥

1616 " तोंवरि तोंवरि शोभतील गारा । जंव नाहीं हिरा प्रकाशला ॥१॥ तोंवरि तोंवरि शोभतील दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥२॥ तोंवरि तोंवरि सांगती संताचिया गोष्टी । जंव नाहीं भेटी तुक्यासवें ॥३॥

1617 " तोंवरी म्यां त्यास कैसें निषेधावें । जों नाहीं बरवें कळों आलें ॥१॥ कोणाचिया मुखें तट नाहीं मागें । वचन वाउगें बोलों नये ॥ध्रु.॥ दिसे हानि परी निरास न घडे । हे तंव रोकडे अनुभव ॥२॥ आपुलिया भोगें होईंल उशीर । तोंवरी कां धीर केला नाहीं ॥३॥ तुका म्हणे गोड करील सेवट । पाहिली ते वाट ठायीं आहे ॥४॥

1618 " तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥१॥ कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काईं ॥ध्रु.॥ धान्यें बीजें जेणें जाळिलीं सकळें । पेरितो काळें जिरें बीज ॥२॥ मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेउनि लोकां ॥३॥ विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रम्हहत्या ॥४॥ तुका म्हणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥५॥

1619 " त्या हरिदासांची भेटी घेतां । नकाऩ उभयतासी जातां ॥१॥ माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥ध्रु.॥ देतां घेतां नरकवासी । उभयतांसी रवरव ॥२॥ तुका म्हणे नरकगांवा । जाती हांवा धरोनि ॥३॥

1620 " त्यांचिया चरणां माझें दंडवत । ज्यांचें धनवित्त पांडुरंग ॥१॥ येथें माझा जीव पावला विसांवा । म्हणऊनि हांवा भरलासें ॥ध्रु.॥ चरणींचें रज लावीन कपाळा । जीं पदें राउळा सोईं जाती ॥२॥ आणिक तीं भाग्यें येथें कुरवंडी । करूनियां सांडीं इंद्राऐसी ॥३॥ वैष्णवांचे घरीं देवाची वसति । विश्वास हा चित्तीं सत्यभावें ॥३॥ तुका म्हणे सखे हरिचे ते दास । आतां पुढें आस नाहीं दुजें ॥५॥

1621 " त्यांसि राखे बळें आपुले जे दास । कळिकाळासि वास पाहों नेदी ।१॥ पाउस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग ॥२॥ येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारीं शिळाचिये ॥३॥ शळिांचिये धारीं वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥४॥ एक सरें गिरि धरिला गोपाळीं । होतों भाव बळी आम्ही ऐसे ॥५॥ ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । म्हणे तुम्हीं आतां हात सोडा ॥६॥ हांसती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥७॥ दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥८॥ भार आम्हांवरि घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥९॥ निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहों कैसा गिरी धरितोसि ॥१०॥ सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकें चि खरें मानुनियां ॥११॥ यांणीं अंत पाहों आदरिला याचा । तुका म्हणे वाचा वाचाळ ते ॥१२॥

1622 " त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ॥१॥ मग जैसा तैसा राहें । काय पाहें उरलें तें ॥ध्रु.॥ अंतरींचें विषम गाढें । येऊं पुढें नेदावें ॥२॥ तुका म्हणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ॥३॥

1623 " त्यागें भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करूं ॥१॥ आतां असो तुझे पायीं हें मोटळें । इंद्रियें सकळें काया मन ॥ध्रु.॥ सांडीमांडी विधिनिषेधाचा ठाव । न कळतां भाव जाइल वांयां ॥२॥ तुका म्हणे आतां नको उजगरा । लपवीं दातारा अंगीं मज ॥३॥

1624 " त्रासला हा जीव संसारींच्या सुखा । तुजविण सखा नाहीं कोणी ॥१॥ ऐसें माझें मनीं वाटे नारायणा । घालावी चरणावरि मिठी ॥ध्रु.॥ कइं तें सुंदर देखोनि रूपडें । आवडीच्या कोडें आळंगीन ॥२॥ नाहीं पूर्व पुण्य मज पापरासी । म्हणोनि पायांसी अंतरलों ॥३॥ अलभ्य लाभ कैंचा संचितावेगळा । विनवी गोपाळा दास तुका ॥४॥

1625 " त्राहे त्राहे सोडवीं अनंता । लागों दे ममता तुझे पायीं॥१॥ एक चि मागणें देई तुझी गोडी । न लगे आवडी आणिकाची ॥ध्रु.॥ तुझें नाम गुण वर्णीन पवाडे । आवडीच्या कोडें नाचों रंगीं ॥२॥ बापा विठ्ठलराया हें चि देई दान । जोडती चरण जेणें तुझे ॥३॥ आवडीसारखें मागितलें जरी । तुका म्हणे करीं समाधान ॥४॥

1626 " त्रिपुटीच्या योगें । कांहीं नव्हे कोणां जोगें । एक जातां लागें । एक पाठीं लागतें ॥१॥ मागें पुढें अवघा काळ । पळों नये न चले बळ । करितां कोल्हाळ । कृपे खांदां हरि वाहे ॥ध्रु.॥ पापपुण्यात्मयाच्या शक्ति । असती योजिल्या श्रीपती । यावें काकुलती । तेथें सत्तानायेका ॥२॥ तुका उभा पैल थडी । तरि हे प्रकाश निवडी । घातल्या सांगडी । तापे पेटीं हाकारी ॥३॥

1627 " त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविला॥१॥ आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख गौरव संतां अंगीं ॥ध्रु.॥ हिशेबें आलें तें सकळांसी प्रमाण । तेथें नाही आन चालों येत ॥२॥ तुका म्हणे नाहीं पापपुण्य खतीं । झाड्याची हुजती हातां आली ॥३॥

1628 " त्रुशाकाळें उदकें भेटी । पडे मिठी आवडीची ॥१॥ ऐसियाचा हो कां संग । जिवलग संतांचा ॥ध्रु.॥ मिष्टान्नाचा योग भुके । म्हणतां चुके पुरेसें ॥२॥ तुका म्हणे माते बाळा । कळवळा भेटीचा ॥३॥

1629 " त्रैलोकींचा नाथ सकळांचा आधार । बळिचें तुवां घर धरियेलें ॥१॥ आम्हां मोकलिलें कोणां निरविलें । कोणा हातीं दिले तिन्ही लोक ॥ध्रु.॥ अनाथांचा बंधु दासांचा कैवारी । ब्रिदें तुझीं हरी जाती वांयां ॥२॥ तुका म्हणे ऐसें बोलिला दुर्वास । वाटला संतोष पांडुरंगा ॥३॥

1630 " थडियेसी निघतां पाषाणांच्या सांगडी । बुडतां मध्यभागीं तेथें कोण घाली उडी ॥१॥ न करी रे तैसें आपआपणा । पतंग जाय वांयां जीवें ज्योती घालूनियां ॥ध्रु.॥ सावधपणें सोमवल वाटी भरोनियां प्याला । मरणा अंतीं वैद्य बोलावितो गहिला ॥२॥ तुकाम्हणे करीं ठायींचा चि विचार । जंवें नाहीं पातला यमाचा किंकर ॥३॥

1631 " थुंकोनियां मान । दंभ करितों कीर्तन ॥१॥ जालों उदासीन देहीं । एकाविण चाड नाहीं ॥ध्रु.॥ अर्थ अनर्थ सारिखा । करूनि ठेविला पारिखा ॥२॥ उपाधिवेगळा । तुका राहिला सोंवळा ॥३॥

1632 " थोडे तुम्ही मागें होती उद्धरिले । मज ऐसे गेले वांयां जीव ॥१॥ आतां याचा काहीं न मनावा भार । कृपेचा सागर आहेसी तूं ॥ध्रु.॥ तुज आळवितां पापाची वसति । राहे अंगीं किती बळ त्याचें ॥२॥ तुका म्हणे उदकीं तारिले दगड । तैसा मी ही जड एक देवा ॥३॥

1633 " थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्ती क्षोभविलें ॥१॥ भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ध्रु.॥ अवघें घालूनियां कोडें तानभुकेचें सांकडें । योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥२॥ उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका म्हणे ब्रीद साच केलें आपुलें ॥३॥

1634 " थोर ती गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥१॥ व्यर्थ भराभर केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ध्रु.॥ घोडें काय थोडें वागवितें ओझें । भावेंविण तैसें पाठांतर ॥२॥ तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो॥३॥

1635 " दंड अन्यायाच्या माथां । देखोनि करावा सर्वथा ॥१॥ नये उगे बहुतां घाटूं । सिसें सोनियांत आटूं ॥ध्रु.॥ पापुण्यासाठीं । नीत केली सत्ता खोटी ॥२॥ तुका म्हणे देवा । दोष कोणाचा तो दावा ॥३॥

1636 " दगडाच्या देवा बगाड नवस । बाईंल कथेस जाऊं नेदी ॥१॥ वेची धनरासी बांधलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी ॥ध्रु.॥ चोरें नागविला न करी त्याची खंती । परी द्विजा हातीं नेदी रुका ॥२॥ करी पाहुणेर विव्हाया जावयासी । आल्या अतीतासी पाठमोरा ॥३॥ तुका म्हणे जळो धिग त्याचें जिणें । भार वाही सीण वर्म नेणे ॥४॥

1637 " दधिमाझी लोणी जाणती सकळ । तें काढी निराळें जाणे मथन ॥१॥ अिग्न काष्ठामाजी ऐसें जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥ध्रु.॥ तुका म्हणे मुख मळीण दर्पणीं । उजळिल्यावांचूनि कैसें भासे ॥२॥

1638 " दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥१॥ पावे धांवोनियां घरा । राहे धरोनियां थारा ॥ध्रु.॥ कीर्तनाचे वाटे । बराडिया ऐसा लोटे ॥२॥ तुका म्हणे घडे । पूजा नामें देव जोडे ॥३॥

1639 " दर्दुराचें पिलुं म्हणे रामराम । नाहीं उदक उष्ण होऊं दिलें ॥१॥ कढेमाजी बाळ करी तळमळ । गोविंद गोपाळ पावें वेगीं ॥ध्रु.॥ आज्ञा तये काळीं केली पावकासी । झणी पिलीयासी तापवीसी ॥२॥ तुका म्हणे तुझे ऐसे हे पवाडे । वणिऩतां निवाडे सुख वाटे ॥३॥

1640 " दर्पणासी बुजे । नखटें तोंड पळवी लाजे ॥१॥ गुण ज्याचे जो अंतरीं । तो चि त्यासी पीडा करी ॥ध्रु.॥ चोरा रुचे निशी । देखोनियां विटे शशी ॥२॥ तुका म्हणे जन । देवा असे भाग्यहीन ॥३॥

1641 " दर्शनाचें आर्त जीवा । बहु देवा राहिलें ॥१॥ आतां जाणसी तें करीं । विश्वंभरीं काय उणें ॥ध्रु.॥ येथें जरी उरे चिंता । कोण दाता याहूनी ॥२॥ तुका म्हणे जाणवलें । आम्हां भलें एवढेंच॥३॥

1642 " दसरा दिवाळी तो चि आम्हां सन । सखे संतजन भेटतील ॥१॥ आमुप जोडल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी न दिसे आतां ॥ध्रु.॥ धन्य दिवस आजि जाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥२॥ तुका म्हणे काय होऊं उतराई । जीव ठेऊं पांयीं संतांचिये ॥३॥

1643 " दह्यांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये ॥१॥ आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥ध्रु.॥ पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी समसाटी करूं नये ॥२॥ तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजूं नये ॥३॥

1644 " दाखवूनि आस । केला बहुतांचा नास ॥१॥ थोंटा झोडा शिरोमणी । भेटलासी नागवणी ॥ध्रु.॥ सुखाचें उत्तर । नाहीं मुदलासी थार ॥२॥ तुका म्हणे काय । तुझे घ्यावें उरे हाय ॥३॥

1645 " दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टि वरी ॥१॥ तेणें सुखें छंदें घेईंन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्यां ॥ध्रु.॥ तुझ्या मोहें पडो मागील विसर । आलापें सुस्वर करिन कंठ ॥२॥ तुका म्हणे येथें पाहिजे सौरस । तुम्हांविण रस गोड नव्हे॥३॥

1646 " दाढी डोई मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरति बरवें वस्त्र काळें ॥१॥ उफराटी काठी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रासी॥२॥ चाळवुनी रांडा देउनियां भेष । तुका म्हणे त्यास यम दंडी ॥३॥

1647 " दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥१॥ आणीक नासिवंतें काय । न सरे हाय ज्यांच्यानें ॥ध्रु.॥ यावें तयां काकुलती । जे दाविती सुपंथ ॥२॥ तुका म्हणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥३॥ अलंकापुरीं ब्राम्हण धरणें बसून बेताळीस दिवस उपवासी होता त्यास द्दष्टांत कीं देहूस तुकोबापाशी जाणें. ब्राम्हण स्वामीपें आला त्याबद्दल अभंग ॥ ३१ ॥

1648 " दामाजीपंताची रसद गुदरली । लज्जा सांभाळिली देवरायें ॥१॥ तयाचें चरित्र परिसा हो सादरें । करितों नमस्कार संतजना ॥ध्रु.॥ मंगळवेढा असे विस्त कुटुंबेंसी । व्यापारी सर्वांसी मान्य सदा ॥२॥ कर्म काय करी ठाणाचा हवाला । तों कांहीं पडला कठिण काळ ॥३॥ धान्याचीं भांडारें होतीं तीं फोडिलीं । पंढरी रक्षिली दुष्काळांत ॥४॥ दुबळें अनाथ तें हि वांचविलें । राष्टधांत ते जाली कीर्ति मोठी ॥५॥ मुजुम करीत होता कानडा ब्राम्हण । फिर्याद लिहून पाठविली ॥६॥ अविंदाचें राज्य बेदरीं असतां । कागद पाहतां तलब केली ॥७ ॥ दामाजीपंतासी धरोनि चालविलें । इकडे या विठ्ठलें माव केली ॥८॥ विकते धारणे सवाईंचें मोल । धान्याचें सकळ द्रव्य केलें ॥९॥ दामाजीपंताच्या नांवें अर्जदास्त । लिहून खलेती मुद्रा केली ॥१०॥ विठो पाडेवार भक्तां साहए जाला । वेदरासी गेला रायापासीं ॥११॥ जोहार मायबाप पुसती कोठील । तंव तो म्हणे स्थळ मंगळवेढें ॥१२॥ दामाजीपंतांनीं रसद पाठविली । खलेती ओतिली अर्जदास्त ॥१३॥ देखोनियां राजा संतोष पावला । म्हणे व्यर्थ त्याला तलब केली ॥१४॥ काय तुझें नांव पुसती यंत्रधारी । तो म्हणे बेगारी विठा कां जी ॥१५॥ पावल्याचा जाब द्यावा मायबाप । करोनि घेतों माप म्हणती ते ॥१६॥ पावल्याचा जाब दिधला लिहून । तसरीफ देऊन पाठविला ॥१७॥ छत्री घोडा शिबिका आभरणांसहित । दिला सवें दूत पाठवूनि ॥१८॥ वाटे चुकामुक जाली याची त्यांची । ते आले तैसे चि मंगळवेढा ॥१९॥ दामाजीपंतासी बेदरासी नेलें । राजा म्हणे जालें कवतुक ॥२०॥ काल गेला विठा बेगारी देऊन । तसरीफ देऊन जाब दिला ॥२१॥ काय तुमचें काज बोला जी सत्वर । बोलाजी निर्धार वचनाचा ॥२२॥ कैंचा विठा कोण पाठविला कधीं । काढोनियां आधीं जाब दिला ॥२३॥ पहातां चि जाब हृदय फुटलें । नयन निडारले राजा देखे ॥२४॥ सावळें सकुमार रूप मनोहर । माथां तेणें भार वाहियेला ॥२५॥ दामाजीपंतासी रायें सन्मानिलें । तो म्हणे आपुलें कर्म नव्हे ॥२६॥ आतां तुमची सेवा पुरे जी स्वामिया । शिणविलें सखया विठोबासी ॥२७॥ निरोप घेऊनि आला स्वस्थळासी । उदास सर्वासीं होता जाला ॥२८॥ दामाजीपंतांनीं सेविली पंढरी । ऐसा त्याचा हरि निकटवृत्ति ॥२९॥ तुका म्हणे विठो अनाथ कैवारी । नुपेक्षी हा हरि दासालागीं ॥३०॥

1649 " दारिद्रानें विप्र पीडिला अपार । तया पोटीं पोर एक असे ॥१॥ बाहेरी मिष्टान्न मिळे एके दिशीं । घेऊनी छंदासि त्या चि बैसे ॥ध्रु.॥ क्षुधाकाळीं रडे देखिलें तें मागे । कांहीं केल्या नेघे दुजें कांहीं ॥२॥ सहज कौतुकें बोले बापमाये । देवापाशीं आहे मागशी तें ॥३॥ तेव्हां तुजलागीं स्मरे नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥४॥ लागली हे क्षुधा जात असे प्राण । काय हें निर्वाण पाहातोसि ॥५॥ ब्रम्हांडनायक विश्वाचा पाळक । वरी तिन्ही लोक पोसितोसि ॥६॥ प्राण हा उत्कर्ष जाहला विव्हळ । तेव्हां तो कृपाळ धांव घाली ॥७॥ सांडूनि वैकुंठ धांव घाली तई । आळंगिला बाहीं कृपावंतें ॥८॥ तुका म्हणे दिला क्षीराचा सागर । राहे निरंतर तयापासीं ॥९॥

1650 " दारीं परोवरी । कुडीं कवाडीं मी घरीं ॥१॥ तुमच्या लागलों पोषणा । अवघे ठायीं नारायणा ॥ध्रु.॥ नेदीं खाऊं जेवूं । हातींतोंडींचें ही घेऊं ॥२॥ तुका म्हणे अंगीं । जडलों ठायींचा सलगी ॥३॥

1651 " दावी वर्म सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥ मान देती आधीं मागतील डाव । देवा तें गौरव माने सुख ॥२॥ मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरि स्नान तेणें ॥३॥ वस्त्रें घोंगडिया घालुनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥४॥ तिंहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना वळतियां ॥५॥ यांच्या वचनाचीं पुष्पें वाहे शिरीं । नैवेद्य त्यांकरीं कवळ मागे ॥६॥ त्यांचिये मुखींचें हिरोनियां घ्यावें । उच्छष्टि तें खावें धणीवरी ॥७॥ वरी माथां गुंफे मोरपिसांवेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदें ॥८॥ छंदें नाचतील जयासवें हरी । देहभाव वरी विसरलीं ॥९॥ विसरली वरी देहाची भावना । ते चि नारायणा सर्वपूजा ॥१०॥ पूजा भाविकांची न कळतां घ्यावी । न मागतां दावी निज ठाव ॥११॥ ठाव पावावया हिंडे मागें मागें । तुका म्हणे संगें भक्तांचिया ॥१२॥

1652 " दावूनियां कोणां कांहीं । ते चि वाहीं चाळविलीं ॥१॥ तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥ रिद्धिसिद्धी ऐसे आड । येती नाड नागवूं ॥२॥ उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळईं ॥३॥ दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥४॥ तुका म्हणे पायांसाटीं । करीं आटी कळों द्या ॥५॥

1653 " दावूनियां बंड । पुरे न करी तें भांड ॥१॥ जळो जळो तैसें जिणें । फटमरे लाजिरवाणें ॥ध्रु.॥ घेतलें तें सोंग । बरवें संपादावें सांग ॥२॥ तुका म्हणे धीरें । देवें नुपेक्षिलें खरें ॥३॥

1654 " दास जालों हरिदासांचा । बुद्धिकायामनेंवाचा ॥१॥ तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंगकल्लोळ । नासे दुष्टबुद्धि सकळ । समाधि हरिकीर्त्तनीं ॥ध्रु.॥ ऐकतां हरिकथा । भक्ति लागे त्या अभक्तां ॥२॥ देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ॥३॥ हें सुख ब्रम्हादिकां । म्हणे नाहीं नाहीं तुका ॥४॥

1655 " दासां सर्व काळ । तेथें सुखाचे कल्लोळ ॥१॥ जेथें वसती हरिदास । पुण्य पिके पापा नास ॥ध्रु.॥ फिरे सुदर्शन । घेऊनियां नारायण ॥२॥ तुका म्हणे घरीं । होय म्हणियारा कामारी ॥३॥

1656 " दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नर्का द्वारीं ॥१॥ ऐसे सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥ध्रु.॥ बरें विचारूनी पाहें । तुज अंतीं कोण आहे ॥२॥ तुका म्हणे रांडलेंका । अंतीं जासिल यमलोका ॥३॥

1657 " दासों पाछें दौरे राम । सोवे खडा आपें मुकाम ॥१॥ प्रेमरसडी बांधी गळे । खैंच चले उधर ॥ध्रु.॥ आपणे जनसु भुल न देवे । कर हि धर आघें बाट बसावे ॥२॥ तुका प्रभु दीनदयाला । वारि रे तुज पर हुं गोपाला ॥३॥

1658 " दिक चि या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥१॥ तांतडींत करीं म्हणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥ध्रु.॥ संकल्पाच्या बीजें इंद्रियांची चाली । प्रारब्ध तें घाली गर्भवासीं ॥२॥ तुका म्हणे बीजें जाळुनी सकळ । करावा गोपाळ आपुला तो ॥३॥

1659 " दिनदिन शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥१॥ कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥ विसरला मरण । त्याची नाहीं आठवण ॥२॥ देखत देखत पाहीं । तुका म्हणे आठव नाहीं ॥३॥

1660 " दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥१॥ हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये पराकृत म्हणों यासि ॥२॥ यासि कळावया एक भक्तिभाव । दुजा नाहीं ठाव धांडोळितां ॥३॥ धांडोळितां श्रुति राहिल्या निश्चित । तो करी संकेत गोपींसवें ॥४॥ गोपिकांची वाट पाहे द्रुमातळीं । मागुता न्याहाळी न देखतां ॥५॥ न देखतां त्यांसि उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळां ॥६॥ वेळोवेळां पंथ पाहे गोपिकांचा । तुका म्हणे वाचा नातुडे तो ॥७॥

1661 " दिला जीवभाव । तेव्हां सांडिला म्यां ठाव ॥१॥ आतां वर्ते तुझी सत्ता । येथें सकळ अनंता ॥ध्रु.॥ माझीया मरणें । तुम्ही बैसविलें ठाणें ॥२॥ तुका म्हणे काई । मी हें माझें येथें नाहीं ॥३॥

1662 " दिली चाले वाचा । क्षय मागिल्या तपाचा ॥१॥ रिद्धि सिद्धि येती घरा । त्याचा करिती पसारा ॥ध्रु.॥ मानदंभांसाटीं । पडे देवासवें तुटी ॥२॥ तुका म्हणे मेवा । कैचा वेठीच्या नदवां ॥३॥

1663 " दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥१॥ समर्थासी असे विचाराची आण । भलीं पापपुण्य विचारावें ॥ध्रु.॥ काकुळतीसाटीं सत्याचा विसर । पडिलें अंतर न पाहिजे ॥२॥ तुका म्हणे यश कीर्ति आणि मान । करितां जतन देव जोडे ॥३॥

1664 " दिली हाक मनें नव्हे ती जतन । वेंटाळिल्या गुणें धांव घेती ॥१॥ काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा द्वेष फार माया तृष्णा ॥ध्रु.॥ इंद्रियांचे भार फिरतील चोर । खान घ्यावया घर फोडूं पाहे ॥२॥ माझा येथें कांहीं न चले पराक्रम । आहे त्याचें वर्म तुझे हातीं ॥३॥ तुका म्हणे आतां करितों उपाय । जेणें तुझे पाय आतुडती ॥४॥

1665 " दिवसा व्यापारचावटी । रात्री कुटुंबचिंता मोटी ॥१॥ काय करूं या मनासी । नाठवे हृषीकेशी ॥ध्रु.॥ वेश्येपाशीं रात्रीं जागे । हरिकीर्त्तनीं निद्रा लागे ॥२॥ तुका म्हणे काय जालासी । वृथा संसारा आलासी ॥३॥

1666 " दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरिकथा ॥१॥ तारूं भवसागरींचें । उंचनीच अधिकार ॥ध्रु.॥ चरित्र तें उच्चारावें । केलें देवें गोकुळीं ॥२॥ तुका म्हणे आवडी धरीं । कृपा करी म्हणऊनी ॥३॥

1667 " दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥१॥ उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥ध्रु.॥ जाणतियाहूनि नेणत्याची गोडी । आळिंगी आवडी करूनियां ॥२॥ शीण घेऊनियां प्रेम देतो साटी । न विचारी तुटी लाभा कांहीं ॥३॥ तुका म्हणे असों अनाथ दुबळीं । आम्हांसी तो पाळी पांडुरंग ॥४॥

1668 " दुःखाची संगति । तिच्याठायीं कोण प्रीति ॥१॥ अवघें असो हें निराळें । करूं सोइरें सावळें ॥ध्रु.॥ क्षणभंगुर ते ठाव । करूनि सांडावे चि वाव ॥२॥ तुका म्हणे बरा । ठाव पावलों हा थारा ॥३॥

1669 " दुःखी होती लोभें करावें तें काईं । उडतील गाईं म्हैसी आतां ॥१॥ आणीकही कांहीं होईंल अरष्टि । नायिके हा धीट सांगितलें ॥२॥ सांगों चला याच्या मायबापांपाशीं । निघाले घरासि देवा रागें ॥३॥ रागें काला देतां न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियांसि ॥४॥ क्रोध देवावरि धरियेला राग । तुका म्हणे भाग न लभती ॥५॥

1670 " दुःखें दुभागलें हृदयसंपुष्ट । गहिंवरें कंठ दाटताहे ॥१॥ ऐसें काय केलें सुमित्रा सखया । दिलें टाकोनियां वनामाजी ॥ध्रु.॥ आक्रंदती बाळें करुणावचनीं । त्या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥२॥ काय हे सामर्थ्य नव्हतें तुजपाशीं । संगें न्यावयासी अंगभूतां ॥३॥ तुज ठावें आम्हां कोणी नाहीं सखा । उभयलोकीं तुका तुजविण ॥४॥ कान्हा म्हणे तुझ्या वियोगें पोरटीं । जालों दे रे भेटी बंधुराया ॥५॥

1671 " दुखवलें चत्ति आजिच्या प्रसंगें । बहु पीडा जगें केली देवा ॥१॥ कधीं हा संबंध तोडिसी तें नेणें । आठवूनि मनें पाय असें ॥ध्रु.॥ आणिकांची येती अंतरा अंतरें । सुखदुःख बरेंवाइट तीं ॥२॥ तुका म्हणे घडे एकांताचा वास । तरिच या नास संबंधाचा ॥३॥

1672 " दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥१॥ ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं तैशापरी ॥ध्रु.॥ आवंतण्याची आस । जैसी लागे दुर्बळासी ॥२॥ लोभ्या कळांतराची आस । बोटें मोजी दिवस मास ॥३॥ तुका म्हणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥४॥

1673 " दुद दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥१॥ हें चि वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥ लोहो कफ गारा अग्नीचिया काजें । येर्‍हवी तें ओझें कोण वाहे ॥२॥ तुका म्हणे खोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥३॥

1674 " दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥१॥ तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ध्रु.॥ काय करावीं तें बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां गेलीं ॥२॥ तुका म्हणे अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैशी सवें श्वगॉ ॥३॥

1675 " दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥ कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥ मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राम्हणाचे लीळे वर्तूं नेणे ॥२॥ जरी तो ब्राम्हण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥३॥

1676 " दुबळें सदैवा । म्हणे नागवेल केव्हां ॥१॥ आपणासारिखें त्या पाहे । स्वभावासी करिल काये ॥ध्रु.॥ मूढ सभे आंत । इच्छी पंडिताचा घात ॥२॥ गांढें देखुनि शूरा । उगें करितें बुरबुरा ॥३॥ आणिकांचा हेवा । न करीं शरण जाई देवा ॥४॥ तुका म्हणे किती । करूं दुष्टाची फजिती ॥५॥

1677 " दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥१॥ लात हाणोनियां वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥ध्रु.॥ बहुतां पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥२॥ तुका म्हणे नखें । काढुनि टाकिजेती सुखें ॥३॥

1678 " दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती ॥१॥ त्याची बुद्धि त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥ध्रु.॥ पाहें संतांकडे । दोषदृष्टी सांडी भडे ॥२॥ उंच निंच नाहीं । तुका म्हणे खळा कांहीं ॥३॥

1679 " दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी ॥१॥ पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥ध्रु.॥ न म्हणे रामराम । मनें वाचे हें चि काम ॥२॥ तुका म्हणे भागा । आली निंदा करी मागा ॥३॥

1680 " दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नर्काचा कोथळ सांटवण ॥१॥ खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥ध्रु.॥ सर्पा मंत्र चाले धरावया हातीं । खळाची ते जाती निखळे चि ॥२॥ तुका म्हणे कांहीं न साहे उपमा । आणीक अधमा वोखट्याची ॥३॥

1681 " दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धि । सदैवा समाधि विश्वरूपीं ॥१॥ काय त्याचें वांयां गेलें तें एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥ध्रु.॥ तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिलें ॥२॥ तुका म्हणे एक वाहाती मोळिया । भाग्यें आगळिया घरा येती ॥३॥

1682 " दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी ॥१॥ तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणां तुम्ही आतां ॥ध्रु.॥ खातां लेतां नये मिरवितां वरि । राजा दंड करी जनराग ॥२॥ तुका म्हणे मग तळमळ उरे । देखिलें तें झुरे पाहावया ॥३॥

1683 " दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण । तयावांचूनि काय तें ॥१॥ कळों आलें अनुभवें । पांडुरंगा माझ्या जीवें । न संगतां ठावें । पडे चर्या देखोनि ॥ध्रु.॥ काम क्रोध माझा देहीं । भेदाभेद गेले नाहीं । होतें तेथें कांहीं । तुज कृपा करितां ॥२॥ हें तों नव्हे उचित । नुपेक्षावें शरणागत । तुका म्हणे रीत । तुमची आम्हां न कळे ॥३॥

1684 " दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥ आतां ऐसें करीं । तुझे पाय चत्तिीं धरीं ॥ध्रु.॥ उपजला भाव । तुमचे कृपे सद्धिी जावो ॥२॥ तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥३॥

1685 " दुर्वासया स्वामी गुंतलों भाकेसी । पुसा जा बळीसी निरोप द्यावा ॥१॥ त्याचे आज्ञेविण आम्हां येतां नये । द्वारपाळ राहें होऊनियां ॥ध्रु.॥ पुसे दुर्वासया बळीसी जाऊनि । येरू म्हणे झणी बोलों नका ॥२॥ तुका म्हणे केला अन्यत्राचा त्याग । तेव्हां पांडुरंग सखा जाला ॥३॥

1686 " दुर्वासें निरोप आणिला ये रिती । मग वाढलेती नारायणा ॥१॥ ठेविलें चरण बळिचिये द्वारीं । शीर अंगावरी लांबविलें ॥ध्रु.॥ पाडियेलें द्वार द्वारावतियेसी । वरि हृषीकेशी निघालेती ॥२॥ तेथूनियां नाम पडिलें द्वारका । वैकुंठनायका तुका म्हणे ॥३॥

1687 " दुष्ट आचरण ग्वाही माझें मन । मज ठावे गुण दोष माझे ॥१॥ आतां तुम्ही सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसें केलें ॥ध्रु.॥ व्याह्याजांवायांचे पंगती दुर्बळ । वंचिजे तो काळ नव्हे कांहीं ॥२॥ तुका म्हणे आतां जालों शरणागत । पुढिल उचित तुम्हां हातीं ॥३॥

1688 " दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें ॥१॥ धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकांवारि ॥ध्रु.॥ मळ खाये संवदणी । करी आणिकांची उजळणी ॥२॥ तुका म्हणे त्याचा । प्रीती आदर करा साचा ॥३॥

1689 " दुष्टाचें चत्ति न भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला । पालथे घागरी घातलें जीवन । न धरी च जाण तें ही त्याला ॥१॥ जन्मा येउनि तेणें पतन चि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा । जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हे आलें संवसारा ॥ध्रु.॥ पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो । कुचर मुग नये चि पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥२॥ तुका म्हणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रेत्न कांहीं । म्हणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥३॥

1690 " दूरि तों चि होतों आपुले आशंके । नव्हतें ठाउकें मूळभेद ॥१॥ आतां जेथें तेथें येइन सांगातें । लपाया पुरतें उरों नेदीं ॥ध्रु.॥ मिथ्या मोहें मज लाविला उशीर । तरी हे अंतर जालें होतें ॥२॥ तुका म्हणे कां रे दाखविसी भिन्न । लटिका चि सीण लपंडाईं ॥३॥

1691 " देई डोळे भेटी न धरीं संकोच । न घलीं कांहीं वेच तुजवरी ॥१॥ तुज बुडवावें ऐसा कोण धर्म । अहनिऩशीं नाम घेतां थोडें ॥ध्रु.॥ फार थोडें काहीं करूनि पातळ । त्याजमध्यें काळ कडे लावूं ॥२॥ आहे माझी ते चि सारीन सिदोरी । भार तुजवरी नेदीं माझा ॥३॥ तुका म्हणे आम्हां लेंकराची जाती । भेटावया खंती वाटतसे ॥४॥

1692 " देईंल तें उणें नाहीं । याचे कांहीं पदरीं ॥१॥ पाहिजे तें संचित आतां । येथें सत्ता करावया ॥ध्रु.॥ गुणां ऐसा भरणा भरी। जो जें चारी तें लाभे ॥२॥ तुका म्हणे देवीं देव । फळे भव आपुला ॥३॥

1693 " देऊं कपाट । कीं कोण काळ राखों वाट ॥१॥ काय होईंल तें शिरीं । आज्ञा धरोनियां करीं ॥ध्रु.॥ करूं कळे ऐसी मात। किंवा राखावा एकांत ॥२॥ तुका म्हणे जागों । किंवा कोणा नेंदूं वागों ॥३॥

1694 " देऊनियां प्रेम मागितलें चित्त । जाली फिटाफिट तुम्हां आम्हां ॥१॥ काशानें उदार तुम्हांसी म्हणावें । एक नेसी भावें एक देसी ॥ध्रु.॥ देऊनियां थोडें नेसील हें फार । कुंटिसी विचार अवघियांचा ॥२॥ तुका म्हणे आम्हां भांडवल चित्त । देउनी दुश्चित पाडियेलें ॥३॥

1695 " देखण्याच्या तीन जाती । वेठी वार्ता अत्यंतीं ॥१॥ जैसा भाव तैसें फळ । स्वातीतोय एक जळ ॥ध्रु.॥ पाहे सांगे आणि जेवी । अंतर महदांतर तेवी ॥२॥ तुका म्हणे हिरा । पारखियां मूढां गारा ॥३॥

1696 " देखत आखों झुटा कोरा । तो काहे छोरा घरंबार ॥ध्रु.॥ मनसुं किया चाहिये पाख । उपर खाक पसारा ॥१॥ कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥२॥ कहे तुका वो संन्यास । छोडे आस तनकी हि ॥३॥

1697 " देखिलें तें धरिन मनें । समाधानें राहेन ॥१॥ भाव माझी सांटवण । जगजीवन कळावया ॥ध्रु.॥ बोळवीन एकसरें । उत्तरें या करुणेच्या ॥२॥ तुका म्हणे नयों रूपा । काय बापा करीसी ॥३॥

1698 " देखीचें तें ज्ञान करावें तें काई । अनुभव नाहीं आपणासी ॥१॥ इंद्रियांचे गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥ध्रु.॥ युक्तीचा आहार नीतीचा वेव्हार । वैराग्य तें सार तरावया ॥२॥ नाव रेवाळितां घाला घाली वारा । तैसा तो पसारा अहंतेचा ॥३॥ तुका म्हणे बुद्धि आपुले अधीन । करी नारायण आतुडे तों ॥४॥

1699 " देखोवेखीं करिती गुरू । नाहीं ठाउका विचारु ॥१॥ वर्म तें न पडे ठायीं । पांडुरंगाविण कांहीं ॥ध्रु.॥ शिकों कळा शिकों येती । प्रेम नाहीं कोणां हातीं ॥२॥ तुका म्हणे सार । भक्ति नेणती गव्हार ॥३॥

1700 " देव अवघें प्रतिपादी । वंदी सकळां एक निंदी ॥१॥ तेथें अवघें गेलें वांयां । विष घास एके ठायां ॥ध्रु.॥ सर्वांग कुरवाळी । उपटी एकच रोमावळी ॥२॥ तुका म्हणे चत्ति । नाहीं जयाचें अंकित ॥३॥

1701 " देव आतां आम्हीं केला असे ॠणी । आणिका वांचूनि काय गुंता ॥१॥ एकाचें आर्जव करू एकनिष्ठ । आणिकांचा बोभाट कामा नये ॥ध्रु.॥ बहुतांचे आर्जव केलिया खटपट । नाहीं हा शेवट शुद्ध होत ॥२॥ पुरता विचार आणोनी मानसीं । अंतरलों सर्वासि पई देखा ॥३॥ तुका म्हणे देवा चरणीं असो भाव । तेणें माझा जीव संतोष हा ॥४॥

1702 " देव आमचा आमचा । जीव सकळ जीवांचा ॥१॥ देव आहे देव आहे । जवळीं आम्हां अंतरबाहे ॥ध्रु.॥ देव गोड देव गोड । पुरवी कोडाचें ही कोड ॥२॥ देव आम्हां राखे राखे । घाली कळिकाळासी काखे ॥३॥ देव दयाळ देव दयाळ । करी तुक्याचा सांभाळ ॥४॥

1703 " देव आहे सुकाळ देशीं । अभाग्यासी दुर्भिक्षा ॥१॥ नेणती हा करूं सांटा । भरले फांटा आडरानें ॥ध्रु.॥ वसवूनि असे घर । माग दूर घातला ॥२॥ तुका म्हणे मन मुरे । मग जें उरे तें चि तूं ॥३॥

1704 " देव कैंचा तया दुरी । भाका बरी करुणा ॥१॥ आळवित्या न लगे धर । माय जाणे रे भातुकें ॥ध्रु.॥ नावे तरी ज्याचा भार । पैल पार जवळी त्या ॥२॥ आतां परदेशी तुका । जाला लोकांवेगळा ॥३॥

1705 " देव गावा ध्यावा ऐसें जालें । परदेशी नाहीं उगलें । वडील आणि धाकुलें । नाहीं ऐसें जालें दुसरें तें ॥१॥ नाहीं लागत मुळीहूनि । सुहृदजन आणि जननी । लागल्या लागें त्यागें सांडूनि । लोभीये मांडणी संयोगाची ॥ध्रु.॥ शिव बाटला जीवदशे । बहुत ओतत आलें ठसें । हीन जालें भूषणाचें इच्छे । निवडती कैसे गुणागुण ॥२॥ आतां हे हुतांश तों बरें । अवघे एक च मोहरें । पिटिलियाविण नव्हे खरें । निवडें बरें जातिशुद्ध ॥३॥ तुका उतावेळ याजसाटीं । आहे तें निवेदीन पोटीं । आवडी द्यावी जी येथें लाटी । तुझी जगजेठी कीर्ती वाखाणीन ॥४॥

1706 " देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥ देव न लगे देव न लगे । सांटवणेचे रुधले जागे ॥ध्रु.॥ देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥२॥ देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥३॥ दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥४॥

1707 " देव जडला जाइना अंगा । यासी काय करूं सांगा ॥१॥ वरकड देव येती जाती । हा देव जन्माचा सांगाती ॥ध्रु.॥ अंगीं भरलें देवाचें वारें । देव जग चि दिसे सारें ॥२॥ भूत न बोले निरुतें । कांहीं केल्या न सुटे तें ॥३॥ जीव खादला दैवतें । माझा आणि पंचभूतें ॥४॥ तुका म्हणे वाडें कोडें । उभें पुंडलिकापुढें ॥५॥

1708 " देव जाणता देव जाणता । आपली च सत्ता एकाएकीं॥१॥ देव चतुर देव चतुर । जाणोनि अंतर वर्ततसे ॥२॥ देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळा तुका म्हणे ॥३॥

1709 " देव जाले अवघे जन । माझे गुण दोष हारपले ॥१॥ बरवें जालें बरवें जालें । चत्ति धालें महालाभें ॥ध्रु.॥ दर्पणीचें दुसरें भासे । परि तें असे एक तें ॥२॥ तुका म्हणे सिंधुभेटी । उदका तुटी वाहाळासी ॥३॥

1710 " देव तिंहीं बळें धरिला सायासें । करूनियां नास उपाधीचा ॥१॥ पर्वपक्षी धातु धिःकारिलें जन । स्वयें जनार्दन ते चि जाले ॥२॥ तुका म्हणे यासी न चले तांतडी । अनुभवें गोडी येइल कळों ॥३॥

1711 " देव तिला आला । गोडगोड जीव धाला ॥१॥ साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥ पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥२॥ तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दनीं जनीं ॥३॥

1712 " देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥१॥ तया बरें फावे देवा चुकवितां । संचिताची सत्ता अंतराय ॥ध्रु.॥ शुद्धाशुद्धठाव पापुण्यबीज । पाववील दुजे फळभोग ॥२॥ तुका म्हणे विश्वंभराऐसें वर्म । चुकविल्या धर्म अवघे मिथ्या ॥३॥

1713 " देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥१॥ मी तों सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥ध्रु.॥ निराकारी ओस दिशा । येथें इच्छा पुरतसे ॥२॥ तुका म्हणे रोकडें केणें । सेवितां येणें पोट धाय ॥३॥

1714 " देव त्यां फावला गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान ॥१॥ नाडलीं आपल्या आपण चि एकें । संदेहदायकें बहुफारें ॥२॥ फारें चाळविलीं नेदी कळों माव । देवाआदिदेव विश्वंभर ॥३॥ विश्वासावांचुनि कळों नये खरा । अभक्तां अधीरा जैसा तैसा ॥४॥ जैसा भाव तैसा जवळि त्या दुरि । तुका म्हणे हरि देतो घेतो ॥५॥

1715 " देव दयाळ देव दयाळ । साहे कोल्हाळ बहुतांचा ॥१॥ देव उदार देव उदार । थोड्यासाटीं फार देऊं जाणे ॥२॥ देव चांगला देव चांगला । तुका लागला चरणीं ॥३॥

1716 " देव धरी नाना सोंगें । नाम श्रेष्ठ पांडुरंग ॥१॥ तो हा गवळियाचे घरीं । नाम सारितो मुरारि ॥ध्रु.॥ धन्य यशोदेचें प्रारब्ध । नाचे अंगणीं गोविंद ॥२॥ ऐशा भक्तांसाटीं देवें । नाना धरियेलीं नांवें ॥३॥ होय दासांचा जो दास । तुका म्हणे विठ्ठलास ॥४॥

1717 " देव निढळ देव निढळ । मूळ नाहीं डाळ परदेशी ॥१॥ देव अकुळी देव अकुळी । भलते ठायीं सोयरीक ॥२॥ देव लिगाड्या देव लिगाड्या । तुका म्हणे भाड्या दंभें ठकी ॥३॥

1718 " देव पाहावया करीं वो सायास । न धरीं हे आस नाशिवंत ॥१॥ दिन शुद्ध सोम सकाळीं पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥ध्रु.॥ द्विजां पाचारूनि शुद्ध करीं मन । देई वो हें दान यथाविध ॥२॥ नको चिंता करूं वस्त्रा या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥३॥ तुका म्हणे दुरी सांगतों पाल्हाळीं । परी तो जवळी आहे आम्हां ॥४॥

1719 " देव पाहों देव पाहों । उंचे ठायीं उभे राहों ॥१॥ देव देखिला देखिला । तो नाहीं कोणां भ्याला ॥ध्रु.॥ देवा कांहीं मागों मागों । जीव भाव त्यासी सांगों ॥२॥ देव जाणे देव जाणे । पुरवी मनींचिये खुणे ॥३॥ देव कातर कातर । तुका म्हणे अभ्यंतर ॥४॥

1720 " देव बराडी देव बराडी । घाली देंठासाटीं उडी ॥१॥ देव भ्याड देव भ्याड । राखे बळीचें कवाड ॥ध्रु.॥ देव भाविक भाविक । होय दासाचें सेवक ॥२॥ देव होया देव होया । जैसा म्हणे तैसा तया ॥३॥ देव लाहान लाहान । तुका म्हणे अनुरेण ॥४॥

1721 " देव बासर देव बासर । असे निरंतर जेथें तेथें ॥१॥ देव खोळंबा देव खोळंबा । मज झळंबा म्हूण कोंडी ॥ध्रु.॥ देव लागट देव लागट । लाविलिया चट जीवीं जडे ॥२॥ देव बावळा देव बावळा । भावें जवळा लुडबुडी ॥३॥ देव न व्हावा देव न व्हावा । तुका म्हणे गोवा करी कामीं ॥४॥

1722 " देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥१॥ भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥ स्त्री द्यावी गुणवंती नसती गुंते आशा । यालागीं कर्कशा पाठी लावी ॥२॥ तुका म्हणे मज प्रचित आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥३॥

1723 " देव भला देव भला । मिळोनि जाय जैसा त्याला ॥१॥ देव उदार उदार । देतां नाहीं थोडें फार ॥ध्रु.॥ देव बळी देव बळी । जोडा नाहीं भूमंडळीं ॥२॥ देव व्हावा देव व्हावा । आवडे तो सर्वां जीवां ॥३॥ देव चांगला चांगला । तुका चरणीं लागला ॥४॥

1724 " देव मजुर देव मजुर । नाहीं उजुर सेवेपुढें ॥१॥ देव गांढ्याळ देव गांढ्याळ । देखोनियां बळ लपतसे ॥२॥ देव तर काईं देव तर काईं । तुका म्हणे राईं तरी मोटी ॥३॥

1725 " देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥१॥ न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तें ही अमृत पाहीं ॥ध्रु.॥ न चुके वाट न पडे फंदीं । नव्हे कधीं कधीं यमबाधा ॥२॥ तुका म्हणे नारायण । येता गोर्‍या वारी वाण ॥३॥

1726 " देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥ ऐसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥ हरिजनासी भेटी । नहो अंगसंगें तुटी ॥२॥ तुका म्हणे जिणें । भलें संतसंघष्टणें ॥३॥

1727 " देव सखा आतां केलें नव्हे काईं । येणें सकळईं सोइरीं च ॥१॥ भाग्यवंत जालों गोतें सपुरतीं । आतां पुण्या नीती पार नाहीं ॥ध्रु.॥ पाहातां दिसती भरलिया दिशा । ठसावला ठसा लोकत्रयीं ॥२॥ अविनाश जोडी आम्हां भाग्यवंतां । जाली होती सत्ता संचिताची ॥३॥ पायांवरी डोईं ठेवाया अरोथा । जाली द्यावी सत्ता क्षेम ऐसी ॥४॥ तुका म्हणे जीव पावला विसावा । म्हणवितां देवा तुमचींसीं ॥५॥

1728 " देव होसी तरी आणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥१॥ दुष्ट होसी तरी अणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥२॥ तुका म्हणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणलें निश्चयेसीं ॥३॥

1729 " देवकीनंदनें । केलें आपुल्या चिंतनें ॥१॥ मज आपुलिया ऐसें । मना लावूनियां पिसें ॥ध्रु.॥ गोवळे गोपाळां । केलें लावूनियां चाळा ॥२॥ तुका म्हणे संग । केला दुरि नव्हे मग॥३॥

1730 " देवा आतां ऐसा करीं उपकार । देहेचा विसर पाडीं मज ॥१॥ तरीं च हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें ॥ध्रु.॥ ठाव देई चित्ती राख पायांपाशीं । सकळ वृत्तींसी अखंडित ॥२॥ असे भय आतां लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा ॥३॥ मागणें तें एक हें चि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देई ॥४॥ तुका म्हणे नको वरपंग देवा । घेई माझी सेवा भावशुद्ध ॥५॥

1731 " देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी ॥१॥ माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देई प्रेम कांहीं कळा ॥२॥ कळा तुजपाशीं आमचें जीवन । उचित करून देई आम्हां ॥३॥ आम्हां शरणागतां तुझा चि आधार । तूं तंव सागर कृपासिंधु ॥४॥ सिंधु पायावाट होय तुझ्या नामें । जाळीं महाकर्में दुस्तरें तीं ॥५॥ तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥६॥ सेविंलिया राम कृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥७॥ संसार तें काय तृणवतमय । अग्नि त्यासी खाय क्षणमात्रें ॥८॥ क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥९॥ करीं ब्रिदें साच आपलीं आपण । पतितपावन दिनानाथ ॥१०॥ नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तीचा मनोरथ ॥११॥ चित्ती जें धरावें तुका म्हणे दासीं । पुरविता होसी मनोरथ ॥१२॥

1732 " देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ति । तया इच्छा गति । हें चि सुख आगळें ॥१॥ या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धिसिद्धी द्वारीं । कर जोडूनि उभ्या ॥ध्रु.॥ नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा नास । अद्भुत हा रस । कथाकाळीं नामाचा ॥२॥ तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे रे मेघशामा । तुका म्हणे आम्हां । जन्म गोड यासाटीं ॥३॥

1733 " देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥१॥ तरी साच मी पतित । तूं च खोटा दिनानाथ । ग्वाही साधुसंत जन । करूनि अंगीं लावीन ॥ध्रु.॥ आम्ही धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छेद ॥२॥ न चले तुझे कांहीं त्यास । आम्ही बळकाविले दोष ॥३॥ दिशा भरल्या माझ्या मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥४॥ तुका म्हणे चत्ति । करी तुझी माझी नीत ॥५॥

1734 " देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ॠण । आहे तें कां नेदिसी अझून । अवगलासीं झोंडपणें । परी मी जाण जीवें जिरों नेदीं ॥१॥ कळों येईंल रोकडें । उभा करिन संतांपुढें । तुझें काय एवढें । भय आपुलें मागतां ॥ध्रु.॥ आजिवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता । कवडीचा तो आतां । पडों नेदीन फेर ॥२॥ ठेविला ये जीवनीं जीव । म्हणे तुकयाचा बंधव । माझा गळा तुझा पाव । एके ठायीं बांधेन ॥३॥

1735 " देवा बोलें आतां बोला । त्वां कां धरिला अबोला॥१॥ भेऊं नको देई भेटी । तूं कां पडिलासी संकटीं ॥ध्रु.॥ तुझ्या जीवींचें मी जाणें । म्हणसी मुक्ती आम्हां देणें ॥२॥ तुका म्हणे न लगे कांहीं । चित्त राहो तुझे पायीं ॥३॥

1736 " देवांच्या ही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनीं ॥१॥ पातकांच्या रासी नासितोसी नामें । जळतील कर्में महा दोष ॥ध्रु.॥ सर्व सुखें तुझ्या वोळगती पायीं । रिद्धि सिद्धि ठायीं मुक्तिचारी ॥२॥ इंद्रासी दुर्लभ पाविजे तें पद । गीत गातां छंद वातां टाळी ॥३॥ तुका म्हणे जड जीव शक्तिहीन । त्यांचें तूं जीवन पांडुरंगा ॥४॥

1737 " देवाचा भक्त तो देवासी गोड । आणिकांसी चाड नाहीं त्याची । कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघियां हातीं अंतरला ॥१॥ निष्काम वेडें म्हणतील बापुडे । अवघियां सांकडें जाला कैसा । माझें ऐसें तया न म्हणत कोणी । असे रानीं वनीं भलते ठायीं ॥ध्रु.॥ प्रातःस्नान करी विभूतिचर्चन । दखोनिया जन निंदा करी । कंठीं तुळसीमाळा बैसोनि निराळा । म्हणती या चांडाळा काय जालें ॥२॥ गातां शंका नाहीं बैसे भलते ठायीं । शिव्या देती आईं बाप भाऊ । घरी बाइल म्हणे कोठें व्याली रांड । बरें होतें शंड मरता तरी ॥३॥ जन्मोनि जाला अवघियां वेगळा । म्हणोनि गोपाळा दुर्लभ तो । तुका म्हणे जो संसारा रुसला । तेणें चि टाकिला सिद्धपंथ ॥४॥

1738 " देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । स्त्रियेसी पाठवी उंच साडी ॥१॥ गाईंचें पाळण नये चि विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥ध्रु.॥ लेकराची रास स्वयें धांवें क्षाळूं । न म्हणे प्रक्षाळूं द्विजपायां ॥२॥ तुका म्हणे त्याच्या तोंडावरि थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥

1739 " देवाचिये चाडे प्रमाण उचित । नये वांटूं चित्त निषेधासीं ॥१॥ नये राहों उभें कसमळापाशीं । भुंकतील तैसीं सांडावीं तीं ॥२॥ तुका म्हणे क्षमा सुखाची हे रासी । सांडूनि कां ऐसी दुःखी व्हावें ॥३॥

1740 " देवाचिये पायीं देई मना बुडी । नको धांवों वोढी इंिद्रयांचे ॥१॥ सर्व सुखें तेथें होती एकवेळे । न सरती काळें कल्पांतीं ही ॥ध्रु.॥ जाणें येणें खुंटे धांवे वेरजार । न लगे डोंगर उसंतावे ॥२॥ सांगन तें तुज इतुलें चि आतां । मानी धन कांता विषतुल्य ॥३॥ तुका म्हणे तुझे होती उपकार । उतरों हा पार भवसिंधु ॥४॥

1741 " देवाचिये पायीं वेचों सर्व शक्ती । होतील विपित्त ज्याज्या कांहीं ॥१॥ न घेई माझी वाचा पुढें कांहीं वाव । आणि दुजे भाव बोलायाचे ॥ध्रु.॥ मनाचे वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥२॥ तुका म्हणे घेई विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥३॥

1742 " देवाचिये माथां घालुनियां भार । सांडीं किळवर ओंवाळूनि ॥१ ॥ नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ॥ध्रु.॥ करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावें दुसरें आड येऊं ॥२॥ तुका म्हणे सांडीं लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ॥३॥

1743 " देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा ॥१॥ देवाची ते खूण करावें वाटोंळें । आपणा वेगळें कोणी नाहीं ॥ध्रु.॥ देवाची ते खूण गुंतों नेदी आशा । ममतेच्या पाशा शिवों नेदी ॥२॥ देवाची ते खूण गुंतों नेदी वाचा । लागों असत्याचा मळ नेदी ॥३॥ देवाची ते खूण तोडी मायाजाळ । आणि हें सकळ जग हरी ॥४॥ पहा देवें तेंचि बळकाविलें स्थळ । तुक्यापें सकळ चिन्हें होतीं ॥५॥

1744 " देवाची पूजा हे भूताचें पाळण । मत्सर तो सीण बहुतांचा ॥१॥ रुसावें फुगावें आपुलियावरि । उरला तो हरि सकळ ही ॥२॥ तुका म्हणे संतपण यां चि नांवें । जरि होय जीव सकळांचा ॥३॥

1745 " देवाची भांडारी । आदा विनियोग करी ॥१॥ आतां न माखे हातपाय । नेणों होतें ऐसें काय ॥ध्रु.॥ देवें नेली चिंता । जाला सकळ करिता ॥२॥ तुका म्हणे धणी । त्यासी अवघी पुरवणी ॥३॥

1746 " देवाचे घरीं देवें केले चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ॥१॥ धांवणियां धांवा धांवणियां धांवा । माग चि नाहीं जावें कवणिया गांव ॥ध्रु.॥ सवें चि होता चोर घरिचिया घरीं । फावलियावरी केलें अवघें वाटोळें ॥२॥ तुका म्हणे येथें कोणी च नाहीं । नागवलें कोण गेलें कोणाचें काईं ॥३॥

1747 " देवाचें चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे ॥१॥ हातावरि हात हासोनि आफळी । वाजवितां टाळी लाज वाटे ॥२॥ तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरि । जातो यमपुरी भोगावया ॥३॥

1748 " देवाचें निर्माल्य कोण शिवे हातीं । संकल्पासी होती विकल्प ते ॥१॥ वाहिलें देह हें देवा एकसरें । होईंल तें बरें तेणें द्वारें ॥ध्रु.॥ होता भार त्याची निवारली खंती । येथें आतां रिती साटवण ॥२॥ तुका म्हणे इच्छे पावविले कष्ट । म्हणऊनि नष्ट दुरावली ॥३॥

1749 " देवाचें भजन कां रे न करीसी । अखंड हव्यासीं पीडतोसी ॥१॥ देवासी शरण कां रे न वजवे तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागीं ॥ध्रु.॥ देवाचा विश्वास कां रे नाहीं तैसा । पुत्रस्नेहें जैसा गुंतलासी ॥२॥ कां रे नाहीं तैसी देवाची हे गोडी । नागवूनी सोडी पत्नी तैसी ॥३॥ कां रे नाहीं तैसे देवाचे उपकार । माया मिथ्या भार पितृपूजना ॥४॥ कां रे भय वाहासी लोकांचा धाक । विसरोनि एक नारायण ॥५॥ तुका म्हणे कां रे घातलें वांयां । अवघें आयुष्य जाया भक्तिविण ॥६॥

1750 " देवाच्या उद्देशें जेथें जेथें भाव । तो तो वसे ठाव विश्वंभरें ॥१॥ लोभाचे संकल्प पळालियावरी । कैंची तेथें उरी पापपुण्या ॥ध्रु.॥ शुद्ध भक्ती मन जालिया निर्मळ । कुश्चळी विटाळ वज्रलेप ॥२॥ तुका म्हणे ज्याचें तयासी च कळे । प्रांत येतो फळें कळों मग ॥३॥

1751 " देवाच्या निरोपें पिटितों डांगोरा । लाजे नका थारा देऊं कोणी ॥१॥ मोडिलें या रांडे सुपंथ मारग । चालविलें जग यमपंथें ॥ध्रु.॥ परिचारीं केली आपुली च रूढी । पोटींची ते कुडी ठावी नाहीं ॥२॥ तुका म्हणे आणा राउळा धरून । फजित करून सोडूं मग ॥३॥

1752 " देवावरिल भार । काढूं नये कांहीं पर ॥१॥ तानभुके आठवण । घडे तें बरें चिंतन ॥ध्रु.॥ देखावी निश्चिंती । ते चि अंतर श्रीपती ॥२॥ वैभव सकळ । तुका मानितो विटाळ ॥३॥

1753 " देवावरी भार । वृत्ति अयाचित सार ॥१॥ देह देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळीं ॥ध्रु.॥ विश्वासीं निर्धार । विस्तारील विश्वंभर ॥२॥ तुका म्हणे व्हावें । बळ एक चि जाणावें ॥३॥

1754 " देवासाटीं जाणा तयासी च आटी । असेल ज्या गांठीं पुण्यराशी ॥१॥ निर्बळा पाठवी बळें वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध पुण्य ॥ध्रु.॥ कथें निद्राभंग करावा भोजनीं । तया सुखा धणी पार नाहीं ॥२॥ यागीं रीण घ्यावें द्यावें सुख लाहीं । बुडतां चिंता नाहीं उभयतां ॥३॥ तुका म्हणे वर्म जाणोनि करावें । एक न घलावें एकावरी ॥४॥

1755 " देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥१॥ भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ध्रु.॥ देवें भक्तां रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥२॥ एका अंगीं दोन्ही जालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥३॥ तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तो चि देव देव भक्त ॥४॥

1756 " देवासी तो पुरे एकभाव गांठी । तो चि त्याचे मिठी देइल पायीं ॥१॥ पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनियां ॥ध्रु.॥ कांहीं नेघें शिरीं निमित्याचा भार । न लगे उत्तर वेचावें चि ॥२॥ तुका म्हणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटों येत ॥३॥

1757 " देवासी पैं भांडों एकचत्ति करूनि । आम्हांसि सज्जनीं सांगितलें ॥१॥ आम्हां काय आतां देवें आडो परी । भेटी नेदी तरी सुखें नेदो ॥ध्रु.॥ तो चि नांदो सदा हरि पैं वैकुंठीं । आम्हां देशवटी देवो सुखें ॥२॥ देवें अभिमान चित्तांत धरिला । तरी तो एकला राहो आतां ॥३॥ चित्ती धरोनि नाम असों सुखें येथें । हषॉ गाऊं गीत गोविंदाचें ॥४॥ तुका म्हणे सर्व देवाची नष्टाईं । आम्ही सुखें डुलतसों ॥५॥

1758 " देवासी लागे सकळांसी पोसावें । आम्हां न लगे खावें काय चिंता ॥१॥ देवा विचारावें लागे पापपुण्य । आम्हासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥ देवासी उत्पत्ति लागला संहार । आम्हां नाहीं फार थोडें काहीं ॥२॥ देवासी काम लागला धंदा । आम्हासी ते सदा रिकामीक ॥३॥ तुका म्हणे आम्ही भले देवाहून । विचारितां गुण सर्वभावें ॥४॥

1759 " देवीं आणि दैतीं सिंधू गुसळिला । भार पृथ्वीस जाला साहावेना ॥१॥ जालासी कासव धरिली पाठीवरी । चिंता तुज हरी सकळांची ॥ध्रु.॥ तये काळीं देव करिताती स्तुती । कृपाळु श्रीपती म्हणोनियां ॥२॥ तुका म्हणे ऐसे उदंड पवाडे । ज्यासी सहस्र तोंडें सिणला तो ही ॥३॥

1760 " देवें दिला देह भजना गोमटा । तों या जाला भांटा बाधिकेच्या ॥१॥ ताठोनियां मान राहिली वरती । अहंकारा हातीं लवों नल्हे ॥ध्रु.॥ दास म्हणावया न वळे रसना । सइरवचना बासे गळा ॥२॥ तुका म्हणे कोठें ठेवावा विटाळ । स्नानें नीर्मळ व्हावयासी ॥३॥

1761 " देवें देऊळ सेविलें । उदक कोरडें चि ठेविलें ॥१॥ नव्हे मत गूढ उमानें कांहीं । तूं आपणआपणापें पाहीं ॥ध्रु.॥ पाठें पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥२॥ वांजेघरीं बाळ तान्हा । एक बाळी दों कानां ॥३॥ तुका म्हणे पैस । अनुभविया ठावा गोडीरस ॥४॥ ॥ लोहागांवीं कीर्तनांत मेलें मूल जीत झालें ते समयीं स्वामींनीं अभंग केले ते ॥

1762 " देह आणि देहसंबंधें निंदावीं । इतरें वंदावीं श्वानशूकरें ॥१॥ येणें नांवें जाला मी माझ्याचा झाडा । मोहा नांवें खोडा गर्भवास ॥ध्रु.॥ गृह आणि वित्त स्वदेशा विटावें । इतरा भेटावें श्वापदझाडां ॥२॥ तुका म्हणे मी हें माझें न यो वाचे । येणें नांवें साचे साधुजन ॥३॥

1763 " देह जाईंल जाईंल । यासी काळ बा खाईंल ॥१॥ कां रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥ध्रु.॥ लोडें बालिस्तें सुपती । जरा आलिया फजिती ॥२॥ शरीरसंबंधाचें नातें । भोरड्या बुडविती सेतातें ॥३॥ अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढें दगा ॥४॥

1764 " देह तंव असे भोगाचे अधीन । याचें सुख सीण क्षीणभंगर ॥१॥ अविनाश जोडी देवापायीं भाव । कल्याणाचा ठाव सकळही ॥ध्रु.॥ क्षणभंगुर हा तेथील पसारा । आलिया हाकारा अवघें राहे ॥२॥ तुका म्हणे येथें सकळ विश्रांति । आठवावा चित्तीं नारायण ॥३॥

1765 " देह तंव आहे प्रारब्धा अधीन । याचा मी कां सीण वाहूं भार ॥१॥ सरो माझा काळ तुझिया चिंतनें । कायावाचामनें इच्छीतसें ॥ध्रु.॥ लाभ तो न दिसे याहूनि दुसरा । आणीक दातारा येणें जन्में ॥२॥ तुका म्हणे आलों सोसीत संकटें । मी माझें वोखटें आहे देवा ॥३॥

1766 " देह तुझ्या पायीं । ठेवूनि जालों उतराईं ॥१॥ आतां माझ्या जीवां । करणें तें करीं देवा ॥ध्रु.॥ बहु अपराधी । मतिमंद हीनबुद्धि ॥२॥ तुका म्हणे नेणें । भावभक्तीचीं लक्षणें ॥३॥

1767 " देह नव्हे मी हें सरे । उरला उरे विठ्ठल ॥१॥ म्हणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतनें ॥ध्रु.॥ पाळणाची नाहीं चिंता । ठाव रिता देवाचा ॥२॥ तुका म्हणे जीवासाटीं । देव पोटीं पडेल ॥३॥

1768 " देह निरसे तरी । बोलावया नुरे उरी ॥१॥ येर वाचेचें वाग्जाळ । अळंकारापुरते बोल ॥ध्रु.॥ काचें तरी कढे । जाती ऐसें चित्ती ओढे ॥२॥ विष्णुदास तुका । पूर्ण धनी जाणे चुका ॥३॥

1769 " देह प्रारब्धा शिरीं । असोन करी उद्वेग ॥१॥ धांव घालीं नारायणा । माझ्या मना जागवीं ॥ध्रु.॥ ऐसी चुकोनियां वर्में । पीडा भ्रमें पावलों ॥२॥ तुका म्हणे कैंचा भोग । नव्हे रोग अंगींचा॥३॥

1770 " देह मृत्याचें भातुकें । कळों आलें कवतुकें ॥१॥ काय मानियेलें सार । हें चि वाटतें आश्चर्य ॥ध्रु.॥ नानाभोगांची संचितें । करूनि ठेविलें आइतें ॥२॥ तुका म्हणे कोडीं । उगवून न सकती बापुडीं ॥३॥

1771 " देहबुद्धि वसे जयाचियें अंगीं । पूज्यता त्या जगीं सुख मानी ॥१॥ थोर असे दगा जाला त्यासी हाटीं । सोडोनिया गांठी चोरीं नेली ॥ध्रु.॥ गांठीचें जाउनि नव्हे तो मोकळा । बांधिलासे गळा दंभलोभें ॥२॥ पुढिल्या उदिमा जालेंसे खंडण । दिसे नागवण पडे गांठी ॥३॥ तुका म्हणे ऐसे बोलतील संत । जाणूनियां घात कोण करी ॥४॥

1772 " देहभाव आम्ही राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥१॥ आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तो चि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥ म्हणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥२॥ जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥३॥ तुका म्हणे जालों जयाचे अंकित । तो चि माझें हित सर्व जाणे ॥४॥

1773 " देहीं असोनियां देव । वृथा फिरतो निर्दैव ॥१॥ देव आहे अंतर्यामीं । व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं ॥ध्रु.॥ नाभी मृगाचे कस्तुरी । व्यर्थ हिंडे वनांतरीं ॥२॥ साखरेचें मूळ ऊंस । तैसा देहीं देव दिसे ॥३॥ दुधीं असतां नवनीत । नेणे तयाचें मथित ॥४॥ तुका सांगे मूढजना । देहीं देव कां पाहाना ॥५॥

1774 " दैत्यभारें पीडिली पृथुवी बाळा । म्हणोनि तूज येणें जालें गोपाळा । भक्तिप्रतिपाळक उत्सव सोहळा । मंगळें तुज गाती आबळ बाळा ॥१॥ जय देव जय देव जय गरुडध्वजा । श्रीगरुडध्वजा । आरती ओवाळूं तुज भक्तीकाजा ॥ध्रु.॥ गुण रूप नाम नाहीं जयासी । चिंतितां तैसा चि होसी तयांसी । मत्स्य कूर्म वराह नरसिंह जालासी । असुरां काळ मुणि ठाके ध्यानासी ॥२॥ सहजर रूपें नाम सांवळा ना गोरा । श्रुति नेती म्हणती तुज विश्वंभरा । जीवनां जीवन तूं चि होसी दातारा । न कळे पार ब्रम्हादिकां सुरवरां ॥३॥ संतां महंतां घरीं म्हणवी म्हणियारा । शंखचक्रगदाआयुधांचा भारा । सुदर्शन घरटी फिरे अवश्वरा । सकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥४॥ भावेंविण तुझें न घडे पूजन । सकळ ही गंगा जाल्या तुजपासून । उत्पत्ति प्रळय तू चि करिसी पाळण । धरूनि राहिला तुका निश्चयीं चरण ॥५॥

1775 " दैन्य दुःख आम्हां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥१॥ सर्व सुखें येती मानें लोटांगणीं । कोण यांसी आणी दृष्टीपुढें ॥ध्रु.॥ आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचें ॥२॥ आमचें मागणें मागों त्याची सेवा । मोक्षाची निर्दैवा कोणा चाड ॥३॥ तुका म्हणे पोटीं सांटविला देव । नुन्य तो भाव कोण आम्हां ॥४॥

1776 " दो दिवसांचा पाहुणा चालतो उताणा । कां रे नारायणा न भजसी ॥१॥ तूं अखंड दुश्चित्ता तुज नेती अवचिता । मग पंढरीनाथा भजसी केव्हां ॥२॥ तुका म्हणे ऐसे आहेत उदंड । तया केशव प्रचंड केवीं भेटे ॥३॥

1777 " दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साटीं । विठ्ठला ॥१॥ भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आम्हालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ध्रु.॥ होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं । म्हणोनियां घरीं । गौळियांचे अवतार ॥२॥ केला पुंडलिकें गोवा । तुज पंढरीसि देवा । तुका म्हणे भावा । साटीं हातीं सांपडसी ॥३॥

1778 " दोराच्या आधारें पर्वत चढला । पाउलासाटीं केला अपघात ॥१॥ अष्टोत्तरदशें व्याधि ज्य वैद्यें दवडुनी । तो वैद्य मारूनि उत्तीर्ण जाला ॥ध्रु.॥ नव मास माया वाइलें उदरीं । ते माता चौबारीं नग्न केली ॥२॥ गायत्रीचें क्षीर पिळुनी घेऊनी । उपवासी बांधोनी ताडन करी ॥३॥ तुका म्हणे दासां निंदी त्याचें तोंड । पहातां नरककुंड पूर्वजांसी ॥४॥

1779 " दोष करूनि आम्ही पतित सद्धि जालों । पावन मागों आलों ब्रीद तुझें ॥१॥ आतां पतिता तारावें कीं ब्रीद हें सोडावें । यांत जें पुरवे तें चि सांगा ॥ध्रु.॥ उद्धार तुमच्यानें नव्हे हो श्रीहरि । सोडा झडकरी ब्रीद आतां ॥२॥ तें ब्रीद घेउनी हिंडों दारोदारीं । सांगूं तुझी कीर्ती रे पांडुरंगा ॥३॥ देवें हारविलें ब्रीद हें सोडिलें । पतितें जिंकिलें आम्हीं देवा ॥४॥ तुका म्हणे आम्हीं उठलों दैन्यवरि । विचारा श्रीहरी तुम्ही आतां ॥५॥

1780 " दोहीं बाहीं आम्हां वास । असों कास घालूनि ॥१॥ बोल बोलों उभयतां । स्वामीसत्ता सेवेची ॥ध्रु.॥ एकसरें आज्ञा केली । असों चाली ते नीती ॥२॥ तुका म्हणे जोहारितों । आहें होतों ते ठायीं ॥३॥

1781 " दोहींमध्यें एक घडेल विश्वासें । भातुकें सरिसें मूळ तरी ॥१॥ करिती निरास निःशेष न घडे । कांहीं तरी ओढे चित्ती माये ॥ध्रु.॥ लौकिकाची तरी धरितील लाज । काय माझ्या काज आचरणें ॥२॥ अथवा कोणाचें घेणें लागे रीण । नाहीं तरी हीनकर्मी कांहीं ॥३॥ व्यालीचिये अंगीं असती वेधना । तुका म्हणे मना मन साक्ष ॥४॥

1782 " द्या जी माझा विचारोनियां विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें ॥१॥ किती नेणों तुम्हां साहाते कटकट । आम्ही च वाईंट निवडलों ते ॥ध्रु.॥ करवितां कल्हें जिवाचियेसाटीं । हे तुम्हां वोखटीं ढाळ देवा ॥२॥ तुका म्हणे धीर कारण आपुला । तुम्हीं तों विठ्ठला मायातीत ॥३॥

1783 " द्याल ऐसें दिसे । तुमचें साचपण इच्छे ॥१॥ म्हणऊनि न भंगे निर्धार । केलें लोचनें सादर ॥ध्रु.॥ मुखाची च वास । पुरला पाहे अवकाश ॥२॥ तुका म्हणे कळे । काय लाभ कोण वेळ ॥३॥

1784 " द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥ आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥ध्रु.॥ सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन ॥२॥ नामदेवापायीं तुक्या स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥३॥

1785 " द्रव्याचिया कोटी । नये गांडीची लंगोटी ॥१॥ अंती बोळवणेसाटीं । पांडुरंग धरा कंठीं ॥ध्रु.॥ लोभाची लोभिकें । यांचें सन्निधान फिकें ॥२॥ तुका म्हणे हितें । जग नव्हो पडो रितें ॥३॥

1786 " द्वारकेचें केणें आलें या चि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥१॥ गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु.॥ वैष्णव मापार नाहीं जाली सळे । पुढें ही न कळे पार त्याचा ॥२॥ लाभ जाला त्यांनीं धरिला तो विचार । आहिक्य परत्र सांटविलें ॥३॥ तुका म्हणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं संतांचिया ॥४॥

1787 " द्वारपाळ विनंती करी । उभे द्वारीं राउळा ॥१॥ आपुलिया शरणागता । वाहों चिंता नेदावी ॥ध्रु.॥ वचना या चत्ति द्यावें । असो ठावें पायांसी ॥२॥ तुका म्हणे कृपासिंधू । दीनबंधू केशवा ॥३॥

1788 " द्वेषाचिया ध्यानें हरिरूप जाले । भाव हारपले देहादिक ॥१॥ देहादिक कर्में अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥ नारायण जोडे एकविध भावें । तुका म्हणे जीवें जाणें लागे ॥३॥

1789 " धडकला अग्नि आह्या येती वरी । गोपाळ श्रीहरी विनविती ॥१॥ अरे कृष्णा काय विचार करावा । आला रे वोणवा जळों आतां ॥ध्रु.॥ अरे कृष्णा तुझें नाम बळिवंत । होय कृपावंत राख आतां ॥२॥ तुका म्हणे अरे कृष्णा नारायणा । गोपाळ करुणा भाकितिले ॥३॥

1790 " धन मेळवूनि कोटी । सवें नये रे लंगोटी ॥१॥ पानें खाशील उदंड । अंतीं जासी सुकल्या तोंडें ॥ध्रु.॥ पलंग न्याहाल्या सुपती । शेवटीं गोवर्‍या सांगाती ॥२॥ तुका म्हणे राम । एक विसरतां श्रम ॥३॥

1791 " धनवंत एक बहिर अंधळे । शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगीं ॥१॥ परारब्धगति न कळे विचित्र । आहे हातीं सूत्र विठोबाचे ॥ध्रु.॥ आणीक रोगांचीं नांवें घेऊं किती । अखंड असती जडोनियां ॥२॥ तुका म्हणे नष्ट संचिताचें दान । पावे खातां पण सुख नेदी ॥३॥

1792 " धनवंता घरीं । करी धन चि चाकरी ॥१॥ होय बैसल्या व्यापार । न लगे सांडावें चि घर ॥ध्रु.॥ रानीं वनीं दीपीं । असतीं तीं होतीं सोपीं ॥२॥ तुका म्हणे मोल । देतां कांहीं नव्हे खोल ॥३॥

1793 " धनवंतालागीं । सर्वमान्यता आहे जगीं ॥१॥ माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥ध्रु.॥ जव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥२॥ सदा शृंगारभूषणें । कांता लवे बहुमानें ॥३॥ तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥४॥

1794 " धना गुंतलें चित्त माझें मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारीं । मरे हिंडतां न पुरे यासि कांहीं । मही ठेंगणी परी तें तृप्त नाहीं ॥१॥ न दिसे शुद्ध पाहातां निजमती । पुढें पडिलों इंद्रियां थोर घातीं । जिवा नास त्या संगती दंड बेडी । हरी शीघ्र या दुष्टसंगासि तोडीं ॥२॥ असीं आणिकें काय सांगों अनंता । मोहो पापिणी दुष्टमायाममता । क्रोध काम यातना थोर करी । तुजवांचुनी सोडवी कोण हरी ॥३॥ निज देखतां निज हे दूरि जाये । निद्रा आळस दंभ यी भीत आहे । तयां विस्त देहीं नको देउं देवा । तुजवांचुनी आणिक नास्ति हेवा ॥४॥ करीं घात पात शंका लाज थोरी । असे सत्य भाव बहू भक्ति दूरी । नको मोकलूं दीनबंधु अनाथा । तुका वीनवी ठेवुनी पायिं माथा ॥५॥

1795 " धनासीं च धन । करी आपण जतन ॥१॥ तुज आळवितां गोडी । पांडुरंगा खरी जोडी ॥ध्रु.॥ जेविल्याचें खरें । वरी उमटे ढेंकरें ॥२॥ तुका म्हणे धाय । तेथें कोठें उरे हाय ॥३॥

1796 " धनी ज्या पाइका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥१॥ जिवाचे उदार शोभती पाईंक । मिरवती नाईंक मुगुटमणि ॥ध्रु.॥ आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥२॥ कमाइचीं हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥३॥ तुका म्हणे तरि पाइकी च भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥४॥

1797 " धनें वित्तें कुळें । अवघियानें ते आगळे ॥१॥ ज्याचे नारायण गांठीं । भरला हृदय संपुटीं ॥ध्रु.॥ अवघें चि गोड । त्याचें पुरलें सर्व कोड ॥२॥ तुका म्हणे अस्त । उदय त्याच्या तेजा नास्त ॥३॥

1798 " धन्य जालों हो संसारीं । आम्ही देखिली पंढरी ॥१॥ चंद्रभागे करूं स्नान । पुंडलीकाचें दर्शन ॥ध्रु.॥ करूं क्षेत्रप्रदक्षिणा। भेटूं सत या सज्जनां ॥२॥ उभे राहूं गरुडपारीं । डोळेंभरुनी पाहों हरी ॥३॥ तुका म्हणे वाळवंटीं । महालाभ फुकासाटीं ॥४॥

1799 " धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥१॥ धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥ध्रु.॥ धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥२॥ धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे ॥३॥ धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥४॥ तुका म्हणे धन्य संसारातें आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥५॥

1800 " धन्य तो ग्राम जेथें हरिदास । धन्य तो चि वास भाग्य तया ॥१॥ ब्रम्हज्ञान तेथें असे घरोघरीं । धन्य त्या नरनारी चतुर्भुज ॥ध्रु.॥ नाहीं पापा रिघ काळाचें जीवन । हरिनामकीर्त्तन घरोघरीं ॥२॥ तुका म्हणे तिहीं तारिलें सकळां । आपल्या कोटिकुळासहित जीव ॥३॥

1801 " धन्य दिवस आजि डोळियां लाधला । आनंद देखिला धणीवरी ॥१॥ धन्य जालें मुख निवाली रसना । नाम नारायणा घोंष करूं ॥ध्रु.॥ धन्य हें मस्तक सर्वांग शोभलें । संताचीं पाउलें लागताती ॥२॥ धन्य आजि पंथें चालती पाउलें । टाळिया शोभले धन्य कर ॥३॥ धन्य तुका म्हणे आम्हांसी फावलें । पावलों पाउलें विठोबाचीं ॥४॥

1802 " धन्य दिवस आजि दरुषण संतांचें । नांदे तया घरीं दैवत पंढरीचें ॥१॥ धन्य पुण्य रूप कैसा जालें संसार । देव आणि भक्त दुजा नाहीं विचार ॥ध्रु.॥ धन्य पूर्व पुण्य वोडवलें निरुतें । संतांचें दर्शन जालें भाग्यें बहुतें ॥२॥ तुका म्हणे धन्य आम्हां जोडली जोडी । संतांचे चरण आतां जीवें न सोडीं ॥३॥

1803 " धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ॥१॥ न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें ॥ध्रु.॥ सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥२॥ विष्णुपद गया रामधाम काशी । अवघीं पायांपाशीं विठोबाच्या ॥३॥ तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नास अहंकाराचा ॥४॥

1804 " धन्य बा ह्या ऐशा नारी । घरीं दारीं नांदती ॥१॥ चोरूनिया तुजपाशीं । येतां त्यांसी न कळतां ॥ध्रु.॥ दोन्हीं ठायीं समाधान । सम कठीण बहुतचि ॥२॥ तुका म्हणे जीवासाठीं । दुर्लभ भेटी ते देवा ॥३॥

1805 " धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ॥१॥ धन्य जालों आतां यासि संदेह नाहीं । न पडों या वाहीं काळा हातीं ॥ध्रु.॥ ब्रम्हरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥२॥ तुका म्हणे पोट धालें चि न धाये । खादलें चि खायें आवडीनें ॥३॥

1806 " धन्यधन्य ज्यास पंढरीसी वास । धन्य ते जन्मास प्राणी आले ॥१॥ बहु खाणीमध्यें होत कोणी एक । त्रिगुण कीटक पक्षिराज ॥ध्रु.॥ उत्तम चांडाळ नर नारी बाळ । अवघे चि सकळ चतुर्भुज ॥२॥ अवघा विठ्ठल तेथें दुजा नाहीं । भरला अंतर्बाहि सदोदीत ॥३॥ तुका म्हणे येथें होउनी राहेन । सांडोवा पाषाण पंढरीचा ॥४॥

1807 " धन्या आतां काय करूं । माझें तान्हुलें लेकरूं ॥१॥ धन्या अवचित मरण आलें । मज कोणासी निरविलें ॥ध्रु.॥ माझें दारवंड नका पाडूं । त्याचे हात पाय तोडूं ॥२॥ एके हातीं धरली दाढी । घे कुर्‍हाडी दुजे हातीं ॥३॥ येरी घाव घालूं पाहे । तंव तो उठोनि उभा राहे ॥४॥ तुका म्हणे अवघीं चोरें । सेकी रामनाम सोइरें ॥५॥

1808 " धन्ये शुद्ध जाती । धरीं लौकरी परती ॥१॥ ऐकिलें तें चि कानीं । होय परिपाक मनीं ॥ध्रु.॥ कळवळा पोटीं । सावधान हितासाठीं ॥२॥ तुका म्हणे भाव । त्याचा तो चि जाणां देव ॥३॥

1809 " धरावा तो बरा । ठाव वसतीचा थारा ॥१॥ निजविल्या जागविती । निज पुरवूनि देती ॥ध्रु.॥ एक वेवसाव । त्यांचा संग त्यांचा जीव ॥२॥ हितें केलें हित । ग्वाही एक एकां चित्त ॥३॥ विषमाचें कांहीं । आड तया एक नाहीं ॥४॥ तुका म्हणे बरीं । घरा येतील त्यापरी ॥५॥

1810 " धरावें तों भय । अंतरोनि जाती पाय ॥१॥ जाल्या तुटी देवासवें । काय वांचोनि करावें ॥ध्रु.॥ कोणासी पारिखें । लेखूं आपणासारिखें ॥२॥ तुका म्हणे असो । अथवा हें आतां नासो ॥३॥

1811 " धरितां इच्छा दुरी पळे । पाठी सोहळे उदासा ॥१॥ म्हणऊनि असट मन । नका खुण सांगतों ॥ध्रु.॥ आविसापासी अवघें वर्म । सोस श्रम पाववी ॥२॥ तुका म्हणे बीज न्यावें । तेथें यावें फळानें ॥३॥

1812 " धरितां ये पंढरीची वाट । नाहीं संकट मुक्तीचें ॥१॥ वंदूं येती देव पदें । त्या आनंदें उत्साहें ॥ध्रु.॥ नृत्यछंदें उडती रज । जे सहज चालतां ॥२॥ तुका म्हणे गरुड टके । वैष्णव निके संभ्रम ॥३॥

1813 " धरितों वासना परी नये फळ । प्राप्तीचा तो काळ नाहीं आला ॥१॥ तळमळी चत्ति घातलें खापरीं । फुटतसे परी लाहीचिया ॥ध्रु.॥ प्रकार ते कांहीं नावडती जीवा । नाहीं पुढें ठावा काळ हातीं ॥२॥ जातों तळा येतों मागुता लौकरी । वोळशाचे फेरी सांपडलों ॥३॥ तुका म्हणे बहु करितों विचार । उतरें डोंगर एक चढें ॥४॥

1814 " धरियेलीं सोंगें । येणें अवघीं पांडुरंगें ॥१॥ तें हें ब्रम्ह विटेवरी । उभें चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥ अंतर व्यापी बाहे । धांडोळितां कोठें नोहे ॥२॥ योगयागतपें । ज्याकारणें दानजपें ॥३॥ दिले नेदी जति । भोग सकळ ज्या होती ॥४॥ अवघी लीळा पाहे । तुका म्हणे दासां साहे ॥५॥

1815 " धरियेलें रूप कृष्ण नाम बुंथी । परब्रम्ह क्षिती उतरलें ॥१॥ उत्तम हें नाम राम कृष्ण जगीं । तरावयालागीं भवनदी ॥२॥ दिनानाथब्रिदें रुळती चरणी । वंदितील मुनि देव ॠषि ॥३॥ ॠषीं मुनीं भेटी दिली नारायणें । आणीक कारणें बहु केलीं ॥४॥ बहु कासावीस जाला भक्तांसाटीं । तुका म्हणे आटी सोसियेली ॥५॥

1816 " धरिलीं जीं होतीं चित्तीं । डोळां तीं च दिसती ॥१॥ आलें आवडीस फळ । जालें कारण सकळ ॥ध्रु.॥ घेईंन भातुकें । मागोनियां कवतुकें ॥२॥ तुका म्हणे लाड । विठोबा पुरवील कोड ॥३॥

1817 " धरिल्या देहाचें सार्थक करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥ लावीन निशान जावया वैकुंठा । माजवीन पेठा कीर्तनाच्या ॥ध्रु.॥ नामाचिया नौका करीन सहस्रवरि । नावाडा श्रीहरि पांडुरंग ॥२॥ भाविक हो येथें धरा रे आवांका । म्हणे दास तुका शुद्धयाति ॥३॥

1818 " धरी दोही ठायीं सारखा चि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥१॥ दोन्ही एके ठायीं केल्या नारायणें । वाढविला तिणें आणि व्याली ॥२॥ व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणें मायबापा ॥३॥ माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्न यासि ॥४॥ कोण जाणे याचे अंतरींचा भाव । कळों नेदी माव तुका म्हणे ॥५॥

1819 " धरूनि पालव असुडीन करें । मग काय बरें दिसे लोकीं ॥१॥ काय तें विचारा ठायींचें आपणां । जो हा नारायणा अवकाश ॥ध्रु.॥ अंतर पायांसी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालों नेदीं ॥२॥ रुसलेती तरी होईंल बुझावणी । तांतडी करूनि साधावें हें ॥३॥ सांपडलिया आधीं कारणासी ठाव । येथें करूं भाव दृढ आतां ॥४॥ तुका म्हणे तुझे ठाउके बोभाट । मग खटपट चुकली ते ॥५॥

1820 " धरूनि हें आलों जीवीं । भेटी व्हावी विठोबासी ॥१॥ संकल्प तो नाहीं दुजा । महाराजा विनवितों ॥ध्रु.॥ पायांवरि ठेविन भाळ । येणें सकळ पावलें ॥२॥ तुका म्हणे डोळेभरी । पाहिन हरी श्रीमुख ॥३॥

1821 " धरूनियां चाली हांवा । येइन गांवां धांवत ॥१॥ पाठविसी मूळ तरी । लवकरी विठ्ठले ॥ध्रु.॥ नाचेन त्या प्रेमसुखें । कीर्ती मुखें गाईंन ॥२॥ तुका म्हणे संतमेळीं । पायधुळी वंदीन ॥३॥

1822 " धरूनियां मनीं बोलिलों संकल्प । होसी तरि बाप सिद्धी पाव ॥१॥ उत्कंठा हे आजी जाली माझे पोटीं । मोकळिली गोष्टी टाळाटाळ ॥ध्रु.॥ माझा मज असे ठाउका निर्धार । उपाधि उत्तर न साहे पैं ॥२॥ तुका म्हणे जरि दिली आठवण । तरि अभिमान धरीं याचा ॥३॥

1823 " धरूनियां सोईं परतलें मन । अनुलक्षीं चरण करूनियां ॥१॥ येई पांडुरंगे नेई सांभाळूनि । करुणावचनीं आळवितों ॥ध्रु.॥ बुद्धि जाली साहए परि नाहीं बळ । अवलोकितों जळ वाहे नेत्रीं ॥२॥ न चलती पाय गळित जाली काया । म्हणऊनि दया येऊं द्यावी ॥३॥ दिशच्या करितों वारियासीं मात । जोडुनियां हात वास पाहें ॥४॥ तुका म्हणे वेग करावा सत्वर । पावावया तीर भवनदीचें ॥५॥

1824 " धरोनि दोन्ही रूपें पाळणें संहार । करी कोप रुद्र दयाळ विष्णु ॥१॥ जटाजूट एका मुगुट माथां शिरीं । कमळापति गौरीहर एक ॥ध्रु.॥ भस्मउद्धळण लक्ष्मीचा भोग । शंकर श्रीरंग उभयरूपीं ॥२॥ वैजयंती माळा वासुगीचा हार । लेणें अळंकार हरिहरा ॥३॥ कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ॥४॥ तुका म्हणे मज उभयरूपीं एक । सारोनि संकल्प शरण आलों ॥५॥

1825 " धरोनियां फरश करी । क्तजनाचीं विघ्नें वारी ॥१॥ ऐसा गजानन महाराजा । त्याचें चरणीं हालो लागो माझा ॥ध्रु.॥ सेंदुर शमी बहुप्रिय ज्याला । तुरा दुर्वांचा शोभला ॥२॥ उंदिर असे जयाचें वहन । माथां जडितमुगुट पूर्ण ॥३॥ नागयज्ञोपवीत रुळे । शुभ्र वस्त्र शोभित साजिरें ॥४॥ भावमोदक हराभरी । तुका भावें हे पूजा करी ॥५॥

1826 " धर्म तो न कळे । काय झांकितील डोळे ॥१॥ जीव भ्रमले या कामें । कैसीं कळों येती वर्में ॥ध्रु.॥ विषयांचा माज । कांहीं धरूं नेदी लाज ॥२॥ तुका म्हणे लांसी । माया नाचविते कैसी ॥३॥

1827 " धर्म रक्षावया अवतार घेशी । आपुल्या पाळिसी भक्तजना ॥१॥ अंबॠषीसाटीं जन्म सोसियेलें । दुष्ट निर्दाळिले किती एक ॥ध्रु.॥ धन्य तुज कृपासिंधु म्हणतील । आपुला तूं बोल साच करीं ॥२॥ तुका म्हणे तुज वणिऩती पुराणें । होय नारायणें दयासिंधु ॥३॥

1828 " धर्माचे पाळण । करणें पाषांड खंडण ॥१॥ हें चि आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥ध्रु.॥ तीक्षण उत्तरें । हातीं घेउनि बाण फिरें ॥२॥ नाहीं भीड भार । तुका म्हणे साना थोर ॥३॥

1829 " धवळलें जगदाकार । आंधार तो निरसला ॥१॥ लपों जातां नाहीं ठाव । प्रगट पा पसारा ॥ध्रु.॥ खरियाचा दिवस आला । वाढी बोला न पुरे ॥२॥ तुका म्हणे जिवें साटीं । पडिली मिठी धुरेसी ॥३॥

1830 " धांव धांव गरुडध्वजा । आम्हां अनाथांच्या काजा ॥१॥ बहु जालों कासावीस । म्हणोनि पाहें तुझी वास ॥ध्रु.॥ पाहें पाहें त्या मारगें । कोणी येतें माझ्या लागें ॥२॥ असोनियां ऐसा । तुज सारिखा कोंवसा ॥३॥ न लवावा उशीर । नेणों कां हा केला धीर ॥४॥ तुका म्हणे चाली । नको चालूं धांव घालीं ॥५॥

1831 " धांवा केला धांवा । श्रम होऊं नेदी जीवा ॥१॥ वर्षे अमृताच्या धारा । घेई वोसंगा लेंकरा ॥ध्रु.॥ उशीर तो आतां । न करावा हे चिंता ॥२॥ तुका म्हणे त्वरें । वेग करीं विश्वंभरे ॥३॥

1832 " धांवा शीघ्रवत । किंवा घ्यावें दंडवत ॥१॥ तुमचा जातो बडिवार । आम्हीं होतों हीनवर ॥ध्रु.॥ न धरावा धीर । धांवा नका चालों स्थिर ॥२॥ तुका म्हणे वाणी । माझी लाजली जी गुणीं ॥३॥

1833 " धांवे त्यासी फावे । दुजे उगवूनि गोवे ॥१॥ घ्यावें भरूनियां घर । मग नाहीं येरझार ॥ध्रु.॥ धणी उभें केलें । पुंडलिकें या उगलें ॥२॥ तुका म्हणे ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥३॥

1834 " धांवे माते सोईं । बाळ न विचारितां कांहीं ॥१॥ मग त्याचें जाणें निकें । अंग वोडवी कौतुकें ॥ध्रु.॥ नेणे सर्प दोरी । अगी भलतें हातीं धरी ॥२॥ तीविन तें नेणें । आणीक कांहीं तुका म्हणे ॥३॥

1835 " धांवोनियां आलों पहावया मुख । गेलें माझें दुःख जन्मांतरिंचें ॥१॥ ऐकिलें ही होतें तैसें चि पाहिलें । मन स्थिरावलें तुझ्या पायीं ॥२॥ तुका म्हणे माझी इच्छा पूर्ण जाली । कांहीं न राहिली वासना हे ॥३॥

1836 " धालों सुखें ढेकर देऊं । उमटे जेवूं तोंवरी ॥१॥ क्रीडा करूं निरांजनीं । न पुरे धणी हरिसवें ॥ध्रु.॥ अवघे खेळों अवघ्यामधीं । डाईं न पडों ऐसी बुद्धी ॥२॥ तुका म्हणे वांचवीत । आम्हां सत्ता समर्थ ॥३॥

1837 " धिंदधिंद तुझ्या करीन धिंदड्या । ऐसें काय वेड्या जाणितलें ॥१॥ केली तरी बरें मज भेटी भावास । नाहीं तरि नास आरंभिला ॥ध्रु.॥ मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलेंसावें ॥२॥ तुकयाबंधु म्हणे तुझी माझी उरी । उडाली न धरीं भीड कांहीं ॥३॥

1838 " धिग तो दुर्जन नाहीं भूतदया । व्यर्थ तया माया प्रसवली ॥१॥ कठिण हृदय तया चांडाळाचें । नेणे पराचें दुःख कांहीं ॥ध्रु.॥ आपुला का प्राण तैसे सकळ लोक । न करी विवेक पशु जैसा ॥२॥ तुका म्हणे सुखें कापीतसे गळे । आपुलिया वेळे रडतसे ॥३॥

1839 " धीर तो कारण एकविधभाव । पतिव्रते नाहो सर्वभावें ॥१॥ चातक हे जळ न पाहाती दृष्टी । वाट पाहे कंठीं प्राण मेघा ॥ध्रु.॥ सूर्यविकाशनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्तउदयाची ॥२॥ धेनु येऊं नेदी जवळी आणिकां । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥३॥ तुका म्हणे नेम प्राणांसवेंसाटी । तरी च या गोष्टी विठोबाची ॥४॥

1840 " धीर तो कारण साहे होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहों चिंता दासांसी ॥१॥ सुखें करावें कीर्तन हर्षे गावे हरिचे गुण । वारी सुदर्शन आपण चि किळकाळ ॥ध्रु.॥ जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥२॥ हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका म्हणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥३॥

1841 " धीर नव्हे मनें । काय तयापाशीं उणें ॥१॥ भार घातलियावरी । दासां नुपेक्षील हरी ॥ध्रु.॥ याऐसी आटी । द्यावी द्रव्याचिये साटी ॥२॥ तुका म्हणे पोटें । देवा बहु केलें खोटें ॥३॥

1842 " धेनु चरे वनांतरीं । चत्ति बाळकापें घरीं ॥१॥ तैसें करीं वो माझे आईं । ठाव देऊनि राखें पायीं ॥ध्रु.॥ न काढितां तळमळी । जिवनाबाहेर मासोळी ॥२॥ तुका म्हणे कुडी । जीवाप्राणांची आवडी ॥३॥

1843 " धोंडएासवें आदळितां फुटे डोकें । तों तों त्याच्या सुखें घामेजेना ॥१॥ इंगळासी सन्निधान अतित्याईं । क्षेम देतां काईं सुख वाटे ॥२॥ तुका म्हणे आम्हांसवें जो रुसला । तयाचा अबोला आकाशासीं ॥३॥

1844 " ध्याइन तुझें रूप गाइन तुझें नाम । आणीक न करीं काम जिव्हामुखें ॥१॥ पाहिन तुझे पाय ठेविन तेथें डोय । पृथक तें काय न करीं मनीं ॥ध्रु.॥ तुझे चि गुणवाद आइकेन कानीं । आणिकांची वाणी पुरे आतां ॥२॥ करिन सेवा करीं चालेन मी पायीं । आणीक न वजें ठायीं तुजविण ॥३॥ तुका म्हणे जीव ठेविला तुझ्या पायीं । आणीक तो काईं देऊं कोणा ॥४॥

1845 " ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया ॥१॥ तेथें बोला कैची उरी । माझें मीपण जाला हरि ॥ध्रु.॥ चित्तचैतन्यीं पडतां मिठी । दिसे हरिरूप अवघी सृष्टि ॥२॥ तुका म्हणे सांगों काय । एकाएकीं हरिवृत्तिमय ॥३॥

1846 " न करा टांचणी । येथें कांहीं आडचणी ॥१॥ जिव्हा अमुप करी माप । विठ्ठल पिकला माझा बाप ॥२॥ तुका म्हणे सर्वकाळ । अवघा गोविंद गोपाळ ॥३॥

1847 " न करावी चिंता । भय धरावें सर्वथा ॥१॥ दासां साहे नारायण । होय रिक्षता आपण ॥ध्रु.॥ न लगे परिहार । कांहीं योजावें उत्तर ॥२॥ न धरावी शंका । नये बोलों म्हणे तुका ॥३॥

1848 " न करावी स्तुति माझी संतजनीं । होईंल या वचनीं अभिमान ॥१॥ भारें भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥२॥ तुका म्हणे गर्व पुरवील पाठी । होईंल माझ्या तुटी विठोबाची ॥३॥

1849 " न करि त्याचें गांढेपण । नारायण सद्धि उभा ॥१॥ भवसिंधूचा थडवा केला । बोलाविला पाहिजे ॥ध्रु.॥ याचे सोईं पाउल वेचे । मग कैचे आडथळे ॥२॥ तुका म्हणे खरें खोटें । न म्हणे मोटें लहान ॥३॥

1850 " न करीं उदास । माझी पुरवावी आस ॥१॥ ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥ध्रु.॥ मायबाप बंधुजन । तूं चि सोयरा सज्जन ॥२॥ तुका म्हणे तुजविरहित । माझें कोण करी हित ॥३॥

1851 " न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥१॥ अविनाश सुख देईंल निर्वाणी । चुकतील खाणी चौर्‍याशीच्या ॥ध्रु.॥ आणिकिया जीवां होईंल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥२॥ आहिक्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥३॥ तुका म्हणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥४॥

1852 " न करीं तुमची सेवा । बापुडें मी पण देवा । बोलिलों तो पाववा । पण सिद्धी सकळ ॥१॥ आणीक काय तुम्हां काम । आम्हां नेदा तरी प्रेम । कैसे धर्माधर्म । निश्चयेंसी रहाती ॥ध्रु.॥ आम्हीं वेचलों शरीरें । तुझी बीज पेरा खरें । संयोगाचें बरें । गोड होतें उभयतां ॥३॥ एका हातें टाळी । कोठें वाजते निराळी । जाला तरी बळी । स्वामीविण शोभेना ॥३॥ रूपा यावे जी अनंता । धरीन पुटाची त्या सत्ता । होईंन सरता । संतांमाजी पोसणा ॥४॥ ठेविलें उधारा । वरी काय तो पातेरा । तुका म्हणे बरा । रोकडा चि निवाड ॥५॥

1853 " न करीं पठन घोष अक्षरांचा । बीजमंत्र आमुचा पांडुरंग ॥१॥ सर्वकाळ नामचिंतन मानसीं । समाधान मनासी समाधि हे ॥ध्रु.॥ न करीं भ्रमण न रिघें कपाटीं । जाईंन तेथें दाटी वैष्णवांची ॥२॥ अनु नेणें कांहीं न वजें तपासी । नाचें दिंडीपाशीं जागरणीं ॥३॥ उपवास व्रत न करीं पारणें । रामकृष्ण म्हणें नारायण ॥४॥ आणिकांची सेवा स्तुती नेणें वाणूं । तुका म्हणे आणु दुजें नाहीं ॥५॥

1854 " न करीं रे मना कांहीं च कल्पना । चिंतीं या चरणां विठोबाच्या ॥१॥ येथें सुखाचिया रासी । पुढें ठाव नाहीं कल्पनेसी॥ध्रु.॥ सुखाचें ओतिलें साजिरें श्रीमुख । शोक मोह दुःख पाहाता नाहीं ॥२॥ तुका म्हणे येथें होईंल विसांवा । तुटतील हांवा पुढिलिया ॥३॥

1855 " न कळतां कोणीं मोडियेलें व्रत । तया प्रायिश्चत्त चाले कांहीं ॥१॥ जाणतियां वज्रलेप जाले थोर । तयांस अघोर कुंभपाक ॥ध्रु.॥ आतां जरी कोणी नाइके सांगतां । तया शिकवितां तें चि पाप ॥२॥ काय करूं मज देवें बोलविलें । माझें खोळंबिलें काय होतें ॥३॥ तुका म्हणे जना पाहा विचारूनी । सुख वाटे मनीं तें चि करा ॥४॥

1856 " न कळसी ज्ञाना न कळसी ध्याना । न कळेसी दर्शना धुंडाळितां ॥१॥ न कळेसी आगमा न कळेसी निगमा । न बोलवे सीमा वेदां पार ॥२॥ तुका म्हणे तुझा नाहीं अंतपार । म्हणोनि विचार पडिला मज ॥३॥

1857 " न कळे जी भक्ती काय करूं सेवा । संकोचोनि देवा राहिलोंसे ॥१॥ जोडोनियां कर राहिलों निवांत । पायांपाशीं चित्त ठेवूनियां ॥ध्रु.॥ दिशाभुली करीं स्थळीं प्रदक्षणा । भ्रमें नारायणा कष्टविलें ॥२॥ तुका म्हणे जालों आज्ञेचा पाळक । जीवनासी एक ठाव केला ॥३॥

1858 " न कळे तत्वज्ञान मूढ माझी मती । परि ध्यातों चित्तीं चरणकमळ ॥१॥ आगमाचे भेद मी काय जाणें । काळ तो चिंतनें सारीतसें ॥ध्रु.॥ कांहीं नेणें परि म्हणवितों दास । होइल त्याचा त्यास अभिमान ॥२॥ संसाराची सोय सांडिला मारग । दुराविलें जग एका घायें ॥३॥ मागिल्या लागाचें केलेंसे खंडण । एकाएकीं मन राखियेलें ॥४॥ तुका म्हणे अगा रखुमादेवीवरा । भक्तकरुणाकरा सांभाळावें ॥५॥

1859 " न कळे तें कळों येईंल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥१॥ न दिसे तें दिसों येईंल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥ न बोलों तें बोलों येईंल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥२॥ न भेटे तें भेटों येईंल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥३॥ अलभ्य तो लाभ होईंल अपार । नाम निरंतर म्हणतां वाचे ॥४॥ तुका म्हणे आसक्त जीव सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥५॥

1860 " न कळे ब्रम्हज्ञान आचार विचार । लटिका वेव्हार करीतसे ॥१॥ विश्वामित्री पोटीं तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचें ॥ध्रु.॥ द्रव्यइच्छेसाटीं करीतसे कथा । काय त्या पापिष्ठा न मिळे खाया ॥२॥ पोट पोसावया तोंडें बडबडी । नाहीं धडफुडी एक गोष्टी ॥३॥ तुका म्हणे तया काय व्याली रांड । येउनिया भंड जनामध्यें ॥४॥

1861 " न कळे महिमा वेद मोनावले । जेथें पांगुळले मनपवन ॥१॥ चंद्र सूर्य ज्याचें तेज वागविती । तेथें माझी मती कोणीकडे ॥ध्रु.॥ काय म्यां वाणावें तुझ्या थोरपणा । सहस्रवदना वर्णवेना ॥२॥ तुका म्हणे आम्ही बाळ तूं माउली । कृपेची साउली करीं देवा ॥३॥

1862 " न कळे माव मुनि मागे एकी अंतुरी । साठी संवत्सरां जन्म तया उदरीं ॥१॥ कैसा आकळे गे माये चपळ वो । त्रिभुवनव्यापक सकळ वो ॥ध्रु.॥ हनुमंता भेटी गर्व हरिला दोहींचा । गरुडा विटंबना रूपा सत्यभामेच्या ॥२॥ द्रौपदीचा भेद पुरविला समयीं । ॠषि फळवनीं देंठीं लावितां ठायीं ॥३॥ अर्जुनाच्या रथीं कपि स्तंभीं ठेविला । दोहीं पैज तेथें गर्व हरी दादुला ॥४॥ भावभक्ती सत्वगुण जाला दुर्जना । तुका म्हणे सकळां छंदें खेळे आपण ॥५॥

1863 " न गमे न गमे न गमे हरिविण । न मगे न मगे न मगे मेळवा शाम कोणी गे ॥१॥ तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा । दिसती दिशा ओसा वो ॥ध्रु.॥ नाठवे भूक तान विकळ जालें मन । घडी जाय प्रमाण जुगा एकी वो ॥२॥ जरी तुम्ही नोळखा सांगतें ऐका । तुकयाबंधूचा सखा जगजीवन ॥३॥

1864 " न गमेसी जाली दिवसरजनी । राहिलों लाजोनि नो बोलावें ॥१॥ रुचिविण काय शब्द वार्‍या माप । अनादरें कोप येत असे ॥ध्रु.॥ आपुलिया रडे आपुलें चि मन । दाटे समाधान पावतसें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही असा जी जाणते । काय करूं रिते वादावाद ॥३॥

1865 " न घडे मायबापें बाळकाचा घात । आपणादेखत होऊं नेदी ॥१॥ कां मी मनीं चिंता वाहूं भय धाक । काय नव्हे एक करितां तुज ॥ध्रु.॥ वर्म जाणे त्याच्या हिताचे उपाय । तान भूक वाहे कडिये खांदीं ॥२॥ तुका म्हणे तूं गा कृपावंत भारी । ऐसें मज हरी कळों आलें ॥३॥

1866 " न चलवे पंथ वेच नसतां पालवीं । शरीर विटंबिलें वाटे भीक मागावी ॥१॥ न करीं रे तैसें आपआपणां । नित्य राम राम तुम्ही सकळ म्हणा ॥ध्रु.॥ राम म्हणवितां रांडा पोरें निरविशी । पडसी यमा हांतीं जाचविती चौर्‍याशी ॥२॥ मुखीं नाहीं राम तो ही आत्महत्यारा । तुका म्हणे लाज नाहीं तया गंव्हारा ॥३॥

1867 " न देखिजे ऐसें केलें । या विठ्ठलें दुःखासी ॥१॥ कृपेचिये सिंव्हासनीं । अधिष्ठानीं बैसविलें ॥ध्रु.॥ वाजता तो नलगे वारा । क्षीरसागरा शयनीं ॥२॥ तुका म्हणें अवघें ठायीं । मज पायीं राखिलें ॥३॥

1868 " न धरी प्रतिष्ठा कोणाची यम । म्हणतां कां रे राम लाजा झणी ॥१॥ सांपडे हातींचें सोडवील काळा । तो कां वेळोवेळां नये वाचे ॥ध्रु.॥ कोण लोक जो हा सुटला तो एक । गेले कुंभपाक रवरवांत ॥२॥ तुका म्हणे हित तों म्हणा विठ्ठल । न म्हणे तो भोगील कळेल तें ॥३॥

1869 " न पडो आतां हाडीं घाव । मध्यें कींव नासक ॥१॥ करविली आत्महत्या । जीवा कां द्वंदाचा ॥ध्रु.॥ आशापाशीं गुंतला गळा । तेणें कळाहीन जालों ॥२॥ तुका म्हणे लावूं मुळी । जीवकुळी थोरेसी ॥३॥

1870 " न पवीजे तया ठाया । आलों कायाक्लेशेसीं ॥१॥ आतां माझें आणीं मना । नारायणा ओजेचें ॥ध्रु.॥ बहु रिणें पिडिलों फार । परिहार करावा ॥२॥ तुका म्हणे निर्बळशक्ति । काकुलती म्हुण येतों ॥३॥

1871 " न पालटे एक । भोळा भक्त चि भाविक ॥१॥ येरां नास आहे पुढें । पुण्य सरतां उघडें ॥ध्रु.॥ नेणे गर्भवास । एक विष्णूचा चि दास ॥२॥ तुका म्हणे खरें । नाम विठोबाचे बरें ॥३॥॥ स्वामींनीं पत्र पंढरीनाथास पंढरीस पाठविलें ते अभंग ॥ ६६ ॥ संतांबरोबर पाठविल्या पत्राचे अभंग ३६

1872 " न पालटे जाती जीवाचिये साटीं । बाहे तें चि पोटीं दावी वरी ॥१॥ अंतरीं सबाहीं सारिखा चि रंग । वीट आणि भंग नाहीं रसा ॥ध्रु.॥ घणाचिया घायें पोटीं शिरे हिरा । सांडूं नेणे धीरा आपुलिया ॥२॥ तुका म्हणे कढे करावी शीतळ । ऐसें जातिबळ चंदनाचें ॥३॥

1873 " न पाहें माघारें आतां परतोनि । संसारापासूनि विटला जीव ॥१॥ सामोरें येऊनि कवळीं दातारा । काळाचा हाकारा न साहावे ॥ध्रु.॥ सावधान चित्त होईंल आधारें । खेळतां ही बरें वाटईंल ॥२॥ तुका म्हणे कंठ दाटला या सोसें । न पवे कैसें जवळी हें ॥३॥

1874 " न पूजीं आणिकां देवां न करीं त्यांची सेवा । न मनीं या केशवाविण दुजें ॥१॥ काय उणें जालें मज तयापायीं । तें मी मागों काई कवणासी ॥ध्रु.॥ आणिकाची कीर्ती नाइकें न बोलें । चाड या विठ्ठलेंविण नाहीं ॥२॥ न पाहें लोचनीं श्रीमुखावांचूनि । पंढरी सांडूनि न वजें कोठें ॥३॥ न करीं कांहीं आस मुक्तीचे सायास । न भें संसारास येतां जातां ॥४॥ तुका म्हणे कांहीं व्हावें ऐसें जीवा । नाहीं या केशवाविण दुजें ॥५॥

1875 " न बैससी खालीं । सम उभा च पाउलीं ॥१॥ ऐसे जाले बहुत दिस । जालीं युगें अठ्ठाविस ॥ध्रु.॥ नाहीं भाग सीण । अराणूक एक क्षण ॥२॥ तुका म्हणे किती । मापें केलीं देती घेती ॥३॥

1876 " न बोलावें परी पडिला प्रसंग । हाकलितें जग तुझ्या नामें ॥१॥ लटिकें चि सोंग मांडिला पसारा । भिकारी तूं खरा कळों आलें ॥ध्रु.॥ निलाजिरीं आम्ही करोनियां धीर । राहिलों आधार धरूनियां ॥२॥ कैसा नेणों आतां करिसी शेवट । केली कटकट त्याची पुढें॥३॥ तुका म्हणे कांहीं न बोलसी देवा । उचित हे सेवा घेसी माझी ॥४॥

1877 " न बोलेसी करा वाचा । उपाधीचा संबंध ॥१॥ एका तुमच्या नामाविण । अवघा सीण कळतसे ॥ध्रु.॥ संकल्पाचे ओढी मन । पापपुण्य सम चि ॥२॥ तुका म्हणे नारायणीं । पावो वाणी विसांवा ॥३॥

1878 " न मनावी चिंता । कांहीं माझेविशीं आतां ॥१॥ ज्याणें लौकिक हा केला । तो हें निवारिता भला ॥ध्रु.॥ माझे इच्छे काय । होणार ते एक ठाय ॥२॥ सुखा आणि दुःखा । म्हणे वेगळा मी तुका ॥३॥

1879 " न मनावें तैसें गुरूचें वचन । जेणें नारायण अंतरे तें । आड आला म्हुन फोडियेला डोळा । बिळनें आंधळा शुक्र केला ॥१॥ करी देव तरी काय नव्हे एक । कां तुम्ही पृथक सिणा वांयां ॥ध्रु.॥ उलंघुनि भ्रताराची आज्ञा । अन्न ॠषिपत्न्या घेउनि गेल्या । अवघे चि त्यांचें देवें केलें काज । धर्म आणि लाज राखियेली ॥२॥ पितियासी पुत्रें केला वैराकार । प्रल्हादें असुर मारविला । बहुत विघ्नें केलीं तया आड । परि नाहीं कैवाड सांडियेला ॥३॥ गौळणी करिती देवाशीं व्यभिचार । सांडुनी आचार भ्रष्ट होती । तयां दिलें ते कोणासी नाहीं । अवघा अंतर्बाहीं तो चि जाला ॥४॥ देव जोडे ते करावे अधर्म । अंतरे तें कर्म नाचरावें । तुका म्हणे हा जाणतो कळवळा । म्हणोनि अजामेळा उद्धरिलें ॥५॥

1880 " न मनीं ते ज्ञानी न मनीं ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावें ॥१॥ धातू पोसोनियां आणिकां उपदेश । अंतरीं तो लेश प्रेम नाहीं ॥ध्रु.॥ न मनीं ते योगी न मनीं ते हरिदास । दर्शनें बहुवस बहुतां परीचीं ॥२॥ तुका म्हणे तयां नमन बाह्यात्कारी । आवडती परी चत्तिशुद्धीचे ॥३॥

1881 " न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥१॥ भलीं तेथें राहूं नये । क्षणें होईंल न कळे काय ॥ध्रु.॥ न करितां अन्याय । बळें करी अपाय ॥२॥ नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ॥३॥ भल्या बुर्‍या मारी । होतां कोणी न निवारी ॥४॥ अविचार्‍या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥५॥ तुका म्हणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥६॥

1882 " न म्हणे कवणां सद्धि साधक गंव्हार । अवघा विश्वंभर वांचूनियां ॥१॥ ऐसें माझे बुद्धि काया वाचा मन । लावीं तुझें ध्यान पांडुरंगा ॥ध्रु.॥ गातां प्रेमगुण शंका माझ्या मनीं । नाचतां रंगणीं नाठवावी ॥२॥ देई चरणसेवा भूतांचें भजन । वर्णा अभिमान सांडवूनि ॥३॥ आशापाश माझी तोडीं माया चिंता । तुजविण वेथा नको कांहीं ॥४॥ तुका म्हणे सर्व भाव तुझे पायीं । राहे ऐसें देई प्रेम देवा ॥५॥

1883 " न म्हणे वो आम्ही आपुलेनि चित्ती । निःशेष अतिप्रीति विषयीं तो ॥१॥ खोटा तो विटाळ । म्हणोनि गाबाळ सांडियेले ॥ध्रु.॥ भांगतमाखूचा चित्ताचा आदर । कोरडें उत्तर चाटावें तें ॥२॥ तुका म्हणे आम्ही नव्हों फजितखोर । तुटीचा व्यापार करावया ॥३॥

1884 " न म्हणे साना थोर । दृष्ट पापी अथवा चोर ॥१॥ सकळा द्यावी एकी चवी । तान हरूनि निववी ॥ध्रु.॥ न म्हणे दिवस राती । सर्व काल सर्वां भूतीं ॥२॥ तुका म्हणे झारी । घेतां तांब्यानें खापरी ॥३॥

1885 " न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटी । जाय तेथें दाटी । वैष्णवांची धांवोनि ॥१॥ भाविक गे माये भोळें गुणाचें । आवडे तयाचें नाम घेतां तयासी ॥ध्रु.॥ जो नातुडे कवणिये परी । तपें दानें व्रतें थोरी । म्हणतां वाचे हरि । राम कृष्ण गोविंदा ॥२॥ चौदा भुवनें जया पोटीं । तो राहे भक्तांचिये कंठीं । करूनियां साटी। चत्ति प्रेम दोहींची ॥३॥ जया रूप ना आकार । धरी नाना अवतार । घेतलीं हजार । नांवें ठेवूनि आपणां ॥४॥ ऐसा भक्तांचा ॠणी । पाहातां आगमीं पुराणीं । नाहीं तुका म्हणे ध्यानीं । तो कीर्तनीं नाचतसे ॥५॥

1886 " न लगती मज शब्दब्रम्हज्ञान । तुझिया दर्शनावांचूनियां ॥१॥ म्हणऊनि तुझें करितों चिंतन । नावडे वचन आणिकांचें ॥ध्रु.॥ काय ते महत्वी करावी मान्यता । तुज न देखतां पांडुरंगा ॥२॥ तुका म्हणे तुज दिधल्यावांचूनि । न राहे त्याहूनि होइन वेडा ॥३॥

1887 " न लगावी दिठी । माझी तुझे मुखवटी ॥१॥ आधीं पाउलें पाउलें । ते मी पाहेन तें भलें ॥ध्रु.॥ देईन हे काया । वरि सांडणें सांडाया ॥२॥ तुका म्हणे देवा । बहु आवडसी जीवा ॥३॥

1888 " न लगे चिंता आतां अन्मोन हाता । आलें मूळ भ्राता गेला त्याचें ॥१॥ घरभेद्या येथें आहे तें सुकानु । धरितों कवळून पाय दोन्ही ॥ध्रु.॥ त्याचें त्याचिया मुखें पडिलें ठावें । न लगे सारावें मागें पुढें ॥२॥ तुकयाबंधु म्हणे करील भेटी भावा । सोडीन तेधवां या विठ्ठला ॥३॥

1889 " न लगे देवा तुझें आम्हांसी वैकुंठ । सायुज्याचा पट न लगे मज ॥१॥ देई तुझें नाम मज सर्वकाळीं । मागेन वनमाळीहें चि तुज ॥ध्रु.॥ नारद तुंबर उद्धव प्रल्हाद । बळी रुक्मांगद नाम ध्याती ॥२॥ सद्धि मुनिगण गंधर्व किन्नर । करिताती गजर रामनामें ॥३॥ तुका म्हणे हरी देई तुझें नाम । अखंडित प्रेम हें चि द्यावें ॥४॥

1890 " न लगे देशकाळ । मंत्रविधानें सकळ । मनें चि निश्चळ । करूनि करुणा भाकावी ॥१॥ येतो बैसलिया ठाया । आसणें व्यापी देवराया । निर्मळ ते काया । अधिष्ठान तयाचें ॥ध्रु.॥ कल्पनेचा साक्षी । तरि आदरें चि लक्षी । आवडीनें भक्षी । कोरडें धान्य मटमटां ॥२॥ घेणें तरि भाव । लक्षी दासांचा उपाव । तुका म्हणे जीव । जीवीं मेळविल अनंत ॥३॥

1891 " न लगे द्यावा जीव सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा कांहीं ॥१॥ मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥२॥ तुका म्हणे कई होईंल स्वहित । निधान जो थीत टाकुं पाहे ॥३॥

1892 " न लगे पाहावें अबद्ध वांकडें । उच्चारावें कोडें नाम तुझें ॥१॥ नाहीं वेळ नाहीं पंडितांचा धाक । होत कां वाचक वेदवक्ते ॥ध्रु.॥ पुराणीं ही कोठें न मिळे पाहातां । तैशीं या अनंता ठेवूं नामें ॥२॥ आपुलिया मना उपजे आनंद । तैसे करूं छंद कथेकाळीं ॥३॥ तुका म्हणे आम्ही आनंदें चि धालों । आनंद चि ल्यालों अळंकार ॥४॥

1893 " न लगे मरावें । ऐसा ठाव दिला देवें ॥१॥ माझ्या उपकारासाटीं । वागविला म्हुण कंठीं ॥ध्रु.॥ घरीं दिला ठाव । अवघा सकळ ही वाव ॥२॥ तुका म्हणे एके ठायीं । कोठें माझें तुझें नाहीं ॥३॥

1894 " न लगे मायेसी बाळें निरवावें । आपुल्या स्वभावें ओढे त्यासी ॥१॥ मज कां लागला करणें विचार । ज्याचा जार भार त्याचे मायां ॥ध्रु.॥ गोड धड त्यासी ठेवी न मगतां । समाधान खातां नेदी मना ॥२॥ खेळतां गुंतलें उमगूनी आणी । बैसोनियां स्तनीं लावी बळें ॥३॥ त्याच्या दुःखेंपणें आपण खापरीं । लाही तळीं वरी होय जैसी ॥४॥ तुका म्हणे देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागों नेदी ॥५॥

1895 " न वजावा तो काळ वांयां । मुख्य दया हे देवा ॥१॥ म्हणऊनि जैसें तैसें । रहणी असें पायांचे ॥ध्रु.॥ मोकळें हे मन कष्ट । करी नष्ट दुर्जन ॥२॥ तुका म्हणे कांहीं नेणें । न वजें येणेंपरी वांयां ॥३॥

1896 " न वजे वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां वांयां न वजे ॥१॥ न वजे वांयां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ध्रु.॥ न वजे वांयां कांहीं केलिया तीर्थ । अथवा कां व्रत वांयां न वजे ॥२॥ न वजे वांयां जालें संतांचें दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥३॥ तुका म्हणे भाव असतां नसतां । सायास करितां वांयां न वजे ॥४॥

1897 " न विचारितां ठायाठाव । काय भुंके तो गाढव ॥१॥ केला तैसा लाहे दंड । खळ अविचारी लंड ॥ध्रु.॥ करावें लाताळें । ऐसें नेणे कोण्या काळें ॥२॥ न कळे उचित । तुका म्हणे नीत हित ॥३॥

1898 " न व्हावें तें जालें । तुम्हां आम्हांसी लागलें ॥१॥ आतां हालमाकलमें । भांडोनियां काढूं वर्में ॥ध्रु.॥ पाटोळ्यासवेंसाटी । दिली रगट्याची गांठी ॥२॥ तुका म्हणे हरी । आणूनियां करिन सरी ॥३॥

1899 " न संगतां तुम्हां कळों येतें अंतर । विश्वीं विश्वंभर परिहार चि न लगे ॥१॥ परि हे अनावर आवरितां आवडी । अवसान ते घडी पुरों देत नाहीं ॥ध्रु.॥ काय उणें मज येथें ठेविलिये ठायीं । पोटा आलों तईपासूनिया समर्थ ॥२॥ तुका म्हणे अवघी आवरिली वासना । आतां नारायणा दुसरियापासूनि ॥३॥

1900 " न संगावें वर्म । जनीं असों द्यावा भ्रम ॥१॥ उगींच लागतील पाठीं । होतीं रितीं च हिंपुटीं ॥ध्रु.॥ सिकविल्या गोटी । शिकोनि धरितील पोटीं ॥२॥ तुका म्हणे सीण । होइल अनुभवाविण ॥३॥

1901 " न संडावा आतां ऐसें वाटे ठाव । भयाशी उपाव रक्षणाचा ॥१॥ म्हणऊनि मनें वळियेलें मन । कारियेकारण चाड नाहीं ॥ध्रु.॥ नाना वीचि उपाधि करूनियां मूळ । राखतां विटाळ तें चि व्हावें ॥२॥ तुका म्हणे येथें न वेचे वचन । निजीं निजखूण सांपडली ॥३॥

1902 " न संडावा ठाव । ऐसा निश्चयाचा भाव ॥१॥ आतां पुरे पुन्हा यात्रा । हें चि सारूनि सर्वत्रा ॥ध्रु.॥ संनिध चि सेवा । असों करुनियां देवा ॥२॥ आज्ञेच्या पाळणें । असें तुका संतां म्हणे ॥३॥

1903 " न सरे भांडार । भरलें वेचितां अपार ॥१॥ मवित्याचें पोट भरे । पुढिलासी पुढें उरे ॥ध्रु.॥ कारणापुरता लाहो आपुलाल्या हिता ॥२॥ तुका म्हणे देवा । पुढें केला चाले हेवा ॥३॥

1904 " न सरे लुटितां मागें बहुतां जनीं । जुनाट हे खाणी उघडिली ॥१॥ सद्धि महामुनि साधक संपन्न । तिहीं हें जतन केलें होतें ॥ध्रु.॥ पायाळाच्या गुणें पडिलें ठाउकें । जगा पुंडलिकें दाखविलें ॥२॥ तुका म्हणे येथें होतों मी दुबळें । आलें या कपाळें थोडें बहु ॥३॥

1905 " नका घालूं दुध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥ नेदा तरी हें हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥२॥ तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥३॥

1906 " नका दंतकथा येथें सांगों कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥ अनुभव येथें व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हांपुढें ॥ध्रु.॥ निवडी वेगळें क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळालीं ॥२॥ तुका म्हणे येथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचें काय काम ॥३॥

1907 " नका धरूं कोणी । राग वचनाचा मनीं ॥१॥ येथें बहुतांचें हित । शुद्ध करोनि राखा चित्ती ॥ध्रु.॥ नाहीं केली निंदा । आम्हीं दुसिलेंसे भेदा ॥२॥ तुका म्हणे मज । येणें विण काय काज ॥३॥

1908 " नका मजपाशीं । वदो प्रपंचाचे विशीं ॥१॥ आतां नाइकावी कानीं । मज देवाविण वाणी ॥ध्रु.॥ येऊनियां रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥२॥ मागे आजिवरी । जालें माप नेलें चोरी ॥३॥ सांडियेलीं पानें । पुढें पिका अवलोकन ॥४॥ पडों नेदी तुका । आड गुंपूं कांहीं चुका ॥५॥

1909 " नको आतां पुसों कांहीं । लवलाहीं उसंती ॥१॥ जाय वेगीं पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥ध्रु.॥ वचनाचा न करीं गोवा । रिघें देवासीं शरण ॥२॥ तुका म्हणे कृपावंता । बहु चिंता दीनाची ॥३॥

1910 " नको ऐसें जालें अन्न । भूक तान ते गेली ॥१॥ गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ध्रु.॥ राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥२॥ देह घरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥३॥ जाऊं नेदीं करितां सोस । क्षेमा दोष करवीन ॥४॥ तुका म्हणे या च पाठी । आता साटी जीवाची ॥५॥

1911 " नको कांहीं पडों ग्रंथाचे भरीं । शीघ व्रत करीं हें चि एक ॥१॥ देवाचिये चाडे आळवावें देवा । ओस देहभावा पाडोनियां ॥ध्रु.॥ साधनें घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकीं न चुकती ॥२॥ उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा । पतनासी इच्छा आवश्यक ॥३॥ रोकडी पातली अंगसंगें जरा । आतां उजगरा कोठवरि ॥४॥ तुका म्हणे घालीं नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥५॥

1912 " नको घालूं झांसां । मना उपाधिवोळसा ॥१॥ जे जे वाहावे संकल्प । पुण्य तरी ते चि पाप ॥ध्रु.॥ उपजतो भेव । होतो कासावीस जीव ॥२॥ तुका म्हणे पाहों । होइल तें निवांत राहों ॥३॥

1913 " नको दुष्टसंग । पडे भजनामधीं भंग ॥१॥ काय विचार देखिला । सांग माझा तो विठ्ठला ॥ध्रु.॥ तुज निषेधितां । मज न साहे सर्वथा ॥२॥ एका माझ्या जीवें । वाद करूं कोणासवें ॥३॥ तुझे वणूप गुण । कीं हे राखों दुष्टजन ॥४॥ काय करूं एका । मुखें सांग म्हणे तुका ॥५॥

1914 " नको देऊं देवा पोटीं हें संतान । मायाजाळें जाण नाठवसी ॥१॥ नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेग होय जीवा ॥२॥ तुका म्हणे करीं फकिराचे परी । रात्रदिवस हरि येइल घरा ॥३॥

1915 " नको धरूं आस व्हावें या बाळांस । निर्माण तें त्यांस त्यांचें आहे ॥१॥ आपुला तूं गळा घेई उगवूनि । चुकवीं जाचणी गर्भवास ॥ध्रु.॥ अवेज देखोनि बांधितील गळा । म्हणोनि निराळा पळतुसें ॥२॥ देखोनियां त्यांचा अवघड मार । कांपे थरथर जीव माझा ॥३॥ तुका म्हणे जरी आहे माझी चाड । तरी करीं वाड चित्ति आतां ॥४॥

1916 " नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥ काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥ध्रु.॥ सोडवीना राजा देशींचा चौधरी । आणीक सोइरीं भलीं भलीं ॥२॥ तुका म्हणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वांचूनियां ॥३॥

1917 " नको बोलों भांडा । खीळ घालुन बैस तोंडा ॥१॥ ऐक विठोबाचे गुण । करीं सादर श्रवण ॥ध्रु.॥ प्रेमसुखा आड । काय वाजातें चाभाड ॥२॥ तुका म्हणे हिता । कां रे नागवसी थीता ॥३॥

1918 " नको ब्रम्हज्ञान आत्मस्थितीभाव । मी भक्त तूं देव ऐसें करीं ॥१॥ दावीं रूप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥ध्रु.॥ पाहोनि श्रीमुख देइन आलिंगन । जीवें निंबलोण उतरीन ॥२॥ पुसतां सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥३॥ तुका म्हणे यासी न लावीं उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥४॥

1919 " नको मज ताठा नको अभिमान । तुजवांचूनि क्षीण होतो जीव ॥१॥ दुर्धर हे माया न होय सुटका । वैकुंठनायका सोडवीं मज ॥२॥ तुका म्हणे तुझें जालिया दर्षण । मग निवारण होइल सर्व ॥३॥

1920 " नको माझे मानूं आहाच ते शब्द । कळवळ्याचा वाद करीतसें ॥१॥ कासयानें बळ करूं पायांपाशीं । भाकावी ते दासीं करुणा आम्हीं ॥ध्रु.॥ काय मज चाड असे या लौकिकें । परी असे निकें अनुभवाचें ॥२॥ लांचावल्यासाटीं वचनाची आळी । टकळ्यानें घोळी जवळी मन ॥३॥ वाटतसे आस पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें लावियेले ॥४॥ तुका म्हणे माझी येथें चि आवडी । श्रीमुखाची जोडी इच्छीतसें ॥५॥

1921 " नको येऊं लाजे होय तूं परती । भजों दे श्रीपती सखा माझा ॥१॥ तुझे संगतीनें मोटा जाला घात । जालों मी अंकित दुर्जनाचा ॥२॥ तुका म्हणे रांडे घेइन काठीवरी । धनी सहाकारी राम केला ॥३॥

1922 " नको विद्या वयसा आयुष्य फारसें । नाहीं मज पिसें मुक्तीचें ही ॥१॥ रामकृष्ण म्हणतां जावो माझा प्राण । हें चि कृपादान मागतसें ॥ध्रु.॥ नको धन मान न वाढे संतान । मुखीं नारायण प्राण जावा ॥२॥ तुका म्हणे दीन काकुलती येतों । तुज निरवितों पांडुरंगा ॥३॥

1923 " नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥ मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥ध्रु.॥ नको गुंपों भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥२॥ तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥३॥

1924 " नटनाट्य तुम्ही केलें याच साटीं । कवतुकें दृष्टी निववावी ॥१॥ नाहीं तरि काय कळलें चि आहे । वाघ आणि गाय लांकडाची ॥ध्रु.॥ अभेद चि असे मांडियेलें खेळा । केल्या दीपकळा बहुएकी ॥२॥ तुका म्हणे रूप नाहीं दर्पणांत । संतोषाची मात दुसरें तें ॥३॥

1925 " नभोमय जालें जळ । एकीं सकळ हरपलें ॥१॥ आतां काय सारासारी । त्याच्या लहरी तयांत ॥ध्रु.॥ कैचा तेथ यावा सांडी । आप कोंडी आपण्यां ॥२॥ तुका म्हणे कल्प जाला । अस्त गेला उदय ॥३॥

1926 " नमस्कारी भूतें विसरोनि याती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥१॥ परउपकारीं वेचियेल्या शक्ती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥ध्रु.॥ द्वयें द्वैतभाव नाहीं जया चत्तिीं । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥२॥ जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥३॥ उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भक्ति मानव तो ॥४॥ तुकयाबंधु म्हणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥५॥

1927 " नमावे पाय हें माझें उचित । आशीर्वादें हित तुमचिया॥१॥ कृपेचा वोरस न समाये पोटीं । म्हणोनि उफराटीं वचनें हीं ॥ध्रु.॥ तुमची उष्टावळी हें माझें भोजन । झाडावें अंगण केरपुंजे ॥२॥ परि ऐसें पुण्य नाहीं माझें गांठीं । जेणें पडे मिठी पायांसवें ॥३॥ तुका म्हणे राहे आठवण चित्ती । ऐशी कृपा संतीं केली तुम्हीं ॥४॥

1928 " नमितों या देवा । माझी एके ठायीं सेवा ॥१॥ गुणअवगुण निवाडा । म्हैस म्हैस रेडा रेडा ॥ध्रु.॥ जनीं जनार्दन । साक्ष त्यासी लोटांगण ॥२॥ तुका म्हणे खडे । निवडू दळणीं घडघडे ॥३॥

1929 " नमो विष्णुविश्वरूपा मायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥ विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥ तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांत चि ठेला नेति नेति ॥२॥ ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां ते गुण न सरती ॥३॥ तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥

1930 " नमोनमो तुज माझें हें कारण । काय जालें उणें करितां स्नान ॥१॥ संतांचा मारग चालतों झाडूनि । हो का लाभ हानि कांहींतरि ॥ध्रु.॥ न करिसी तरि हेंचि कोडें मज । भक्ती गोड काज आणीक नाहीं ॥२॥ करीं सेवा कथा नाचेन रंगणीं । प्रेमसुखधणी पुरेल तों ॥३॥ महाद्वारीं सुख वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥४॥ तुका म्हणे नाहीं मुक्तिसवें चाड । हें चि जन्म गोड घेतां मज ॥५॥

1931 " नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥१॥ हें चि शूरत्वाचे अंग । हरी आणिला श्रीरंग ॥ध्रु.॥ अवघा जाला पण । लवण सकळां कारण ॥२॥ तुका म्हणे पाणी । पाताळ तें परी खणी ॥३॥

1932 " नये इच्छूं सेवा स्वइच्छा जगाची । अवज्ञा देवाची घडे तेणें ॥१॥ देहाचा निग्रही त्याचें तो सांभाळी । मग नये किळ अंगावरी ॥ध्रु.॥ आपलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणें क्षोभें ॥२॥ तुका म्हणे सांडा देखीचे दिमाख । मोडसीचें दुःख गांड फाडी ॥३॥

1933 " नये ऐसें बोलों कठिण उत्तरें । सलगी लेंकुरें केली पुढें ॥१॥ अपराध कीजे घडला तो क्षमा । सिकवा उत्तमा आमुचिया॥ध्रु.॥ धरूं धावें आगी पोळलें तें नेणे । ओढिलिया होणें माते बाळा ॥२॥ तुका म्हणे फार ज्याचा जार त्यासी । प्रवीण येविशीं असा तुम्ही ॥३॥

1934 " नये पाहों मुख मात्रागमन्याचें । तैसें अभक्ताचें गुरुपुत्रा ॥१॥ म्हणऊनि बरें धरितां एकांत । तेणें नव्हे घात भजनासी ॥ध्रु.॥ नये होऊं कदा निंदकाची भेटी । जया द्वैत पोटीं चांडाळाच्या ॥२॥ तुका म्हणे नका बोलों त्यासी गोष्टी । जयाचिये दृष्टी पाप वाढे ॥३॥

1935 " नये पुसों आज्ञा केली एकसरें । आम्हांसी दुसरें आतां नाहीं ॥१॥ ज्याचें तो बळिवंत सर्व निवारिता । आम्हां काय चिंता करणें लागें ॥ध्रु.॥ बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक । काय नाहीं एक अंगीं तया ॥२॥ तुका म्हणे मज होईंल वारिता । तरी काय सत्ता नाहीं हातीं ॥३॥

1936 " नये वांटूं मन । कांहीं न देखावें भिन्न ॥१॥ पाय विठोबाचे चित्ती । असों द्यावे दिवसराती ॥ध्रु.॥ नये काकुळती । कोणा यावें हरिभक्ति ॥२॥ तुका म्हणे साईं । करील कृपेची विठाईं ॥३॥

1937 " नये सोमसरी उपचाराची हरी । करकरेचें करीं काळें तोंड ॥१॥ मागतों इतुकें जोडुनियां कर । ठेउनियां शीर पायांवरी ॥ध्रु.॥ तुम्हां आम्हां एके ठायीं सहवास । येथें द्वैत द्वेष काय बरा ॥२॥ तुकयाबंधु म्हणे बहुतां बहुतां रीती । अनंता विनंती परिसावी हे ॥३॥

1938 " नये स्तवूं काचें होतें क्रियानष्ट । फुंदाचे ते कष्ट भंगा मूळ ॥१॥ नाहीं परमार्थ साधत लौकिकें । धरुन होतों फिकें अंगा आलें ॥ध्रु.॥ पारखिया पुढें नये घालूं तोंड । तुटी लाभा खंड होतो माना ॥२॥ तुका म्हणे तरी मिरवतें परवडी । कामावल्या गोडी अविनाश ॥३॥

1939 " नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनीं कुडी बुद्धि ॥१॥ ऐसें मागा अरे जना । नारायणा विनवूनि ॥ध्रु.॥ कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥२॥ तुका म्हणे नानाछंदें । या विनोदें न पडावें ॥३॥

1940 " नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥१॥ न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥ असावें म्यां सदा विषयीं विरक्त । काया वाचा चित्त तुझे पायीं ॥२॥ करोनियां साहए पुरवीं मनोरथ । व्हावें कृपावंत तुका म्हणे ॥३॥

1941 " नरदेह वांयां जाय । सेवीं सद्ग‍ूचे पाय ॥१॥ सांडोनियां अहंभाव । धरीं भक्ती पूजीं देव ॥ध्रु.॥ थोराचिये वाटे । जातां भवशोक आटे ॥२॥ प्रल्हादातें तारी । तुका म्हणे तो कंठीं धरीं ॥३॥

1942 " नरस्तुति आणि कथेचा विकरा । हें नको दातारा घडों देऊं ॥१॥ ऐसिये कृपेचि भाकितों करुणा । आहेसि तूं राणा उदाराचा ॥ध्रु.॥ पराविया नारी आणि परधना । नको देऊं मनावरी येऊं ॥२॥ भूतांचा मत्सर आणि संतनिंदा । हें नको गोविंदा घडों देऊं ॥३॥ देहअभिमान नको देऊं शरीरीं । चढों कांहीं परी एक देऊं ॥४॥ तुका म्हणे तुझ्या पायांचा विसर । नको वारंवार पडों देऊं ॥५॥

1943 " नव जातां घरा । आम्ही कोणाच्या दातारा ॥१॥ कां हे छळूं येती लोक । दाट बळें चि कंटक ॥ध्रु.॥ नाहीं आम्ही खात । कांहीं कोणाचें लागत ॥२॥ कळे तैसी सेवा । तुका म्हणे करूं देवा ॥३॥

1944 " नव्हतियाचा सोस होता । झडो आतां पदर ॥१॥ देखणें तें देखियेलें । आतां भलें साक्षित्वें ॥ध्रु.॥ लाभें कळों आली हानि । राहों दोन्हीं निराळीं ॥२॥ तुका म्हणे एकाएकीं । हा कां लोकीं पसारा ॥३॥

1945 " नव्हती आली सीसा सुरी अथवा घाय पाठीवरी । तो म्यां केला हरी एवढा तुम्हां आकांत ॥१॥ वांटिलासी दोहीं ठायीं मजपाशीं आणि डोहीं । लागों दिला नाहीं येथें तेथें आघात ॥ध्रु.॥ जीव घेती मायबापें थोड्या अन्याच्या कोपें । हें तों नव्हे सोपें साहों तों चि जाणीतलें ॥२॥ तुका म्हणे कृपावंता तुज ऐसा नाहीं दाता । काय वाणूं आतां वाणी माझी कुंटली ॥३॥

1946 " नव्हती ते संत करितां कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत ॥१॥ येथें नाहीं वेश सरतें आडनांवें । निवडे घावडाव व्हावा अंगीं ॥ध्रु.॥ नव्हती ते संत धरितां भोंपळा । करितां वाकळा प्रावरण ॥२॥ नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराणें नव्हती संत ॥३॥ नव्हती ते संत वेदाच्या पठणें । कर्म आचरणें नव्हती संत ॥४॥ नव्हती संत करितां तप तीर्थाटणें । सेविलिया वन नव्हती संत ॥५॥ नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणें । भस्म उधळणें नव्हती संत ॥६॥ तुका म्हणे नाहीं निरसला देहे । तों अवघे हे सांसारिक ॥७॥

1947 " नव्हती भेटी तों चि बरें । होतां चोरें नाडिलें ॥१॥ अवाघियांचा केला झाडा । रिता वाडा खोंकर ॥ध्रु.॥ चिंतनांचें मूळ चत्ति । नेलें वृत्ति हरूनि ॥२॥ तुका म्हणे मूळा आलें । होतें केलें तैसें चि ॥३॥

1948 " नव्हती माझे बोल जाणां हा निर्धार । मी आहें मजूर विठोबाचा ॥१॥ निर्धारा वचन सोडविलें माझ्या । कृपाळुवें लज्जा राखियेली ॥ध्रु.॥ निर्भर मानसीं जालों आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषें ॥२॥ आतां भय माझें नासलें संसारीं । जालोंसें यावरी गगनाचा ॥३॥ तुका म्हणे हा तों संतांचा प्रसाद । लाधलों आनंद प्रेमसुख ॥४॥

1949 " नव्हती हीं माझीं जायाचीं भूषणें । असे नारायणें उचित केलें ॥१॥ शब्दाच्या वोवोनी रत्नाचिया माळा । मुळींच जिव्हाळा झरवणी ॥ध्रु.॥ अर्थांतरीं असे अनुभवसेवन । परिपाकीं मन साक्ष येथें ॥२॥ तुका म्हणे मज सरतें परतें । हें नाहीं अनंतें उरों दिलें ॥३॥

1950 " नव्हती हे उसणे बोल । आहाच फोल रंजवण ॥१॥ अनुभव तो वरावरी । नाहीं दुरी वेगळा ॥ध्रु.॥ पाहिजे तें आलें रुची । काचाकुची काशाची ॥२॥ तुका म्हणे लाजे आड । त्याची चाड कोणासी ॥३॥

1951 " नव्हतील जपें नव्हतील तपें । आम्हांसी हें सोपें गीतीं गातां ॥१॥ न करितां ध्यान न करितां धारणा । तो नाचे कीर्तनामाजी हरि ॥ध्रु.॥ जयासी नाहीं रूप आणि आकार । तो चि कटी कर उभा विटे ॥२॥ अनंत ब्रम्हांडें जयाचिया पोटीं । तो आम्हां संपुष्टीं भक्तिभावें ॥३॥ तुका म्हणे वर्म जाणती लडिवाळें । जें होतीं निर्मळें अंतर्बाहीं ॥४॥

1952 " नव्हतें तें कळों आलें । तरी बोलें अबोला ॥१॥ तुज मज घातली तुटी । एके भेटीपासूनि ॥ध्रु.॥ आतां याची न धरीं चाड । कांहीं कोड कवतुकें ॥२॥ तुका म्हणे यावें जावें । एका भावें खंडलें ॥३॥

1953 " नव्हावा तो बरा मुळीं च संबंध । विश्वासिकां वध बोलिलासे ॥१॥ आतां माझें हित काय तें विचारा । सत्यत्वें दातारा पांडुरंगा ॥ध्रु ॥ नाहीं भाव परी म्हणवितों दास । नका देऊं यास उणेंयेऊं ॥२॥ तुका म्हणे कां हो उद्धरितां दीन । मानीतसां सीण मायबापा ॥३॥

1954 " नव्हे खळवादी मता च पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥१॥ साक्षत्वेंसी मना आणावीं उत्तरें । परिपाकीं खरें खोटें कळे ॥ध्रु.॥ नव्हे एकदेशी शब्द हा उखता । ब्रम्हांडापुरता घेईल त्यासी ॥२॥ तुका विनवणी करी जाणतियां । बहुमतें वांयां श्रमों नये ॥३॥

1955 " नव्हे गुरुदास्य संसारियां । वैराग्य तरी भेणें कांपे विषयां । तैसें नाम पंढरीराया । जया सायास न लगती ॥१॥ म्हणोनि गोड सर्वभावें । आंघोळी न लगे तोंड धुवावें । अर्थचाड जीवें । न लगे भ्यावें संसारा ॥ध्रु.॥ कर्मा तंव न पुरे संसारिक । धर्म तंव फळदायक । नाम विठ्ठलाचें एक । नाशी दुःख भवाचें ॥२॥ न लगे सांडणें मांडणें । आगमनिगमाचें देखणें । अवघें तुका म्हणे । विठ्ठलनामें आटलें ॥३॥

1956 " नव्हे जोखाईं जोखाईं । मायराणी मेसाबाईं ॥१॥ बिळया माझा पंढरिराव । जो या देवांचा ही देव ॥ध्रु.॥ रंडी चंडी शक्ति । मद्यमांस भिक्षती ॥२॥ बहिरव खंडेराव । रोटीसुटीसाटीं देव ॥३॥ गणोबा विक्राळ । लाडुमोदकांचा काळ ॥४॥ मुंज्या म्हैसासुरें । हें तों कोण लेखी पोरें ॥५॥ वेताळें फेताळें । जळो त्यांचें तोंड काळें ॥६॥ तुका म्हणे चित्तीं । धरा रखुमाईंचा पती ॥७॥

1957 " नव्हे तुम्हां सरी । येवढें कारण मुरारी ॥१॥ मग जैसा तैसा काळ । दाट सारावा पातळ ॥ध्रु.॥ स्वामींचें तें सांडें । पुत्र होतां काळतोंडें ॥२॥ शब्दा नाहीं रुची । मग कोठें तुका वेची ॥३॥

1958 " नव्हे धीर कांहीं पाठवूं निरोप । आला तरीं कोप येऊ सुखें ॥१॥ कोपोनियां तरी देईंल उत्तर । जैसें तैसें पर फिरावूनि ॥ध्रु.॥ नाहीं तया तरी काय एक पोर । मज तों माहेर आणीक नाहीं ॥२॥ तुका म्हणे असे तयामध्यें हित । आपण निवांत असों नये ॥३॥

1959 " नव्हे निष्ठावंत तुज काय बोल । सेवेविण मोल मागतसें ॥ध्रु.॥ न घडे भजन शुद्ध भावनिष्ठा । आपुल्या अदृष्टावरी बोल ॥ध्रु.॥ पूवाअ जाले भक्त असंख्य विरक्त । काम क्रोध अहंते निर्दाळिलें ॥२॥ ऐसी अंगवण नाहीं मज देवा । करीतसें हेवा भेटावयाचा ॥३॥ कृपा करोनियां पुरवीं असोसी । आपुल्या ब्रिदासी राखावया ॥४॥ तुका म्हणे एक बाळक अज्ञातें । त्यासि हे पोसित मायबापें ॥५॥

1960 " नव्हे ब्रम्हचर्य बाइलेच्या त्यागें । वैराग्य वाउगें देशत्यागें ॥१॥ काम वाढे भय वासनेच्या द्वारें । सांडावें तें धीरें आचावाचे ॥ध्रु.॥ कांपवूनि टिरी शूरत्वाची मात । केलें वाताहात उचित काळें ॥२॥ तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मळ स्तुति होतां ॥३॥

1961 " नव्हे ब्रम्हज्ञान बोलतां सिद्ध । जंव हा आत्मबोध नाहीं चित्ती ॥१॥ काय करिसी वांयां लटिका चि पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥ध्रु.॥ मी च देव ऐसें सांगसी या लोकां । विषयांच्या सुखा टोंकोनियां ॥२॥ अमृताची गोडी पुढिलां सांगसी । आपण उपवासी मरोनिया ॥३॥ तुका म्हणे जरि राहील तळमळ । ब्रम्ह तें केवळ सदोदित ॥४॥

1962 " नव्हे भिडा हें कारण । जाणे करूं ऐसे जन ॥१॥ जों जों धरावा लौकिक । रडवितोसी आणीक ॥ध्रु.॥ चाल जाऊं संतांपुढें । ते हें निवडिती रोकडें ॥२॥ तुका म्हणे तूं निर्लज्ज । आम्हां रोकडी गरज ॥३॥

1963 " नव्हे मतोळ्याचा वाण । नीच नवा नारायण ॥१॥ सुख उपजे श्रवणें । खरें टांकसाळी नाणें ॥ध्रु.॥ लाभ हातोहातीं । अधिक पुढतोंपुढती ॥२॥ तुका म्हणे नेणों किती । पुरोनि उरलें पुढती ॥३॥

1964 " नव्हे मी शाहाणा । तरी म्हणा नारायणा ॥१॥ तुम्हां बोलवाया कांहीं । ये च भरलोंसे वाहीं ॥ध्रु.॥ आणावेति रूपा । कोपलेती तरी कोपा ॥२॥ कळोनि आवडी । तुका म्हणे जाते घडी ॥३॥

1965 " नव्हे हें कवित्व टांकसाळी नाणें । घेती भले जन भले लोक ॥१॥ लागलासे झरा पूर्ण नवनीतें । सेविलियां हित फार होय ॥२॥ तुका म्हणे देवा केला बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥३॥

1966 " नव्हें कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥१॥ म्हणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ध्रु.॥ शरीर जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥२॥ तुका म्हणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥३॥

1967 " नव्हें दास खरा । परि जाला हा डांगोरा ॥१॥ यासी काय करूं आतां । तूं हें सकळ जाणता ॥ध्रु.॥ नाहीं पुण्यगाठीं । जे हें वेचूं कोणासाठीं ॥२॥ तुका म्हणे कां उपाधी । वाढविली कृपानिधी ॥३॥

1968 " नव्हें परि म्हणवीं दास । कांहीं निमित्तास मूळ केलें ॥१॥ तुमचा तो धर्म कोण । हा आपण विचारा ॥धृ. ॥ नाहीं शुद्ध आचरण । परी चरण चिंतितों ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । ऐसें कां गा नेणां हें ॥३॥

1969 " नव्हें मी आहाच आशेचें बांधलें । जें हें टोंकविलें नारायणा ॥१॥ अंतर तों तुम्हां बरें कळों येतें । वेव्हार उचितें चाळवीजे ॥ध्रु.॥ मनें कल्पीलें आवरितां पाप । संकल्पीं विकल्प याचि नांवें ॥२॥ तुका म्हणे आम्हां न सोसे जळजळ । सिजल्यावरी जाळ कढ खोटा ॥३॥

1970 " नव्हें मी स्वतंत्र अंगाचा पाईंक । जे हे सकळिक सत्ता वारूं ॥१॥ तुम्हां आळवावें पाउला पाउलीं । कृपेची साउली करीं मज ॥ध्रु.॥ शक्तिहीन तरी जालों शरणागत । आपुला वृत्तांत जाणोनियां ॥२॥ तुका म्हणे भवाभेणें धरिलें पाय । आणीक उपाय नेणें कांहीं ॥३॥

1971 " नव्हें हें गुरुत्व मेघवृष्टि वाणी । ऐकावी कानीं संतजनीं ॥१॥ आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥ देहपिंड दान दिला एकसरें । मुळिचें तें खरें टांकसाळ ॥२॥ तुका म्हणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥३॥

1972 " नव्हेव निग्रह देहासी दंडण । न वजे भूकतान सहावली ॥१॥ तरि नित्य नित्य करीं आळवण । माझा अभिमान असों द्यावा ॥ध्रु.॥ नाहीं विटाळिलें कायावाचामन । संकल्पासी भिन्न असें चि या ॥२॥ तुका म्हणे भवसागरीं उतार । कराया आधार इच्छीतसें ॥३॥

1973 " नव्हेसी तूं लांसी । मायां आणिकां त्या ऐसी ॥१॥ जे हे वांयां जाती बोल । होती निर्फळ चि फोल ॥ध्रु.॥ नव्हेसी दुबळी । कांहीं नाहीं तें जवळी ॥२॥ तुका म्हणे खोटी । कांहीं नव्हेसी करंटी ॥३॥

1974 " नव्हो आतां जीवीं कपटवसती । मग काकुळती कोणा यावें ॥१॥ सत्याचिये मापें गांठीं नये नाड । आदि अंत गोड नारायण ॥ध्रु.॥ चोखटिया नाहीं विटाळाचा आघात । साच ते साचांत सांचा पडे ॥२॥ विचारिली वाट उसंत सीतळ । बुद्धीपुढें बळ तृणतुल्य ॥३॥ आहाराच्या घासें पचोनियां जिरे । वासना ही उरे उर्वरीत ॥४॥ तुका म्हणे ताळा घालावा वचनीं । तूं माझी जननी पांडुरंगे ॥५॥

1975 " नव्हों आम्ही आजिकालीचीं । काचीं कुचीं चाळवणी ॥१॥ एके ठायीं मूळडाळ । ठावा सकळ आहेसी ॥ध्रु.॥ तुमचें आमचेंसें कांहीं । भिन्न नाहीं वांटलें ॥२॥ तुका म्हणे जेथें असें । तेथें दिसें तुमचासा ॥३॥

1976 " नव्हों गांढे आळसी । जो तूं आम्हांपुढें जासी ॥१॥ अरे दिलें आम्हां हातीं । वर्म वेवादाचें संतीं ॥ध्रु.॥ धरोनियां वाट । जालों शिरोमणि थोंट ॥२॥ तुका म्हणे देवा । वाद करीन खरी सेवा ॥३॥

1977 " नव्हों वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी ॥१॥ कुपथ्य करूनि विटंबावे रोगी । का हे सलगी भीड त्याची ॥२॥ तुका म्हणे लांसू फांसुउं देऊं डाव । सुखाचा उपाव पुढें आहे ॥३॥

1978 " नव्हों सभाधीट । समोर बोलाया नीट । एकलीं एकट । दुजें नाहीं देखिलें ॥१॥ आतां अवघें तुम्हीं जाणां । तुमचें माझें नारायणा । येईंल करुणा । ते चि पहा तुम्हांसी ॥ध्रु.॥ ताळ नाहीं माझे बुद्धी । धरली न धरवे शुद्धी । आतां बळें कधीं । कोण्या जन्में निवाड ॥२॥ आतां शेवटीचें । उत्तर तें हें चि साचें । शरण आलें त्याचें । तुका म्हणे सांभाळा ॥३॥

1979 " नसता चि दाउनि भेव । केला जीव हिंपुटी ॥१॥ जालों तेव्हां कळलें जना । वाउगा हा आकांत ॥ध्रु.॥ गंवसिलों पुढें मागें लागलागे पावला ॥२॥ तुका म्हणे केली आणि । सलगीच्यांनी सन्मुख ॥३॥

1980 " नसतां अधिकार उपदेशासी बळत्कार । तरि ते केले हो चार माकडा आणि गारूडी ॥१॥ धन धान्य राज्य बोल वृथा रंजवणें फोल । नाहीं तेथें ओल बीज वेची मूर्ख तो ॥ध्रु.॥ नये बांधों गांठी पदरा आण ऐसी तुटी । असोन कसोटी शिष्टाचार अनुभव ॥२॥ उपदेसी तुका मेघ वृष्टीनें आइका । संकल्पासी धोका सहज तें उत्तम ॥३॥

1981 " नसतों किविलवाणें । कांहीं तुमच्या कृपादानें ॥१॥ हे चि तयाची ओळखी । धालें टवटवित मुखीं ॥ध्रु.॥ वांयां जात नाहीं । वचन प्रीतीचें तें कांहीं ॥२॥ तुका म्हणे देवा । सत्य येतें अनुभवा ॥३॥

1982 " नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥१॥ जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन ॥ध्रु.॥ राहों नेदी बाकी । दान ज्याचें त्यासी टाकी ॥२॥ होवा वाटे जना । तुका म्हणे साटीं गुणां ॥३॥

1983 " नाइकावे कानीं तयाचे ते बोल । भक्तीविण फोल ज्ञान सांगे ॥१॥ वाखाणी अद्वैत भक्तिभावेंविण । दुःख पावे सीण श्रोता वक्ता ॥ध्रु.॥ अहं ब्रम्ह म्हणोनि पाळित पिंडा । नो बोलावें भांडा तया सवें ॥२॥ वेदबाह्य लंड बोले जो पाषांड । त्याचें काळें तोंड संतांमध्ये ॥३॥ तुका म्हणे खंडी देवभक्तपण । वरिष्ठ त्याहूनि श्वपच तो ॥४॥

1984 " नागर गोडें बाळरूप । तें स्वरूप काळीचें ॥१॥ गाईंगोपाळांच्या संगें । आलें लागें पुंडलीका ॥ध्रु.॥ तें हें ध्यान दिगांबर । कटीं कर मिरवती ॥२॥ नेणपणे उगें चि उभें । भक्तिलोभें राहिलें ॥३॥ नेणे वरदळाचा मान । विटे चरण सम उभें ॥४॥ सहज कटावरी हात । दहींभात शिदोरी ॥५॥ मोहरी पांवा गांजिवा पाठीं । धरिली काठी ज्या काळें ॥६॥ रम्य स्थळ चंद्रभागा । पांडुरंगा क्रीडेसी ॥७॥ भीमा दक्षणमुख वाहे । दृष्टी पाहे समोर ॥८॥ तारावेसे मूढ लोक । दिली भाक पुंडलिका ॥९॥ तुका म्हणे वैकुंठवासी । भक्तांपासीं राहिला ॥१०॥

1985 " नागलें देखोनि चांगलें बोले । आपुलें वेचूनि त्याजपुढें खुले ॥१॥ अधमाचे ओंगळ गुण । उचित नेणें तो धर्म कोण ॥ध्रु.॥ आर्तभूता न घली पाण्याचा चुळ । न मागे त्यासी घाली साखर गुळ ॥२॥ एकासी आड पडोनि होंकरी । एकासी देखोनि लपवी भाकरी ॥३॥ एकासी धड न बोले वाचा । एकासी म्हणे मी तुझे बांदीचा ॥४॥ तुका म्हणे ते गाढवपशु । लाभेंविण केला आयुष्यनाशु ॥५॥

1986 " नागवूनि एकें नागवीं च केली । फिरोनियां आलीं नाहीं येथें ॥१॥ भेणें सुती कोणी न घेती पालवीं । करूनियां गोवी निसंतान ॥ध्रु.॥ एकें तीं गोविलीं घेऊनि जमान । हांसतील जन लोक तयां ॥२॥ सरले तयांसी घाली वैकुंठीं । न सोडी हे साटी जीवें जाली ॥३॥ तुका म्हणे जालों जाणोनि नेणती । सांपडलों हातीं याचे आम्ही ॥४॥

1987 " नाचतां देखिलीं गाईं वत्सें जन । विस्मित होऊन इंद्र ठेला ॥१॥ लागला पाऊस शिळांचिये धारीं । वांचलीं हीं परी कैसीं येथें ॥२॥ येथें आहे नारायण संदेह नाहीं । विघ्न केलें ठायीं निर्विघ्न तें ॥३॥ विचारितां उचलिला गोवर्धन । अवतार पूर्ण कळों आला ॥४॥ आला गौळियांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचें ॥५॥ त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रम्हयासि ॥६॥ सीणतां जो ध्याना न ये एकवेळा । तो तया गोपाळां समागमें ॥७॥ समागमें गाईं वत्स पुण्यवंता । देह कुर्वाळितां अंगसंग ॥८॥ संग जाला मायबापां लोकपाळां । आळिंगिती गळा कंठाकंठ ॥९॥ करिते हे जाले स्तुती सकळिक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥१०॥ करितील वृष्टी पुष्पवरुषाव । देवआदिदेव पूजियेला ॥११॥ पुष्पांजुळी मंत्र घोष जयजयकार । दुमदुमी अंबर नेणें नादें ॥१२॥ नामाचे गजर गंधर्वांचीं गाणीं । आनंद भुवनीं न माये तो ॥१३॥ तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळीं देवासी दोहीं ठायीं ॥१४॥ दोहीं ठायीं सुख दिलें नारायणें । गेला दरुषणें वैरभाव ॥१५॥ भावना भेदाची जाय उठाउठी । तुका म्हणे भेटी गोविंदाचे ॥१६॥

1988 " नाचावेंसें वाटे मना । छंद गुणा अधीन ॥१॥ चेष्टविलीं माझीं गात्रें । सत्तासूत्रें हालती ॥ध्रु.॥ नामरूपें रंगा आलीं । ते चि चाली स्वभावें ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगे । अंग संगें कवळिलें ॥३॥

1989 " नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥१॥ भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां ॥ध्रु.॥ कोण्या काळें सुखा । ऐशा कोण पावता ॥२॥ अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥३॥ तुका म्हणे धन्य जालें । भूमी वैकुंठ आणिलें ॥४॥

1990 " नाना मतांतरें शब्दाची वित्पत्ति । पाठांतरें होती वाचाळ ते ॥१॥ माझ्या विठोबाचें वर्म आहे दुरी । कैंची तेथें उरी देहभावा ॥ध्रु.॥ यज्ञयाग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान आलीकडे ॥२॥ तुका म्हणे होय उपरति चित्ति । अंगीं सप्रेमता येणें लागें ॥३॥

1991 " नाम आहे जयापाशीं । जेथें राहे तेथें चि काशी ॥१॥ ऐसा नामाचा महिमा । जाणे वाल्मीक शंकर उमा ॥ध्रु.॥ नाम प्रल्हादबाळ । जाणे पापी आजामेळ ॥२॥ नाम जाणे तो नारद । नामें ध्रुवा अक्षय पद ॥३॥ नाम गणिकेतें तारी । पशु गजेंद्र उद्धारी ॥४॥ नाम जाणे हणुमंत । जाणताति महासंत ॥५॥ नाम जाणे शुकमूर्ति । जाणे राजा परिक्षिती ॥६॥ नाम जाणे तुका । नाहीं संसाराचा धोका ॥७॥

1992 " नाम उच्चारितां कंटीं । पुढें उभा जगजेठी ॥१॥ ऐसें धरोनियां ध्यान । मनें करावें चिंतन ॥ध्रु.॥ ब्रम्हादिकांच्या ध्याना नये । तो हा कीर्तनाचे सोये ॥२॥ तुका म्हणे सार घ्यावें । मनें हरिरूप पाहावें ॥३॥

1993 " नाम घेतां उठाउठीं । होय संसारासी तुटी ॥१॥ ऐसा लाभ बांधा गांठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ॥ध्रु.॥ नामापरतें साधन नाहीं । जें तूं करिशी आणिक कांहीं ॥२॥ हाकारोनि सांगे तुका । नाम घेतां राहों नका ॥३॥

1994 " नाम घेतां कंठ शीतळ शरीर । इंद्रियां व्यापार नाठवती ॥१॥ गोड गोमटें हें अमृतासी वाड । केला कइवाड माझ्या चित्ती ॥ध्रु.॥ प्रेमरसें जाली पुष्ट अंगकांति । त्रिविध सांडिती ताप अंग ॥२॥ तुका म्हणे तेथें विकाराची मात । बोलों नये हित सकळांचें ॥३॥

1995 " नाम घेतां न लगे मोल । नाममंत्र नाहीं खोल ॥१॥ दों अक्षरांचें काम । उच्चारावें राम राम ॥ध्रु.॥ नाहीं वर्णाधमयाती । नामीं अवघीं चि सरतीं ॥२॥ तुका म्हणे नाम । चैतन्य निजधाम ॥३॥

1996 " नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृत चि जरवे । होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥१॥ मन रंगलें रंगलें । तुझ्या चरणीं स्थिरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥ध्रु.॥ जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें । अंगा येती उद्गार ॥२॥ सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा । तुका म्हणे लेखा । आतां नाहीं आनंदा ॥३॥

1997 " नाम घेतां वांयां गेलां । ऐसा कोणें आईंकिला ॥१॥ सांगा विनवितों तुम्हांसी । संत महंत सद्धि ॠषी ॥ध्रु.॥ नामें तरला नाहीं कोण । ऐसा द्यावा निवडून ॥२॥ सलगीच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ॥३॥

1998 " नाम तारक भवसिंधु । विठ्ठल तारक भवसिंधु ॥१॥ नामधारक तया अरि मित्रु । समता त्यागुनियां क्रोधु ॥ध्रु.॥ नामधारक तया । कदापि न घडे विषयाचा बाधु ॥२॥ ज्या नामें तरले शुकादिक । नारद संत मुनिजन साधु ॥३॥ जाणूनियां जे नसरें । ते नेणति जैसा गज अंधु ॥४॥ सहज तुकया । नाम चि जपतां स्वरुपीं वेधु ॥५॥

1999 " नाम दुसी त्याचें नको दरषण । विष तें वचन वाटे मज ॥१॥ अमंगळ वाणी नाइकवे कानीं । निंदेची पोहोणी उठे तेथें ॥ध्रु.॥ काय लभ्य त्याचिये वचनीं । कोणत्या पुराणीं दिली ग्वाही ॥२॥ काय आड लावूं त्याचिया तोंडासी । आतां या जिभेसी काय करूं ॥३॥ तुका म्हणे संत न मनिती त्यांस । घेऊं पाहे ग्रास यमदूत ॥४॥

2000 " नाम न वदे ज्याची वाचा । तो लेंक दो बापांचा ॥१॥ हे चि ओळख तयाची । खूण जाणा अभक्ताची ॥ध्रु.॥ ज्याची विठ्ठल नाहीं ठावा । त्याचा संग न करावा ॥२॥ नाम न म्हणे ज्याचें तोंड । तें चि चर्मकाचें कुंड ॥३॥ तुका म्हणे त्याचे दिवशीं । रांड गेली महारापाशीं ॥४॥

2001 " नाम पावन पावन । त्याहून पवित्र आहे कोण ॥१॥ शिव हालाहालें तापला । तो ही नामें शीतळ जाला ॥ध्रु.॥ शिवास नामाचा आधार । केला कळिकाळ किंकर ॥२॥ मरण जालें काशीपुरी । तेथें नाम चि उद्धरी ॥३॥ तुका म्हणे अवघीं चोरें। एक हरिनाम सोइरें ॥४॥

2002 " नाम म्हणतां मोक्ष नाहीं । ऐसा उपदेश करिती कांहीं । बधिर व्हावें त्याचे ठायीं । दुष्ट वचन वाक्य तें ॥१॥ जयाचे राहिलें मानसीं । तें चि पावले तयासी । चांचपडतां मेलीं पिसीं । भलतैसीं वाचाळें ॥ध्रु.॥ नवविधीचा निषेध । जेणें मुखें करिती वाद । जन्मा आले निंद्य । शूकरयाती संसारा ॥२॥ काय सांगों वेळोवेळां । आठव नाहीं चांडाळा । नामासाठीं बाळा । क्षीरसागरीं कोंडिलें ॥३॥ आपुलिया नामासाठीं । लागे शंखासुरापाठीं । फोडोनियां पोटीं । वेद चारी काढिले ॥४॥ जगीं प्रसद्धि हे बोली । नामें गणिका तारिली । आणिकें ही उद्धरिलीं । पातकी महादोषी ॥५॥ जे हे पवाडे गर्जती । नाम प्रल्हादाचा चित्तीं । जळतां बुडतां घातीं । राखे हातीं विषाचे ॥६॥ काय सांगों ऐशीं किती । तुका म्हणे नामख्याती । नरकाप्रती जाती । निषेधिती तीं एकें ॥७॥

2003 " नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥ सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥ माप टाकी सळ धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥ प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटीं लावी तुका ॥३॥

2004 " नामधारकासी नाहीं वर्णावर्ण । लोखंड प्रमाण नाना जात ॥१॥ शस्त्र अथवा गोळे भलता प्रकार । परिसीं संस्कार सकळ ही हेम ॥ध्रु.॥ प्रजन्य वर्षतां जीवना वाहावट । तें समसकट गंगे मिळे ॥२॥ सर्व तें हें जाय गंगा चि होऊन । तैसा वर्णावर्ण नाहीं नामीं ॥३॥ महांपुरीं जैसें जातसे उदक । मध्यें तें तारक नाव जैसी ॥४॥ तये नावेसंगें ब्राम्हण तरती । केवीं ते बुडती अनामिक ॥५॥ नाना काष्ठजात पडतां हुताशनीं । ते जात होउनी एकरूप ॥६॥ तेथें निवडेना घुरे कीं चंदन । तैसा वर्णावर्ण नामीं नाहीं ॥७॥ पूर्वानुवोळख तें चि पैं मरण । जरि पावे जीवन नामामृत ॥८॥ नामामृतें जालें मुळीचें स्मरण । सहज साधन तुका म्हणे ॥९॥

2005 " नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरें ॥१॥ न लगे सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥ध्रु.॥ ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥२॥ रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥३॥ याहूनि आणीक नाहीं पैं साधन । वाहातसें आण विठोबाची ॥४॥ तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथें ॥५॥

2006 " नामांचा डांगोरा फिरवीं घरोघरीं । म्हणा हरीहरी सर्वभावें ॥१॥ नामें हरती कर्में वैकुंठींची पै विस्त । संनिध श्रीपति सदोदित ॥ध्रु.॥ नामाचा महिमा बहुतां कळला । नामें उद्धरिला अजामेळ ॥२॥ गजेंद्राची स्थिति पुराणीं बोलती । नामें चि श्रीपति पावलासे ॥३॥ तुका म्हणे घेतां मुक्ति आहे । नामें सर्व पाहें आकळिलें॥४॥

2007 " नामाचा महिमा बोलिलों उत्कर्ष । अंगा कांहीं रस न ये चि तो ॥१॥ कैसें समाधान राहे पांडुरंगा । न लगे चि अंगा आणी कांहीं ॥ध्रु.॥ लाभाचिये अंगीं सोस कवतुकें । फिक्याचें तें फिकें वेवसाव ॥२॥ तुका म्हणे करा आपुला महिमा । नका जाऊं धर्मावरि माझ्या ॥३॥

2008 " नामाची आवडी तो चि जाणा देव । न धरीं संदेह कांहीं मनीं ॥१॥ ऐसें मी हें नाहीं बोलत नेणतां । आनुनि संमता संतांचिया ॥ध्रु.॥ नाम म्हणे तया आणीक साधन । ऐसें हें वचन बोलों नये ॥२॥ तुका म्हणे सुख पावे या वचनीं । ज्याचीं शुद्ध दोन्ही मायबापें ॥३॥

2009 " नामाचे पवाडे बोलती पुराणें । होऊनि कीर्तन तो चि ठेला ॥१॥ आदिनाथा कंठीं आगळा हा मंत्र । आवडीचें स्तोत्र सदा घोकी ॥ध्रु.॥ आगळें हे सार उत्तमा उत्तम । ब्रम्हकर्मा नाम एक तुझें ॥२॥ तिहीं त्रिभुवनीं गमन नारदा । हातीं विणा सदा नाम मुखीं ॥३॥ परिक्षिती मृत्यु सातां दिवसांचा । मुक्त जाला वाचा उच्चारितां ॥४॥ कोळियाची कीर्ति वाढली गहन । केलें रामायण रामा आधीं ॥५॥ सगुण निर्गुण तुज म्हणे वेद । तुका म्हणे भेद नाहीं नांवा ॥६॥

2010 " नामाचें चिंतन प्रगट पसारा । असाल तें करा जेथें तेथें ॥१॥ सोडवील माझा स्वामी निश्चयेसीं । प्रतिज्ञा हे दासीं केली आम्हीं ॥ध्रु.॥ गुण दोष नाहीं पाहात कीर्तनीं । प्रेमें चक्रपाणी वश्य होय ॥२॥ तुका म्हणे कडु वाटतो प्रपंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥३॥

2011 " नामाचें सामर्थ्य कां रे दवडीसी । कां रे विसरसी पवाडे हे ॥१॥ खणखणां हाणती खर्ग प्रल्हादासी । न रुपे आंगासी किंचित ही ॥ध्रु.॥ राम कृष्ण हरी ऐसी मारी हाक । तेणें पडे धाक बळियासी ॥२॥ असों द्यावीं सामर्थ्या ऐसिया कीर्तीचीं । आवडी तुक्याची भेटी देई ॥३॥

2012 " नामाविण काय वाउगी चावट । वांयां वटवट हरीविण ॥१॥ फुकट चि सांगे लोकाचिया गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥ध्रु.॥ मेळवूनि चाट करी सुरापान । विषयांच्या गुणें माततसे ॥२॥ बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥३॥ बळें यम दांत खाय तयावरी । जंव भरे दोरी आयुष्याची ॥४॥ तुका म्हणे तुला सोडवील कोण । नाहीं नारायण आठविला ॥५॥

2013 " नामासारिखी करणी । हे तों न दिसे त्रिभुवनीं ॥१॥ सिलंगणीचें सोनें । ठेवूं नये तें गाहाण ॥ध्रु.॥ आदित्याचीं झाडें । काय त्याचा उजड पडे ॥२॥ तुका म्हणे देवा । ब्रिदें सोडोनियां ठेवा ॥३॥

2014 " नारायण आले निजमंदिरासि । जाले या लोकांसि बहुडविते ॥१॥ बहुडविले बहु केलें समाधान । विसरु तो क्षण नका माझा ॥२॥ मात सांगितली सकळ वृत्तांत । केलें दंडवत सकळांनीं ॥३॥ सकळां भातुकें वांटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥४॥ लोक गेले कामा गाईंपें गोपाळ । वारली सकळ लोभापाठी ॥५॥ लोभ दावुनियां आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥६॥ आशेचे बांधले तुका म्हणे जन । काय नारायण ऐसा जाणे ॥७॥

2015 " नारायण भूतीं न कळे जयांसि । होय गर्भवासीं येणें जाणें ॥१॥ येणें जाणें होय भूतांच्या मत्सरें । न कळतां खरें देव ऐसा ॥२॥ देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुद्धि ॥३॥ बुद्धीचा पालट नव्हे कोणे काळीं । हरि जळीं स्थळीं तया चित्ती ॥४॥ चित्त तें निर्मळ जैसें नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥५॥ तयामाजी हरि जाणिजे त्या भावें । आपलें परावें सारिखें चि ॥६॥ चिंतनें तयाच्या तरती आणीक । जो हें सकळिक देव देखे ॥७॥ देव देखे तो ही कसा देव नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥८॥ काया वाचा मनें पूजावे वैष्णव । म्हणउनि भाव धरूनियां ॥९॥ यांसि कवतुक दाखविलें रानीं । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥१०॥ गोपाळांसि डोळे झांकविले हातें । धरिलें अनंतें विश्वरूप ॥११॥ पसरूनि मुख गिळियेलें ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥१२॥ संधि सारूनियां पाहिलें अनंता । म्हणती ते आतां कळलांसी ॥१३॥ कळला हा तुझा देह नव्हे देवा । गिळिला वोणवा आणीक तो ॥१४॥ तो तयां कळला आरुषां गोपाळां । दुर्गम सकळां साधनांसि ॥१५॥ सीण उरे तुका म्हणे साधनाचा । भाविकांसि साचा भाव दावी ॥१६॥

2016 " नारायणा ऐसा । सेवूं नेणतील रसा ॥१॥ जेणें भवव्याध तुटे । दुःख मागुतें न भेटे ॥ध्रु.॥ न लगे कांहीं आटी । बाधा राहों न सके पोटीं ॥२॥ कैवल्य तें जोडे । पालट लवकरी घडे ॥३॥ जन्ममरणदुःख अटे । जाळें अवघेंचि तुटे ॥४॥ तुका म्हणे जाला । याचा गुण बहुतांला ॥५॥

2017 " नारायणें कंस चाणूर मदिला । रार्ज्यीं बैसविला उग्रसेन ॥१॥ उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविला अंत अभक्ताचाम ॥२॥ अवघें चि केलें कारण अनंतें । आपुलिया हातें सकळ ही ॥३॥ सकळ ही केलीं आपुलीं अंकित । राहे गोपीनाथ मथुरेसि ॥४॥ मथुरेसि आला वैकुंठनायक । जालें सकळिक एक राज्य ॥५॥ राज्य दिलें उग्रसेना शरणागता । सोडविलीं माता पिता दोन्हीं ॥६॥ सोडवणे धांवे भक्ताच्या कैवारें । तुका म्हणे करें शस्त्र धरी ॥७॥

2018 " नारे तरि काय नुजेडे कोंबडें । करूनियां वेडें आघ्रो दावी ॥१॥ आइत्याचें साहे फुकाचा विभाग । विक्षेपानें जग ची थू करी ॥ध्रु.॥ नेमून ठेविला करत्यानें काळ । नल्हायेसें बळ करूं पुढें ॥२॥ तुका म्हणे देव साहे जाल्यावरी । असांग चि करी सर्व संग ॥३॥

2019 " नावडावें जन नावडावा मान । करूनि प्रमाण तूं चि होई ॥१॥ सोडुनि देहसंबंध वेसनें । ऐसी नारायणें कृपा कीजे ॥ध्रु.॥ नावडावें रूप नावडावे रस । अवघी राहो आस पायांपाशीं ॥२॥ तुका म्हणे आतां आपुलिया सत्ता । करूनि अनंता ठेवा ऐसें ॥३॥

2020 " नावडे जें चित्ती । तें चि होसी पुरविता ॥१॥ कां रे पुरविली पाठी । माझी केली जीवेसाटीं ॥ध्रु.॥ न करावा संग । वाटे दुरावावें जग ॥२॥ सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ॥३॥ जन धन तन । वाटे लेखावें वमन ॥४॥ तुका म्हणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरिनाथा ॥५॥

2021 " नावडे ज्या कथा उठोनियां जाती । ते यमा फावती बरे वोजा ॥१॥ तो असे जवळी गोंचिडाच्या न्यायें । देशत्यागें ठायें तया दुरी ॥ध्रु.॥ नव्हे भला कोणी नावडे दुसरा । पाहुणा किंकरा यमा होय ॥२॥ तुका म्हणे तया करावें तें काईं । पाषाण कां नाहीं जळामध्यें ॥३॥

2022 " नाशवंत देह नासेल हा जाणा । कां रे उच्चाराना वाचे नाम ॥१॥ नामें चि तारिले कोटट्या हे कोटी । नामें हे वैकुंठी बैसविले ॥ध्रु.॥ नामापरतें सार नाहीं त्रिभुवनीं । तें कां तुम्ही मनीं आठवाना ॥२॥ तुका म्हणे नाम वेदांसी आगळें । तें दिलें गोपाळें फुकासाटीं ॥३॥

2023 " नाही काष्ठाचा गुमान । गोवी भ्रमरा सुमन ॥१॥ प्रेम प्रीतीचे बांधलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥ पदरीं घालीं पिळा । बाप निर्बळ साटी बाळा ॥२॥ तुका म्हणे भावें । भेणें देवा आकारावें ॥३॥

2024 " नाही बळयोग अभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥१॥ तुझिये भेटीचें प्रेम अंतरंगीं । नाहीं बळ अंगीं भजनाचें ॥ध्रु.॥ काय पांडुरंगा करूं बा विचार । झुरतें अंतर भेटावया ॥२॥ तुका म्हणे सांगा वडिलपणें बुद्धी । तुजविण दयानिधी पुसों कोणां ॥३॥

2025 " नाहीं आइकत तुम्ही माझे बोल । कासया हें फोल उपणूं भूस ॥१॥ येसी तें करीन बैसलिया ठाया । तूं चि बुझावया जवळी देवा ॥ध्रु.॥ करावे ते केले सकळ उपाय । आतां पाहों काय अझुनि वास ॥२॥ तुका म्हणे आला आज्ञेसी सेवट । होऊनियां नीट पायां पडों ॥३॥

2026 " नाहीं आम्हां शत्रु सासुरें पिसुन । दाटलें हें घन माहियेर ॥१॥ पाहें तेथें पांडुरंग रखुमाईं । सत्यभामा राही जननिया ॥ध्रु.॥ लज्जा भय कांही आम्हां चिंता नाहीं । सर्वसुखें पायीं वोळगती ॥२॥ तुका म्हणे आम्ही सदैवाचीं बाळें । जालों लडिवाळें सकळांचीं ॥३॥

2027 " नाहीं आलें भक्तिसुख अनुभवा । तो मी ज्ञान देवा काय करूं ॥१॥ नसावें जी तुम्ही कांहीं निश्चिंतीनें । माझिया वचनें अभेदाच्या ॥ध्रु.॥ एकाएकीं मन नेदी समाधान । देखिल्या चरण वांचूनियां ॥२॥ तुका म्हणे वाचा गुणीं लांचावली । न राह उगली मौन्य मज ॥३॥

2028 " नाहीं कंटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥१॥ जन वन आम्हां समान चि जालें । कामक्रोध गेले पावटणी ॥ध्रु.॥ षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥२॥ म्हणऊनिं मुख्य धर्म आम्हां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥३॥ म्हणऊनिं तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥४॥

2029 " नाहीं कोणी दिस जात वांयांविण । साध्य नाहीं सीण लटिका चि ॥१॥ एकाचिये माथां असावें निमत्ति । नसो नाहीं हित कपाळीं तें ॥ध्रु.॥ कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥२॥ तुका म्हणे वर्में कळों येती कांहीं । ओळखी जे नाहीं होईंल ते ॥३॥

2030 " नाहीं खंड जाला । माझा तुमचा विठ्ठला ॥१॥ कैसें कैसें हो दुश्चित । आहे चौघांपाशीं नीत ॥ध्रु.॥ मुळींचे लिहिलें । मज आतां सांपडलें ॥२॥ तुका म्हणे मज । न लगे बोलणें सहज ॥३॥

2031 " नाहीं गुणदोष लिंपों देत अंगीं । झाडितां प्रसंगीं वरावरी ॥१॥ निकटवासिया आळवितों धांवा । तेथूनियां देवा सोडवूनी ॥ध्रु.॥ उमटे अंतरीं तें करूं प्रगट । कळोनी बोभाट धांव घालीं ॥२॥ तुका म्हणे तरि वांचलों या काळें । समर्थाचे बळें सुखी असों ॥३॥

2032 " नाहीं घटिका म्हणसी । लाग लागला तुजपाशीं । पडिला हृषीकेशी । जाब सकळ करणें ॥१॥ माझें नेलें पांघरुण । ठावें असोन दुर्बळ दीन । माणसांमधून । उठविलें खाणोर्‍या ॥ध्रु.॥ आम्हीं हें जगऊनि होतों पाणी । संदीं देवदेव करूनि । जालासी कोठोनि । पैदा चोरा देहाच्या ॥२॥ तुकयाबंधु म्हणे केलें । उघडें मजचि उमगिलें । ऐसें काय गेलें । होतें तुज न पुरतें ॥३॥

2033 " नाहीं घाटावें लागत । एका सितें कळें भात ॥१॥ क्षीर निवडितें पाणी । चोंची हंसाचिये आणी ॥ध्रु.॥ आंगडें फाडुनि घोंगडें करी । अवकळा तये परी ॥२॥ तुका म्हणे कण । भुसीं निवडे कैंचा सीण ॥३॥ स्वामीचें अभंगींचें नांव काढून सालोमालो आपलें नांव घालीत त्यावर अभंग ॥ ८ ॥

2034 " नाहीं जप तप जीवाची आटणी । मनासी दाटणी नाहीं केली ॥१॥ निजलिया ठायीं पोकारिला धांवा । सांकडें तें देवा तुझें मज ॥ध्रु.॥ नाहीं आणूनियां समपिऩलें जळ । सेवा ते केवळ चिंतनाची ॥२॥ तुका म्हणे आम्हीं वेचिलीं उत्तरें । घेतलीं उदारें साच भावें ॥३॥

2035 " नाहीं जालें मोल कळे देतां काळीं । कोण पाहों बळी दोघांमध्यें ॥१॥ आम्ही तरी जालों जीवासी उदार । कैंचा हा धीर तुजपाशीं ॥ध्रु.॥ बहु चाळविलें मागें आजिवरी । आतां पुढें हरि जाऊं नेदीं ॥२॥ नव्हती जों भेटी नामाची ओळखी । म्हणऊनि दुःखी बहु जालें ॥३॥ तुका म्हणे कांहीं राहों नेदीं बाकी । एकवेळा चुकी जाली आतां ॥४॥

2036 " नाहीं जों वेचलों जिवाचिया त्यागें । तोंवरी वाउगें काय बोलों ॥१॥ जाणिवलें आतां करीं ये उदेश । जोडी किंवा नाश तुमची जीवें ॥ध्रु.॥ ठायींचे चि आलें होतें ऐसें मना । जावें ऐसें वना दृढ जालें ॥२॥ तुका म्हणे मग वेचीन उत्तरें । उद्धेसिलें खरें जाल्यावरी ॥३॥

2037 " नाहीं तरी आतां कैचा अनुभव । जालासीं तूं देव घरघेणा ॥१॥ जेथें तेथें देखें लांचाचा पर्वत । घ्यावें तरि चत्ति समाधान ॥ध्रु.॥ आधीं वरी हात या नांवें उदार । उसण्याचे उपकार फिटाफीट ॥२॥ तुका म्हणे जैसी तैसी करूं सेवा । सामर्थ्य न देवा पायांपाशीं ॥३॥

2038 " नाहीं तुज कांहीं मागत संपत्ती । आठवण चित्ती असों द्यावी ॥१॥ सरलिया भोग येईंन सेवटीं । पायापें या भेटी अनुसंधानें ॥ध्रु.॥ आतां मजसाटीं याल आकारास । रोकडी हे आस नाहीं देवा ॥२॥ तुका म्हणे मुखीं असो तुझें नाम । देईंल तो श्रम देवो काळ ॥३॥

2039 " नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥१॥ चाहाड तुझे दाविन घरीं । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ध्रु.॥ तुम्हां आम्हां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥२॥ तुका म्हणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥३॥

2040 " नाहीं तुम्हां कांहीं लाविलें मागणें । कांटाळ्याच्या भेणें त्रासलेती ॥१॥ एखादिये परी टाळावीं करकर । हा नका विचार देखों कांहीं ॥ध्रु.॥ पायांच्या वियोगें प्राणासवें साटी । ने घवेसी तुटी जाली आतां ॥२॥ तुका म्हणे तुम्हां मागेन तें आतां । हें चि कृपावंता चरणीं वास ॥३॥

2041 " नाहीं तुम्ही केला । अंगीकार तो विठ्ठला ॥१॥ सोंगें न पवीजे थडी । माजी फुटकी सांगडी ॥ध्रु.॥ प्रेम नाही अंगीं । भले म्हणविलें जगीं ॥२॥ तुका म्हणे देवा । मज वांयां कां चाळवा ॥३॥

2042 " नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥ जाणतियां सवें येऊं नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले ॥२॥ वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनियां दूर दुराविले ॥३॥ दुरावले दूर आशाबद्ध देवा । करितां या सवा कुटुंबाची ॥४॥ चित्ती द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥५॥ नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥६॥ जीहीं हरिसंग केला संवसारीं । तुका म्हणे खरी खेप त्यांची ॥७॥

2043 " नाहीं त्रिभुवनीं सुख या समान । म्हणऊनि मन स्थिरावलें ॥१॥ धरियेलीं जीवीं पाउलें कोमळीं । केली एकावळी नाममाळा ॥ध्रु.॥ शीतळ होऊनियां पावलों विश्रांती । न साहे पुढती घाली चित्ती ॥२॥ तुका म्हणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगें ॥३॥

2044 " नाहीं दिलें कधीं कठिण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥१॥ म्हणऊनि आतां वियोग न साहे । लांचावलें देहे संघष्टणें ॥ध्रु.॥ वेळोवेळां वाचे आठवितों नाम । अधिक चि प्रेम चढे घेतां ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविलें ॥३॥

2045 " नाहीं देणें घेणे । गोवी केली अभिमानें ॥१॥ आतां कां हो निवडूं नेदां । पांडुरंगा येवढा धंदा ॥ध्रु.॥ पांचांमधीं जावें । थोड्यासाटीं फजित व्हावें ॥२॥ तुज ऐसी नाहीं । पांडुरंगा आम्ही कांहीं ॥३॥ टाकुं तो वेव्हार । तुज बहू करकर ॥४॥ तुका म्हणे आतां । निवडूं संतां हें देखतां ॥५॥

2046 " नाहीं देवाचा विश्वास । करी संतांचा उपहास ॥१॥ त्याचे तोंडी पडे माती । हीन शूकराची जाती ॥ध्रु.॥ घोकुनी अक्षर । वाद छळणा करीत फिरे ॥२॥ म्हणे देवासी पाषाण । तुका म्हणे भावहीन ॥३॥

2047 " नाहीं देवापाशीं मोक्षाचे गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं ॥१॥ इंद्रियांचा जय साधुनियां मन । निर्विषय कारण असे तेथें ॥ध्रु.॥ उपास पारणीं अक्षरांची आटी । सत्कर्मां शेवटीं असे फळ ॥२॥ आदरें संकल्प वारीं अतिशय । सहज तें काय दुःख जाण ॥३॥ स्वप्नींच्या घायें विळवसी वांयां । रडे रडतियासवें मिथ्या ॥४॥ तुका म्हणे फळ आहे मूळापाशीं । शरण देवासीं जाय वेगीं ॥५॥

2048 " नाहीं नाश हरि आठवितां मुखें । जोडतील सुखें सकळ ही ॥१॥ सकळी ही सुखें वोळलीं अंतरीं । मग त्याबाहेरी काय काज ॥२॥ येऊं विसरलीं बाहेरी गोपाळें । तल्लीन सकळें कृष्णसुखें ॥३॥ सुख तें योगियां नाहीं समाधीस । दिलें गाईं वत्स पशु जीवां ॥४॥ वारला पाऊस केव्हां नाहीं ठावा । तुका म्हणे देवावांचूनियां ॥५॥

2049 " नाहीं पाक होत उफराटे चाली । बोलिली ते केली व्हावी नीत ॥१॥ नाहीं मानूं येत वांजटाचे बोल । कोरडे च फोल चवी नाहीं ॥ध्रु.॥ तरुवरा आधीं कोठें आहे फळ । चावटा बरळ म्हणा त्यासी ॥२॥ तुका म्हणे किती ठकलीं बापुडीं । गव्हा आहे गोडी मांडे पुर्‍या ॥३॥

2050 " नाहीं भ्यालों तरी पावलों या ठाया । तुम्हां आळवाया जवळिकें ॥१॥ सत्ताबळें आतां मागेन भोजन । केलें तें चिंतन आजिवरी ॥ध्रु.॥ नवनीतासाटीं खादला हा जीव । थोड्यासाटीं कीव कोण करी ॥२॥ तुका म्हणे ताक न लगे हें घाटे । पांडुरंगा खोटें चाळवण ॥३॥

2051 " नाहीं मज कृपा केली पांडुरंगें । संताचिया संगें पोट भरीं ॥१॥ चतुराचे सभे पंडित कुशळ । मी काय दुर्बळ विष्णुदास॥२॥ तुका म्हणे नेणें करूं समाधान । धरिले चरण विठोबाचे ॥३॥

2052 " नाहीं मज कोणी उरला दुर्जन । मायबापाविण ब्रम्हांडांत ॥१॥ कासया जी माझी करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता संतीं ॥ध्रु.॥ विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । सत्तेनें तो चाळी आपुलिये ॥२॥ तुका म्हणे माझें पाळणपोषण । करितां आपण पांडुरंगा ॥३॥

2053 " नाहीं मागितला । तुम्हां मान म्यां विठ्ठला ॥१॥ जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ध्रु.॥ नाहीं केला पोट । पुढें घालूनि बोभाट ॥२॥ तुका म्हणे धरूनि हात । नाहीं नेले दिवानांत ॥३॥

2054 " नाहीं माथां भार । तुम्ही घेत हा विचार ॥१॥ जाणोनियां ऐसें केलें । दुरिल अंगेसी लाविलें ॥ध्रु.॥ आतां बोलावें आवडी । नाम घ्यावें घडी घडी ॥२॥ तुका म्हणे दुरी । देवा खोटी ऐसी उरी ॥३॥

2055 " नाहीं म्या वंचिला मंत्र कोणापाशीं । राहिलों जीवासीं धरूनि तो ॥१॥ विटेवरी भाव ठेवियेलें मन । पाउलें समान चिंतीतसें ॥ध्रु.॥ पावविला पार धरिला विश्वास । घालूनियां कास बळकट ॥२॥ तुका म्हणे मागें पावले उद्धार । तिहीं हा आधार ठेविलासे ॥३॥

2056 " नाहीं येथें वाणी । सकळां वर्णी घ्यावी धणी ॥१॥ जालें दर्पणाचें अंग । ज्याचा त्यासी दावी रंग ॥ध्रु.॥ एका भावाचा एकांत । पीक पिकला अनंत ॥२॥ तुका खळे दाणीं । करी बैसोनी वांटणी ॥३॥

2057 " नाहीं रिकामीक परी वाहे मनीं । तया चक्रपाणि साह्य होय ॥१॥ उद्वेग जीवासि पंढरीचें ध्यान । तया नारायण साह्य करी ॥ध्रु.॥ शरीरासि बळ नाहीं स्वता भाव । तया पंढरिराव साह्य करी ॥२॥ असो नसो बळ राहे पराधीन । तरी अनुमान करूं नका ॥३॥ तुका म्हणे येणें करोनि चिंतनीं । तया नारायण जवळीक ॥४॥

2058 " नाहीं रूप नाहीं नांव । नाहीं ठाव धराया ॥१॥ जेथें जावें तेथें आहे । विठ्ठल मायबहीण ॥ध्रु.॥ नाहीं आकार विकार । चराचर भरलेंसे ॥२॥ नव्हे निर्गुण सगुण । जाणे कोण तयासी ॥३॥ तुका म्हणे भावाविण । त्याचें मन वोळेना ॥४॥

2059 " नाहीं लाग माग । न देखेंसें केलें जग ॥१॥ आतां बैसोनियां खावें । दिलें आइतें या देवें ॥ध्रु.॥ निवारिलें भय । नाहीं दुसर्‍याची सोय ॥२॥ तुका म्हणे कांहीं । बोलायाचें काम नाहीं ॥३॥

2060 " नाहीं लोपों येत गुण । वेधी आणीकें चंदन ॥१॥ न संगतां पडे ताळा । रूप दर्पणीं सकळां ॥ध्रु.॥ सारविलें वरी । आहाच तें क्षणभरी ॥२॥ तुका म्हणे वोहळें । सागराच्या ऐसें व्हावें ॥३॥

2061 " नाहीं वागवीत जाणिवेचें ओझें । स्वामिसेवेकाजे निर्धारु हा ॥१॥ आज्ञा ते प्रमाण हा मनीं निर्धार । येणें फिटे भार निश्चयेसी ॥ध्रु.॥ आळीकरें आम्ही एकविध चित्ते । तैसें होऊं येतें मायबापें ॥२॥ तुका म्हणे माझी ये जातीची सेवा । घातलासे देवावरी भार ॥३॥

2062 " नाहीं विचारीत । मेघ हागनदारी सेत ॥१॥ नये पाहों त्याचा अंत । ठेवीं कारणापें चत्ति ॥ध्रु.॥ वर्जीत गंगा । नाहीं उत्तम अधम जगा ॥२॥ तुका म्हणे मळ । नाहीं अग्नीसी विटाळ ॥३॥

2063 " नाहीं शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रीं मंत्रीं अनुभव तो ॥१॥ हर्षामर्षा अंगीं आदळती लाटा । कामक्रोधें तटा सांडियेलें ॥ध्रु.॥ न सरे ते भक्ति विठोबाचे पायीं । उपरति नाहीं जेथें चित्ति ॥२॥ तुका म्हणे सुख देहनिरसनें । चिंतनें चिंतन तद्रूपता ॥३॥

2064 " नाहीं संतपण मिळतें हें हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥१॥ नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥१॥ तुका म्हणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥३॥

2065 " नाहीं संतांशीं शरण । काय वाचोनि पुराण ॥१॥ म्हणे विठ्ठलाचा दास । देखोनी परनारीस हांसे ॥ध्रु.॥ करिती विठोबाची भक्ति । दयाधर्म नाहीं चित्ती ॥२॥ तेथें नाहीं माझा देव। व्यर्थ श्रमवी हा जीव ॥३॥ अंगीं नाहीं क्षमा दया । म्हणती भेट पंढरीराया ॥४॥ नाहीं धर्माची वासना । काय करोनि प्रदक्षिणा ॥५॥ ऐसें नव्हे भक्तिवर्म । तेथें नाहीं माझा राम ॥६॥ नये कृपा कांहीं केल्या । नये घाम जीव गेल्या ॥७॥ जैसी खड्गाची धार । विठ्ठलचरणीं तुका शूर ॥८॥

2066 " नाहीं संसाराची चाड । गाऊं हरिचें नाम गोड ॥१॥ हो का प्राणाचा ही घात । परि हा न सोडीं अनंत ॥ध्रु.॥ जन्मोजन्मीं हा चि धंदा । संतसंग राहो सदा ॥२॥ तुका म्हणे भाव । तो हा जाणा पंढरिराव ॥३॥

2067 " नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥१॥ सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों ॥ध्रु.॥ काय आगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कसापाशीं ॥२॥ तुका म्हणे येथे करावा उकल । लागे चि ना बोल वाढवूनि ॥३॥

2068 " नाहीं सरों येत कोरडएा उत्तरीं । जिव्हाळ्याची बरी ओल ठायीं ॥१॥ आपुलिया हिता मानिसी कारण । सत्या नारायण साहे असो ॥ध्रु.॥ निर्वाणीं निवाड होतो आगीमुखें । तप्त लोह सुखें धरितां हातीं ॥२॥ तुका म्हणे नेम न टळतां बरें । खर्‍यासी चि खरें ऐसें नांव ॥३॥

2069 " नाहीं सुगंधाची लागती लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥१॥ वार्‍या हातीं माप चाले सज्जनाचें । कीर्ति मुख त्याचें नारायण ॥ध्रु.॥ प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥२॥ तुका म्हणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हा ॥३॥

2070 " नाहीं हानि परी न राहावे निसुर । न पडे विसर काय करूं ॥१॥ पुसाविसी वाटे मात कापडियां । पाठविती न्याया मूळ मज ॥ध्रु.॥ आणीक या मना नावडे सोहळा । करितें टकळा माहेरींचा ॥२॥ बहु कामें केलें बहु कासावीस । बहु जाले दिस भेटी नाहीं ॥३॥ तुका म्हणे त्याचें न कळे अंतर । अवस्था तों फार होते मज ॥४॥

2071 " नाहीं हित ठावें जननीजनका । दाविले लौकिकाचार तींहीं ॥१॥ अंधळ्याचे काठी अंधळें लागलें । घात एकवेळे मागेंपुढें ॥ध्रु.॥ न ठेवावी चाली करावा विचार । वरील आहार गळी लावी ॥२॥ तुका म्हणे केला निवाडा रोकडा । राऊत हा घोडा हातोहातीं ॥३॥

2072 " नाहीं होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळ ही ॥१॥ ऐसा नाहीं मज एकाचा अनुभव । धरिला तो भाव उद्धरलें ॥ध्रु.॥ उतावीळ असे शरणागतकाजें । धांव केशीराजे आइकतां ॥२॥ तुका म्हणे हित चिंतन भरवंसा । नेदी गर्भवासा येऊं देवा ॥३॥

2073 " निंचपण बरवें देवा । न चले कोणाचा ही दावा ॥१॥ महा पुरें झाडें जाती । तेथें लव्हाळे राहाती ॥ध्रु.॥ येतां सिंधूच्या लहरी । नम्र होतां जाती वरि ॥२॥ तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥३॥

2074 " निंदक तो परउपकारी । काय वणूप त्याची थोरी । जे रजकाहुनि भले परि । सर्व गुणें आगळा ॥१॥ नेघे मोल धुतो फुका । पाप वरच्यावरि देखा । करी साधका । शुद्ध सरते तिहीं लोकीं ॥ध्रु.॥ मुखसंवदणी सांगते । अवघें सांटविलें तेथें । जिव्हा साबण निरुतें । दोष काढी जन्माचे ॥२॥ तया ठाव यमपुरीं । वास करणें अघोरीं । त्यासी दंडण करी । तुका म्हणे न्हाणी ते ॥३॥

2075 " निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट ॥१॥ जटा राख विटंबना । धीर नाहीं क्षमा मना ॥ध्रु.॥ शृंगारिलें मढें । जीवेंविण जैसें कुडें ॥२॥ तुका म्हणे रागें । भलतें चावळे वाउगें ॥३॥

2076 " निंदावें हें जग । ऐसा भागा आला भाग ॥१॥ होतें तैसें आलें फळ । गेलें निवडूनि सकळ ॥ध्रु.॥ दुसर्‍याच्या मता । मिळेनासें जालें चित्ता ॥२॥ तुका जाला सांडा । विटंबिती पोरें रांडा ॥३॥

2077 " निंबाचिया झाडा साकरेचें आळें । आपलीं ती फळें न संडी च ॥१॥ तैसें अधमाचें अमंगळ चित्त । वमन तें हित करुनि सांडी ॥ध्रु.॥ परिसाचे अंगीं लाविलें खापर । पालट अंतर नेघे त्याचें ॥२॥ तुका म्हणे वेळू चंदना संगतीं । काय ते नसती जवळिकें ॥३॥

2078 " निघालें तें अगीहूनि । आतां झणी आतळे ॥१॥ पळवा परपरतें दुरी । आतां हरी येथूनि ॥ध्रु.॥ धरिलें तैसें श्रुत करा हो । येथें आहो प्रपंचीं ॥२॥ अबोल्यानें ठेला तुका । भेउनि लोकां निराळा ॥३॥

2079 " निघालें दिवाळें । जालें देवाचें वाटोळें ॥१॥ आतां वेचूं नये वाणी । विचारावें मनिच्या मनीं ॥ध्रु.॥ गुंडाळिलीं पोतीं । भीतरी लावियेली वाती ॥२॥ तुका म्हणे करा । ऐसा राहे माजी घरा ॥३॥

2080 " निजदास उभा तात्काळ पायापें । स्वामी देखे सर्पें वेष्टियेला ॥१॥ लहानथोरें होतीं मिळालीं अपारें । त्याच्या धुदकारें निवारिलीं ॥२॥ निघतां आपटी धरूनि धांवामधीं । एकाचें चि वधी माथें पायें ॥३॥ एकीं जीव दिले येतां च त्या धाकें । येतील तीं एकें काकूलती ॥४॥ यथेष्ट भक्षिलीं पोट धाये वरी । तंव म्हणे हरि पुरे आतां ॥५॥ आतां करूं काम आलों जयासाटीं । हरी घाली मिठी काळयासि ॥६॥ यासि नाथूनियां नाकीं दिली दोरी । चेंडू भार शिरीं कमळांचा ॥७॥ चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगुन बहुडविलें ॥८॥ विसरु न पडे संवगड्या गाईं । यमुनेच्या डोहीं लक्ष त्यांचें ॥९॥ त्याच्या गोष्टी कांठीं बैसोनि सांगती । बुडाला दाविती येथें हरि ॥१०॥ हरीचें चिंतन करितां आठव । तुका म्हणे देव आला वरी ॥११॥

2081 " निजल्यानें गातां उभा नारायण । बैसल्या कीर्तन करितां डोले ॥१॥ उभा राहोनियां मुखीं नाम वदे । नाचे नाना छंदें गोविंद हा ॥ध्रु.॥ मारगीं चालतां मुखीं नाम वाणी । उभा चक्रपाणी मागें पुढें ॥२॥ तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमे घाली उडी नामासाटीं ॥३॥

2082 " निजसेजेची अंतुरी । पादलिया कोण मारी ॥१॥ तैसा आम्हासी उबगतां । तुका विनवितो संतां ॥ध्रु.॥ मूल मांडीवरी हागलें । तें बा कोणे रें त्यागिलें ॥२॥ दासी कामासी चुकली । ते बा कोणें रें विकली ॥३॥ पांडुरंगाचा तुका पापी । संतसाहें काळासि दापी ॥४॥

2083 " निजों नव्हें सकाळवेळीं । रातीकाळी चिंन चिंनी॥१॥ वोंगळानें घेतली पाठी । केली आटी जीवासी ॥ध्रु.॥ मेळऊनि सवें जन । चिंता नेणे देवळीं च ॥२॥ तुका म्हणे आलों घरा । तोंडा घोरा बाइलेच्या ॥३॥

2084 " नित्य उठोनियां खायाची चिंता । आपुल्या तूं हिता नाठवीसी ॥१॥ जननीचे पोटीं उपजलासी जेव्हां । चिंता तुझी तेव्हां केली तेणें ॥ध्रु.॥ चातकां लागूनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवीं ॥२॥ पक्षी वनचरें आहेत भूमीवरि । तयांलागीं हरि उपेक्षीना ॥३॥ तुका म्हणे भाव धरुन राहें चित्तीं । तरि तो श्रीपति उपेक्षीना ॥४॥

2085 " नित्य मनासी करितों विचार । तों हें अनावर विषयलोभी ॥१॥ आतां मज राखें आपुलिया बळें । न देखें हे जाळें उगवतां ॥ध्रु.॥ सांपडलों गळीं नाहीं त्याची सत्ता । उगळी मागुता घेतला तो ॥२॥ तुका म्हणे मी तों अज्ञान चि आहें । परि तुझी पाहें वास देवा ॥३॥

2086 " निदऩयासी तुम्ही करितां दंडण । तुमचें गार्‍हाणें कोठें द्यावें ॥१॥ भाकितों करुणा ऐकती कान । उगलें चि मौन्य धरिलें ऐसें ॥ध्रु.॥ दीनपणें पाहें पाय भिडावोनि । मंजुळा वचनीं विनवीतसें ॥२॥ तुका म्हणे गांठी मनाची उकला । काय जी विठ्ठला पाहातसां ॥३॥

2087 " निनांवा हें तुला । नांव साजे रे विठ्ठला । बरा शिरविला । फाटक्यामध्यें पाव ॥१॥ कांहीं तरी विचारिलें । पाप पुण्य ऐसें केलें । भुरळें घातलें । एकाएकीं भावासी ॥ध्रु.॥ मुद्राधारणें माळ माळा टिळे । बोल रसाळ कोंवळे । हातीं फांशाचे गुंडाळे । कोण चाळे गृहस्था हे ॥२॥ तुकयाबंधु म्हणे मिस्किन । करितोसी देखोन । पाहा दुरिवरी विच्छिन्न । केला परी संसार ॥३॥

2088 " निरंजनीं आम्हीं बांधियेलें घर । निराकारीं निरंतर राहिलों आम्ही ॥१॥ निराभासीं पूर्ण जालों समरस । खंड ऐक्यास पावलों आम्ही ॥२॥ तुका म्हणे आतां नाहीं अहंकार । जालों तदाकार नित्य शुद्ध ॥३॥

2089 " निरांजनीं एकटवाणें । संग नेणें दुसरा ॥१॥ पाहा चाळविलें कैसें । लावुनि पिसें गोवळें ॥ध्रु.॥ लपलें अंगें अंग । दिला संग होता तो ॥२॥ तुका म्हणे नव्हतें ठावें । जालें भावें वाटोळें ॥३॥

2090 " निरोधती परि न मोडे विकार । बहु हीं दुस्तर विषयद्वारें ॥१॥ राहातेति तुम्ही भरोनि अंतरीं । होतों तदाकारी निर्विषचि ॥ध्रु.॥ कृपेचिया साक्षी असती जवळी । वचनें मोकळीं सरत नाहीं ॥२॥ तुका म्हणे ताळा मेळवणीपाशीं । विनंती पायापाशीं हे चि करीं ॥३॥

2091 " निरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासावीस ॥१॥ म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ध्रु.॥ देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥२॥ तुका म्हणे देव अंतरे ज्यामुळें । आशामोहोजाळें दुःख वाढे ॥३॥

2092 " निरोप सांगतां । न धरीं भय न करीं चिंता ॥१॥ असो ज्याचें त्याचे त्याचे माथां । आपण करावी ते कथा ॥ध्रु.॥ उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥२॥ तुका म्हणे धाक । तया इह ना परलोक ॥३॥

2093 " निरोपासी वेचे । काय बोलतां फुकाचें ॥१॥ परी हें नेघेवे चि यश । भेओं नको सुखी आस ॥ध्रु.॥ सुख समाधानें । कोण पाहे देणें घेणें ॥२॥ न लगे निरोपासी मोल । तुका म्हणे वेचे बोल ॥३॥

2094 " निर्वाहापुरतें अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोंपी गुहा ॥१॥ कोठें ही चित्तासी नसावें बंधन । हृदयीं नारायण सांटवावा ॥ध्रु.॥ नये बोलों फार बैसों जनामधीं । सावधान बुद्धी इंद्रियें दमी ॥२॥ तुका म्हणे घडी घडीनें साधावी । त्रिगुणांची गोवी उगवूनि ॥३॥

2095 " निर्वैर व्हावें सर्वभूतांसवें । साधन बरवें हें चि एक ॥१॥ तरी च अंगीकार करिल नारायण । बडबड तो सीण येणेंविण ॥ध्रु.॥ सोइरें पिशुन समान चि घटे । चित्ती पर ओढे उपकारी ॥२॥ तुका म्हणे चित्ती जालिया निर्मळ । तरि च सकळ केलें होय ॥३॥

2096 " निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥१॥ नाहीं चालों येती सोंगसंपादणी । निवडे अवसानीं शुद्धाशुद्ध ॥ध्रु.॥ त्यागा नांव तरी निर्विषयवासना । कारीयेकारणांपुरते विधि ॥२॥ तुका म्हणे राहे चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंशीं ॥३॥

2097 " निवडावें खडे । तरी दळण वोजें घडे ॥१॥ नाहीं तरि नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥ध्रु.॥ निवडावें तन । सेतीं करावें राखण ॥२॥ तुका म्हणे नीत । न विचारितां नव्हे हित ॥३॥

2098 " निवडे जेवण सेवटींच्या घांसें । होय त्याच्या ऐसें सकळ ही ॥१॥ न पाहिजे जाला बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वांयां ॥ध्रु.॥ संपादिलें होय धरिलें तें सोंग । विटंबणा वेंग पडियाली ॥२॥ तुका म्हणे वर्म नेणतां जें रांधी । पाववी ते बुद्धि अवकळा ॥३॥

2099 " निवडोनि वाण काढिले निराळे । प्रमाण डोहळे यावरि ते ॥१॥ जयाचा विभाग तयासी च फळे । देखणें निराळें कौतुकासी ॥ध्रु.॥ शूर तो ओळखे घायडायहात । येरां होइल मात सांगायासी ॥२॥ तुका म्हणे माझी केळवते वाणी । केला निजस्थानीं जाणवसा ॥३॥

2100 " निश्चितीनें होतों करुनियां सेवा । कां जी मन देवा उद्वेगिलें ॥१॥ अनंत उठती चित्ताचे तरंग । करावा हा त्याग वाटतसे ॥ध्रु.॥ कोण तुम्हांविण मनाचा चाळक । दुजें सांगा एक नारायणा ॥२॥ तुका म्हणे माझा मांडिला विनोद । करऊं नेणें छंद कराल काइ ॥३॥

2101 " निष्ठ‍ तो दिसे निराकारपणें । कोंवळा सगुणें प्रतिपाळी ॥१॥ केला च करावा केला कइवाड । होईंल तें गोड न परेते ॥ध्रु.॥ मथिलिया लागे नवनीत हातां । नासे वितळितां आहाच तें ॥२॥ तुका म्हणे आतां मनाशीं विचार । करावा तो सार एकचित्त ॥३॥

2102 " निष्ठ‍ मी जालों अतिवादागुणें । हें कां नारायणें नेणिजेल ॥१॥ सांडियेली तुम्ही गोत परिसोय । फोडविली डोय कर्मा हातीं ॥ध्रु.॥ सांपडूनि संदी केली जीवेंसाटीं । घ्यावयासि तुटी कारण हें ॥२॥ तुका म्हणे तुज काय म्हणों उणें । नाहीं अभिमानें चाड देवा ॥३॥

2103 " निष्ठ‍ यासाटीं करितों भाषण । आहेसी तूं सर्वजाण दाता ॥१॥ ऐसें कोण दुःख आहे निवारिता । तो मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥ बैसलासी केणें करुनि एक घरीं । नाहीं येथें उरी दुसर्‍याची ॥२॥ तुका म्हणे आलें अवघें चि पायापें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥३॥

2104 " निष्ठ‍ा उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचा चि ॥१॥ तूं माझा जनिता तूं माझा जनिता । रखुमाईंच्या कांता पांडुरंगा ॥ध्रु.॥ मुळींच्या ठेवण्यां आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलों होतों ॥२॥ पोटींच्या आठवा पडिला विसर । काहीं आला भार माथां तेणें ॥३॥ राखिला हा होता बहु चौघां चार । साक्षीने वेव्हार निवडिला ॥४॥ तुका म्हणे कांहीं बोलणें न लगे । आतां पांडुरंगे तूं मी ऐसें ॥५॥

2105 " निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥ निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥ तुका म्हणे ऐसा कोणें उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥३॥

2106 " निसुर संसार करून । होतों पोट भरून । केली विवसी निर्माण । देवपण दाखविलें ॥१॥ ऐसा काढियेला निस । काय म्हुण सहित वंश । आणिलें शेवटास । हाउस तरी न पुरे ॥ध्रु.॥ उरलों पालव्या सेवटीं । तें ही न देखवे दृष्टी । दोघांमध्ये तुटी । रोकडीचि पाडीली ॥२॥ तुकयाबंधु म्हणे गोड । बहु जालें अति वाड । म्हणोनी कां बुड । मुर्‍यांसहित खावें ॥३॥

2107 " नीत सांडोनि अवनीत चाले । भंडउभंड भलतें चि बोले ॥१॥ त्यांत कोणाचें काय बा गेलें । ज्याचें तेणें अनहित केलें ॥ध्रु.॥ ज्यासि वंदावें त्यासी निंदी । मैत्री सांडोनि होतसे दंदी ॥२॥ आन यातीचे संगती लागे । संतसज्जनामध्यें ना वागे ॥३॥ केल्याविण पराक्रम सांगे । जेथें सांगे तेथें चि भीक मागे ॥४॥ करी आपुला चि संभ्रम । परि पुढें कठीण फार यम ॥५॥ तुका म्हणे कांहीं नित्यनेम । चित्ती न धरी तो अधम ॥६॥

2108 " नेघें तुझें नाम । न करीं सांगितलें काम ॥१॥ वाढे वचनें वचन । दोष उच्चारितां गुण ॥ध्रु.॥ आतां तुझ्या घरा । कोण करी येरझारा ॥२॥ तुका म्हणे ठायीं । मजपाशीं काय नाहीं ॥३॥

2109 " नेणतियांसाटीं नेणता लाहान । थिंकोनि भोजन मागे माये ॥१॥ माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तयांवरी ॥२॥ तयांवरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥३॥ घेउनियां एके ठायीं अवतार । एकीं केला थोर वाढवूनि ॥४॥ उणा पुरा यासी नाहीं कोणी ठाव । सारिखा चि देव अवघियांसी ॥५॥ यासी दोनी ठाव सारिखे अनंता । आधील मागुता वाढला तो ॥६॥ वाढला तो सेवाभक्तिचिया गुणें । उपचारमिष्टान्नें करूनियां ॥७॥ करोनियां सायास मेळविलें धन । तें ही कृष्णार्पण केलें तीहीं ॥८॥ कृष्णासी सकळ गाईं घोडे म्हैसी । समर्पिल्या दासी जीवें भाव ॥९॥ जीवें भावें त्याची करितील सेवा । न विसंबती नांवा क्षणभरी ॥१०॥ क्षणभरी होतां वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥११॥ त्यांचे ध्यानीं मनीं सर्वभावें हरि । देह काम करी चत्ति त्यापें ॥१२॥ त्याचें चि चिंतन कृष्ण कोठें गेला । कृष्ण हा जेविला नाहीं कृष्ण ॥१३॥ कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयरा भेटों कृष्णा ॥१४॥ कृष्ण गातां ओंव्या दळणीं कांडणीं । कृष्ण हा भोजनीं पाचारिती ॥१५॥ कृष्ण तयां ध्यानीं आसनीं शयनीं । कृष्ण देखे स्वपनीं कृष्णरूप ॥१६॥ कृष्ण त्यांस दिसे आभास दुश्चितां । धन्य मातापिता तुका म्हणे ॥१७॥

2110 " नेणपणें नाहीं केला हा बोभाट । आतां आली वाट कळों खरी ॥१॥ आतां बहुं शीघ्र यावें लवकरी । वाट पाहें हरी भेटी देई ॥ध्रु.॥ समर्थाच्या बाळा करुणेचें भाषण । तरी त्याची कोण नांदणूक ॥२॥ तुका म्हणे बहु बोलिले बडिवार । पडिलें अंतर लौकिकीं तें ॥३॥

2111 " नेणे करूं सेवा । पांडुरंगा कृपाळुवा ॥१॥ धांवें बुडतों मी काढीं । सत्ता आपुलिया ओढीं ॥ध्रु.॥ क्रियाकर्महीन । जालों इंद्रियां अधीन ॥२॥ तुका विनंती करी । वेळोवेळां पाय धरी ॥३॥

2112 " नेणे गति काय कवण अधोगति । मानिली निश्चिंती तुझ्या पायीं ॥१॥ कर्म धर्म कोण नेणें हा उपाव । तुझ्या पायीं भाव ठेवियेला ॥ध्रु.॥ नेणें निरसं पाप पुण्य नेणें काय । म्हणऊनि पाय धरिले तुझे ॥२॥ वेडा मी अविचार न कळे विचार । तुज माझा भार पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे तुज करितां नव्हे काय । माझा तो उपाय कवण तेथें ॥४॥

2113 " नेणे सुनें चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥१॥ शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेले वांयां बोल जाती ॥ध्रु.॥ क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥२॥ वंदूं निंदूं काय दुराचार । खळाचा विचार तुका म्हणे ॥३॥

2114 " नेणें अर्थ कांहीं नव्हती माझे बोल । विनवितों कोपाल संत झणी ॥१॥ नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगें व्यापूनिया ॥ध्रु.॥ मज मूढा शक्ति कैंचा हा विचार । निगमादिकां पार बोलावया ॥२॥ राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारि । बोबडा उत्तरीं हें चि ध्यान ॥३॥ तुका म्हणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगें भार घेतला माझा ॥४॥

2115 " नेणें काुंफ्कों कान । नाहीं एकांतींचें ज्ञान ॥१॥ तुम्ही आइका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥ध्रु.॥ नाहीं देखिला तो डोळां । देव दाखवूं सकळां ॥२॥ चिंतनाच्या सुखें । तुका म्हणे नेणें दुःखें ॥३॥

2116 " नेणें जप तप अनुष्ठान याग । काळें तंव लाग घेतलासे ॥१॥ रिघालो या भेणें देवाचे पाठीसी । लागे त्याचें त्यासी सांभाळणें ॥ध्रु.॥ मापें माप सळे चालिली चढती । जाली मग राती काय चाले ॥२॥ तुका म्हणे चोरा हातीं जे वांचलें । लाभावरी आलें वारिलेशु ॥३॥

2117 " नेणें वर्ण धर्म जीं आलीं सामोरीं । अवघीं च हरी आळिंगिलीं ॥१॥ हरि लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥२॥ पारणें तयांचें जालें एका वेळे । देखिलें सावळें परब्रम्ह ॥३॥ ब्रम्हानंदें लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरीं ॥४॥ घरोघरीं सुख आनंद सोहळा । सडे रंग माळा चौकदारीं ॥५॥ दारीं वृंदावनें तुळसीचीं वनें । रामकृष्णगाणें नारायण ॥६॥ नारायण तिहीं पूजिला बहुतीं । नाना पुष्पयाती करूनियां ॥७॥ यांचें ॠण नाहीं फिटलें मागील । पुढें भांडवल जोडिती हीं ॥८॥ हीं नव्हतीं कधीं या देवा वेगळीं । केला वनमाळी सेवाॠणी ॥९॥ सेवाॠणें तुका म्हणे रूपधारी । भक्तांचा कैवारी नारायणा ॥१०॥

2118 " नेणों काय नाड । आला उचित काळा आड ॥१॥ नाहीं जाली संतभेटी । येवढी हानी काय मोठी ॥ध्रु.॥ सहज पायांपासीं । जवळी पावलिया ऐसी ॥२॥ चुकी जाली आतां काय । तुका म्हणे उरली हाय ॥३॥

2119 " नेत्र झाकोनियां काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं भावप्रेम ॥१॥ उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा । तुटती यातना गर्भवास ॥ध्रु.॥ मंत्र यंत्र कांहीं करिसी जडी बुटी । तेणें भूतसृष्टी पावशील ॥२॥ सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधुतारक रामकृष्ण ॥३॥

2120 " नेत्राची वासना । तुज पाहावें नारायणा ॥१॥ करीं याचें समाधान । काय पहातोसी अनुमान ॥ध्रु.॥ भेटावें पंढरिराया । हें चि इच्छिताती बाह्या ॥२॥ म्हणतों जावें पंढरीसीं । हेंचि ध्यान चरणासी ॥३॥ चित्त म्हणे पायीं । तुझे राहीन निष्चयीं ॥४॥ म्हणे बंधु तुकयाचा । देवा भाव पुरवीं साचा ॥५॥

2121 " नेदावी सलगी न करावा संग । करी चित्ता भंग वेळोवेळा ॥१॥ सर्प शांतिरूप न म्हणावा भला । झोंबे खवळीला तात्काळ तो ॥२॥ तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन । करावें वचन न घडे तें ॥३॥

2122 " नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥ न पुरेसा हात घाली चेंडूकडे । म्हणीतलें गडे सांभाळावें ॥२॥ सांभाळ करितां सकळां जिवांचा । गोपाळांसि वाचा म्हणे बरें ॥३॥ बरें विचारुनी करावें कारण । म्हणे नारायण बर्‍या बरें ॥४॥ बरें म्हणउनि तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडू तळा ॥५॥ तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडते येती घरा ॥६॥ येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥७॥ पुसतील मात आपआपल्यासि । हरिदुःखें त्यांसी न बोलवे ॥८॥ न बोलवे हरि बुडालासें मुखें । कुटितील दुःखें उर माथे ॥९॥ मायबापें तुका म्हणे न देखती । ऐसें दुःख चित्ती गोपाळांच्या ॥१०॥

2123 " नेदी दुःख देखों दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधीं ॥१॥ आधीं पुढें शुद्ध करावा मारग । दासांमागें मग सुखरूप ॥२॥ पर्वतासि हात लाविला अनंतें । तो जाय वरतें आपेंआप ॥३॥ आपल्याआपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासि ॥४॥ निमित्य करूनि करावें कारण । करितां आपण कळों नेदी ॥५॥ दिनाचा कृपाळु पतितपावन । हें करी वचन सांच खरें ॥६॥ सांगणें न लगे सुखदुःख दासा । तुका म्हणे ऐसा कृपावंत ॥७॥

2124 " नेलें सळेंबळें । चित्तावित्ताचें गांठोळें ॥१॥ साहए जालीं घरिच्या घरीं । होतां ठायीं च कुठोरी ॥ध्रु.॥ मी पातलों या भावा । कपट तें नेणें देवा ॥२॥ तुका म्हणे उघडें केलें । माझें माझ्या हातें नेलें ॥३॥

2125 " नेसणें आलें होतें गर्‍या । लोक रर्‍या करिती ॥१॥ आपणियां सावरिलें । जग भलें आपण ॥ध्रु.॥ संबंध तो तुटला येणें । जागेपणें चेष्टाचा ॥२॥ भलती सेवा होती अंगें । बारस वेगें पडिलें ॥३॥ सावरिलें नीट वोजा । दृष्टीलाजा पुढिलांच्या ॥४॥ बरे उघडिले डोळे । हळहळेपासूनि ॥५॥ तुका म्हणे विटंबना । नारायणा चुकली ॥६॥

2126 " नो बोलावें ऐसें जनासी उत्तर । करितों विचार बहु वेळा ॥१॥ कोण पाप आड ठाकतें येऊन । पालटिति गुण अंतरींचा ॥ध्रु.॥ संसारा हातीं सोडवूनि गळा । हें कां अवकळा येती पुढें ॥२॥ तुका म्हणे सेवे घडेल अंतराय । यास करूं काय पांडुरंगा ॥३॥

2127 " पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥ तेथें काय मी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥ध्रु.॥ जीव न देखे मरण । धरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोगा शुभा अशुभा ॥२॥ इच्छा वाढवी ते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकलें तें पावेल ॥३॥

2128 " पंचभूतांचिये सांपडलों संदीं । घातलोंसे बंदीं अहंकारें ॥१॥ आपल्या आपण बांधविला गळा । नेणें चि निराळा असतां हो ॥ध्रु.॥ कासया हा सत्य लेखिला संसार । कां हे केले चार माझें माझें ॥२॥ कां नाहीं शरण गेलों नारायणा । कां नाहीं वासना आवरिली ॥३॥ किंचित सुखाचा धरिला अभिळास । तेणें बहु नास केला पुढें ॥४॥ तुका म्हणे आतां देह देऊं बळी । करुनि सांडूं होळी संचिताची ॥५॥

2129 " पंचाग्निसाधन करूं धूम्रपान । काय तीर्थाटण करूं सांग ॥१॥ सांग कोणे देशीं आहे तुझें गांव । घेऊनियां धांव येऊं तेथें ॥ध्रु.॥ सांग कांहीं वृत्त कोण करूं व्रत । जेणें कृपावंत होशील तूं ॥२॥ वाटतें सेवटीं जालासि निष्ठ‍ । न देसी उत्तर तुका म्हणे ॥३॥

2130 " पंडित तो चि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥१॥ अवघें सम ब्रम्ह पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ध्रु.॥ रिता नाहीं कोणी ठाव । सर्वां भूतीं वासुदेव ॥२॥ तुका म्हणे तो चि दास । त्यां देखिल्या जाती दोष ॥३॥

2131 " पंडित म्हणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥१॥ काय करावें घोकिलें । वेदपठण वांयां गेलें ॥ध्रु.॥ वेदीं सांगितलें तें न करी । सम ब्रम्ह नेणे दुराचारी ॥२॥ तुका देखे जीवीं शिव । हा तेथींचा अनुभव ॥३॥

2132 " पंढरपुरींचें दैवत भजावें । काया वाचा जावें शरण त्या ॥१॥ मनीं ध्यान करी अहंता धरूनी । तया चक्रपाणी दूर ठेला ॥ध्रु.॥ मान अभिमान सांडुनियां द्यावे । अवघ्यां नीच व्हावें तरी प्राप्त ॥२॥ तुका म्हणे हें चि कोणासी सांगावें । सादर होउनि भावें भजें देवा ॥३॥

2133 " पंढरि पुण्यभूमी भीमा दिक्षणावाहिनी । तीर्थ हें चंद्रभागा महा पातकां धुनी । उतरलें वैकुंठमहासुख मेदिनी ॥१॥ जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा । आरती ओंवाळीन तुम्हां लक्ष्मीकांता ॥ध्रु.॥ नित्य नवा सोहळा हो महावाद्यां गजर । सन्मुख गरुड पारीं उभा जोडुनि कर । मंडितचतुर्भुजा कटीं मिरवती कर ॥२॥ हरिनाम कीर्तन हो आनंद महाद्वारीं । नाचती प्रेमसुखें नर तेथिंच्या नारी । जीवन्मुक्त लोक नित्य पाहाती हरी ॥३॥ आषाढी कार्तिकी हो गरुडटकयां भार । गर्जती नाम घोष महावैष्णववीर । पापासी रीग नाहीं असुर कांपती सुर ॥४॥ हें सुख पुंडलिकें कसें आणिलें बापें । निर्गुण साकारले आम्हांलागिं हें सोपें । म्हणोनि चरण धरोनि तुका राहिला सुखें ॥५॥

2134 " पंढरी पंढरी । म्हणतां पापाची बोहोरी ॥१॥ धन्य धन्य जगीं ठाव । होतो नामाचा उत्साव ॥ध्रु.॥ रिद्धिसिद्धी लोटांगणीं । प्रेमसुखाचिया खाणी ॥२॥ अधिक अक्षरानें एका । भूवैकुंठ म्हणे तुका ॥३॥

2135 " पंढरी पावन जालें माझें मन । आतां करूं ध्यान विठोबाचें ॥१॥ आतां ऐसें करूं नाम गाऊं गीतीं । सुखाचा सांगाती विठो करूं ॥ध्रु.॥ संग करूं त्याचा तो सखा आमचा । अनंतां जन्मांचा मायबाप ॥२॥ परतोनि सोईं धरीं कां रे मना । विठ्ठलचरणा घालीं मिठी ॥३॥ घातलीसे मिठी नाही भक्तिभाव । उदार पंढरिराव तुका म्हणे ॥४॥

2136 " पंढरीचा वारकरी । खेपा वैकुंठबंदरीं ॥१॥ तया नाहीं आणखी पेणें । सदा वैकुंठीं राहाणें ॥ध्रु.॥ आला गेला केल्या यात्रा । उद्धरिलें कुळा सर्वत्रा ॥२॥ तुका म्हणे नाहीं । यासि संदेह कल्पांतीं ही ॥३॥

2137 " पंढरीचा वास धन्य ते चि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥१॥ मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥ध्रु.॥ शांति क्षमा अंगीं विरक्ति सकळ । नैराश्य निर्मळ नारी नर ॥२॥ तुका म्हणे नाहीं वर्णा अभिमान । अवघे जीवनमुक्त लोक ॥३॥

2138 " पंढरीची वाट पाहें निरंतर । निडळावरी कर ठेवूनियां ॥१॥ जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥ पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें । विठ्ठलासारिकें चतुर्भुज ॥२॥ तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा ॥३॥

2139 " पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥१॥ व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहर्निशीं मुखीं नाम ॥२॥ नाम विठोबाचें घेईंन मी वाचे । बीज कल्पांतींचें तुका म्हणे ॥३॥

2140 " पंढरीची वारी जयांचिये घरीं । पायधुळी शिरीं वंदिन त्यांची ॥१॥ दासाचा मी दास पोसणा डोंगर । आतां बहु फार काय बोलों ॥ध्रु.॥ जातीचें मी हीन न कळे भजन । म्हणोनि संतचरण इच्छीतसें ॥२॥ तुका म्हणे मज म्हणावें आपुलें । बहुता तारिलें संतजनीं ॥३॥

2141 " पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥ पुंडलिका दिला वर । करुणाकरें विठ्ठलें ॥ध्रु.॥ मूढ पापी जैसे तैसे । उतरी कासे लावूनि ॥२॥ तुका म्हणे खरें जालें । एका बोलें संतांच्या ॥३॥

2142 " पंढरीचें बा भूत मोटें । आल्या गेल्या झडपी वाटे ॥१॥ तेथें जाऊं नका कोणी । गेले नाहीं आले परतोनि ॥२॥ तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाहीं आला ॥३॥

2143 " पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीत ॥१॥ राही रखुमाईं सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥ध्रु.॥ उद्धव अक्रूर व्यास आंबॠषि । भाईं नारदासी गौरवीन ॥२॥ गरुड बंधु लडिवाळ पुंडलीक । यांचें कवतुक वाटे मज ॥३॥ मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥४॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥५॥ नागोजन मित्रा नरहरि सोनारा । रोहिदास कबिरा सोईंरिया ॥६॥ परसो भागवता सुरदास सांवता । गाईंन नेणतां सकळांसी ॥७॥ चोखामेळा संत जिवाचे सोइरे । न पडे विसर यांचा घडी ॥८॥ जीवींच्या जीवना एका जनार्दना । पाटका कान्हया मिराबाईं ॥९॥ आणीक हे संत महानुभाव मुनि । सकळां चरणीं जीव माझा ॥१०॥ आनंदें ओविया गाईंन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥११॥ तुका म्हणे माझा बळिया बापमाय । हरुषें नांदों सये घराचारी ॥१२॥

2144 " पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥१॥ दुराचारें मोक्ष सुखाचे वसति । भोळी बाळमूर्ति पांडुरंग ॥ध्रु.॥ केला न सहावे तीर्थउपवास । कथेविण दोषसाधन तें ॥२॥ कालियापें भेद मानितां निवडे । श्रोत्रियांसी जोडे आंतेजेता ॥३॥ माहेरीं सलज्ज ते जाणा सिंदळी । काळिमा काजळी पावविते ॥४॥ तुका म्हणे तेथें विश्वास जतन । पुरे भीमास्नान सम पाय ॥५॥

2145 " पंढरीस जाऊं म्हणती । यम थोर चिंता करि ती ॥१॥ या रे नाचों ब्रम्हानंदें । विठ्ठलनामाचिया छंदें ॥ध्रु.॥ धरिली पंढरीची वाट । पापें रिगालीं कपाट ॥२॥ केलें भीमरेचें स्नान । यमपुरी पडिले खान ॥३॥ दुरोनि देखिली पंढरी । पापें गेलीं दुरच्यादुरी ॥४॥ दुरोनि देखिलें राउळ । हरुषें नाचती गोपाळ ॥५॥ तुका म्हणे नाहीं जाणें । अखंड पंढरिराहणें ॥६॥

2146 " पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षम सांगा ॥१॥ अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवें नको दीन गांजों देऊं ॥ध्रु.॥ ग्रासिलें भुजंगें सर्पें महाकाळें । न दिसे हें जाळें उगवतां ॥२॥ कामक्रोधसुनीं श्वापदीं बहुतीं । वेढलों आवर्ती मायेचिये ॥३॥ मृदजलनदी बुडविना तरी । आणूनियां वरी तळा नेते ॥४॥ तुका म्हणे तुवां धरिलें उदास । तरि पाहों वास कवणाची ॥५॥

2147 " पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥१॥ पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥ उदमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥२॥ पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥३॥ तुका म्हणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥४॥

2148 " पंढरीसी जा रे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥ मागील परिहार पुढें नेहे सीण । जालिया दर्षणें एकवेळा ॥२॥ तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चत्तिीं निवडेना ॥३॥

2149 " पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाई जननी भेटे केव्हां ॥१॥ न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥२॥ तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥३॥

2150 " पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार जाला । विठोबा भेटला निराकार ॥१॥ भांबगिरिपाठारीं विस्त जाण केली । वृत्ति थिरावली परब्रम्हीं ॥ध्रु.॥ निर्वाण जाणोनि आसन घातलें । ध्यान आरंभिलें देवाजीचें ॥२॥ सर्प विंचू व्याघ्र आंगासी झोंबले । पीडूं जे लागले सकळिक ॥३॥ दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका म्हणे ॥४॥

2151 " पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥ काय तुझा जीव जातो एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ध्रु.॥ स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचें ॥२॥ थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥३॥ तुका म्हणे कां रे सकुमार जालासी । काय जाब देसी यमदूतां ॥४॥

2152 " पक्षीयाचे घरीं नाहीं सामुगरी । त्यांची चिंता करी नारायण ॥१॥ अजगर जनावर वारुळांत राहे । त्याजकडे पाहे पांडुरंग ॥ध्रु.॥ चातक हा पक्षी नेघे भूमिजळ । त्यासाटीं घननीळ नित्य वर्षे ॥२॥ तुका म्हणे आम्ही पिप्पलिकांची जात । पुरवीं मनोरथ पांडुरंगा ॥३॥

2153 " पटे ढाळूं आम्ही विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥१॥ निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥ बळिवंत जेणें रचिलें सकळ । आम्हां त्याचें बळ अंकितांसी ॥२॥ तुका म्हणे आम्ही देखत चि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥३॥

2154 " पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥१॥ मग तो होऊं नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥ध्रु.॥ नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळती विघ्नें ॥२॥ तुका म्हणे प्राण । करा देवासी अर्पण ॥३॥

2155 " पडली घोर रजनी । संगी कोणी नसे चि ॥१॥ पहा हो कैसें चालविलें । पिसें गोवलें लावूनि ॥ध्रु.॥ कोठें लपविलें तें अंग । होता संग दिला तो ॥ ।२॥ मज कधीं नव्हतें ठावें । दोही भावें वाटोळें ॥३॥ तुका म्हणे कैंची उरी । दोहीपरि नाडिलें ॥४॥

2156 " पडियेलों वनीं थोर चिंतवनी । उसीर कां आझूनि लावियेला ॥१॥ येई गा विठ्ठला येईगा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥ध्रु.॥ काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां ॥२॥ तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे ॥३॥

2157 " पडिला प्रसंग कां मी ऐसा नेणें । संकल्प ते मनें जिरवले ॥१॥ चेष्टाविलें तरी सांगावें कारणे । भक्ती ते उजेवन करावया ॥ध्रु.॥ लावूनियां दृिष्ट घेतली सामोरी । बैसलें जिव्हारीं डसोन तें ॥२॥ तुका म्हणे जीवा लाविला तो चाळा । करावें गोपाळा शीघ्र दान ॥३॥

2158 " पडिलिया ताळा । मग अवघा चि निर्वाळा । तेथें कोणी बळा । नाहीं येत कोणासी ॥१॥ जोडिलें तें लागें हातीं । आपआपली निश्चिंती । हर्ष आणि खंती । तेथें दोनी नासलीं ॥ध्रु.॥ सहज सरलिया कारणें । मग एकला आपण । दिसे तरी भिन्न । वचनाचा प्रसंग ॥२॥ करूनि झाडा पाडा । तुका वेगळा लिगाडा । निश्चिंतीच्या गोडा । गोष्टी म्हुण लागती ॥३॥

2159 " पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य म्हूण ॥१॥ मरणाची कां रे नाहीं आठवण । संचिताचा धन लोभ हेवा ॥ध्रु.॥ देहाचें भय तें काळाचें भातुकें । ग्रासूनि तें एकें ठेविलेंसे ॥२॥ तुका म्हणे कांहीं उघडा रे डोळे । जाणोनि अंधळे होऊं नका ॥३॥

2160 " पडिलों बाहेरि आपल्या कर्तव्यें । संसाराचा जीवें वीट आला ॥१॥ एकामध्यें एक नाहीं मिळे येत । ताक नवनीत निडळिया ॥ध्रु.॥ दोनी जालीं नांवें एकाच्या मथनें । भुस सार गुणें वेगळालीं ॥२॥ तुका म्हणे कोठें वसे मुक्ताफळ । सिंपल्याचें स्थळ खंडलिया ॥३॥

2161 " पडोनियां राहीं । उगा च संतांचिये पायीं ॥१॥ न लगे पुसणें सांगावें । चत्ति शुद्ध करीं भावें ॥ध्रु.॥ सहज ते स्थिति । उपदेश परयुक्ति ॥२॥ तुका म्हणे भाव । जवळी धरूनि आणी देव ॥३॥

2162 " पढीयंतें मागा पांडुरंगापाशीं । मज दुर्बळासी काय पीडा ॥१॥ या चि साटीं दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥ध्रु.॥ कांहीं करितां कोठें नव्हें समाधान । विचारितां पुण्य तें चि पाप ॥२॥ तुका म्हणे आतां निश्चळि चि भलें । तुज आठविलें पांडुरंगा ॥३॥

2163 " पतित मी पापी शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥१॥ तारियेले भक्त न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ध्रु.॥ द्रौपदी बहिणी वैरीं गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥२॥ प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । माझा कां विसर पांडुरंगा ॥३॥ सुदामा ब्राम्हण दारिद्रे पीडिला । आपणाऐसा केला पांडुरंगा ॥४॥ तुका म्हणे तुज शरण निजभावें । पाप निदाऩळावें पांडुरंगा ॥५॥

2164 " पतितपावना । दिनानाथा नारायणा ॥१॥ तुझें रूप माझे मनीं । राहो नाम जपो वाणी ॥ध्रु.॥ ब्रम्हांडनायका । भक्तजनाच्या पाळका ॥२॥ जीवांचिया जीवा । तुका म्हणे देवदेवा ॥३॥

2165 " पतितमिरासी । ते म्यां धरिला जीवेंसी ॥१॥ आतां बळिया सांग कोण । ग्वाही तुझें माझें मन ॥ध्रु.॥ पावणांचा ठसा । दावीं मज तुझा कैसा ॥२॥ वाव तुका म्हणे जालें । रोख पाहिजे दाविलें ॥३॥

2166 " पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥१॥ भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं जाण संभ्रम तो ॥२॥ तुका म्हणे तिच्या दोषा नाहीं पार । भोगील अघोर कुंभपाक ॥३॥

2167 " पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥१॥ तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें ॥ध्रु.॥ सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळावसंतेंसी ॥२॥ तुका म्हणे बाळ मातेपुढें नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥३॥

2168 " पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥१॥ जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥ सुख पुराणीं आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥२॥ शूरा उल्हास अंगीं । गांढव्या मरण ते प्रसंगीं ॥३॥ शुद्ध सोनें उजळे अगी । हीन काळें धांवे रंगीं ॥४॥ तुका म्हणे तो चि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥५॥

2169 " पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळईंच्या माथां तिडिक उठे ॥२॥ आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केलें कोणीं ॥ध्रु.॥ अंगें उणें त्याच्या बैसे टाळक्यांत । तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे ॥२॥ तुका म्हणे आम्ही काय करणें त्यासी । ढका खवंदासी लागतसे ॥३॥

2170 " पत्र उचटिलें प्रेत्नें । ग्वाही कराया कारणें । नाहींतरी पुण्यें । तुझ्या काय उणें आम्हां ॥१॥ नांव तुझें चि करोनि । आहों सुखें पोट भरोनि । केली जाणवणी । म्हणउनि नाहीं म्हणसील ॥ध्रु.॥ आतां इतकियाउपरी । दे नको भलतें करीं । म्हणती ॠणकरी । आमुचा इतकें उदंड ॥२॥ तुकयाबंधु जागा । अळवावया पांडुरंगा । केला कांहीं मागायाची । नव्हती गरज ॥३॥

2171 " पदोपदीं पायां पडणें । करुणा जाण भाकावी ॥१॥ ये गा ये गा विसांवया । करुणा दयासागरा ॥ध्रु.॥ जोडोनियां करकमळ । नेत्र जळ भरोनि ॥२॥ तुका उभें दारीं पात्र । पुरवीं आर्त विठोबा ॥३॥

2172 " पय दधि घृत आणि नवनीत । तैसें दृश्यजात एकपणें ॥१॥ कनकाचे पाहीं अलंकार केले । कनकत्वा आले एकपणें ॥ध्रु.॥ मृत्तिकेचे घट जाले नानापरी । मृत्तिका अवधारीं एकपणें ॥२॥ तुका म्हणे एक एक ते अनेक । अनेकत्वीं एक एकपणा ॥३॥

2173 " परउपकारें कायावाचामन । वेचे सुदर्शन रक्षी तया ॥१॥ याजसाटीं असें योजिलें श्रीपति । संकल्पाचे हातीं सर्व जोडा ॥ध्रु.॥ परपीडे ज्याची जिव्हा मुंडताळे । यमदूत डाळे करिती पूजा ॥२॥ तुका म्हणे अंबॠषी दुर्योधना । काय झालें नेणां दुर्वासया ॥३॥

2174 " परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥१॥ न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥ पडिलिये ठायीं उच्छिष्ट सेवावें । आरते तें चि देवें केलें ऐसें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही आम्हां जी वेगळे । केलेती निराळे द्विज देवें ॥३॥

2175 " परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्त । आणि कर्मी तो तत्वता । बांधला न वजाय ॥१॥ ऐसा अनुभव रोकडा । विश्वासीतो जीवा जोडा । एकांत त्या पुढां । अवघा करी उकल ॥ध्रु.॥ सकट आंबलें तें अन्न । शोधीं तें चि मद्यपान । विषमानें भिन्न । केलें शुद्धाशुद्ध ॥२॥ तुका म्हणे नित । बरवें अनुभवें उचित । तरी काय हित । मोलें घ्यावें लागतें ॥३॥

2176 " परद्रव्य परनारी । अभिळासूनि नाक धरी ॥१॥ जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥ध्रु.॥ सोहोर्‍याची स्थिती । क्रोधें विटाळला चित्ती ॥२॥ तुका म्हणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥३॥

2177 " परद्रव्यपरनारीचा अभिळास । तेथूनि हारास सर्वभाग्या ॥१॥ घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥ पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥२॥ तुका म्हणे एकां तडतांथवड । काळ लागे नाड परी खरा ॥३॥

2178 " परपीडक तो आम्हां दावेदार । विश्वीं विश्वंभर म्हणऊनि ॥१॥ दंडूं त्यागूं बळें नावलोकुं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा दुरि ॥ध्रु.॥ अनाचार कांहीं न साहे अवगुणें । बहु होय मन कासावीस ॥२॥ तुका म्हणे माझी एकविध सेवा । विमुख ते देवा वाळी चित्ते ॥३॥

2179 " परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरि मेघश्यामा । अविनाशा अलक्षा परता परब्रम्हा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥१॥ जय देव जय देव जया जी श्रीपती । मंगळशुभदायका करीन आरती ॥ध्रु.॥ गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा । गिरिधरकर भवसागरतारक दधिमथना । मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनवत्सळ सकळां मूळ जय जयनिधाना ॥२॥ विश्वंभरा सर्वेश्वर जगदाधारा । चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा । सुखसागर गुणआगर मुगुटमणी शूरा । कल्याणकैवल्यमूर्ति मनोहरा ॥३॥ गरुडासना शेषशयना नरहरी । नारायणा ध्याना सुरहरवरगौरी । नंदा नंदनवंदन त्रिभुवनांभीतरी । अनंतनामीं ठसा अवतारांवरी ॥४॥ सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संतां । भगवाना भगवंता कालकृदांता । उत्पत्तिपाळणपासुन संहारणसत्ता । शरण तुकयाबंधु तारीं रिति बहुतां ॥५॥

2180 " परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥१॥ थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥ पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥२॥ तुका म्हणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥३॥

2181 " परस्त्रीतें म्हणतां माता । चत्ति लाजवितें चित्ती ॥१॥ काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥ धर्मधारष्टिगोष्टी सांगे । उष्ट्या हाते नुडवी काग ॥२॥ जें जें कर्म वसे अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥३॥ बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ॥४॥

2182 " पराधीन माझें करूनियां जीणें । सांडीं काय गुणें केली देवा ॥१॥ उदार हे कीर्ति असे जगामाजी । कां तें ऐसें आजि पालटिलें ॥ध्रु.॥ आळवितों परी न पुरे चि रीग । उचित तो त्याग नाहीं तुम्हां ॥२॥ तुका म्हणे कां बा मुळीं च व्यालासी । ऐसें कां नेणसी पांडुरंगा ॥३॥

2183 " परि आतां माझी परिसावी विनंती । रखुमाईच्या पती पांडुरंगा ॥१॥ चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥२॥ तुका म्हणे तुझा म्हणताती मज । आतां आहे लाज हे चि तुम्हां ॥३॥

2184 " परि तो आहे कृपेचा सागर । तोंवरी अंतर पडों नेदी ॥१॥ बहुकानदृष्टी आइके देखणा । पुरोनियां जना उरलासे ॥ध्रु.॥ सांगितल्याविणें जाणे अंतरिंचें । पुरवावें ज्याचें तैसें कोड ॥२॥ बहुमुखें कीर्ती आइकिली कानीं । विश्वास ही मनीं आहे माझा ॥३॥ तुका म्हणे नाहीं जात वांयांविण । पाळितो वचन बोलिलों तें ॥४॥

2185 " परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं ढवळारें एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माड । अवघियां बाजार एक चि जाला । मांविकलीं आपुल्या पाडीं ॥१॥ गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥ध्रु.॥ एक गुणें आगळे असती । अमोल्य नांवांचे खडे । एक समर्थ दुर्बळा घरीं । फार मोलाचे थोडे । एक झगमग करिती वाळवंटीं । कोणी न पाहाती तयांकडे । सभाग्य संपन्न आपुलाले घरीं । मायेक दैन्य बापुडें ॥२॥ एक मानें रूपें सारिख्या असती । अनेकप्रकार याती । ज्याचिया संचितें जैसें आलें पुढें । तयाची तैसी च गति । एक उंचपदीं बैसउनि सुखें । दास्य करवी एका हातीं तुका म्हणे कां मानिती सुख । चुकलिया वांयां खंती ॥३॥

2186 " परिस काय धातु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥१॥ काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥ कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥२॥ चंदनांच्या वासें वसतां चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥३॥ काय त्याचें उणें जालें त्यासी देतां । विचारीं अनंता तुका म्हणे ॥४॥

2187 " परिसाचे अंगें सोनें जाला वळिा । वाकणें या कळा हीन नेव्हे ॥१॥ अंतरीं पालट घडला कारण । मग समाधान तें चि गोड ॥ध्रु.॥ पिकली सेंद पूर्वकर्मा नये । अव्हेरु तो काय घडे मग ॥२॥ तुका म्हणे आणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाकें ॥३॥

2188 " परिसें गे सुनेबाई । नको वेचूं दूध दहीं ॥१॥ आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ॥ध्रु.॥ ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटकें पाळें ॥२॥ माझे हातींचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडूं ॥३॥ वळवटिक्षरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ॥४॥ उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ॥५॥ भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ॥६॥ भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरो सारूं ॥७॥ सून म्हणे बहुत निकें । तुम्ही यात्रेसि जावें सुखें ॥८॥ सासूबाई स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ॥९॥ सुनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं ॥१०॥ सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेंसें इला वाटे ॥११॥ अतां कासया यात्रे जाऊं । काय जाउनि तेथें पाहूं॥ १२॥ मुलें लेंकरें घर दार । माझें येथें चि पंढरपूर ॥१३॥ तुका म्हणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ॥१४॥

2189 " परिसोनि उत्तर । जाब देईंजे सत्वर ॥१॥ जरी तूं होसी कृपावंत । तरि हा बोलावीं पतित ॥ध्रु.॥ नाणीं कांहीं मना । करूनि पापाचा उगाणा ॥२॥ तुका म्हणे नाहीं । काय शक्ति तुझे पायीं ॥३॥

2190 " पर्वकाळीं धर्म न करी नासरी । खर्ची राजद्वारीं द्रव्यरासी ॥१॥ सोइर्‍याची करी पाहुणेर बरा । कांडवी ठोंबरा संतांलागीं ॥ध्रु.॥ बाइलेचीं सर्व आवडीनें पोसी । मातापितरांसी दवडोनी ॥२॥ श्राद्धीं कष्टी होय सांगतां ब्राम्हण । गोवार मागून सावडीतो ॥३॥ नेतो पानें फुलें वेश्येला उदंड । ब्राम्हणासी खांड नेदी एक ॥४॥ हातें मोर्‍या शोधी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कांटाळतो ॥५॥ सारा वेळ धंदा करितां श्रमेना । साधूच्या दर्शना जातां कुंथे ॥६॥ हरिच्या कीर्तनीं गुंगायासि लागे । येरवीं तो जागे उगला चि ॥७॥ पुराणीं बैसतां नाहीं रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्रीं ॥८॥ देवाच्या विभुती न पाहे सर्वथा । करी पानवथा नेत्रभिक्षा ॥९॥ गाईंला देखोनी बदबदां मारी । घोड्याची चाकरी गोड लागे ॥१०॥ ब्राम्हणाचें तीर्थ घेतां त्रास मोटा । प्रेमें घेतो घोंटा घटघटां ॥११॥ तुका म्हणे ऐसे प्रपंचीं गुंतले । जन्मोनि मुकले विठोबासी ॥१२॥

2191 " पवित्र तें अन्न । हरिचिंतनीं भोजन ॥१॥ येर वेठ्या पोट भरी । चाम मसकाचे परी ॥ध्रु.॥ जेऊनि तो धाला । हरिचिंतनीं केला काला ॥२॥ तुका म्हणे चवी आलें । जें कां मिश्रित विठ्ठलें ॥३॥

2192 " पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास घेती जन्म ॥१॥ कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥ वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥३॥ अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं ॥३॥ वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥४॥ कबीर मोमीन लतिब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥५॥ काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरिचे पायीं ॥६॥ चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥७॥ नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥८॥ मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥९॥ यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥१०॥ तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥११॥

2193 " पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥ तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥ देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥२॥ काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥३॥ तुका म्हणे देवभक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥४॥

2194 " पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणीं मस्तक हें ॥१॥ जोडोनि हस्तक करीन विनवणी । घेइन पायवणी धोवोनियां ॥२॥ तुका म्हणे माझें भांडवल सुचें । संतां हें ठायींचें ठावें आहे ॥३॥

2195 " पवित्र होईंन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥१॥ आपुरती बुद्धी पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥ गाईंन ओविया शिष्टांच्या आधारें । सारीन विचारें आयुष्या या ॥२॥ तुका म्हणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥३॥

2196 " पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणीं या विषयांचे ॥१॥ ठेवूनियां लोभीं लोभ । जाला क्षोभ आत्मत्वीं ॥ध्रु.॥ केला आणिकां वाढी पाक । खाणें ताक मूर्खासी ॥२॥ तुका म्हणे मोठा घात । वाताहात हा देह ॥३॥

2197 " पसरूनि राहिलों बाहो । सोयी अहो तुमचिये ॥१॥ आतां यावें लागवेगें । पांडुरंगे धांवत ॥ध्रु.॥ बैसायाची इच्छा कडे । चाली खडे रुपताती ॥२॥ तुका म्हणे कृपाळुवा । करीन सेवा लागली ॥३॥

2198 " पसरोनि मुखें । कैसे धालों बा हारीखें ॥१॥ ब्रम्हादिका दुर्लभ वांटा । आम्हां फावला राणटां ॥ध्रु.॥ गोड लागे काय तरि। कृपावंत जाला हरि ॥२॥ उडती थेंबुटें । अमृताहुनि गोमटें ॥३॥ गोडाहुनि गोड । जिव्हा नाचे वाटे कोड ॥४॥ खुणावुनि तुका । दावी वर्म बोलों नका ॥५॥

2199 " पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥१॥ प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनीं नारायण ॥ध्रु.॥ सुदामा ब्राम्हण दरिद्रे पीडिला । नाहीं विसरला पांडुरंग ॥२॥ तुका म्हणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे डोंगर जाले तरी ॥३॥

2200 " पहावया तुझा जरि बोलें अंत । तरि माझे जात डोळे देवा ॥१॥ स्तंबीं तुज नाहीं घातलें प्रल्हादें । आपुल्या आनंदें अवतार ॥ध्रु.॥ भक्ताचिया काजा जालासी सगुण । तुज नाहीं गुण रूप नाम ॥२॥ ऐसा कोण देवा अधम यातीचा । निर्धार हा साचा नाहीं तुझा ॥३॥ तुका म्हणे बोले कवतुकें गोष्टी । नेदीं येऊं पोटीं राग देवा ॥४॥

2201 " पहावा नयनीं विठ्ठल चि एक । कांहीं तरी सार्थक संसाराचें ॥१॥ कोठें पाहों तुज कां गा लपालासि । कांहीं बोल मशीं नारायणा ॥ध्रु.॥ वाटते उदास मज दाही दिशा । तुजविण हृषीकेशा वांचोनियां ॥२॥ नको ठेवूं मज आपणा वेगळें । बहुत कळवळें तुजलागीं ॥३॥ तुका म्हणे भेटी देई नारायणा । घडी कंठवेना तुजविण ॥४॥

2202 " पहिली माझी ओवी ओवीन जगत्र । गाईंन पवित्र पांडुरंग ॥१॥ दुसरी माझी ओवी दुजें नाहीं कोठें । जनीं वनीं भेटे पांडुरंग ॥ध्रु.॥ तिसरी माझी ओवी तिळा नाहीं ठाव । अवघा चि देव जनीं वनीं ॥२॥ चवथी माझी ओवी वैरिलें दळण । गाईंन निधान पांडुरंग ॥३॥ पांचवी माझी ओवी ते माझिया माहेरा । गाईंन निरंतरा पांडुरंगा ॥४॥ साहावी माझी ओवी साहा ही आटले । गुरूमूर्त भेटले पांडुरंग ॥५॥ सातवी माझी ओवी आठवे वेळोवेळां । बैसलासे डोळां पांडुरंग ॥६॥ आठवी माझी ओवी आठावीस योग । उभा चंद्रभागे पांडुरंग ॥७॥ नववी माझी ओवी सरलें दळण । चुकलें मरण संसारीचें ॥८॥ दाहावी माझी ओवी दाहा अवतारा । न यावें संसारा तुका म्हणे ॥९॥

2203 " पांडुरंगा आतां ऐका हे विनंती । बहु माझे चित्तीं भय वाटे ॥१॥ नाहीं आइकिलें संतांचिया मुखें । तें या मज लोकें भडसाविलें ॥ध्रु.॥ विष्णुदासां गति नाहीं तरावया । म्हणती गेले वांयां कष्टत ही ॥२॥ धिक्कारिती मज करितां कीर्तन । काय सांगों शीण ते काळिचा ॥३॥ तुका म्हणे मज वाटतें उदास । काय करूं यास पांडुरंगा ॥४॥

2204 " पांडुरंगा ऐसा सांडुनि वेव्हारा । आणिकांची करा आस वांयां ॥१॥ बहुतांसी दिला उद्धार उदारें । निवडीना खरें खोटें कांहीं ॥ध्रु.॥ याचिया अंकिता वैकुंठ बंदर । आणीक वेव्हार चालितना ॥२॥ तुका म्हणे माझे हातींचें वजन । यासी बोल कोण ठेवूं सके ॥३॥

2205 " पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरें चरणा संतांचिया ॥१॥ याच्या कृपादानें कथेचा विस्तार । बाबाजीसद्ग‍ुदास तुका ॥२॥ काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवूं चित्तासी आपुलिया ॥३॥ या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥ सीण जाला मज संवसारसंभ्रमें । सीतळ या नामें जाली काया ॥५॥ या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आलें आकारासी निर्विकार ॥६॥ नित्य धांवे तेथें नामाचा गजर । घोष जयजयकार आइकतां ॥७॥ तांतडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥८॥ मूळ नरकाचें राज्यमदेंमाते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥ दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसें गोंचिडासी क्षीर राहे ॥१०॥ हे वाट गोमटी वैकुंठासी जातां । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥ जाणतयांनीं सांगितलें करा । अंतरासी वारा आडूनियां ॥१२॥ यांसी आहे ठावें परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥ नाहीं त्या सुटलीं द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥ चत्ति ज्याचें पुत्रपत्नीबंधूवरी । सुटल हा परि कैसें जाणा ॥१५॥ जाणत नेणत करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥ माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥ कोणीं तरी कांहीं केलें आचरण । मज या कीर्तनेंविण नाहीं ॥१८॥ नाहीं भय भक्ता तराया पोटाचें । देवासी तयाचें करणें लागे ॥१९॥ लागे पाठोवाटी पाहे पायांकडे । पीतांबर खडे वाट सांडी ॥२०॥ डिंकोनियां कां रे राहिले हे लोक । हें चि कवतुक वाटे मज ॥२१॥ जयानें तारिले पाषाण सागरीं । तो ध्या रे अंतरीं स्वामी माझा ॥२२॥ माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥२३॥ हा चि माझा नेम हा चि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचें ॥२४॥ चेतवला अग्नि तापत्रयज्वाळ । तो करी शितळ रामनाम ॥२५॥ मना धीर करीं दृढ चिता धरीं । तारील श्रीहरि मायबाप ॥२६॥ बाप हा कृपाळु भक्ता भाविकांसी । घरीं होय दासी कामारी त्या ॥२७॥ त्याचा भार माथां चालवी आपुला । जिहीं त्या दिधला सर्व भाव ॥२८॥ भावेंविण त्याची प्राप्ति । पुराणें बोलती ऐसी मात ॥२९॥ मात त्याची जया आवडे जीवासी । तया गर्भवासीं नाहीं येणें ॥३०॥ यावें गर्भवासीं तरी च विष्णुदासीं। उद्धार लोकांसी पूज्य होती ॥३१॥ होती आवडत जीवाचे ताइत । त्यां घडी अच्युत न विसंभे ॥३२॥ भेदाभेद नाहीं चिंता दुःख कांहीं । वैकुंठ त्या ठायीं सदा वसे ॥३३॥ वसे तेथें देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥३४॥ संपदा तयांची न सरे कल्पांतीं । मेळविला भक्ती देवलाभ ॥३५॥ लाभ तयां जाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भक्ती केला ॥३६॥ लागलेंसे पिसें काय मूढजनां । काय नारायणा विसरलीं ॥३७॥ विसरलीं तयां थोर जाली हाणी । पचविल्या खाणी चौर्‍यासी ॥३८॥ शिकविलें तरी नाहीं कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥३९॥ गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नासिवंत ॥४०॥ तळमळ त्याची कांहीं तरी करा । कां रे निदसुरा बुडावया ॥४१॥ या जनासी भय यमाचें नाहीं । सांडियेलीं तिहीं एकराज्यें ॥४२॥ जेणें अग्निमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता ॥४३॥ तान भूक जिहीं साहिले आघात । तया पाय हात काय नाहीं ॥४४॥ नाहीं ऐसा तिहीं केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥४५॥ याच जन्में घडे देवाचें भजन । आणीक हें ज्ञान नाहीं कोठें ॥४६॥ कोठें पुढें नाहीं घ्यावया विसांवा । फिरोनि या गांवा आल्याविण ॥४७॥ विनवितां दिवस बहुत लागती । म्हणउनि चित्ती देव धरा ॥४८॥ धरा पाय तुम्ही संतांचे जीवासी । वियोग तयांसी देवा नाहीं ॥४९॥ नाहीं चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया ॥५०॥ त्याची च उच्छष्टि बोलतों उत्तरें । सांगितलें खरें व्यासादिकीं ॥५१॥ व्यासें सांगितलें भक्ति हे विचार । भवसिंधु पार तरावया ॥५२॥ तरावया जना केलें भागवत । गोवळ गोपी क्त माता पिता ॥५३॥ तारुनियां खरे नेली एक्यासरें । निमित्ति उत्तरें रुसिया ॥५४॥ यासी वर्म ठावें भक्तां तरावया । जननी बाळ माया राख तान्हें ॥५५॥ तान्हेलें भुकेलें म्हणे वेळोवेळां । न मगतां लळा जाणोनियां ॥५६॥ जाणोनियां वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवें धांवे ॥५७॥ धांवे सर्वता धेनु जैसी वत्सा । भक्तालागीं तैसा नारायण ॥५८॥ नारायण व्होवा हांव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाहीं ॥५९॥ पार नाहीं सुखा तें दिलें तयासी । अखंड वाचेसी रामनाम ॥६०॥ रामनाम दोनी उत्तम अक्षरें । भवानीशंकरें उपदेशिलीं ॥६१॥ उपदेश करी विश्वनाथ कानीं । वाराणसी प्राणी मध्यें मरे ॥६२॥ मरणाचे अंतीं राम म्हणे जरी । न लगे यमपुरी जावें तया ॥६३॥ तयासी उत्तम ठाव वैकुंठीं । वसे नाम चित्ती सर्वकाळ ॥६४॥ सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरीं । नसे क्षणभरी थिर कोठें ॥६५॥ कोठें नका पाहों करा हरिकथा । तेथें अवचिता सांपडेल ॥६६॥ सांपडे हा देव भाविकांचे हातीं । शाहाणे मरती तरी नाहीं ॥६७॥ नाहीं भलें भक्ती केलियावांचूनि। अहंता पापिणी नागवण ॥६८॥ नागवलों म्हणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकलों तो ॥६९॥ तो चि देव येर नव्हे ऐसें कांहीं । जनार्दन ठायीं चहूं खाणी ॥७०॥ खाणी भरूनियां राहिलासे आंत । बोलावया मात ठाव नाहीं ॥७१॥ ठाव नाहीं रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥७२॥ वाणी बोलूनियां गेलीं एक पुढें । तयासी वांकुडें जातां ठक ॥७३॥ ठका नाहीं अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥७४॥ दास ठेला पोट अर्थ दंभासाटीं । म्हणउनि तुटी देवासवें ॥७५॥ सवें देव द्विजातीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥७६॥ पाड करूनियां नागविलीं फार । पंडित वेव्हार खळवादी ॥७७॥ वादका निंदका देवाचें दरुशन । नव्हे जाला पूर्ण षडकर्मा ॥७८॥ षडकर्मा हीन रामनाम कंठीं । तयासवें भेटी सवें देवा ॥७९॥ देवासी आवड भाविक जो भोळा । शुद्ध त्या चांडाळा करुनि मानी ॥८०॥ मानियेल्या नाहीं विश्वास या बोला । नाम घेतां मला युक्ति थोडी ॥८१॥ युक्त थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥८२॥ बोलतां पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युक्ति पुढें त्यांच्या ॥८३॥ पुढें पार त्याचा न कळे चि जातां । पाउलें देखतां ब्रम्हादिकां ॥८४॥ काय भक्तीपिसें लागलें देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय ॥८५॥ होय हा सगुण निर्गुण आवडी । भक्तिप्रिय गोडी फेडावया ॥८६॥ या बापासी बाळ बोले लाडें कोडें । करुनि वांकुडें मुख तैसें ॥८७॥ तैसें याचकाचें समाधान दाता । होय हा राखता सत्वकाळीं ॥८८॥ सत्वकाळीं कामा न येती आयुधें । बळ हा संबंध सैन्यलोक ॥८९॥ सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥९०॥ कोपा मरण नाहीं शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्वगुणीं ॥९१॥ सत्वरजतमा आपण नासती । करितां हे भक्ति विठोबाची ॥९२॥ चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथें उणें काय निजसुखा ॥९३॥ सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तो चि एक ॥९४॥ एक चित्त धरूं विठोबाचे पायीं । तेथें उणें कांहीं एक आम्हां ॥९५॥ आम्हांसी विश्वास याचिया नामाचा । म्हणउनि वाचा घोष करूं ॥९६॥ करूं हरिकथा सुखाची समाधि । आणिकाची बुद्धी दुष्ट नास ॥९७॥ नासे संवसार लोकमोहो माया । शरण जा रे तया विठोबासी ॥९८॥ सिकविलें मज मूढा संतजनीं । दृढ या वचनीं राहिलोंसे ॥९९॥ राहिलोंसे दृढ विठोबाचे पायीं । तुका म्हणे कांहीं न लगे आंता ॥१००॥

2206 " पांडुरंगा कांहीं आइकावी मात । न करावें मुक्त आतां मज ॥१॥ जन्मांतरें मज तैसीं देई देवा । जेणें चरणसेवा घडे तुझी ॥ध्रु.॥ वाखाणीन कीर्ती आपुलिया मुखें । नाचेन मी सुखें तुजपुढें ॥२॥ करूनि कामारी दास दीनाहुनी । आपुला अंगणीं ठाव मज ॥३॥ तुका म्हणे आम्ही मृत्युलोकीं भले । तुझे चि अंखिले पांडुरंगा ॥४॥

2207 " पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरिसील सत्ता सकळ ही ॥१॥ कां जी आम्हांवरी आणिकांची सत्ता । तुम्हासी असतां जवळिक ॥२॥ तुका म्हणे पायीं केलें निवेदन । उचित हें दान करीं आतां ॥३॥

2208 " पांडुरंगा तुझे काय वाणूं गुण । पवाडे हे धन्य जगीं तुझे ॥१॥ दंडिलें दुर्वासा सुरा असुरानें । तो आला गार्‍हाणें सांगावया ॥ध्रु.॥ बळिचिये द्वारीं तुम्ही बैसलेती । दुर्वास विनंती करी भावें ॥२॥ तुका म्हणे कृपासागरा श्रीहरी । तुझी भक्तावरी प्रेमच्छाया ॥३॥

2209 " पांडुरंगे पांडुरंगे । माझे गंगे माउलिये ॥१॥ पान्हां घाली प्रेमधारा । पूर क्षीरा लोटों दे ॥ध्रु.॥ अंगें अंग मेळउनी । करीं धणी फेडाया ॥२॥ तुका म्हणे घेइन उड्या । सांडिन कुड्या भावना ॥३॥

2210 " पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परिणाम सेंडी धरिली आम्ही ॥१॥ आतां संतांनीं करावी पंचाईत । कोण हा फजितखोर येथें ॥ध्रु.॥ कोणाचा अन्याय येथें आहे स्वामी । गर्जतसों आम्ही पातकी ही ॥२॥ याचें पावनपण सोडवा चि तुम्ही । पतितपावन आम्ही आहों खरें ॥३॥ आम्ही तंव आहों अन्यायी सर्वथा । याची पावन कथा कैसी आहे ॥४॥ तुका म्हणे आम्ही मेलों तरी जाणा । परि तुमच्या चरणा न सोडावें ॥५॥

2211 " पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुद्धिभेद ॥१॥ जीवशिवा सेज रचिली आनंदें । औठावे पदीं आरोहण ॥२॥ निजीं निजरूपीं निजविला तुका । अनुहाते बाळका हलरु गाती ॥३॥

2212 " पाइकपणें खरा मुशारा । पाईंक तो खरा पाइकीनें ॥१॥ पाईंक जाणें मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥ध्रु.॥ एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाईंक तो पणें निवडला ॥२॥ करूनि कारण स्वामी यश द्यावें । पाइका त्या नांव खरेपण ॥३॥ तुका म्हणे ठाव पाइकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥४॥

2213 " पाइकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥१॥ पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ध्रु.॥ आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥२॥ सांडितां मारग मारिती पाईंक । आणिकांसी शीक लागावया ॥३॥ तुका म्हणे विश्वा घेऊनि विश्वास । पाईंक तयास सुख देती ॥४॥

2214 " पाइकीचें सुख पाइकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटीं ॥१॥ येतां गोळ्या बाण साहिले भडमार । वर्षातां अपार वृष्टी वरी ॥ध्रु.॥ स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥२॥ पाइकांनीं सुख भोगिलें अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं ॥३॥ तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥४॥

2215 " पाईंक जो जाणे पाइकींनीं भाव । लाग पगें ठाव चोरवाट ॥१॥ आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥ध्रु.॥ येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाईंक त्या जग स्वामी मानी ॥२॥ ऐसें जन केलें पाइकें पाईंक । जया कोणी भीक न घलिती ॥३॥ तुका म्हणे ऐसे जयाचे पाईंक । बिळया तो नाइक त्रैलोकींचा ॥४॥

2216 " पाईंक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥१॥ तो एक पाईंक पाइकां नाईंक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ध्रु.॥ तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥२॥ विश्वासावांचूनि पाइकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥३॥ तुका म्हणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥४॥

2217 " पाईंकपणें जोतिला सिद्धांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥१॥ पाइकावांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥ध्रु.॥ तरि व्हावें पाईंक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥२॥ पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥३॥ तुका म्हणे एका क्षणांचा करार । पाईंक अपार सुख भोगी ॥४॥

2218 " पाचारितां धावे । ऐसी ठायींची हे सवे ॥१॥ बोले करुणा वचनीं । करी कृपा लावी स्तनीं ॥ध्रु.॥ जाणे कळवळा । भावसिद्धींचा जिव्हाळा ॥२॥ तुका म्हणे नाम । मागें मागें धांवे प्रेम॥३॥

2219 " पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । कार्या देहाकडे नावलोकीं ॥१॥ म्हणउनि मागें कंठींचा सौरस । पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.॥ कृपेच्या कटाक्षें निभें कळिकाळा । येतां येत बळाशक्तीपुढें ॥२॥ तुका म्हणे गुढी आणीन पायांपें । जगा होइल सोपें नाम तुझें ॥३॥

2220 " पाठी लागे तया दवडीं दुरी । घालीं या बाहेरी संवसारा ॥१॥ येउनि दडें तुमच्या पायीं । धांवें तई छो म्हणा ॥ध्रु.॥ पारखियाचा वास पडे । खटबड उठी तें ॥२॥ तुका म्हणे लाविला धाक । नेदी ताक खाऊं कोणी ॥३॥

2221 " पाठीलागा काळ येतसे या लागें । मी माझें वाउगें मेंढीऐसें ॥१॥ आतां अगी लागो ऐसिया वेव्हारा । तूं माझा सोइरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ वागविला माथां नसतां चि भार । नव्हे तें साचार जाणील तों ॥२॥ तुका म्हणे केलें जवळील दुरी । मृगजळ वरी आड आलें ॥३॥

2222 " पाठीवरी भार । जातो वाहूनियां खर ॥१॥ संत नेतील त्या ठाया । माझी आधीन त्यां काया ॥ध्रु.॥ मोटचौफळ । अंतीं उच्छिष्टाचें बळ ॥२॥ न संडीं मारग । येथें न चोरूनि अंग ॥३॥ आपुलिया सत्ता । चालविती नाहीं चिंता ॥४॥ कळवळिला तुका । घराचार येथें नका ॥५॥

2223 " पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ॥१॥ आपणां आपण हे चि कसवटी । हर्षामर्ष पोटीं विरों द्यावें ॥ध्रु.॥ नवनीत तोंवरी कडकडी लोणी । निश्चळ होऊनी राहे मग ॥२॥ तुका म्हणे जरी जग टाकी घाया । त्याच्या पडे पायां जन मग ॥३॥

2224 " पाडावी ते बरी । गांठी धुरेसवें खरी ॥१॥ नये मरों लंडीपणें । काय बापुडें तें जिणें ॥ध्रु.॥ लुटावें भांडार । तरी जया नाहीं पार ॥२॥ तुका म्हणे नांवें । कीर्ती आगळीनें ज्यावें ॥३॥

2225 " पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥१॥ आवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥ध्रु.॥ भिक्षा कामधेनुऐशी । अवकाशीं शयन ॥२॥ पांघरोनि तुका दिशा । केला वास अलक्षीं ॥३॥

2226 " पाण्या निघाली गुजरी । मन ठेविलें दो घागरीं । चाले मोकऑया पदरीं । परी लक्ष तेथें ॥१॥ वावडी उडाली अंबरीं । हातीं धरोनियां दोरी । दिसे दुरिच्या दुरी । परी लक्ष तेथें ॥ध्रु.॥ चोर चोरी करी । ठेवी वनांतरीं । वर्ततसे चराचरीं । परी लक्ष तेथें ॥२॥ व्यभिचारिणी नारी । घराश्रम करी । परपुरुष जिव्हारीं । परी लक्ष तेथें ॥३॥ तुका म्हणे असों भलतिये व्यापारीं । लक्ष सर्वेश्वरीं । चुकों नेदी ॥४॥

2227 " पात्र शुद्ध चत्ति गोही । न लगे कांहीं सांगणें ॥१॥ शूर तरी सत्य चि व्हावें । साटी जीवें करूनि ॥ध्रु.॥ अमुप च सुखमान । स्वामी जन मानावें ॥२॥ तुका म्हणे जैसी वाणी । तैसे मनीं परिपाक ॥३॥

2228 " पानें जो खाईल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ॥१॥ तमाखू ओढूनि काढला जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥ध्रु.॥ कीर्तनीं बडबड करील जो कोणी । बेडुक होउनी येइल जन्मा ॥२॥ जयाचिये मनीं कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥३॥ जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचें काळें तोंड तुका म्हणे ॥४॥

2229 " पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरिदासांची ॥१॥ ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिर्थे जगीं दानें व्रतें ॥ध्रु.॥ चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥२॥ भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥३॥ तुका म्हणे मन जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥४॥

2230 " पाप ताप माझे गुणदोष निवारीं । कृष्णा विष्णु हरी नारायणा ॥१॥ काम क्रोध वैरी घालोनि बाहेरी । तूं राहें अंतरीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ करिशील तरी नव्हे कांइ एक । निर्मिलें त्रैलोक्य हेळामात्रें ॥२॥ समर्थासि काय आम्हीं शिकवावें । तुका म्हणे यावें पांडुरंगा ॥३॥

2231 " पाप पुण्य दोन्ही वाहाती मारग । स्वर्गनर्कभोग यांचीं पेणीं ॥१॥ एका आड एक न लगे पुसावें । जेविल्या देखावें मागें भूक ॥ध्रु.॥ राहाटीं पडिलें भरोनियां रितीं । होतील मागुतीं येतीं जातीं ॥२॥ तुका म्हणे आम्ही खेळतियांमधीं । नाहीं केली बुद्धी स्थिर पाहों ॥३॥

2232 " पापपुण्यसुखदुःखाचीं मंडळें । एक एकाबळें वाव घेती ॥१॥ कवतुक डोळां पाहिलें सकळ । नाचवितो काळ जीवांसी तो ॥ध्रु.॥ स्वर्गाचिया भोगें सरतां नरक । मागें पुढें एक एक दोन्ही ॥२॥ तुका म्हणे भय उपजलें मना । घेई नारायणा कडिये मज ॥३॥

2233 " पापांचीं संचितें देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥१॥ पेरी कडू जिरें मागे अमृतफळ । आकाऩ वृक्षफळें कैसीं येती ॥ध्रु.॥ सुख अथवा दुःख भोग हो देहेचा । नास हा ज्ञानाचा न करावा ॥२॥ तुका म्हणे आतां देवा कां रुसावें । मनासी पुसावें काय केलें ॥३॥

2234 " पापाचिया मुळें । जालें सत्याचें वाटोळें ॥१॥ दोष जाले बळिवंत । नाहीं ऐसी जाली नीत ॥ध्रु.॥ मेघ पडों भीती । पिकें सांडियेली क्षिती ॥२॥ तुका म्हणे कांहीं । वेदा वीर्य शक्ति नाहीं ॥३॥

2235 " पापाची मी राशी । सेवाचोर पायांपाशीं ॥१॥ करा दंड नारायणा । माझ्या मनाची खंडणा ॥ध्रु.॥ जना हातीं सेवा । घेतों लंडपणें देवा ॥२॥ तुझा ना संसार । तुका दोहींकडे चोर ॥३॥

2236 " पापाची वासना नको दावूं डोळां । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥ निंदेचें श्रवण नको माझे कानीं । बधिर करोनि ठेवीं देवा ॥ध्रु.॥ अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥२॥ नको मज कधीं परस्त्रीसंगति । जनांतुन माती उठतां भली ॥३॥ तुका म्हणे मज अवघ्याचा कांटाळा । तूं एक गोपाळा आवडसी ॥४॥

2237 " पापिया चांडाळा हरिकथा नावडे । विषयालागीं आवडें गाणें त्याला ॥१॥ ब्राम्हणा दक्षणा देतां रडे रुका । विषयालागीं फुका लुटीतसे ॥ध्रु.॥ वीतभरि लंगोटी नेदी अतीताला । खीरम्या देतो शाला भोरप्यासी ॥२॥ तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरि । जातो यमपुरी भोगावया ॥३॥

2238 " पापी तो नाठवी आपुल्या संचिता । ठेवी भगवंता वरी बोल ॥१॥ भेईना करितां पापाचे डोंगर । दुर्जन पामर दुराचारी ॥ध्रु.॥ नाठवी तो खळ आपुली करणी । देवासी निंदोनि बोलतसे ॥२॥ तुका म्हणे त्याच्या तोंडा लागो काटी । नाहीं जगजेठी जया चित्तीं ॥३॥

2239 " पापी म्हणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥१॥ ऐशा विचाराचे घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥ एकवेळ जेणें पुत्राच्या उद्देशें । घेतल्याचें कैसें नेलें दुःख ॥२॥ तुका म्हणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥३॥

2240 " पायरवे अन्न । मग करी क्षीदक्षीण ॥१॥ ऐसे होती घातपात । लाभे विण संगें थीत ॥ध्रु.॥ जन्माची जोडी । वाताहात एके घडी ॥२॥ तुका म्हणे शंका । हित आड या लौकिका ॥३॥

2241 " पाया जाला नारू । तेथें बांधला कापूरु । तेथें बिबव्याचें काम । अधमासि तों अधम ॥१॥ रुसला गुलाम । धणी करीतो सलाम । तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥ रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि । तेथें बटकीचें काम । अधमासि तों अधम ॥२॥ देव्हार्‍यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला । तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥३॥ तुका म्हणे जाती । जातीसाटीं खाती माती ॥४॥

2242 " पायां पडावें हें माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं ॥१॥ तरि हे सलगी कवतुक केलें । लडिवाळ धाकुलें असें बाळ ॥ध्रु.॥ काय उणें तुम्हां संताचिये घरीं । विदित या परी सकळ ही ॥२॥ तुका म्हणे माझें उचित हे सेवा । नये करूं ठेवाठेवी कांहीं ॥३॥

2243 " पायां लावुनियां दोरी । भृंग बांधिला लेंकुरीं ॥१॥ तैसा पावसी बंधन । मग सोडवील कोण ॥ध्रु.॥ गळां बांधोनियां दोरी । वांनर हिंडवी घरोघरीं ॥२॥ तुका म्हणे पाहें । रीस धांपा देत आहे ॥३॥

2244 " पायांच्या प्रसादें । कांहीं बोलिलों विनोदें ॥१॥ मज क्षमा करणें संतीं । नव्हे अंगभूत युक्ति ॥ध्रु.॥ नव्हे हा उपदेश । तुमचें बडबडिलों शेष ॥२॥ तुमचे कृपेचें पोसणें । जन्मोजन्मीं तुका म्हणे ॥३॥

2245 " पायांपासीं चित्त । तेणें भेटी अखंडित ॥१॥ असे खेळे भलते ठायीं । प्रेमसूत्रदोरी पायीं ॥ध्रु.॥ केलेंसे जतन । मुळीं काय तें वचन ॥२॥ तुका म्हणे सर्वजाणा । ठायीं विचारावें मना ॥३॥

2246 " पाळितों वचन । परि बहु भीतें मन ॥१॥ करितें पायांशीं सलगी । नये बैसों अंगसंगीं ॥ध्रु.॥ जोडोनियां कर । उभें असावें समोर ॥२॥ तुका म्हणे संत । तुम्ही मी बहु पतित ॥३॥

2247 " पाळियेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥१॥ बहुजन्माचें पोषणें । सरतें पायांपाशीं तेणें ॥ध्रु.॥ सवे दिली लागों । भातें आवडीचें मागों ॥२॥ तुका म्हणे भिन्न । नाहीं दिसों दिलें क्षण ॥३॥

2248 " पाळिलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥१॥ आतां काय माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ध्रु.॥ नेदी वारा अंगीं लागों आघाताचा । घेतला ठायींचा भार माथां ॥२॥ तुका म्हणे बोल करितों आवडी । अविट ते चि गोडी अंतरींची ॥३॥

2249 " पावतों ताडन । तरी हें मोकलितों जन ॥१॥ मग मी आठवितों दुःखें । देवा सावकाश मुखें ॥ध्रु.॥ होती अप्रतिष्ठा । हो तों वरपडा कष्टा ॥२॥ तुका म्हणे मान । होतां उत्तम खंडन ॥३॥

2250 " पावलों पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥ पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥ध्रु.॥ पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलें ॥२॥ पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥३॥ पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥४॥ पावलों पंढरी आपुलें माहेर । नाहीं संवसार तुका म्हणे ॥५॥

2251 " पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । जालें या चित्तासी समाधान ॥१॥ मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजें ॥ध्रु.॥ सांभाळासी येऊं नेदी च उणीव । अधिकारगौरव राखे तैसें ॥२॥ तुका म्हणे सर्व अंतर्बाहए आहे । जया तैसा राहे कवळूनी ॥३॥

2252 " पावलों हा देह कागतालिन्यायें । न घडे उपायें घडों आलें ॥१॥ आतां माझीं खंडीं देह देहांतरें । अभय दातारें देऊनियां ॥ध्रु.॥ अंधळ्याचे पाठीं धनाची चरवी । अघटित तेंवि घडों आलें ॥२॥ तुका म्हणे योग घडला बरवा । आतां कास देवा न सोडीं मी ॥३॥

2253 " पाववावें ठाया । ऐसें सवें बोलों तया ॥१॥ भावा ऐसी क्रिया राखे । खोट्या खोटेपणें वाखे ॥ध्रु.॥ न ठेवूं अंतर । कांहीं भेदाचा पदर ॥२॥ तुका म्हणे जीवें भावें । सत्या मानविजे देवें ॥३॥

2254 " पावावे संतोष । तुम्हीं यासाटीं सायास ॥१॥ करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥ध्रु.॥ द्यावें अभयदान । भुमीन पाडावें वचन ॥२॥ तुका म्हणे परस्परें । कांहीं वाढवीं उत्तरें ॥३॥

2255 " पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ॥१॥ सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव ते चि जाले ॥ध्रु.॥ उदका भिन्न पालट काईं । गंगा गोड येरां चवी काय नाहीं ॥२॥ तुका म्हणे हें भाविकांचें वर्म । येरीं धर्माधर्म विचारावें ॥३॥

2256 " पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा ॥१॥ सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥ध्रु.॥ ऐसी सहस्र त्या सुंदरा कामिनी । माजी मुखरणी मंदोदरी ॥२॥ पुत्रपौत्राचा लेखा कोण करी । मुख्य पुत्र हरी इंद्रा आणी ॥३॥ चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण ॥४॥ तुका म्हणे ज्याचे देव बांदवडी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥५॥

2257 " पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हें हो हातीं एका समर्थाचे ॥१॥ अनामिका हातीं समर्थाचा सिक्का । न मानितां लोकां येइल कळों ॥२॥ तुका म्हणे येथें दुराग्रह खोटा । आपुल्या अदृष्टा शरण जावें ॥३॥

2258 " पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ॥१॥ काय ऐसें पाप होतें आम्हांपासीं । बोलती एकासी एक एका ॥२॥ एकांचिये डोळां असुं बाह्यात्कारी । नाहीं तीं अंतरीं जळतील ॥३॥ जळतील एकें अंतर्बाह्यात्कारें । टाकिलीं लेकुरें कडियेहूनि ॥४॥ निवांत चि एकें राहिलीं निश्चिंत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥५॥ त्यांचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळांवांचूनियां ॥६॥ वांचणें तें आतां खोटें संवसारीं । नव्हे भेटी जरी हरिसवें ॥७॥ सवें घेऊनियां चालली गोपाळां । अवघीं च बाळा नर नारी ॥८॥ नर नारी नाहीं मनुष्याचें नावें । गोकुळ हें गांव सांडियेलें ॥९॥ सांडियेलीं अन्नें संपदा सकळ । चित्ती तो गोपाळ धरुनि जाती ॥१०॥ तिरीं माना घालूनियां उभ्या गाईं । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥११॥ यमुनेच्या तिरीं झाडें वृक्ष वल्ली । दुःखें कोमाइलीं कृष्णाचिया ॥१२॥ यांचें त्यांचें दुःख एक जालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥१३॥ मायबाप तुका म्हणे सहोदर । तोंवरी च तीर न पवतां ॥१४॥

2259 " पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥१॥ ज्याचे त्याचे मिळणीं मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥ध्रु.॥ जाणिवेचें नेदी अंग । दिसों रंग निवडीना ॥२॥ तुका म्हणे ये चि ठायीं । हें तों नाहीं सर्वत्र ॥३॥

2260 " पाहा किती आले शरण समान चि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥१॥ मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥ नाहीं पाहिला आचार कुळगोत्रांचा विचार । फेडूं आला भार मग न म्हणे दगड ॥२॥ तुका म्हणे सर्वजाणा तुझ्या आल्यावरि मना । केला तो उगाणा घडल्या दोषांच्या ॥३॥

2261 " पाहा कैसेकैसे । देवें उद्धरिले आनयासें ॥१॥ ऐका नवल्याची ठेव । नेणतां भक्तिभाव ॥ध्रु.॥ कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बैसला ॥२॥ पांखांच्या फडत्कारीं । उद्धरुनी नेली घारी ॥३॥ खेचरें पिंडी दिला पाव । त्या पूजनें धाये देव ॥४॥ तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हो कोंवळा ॥५॥

2262 " पाहा रे हें दैवत कैसें । भक्तिपिसें भाविक ॥१॥ पाचारिल्या सरिसें पावे । ऐसें सेवे बराडी ॥ध्रु.॥ शुल्क काष्ठीं गुरुगुरी । लाज हरि न धरी ॥२॥ तुका म्हणे अर्धनारी । ऐसीं धरी रूपडीं ॥३॥

2263 " पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन । पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचे ॥१॥ ऐसें अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ । केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥ध्रु.॥ थोर या युगाचें आश्चर्य । ब्रम्हकर्म उत्तम सार । सांडूनियां द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥२॥ ऐसे यथार्थाचे अनर्थ । जाला बुडाला परमार्थ । नाहीं जाली ऐसी नीत । हा हा भूत पातलें ॥३॥ शांति क्षमा दया । भावभक्ति सित्क्रया । ठाव नाहीं सांगावया । सत्वधैर्य भंगिलें ॥४॥ राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म । म्हणवितां रामराम । श्रम महा मानिती ॥५॥ थेर भोरपाचे विशीं । धांवती भूतें आविसा तैसीं । कथा पुराण म्हणतां सिसी । तिडीक उठी नकर्‍याचे ॥६॥ विषयलोभासाटीं । सर्वार्थेसीं प्राण साटी । परमार्थी पीठ मुठी । मागतां उठती सुनींसीं ॥७॥ धनाढए देखोनि अनामिक । तयातें मनिती आवश्यक । अपमानिले वेदपाठक । सात्विक शास्त्रज्ञ संपन्न ॥८॥ पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी । सुनांचिया दासी । सासा जाल्या आंदण्या ॥९॥ खोटें जालें आली विंवसी । केली मर्यादा नाहींसी । भ्रतारें तीं भार्यासी । रंक तैसीं मानिती ॥१०॥ नमस्कारावया हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा । पोटासाटीं खौसा । वंदिती मलिंछाच्या ॥११॥ बहुत पाप जालें उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ। अभक्ष भिक्षती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥१२॥ कैसें जालें नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न । विडे घेऊनि ब्राम्हण । अविंदवाणी वदताती ॥१३॥ कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदनें दासीचीं चुंबिती । सोवळ्याच्या स्फीती । जगीं मिरविती पवित्रता ॥१४॥ मद्यपानाची सुराणी । नवनीता न पुसे कोणी । केळवती व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥१५॥ केवढी दोषाची सबळता । जाली पाहा हो भगवंता । पुण्य धुडावोनी संता । तीर्थां हरी आणिली ॥१६॥ भेणें मंद जाल्या मेघवृष्टि । आकांतली कांपे सृष्टि । देव रिगाले कपाटीं । आटाआटी प्रवर्तली ॥१७॥ अपीक धान्यें दिवसें दिवसें । गाईं म्हैसी चेवल्या गोरसें । नगरें दिसती उध्वंसें । पिकलीं बहुवसें पाखांडें ॥१८॥ होम हरपलीं हवनें । यज्ञयाग अनुष्ठानें । जपतपादिसाधनें । आचरणें भ्रष्टलीं ॥१९॥ अठरा यातींचे व्यापार। करिती तस्कराईं विप्र । सांडोनियां शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळी पांघरती ॥२०॥ गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं । अश्वाचियापरी । कुमारी विकिती वेदवक्ते ॥२१॥ वेदाध्ययनसंहितारुचि । भकाद्या करिती तयांची । आवडी पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥२२॥ मुख्य सर्वोत्तम साधनें । तीं उच्छेदुनि केलीं दीनें । कुडीं कापटें महा मोहनें । मिरविताती दुर्जन ॥२३॥ कळाकुशळता चतुराईं । तर्कवादी भेद निंदेठायीं । विधिनिषेधाचा वाही । एक ही ऐसीं नाडलीं ॥२४॥ जे संन्यासी तापसी ब्रम्हचारी । होतां वैरागी दिगांबर निस्पृही वैराग्यकारी । कामक्रोधें व्यापिले भारी । इच्छाकरीं न सुटती ॥२५॥ कैसें विनाशकाळाचें कौतुक । राजे जाले प्रजांचे अंतक । पिते पुत्र सहोदर । एकाएक शत्रुघातें वर्त्तती ॥२६॥ केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविलें अवघें जन । याती अठरा चार्‍ही वर्ण । कर्दम करूनि विटाळले ॥२७॥ पूवाअहोतें भविष्य केलें । संतीं ते यथार्थ जालें । ऐकत होतों ते देखिलें ।प्रत्यक्ष लोचनीं ॥२८॥ आतां असो हें आघवें । गति नव्हे कळीमध्येंवागवरावें । देवासी भाकोनि करुणावें । वेगें स्मरावें अंतरीं ॥२९॥ अगा ये वैकुंठानायका । काय पाहातोसि या कौतुका । धांव कलीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥३०॥

2264 " पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचितें ॥१॥ एक नाहीं एका ऐसें । दावी कैसे शुद्ध हीन ॥ध्रु.॥ पंचभूतें एकी रासी । सूत्रें कैसीं खेळवी ॥२॥ तुका म्हणे जे जे जाती । तैसी स्थिति येतसे ॥३॥

2265 " पाहातां ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥१॥ नये वाटों गुणदोषीं । मना जतन येविशीं ॥ध्रु.॥ त्रिविधदेह परिचारा । जनीं जनार्दन खरा ॥२॥ तुका म्हणे धीरें । विण कैसें होतें बरें ॥३॥

2266 " पाहातां रूप डोळां भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥१॥ तो हा नंदानंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ध्रु.॥ दिसतो हा नव्हे तैसा । असे दिशाव्यापक । लाघव हा खोळेसाटीं । होतां भेटी परतेना ॥२॥ म्हणोनि उभी ठालीये । परतलीये या वाटा । आड करोनियां तुका । जो या लोकां दाखवितो ॥३॥

2267 " पाहातां हें बरवें जालें । कळों आलें यावरी ॥१॥ मागिलांचा जाला झाडा । त्या निवाडास्तव ॥ध्रु.॥ विसांवलें अंग दिसे । सरिसे अनुभव ॥२॥ तुका म्हणे बरें जालें । देवें नेलें गवसूनि ॥३॥

2268 " पाहातोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥१॥ वरि ठेवूं दे मस्तक । ठेलों जोडूनि हस्तक ॥ध्रु.॥ बरवें करीं सम । नको भंगों देऊं प्रेम ॥२॥ तुका म्हणे चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥३॥

2269 " पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥१॥ काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर । कण्या दरदर । पाण्यामाजी रांधिल्या ॥ध्रु.॥ घरीं मोडकिया बाजा । वरि वाकळांच्या शेजा ॥२॥ मुखशुद्धि तुळसी दळ । तुका म्हणे मी दुर्बळ ॥३॥

2270 " पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥१॥ नाहीं तरि वांयां केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥ध्रु.॥ पढोनियां वेद हरिगुण गावे । ठावें तें जाणावें तेव्हां जालें ॥२॥ तप तिर्थाटण तेव्हां कार्यसिद्धि । स्थिर राहे बुद्धि हरिच्या नामीं ॥३॥ यागयज्ञादिक काय दानधर्म । तरि फळ नाम कंठीं राहे ॥४॥ तुका म्हणे नको काबाडाचे भरी । पडों सार धरीं हें चि एक ॥५॥

2271 " पाहें तिकडे दिशा ओस । अवघी पास पायांपें ॥१॥ मन चि साच होइल कई । प्रेम देई भेटोनि ॥ध्रु.॥ सर्वापरि पांगुळ असें । न कळे कैंसे तें तुम्हा ॥२॥ तुका म्हणे कृपावंता । तूं तों दाता दीनाचा ॥३॥

2272 " पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते ॥१॥ करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥ सत्यासाटीं माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें नव्हे ॥२॥ तुका म्हणे माझी कळवळ्याची कींव । भागलासे जीव कर्तव्यानें ॥३॥

2273 " पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥१॥ होईंल तें हो या विठोबाच्या नांवें । आचरलें भावें जीवीं धरूं ॥ध्रु.॥ एखादा अंगासी येईंल प्रकार । विचारितां फार युक्ति वाढे ॥२॥ तुका म्हणे आळी करितां गोमटी । मायबापा पोटीं येते दया ॥३॥

2274 " पिंड पदावरी । दिला आपुलिये करीं ॥१॥ माझें जालें गयावर्जन । फिटलें पितरांचें ॠण ॥ध्रु.॥ केलें कर्मांतर । बोंब मारिली हरिहर ॥२॥ तुका म्हणे माझें । भार उतरलें ओझें ॥३॥

2275 " पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळी तिळवण मूळत्रयीं॥१॥ सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रम्हीं ब्रम्हार्पण सेवटींच्या ॥ध्रु.॥ सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥२॥ पित्यापुत्रत्वाचें जालें अवसान । जनीं जनादऩन अभेदेंसी ॥३॥ आहे तैसी पूजा पावली सकळ । सहज तो काळ साधियेला ॥४॥ तुका म्हणे केला अवघियांचा उद्धार । आतां नमस्कार सेवटींचा ॥५॥

2276 " पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥१॥ नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र जाला ॥ध्रु.॥ पोहों सिणलें नये कासे लावितो आणिका । म्हणावें त्या मूर्खा काय आतां ॥२॥ सिणलें तें गेलें सिणलियापासीं । जाली त्या दोघांसी एक गति ॥३॥ तुका म्हणे अहो देवा दिनानाथा । दरुषण आतां नको त्याचें ॥४॥

2277 " पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडुरंगें ॥१॥ काम क्रोध लोभ निमाले ठायीं चि । सर्व आनंदाची सृष्टि जाली ॥ध्रु.॥ आठव नाठव गेले भावाभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥२॥ तुका म्हणे भाग्य या नांवें म्हणीजे । संसारीं जन्मीजे या चि लागीं ॥३॥

2278 " पिकल्या सेताचा आम्हां देतो वांटा । चौधरी गोमटा पांडुरंग ॥१॥ सत्तर टके बाकी उरली मागे तो हा । मागें झडले दाहा आजिवरी ॥ध्रु.॥ हांडा भांडीं गुरें दाखवी ऐवज । माजघरीं बाजे बैसलासे ॥२॥ मज यासी भांडतां जाब नेदी बळें । म्हणे एका वेळे घ्याल वांटा ॥३॥ तुका म्हणे स्त्रिये काय वो करावें । नेदितां लपावें काय कोठें ॥४॥

2279 " पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥ पुढें उरे खातां देतां । नव्हे खंडण मवितां ॥ध्रु.॥ खोलीं पडे ओली बीज । तरीं च हातीं लागे निज ॥२॥ तुका म्हणे धनी । विठ्ठल अक्षरी हीं तिन्ही ॥३॥

2280 " पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥ पुरोनि उरे खातां देतां । नव्हे खंडन मवितां ॥ध्रु.॥ खोलीं पडे ओली बीज । तरीं च हाता लागे निज ॥२॥ तुका म्हणे धणी । विठ्ठल अक्षरें या तिन्ही ॥३॥

2281 " पुंडलिकाचे निकटसेवे । कैसा धांवे बराडी ॥१॥ आपुलें थोरपण । नारायण विसरला ॥ध्रु.॥ उभा कटीं ठेवुनि कर। न म्हणे पर बैससें ॥२॥ तुका म्हणे जगदीशा । करणें आशा भक्तांची ॥३॥

2282 " पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रम्ह आणिलें ॥१॥ पांडुरंग बाळमूर्ति । गाईंगोपाळां संगती । येऊनियां प्रीति । उभें सम चि राहिलें ॥ध्रु.॥ एका आगळें अक्षर । वैकुंठ चि दुसरें । म्हणविती येरें । परि ती ऐसीं नव्हेती॥२॥ पाप पंचक्रोशीमधीं । येऊ न सकेचिना आधीं । कैंची तेथें विधि । निषेधाची वसति ॥३॥ पुराणें वदती ऐसें । चतुर्भुज तीं मानसें । सुदर्शनावरी वसे । रीग न घडे कल्पांतीं ॥४॥ महाक्षेत्र हें पंढरी । अनुपम्य इयेची थोरी । धन्य धन्य वारकरी । तुका म्हणे तेथींचे ॥५॥

2283 " पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख ॥१॥ हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ध्रु.॥ खेळतां विसरे भूक तान घर । धरूनियां कर आणी बळें ॥२॥ तुका म्हणे पाळी तोंडीचिया घांसें । उदार सर्वस्वें सर्वकाळ ॥३॥

2284 " पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥१॥ केलासी तो उभा आजवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ध्रु.॥ आहे तें ची मागों नाहीं खोटा चाळा । नये येऊं बळा लेंकराशीं ॥२॥ तुका म्हणे माझा साक्षीचा वेव्हार । कृपण जी थोर परी तुम्ही ॥३॥

2285 " पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥१॥ सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥ पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥२॥ तुका म्हणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥३॥

2286 " पुढें जेणें लाभ घडे । तें चि वेडे नाशिती ॥१॥ येवढी कोठें नागवण । अंधारुण विष घ्यावें ॥ध्रु.॥ होणारासी मिळे बुद्धि । नेदी शुद्धी धरूं तें ॥२॥ तुका म्हणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥३॥

2287 " पुढें तरी चित्ती । काय येईंल तें आतां ॥१॥ मज सांगोनिया धाडीं । वाट पाहातों वराडी ॥ध्रु.॥ कंठीं धरिला प्राण । पायांपाशीं आलें मन ॥२॥ तुका म्हणे चिंता । बहु वाटतसे आतां ॥३॥

2288 " पुण्य उभें राहो आतां । संताचें याकारणें ॥१॥ पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥ध्रु.॥ संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥२॥ तुका म्हणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥३॥

2289 " पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥ सत्य तो चि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥ गति ते चि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥२॥ संतांचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥३॥ तुका म्हणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥४॥

2290 " पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । जाला सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों ॥१॥ आजि फिटलें माझें कोडें । भवदुःखाचें सांकडें । कोंदाटलें पुढें । ब्रम्ह सावळें ॥ध्रु.॥ आलिंगणें संतांचिया । दिव्य जाली माझी काया । मस्तक पाया । वरी त्यांच्या ठेवितां ॥२॥ तुका म्हणे धन्य झालों । सुखें संतांचिया धालों । लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥३॥

2291 " पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया ॥१॥ जिंता मरण आलें आप पर गेलें । मूळ छेदियेलें संसाराचें ॥ध्रु.॥ अधिकार जाती वर्णधर्मयाती । ठाव नाहीं सत्यअसत्याशी ॥२॥ जन वन भिन्न आचेत चळण । नाहीं दुजेपण ठाव यासी ॥३॥ तुका म्हणें देह वाईलें विठ्ठलीं । तेव्हां च घडली सर्व पूजा ॥४॥

2292 " पुण्यविकरा तें मातेचें गमन । भाडी ऐसें धन विटाळ तो ॥१॥ आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावें तें नाभी करवी दंड ॥ध्रु.॥ नागवला अल्प लोभाचिये साटीं । घेऊनि कांचवटि परिस दिला ॥२॥ तुका म्हणे हात झाडिले परत्रीं । श्रम तो चि श्रोत्रीं वेठी केली ॥३॥

2293 " पुत्र जाला चोर । मायबापा हर्ष थोर ॥१॥ आतां काशासाटीं जोडी । हाट धाटे गुंडगे घडी ॥ध्रु.॥ ऐते अपाहार । आणूनियां भरी घर ॥२॥ मानिली निश्चिंती । नरका जावया उभयतीं ॥३॥ झोडाझोडगीचे पोटीं । फळें बीजें तीं करंटीं ॥४॥ तुका म्हणे बेट्या । भांडवल न लगे खट्या ॥५॥

2294 " पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥१॥ कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥ प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥२॥ तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥३॥

2295 " पुरली धांव कडिये घेई । पुढें पायीं न चलवीं ॥१॥ कृपाळुवे पांडुरंगे । अंगसंगे जिवलगे ॥ध्रु.॥ अवघी निवारावी भूक । अवघ्या दुःख जन्माचें ॥२॥ तुका म्हणे बोलवेना । लावीं स्तनां विश्वरें ॥३॥

2296 " पुराणप्रसिद्ध सीमा । नामतारकमहिमा ॥१॥ मागें जाळी महा दोष । पुढें नाही गर्भवास ॥ध्रु.॥ जें निंदिलें शास्त्रें । वंद्य जालें नाममात्रें ॥२॥ तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनीं नामठसा ॥३॥

2297 " पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥ नव्हती हे आहाच बोल । मोकळें फोल कवित्व ॥ध्रु.॥ भावें घ्या रे भावें घ्या रे । येगदा जा रे पंढरिये ॥२॥ भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥३॥ पापपुण्या करील झाडा । जाइल पीडा जन्माची ॥४ ॥ घ्यावी हातीं टाळदिंडी । गावे तोंडीं गुणवाद ॥५॥ तुका म्हणे घटापटा । न लगे वाटा शोधाव्या ॥६॥

2298 " पुरुषा हातीं कंकणचुडा । नवल दोडा वृत्ति या ॥१॥ पाहा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥ध्रु.॥ जळो ऐसी ब्रिदावळी । भाटवोळीपणाची ॥२॥ तुका म्हणे पाहों डोळां । अवकळा नये हे ॥३॥

2299 " पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहळे श्रीरंगीं ॥१॥ अंतर्बाहीं विलेपन । हें भूषण मिरवूं ॥ध्रु.॥ इच्छेऐसी आवड पुरे । विश्वंभरे जवळी ॥२॥ तुका करी नारायण । या या सेवन नामाचें ॥३॥

2300 " पुसावें तें ठाईं आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनियां ॥१॥ येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशीं थार अज्ञान तें ॥ध्रु.॥ फळ तें चि बीज बीज तें ची फळ । उपनांवें मूळ न पालटे ॥२॥ तुका म्हणे अवघे गव्हांचे प्रकार । सोनें अलंकार मिथ्या नांव ॥३॥

2301 " पुसावेंसें हें चि वाटे । जें जें भेटे तयासी ॥१॥ देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥ध्रु.॥ अवघियांचा विसर जाला । हा राहिला उदेग ॥२॥ तुका म्हणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसें ॥३॥

2302 " पूर्वजांसी नकाऩ । जाणें तें आइका ॥१॥ निंदा करावी चाहाडी । मनीं धरूनि आवडी ॥ध्रु.॥ मात्रागमना ऐसी । जोडी पातकांची रासी ॥२॥ तुका म्हणे वाट । कुंभपाकाची ते नीट ॥

2303 " पूर्वा बहुतांचे केले प्रतिपाळ । तें मज सकळ श्रुत आहे ॥१॥ अज अविनाश निर्गुण निरामय । विचारिलें काय त्यांचे वेळे ॥ध्रु.॥ तयांचियें वेळे होशी कृपावंत । माझा चि कां अंत पहातोसि ॥२॥ नारद प्रर्‍हाद उपमन्य धुरू । त्यांचा अंगीकारु कैसा केला ॥३॥ अंबॠषीसाटीं गर्भवास जाले । कां गा मोकलिलें कृपासिंधु ॥४॥ धर्माचें उच्छष्टि अर्जुनाचीं घोडीं । आणीक सांकडीं कितीएक ॥५॥ जालासि लुगडीं तया द्रौपदीचीं । न ये कां आमुची कृपा कांहीं ॥६॥ तुका म्हणे कां गा जालासि कठीण । माझा भाग सीण कोण जाणे ॥७॥

2304 " पूवाअ पूर्वजांची गती । हे चि आईंकिली होती । सेवे लावूनि श्रीपती । निश्चिंती केली तयांची ॥१॥ कां रे पाठी लागलासी । ऐसा सांग हृषीकेशी । अद्यापवरी न राहासी । अंत पाहासी किती म्हुण ॥ध्रु.॥ जन्मजन्मांतरीं दावा । आम्हां आपणां केशवा । निमित्य चालवा । काईंसयास्तव हें ॥२॥ तुकयाबंधु म्हणे अदेखणा । किती होसी नारायणा । देखों सकवेना । खातयासी न खात्या ॥३॥

2305 " पूवाअहूनि बहु भक्त सांभाळिले । नाहीं अव्हेरिले दास कोणी ॥१॥ जेजे शरण आले तेते आपंगिले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे ॥ध्रु.॥ मिरवे चरणीं ऐसीये गोष्टीचें । भक्तसांभाळाचें ब्रीद ऐसें ॥२॥ तुका म्हणे आम्हांसाटी येणें रूपा । माझ्या मायबापा पांडुरंगा ॥३॥

2306 " पृथक मी सांगों किती । धर्म नीती सकळां ॥१॥ अवघियांचा एक ठाव । शुद्ध भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥ क्षराअक्षराचा भाग । करा लाग पंढरीये ॥२॥ तुका म्हणे आगमींचें । मथिलें साचें नवनीत ॥३॥

2307 " पेणावलें ढोर मार खाय पाठी । बैसलें तें नुठी तेथूनियां ॥१॥ तैसी माझ्या मना परी जाली देवा । धावें अहंभावा सांडावलों ॥ध्रु.॥ कडां घालीं उडी मागिलांच्या भेणें । मरणामरण न कळे चि ॥२॥ तुका म्हणे जालों त्यापरी दुःखित । असें बोलावीत पांडुरंगा ॥३॥

2308 " पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥१॥ अवघें लंकेमाजी जाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥ध्रु.॥ अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होईं शरणागत किंवा युद्धासी सादर ॥२॥ तुका म्हणे ऐक्या भावें रामेसी भेटी । करूनि घेईं आतां संवंघेसी तुटी ॥३॥

2309 " पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥१॥ गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥ध्रु.॥ मुगुटकुंडलांच्या दीप्ति । तेजें लोपला गभस्ति ॥२॥ मेघश्यामवर्ण हरि । मूर्ति डोळस साजिरी ॥३॥ चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥४॥ पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥५॥ तुका जालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥६॥

2310 " पैल घरीं जाली चोरी । देहा करीं बोंब ॥१॥ हाबा हाबा करिसी काये । फिराऊनि नेट्यां वायें ॥ध्रु.॥ सांडुनियां शुद्धी । निजलासी गेली बुद्धी ॥२॥ चोरीं तुझा काढला बुर । वेगळें भावा घातलें दूर ॥३॥ भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥४॥ तुका म्हणे अझुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥५॥

2311 " पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥१॥ आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा । सुख वाटे मना । डोळे बाह्या स्फुरती ॥ध्रु.॥ उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥२॥ तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥३॥

2312 " पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुर्बिलीं साजिरीं मोरवीसें । हरे त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥१॥ जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा । शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठीं ॥२॥ असे यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही । महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रूप हें पापनासी ॥३॥ कसीं पाउलें साजिरीं कुंकुमाचीं । कसी वीट हे लाधली दैवांची। जया चिंतितां अग्नि हा शांति नीवे । धरा मानसीं आपला देहभाव ॥४॥ मुनी देखतां मूख हें चित्त ध्याय । देह मांडला भाव हा बापमाय। तुक्या लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥५॥

2313 " पोट धालें आतां जीवनीं आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे ॥१॥ काय आंचवणा तांतडीचें काम । मागील तीं श्रम न पवावीं ॥ध्रु.॥ वाढितिया पोटीं बहु असे वाव । सांभाळितां ठाव काय वांचे ॥२॥ दाविल्यावांचूनि नाहीं कळों येत । तेथें ही दुश्चित एकपणें ॥३॥ नावेचा भार तो उदकाचे शिरीं । काय हळू भारी तये ठायीं ॥४॥ तुका म्हणे गीतीं गाऊनि गोविंद । करूं ब्रम्हानंद एकसरें॥५॥

2314 " पोट धालें मग न लगे परती । जालिया निश्चिंती खेळ गोड ॥१॥ आपुलिया हातें देईं वो कवळ । विठ्ठल शीतळ जीवन वरी ॥ध्रु.॥ घराचा विसर होईंल आनंद । नाचेन मी छंदें प्रेमाचिया ॥२॥ तुका म्हणे तों च वरी करकर । मग हें उत्तर खंडईंल ॥३॥

2315 " पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशोदेशीं ॥१॥ पोटाभेणें जिकडे जावें । तिकडे पोट येतें सवें ॥ध्रु.॥ जप तप अनुष्ठान । पोटासाटीं जाले दीन ॥२॥ पोटें सांडियेली चवी । नीचापुढें तें नाचवी ॥३॥ पोट काशियानें भरे । तुका म्हणे झुरझुरूं मरे ॥४॥ आरत्या ॥ १३ ॥ १५६५ जगदेश जगदेश तुज म्हणती । परि या जनामाजी असशील युक्ति । पुण्यपापविरहित सकळां अधिपति । दृष्टा परि नळणी अलिप्त गति ॥१॥ जय देव जय देव जय पंढरिनाथा । श्रीपंढरिनाथा । नुरे पाप विठ्ठल म्हणतां सर्वथा ॥ध्रु.॥ आगम निगम तुज नेणती कोणी । परि तूं भाव भक्ति जवळी च दोन्ही । नेणतां विधियुक्त राते पूजेनी । न माये ब्रम्हांडीं संपुष्टशयनीं ॥२॥ असुरां काळ भासे विक्राळ पुढें । पसरी मुखएक चावितो धुडें । भक्ता शरणागता चाले तो पुढें । दावी वाट जाऊ नेदी वांकडें ॥३॥ एकाएकीं बहु विस्तरला सुखें । खेळे त्याची लीळा तो चि कवतुकें। तेथें नरनारी कवण बाळकें । काय पापपुण्य कवण सुखदुःखें ॥४॥ सकळा वर्मां तूं चि जाणशी एक । बद्ध मोक्ष प्राप्त आणि सुखदुःख। जाणों म्हणतां तुज टकलीं बहुतेकें । तुका म्हणे शरण आलों मज राखें ॥५॥

2316 " पोटापुरतें काम । परि अगत्य तो राम ॥१॥ कारण तें हें चि करीं । चित्तीं पांडुरंग धरीं ॥ध्रु.॥ प्रारब्धी हेवा । जोडी देवाची ते सेवा ॥२॥ तुका म्हणे बळ । बुद्धी वेचूनि सकळ ॥३॥

2317 " पोटासाठीं खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणतां तुझी बसली दांतखीळ ॥१॥ हरिचें नाम कदाकाळीं कां रे नये वाचे । म्हणतां राम राम तुझ्या बाचें काय वेचें ॥ध्रु.॥ द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जातां तुझी जड झाली माती ॥२॥ तुका म्हणे ऐशा जीवा काय करूं आता । राम राम न म्हणे त्याचा गाढव मातापिता ॥३॥

2318 " पोटीं शूळ अंगीं उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया ॥१॥ तैसें मज कां गा केलें पंढरिराया । लौकिक हा वांयां वाढविला ॥ध्रु.॥ ज्वरिलियापुढें वाढिलीं मिष्टान्नें । काय चवी तेणें घ्यावी त्याची ॥२॥ तुका म्हणे मढें शृंगारिलें वरी । ते चि जाली परी मज देवा ॥३॥

2319 " पोरा लागलीसे चट । धरी वाट देवळाची ॥१॥ सांगितलें नेघे कानीं । दुजें मनी विठ्ठल ॥ध्रु.॥ काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुश्चित्त ॥२॥ आमुचे कुळीं नव्हतें ऐसें । हें चि पिसें निवडलें ॥३॥ लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें ॥४॥ तुका म्हणे नरका जाणें । त्या वचनें दुष्टाचीं ॥५॥

2320 " प्रगट व्हावें हे अज्ञानवासना । माझी नारायणा हीनबुद्धि ॥१॥ खाणीवाणी होसी काष्टीं तूं पाषाणीं । जंतु जीवाजनीं प्रसद्धि हा ॥ध्रु.॥ ज्ञानहीन तुज पाहें अल्पमति । लहान हा चित्ती धरोनियां ॥२॥ परि तूं कृपाळ होसी देवराणा । ब्रिदें तुझीं जना प्रसिद्ध हें ॥३॥ उतावीळ बहु भक्तांचिया काजा । होसी केशीराजा तुका म्हणे ॥४॥

2321 " प्रगटलें ज्ञान । नारायण भूतीं तें ॥१॥ अनुभव च घेऊं व्हावा । विनंती देवा करूनियां ॥ध्रु.॥ देखोवेखीं वदे वाणी । पडिल्या कानीं प्रमाणें ॥२॥ तुका म्हणे योगक्षेम । घडे तें वर्म साधावें ॥३॥

2322 " प्रजन्यें पडावें आपुल्या स्वभावें । आपुलाल्या दैवें पिके भूमि ॥१॥ बीज तें चि फळ येईंल शेवटीं । लाभहानितुटी ज्याची तया ॥ध्रु.॥ दीपाचिये अंगीं नाहीं दुजाभाव । धणी चोर साव सारिखे चि ॥२॥ काउळें ढोंपरा ककर तित्तिरा । राजहंसा चारा मुक्ताफळें ॥३॥ तुका म्हणे येथें आवडी कारण । पिकला नारायण जयां तैसा ॥४॥

2323 " प्रजी तो पाईंक ओळीचा नाईंक । पोटासाटीं एकें जैशीं तैशीं ॥१॥ आगळें पाऊल आणिकांसी तरी । पळती माघारीं तोडिजेती ॥ध्रु.॥ पाठीवरी घाय म्हणती फटमर । धडा अंग शूर मान पावे ॥२॥ घेईंल दरवडा देहा तो पाईंक । मारी सकळीक सर्व हरी ॥३॥ तुका म्हणे नव्हे बोलाचें कारण । कमाईंचा पण सिद्धी पावे ॥४॥

2324 " प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही निदानीं न घडे त्यासी ॥१॥ दोहीं पेंवावरी ठेवूं जातां हात । शेवटीं अपघात शरीराचा ॥२॥ तुका म्हणे तया दोहींकडे धका । शेवटीं तो नरकामाजी पडे ॥३॥

2325 " प्रपंच वोसरो । चत्ति तुझे पायीं मुरो ॥१॥ ऐसें करिं गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा ॥ध्रु.॥ पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता ॥२॥ लटिकें तें फेडा । तुका म्हणे जाय पीडा ॥३॥

2326 " प्रपंचाची पीडा सोसिती अघोरी । जया क्षणभरी नाम नये ॥१॥ नाम नाठविती आत्मया रामाचें । धिग जिणें त्याचें भवा मूळ ॥ध्रु.॥ मूळ ते पापाचें आचरण तयाचें । नाहीं राघवाचें स्मरण त्या ॥२॥ स्मरण भजन नावडे जयासी । आंदणीया दासी यमदूतां ॥३॥ चिंतन रामाचें न करी तो दोषी । एकांत तयासीं बोलों नये ॥४॥ नये त्याचा संग धरूं म्हणे तुका । धरितां पातका वांटेकरी ॥५॥

2327 " प्रमाण हें त्याच्या बोला । देव भक्तांचा अंकिला ॥१॥ न पुसतां जातां नये । खालीं बैसतां ही भिये ॥ध्रु.॥ अवघा त्याचा होत । जीव भावाही सहित ॥२॥ वदे उपचाराची वाणी । कांहीं माग म्हणऊनि ॥३॥ उदासीनाच्या लागें । तुका म्हणे धांवे मागें ॥४॥

2328 " प्रल्हादाकारणें नरसिंहीं जालासी । त्याचिया बोलासी सत्य केलें ॥१॥ राम कृष्ण गोविंदा नारायणा हरि । गर्जे राजद्वारीं भक्तराज ॥ध्रु.॥ विठ्ठल माधव मुकुंद केशव । तेणें दैत्यराव दचकला ॥२॥ तुका म्हणे तयां कारणें सगुण । भक्तांचें वचन सत्य केलें ॥३॥

2329 " प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥ ज्ञानाग्निहुताशीं कडशिले वोजा । आत्मसिद्धिकाजा लागूनियां ॥ध्रु.॥ ब्रम्हीं ब्रम्हरस शीघ्र जाला पाक । घेतला रुचक प्रतीतीमुखें ॥२॥ स्वानुभवें अंगीं जाला समरस । साधनी निजध्यास ग्रासोग्रासीं ॥३॥ अरोग्यता तुका पावला अष्टांगीं । मिरविला रंगीं निजात्मरंगें ॥४॥

2330 " प्रसद्धि हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥१॥ तरी वाटा न वजे कोणी । नारायणीं घरबुडी ॥ध्रु.॥ बहुतां ऐसें केलें मागें । लाग लागें लागेना ॥२॥ हो कां नर अथवा नारी । लाहान थोरीं आदर ॥३॥ जालें वेगळें लोकीं पुरे । मग नुरे समूळ ॥४॥ कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥५॥ तुका म्हणे दुसर्‍या भावें । छायें नावें न देखवे ॥६॥

2331 " प्राक्तनाच्या योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करूं नये ॥१॥ उभी कामधेनु मागिलें अंगणीं । तिसी काय ब्राम्हणीं वंदूं नये ॥ध्रु.॥ कोढियाचे हातें परिसें होय सोनें । अपवित्र म्हणोन घेऊं नये ॥२॥ यातिहीन जाला गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानूं नये ॥३॥ भावारूढ तुका मुद्रा विठोबाची । न मनी तयांचीं तोंडें काळीं ॥४॥

2332 " प्राण समर्पिला आम्ही । आतां उशीर कां स्वामी ॥१॥ माझें फेडावें उसणें । भार न मना या ॠणें ॥ध्रु.॥ जाला कंठस्फोट। जवळी पातलों निकट ॥२॥ तुका म्हणे सेवा । कैसी बरी वाटे देवा ॥३॥

2333 " प्राणियां एक बीजमंत्र उच्चारीं । प्रतिदिनीं रामकृष्ण म्हण कां मुरारि ॥१॥ हें चि साधन रे तुज सर्व सिद्धीचे । नाम उच्चारीं पां गोपाळाचें वाचे ॥ध्रु.॥ उपास पारणें न लगे वनसेवन । न लगे धूम्रपान पंचाअग्नतापन ॥२॥ फुकाचें सुखाचें कांहीं न वेचें भांडार । कोटी यज्ञां परिस तुका म्हणे हें सार ॥३॥

2334 " प्रायिश्चत्तें देतो तुका । जातो लोकां सकळां ॥१॥ धरितील ते तरती मनीं । जाती घाणी वांयां त्या ॥ध्रु.॥ निग्रहअनुग्रहाचे ठाय । देतो घाय पाहोनि ॥२॥ तुका जाला नरसिंहीं । भय नाहीं कृपेनें ॥३॥

2335 " प्रारब्धा हातीं जन । सुख सीण पावतसे ॥१॥ करितां घाईळाचा संग । अंगें अंग माखावें ॥ध्रु.॥ आविसा अंगें पीडा वसे । त्यागें असे बहु सुख ॥२॥ तुका म्हणे जीव भ्याला । अवघ्या आला बाहेरी ॥३॥

2336 " प्रारब्धें चि जोडे धन । प्रारब्धें चि वाडे मान ॥१॥ सोस करिसी वांयां । भज मना पंढरीराया ॥ध्रु.॥ प्रारब्धें चि होय सुख। प्रारब्धें चि पावे दुःख ॥२॥ प्रारब्धें चि भरे पोट । तुका करीना बोभाट ॥३॥

2337 " प्रीति करी सत्ता । बाळा भीती मातापिता ॥१॥ काय चाले त्याशीं बळ । आळी करितां कोल्हाळ ॥ध्रु.॥ पदरीं घाली मिठी । खेदी मागें पुढें लोटी ॥२॥ बोले मना आलें । तुका साहिला विठ्ठलें ॥३॥

2338 " प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥१॥ तैसे दंभी जालों तरी तुझे भक्त । वास यमदूत न पाहाती ॥ध्रु.॥ राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणिकां दंडवेल ॥२॥ बाहातरी खोडी परी देवमण कंठीं । तैसो जगजेठी म्हणे तुका ॥३॥

2339 " प्रीतिचिया बोला नाहीं पेसपाड । भलतसें गोड करूनि घेईं ॥१॥ तैसें विठ्ठलराया तुज मज आहे । आवडीनें गायें नाम तुझें ॥ध्रु.॥ वेडे वांकडे बाळकाचे बोल । करिती नवल मायबाप ॥२॥ तुका म्हणे तुज येवो माझी दया । जीवींच्या सखया जिवलगा ॥३॥

2340 " प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरों नेदी बाळ मागें पुढें पित्यासी ॥१॥ काय लागे त्यासी बळ हेडावितां कोण काळ । गोवितें सबळ जाळीं स्नेहसूत्राचीं ॥ध्रु.॥ सलगी दिला लाड बोले तें तें वाटे गोड । करी बुझावोनि कोड हातीं देऊनि भातुकें ॥२॥ तुका म्हणे बोल कोणा हें कां नेणां नारायणा । सलगीच्या वचना कैचें उपजे विषम ॥३॥

2341 " प्रीतीचा तो कळवळा । जिव्हाळाचि वेगळा ॥१॥ बहु नेदी रडों माता । दुश्चित होतां धीर नव्हे ॥ध्रु.॥ वरी वरी तोंडापुरतें । मोहोरी तें कळतसे ॥२॥ जाणोनियां नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥३॥

2342 " प्रीतीच्या भांडणा नाहीं शिरपाव । वचनाचे चि भाव निष्ट‍ता ॥१॥ जीणें तरी एका जीवें उभयता । पुत्राचिया पिता दुखवे दुःखें ॥ध्रु.॥ काय जाणे तुटों मायेचें लिगाड । विषम तें आड उरों नेणें ॥२॥ तुका म्हणे मज करुणा उत्तरें । करितां विश्वंभरे पाविजैल ॥३॥

2343 " प्रेम अमृताची धार । वाहे देवा ही समोर ॥१॥ उर्ध्ववाहिनी हरिकथा । मुगुटमणि सकळां तीर्थां ॥ध्रु.॥ शिवाचें जीवन । जाळी महादोष कीर्तन ॥२॥ तुका म्हणे हरि । इची स्तुति वाणी थोरी ॥३॥

2344 " प्रेम जडलें तुझे पायीं । आणीक न सुचे मजला कांहीं ॥१॥ रात्रीदिवस तुझें ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥ नामापरतें नेणें दुजें । ऐसें कळलें मजला निज ॥२॥ तुका म्हणे अंतकाळीं । आम्हां सोडवीं तात्काळीं ॥३॥

2345 " प्रेम तेथें वास करी । मुखीं उच्चारितां हरी ॥१॥ प्रेम यावें तया गांवा । चोजवीत या वैष्णवां ॥ध्रु.॥ प्रेमें पाठी लागे बळें । भक्त देखोनियां भोळे ॥२॥ प्रेम न वजे दवडितां । शिरे बळें जेथें कथा ॥३॥ तुका म्हणे थोर आशा । प्रेमा घरीं विष्णुदासां ॥४॥

2346 " प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धी देशकाळाची ॥१॥ मुH लज्जाविरहित । भाग्यवंत हरिभक्त। जाले वोसंडत । नामकीर्तिपवाडे ॥ध्रु.॥ जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरिसे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रम्हीं सौरस ॥२॥ हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका म्हणे पाप । गांवीं नाहीं हरिजना ॥३॥

2347 " प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥१॥ कासवीचें बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाहीं भेटी अंगसंगें ॥ध्रु.॥ पोटामध्यें कोण सांगितलें सर्पां । उपजत लपा म्हणऊनि ॥२॥ बोलों नेणें परी जाणे गोड क्षार । अंतरीं विचार त्यासी ठावा ॥३॥ तुका म्हणे बरें विचारावें मनीं । आणिक भल्यांनी पुसों नये ॥४॥

2348 " प्रेमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥ सकळ ही तेथें वोळलीं मंगळें । वृष्टि केली जळें आनंदाच्या ॥ध्रु.॥ सकळ इंद्रियें जालीं ब्रम्हरूप । ओतलें स्वरूप माजी तया ॥२॥ तुका म्हणे जेथें वसे भक्तराव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥३॥

2349 " प्रेमभेटी आळिंगण । मग चरण वंदावे ॥१॥ ऐसामाझा भोळा बाप । हरी ताप कवळोनि ॥ध्रु.॥ न संगतां सीण भाग । पांडुरंग जाणतसे ॥२॥ तुका म्हणे कृपावंतें । द्यावें, भातें न मागतां ॥३॥

2350 " फटएाचे बडबडे चवी ना संवाद । आपुला चि वाद आपणासी ॥१॥ कोणें या शब्दाचे मरावें घाणी । अंतरें शाहाणी राहिजे हो ॥ध्रु.॥ गाढवाचा भुंक आइकतां कानीं । काय कोडवाणी ऐसियेचें ॥२॥ तुका म्हणे ज्यासी करावें वचन । त्याचे येती गुण अंगास ते ॥३॥

2351 " फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चालविलें ॥१॥ फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥ तुका म्हणे अवघें फटकाळ हें जन । अनुभविये खूण जाणतील ॥३॥

2352 " फल पाया तो खुस भया । किन्होसुं न करे बाद । बान न देखे मिरगा रे । चित्त मिलाया नाद ॥१॥

2353 " फळ देंठींहून झडे । मग मागुतें न जोडे ॥१॥ म्हणोनि तांतडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥ध्रु.॥ पुढें चढे हात । त्याग मागिलां उचित ॥२॥ तुका म्हणे रणीं । नये पाहों परतोनि ॥३॥

2354 " फळ पिके देंठीं । निमित्य वारियाची भेटी ॥१॥ हा तों अनुभव रोकडा । कळों येतो खरा कुडा ॥ध्रु.॥ तोडिलिया बळें । वांयां जाती काचीं फळें ॥२॥ तुका म्हणे मन । तेथे आपुलें कारण ॥३॥

2355 " फळकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥ ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥ अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥३॥

2356 " फळाची तों पोटीं । घडे वियोगें ही भेटी ॥१॥ करावें चिंतन । सार तें चि आठवण ॥ध्रु.॥ चित्त चित्ती ग्वाही । उपचारें चाड नाहीं ॥२॥ तुका म्हणे देवा । पावे अंतरींची सेवा ॥३॥

2357 " फावलें तुम्हां मागें । नवतों लागें पावलों ॥१॥ आलों आतां उभा राहें । जवळी पाहें सन्मुख ॥ध्रु.॥ घरीं होती गोवी जाली । कामें बोली न घडे चि ॥२॥ तुका म्हणे धडफुडा । जालों झाडा देई देवा ॥३॥

2358 " फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥१॥ भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥ मिराबाईंसाटीं घेतों विष प्याला । दामाजीचा जाला पाढेवार ॥२॥ कबीराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥३॥ आतां तुम्ही दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां नमीतसे ॥४॥

2359 " फिराविलीं दोनी । कन्या आणि चक्रपाणी ॥१॥ जाला आनंदें आनंद । अवतरले गोविंद ॥ध्रु.॥ तुटलीं बंधनें । वसुदेवदेवकीचीं दर्शनें ॥२॥ गोकुळासी आलें । ब्रम्ह अव्यक्त चांगलें ॥३॥ नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥४॥ निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥५॥ आनंदली मही । भार गेला सकळ ही ॥६॥ तुका म्हणे कंसा । आट भोविला वळसा ॥७॥

2360 " फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥१॥ नाहीं गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषांचे ॥ध्रु.॥ उदंड भावें उदंड घ्यावें । नाम गावें आवडी ॥२॥ तुका म्हणे घरिच्या घरीं । देशा उरीं न सीणीजे ॥३॥

2361 " फोडिलें भांडार । माप घेऊनियां खरें ॥१॥ केली हरिनामाची वरो । मागितलें आतां सरो ॥ध्रु.॥ देशांत सुकाळ । जाला हारपला काळ ॥२॥ घ्यावें धणीवरी । तुका म्हणे लाहान थोरीं ॥३॥

2362 " बंधनाचा तोडूं फांसा । देऊं आशा टाकोनि ॥१॥ नाहीं तें च घेतां शिरीं । होइल दुरी निजपंथ ॥ध्रु.॥ नाथिलें चि माझें तुझें । कोण वोझें वागवी ॥२॥ तुका म्हणे अंतराय । देवीं काय जिणें तें ॥३॥

2363 " बरवयांबरवंट । विटे चरण सम नीट ॥१॥ ते म्या हृदयीं धरिले । तापशमन पाउलें ॥ध्रु.॥ सकळां तीर्थां अधिष्ठान । करी लक्षुमी संवाहन ॥२॥ तुका म्हणे अंतीं । ठाव मागितला संतीं ॥३॥

2364 " बरवी नामावळी । तुझी महादोषां होळी ॥१॥ जालें आम्हांसी जीवन । धणीवरि हें सेवन ॥ध्रु.॥ सोपें आणि गोड । किती अमृता ही वाड ॥२॥ तुका म्हणे अच्युता । आमचा कल्पतरु दाता ॥३॥

2365 " बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य जाली बुद्धि संचितासी ॥१॥ येणें पंथें माझीं चालिलीं पाउलें । दरुषण जालें संतां पायीं ॥ध्रु.॥ त्रासिलें दरिद्रें दोषा जाला खंड । त्या चि काळें पिंड पुनीत जाला ॥२॥ तुका म्हणे जाला अवघा व्यापार । आली वेरझार फळासी हे ॥३॥

2366 " बरवे दुकानीं बैसावें । श्रवण मनन असावें ॥१॥ सारासाराचीं पोतीं । ग्राहिक पाहोनि करा रितीं ॥ध्रु.॥ उगे चि फुगों नका गाल । पूर्ण सांठवावा माल ॥२॥ सत्य तराजू पैं धरा । नका कुडत्रिम विकरा ॥३॥ तुका जाला वाणी । चुकवुनि चौर्‍यासीच्या खाणी ॥४॥

2367 " बरवें ऐसें आलें मना । नारायणा या काळें ॥१॥ देव आम्हा प्राणसखा । जालें दुःखा खंडण ॥ध्रु. ॥ जन्मांतरिंच्या पुण्यरासी । होत्या त्यांसी फळ आलें ॥२॥ तुका म्हणे निजठेवा । होईंल हेवा लाधलों ॥३॥

2368 " बरवें माझ्या केलें मनें । पंथें येणें निघालें ॥१॥ अभयें च जावें ठाया । देवराया प्रतापें ॥ध्रु.॥ साधनाचा न लगे पांग । अवघें सांग कीर्तन ॥२॥ तुका म्हणे सत्ता थोरी । कोण करी खोळंबा ॥३॥

2369 " बरा जाणतोसी धर्मनीती । उचित अनुचित श्रीपती। करूं येते राती । ऐसी डोळे झांकूनि ॥१॥ आतां जाब काय कैसा । देसी तो दे जगदीशा । आणिला वोळसा । आपणां भोंवता ॥ध्रु.॥ सेवेचिया सुखास्तव । बळें धरिलें अज्ञानत्व । येइल परि हा भाव । ज्याचा त्यासी कारणा ॥२॥ तुकयाबंधु म्हणे नाहीं । आतां आम्हां बोल कांहीं । जडोनियां पायीं । तुझे त्वां चि घेतलें ॥३॥

2370 " बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥१॥ एके घरीं कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरांपरी केली आम्हां ॥२॥ कान्हा म्हणे कां रे निःकाम देखिलें । म्हणोनि मना आलें करितोसी ॥३॥

2371 " बराडियाची आवडी पुरे । जया झुरे साटीं तें ॥१॥ तैसें जालें माझ्या मना । नुठी चरणावरूनि ॥ध्रु.॥ मागलिया पेणें पावे । विसांवे तें ठाकणीं ॥२॥ तुका म्हणे छाया भेटे । बरें वाटे तापे त्या ॥३॥

2372 " बरें आम्हां कळों आलें देवपण । आतां गुज कोण राखे तुझें ॥१॥ मारिलें कां मज सांग आजिवरी । आतां सरोबरी तुज मज ॥ध्रु.॥ जें आम्ही बोलों तें आहे तुझ्या अंगीं । देईंन प्रसंगीं आजि शिव्या ॥२॥ निलाजिरा तुज नाहीं याति कुळ । चोरटा शिंदळ ठावा जना ॥३॥ खासी धोंडे माती जीव जंत झाडें । एकलें उघडें परदेसी ॥४॥ गाढव कुतरा ऐसा मज ठावा । बईंल तूं देवा भारवाही ॥५॥ लडिका तूं मागें बहुतांसी ठावा । आलें अनुभवा माझ्या तें ही ॥६॥ तुका म्हणे मज खविळलें भांडा । आतां धीर तोंडा न धरवे ॥७॥

2373 " बरें जालीयाचे अवघें सांगाती । वाइटाचे अंतीं कोणी नाहीं ॥१॥ नोहे मातापिता नोहे कांतासुत । इतरांची मात काय सांगों ॥२॥ तुका म्हणे जन दुतोंडी सावज । सांपडे सहज तिकडे धरी ॥३॥

2374 " बरें जालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली ॥१॥ अनुतापें तुझें राहिलें चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ध्रु.॥ बरें जालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ढोरें गुरें ॥३॥ बरें जालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा ॥४॥ बरें जालें तुझें केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं ॥५॥ तुका म्हणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासीं जागरण ॥६॥॥३॥

2375 " बरें सावधान । राहावें समय राखोन ॥१॥ नाहीं सारखिया वेळा । अवघ्या पावतां अवकळा ॥ध्रु.॥ लाभ अथवा हानी । थोड्यामध्यें च भोवनी ॥२॥ तुका म्हणे राखा । आपणा नाहीं तोंचि वाखा ॥३॥

2376 " बळ बुद्धी वेचुनियां शक्ति । उदक चालवावें युक्ति ॥१॥ नाहीं चळण तया अंगीं । धांवें लवणामागें वेगीं ॥ध्रु.॥ पाट मोट कळा । भरित पखाळा सागळा ॥२॥ बीज ज्यासी घ्यावें । तुका म्हणे तैसें व्हावें ॥३॥

2377 " बळिवंत आम्ही समर्थाचे दास । घातली या कास कळिकाळासी ॥१॥ तेथें मानसाचा कोण आला पाड । उलंघोनि जड गेलों आधीं ॥ध्रु.॥ संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥२॥ तुका म्हणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥३॥

2378 " बळिवंत कर्म । करी आपुला तो धर्म ॥१॥ पुढें घालुनियां सत्ता । न्यावें पतना पतिता ॥ध्रु.॥ आचरणें खोटीं । केलीं सलताती पोटीं ॥२॥ तुका म्हणे देवा । नाहीं भजन केली सेवा ॥३॥

2379 " बळी म्हणे आजि दुर्वासया स्वामी । मागों नका तुम्ही नारायणा ॥१॥ बहुतां प्रयासीं जोडला श्रीहरी । बैसविला द्वारीं राखावया ॥ध्रु.॥ परतला दुर्वास मग हो तेथूनि । चिंतातुर मनीं उद्वेगला ॥२॥ काय तूं एकाचा आहेसी अंकित । होई कृपावंत तुका म्हणे ॥३॥

2380 " बसतां चोरापाशीं तैसी होय बुद्धि । देखतां चि चिंधी मन धांवे ॥१॥ व्यभिचार्‍यापासीं बैसतां क्षणभरी । देखतां चि नारी मन धांवे ॥ध्रु.॥ प्रपंचाचा छंद टाकूनियां गोवा । धरावें केशवा हृदयांत ॥२॥ सांडुनियां देई संसाराची बेडी । कीर्तनाची गोडी धरावी गा ॥३॥ तुका म्हणे तुला सांगतों मी एक । रुक्मिणीनायक मुखीं गावा ॥४॥

2381 " बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥१॥ तुझ्या पायीं मज जालासे विश्वास । म्हणोनियां आस मोकलिली ॥ध्रु.॥ ॠषि मुनि सद्धि साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥२॥ नाहीं नास तें सुख दिलें तयांस । जाले जे उदास सर्वभावें ॥३॥ तुका म्हणे सुख न माये मानसीं । धरिले जीवेंसी पाय तुझे ॥४॥

2382 " बहु कृपावंते माझीं मायबापें । मी माझ्या संकल्पें अंतरलों ॥१॥ संचितानें नाहीं चुकों दिली वाट । लाविलें अदट मजसवें ॥ध्रु.॥ आतां मी रुसतों न कळतां वर्म । परी ठावे धर्म सर्व देवा ॥२॥ तुका म्हणे उभा राहिला न बैसे । आमची माय असे उद्वेग त्या ॥३॥

2383 " बहु क्लेशी जालों या हो नरदेहीं । कृपादृष्टी पाहीं पांडुरंगा ॥१॥ पांडुरंगा सर्वदेवांचिया देवा । घ्यावी माझी सेवा दिनानाथा ॥ध्रु.॥ दिनानाथ ब्रिद त्रिभुवनीं तुझें । मायबापा ओझें उतरावें ॥२॥ उतरीं सत्वर पैलथडी नेई । पूर्णसुख देई पायांपाशीं ॥३॥ पायांपाशीं मज ठेवीं निरंतर । आशा तुझी फार दिवस केली ॥४॥ केली आस तुझी वाट मी पाहातों । निशिदिनीं ध्यातों नाम तुझें ॥५॥ नाम तुझें गोड स्वभक्ता आवडे । भक्तांलागीं कडे खांदा घेसी ॥६॥ घेसी खांद्यावरी खेळविसी लोभें । पाउल शोभे विटेवरि ॥७॥ विटेवरि उभा देखिलासी डोळां । मनाचा सोहळा पुरविसी ॥८॥ पुरवीं सत्वर त्रैलोक्यस्वामिया । मिठी घाली पायां तुका भावें ॥९॥

2384 " बहु जन्मांतरें फेरे । केले येरे सोडवीं ॥१॥ आळवितों करुणाकरे । विश्वंभरे दयाळे ॥ध्रु.॥ वाहवतों मायापुरीं । येथें करीं कुढावा ॥२॥ तुका म्हणे दुजा कोण । ऐसा सीण निवारी ॥३॥

2385 " बहु टाळाटाळी । होतां भोवताहे कळी ॥१॥ बरें नव्हेल सेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥ मुरगाळी कान । घुसमाडील सावधान ॥२॥ अबोलणा तुका । ऐसें कोणी लेखूं नका ॥३॥

2386 " बहु दिस नाहीं माहेरिंची भेटी । जाली होती तुटी व्यवसायें ॥१॥ आपुल्याला होतों गुंतलों व्यासंगें । नाहीं त्या प्रसंगें आठवलें ॥ध्रु.॥ तुटातें तुटतें जडती जडलें । आहे तें आपुलें आपणापें ॥२॥ बहु निरोपाचें पावलें उत्तर । जवळी च पर एक तें ही ॥३॥ काय जाणों मोह होईंल सांडिला । बहु दिस तुटला तुका म्हणे ॥४॥

2387 " बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥१॥ आतां उतरला भार । तुम्हीं केला अंगीकार ॥ध्रु.॥ बहु काकुलती । आलों मागें किती ॥२॥ तुका म्हणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥३॥

2388 " बहु देवा बरें जालें । नसतें गेलें सोंवळें ॥१॥ धोवटाशीं पडिली गांठी । जगजेठीप्रसादें ॥ध्रु.॥ गादल्याचा जाला जाडा । गेली पीडा विकल्प ॥२॥ तुका म्हणे वरावरी । निर्मळ करी निर्मळा ॥३॥

2389 " बहु धीर केला । जाण न होसी विठ्ठला ॥१॥ आतां धरीन पदरीं । करीन तुज मज सरी ॥ध्रु.॥ जालों जीवासी उदार । उभा राहिलों समोर ॥२॥ तुका विनवी संतां । ऐसें सांगा पंढरिनाथा ॥३॥

2390 " बहु नांवें ठेविलीं स्तुतीचे आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥१॥ बहु सोसें सेवन केलें बहुवस । बहु आला दिस गोमट्याचा ॥ध्रु.॥ बहुतां पुरला बहुतां उरला । बहुतांचा केला बहु नट ॥२॥ बहु तुका जाला निकट वृत्ती । बहु काकुलती येऊनियां॥३॥

2391 " बहु फिरलों ठायाठाव । कोठें भाव पुरे चि ना ॥१॥ समाधान तों पावलों । उरलों बोलों यावरि ॥ध्रु.॥ घे गा देवा आशीर्वाद । आमुच्या नांद भाग्यानें ॥२॥ तुका म्हणे जेवूं आधी । खवखव मधीं सारावी ॥३॥

2392 " बहु बरें एकाएकीं । संग चुकी करावा ॥१॥ ऐसें बरें जालें ठावें । अनुभवें आपुल्या ॥ध्रु.॥ सांगावें तें काम मना । सलगी जना नेदावी ॥२॥ तुका म्हणे निघे अगी । दुजे संगीं आतळतां ॥३॥ अलकापुरीं स्वामी कीर्तनास उभे राहिले तेव्हां कवित्वाचा निषेध करून लोक बोलिले कीं कवित्व बुडवणें तेव्हां कवित्व बुडवून पांच दिवस होते ॥ लोकांनीं फार पीडा केली कीं संसारही नाहीं व परमार्थही बुडविला आणीक कोणी असतें तें जीव देतें मग निद्रा केली ते अभंग ॥ २० ॥

2393 " बहु बोलणें नये कामा । वाउगें तें पुरुषोत्तमा । एकाचि वचनें आम्हां । काय सांगणें तें सांग ॥१॥ देणें आहे कीं भांडाईं । करणें आहे सांग भाईं । आतां भीड कांहीं । कोणी न धरी सर्वथा ॥ध्रु.॥ मागें गेलें जें होउनी । असो तें धरित नाहीं मनीं । आतां पुढें येथूनि । कैसा काय विचार ॥२॥ सारखी नाहीं अवघी वेळ । हें तों कळतें सकळ । तुकयाबंधु म्हणे खळखळ । करावी ते उरेल ॥३॥

2394 " बहु भितों जाणपणा । आड न यो नारायणा । घेइन प्रेमपान्हा । भक्तिसुख निवाडें ॥१॥ यासी तुळे ऐसे कांहीं । दुजें त्रिभुवनीं नाहीं । काला भात दहीं । ब्रम्हादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥ निमिशा अर्ध संतसंगति । वास वैकुंठीं कल्पांतीं । मोक्षपदें होती । ते विश्रांति बापुडी ॥२॥ तुका म्हणे हें चि देई । मीतूंपणा खंड नाहीं । बोलिलों त्या नाहीं । अभेदाची आवडी ॥३॥

2395 " बहु या प्रपंचें भोगविल्या खाणी । टाकोनियां मनीं ठेविला सीण ॥१॥ आतां पायांपाशीं लपवावें देवा । नको पाहूं सेवा भक्ती माझी ॥ध्रु.॥ बहु भय वाटे एकाच्या बोभाटें । आली घायवटे फिरोनियां ॥२॥ तुका म्हणे सिगे भरूं आलें माप । वियोग संताप जाला तुझा ॥३॥

2396 " बहु वाटे भये । माझे उडी घाला दये ॥१॥ फांसा गुंतलों लिगाडीं । न चले बळ चरफडी ॥ध्रु.॥ कुंटित चि युक्ति । माझ्या जाल्या सर्व शक्ति ॥२॥ तुका म्हणे देवा । काममोहें केला गोवा ॥३॥

2397 " बहु होता भला । परि ये रांडेनें नासिला ॥१॥ बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे ॥ध्रु.॥ नव्हतें आळवितें कोणी । इनें केला जगॠणी ॥२॥ ज्याचे त्यासी नेदी देऊं । तुका म्हणे धांवे खाऊं ॥३॥

2398 " बहुक्षीदक्षीण । आलों सोसुनियां वन ॥१॥ विठोबा विसांवया विसांवया । पडों देई पायां ॥ध्रु.॥ बहुतां काकुलती । आलों सोसिली फजिती ॥२॥ केली तुजसाटीं । तुका म्हणे येवढी आटी ॥३॥

2399 " बहुजन्मां शेवटीं स्वामी तुझी भेटी । बहु मोह पोटीं थोर जाला ॥१॥ बहु पुरें पाहिलीं बहु दिशा शोधिली । बहु चिंता वाहिली दुर्भराची ॥ध्रु.॥ बहु काळ गेले अनुचित केलें । बहु नाहीं गाइलें नाम तुझें ॥२॥ ऐसा मी अपराधी अगा कृपानिधि । बहु संतां संनिधि ठेवीं तुका ॥३॥

2400 " बहुजन्में केला लाग । तो हा भाग लाधलों ॥१॥ जीव देइन हा बळी । करीन होळी संसारा ॥ध्रु.॥ गेलें मग नये हाता । पुढती चिंता वाटतसे ॥२॥ तुका म्हणे तांतड करूं । पाय धरूं बळकट ॥३॥

2401 " बहुजन्में सोस केला । त्याचा जाला परिणाम ॥१॥ विठ्ठलसें नाम कंठीं । आवडी पोटीं संचितें ॥ध्रु.॥ येथुन तेथवरी आतां । न लगे चिंता करावी ॥२॥ तुका म्हणे धालें मन । हें चि दान शकुनाचें ॥३॥

2402 " बहुत असती मागें सुखी केलीं । अनाथा माउली जिवांची तूं ॥१॥ माझिया संकटा न धरीं अळस । लावुनियां कास पार पावीं ॥ध्रु.॥ कृपावंता करा ज्याचा अंगीकार । तया संवसार नाहीं पुन्हां ॥ ।२॥ विचारितां नाहीं दुजा बळिवंत । ऐसा सर्वगत व्यापी कोणी ॥३॥ म्हणउनि दिला मुळीं जीवभाव । देह केला वाव समाधिस्थ ॥४॥ तुका म्हणे नाहीं जाणत आणीक । तुजविण एक पांडुरंगा ॥५॥

2403 " बहुत करूनि चाळवाचाळवी । किती तुम्ही गोवी करीतसां ॥१॥ लागटपणें मी आलों येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥ध्रु.॥ दुजियाचा तंव तुम्हांसी कांटाळा । राहासी निराळा एकाएकीं ॥२॥ तुका म्हणे आतां यावरी गोविंदा । मजशीं विनोदा येऊं नये ॥३॥

2404 " बहुत कृपाळु दीनाचा दयाळु । जगीं भक्तवत्सळु नाम तुझें ॥१॥ मानियेला चत्तिीं बळीचा उपकार । अझूनि त्याचें द्वार राखसील ॥ध्रु.॥ काय त्याच्या भेणें बैसलासी द्वारीं । नाहीं तुज हरि कृपा बहु ॥२॥ तुका म्हणे भक्तजनाची ममता । तुम्हांसी अनंता अलोलिक ॥३॥

2405 " बहुत प्रकार परि ते गव्हाचे । जिव्हा नाचे आवडी ॥१॥ सरलें परि आवडी नवी । सिंधु दावी तरंग ॥ध्रु.॥ घेतलें घ्यावें वेळोवेळां । माय बाळा न विसंबे ॥२॥ तुका म्हणे रस राहिला वचनीं । तो चि पडताळूनि सेवीतसें ॥३॥

2406 " बहुत सोसिले मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावें ॥१॥ एकाचिये अंगीं हें ठेवावें लावून । नये भिन्न भिन्ना चांचपडो ॥ध्रु.॥ कोण होईल तो ब्रम्हांडचाळक । आपणें चि हाके देईल हाके ॥२॥ तुका म्हणे दिलीं चेतवूनि सुणीं । कौतुकावांचूनि नाहीं छळ ॥३॥

2407 " बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें ॥१॥ करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥ध्रु.॥ सुखाची समाधी हरिकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥२॥ तुका म्हणे बुडे बांधोनि दगड । तेथें काय कोड धांवायाचें ॥३॥

2408 " बहुतां जन्मां अंतीं । जोडी लागली हे हातीं ॥१॥ मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरीं पांडुरंगीं भाव ॥ध्रु.॥ बहु केला फेरा । येथें सांपडला थारा ॥२॥ तुका म्हणे जाणे । ऐसे भले ते शाहाणे॥३॥

2409 " बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां ॥१॥ करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं आतां ॥ध्रु.॥ सांडि आतां कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥२॥ पंढरीस जावें सर्व सुख घ्यावें । रूप तें पाहावें विटेवरि ॥३॥ विटेवरि नीट आनंदाचा कंद । तुका नाचे छंद नामघोषें ॥४॥

2410 " बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरिभक्त । कृपावंत मानसीं ॥१॥ म्हणवी म्हणियारा तयांचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा । काया मनें विठ्ठलीं ॥ध्रु.॥ असे भूतदया मानसीं । अवघा देखे हृषीकेशी । जीवें न विसंबे तयासी । मागें मागें हिंडतसे ॥२॥ तुका म्हणे निर्विकार । शरणागतां वज्रपंजर । जे जे अनुसरले नर । तयां जन्म चुकलें ॥३॥

2411 " बहुतां जातीचा केला अंगीकार । बहुत ही फार सवाौत्तमें ॥१॥ सरला चि नाहीं कोणांचिये वेचें । अक्षोभ ठायींचें ठायीं आहे ॥ध्रु.॥ लागत चि नाहीं घेतां अंतपार । वसवी अंतर अणुचें ही ॥२॥ तुका म्हणे केला होय टाकीऐसा । पुरवावी इच्छा धरिली ते ॥३॥

2412 " बहुतां दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती ॥१॥ येथें सावकासें घेईंन ते धणी । गेली अडचणी उगवोनि ॥ध्रु.॥ बहु दुःख दिलें होतें घरीं कामें । वाढला हा श्रमश्रमें होता ॥२॥ बहु दिस होता पाहिला मारग । क्लेशाचा त्या त्याग आजि जाला ॥३॥ बहु होती केली सोंगसंपादणी । लौकिकापासूनि निर्गमलें ॥४॥ तुका म्हणे येथें जालें अवसान । परमानंदीं मन विसावलें ॥५॥

2413 " बहुतां पुरे ऐसा वाण । आलें धन घरासी ॥१॥ घ्या रे फुका मोलेंविण । नारायण न भुला ॥ध्रु.॥ ऐका निवळल्या मनें । बरवें कानें सादर ॥२॥ तुका म्हणे करूनि अंतीं । निश्चिंती हे ठेवावी ॥३॥

2414 " बा रे कृष्णा तुझें मुख कीं कोमळ । कैसे येवढे ज्वाळ ग्रासियेले ॥१॥ बा रे कृष्णा तुझी जिव्हा कीं कोवळी । होईंल पोळिली नारायणा ॥ध्रु.॥ बैसें कृष्णा तुझें पाहूं मुखकमळ । असेल पोळलें कोणे ठायीं ॥२॥ घोंगडिया घालीं घालूनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥३॥ तुका म्हणे भावें आकळिला देव । कृपासिंधुराव त्रैलोक्याचा ॥४॥

2415 " बा रे पांडुरंगा केव्हां येशी भेटी । जाहालों हिंपुटी तुजवीण ॥१॥ तुजवीण सखें न वटे मज कोणी । वाटतें चरणीं घालूं मिठीं ॥ध्रु.॥ ओवाळावी काया चरणांवरोनि । केव्हां चक्रपाणी भेटशील ॥२॥ तुका म्हणे माझी पुरवीं आवडी । वेगीं घालीं उडी नारायणा ॥३॥

2416 " बांधे सोडी हें तों धन्याचिये हातीं । हेंकडें गोविती आपणां बळें ॥१॥ भुललियासी नाहीं देहाचा आठव । धोतर्‍यानें भाव पालटिला ॥ध्रु.॥ घरांत रिघावें दाराचिये सोईं । भिंतीसवें डोईं घेऊनि फोडी ॥२॥ तुका म्हणे देवा गेलीं विसरोन । आतां वर्म कोण दावी यांसी ॥३॥

2417 " बाइल तरी ऐसी व्हावी । नरकीं गोवी अनिवार ॥१॥ घडों नेदी तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥ध्रु.॥ आपुली च करवी सेवा । पुजवी देवासारिखें ॥२॥ तुका म्हणे गाढव पशु । केला नाशु आयुष्या ॥३॥

2418 " बाइले अधीन होय ज्याचें जिणें । तयाच्या अवलोकनें पडिजे द्वाड ॥१॥ कासया ते जंत जिताती संसारीं । माकडाच्या परी गारोड्यांच्या ॥ध्रु.॥ वाइलेच्या मना येईंल तें खरें । अभागी तें पुरें बाइलेचें ॥२॥ तुका म्हणे मेंग्या गाढवाचें जिणें । कुतर्‍याचें खाणें लगबगा ॥३॥

2419 " बाईंल चालिली माहेरा । संगें दिधला म्हातारा ॥१॥ सिधा सामग्री पोटाची । सवें स्वारी बइलाची ॥ध्रु.॥ जाता पाडिली ढोरानें । सिव्या देती अन्योविन्ये ॥२॥ न सावरी आपणातें । नग्न सावलें वरतें ॥३॥ फजित केलें जनलोकीं । मेला म्हणे पडे नरकीं ॥४॥ गोहाची हे गेली लाज । गांजितां कां तुम्ही मज ॥५॥ तुका म्हणे जनीं । छी थू केली विटंबणी ॥६॥

2420 " बाप करी जोडी लेंकराचे ओढी । आपुली करवंडी वाळवूनी ॥१॥ एकाएकीं केलों मिरासीचा धनी । कडिये वागवूनी भार खांदीं ॥ध्रु.॥ लेवऊनी पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करूनियां ॥२॥ तुका म्हणे नेदी गांजूं आणिकांसी । उदार जीवासी आपुलिया ॥३॥

2421 " बाप माझा दिनानाथ । वाट भक्तांची पाहात ॥१॥ कर ठेवुनियां करीं । उभा चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥ गळां वैजयंतीमाळा। रूपें डोळस सांवळा ॥२॥ तुका म्हणे भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ॥३॥

2422 " बारंबार काहे मरत अभागी । बहुरि मरन संक्या तोरेभागी ॥ध्रु.॥ ये हि तन करते क्या ना होय । भजन भगति करे वैकुंठे जाय ॥१॥ रामनाम मोल नहिं वेचे कबरि । वो हि सब माया छुरावत झगरी ॥२॥ कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चाखो ॥३॥

2423 " बारावर्षे बाळपण । तें ही वेचलें अज्ञानें ॥१॥ ऐसा जन्म गेला वांयां । न भजतां पंढरिराया ॥ध्रु.॥ बाकी उरलीं आठ्याशीं । तीस वेचलीं कामासी ॥२॥ बाकी उरलीं आठावन्न । तीस वेचली ममतेनें ॥३॥ बाकी उरलीं आठावीस । देहगेह विसरलास ॥४॥ तुका म्हणे ऐसा झाडा । संसार हा आहे थोडा ॥५॥

2424 " बाळ काय जाणे जीवनउपाय । मायबाप वाहे सर्व चिंता ॥१॥ आइतें भोजन खेळणें अंतरीं । अंकिताचे शिरीं भार नाहीं ॥ध्रु॥ आपुलें शरीर रिक्षतां न कळें । सांभाळूनि लळे पाळी माय ॥२॥ तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता । जेथें आमची सत्ता तयावरी ॥३॥

2425 " बाळ माते निष्ठ‍ होये । परि तें स्नेह करीत आहे ॥१॥ तैसा तूं गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आम्हां ॥ध्रु.॥ नेणती भागली । कडे घेतां अंग घाली ॥२॥ भूक साहे ताहान । त्याचें राखे समाधान ॥३॥ त्याच्या दुःखें धाये । आपला जीव देऊं पाहे ॥४॥ नांवें घाली उडी । तुका म्हणे प्राण काढी ॥५॥

2426 " बाळ माते लाते वरी । मारी तेणें संतोषे ॥१॥ सुख वसे चित्ती अंगीं । तें हें रंगीं मिळालें ॥ध्रु.॥ भक्षी त्याचा जीवमाग । आले भाग तो बरा ॥२॥ तुका म्हणे ॠणानुबंधें । सांगें सुदें सकळां ॥३॥

2427 " बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे ॥१॥ तयापरी करीं पाळण हें माझें । घेउनियां ओझें सकळ भार ॥ध्रु.॥ कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥२॥ सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥३॥ जेणें काळें पायीं अनुसरलें चित्त । निर्धार हें हित जालें ऐसें ॥४॥ तुका म्हणे तुम्ही तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असों दे वो ॥५॥

2428 " बाळपणें ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥१॥ विटू दांडू चेंडू लगोरया वाघोडीं । चंपे पेंड खडी एकीबेकी ॥ध्रु.॥ हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी ॥२॥ सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाले धोंडी अंगबळें ॥३॥ तुका म्हणे ऐसें बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥४॥

2429 " बाळाचें जीवन । माता जाणें भूक तान ॥१॥ काय करूं विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥ ठेविलिये ठायीं । चत्ति ठेवुनि असें पायीं ॥२॥ करितों हे सेवा । चिंतन सर्वां ठायीं देवा ॥३॥ न्यून तें चि पुरें । घ्यावें करोनि दातारें ॥४॥ तुका म्हणे बुद्धि । अल्प असे अपराधी ॥५॥

2430 " बाळेंविण माय क्षणभरि न राहे । न देखतां होये कासाविस ॥१॥ आणिक उदंड बुझाविती जरी । छंद त्या अंतरीं माउलीचा ॥ध्रु.॥ नावडती तया बोल आणिकाचे । देखोनियां नाचे माय दृष्टी ॥२॥ तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥३॥

2431 " बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥१॥ वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ध्रु.॥ पाल्याची जतन । तरि प्रांतीं येती कण ॥२॥ तुका म्हणे आळा । उदक देतां लाभे फळा ॥३॥

2432 " बीज भाजुनि केली लाही । आम्हां जन्ममरण नाहीं ॥१॥ आकाराशी कैंचा ठाव । देहप्रत्यक्ष जाला देव ॥ध्रु.॥ साकरेचा नव्हे उस । आम्हां कैंचा गर्भवास ॥२॥ तुका म्हणे औघा योग । सर्वां घटीं पांडुरंग ॥३॥

2433 " बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ ॥१॥ तया मूर्ख म्हणावें वेडें । कैसें तुटेल सांकडें ॥ध्रु.॥ दावितिया वाट । वेठी धरूं पाहे चाट ॥२॥ पुढिल्या उपाया । तुका म्हणे राखे काया ॥३॥

2434 " बीजीं फळाचा भरवसा । जतन सिंचनासरिसा । चाविलिया आसा । काकुलती ते नाड ॥१॥ हा तों गडसंदीचा ठाव । पिके पिकविला भाव । संकोचोनि जीव । दशा केली जतन ॥ध्रु.॥ माती घाली धनावरी । रांडा रोटा वरीवरी । सुखाचे सेजारीं । दुःख भ्रमें भोगीतसे ॥२॥ तुका म्हणे दिशाभुली । जाल्या उफराटी चाली । निवाडाची बोली । अनुभवें साक्षीसी ॥३॥

2435 " बुद्धिमंद शिरीं । भार फजिती पदरीं ॥१॥ जाय तेथें अपमान । पावे हाणी थुंकी जन ॥ध्रु.॥ खरियाचा पाड । मागें लावावें लिगाड ॥२॥ तुका म्हणे करी । वर्म नेणें भरोवरी ॥३॥

2436 " बुद्धिहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥१॥ हुंगों नये गो†हवाडी । तेथें जोडी विटाळ ॥ध्रु.॥ अळसियाचे अंतर कुडें। जैसें मढें निष्काम ॥२॥ तुका म्हणे ऐशा हाती । मज श्रीपती वांचवा ॥३॥

2437 " बुद्धिहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं ॥१॥ परिसावी हे विज्ञापना । आम्हां दीनां दासांची ॥ध्रु.॥ चिंतूनियां आले पाय । त्यांसी काय वंचन ॥२॥ तुका म्हणे पुरुषोत्तमा । करीं क्षमा अपराध॥३॥

2438 " बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पति । आठवितां चित्तीं काय नव्हे ॥१॥ आणिकां उपायां कोण वांटी मन । सुखाचें निधान पांडुरंग ॥ध्रु.॥ गीत गावों नाचों छंदें वावों टाळी । वैष्णवांचे मेळीं सुखरूप ॥२॥ अनंत ब्रम्हांडें एके रोमावळी । आम्ही केला भोळीं भावें उभा ॥३॥ लडिका हा केला संवसारसिंधु । मोक्ष खरा बंधु नाहीं पुढें ॥४॥ तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलों निश्चिंत त्याच्या बळें ॥५॥

2439 " बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता नाहीं मनुष्यदेह ॥१॥ आपुल्या हिताचे नव्हती सायास । गृहदाराआसधनवित्त ॥ध्रु.॥ अवचितें निधान लागलें हें हातीं । भोगावी विपत्ती गर्भवास ॥२॥ यावें जावें पुढें ऐसें चि कारण । भोगावें पतन नरकवास ॥३॥ तुका म्हणे धरीं आठव या देहीं । नाहींतरि कांहीं बरें नव्हे ॥४॥

2440 " बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंगें हें पितळ न देखतां ॥१॥ माझें चित्ती मज जवळीच गो ही । तुझी मज नाहीं भेटी ऐसें ॥ध्रु.॥ दासीसुतां नाहीं पितियाचा ठाव । अवघें चि वाव सोंग त्याचें ॥२॥ तुका म्हणे माझी केली विटंबना । अनुभवें जना येईंल कळों ॥३॥

2441 " बैसतां कोणापें नाहीं समाधान । विवरे हें मन ते चि सोईं ॥१॥ घडी घडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥ध्रु.॥ नो बोलावें ऐसा करितों विचार । प्रसंगीं तों फार आठवतें ॥२॥ इंद्रियांसी वाहो पडिली ते चाली । होती विसांवली ये चि ठायीं ॥३॥ एकसरें सोस माहेरासी जावें । तुका म्हणे जीवें घेतलासे ॥४॥

2442 " बैसलों तों कडियेवरी । नव्हें दुरी वेगळा ॥१॥ घडलें हें बहुवा दिसां । आतां इच्छा पुरवीन ॥ध्रु.॥ बहु होता जाला सीण । नाहीं क्षण विसांवा ॥२॥ दुःखी केलें मीतूंपणें । जवळी नेणें होतें तें ॥३॥ पाहात जे होतों वास । ते चि आस पुरविली ॥४॥ तुका म्हणे मायबापा । झणी कोपा विठ्ठला ॥५॥

2443 " बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी ॥१॥ आतां कोठें हालों नेदीं । बरी सांपडली संदी ॥ध्रु.॥ किती वेरझारा । मागें घातलीया घरा ॥२॥ माझें मज नारायणा । देतां कां रे नये मना ॥३॥ भांडावें तें किती । बहु सोसिली फजिती ॥४॥ तुका म्हणे नाहीं । लाज तुझे अंगीं कांहीं ॥५॥

2444 " बैसो आतां मनीं । आले तैसें चि वदनीं ॥१॥ मग अवघें चि गोड । पुरे सकळ हि कोड ॥ध्रु.॥ बाहेरील भाव । तैसा अंतरीं हि वाव ॥२॥ तुका म्हणे मणि । शोभा दाखवी कोंदणीं ॥३॥

2445 " बैसों पाठमोरीं । मना वाटे तैसे करीं ॥१॥ परिं तूं जाणसीं आवडीं । बाळा बहुतांचीं परवडी ॥ध्रु.॥ आपुलाल्या इच्छा । मागों जया व्हावें जैशा ॥२॥ तुका म्हणे आईं । नव्हसी उदास विठाईं ॥३॥

2446 " बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥१॥ येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥ राम कृष्ण हरि मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥२॥ तुका म्हणे ऐसें देईंन मी दिव्य । जरी होइल भाव एकविध ॥३॥

2447 " बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देईंल तो अन्नवस्त्रदाता ॥१॥ काय आम्हां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥ दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥२॥ न लगे मागणें सांगणें तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥३॥ तुका म्हणे लेई अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूं चि होसी ॥४॥

2448 " बैसोनियां खाऊं जोडी । ओढाओढी चुकवूनि ॥१॥ ऐसें केलें नारायणें । बरवें जिणें सुखाचें ॥ध्रु.॥ घरीच्या घरीं भांडवल । न लगे बोल वेचावे ॥२॥ तुका म्हणे आटाआटी । चुकली दाटी सकळ ॥३॥

2449 " बोध्यअवतार माझिया अदृष्टा । मौन्य मुखें निष्ठा धरियेली ॥१॥ लोकांचियेसाटीं शाम चतुर्भुज । संतांसवें गुज बोलतसां ॥ध्रु.॥ आलें कलियुग माझिया संचिता । डोळां हाकलितां न पडेसी ॥२॥ म्यां च तुझें काय केलें नारायणा । कां नये करुणा तुका म्हणे ॥३॥

2450 " बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । आम्ही अविश्वासी सर्वभावें ॥१॥ दंभें करी भक्ती सोंग दावी जना । अंतरीं भावना वेगळिया ॥२॥ तुका म्हणे देवा तूं काय करिसी । कर्मा दुस्तरासी आमुचिया ॥३॥

2451 " बोलणें चि नाहीं । आतां देवाविण कांहीं ॥१॥ एकसरें केला नेम । देवा दिले क्रोध काम ॥ध्रु.॥ पाहेन ते पाय । जोंवरि हे दृष्टी धाय ॥२॥ तुका म्हणे मनें । हे चि संकल्प वाहाणें ॥३॥

2452 " बोलणें तें आम्ही बोलों उपयोगीं । पडिलें प्रसंगी काळाऐसें ॥१॥ जयामध्यें देव आदि मध्यें अंतीं । खोल पाया भिंती न खचेसी ॥ध्रु.॥ करणें तें आम्ही करूं एका वेळे । पुढिलिया बळें वाढी खुंटे ॥२॥ तुका म्हणे असों आज्ञेचीं धारकें । म्हणऊनि एकें घायें सारूं ॥३॥

2453 " बोलतां वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळों आले ॥१॥ मागतिलें नये अरुचीनें हातां । नाहीं वरी सत्ता आदराची ॥ध्रु.॥ समाधानासाटीं लाविलासे कान । चोरलें तें मन दिसतसां ॥२॥ तुका म्हणे आम्हां तुमचे चि फंद । वरदळ छंद कळों येती ॥३॥

2454 " बोलतों निकुरें । नव्हेत सलगीचीं उत्तरें ॥१॥ माझे संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ध्रु.॥ अंगावरि आलें । तोंवरि जाईल सोसिलें ॥२॥ तुज भक्तांची आण देवा । जरि तुका येथें ठेवा ॥३॥

2455 " बोलविले जेणें । तो चि याचें गुह्य जाणे ॥१॥ मी तों काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ध्रु.॥ मजुराच्या हातें । माप जालें गेलें रितें ॥२॥ जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता ॥३॥ मायबापासवें । बाळें कौतुकें खेळावें ॥४॥ जैसा करिती धंदा । तैसा पडोनियां छंदा ॥५॥ त्याच्या साच गाईं म्हैसी । येणें खेळावें मातीशीं ॥६॥ तुका म्हणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥७॥

2456 " बोलविसी तरी । तुझ्या येईंन उत्तरीं ॥१॥ कांहीं कोड कवतिकें । हातीं द्यावया भातुकें ॥ध्रु.॥ बोलविसी तैसें । करीन सेवन सरिसें ॥२॥ तुका म्हणे देवा । माझें चळण तुज सवा ॥३॥

2457 " बोलविसी माझें मुख । परी या जना वाटे दुःख ॥१॥ जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥ कठीण देतां काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥२॥ खाऊं नये तें चि मागे । निवारितां रडों लागे ॥३॥ वैद्या भीड काय । अतित्याईं जीवें जाय ॥४॥ नये भिडा सांगों आन । पथ्य औषधाकारण ॥५॥ धन माया पुत्र दारा । हे तों आवडी नरका थारा ॥६॥ तुका म्हणे यांत । आवडे ते करा मात ॥७॥

2458 " बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥१॥ माझी हरिकथा माउली । नव्हे आणिकांसी पांगिली ॥ध्रु.॥ व्याली वाढविलें । निजपदीं निजवलें ॥२॥ दाटली वो रसें । त्रिभुवन ब्रम्हरसें ॥३॥ विष्णु जोडी कर । माथां रज वंदी हर ॥४॥ तुका म्हणे बळ । तोरडीं हा कळिकाळ ॥५॥

2459 " बोलाल या आतां आपुल्यापुरतें । मज या अनंतें गोवियेलें ॥१॥ झाडिला न सोडी हातींचा पालव । वेधी वेधें जीव वेधियेला ॥ध्रु.॥ तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी । मज सवें मिठी अंगसंगें ॥२॥ तुका म्हणे तुम्हां होईंल हे परी । अनुभव वरी येईंल मग ॥३॥

2460 " बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु.॥ बंधनापासूनि उकलली गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥२॥ तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रितें ॥३॥

2461 " बोलावे म्हुण हे बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळ ॥१॥ भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी ॥ध्रु.॥ मुखीं देतां घांस पळवितीं तोंडें । अंगींचिया भांडे असुकानें ॥२॥ तुका म्हणे पूजा करितों देवाची । आपुलिया रुची मनाचिये ॥३॥

2462 " बोलावें तें आतां आम्ही अबोलणे । एका चि वचनें सकळांसी ॥१॥ मेघदृष्टि कांहीं न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळो ॥२॥ तुका म्हणे नाहीं समाधानें चाड । आपणा ही नाड पुढिलांसीं ॥३॥

2463 " बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें ॥१॥ कवतुक तुझें नवल यावरि । घेसील तें शिरीं काय नव्हे ॥ध्रु.॥ नाहीं मिळे येत संचिताच्या मता । पुराणीं पाहतां अघटित ॥२॥ तुका म्हणे पायीं निरोपिला भाव । न्याल तैसा जाव सिद्धी देवा ॥३॥

2464 " बोलिलीं तीं काय । माझा बाप आणि माय ॥१॥ ऐसें सांगा जी झडकरी । तुम्ही सखे वारकरी ॥ध्रु.॥ पत्राचें वचन । काय दिलें फिरावून ॥२॥ तुका म्हणे कांहीं । मना आणिलें कीं नाहीं ॥३॥

2465 " बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें ॥१॥ करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्धी ॥ध्रु.॥ नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥२॥ तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपें किंकरा ॥३॥

2466 " बोलिलें चि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका ॥१॥ बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥ध्रु.॥ बहुतांच्या भावें वांटिसी भातुकें । बहु कवतुकें खेळविसी ॥२॥ तुका म्हणे ऐसें जाणतसों वर्म । करणें तो श्रम न वजे वांयां॥३॥

2467 " बोलिलेती ते देवॠषी दुर्वासया । जाय पुसावया मागत्यानें ॥१॥ मागुता दुर्वास पुसे बळिराया । निरोप जावया देई देवा ॥ध्रु.॥ बळी म्हणे त्यासी जाय मी न म्हणें । जाईंल नारायण लागला ची ॥२॥ मजपाशीं राहें कोठें तरीं जाय । तुका म्हणे पाय न सोडीं मी ॥३॥

2468 " बोलिलों उत्कषॉ । प्रेमरस दाशत्वें ॥१॥ साच करिता नारायण । जया शरण गेलों तो ॥ध्रु.॥ समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥२॥ तुका म्हणे लडिवाळाचें । द्यावें साचें करूनियां ॥३॥

2469 " बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ ॥१॥ करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरि ॥ध्रु.॥ वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥२॥ तुका म्हणे घडे अपराध नेणतां । द्यावा मज आतां ठाव पायीं ॥३॥

2470 " बोलिलों ते आतां । कांहीं जाणतां नेणतां ॥१॥ क्षमा करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥ध्रु.॥ स्तुती निंदा केली । लागे पाहिजे साहिली ॥२॥ तुका म्हणे लाड । दिला तैसें पुरवा कोड ॥३॥ या पत्राच्या उत्तराच्या मार्गप्रतीक्षेचे अभंग १९

2471 " बोलिलों ते धर्म अनुभव अंगें । काय पांडुरंगें उणें केलें ॥१॥ सर्व सिद्धि पायीं वोळगती दासी । इच्छा नाहीं ऐसी व्हावें कांहीं ॥ध्रु.॥ संतसमागमें अळंकार वाणी । करूं हे पेरणी शुद्ध बीजा ॥२॥ तुका म्हणे रामकृष्णनामें गोड । आवडीचें कोड माळ ओऊं ॥३॥

2472 " बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठी ॥१॥ जातों आतां आज्ञा घेऊनियां स्वामी । काळक्षेप आम्ही करूं कोठें ॥ध्रु.॥ न घडे यावरि न धरवे धीर । पीडतां राष्ट्र देखोनि जग ॥२॥ तुका म्हणे तुम्ही दिसे मोकलिलें । काय आतां आलें जीवित्वाचें ॥३॥

2473 " बोले तैसा चाले । त्याचीं वंदीन पाउलें ॥१॥ अंगें झाडीन अंगण । त्याचें दासत्व करीन ॥ध्रु.॥ त्याचा होईंन किंकर। उभा ठाकेन जोडोनि कर ॥२॥ तुका म्हणे देव । त्याचे चरणीं माझा भाव ॥३॥

2474 " बोलोनि दाऊं कां तुम्ही नेणा जी देवा । ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेन ॥१॥ पांगुळलें मन कांहीं नाठवे उपाय । म्हणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥ध्रु.॥ त्यागें भोगें दुःख काय सांडावें मांडावें । ऐसी धरियेली जीवें माझ्या थोरी आशंका ॥२॥ तुका म्हणे माते बाळा चुकलिया वनीं । न पवतां जननी दुःख पावे विठ्ठले ॥३॥

2475 " बोलोनियां काय दावूं । तुम्ही जीऊ जगाचे ॥१॥ हे चि आतां माझी सेवा । चिंतन देवा करितों ॥ध्रु.॥ विरक्तासी देह तुच्छ । नाहीं आस देहाची ॥२॥ तुका म्हणे पायापाशीं । येइन ऐसी वासना ॥३॥

2476 " बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रम्हाग्नीसीं ॥१॥ एकवेळे जालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥ध्रु.॥ अमृतसंजीवनी निवविली खाईं । अंगें तये ठायीं हारपलीं ॥२॥ एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ॥३॥ अवघीं कर्में जालीं घटस्पोटापाशीं । संबंध एकेसी उरला नामीं ॥४॥ \ तुका म्हणे आतां आनंदीं आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥५॥

2477 " ब्रम्हचारी धर्म घोकावें अक्षर । आश्रमीं विचार षटकर्में ॥१॥ वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥ध्रु.॥ परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथें याती धर्म कुळ नाहीं ॥२॥ बोले वर्म जो चाले याविरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥३॥ तुका म्हणे कांहीं नाहीं नेमाविण । मोकळा तो सीण दुःख पावे ॥४॥

2478 " ब्रम्हज्ञान जरी कळें उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें ॥१॥ शास्त्रांचे भांडण जप तीर्थाटणें । उर्वीचें भ्रमण या च साटीं ॥ध्रु.॥ याचसाटीं जप याचसाटीं तप । व्यासें ही अमुप ग्रंथ केले ॥२॥ या च साटीं संतपाय हे सेवावे । तरि च तरावें तुका म्हणे ॥३॥

2479 " ब्रम्हज्ञान जेथें आहे घरोघरीं । सर्व निरंतरी चतुर्भुज ॥१॥ पापा नाहीं रीग काळाचें खंडण । हरिनामकीर्तन परोपरी ॥२॥ तुका म्हणे हा चि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥३॥

2480 " ब्रम्हज्ञान तरी एके दिवसीं कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥१॥ अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासें उपराटी दृष्टी केली ॥ध्रु.॥ जनकभेटीसी पाठविला तेणें । अभिमान नाणें खोटें केलें ॥२॥ खोटें करूनियां लाविला अभ्यासीं । मेरुशिखरासी शुक गेला ॥३॥ जाऊनियां तेणें साधिली समाधी । तुका म्हणे तधीं होतों आम्ही ॥४॥

2481 " ब्रम्हज्ञान दारीं येतें काकुलती । अव्हेरिलें संतीं विष्णुदासीं ॥१॥ रिघों पाहे माजी बळें त्याचें घर । दवडिती दूर म्हणोनियां ॥२॥ तुका म्हणे येथें न चाले सायास । पडिले उदास त्याच्या गळां ॥३॥

2482 " ब्रम्हज्ञानाची भरोवरी । पुढिला सांगे आपण न करी ॥१॥ थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ सिणवी वैखरी ॥ध्रु.॥ कथा करी वरिवरी । प्रेम नसे चि अंतरीं ॥२॥ तुका म्हणे कवित्व करी । मान वस्तु हे आदरी ॥३॥

2483 " ब्रम्हयाचे वेद शंखासुरें नेले । त्यासाटीं धरिलें मत्स्यरूप ॥१॥ तेणें आत्मा नव्हता नेला ब्रम्हांडासी । काय ब्रम्हयासी नव्हतें ज्ञान ॥ध्रु.॥ परि तेणें धावा केला आवडीनें । जाले नारायण कृपासिंधु ॥२॥ तुका म्हणे विठोबा मी नामधारक । पोसनें सेवक भेटी देई ॥३॥

2484 " ब्रम्हरस घेई काढा । जेणें पीडा वारेल ॥१॥ पथ्य नाम विठोबाचें । अणीक वाचे न सेवीं ॥ध्रु.॥ भवरोगाऐसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥२॥ तुका म्हणे नव्हे बाधा । अणीक कदा भूतांची ॥३॥

2485 " ब्रम्हरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली सकळ ज्यांची ॥१॥ नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥ मन हें निश्चळ जालें एके ठायीं । तयां उणें काईं निजसुखा ॥२॥ तीं चि पुण्यवंतें परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोकां ॥३॥ तुका म्हणे त्यांचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ॥ ४॥

2486 " ब्रम्हरूपाचीं कर्में ब्रम्हरूप । विरहित संकल्प होती जाती ॥१॥ ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥ नानाभाषामतें आळविती बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥२॥ तुका म्हणे माझें नमन जाणतियां । लागतसें पायां वेळोवेळां ॥३॥

2487 " ब्राम्हण तो नव्हे ऐसी ज्यासी बुद्धी । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥१॥ जयासी नावडे हरिनामकीर्तन । आणीक नृत्य न वैष्णवांचें ॥ध्रु.॥ सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥२॥ तुका म्हणे येथें मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें कुष्ट होय ॥३॥

2488 " ब्राम्हण तो याती अंतेज असतां । मानावा तत्वता निश्चयेसी ॥१॥ रामकृष्णें नाम उच्चारी सरळें । आठवी सांवळें रूप मनीं ॥ध्रु.॥ शांति क्षमा दया अलंकार अंगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥२॥ तुका म्हणे गेल्या शडऊर्मी अंगें । सांडुनियां मग ब्रम्हं चि तो ॥३॥

2489 " ब्राम्हणा न कळे आपुलें तें वर्म । गंवसे परब्रम्ह नामें एका ॥१॥ लहानथोरासि करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनीं धरा ॥ध्रु.॥ सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ॥२॥ केशव नारायण करितां आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ॥३॥ नामें करा नित्य भजन भोजन । ब्रम्हकर्म ध्यान याचे पायीं ॥४॥ तुका म्हणे हें चि निर्वाणींचें शस्त्र । म्हणोनि सर्वत्र स्मरा वेगीं ॥५॥

2490 " ब्रिदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या ॥१॥ सुखावे मेदिनी कृष्णाचिये चालीं । कुंकुमें शोभलीं होय रेखा ॥२॥ होउनि भ्रमर पाउलांचें सुख । घेती क्त मुख लावूनियां ॥३॥ याचसाटीं धरियेला अवतार । सुख दिलें फार निजदासां ॥४॥ निज सुख तुका म्हणे भक्तां ठावें । तींहीं च जाणावें भोगूं त्यासि ॥५॥

2491 " ब्रीद मेरे साइंयाके । तुका चलावे पास । सुरा सो हि लरे हमसें । छोरे तनकी आस ॥१॥

2492 " ब्रीद याचें जगदानी । तो चि मनीं स्मरावा ॥१॥ सम पाय कर कटी । उभा तटीं भींवरेच्या ॥ध्रु.॥ पाहिलिया वेध लावी । बैसे जीवीं जडोनि ॥२॥ तुका म्हणे भक्तिकाजा । धांवें लाजा लवलाहें ॥३॥

2493 " भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि ॥१॥ विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥ध्रु.॥ निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें । कांहीं च सांकडें पडों नेदी ॥२॥ तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साहे । घातलिया भये नर्का जाणें ॥३॥

2494 " भक्त देवाघरचा सुना । देव भक्ताचा पोसणा ॥१॥ येर येरां जडलें कैसें । जीवा अंगें जैसें तैसें ॥ध्रु.॥ देव भक्ताची कृपाळु माता । भक्त देवाचा जनिता ॥२॥ तुका म्हणे अंगें । एक एकाचिया संगें ॥३॥

2495 " भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं । ऐसिया अनंतामाजी तूं अनंत । लीलावेश होत जगत्राता ॥१॥ ब्रम्हानंद तुकें तुळे आला तुका । तो हा विश्वसंख्या क्रीडे जनीं ॥ध्रु.॥ शास्त्रा श्रेष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली । देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविण योगेशी ब्रम्हार्पण ॥२॥ संत ग्रहमेळीं जगधंद्या गिळी । पैल उदयाचळीं भानु तुका । संत वृंदें तीर्थ गौतमी हरिकथा । तुकया नर सिंहस्ता भेटों आली ॥३॥ शांति पतिव्रते जाले परिनयन । काम संतर्पण निष्कामता । क्षमा क्षमापणें प्रसद्धि प्रथा जगीं । तें तों तुझ्या अंगी मूर्तिमंत ॥४॥ दया दिनानाथा तुवा जीवविली । विश्वीं विस्तारली कीर्ति तुझी । वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्वभूतें ॥५॥ अधर्म क्षयव्याधि धर्मांशीं स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ति । ब्रम्ह ऐक्यभावें भक्ति विस्तारिली । वाक्यें सपळ केलीं वेदविहितें ॥६॥ देहबुद्धि जात्या अभिमानें वंचलों । तो मी उपेक्षिलों न पाहिजे । न घडो याचे पायीं बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥

2496 " भक्तजनां दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥१॥ आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरीं हरि ॠणी ॥२॥ रुसलिया त्यांचें करी समाधान । करविता आण क्रिया करी ॥३॥ क्रिया करी तुम्हां न वजे पासुनि । अवघियाजणी गोपिकांसी ॥४॥ गोपिकांसी म्हणे वैकुंठींचा पति । तुम्हीं माझ्या चित्ती सर्वभावें ॥५॥ भाव जैसा माझ्याठायीं तुम्ही धरा । तैसा चि मी खरा तुम्हांलागीं ॥६॥ तुम्हां कळों द्या हा माझा साच भाव । तुमचा चि जीव तुम्हां ग्वाही ॥७॥ ग्वाही तुम्हां आम्हां असे नारायण । आपली च आण वाहातसे ॥८॥ सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभवें रसा आणूनियां ॥९॥ यांसी बुझावितो वेगळाल्या भावें । एकीचें हें ठावें नाहीं एकी ॥१०॥ एकी क्रिया नाहीं आवघियांचा भाव । पृथक हा देव घेतो तैसें ॥११॥ तैसें कळों नेदी जो मी कोठें नाहीं । अवघियांचे ठायीं जैसा तैसा ॥१२॥ जैसा मनोरथ जये चित्ती काम । तैसा मेघशाम पुरवितो ॥१३॥ पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥ गोकुळींच्या लोकां लावियेला छंद । बैसला गोविंद त्याचा चित्ती ॥१५॥ चित्ते ही चोरूनि घेतलीं सकळा । आवडी गोपाळांवरी तयां ॥१६॥ आवडे तयांसी वैकुंठनायक । गेलीं सकळिक विसरोनि ॥१७॥ निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाहीं या देहाची शुद्धि कोणा ॥१८॥ कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव म्हणुनि तया चुंबन देती ॥१९॥ देती या टाकून भ्रतारांसी घरीं । लाज ते अंतरीं आथी च ना ॥२०॥ नाहीं कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका म्हणे वाचा काया मनें ॥२१॥

2497 " भक्तवत्सल दिनानाथ । तिहीं लोकीं ज्याची मात ॥१॥ तो हा पुंडलिकासाठीं । आला उभा वाळवंटीं ॥ध्रु.॥ गर्भवास धरी । अंबॠषीचा कैवारी ॥२॥ सकळां देवां अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ॥३॥ तुका म्हणे ध्यानीं । ज्यासि ध्यातो शूळपाणी ॥४॥

2498 " भक्ता म्हणऊनि वंचावें जीवें । तेणें शेण खावें काशासाटीं ॥१॥ नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली ॥ध्रु.॥ अंगीकारिले सेवे अंतराय । तया जाला न्याय खापराचा ॥२॥ तुका म्हणे कोठें तगों येती घाणीं । आहाच ही मनीं अधीरता ॥३॥

2499 " भक्तां समागमें सर्वभावें हरि । सर्व काम करी न संगतां ॥१॥ सांटवला राहे हृदयसंपुष्टीं । बाहेर धाकुटी मूर्ति उभा ॥ध्रु.॥ मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥२॥ तुका म्हणे जीव भाव देवापायीं । ठेवूनि ते कांहीं न मगती ॥३॥

2500 " भक्तांचा महिमा भक्त चिं जाणती । दुर्लभ या गति आणिकांसी ॥१॥ जाणोनि नेणते जाले तेणें सुखें । नो बोलोनि मुखें बोलताती ॥ध्रु.॥ अभेदूनि भेद राखियेला अंगीं । वाढावया जगीं प्रेमसुख ॥२॥ टाळ घोष कथा प्रेमाचा सुकाळ । मूढ लोकपाळ तरावया ॥३॥ तुका म्हणे हें तों आहे तयां ठावें । जिहीं एक्या भावें जाणीतलें ॥४॥

2501 " भक्तांची सांकडीं स्वयें सोसी देव । त्यांपाशीं केशव सर्वकाळ ॥१॥ जये ठायीं कीर्तन वैष्णव करिती । तेथें हा श्रीपति उभा असे ॥२॥ तुका म्हणे देव सर्वाठायीं जाला । भरुनी उरला पांडुरंग ॥३॥

2502 " भक्तांहून देवा आवडे तें काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें ॥१॥ नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा ॥ध्रु.॥ सर्वभावें त्याचें सर्वस्वें ही गोड । तुळसीदळ कोड करुनी घ्यावें ॥२॥ सर्वस्वें त्याचा म्हणवी विकला । चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥३॥ तुका म्हणे भक्तीसुखाचा बांधिला । आणीक विठ्ठला धर्म नाहीं॥४॥

2503 " भक्ति तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रम्हीं भोग ब्रम्हतनु ॥१॥ देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥ उदक अग्नि धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥२॥ तुका म्हणे मज केले ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥

2504 " भक्ति तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥ जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥ कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥२॥ तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥३॥

2505 " भक्तिॠण घेतलें माझें । चरण गाहाण आहेत तुझे ॥१॥ प्रेम व्याज देई हरी । माझा हिशेब लवकरी करीं ॥ध्रु.॥ माझें मी न सोडीं धन । नित्य करितों कीर्तन ॥२॥ तुझें नाम आहे खत । सुखें करी पंचाईंत ॥३॥ तुका म्हणे गरुडध्वजा । यासी साक्ष श्रीगुरुराजा ॥४॥

2506 " भक्तिचिया पोटीं रत्नाचिया खाणी । बम्हींची ठेवणी सकळ वस्तु ॥१॥ माउलीचे मागें बाळकांची हरी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥ध्रु.॥ जेथील जें मागे तें रायासमोर । नाहींसें उत्तर येत नाहीं ॥२॥ सेवेचिये सत्ते धनी च सेवक । आपुलें तें एक न वंची कांहीं ॥३॥ आदिअंताठाव असे मध्यभाग । भोंवतें भासे मग उंचासनी ॥४॥ भावारूढ तुका जाला एकाएकीं । देव च लौकिकीं अवघा केला ॥५॥

2507 " भक्तिप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥ आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ति सुख दुर्लभ त्यां ॥२॥ तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरि च हें वर्म पडे ठायीं ॥३॥

2508 " भक्तिभाव आम्ही बांधिलासे गांठी । साधावितों हाटीं घ्या रे कोणी ॥१॥ सुखाचिया पेंठे घातला दुकान । मांडियेले वान रामनाम ॥ध्रु.॥ सुखाचें फुकाचें सकळांचें सार । तरावया पार भवसिंधु ॥२॥ मागें भाग्यवंत जाले थोर थोर । तिहीं केला फार हा चि सांटा ॥३॥ खोटें कुडें तेथें नाहीं घातपात । तुका म्हणे चत्ति शुद्ध करीं ॥४॥

2509 " भक्तिभावें करी बैसोनि निश्चित । नको गोवूं चित्त प्रपंचासी ॥१॥ एका दृढ करीं पंढरीचा राव । मग तुज उपाव पुढिल सुचे ॥ध्रु.॥ नको करूं कांहीं देवतापूजन । जप तप ध्यान तें ही नको ॥२॥ मानिसील झणी आपलिक कांहीं । येरझार पाहीं न चुके कदा ॥३॥ ऐसे जन्म किती पावलासी देहीं । अझूनि का नाहीं कळली सोय ॥४॥ सोय घरीं आतां होय पां सावध । अनुभव आनंद आहे कैसा ॥५॥ सहज कैसें आहे तेथीचें तें गुज । अनुभवें निज पाहे तुकीं ॥६॥ तुका म्हणे आतां होईं तूं सावध । तोडीं भवबंध एका जन्में ॥७॥

2510 " भक्तिसुखें जे मातले । ते कळिकाळा शूर जाले ॥१॥ हातीं बाण हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥ध्रु.॥ महां दोषां आला त्रास । जन्ममरणां केला नाश ॥२॥ सहस्रनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥३॥ नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचें अंकित त्यावांचून ॥४॥ का म्हणे त्यांच्या घरीं । मोक्षसिद्धी या कामारी ॥५॥

2511 " भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग । पावलों हें सांग सुख याचें ॥१॥ सुख आम्हां जालें धरितां यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥ तुका म्हणे सुख बहु जालें जिवा । घडली या सेवा विठोबाची ॥३॥

2512 " भक्ती ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी ॥१॥ तो नर चि नव्हे पाहीं । खर जाणावा तो देहीं ॥ध्रु.॥ भजन पूजन ही नेणे । काय स्वरूपासी जाणे ॥२॥ तुका म्हणे त्याला । भोवंडून बाहेर घाला ॥३॥

2513 " भक्तीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओंवाळूं आरती ॥१॥ ओंवाळू आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥ध्रु.॥ काय महिमा वर्णू आतां सांगणें तें किती । कोटि ब्रम्हहत्या मुख पाहतां जाती ॥२॥ राही रखुमाईं दोही दों बाही । मयूर पिच्छचामरें ढाळिति ठायीं ठायीं ॥३॥ तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनति शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥४॥

2514 " भक्तीचें वर्म जयाचिये हातीं । तया घरी शांति दया ॥१॥ अष्टमासिद्धि वोळगती द्वारीं । न वजती दुरी दवडितां॥ध्रु.॥ तेथें दुष्ट गुण न मिळे निशेष । चैतन्याचा वास जयामाजी ॥२॥ संतुष्ट चित्त सदा सर्वकाळ । तुटली हळहळ त्रिगुणाची ॥३॥ तुका म्हणे येथें काय तो संदेह । आमचें गौरव आम्ही करूं ॥४॥

2515 " भक्तीवीण जिणें जळो लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखमूळ ॥१॥ वीसलक्ष योनि वृक्षामाजी घ्याव्या । जलचरीं भोगाव्या नवलक्ष ॥ध्रु.॥ अकरालक्ष योनि किड्यामाजी घ्याव्या । दशलक्ष भोगाव्या पर्‍यांमध्ये ॥२॥ तीसलक्ष योनि पशूंचीये घरीं । मानवाभीतरीं चारलक्ष ॥३॥ एकएक योनि कोटिकोटि फेरा । मनुष्यदेहाचा वारा मग लागे ॥४॥ तुका म्हणे तेव्हां नरदेह नरा । तयाचा मातेरा केला मूढें ॥५॥

2516 " भक्तीसाटीं केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥१॥ देव गिळुनियां धरिलें मोहन । माय म्हणे कोण येथें दुजें ॥२॥ दुजें येथें कोणी नाहीं कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥३॥ देवापाशीं पुसे देव काय जाला । हांसें आलें बोला याचें हरि ॥४॥ यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिकें मानिती साच खरें ॥५॥ लटिकें तें साच साच तें लटिके । नेणती लोभिकें आशाबद्ध ॥६॥ सांग म्हणे माय येरु वासी तोंड । तंव तें ब्रम्हांड देखे माजी ॥७॥ माजी जया चंद्र सूर्य तारांगणें । तो भक्तांकारणें बाळलीला ॥८॥ लीळा कोण जाणे याचें महिमान । जगाचें जीवन देवादिदेव ॥९॥ देवें कवतुक दाखविलें तयां । लागतील पायां मायबापें ॥१०॥ मायबाप म्हणे हा चि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥११॥ तो हि त्यांचा देव दिला नारायणें । माझें हें करणें तो हि मी च ॥१२॥ मीं च म्हणउनि जें जें जेथें ध्याती । तेथें मी श्रीपति भोगिता तें ॥१३॥ तें मज वेगळें मी तया निराळा । नाहीं या सकळा ब्रम्हांडांत ॥१४॥ ततभावना तैसें भविष्य तयाचें । फळ देता साचें मी च एक ॥१५॥ मी च एक खरा बोलें नारायण । दाविलें निर्वाण निजदासां ॥१६॥ निजदासां खूण दाविली निरुती । तुका म्हणे भूतीं नारायण ॥१७॥

2517 " भगवें तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथें अनुभवाचा काय पंथ ॥१॥ वाढवुनी चटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज स्थिति ॥ध्रु.॥ कोरोनियां भूमी करिती मधीं वास । तरी उंदरास काय वाणी ॥२॥ तुका म्हणे ऐसें कासया करावें । देहासी दंडावें वाउगें चि ॥३॥

2518 " भजन या नासिलें हेडि । दंभा लंडा आवडी ॥१॥ जेवीत ना आइता पाक । नासी ताक घुसळूनि ॥ध्रु.॥ एकाएकीं इच्छी पाठ । नेणे चाट कां जेवूं ॥२॥ तुका म्हणे मुलाम्याचें । बंधन साचें सेवटीं ॥३॥

2519 " भजनें चि जालें । मग जीवाचें काय आलें ॥१॥ येऊं नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥ध्रु.॥ करितां सरोबरी । कांहीं न ठेवावी उरी ॥२॥ तुका म्हणे शूर । व्हावे धुरेसीं च धुरे॥३॥

2520 " भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्ती हेवा दुजा कांहीं ॥१॥ दुजा छंदु नाहीं तयांचिये मनीं । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥२॥ ध्यान ज्यां हरीचें हरीसि तयांचें । चित्त ग्वाही ज्यांचें तैशा भावें ॥३॥ भाग्यें पूर्वपुण्यें आठविती लोक । अवघे सकळिक मथुरेचे ॥४॥ मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथें नारायण राज्य करी ॥५॥ राज्य करी गोपीयादवांसहित । कमिऩलें बहुतकाळ तेथें ॥६॥ तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका म्हणे ॥७॥

2521 " भय नाहीं भेव । अनुतापीं नव्हतां जीव ॥१॥ जेथें देवाची तळमळ । तेथें काशाचा विटाळ ॥ध्रु.॥ उच्चारितां दोष । नाहीं उरों देत लेश ॥२॥ तुका म्हणे चित्त । होय आवडी मिश्रित ॥३॥

2522 " भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥१॥ ऐसा पडिलों कांचणी । करीं धांवा म्हणउनी ॥ध्रु.॥ विचारितों कांहीं । तों हें मन हातीं नाहीं ॥२॥ तुका म्हणे देवा । येथें न पुरे रिघावा ॥३॥

2523 " भय हरिजनीं । कांहीं न धरावें मनीं ॥१॥ नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥ध्रु.॥ चित्ती वत्ति हेवा । समर्पून राहा देवा ॥२॥ तुका म्हणे मन । असों द्यावें समाधान ॥३॥

2524 " भय होतें आम्हीपणें । पाठी येणें घातलें ॥१॥ अवघा आपुला चि देश । काळा लेश उरे चि ना ॥ध्रु.॥ समर्थाचें नाम घेतां । मग चिंता काशाची ॥२॥ तुका म्हणें नारायणें । जालें जिणें सुखाचें ॥३॥

2525 " भयाची तों आम्हां चिंत्तीं । राहो खंती सकेना ॥१॥ समर्पिलों जीवें भावें । काशा भ्यावें कारणें ॥ध्रु.॥ करीन तें कवतुकें। अवघें निकें शोभेल ॥२॥ तुका म्हणे माप भरूं । दिस सारूं कवतुकें ॥३॥

2526 " भरणी आली मुH पेठा । करा लाटा व्यापार ॥१॥ उधार घ्या रे उधार घ्या रे । अवघे या रे जातीचे ॥ध्रु.॥ येथें पंक्तिभेद नाहीं । मोठें कांहीं लहान ॥२॥ तुका म्हणे लाभ घ्यावा । मुद्दल भावा जतन ॥३॥

2527 " भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि फांकती ॥१॥ भोगा ऐसे ठायाठाव । कर्मा त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथें देव । विरहित संकल्पा ॥ध्रु.॥ दिला पाडूनियां धडा । पापपुण्यांचा निवाडा । आचरती गोडा । आचरणें आपुलाल्या ॥२॥ तुका म्हणे पराधीनें । जालीं ओढलिया ॠणें । तुटती बंधनें । जरि देवा आळविते ॥३॥

2528 " भलते जन्मीं मज घालिसील तरी । न सोडीं मी हरी नाम तुझें ॥१॥ सुख दुःख तुज देईंन भोगितां । मग मज चिंता कासयाची ॥ध्रु.॥ तुझा दास म्हणवीन मी अंकिला । भोगितां विठ्ठला गर्भवास ॥२॥ कासया मी तुज भाकितों करुणा । तारीं नारायणा म्हणवुनि ॥३॥ तुका म्हणे तुज येऊं पाहे उणें । तारिसील तेणें आम्हां तया ॥४॥

2529 " भला म्हणे जन । परि नाहीं समाधान ॥१॥ माझें तळमळी चित्ती । अंतरलें दिसे हित ॥ध्रु.॥ कृपेचा आधार । नाहीं दंभ जाला भार ॥२॥ तुका म्हणे कृपे । अंतराय कोण्या पापें ॥३॥

2530 " भले रे भाईं जिन्हें किया चीज । आछा नहिं मिलत बीज ॥ध्रु.॥ फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥१॥ तीरथ बरत फिर पाया जोग । नहिं तलमल तुटति भवरोग ॥२॥ कहे तुका मैं ताको दासा । नहिं सिरभार चलावे पासा ॥३॥

2531 " भले लोक तुज बहु मानवती । वाढेल या कीर्ति जगामाजी ॥१॥ म्हणे मेलीं गुरें भांडीं नेलीं चोरें । नाहींत लेंकुरें जालीं मज ॥ध्रु.॥ आस निरसूनि कठिण हें मन । करीं वो समान वज्र तैसें ॥२॥ किंचित हें सुख टाकीं वो थुंकोनि । पावसील धनी परमानंद ॥३॥ तुका म्हणे थोर चुकती सायास । भवबंद पाश तुटोनियां ॥४॥

2532 " भले लोक नाहीं सांडीत ओळखी । हे तों झाली देखी दुसर्‍याची ॥१॥ असो आतां यासी काय चाले बळ । आपुलें कपाळ वोडवलें ॥ध्रु.॥ समर्थासी काय कोणें हें म्हणावें । आपुलिया जावें भोगावरि ॥२॥ तुका म्हणे तुम्हां बोल नाहीं देवा । नाहीं केली सेवा मनोभावें ॥३॥

2533 " भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥१॥ परी आम्ही असों एकाचिये हातीं । नाचवितो चित्ती त्याचें तैसें ॥ध्रु.॥ वाट सांगे त्याच्या पुण्या नाहीं पार । होती उपकार अगणित ॥२॥ तुका म्हणे तुम्ही बहु कृपावंत । आपुलें उचित केलें संतीं ॥३॥

2534 " भल्याचें दरुषण । तेथें शुभ चि वचन ॥१॥ बोलावी हे धर्मनीत । क्षोभें होत नाहीं हित ॥ध्रु.॥ मर्यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरीं ॥२॥ तुका म्हणे बहु । लागे ऐसें बरें मऊ ॥३॥

2535 " भवाचिया संगें बहु च नाडिले । कळिकाळें पाडिले तोंडघसीं ॥१॥ तया भवसंगें गुंतलासी वांयां । धन पुत्र जाया भुलों नको ॥ध्रु.॥ जेजे घडी जाय तेते काळ खाय । प्राण्या तरणोपाय काय केला ॥२॥ तुका म्हणे करीं सर्व ही तूं त्याग । अर्पी हें सर्वांग जगदीशीं ॥३॥

2536 " भांडवल माझें लटिक्याचे गांठी । उदीम तो तुटी यावी हा चि ॥१॥ कैसी तुझी वाट पाहों कोणा तोंडें । भोंवतीं किं रे भांडे गर्भवास ॥ध्रु.॥ चहूं खाणीचिया रंगलोंसें संगें । सुष्ट दुष्ट अंगें धरूनियां ॥२॥ बहुतांचे बहु पालटलों सळे । बहु आला काळें रंग अंगा ॥३॥ उकलूनि नये दावितां अंतर । घडिचा पदर सारूनियां ॥४॥ तुका म्हणे करीं गोंवळें यासाटीं । आपल्या पालटीं संगें देवा ॥५॥

2537 " भांडावें तें गोड । पुरे सकळ ही कोड ॥१॥ ऐसा घरींचा या मोळा । ठावा निकटां जवळां ॥ध्रु.॥ हाक देतां दारीं । येती जवळी सामोरीं ॥२॥ तुका म्हणे शिवें । मागितलें हातीं द्यावें ॥३॥ ॥२॥

2538 " भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित ॥१॥ नये खंडों देऊं वाद । आम्हां भांडवलभेद ॥ध्रु.॥ शब्दासारसें भेटी । नये पडों देऊं तुटी ॥२॥ तुका म्हणे आळस । तो चि कारणांचा नास ॥३॥

2539 " भाग त्या सुखाचे वांकड्या बोबड्या । आपलिया गड्या भाविकांसि ॥१॥ भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसि ॥२॥ काला करूनियां वांटिलां सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥३॥ खेळेंमेळें दहीं दुध तूप खाती । भय नाहीं चित्ती कवणाचें ॥४॥ कवणाचें चाले तुका म्हणे बळ । जयासी गोपाळ साह्य जाला ॥५॥

2540 " भाग सीण गेला । माझा सकळ विठ्ठला ॥१॥ तुझा म्हणवितों दास । केली उच्छिष्टाची आस ॥ध्रु.॥ राहिली तळमळ । तई पासोनी सकळ ॥२॥ तुका म्हणे धालें । पोट ऐसें कळों आलें ॥३॥

2541 " भागलों मी आतां आपुल्या स्वभावें । कृपा करोनि देवें आश्वासीजे ॥१॥ देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें । अंगें हीं दातारें निववावीं ॥ध्रु.॥ अमृताची दृष्टी घालूनियां वरी । शीतळ हा करीं जीव माझा ॥२॥ घेई उचलूनि पुसें तानभूक । पुसीं माझें मुख पीतांबरें ॥३॥ बुझावोनि माझी धरीं हनुवंटी । ओवाळुनि दिठी करुनी सांडीं ॥४॥ तुका म्हणे बापा आहो विश्वंभरा । आतां कृपा करा ऐसी कांहीं ॥५॥

2542 " भागल्यांचा तूं विसांवा । करीं नांवा निंबलोण ॥१॥ परमानंदा पुरुषोत्तमा । हरीं या श्रमापासूनि ॥ध्रु.॥ अनाथांचा अंगीकार । करितां भार न मनिसी ॥२॥ तुका म्हणे इच्छा पुरे । ऐसें धुरेगे विठ्ठल ॥३॥

2543 " भागल्याचें तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥१॥ ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी । सुखाची च राशी पांडुरंग ॥ध्रु.॥ सकळां सन्मुख कृपेचिया दृष्टी । पाहे बहु भेटी उतावीळां ॥२॥ तुका म्हणे येथें आतां उरला कैंचा । अनंता जन्मींचा शीण भाग ॥३॥

2544 " भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥१॥ नाही तें पुरवीत आणुनि जवळी । गाउनी माउली गीत सुखें ॥ध्रु.॥ प्रीति अंगीं असे सदा सर्वकाळ । वोळली सकळ सुखें ठायीं ॥२॥ आपुल्या स्वभावें जैसे जेथें असों । तैसे तेथें दिसों साजिरे चि ॥३॥ वासनेचा कंद उपडिलें मूळ । दुरितें सकळ निवारिलीं ॥४॥ तुका म्हणे क्तजनाची माउली । करील साउली विठ्ठल आम्हां ॥५॥

2545 " भाग्यवंत म्हणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥१॥ तरले तरले हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥ध्रु.॥ भक्तिमुक्तीचें तें स्थळ । भाविकनिर्मळ निर्मळ ॥२॥ गाइलें पुराणीं । तुका म्हणे वेदवाणी ॥३॥

2546 " भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची ॥१॥ धन घरीं पांडुरंग । अभंग जें सरेना ॥ध्रु.॥ जनाविरहित हा लाभ । टांचें नभ सांटवणें ॥२॥ तुका म्हणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी ॥३॥

2547 " भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥१॥ आपुलाल्या लाहो भावें । जें ज्या व्हावें तें आहे ॥ध्रु.॥ इच्छाभोजनाचा दाता । न लगे चिंता करावी ॥२॥ तुका म्हणे आल्या थार्‍या । वस्तु बर्‍या मोलाच्या ॥३॥

2548 " भाग्यवंतां हें चि काम । मापी नाम वैखरी ॥१॥ आनंदाची पुष्टी अंगीं । श्रोते संगीं उद्धरती ॥ध्रु.॥ पिकविलें तया खाणें किती । पंगतीस सुकाळ ॥२॥ तुका करी प्रणिपात । दंडवत आचारियां ॥३॥

2549 " भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥१॥ येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥ होई बळकट । माझ्या मना तूं रे धीट ॥२॥ तुका म्हणे लोटांगणीं । भक्तिभाग्यें जाली धणी ॥३॥

2550 " भाग्यालागी लांचावले । देवधर्म ते राहिले ॥१॥ कथे जातां अळसे मन । प्रपंचाचें मोटें ज्ञान ॥ध्रु.॥ अखंडप्रीति जाया । नेणे भजनाच्या ठाया ॥२॥ कथाकीर्तन धनाचें । सर्वकाळ विषयीं नाचे ॥३॥ तुका म्हणे पंढरिराया । ऐसे जन्मविले वांयां॥४॥

2551 " भाग्यासाटीं गुरु केला । नाहीं आम्हांसी फळला ॥१॥ याचा मंत्र पडतां कानीं । आमच्या पेवांत गेलें पाणी ॥ध्रु.॥ गुरु केला घरवासी । आमच्या चुकल्या गाईम्हसी ॥२॥ स्वामी आपुली बुटबुट घ्यावी । आमुची प्रताप टाकुन द्यावी ॥३॥ तुका म्हणे ऐसे नष्ट । त्यांसी दुणे होती कष्ट ॥४॥

2552 " भाते भरूनि हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे॥१॥ अनंतनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥ध्रु.॥ नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचे अंकित त्यावांचून ॥२॥ रिद्धि सिद्धी ज्या कामारी । तुका म्हणे ज्याचे घरीं ॥३॥

2553 " भार घालीं देवा । न लगे देश डोईं घ्यावा ॥१॥ देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे सीण ॥ध्रु.॥ व्यवसाय निमत्ति । फळ देतसे संचित ॥२॥ तुका म्हणे फिरे । भोंवडीनें दम जिरे ॥३॥

2554 " भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥१॥ आले आले वैष्णववीर । काळ कांपती असुर ॥ध्रु.॥ गरुडटकयाच्या भारें । भूमी गर्जे जेजेकारें ॥ २॥ तुका म्हणे काळ । पळे देखोनियां बळ ॥३॥

2555 " भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥१॥ अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥ मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुद्धि स्थिर ॥३॥ बुद्धि स्थिर होउं नेदी नारायण । आशबद्ध जन लोभिकांची ॥४॥ लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका म्हणे तेणें दुःखी होती ॥५॥

2556 " भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥१॥ सांगे गोपाळांसि काय पुण्य होतें । वांचलों जळते आगी हातीं ॥२॥ आजि आम्हां येथें राखियेलें देवें । नाहीं तरी जीवें न वंचतों ॥३॥ न वंचत्या गाईं जळतों सकळें । पूर्वपुण्यबळें वांचविलें ॥४॥ पूर्वपुण्य होतें तुमचिये गांठी । बोले जगजेठी गोपाळांसि ॥५॥ गोपाळांसि म्हणे वैकुंठनायक । भले तुम्ही एक पुण्यवंत ॥६॥ करी तुका म्हणे करवी आपण । द्यावें थोरपण सेवकांसि ॥७॥

2557 " भाव धरिला चरणीं म्हणवितों दास । अहिर्निशीं ध्यास करीतसें ॥१॥ करीतसें ध्यास हृदयीं सकळ । भाव तो सबळ धरियेला ॥२॥ धरिले निश्चळि न सोडीं ते पाय । तुका म्हणे सोय करीं माझी ॥३॥

2558 " भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानीं ॥१॥ न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥ध्रु.॥ नाहीं चाड देवाची कांहीं । छळणें टोंके तस्करघाईं ॥२॥ तुका म्हणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥३॥

2559 " भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भयें पोटीं ॥१॥ पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥२॥ न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥३॥ अंतरला बहु बोलतां वाउगें । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥४॥ गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोण्याभावें रडती तीं ॥५॥ तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥६॥ मायबापांची तों ऐसी जाली गति । तुका म्हणे अंतीं कळों आलें ॥७॥

2560 " भावबळें कैसा जालासी लाहान । मागें संतीं ध्यान वर्णियेलें ॥१॥ तें मज उचित करूनियां देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ध्रु.॥ पाहोनियां डोळां बोलेन मी गोष्टी । आळंगुनि मिठी देइन पांयीं ॥२॥ चरणीं दृष्टी उभा राहेन समोर । जोडोनियां कर पुढें दोन्ही ॥३॥ तुका म्हणे उत्कंठित वासना । पुरवीं नारायणा आर्त माझें ॥४॥

2561 " भावबळें विष्णुदास । नाहीं नास पावत ॥१॥ योगभाग्यें घरा येती । सर्व शक्ति चालत ॥ध्रु.॥ पित्याचें जें काय धन । पुत्रा कोण वंचील ॥२॥ तुका म्हणे कडे बैसों । तेणें असों निर्भर ॥३॥

2562 " भावभक्तीवादें करावें कीर्तन । आशाबधी मन करूं नये ॥१॥ अन्न पाणी धन द्रव्य नारायण । विठ्ठला वांचून बोलूं नये ॥ध्रु.॥ सप्रेम करावें देवाचें कीर्तन । भय द्या सोडून शरीराचें ॥२॥ तरी मग जोडे विठ्ठलनिधान । केलिया कीर्तन सिद्धि पावे ॥३॥ देव जोडिलिया तया काय उणें । तुका म्हणे मन धीट करा ॥४॥

2563 " भावाचिया बळें । आम्ही निर्भर दुर्बळें ॥१॥ नाहीं आणिकांची सत्ता । सदा समाधान चित्ती ॥ध्रु.॥ तर्का नाहीं ठाव । येथें रिघावया वाव ॥२॥ एकछत्रीं राज । तुक्या पांडुरंगीं काज ॥३॥

2564 " भावापुढें बळ । नाहीं कोणाचे सबळ ॥१॥ करी देवावरी सत्ता । कोण त्याहूनि परता ॥ध्रु.॥ बैसे तेथें येती । न पाचारितां सर्व शक्ति ॥२॥ तुका म्हणे राहे । तयाकडे कोण पाहे ॥३॥

2565 " भाविकां हें वर्म सांपडलें निकें । सेविती कवतुकें धणीवरि ॥१॥ इच्छितील तैसा नाचे त्यांचे छंदें । वंदिती तीं पदें सकुमारें ॥ध्रु.॥ विसरले मुक्ति भक्तिअभिळासें । ओढत सरिसें सुखा आलें ॥२॥ तुका म्हणे नाहीं मागायाची आस । पांडुरंग त्यांस विसंबेना ॥३॥

2566 " भाविकांचें काज अंगें देव करी । काढी धर्माघरीं उच्छिष्ट तें ॥१॥ उच्छिष्ट तीं फळें खाय भिल्लटीचीं । आवडी तयांची मोठी देवा ॥ध्रु.॥ काय देवा घरीं न मिळेची अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥२॥ अर्जुनाचीं घोडीं धुतलीं अनंतें । संकटें बहुतें निवारिलीं ॥३॥ तुका म्हणे ऐसीं आवडती लडिवाळें । जाणीवेचें काळें तोंड देवा ॥४॥

2567 " भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त ॥१॥ तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥ध्रु.॥ आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥२॥ मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ॥३॥ वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥४॥ तुका म्हणे फार । थोडा तरी पर उपकार ॥५॥

2568 " भिक्षापत्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऐसियासी नारायणें । उपेक्षीजे सर्वथा ॥१॥ देवा पायीं नाहीं भाव । भक्ति वरी वरी वाव । समर्पिला जीव । नाहीं तो हा व्यभिचार ॥ध्रु.॥ जगा घालावें सांकडें । दीन होऊनि बापुडें । हें चि अभाग्य रोकडें । मूळ आणि विश्वास ॥२॥ काय न करी विश्वंभर । सत्य करितां निर्धार । तुका म्हणे सार । दृढ पाय धरावे ॥३॥

2569 " भीमातिरींचा नाटक । यानें लावियेलें चेटक ॥१॥ मन बुद्धि जाली ठक । नेणे संसाराची टुक ॥ध्रु.॥ कैशी प्रसंगीक वाणी । प्रत्यादर कडसणी ॥२॥ तुका म्हणे मोठा ठक । जेथें तेथें उभा ठाके ॥३॥

2570 " भीमातीरवासी । तेथें नश्चियेंसी काशी ॥१॥ मुख्यमुक्तीचें माहेर । ऐसें जाणा पंढरपुर ॥ध्रु.॥ घडे भींवरेशीं स्नान । त्यासि पुन्हा नाहीं जन्म ॥२॥ भाव धरोनि नेटका । मोक्ष जवळी म्हणे तुका ॥३॥

2571 " भीस्त न पावे मालथी । पढीया लोक रिझाये । निचा जथें कमतरिण । सो ही सो फल खाये ॥१॥

2572 " भुंकुनियां सुनें लागे हस्तीपाठी । होऊनि हिंपुटी दुःख पावे ॥१॥ काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे ॥ध्रु.॥ मातलें बोकड विटवी पंचानना । घेतलें मरणा धरणें तें ॥२॥ तुका म्हणे संतां पीडितील खळ । घेती तोंड काळें करूनियां ॥३॥

2573 " भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥१॥ हे तों चाळवाचाळवी । केलें आपण चि जेवी ॥ध्रु.॥ नैवेद्याचा आळ । वेच ठाकणीं सकळ ॥२॥ तुका म्हणे जड । मज न राखावें दगड ॥३॥

2574 " भुिH मुक्ति तुझें जळों ब्रम्हज्ञान । दे माझ्या आणोनी भावा वेगीं ॥१॥ रद्धिी सिद्धी मोक्ष ठेवीं गुंडाळून । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥ध्रु.॥ नको आपुलिया नेऊं वैकुंठासी । दे माझ्या भावासी आणुन वेगीं ॥२॥ नको होऊं कांहीं होसील प्रसन्न । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥३॥ तुकयाबंधु म्हणे पाहा हो नाहींतरी । हत्या होईंल शिरीं पांडुरंगा ॥४॥

2575 " भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती । करवी फजीती । हांवें भार वाढला ॥१॥ कुळिकेसी लांस फांस । डोईं दाढी बोडवी दोष । अविहितनाश । करवी वजन चुकतां ॥ध्रु.॥ विधिसेवनें विहितें । कार्यकारणापुरतें । न वाटे तो चित्तें । अधमांच्या तो त्यागी ॥२॥ आज्ञापालणें ते सेवा । भय धरोनियां जीवा । तुका म्हणे ठेवा । ठेविला तो जतन ॥३॥

2576 " भूत नावरे कोणासी । पुंडलीकें खिळिलें त्यासी ॥१॥ समचरण असे विटे । कटिकर उभें नीट ॥ध्रु.॥ वाळुवंटीं नाचती संत । प्रेमामृतें डुल्लत ॥२॥ तुका म्हणे पुंडलीका । भक्तिबळें तूं चि निका ॥३॥

2577 " भूत भविष्य कळों यावें वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥१॥ आम्हीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धें ॥ध्रु.॥ जगरूढीसाटीं घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥२॥ तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धिसिद्धी ॥३॥

2578 " भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारीं सर्वभावें ॥१॥ शिकल्या बोलाचा धरीसील ताठा । तरी जासी वाटा यमपंथें ॥ध्रु.॥ हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परी जन संतां तैसी ॥२॥ सरितां वाहाळां गंगे सागरा समान । लेखी तयाहून अधम नाहीं ॥३॥ आणीक अमुप होती तारांगणें । रविशशिमानें लेखूं नये ॥४॥ तुका म्हणे नाहीं नरमता अंगी । नव्हे तें फिरंगी कठिण लोह ॥५॥

2579 " भूतबाधा आम्हां घरीं । हें तों आश्चर्य गा हरी ॥१॥ जाला भक्तीचा कळस । आले वस्तीस दोष ॥ध्रु.॥ जागरणाचें फळ । दिली जोडोनि तळमळ ॥२॥ तुका म्हणे देवा । आहाच कळों आली सेवा ॥३॥

2580 " भूतांचिये नांदे जीवीं । गोसावी च सकळां ॥१॥ क्षणक्षणां जागा ठायीं । दृढ पायीं विश्वास ॥ध्रु.॥ दावूनियां सोंग दुजें । अंतर बीजें वसतसे ॥२॥ तुका म्हणे जाणे धने । धरी तें वर्म चिंतन ॥३॥

2581 " भूतीं देव म्हणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी ॥१॥ जाणे भाव पांडुरंग अंतरींचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥ध्रु.॥ दयेसाटीं केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नाव कथा ॥२॥ तुका म्हणे नाहीं पडत उपवास । फिरतसे आस धरोनियां ॥३॥

2582 " भूतीं भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला ॥१॥ ऐसीं गर्जती पुराणें । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणें । अनुभवें निर्भर ॥ध्रु.॥ माझें तुझें हा विकार । निरसतां एकंकार । न लगे कांहीं फार । विचार चि करणें ॥२॥ तुका म्हणे दुजें । हें तों नाहीं सहजें । संकल्पाच्या काजें । आपें आप वाढलें ॥३॥

2583 " भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥१॥ तैसे वोसपले जीव । सांडी नसतां अंगीं घाव ॥ध्रु.॥ जीव अवघे देव । खोटा नागवी संदेह ॥२॥ तुका म्हणे शुद्ध । मग तुटलिया भेद ॥३॥

2584 " भूमीवरि कोण ऐसा । गांजूं शके हरिच्या दासा ॥१॥ सुखें नाचा हो कीर्त्तनीं । जयजयकारें गर्जा वाणी ॥ध्रु.॥ काळा सुटे पळ । जाती दुरितें सकळ ॥२॥ तुका म्हणे चित्तीं । सांगूं मानाची हे निति ॥३॥

2585 " भेटीची आवडी उतावळि मन । लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥१॥ आतां आवडीचा पुरवावा सोहळा । येऊनी गोपाळा क्षेम देई ॥ध्रु.॥ नेत्र उन्मळित राहिले ताटस्त । गंगा अश्रुपात वहावली ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा साचपणा । मुळींच्या वचना आपुलिया ॥३॥

2586 " भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥ पूर्णिमेचा चंद्र चकोराचें जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥ दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥ भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥३॥ तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥४॥

2587 " भेटीलागीं पंढरिनाथा । जीवीं लागली तळमळ व्यथा ॥१॥ कैं कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥ सीणलें माझें मन । वाट पाहातां लोचन ॥२॥ तुका म्हणे भूक । तुझें पाहावया मुख ॥३॥

2588 " भेटीवांचोनियां दुजें नाहीं चित्तीं । येणें काकुलती याजसाटीं ॥१॥ भेटोनियां बोलें आवडीचें गुज । आनंदाच्या भोजें जेवूं संगें ॥ध्रु.॥ मायलेकरासीं नाहीं दुजी परि । जेऊं बरोबरी बैसोनियां ॥२॥ तुका म्हणे ऐसें अंतरींचें आर्त । यावें जी त्वरित नारायणा ॥३॥

2589 " भेणें पळे डोळसा । न कळे मृत्यु तो सरिसा ॥१॥ कैसी जाली दिशाभुली । न वजातिये वाटे चाली ॥ध्रु.॥ संसाराची खंती । मावळल्या तरी शिक्त ॥२॥ तुका म्हणे हीणा । बुद्धि चुकली नारायणा ॥३॥

2590 " भेद तुटलियावरी । आम्ही तुमचीं च हो हरी ॥१॥ आतां पाळावे पाळावे । आम्हां लडिवाळांचे लळे ॥ध्रु.॥ आणिकांची देवा । नाहीं जाणत चि सेवा ॥२॥ तुका म्हणे हेवा । माझा हेत पायीं देवा ॥३॥

2591 " भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवा रे आतां नारायण ॥१॥ येणें एक केलें अवघें होय सांग । अच्युताच्या योगें नामें छंदें ॥ध्रु.॥ भोंवरे खळाळ चोर वाटा घेती । पावल मारिती सिवेपाशीं ॥२॥ तुका म्हणे येथें भावेंविण पार । न पविजे सार हें चि आहे ॥३॥

2592 " भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥१॥ मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें ॥ध्रु.॥ तिमयाचा बैल करी सिकविलें । चित्रींचें बाहुलें गोष्टी सांगे ॥२॥ तुका म्हणे देवा जळो हे महंती । लाज नाहीं चित्ती निसुगातें ॥३॥

2593 " भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥ भर्ता आणि भोक्ता कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥ विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राम्हणांची ॥२॥ कवळोकवळीं नाम घ्या गोविंदाचें । भोजन भक्तांचें तुका म्हणे ॥३॥

2594 " भोग तो न घडे संचितावांचूनि । करावें तें मनीं समाधान ॥१॥ म्हणऊनी मनीं मानूं नये खेदु । म्हणावा गोविंद वेळोवेळां ॥ध्रु.॥ आणिकां रुसावें न लगे बहुतां । आपुल्या संचितावांचूनियां ॥२॥ तुका म्हणे भार घातलिया वरी । होईंल कैवारी नारायण ॥३॥

2595 " भोग द्यावे देवा । त्याग भोगीं च बरवा ॥१॥ आपण व्हावें एकीकडे । देव कळेवरी जोडे ॥ध्रु.॥ योजे यथाकाळें । उत्तम पाला कंदें मूळें ॥२॥ वंचक त्यासी दोष । तुका म्हणे मिथ्या सोस ॥३॥

2596 " भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा ॥१॥ शांती धरणें जिवासाटीं । दशा उत्तम गोमटी ॥ध्रु.॥ देह लेखावें असार । सत्य परउपकार ॥२॥ तुका म्हणे हे मिरासी । बुडी द्यावी ब्रम्हरसी ॥३॥

2597 " भोगियेल्या नारी । परि तो बाळब्रम्हचारी ॥१॥ ऐसी ज्याचें अंगीं कळा । पार न कळे वेदाला ॥ध्रु.॥ वळीवळी थोरथोर । मोडोनियां केले चूर ॥२॥ वांकडी कुबज्या । सरसी आणियेली वोजा ॥३॥ मल्ल रगडिला पायीं । गज झुगारिला बाहीं ॥४॥ जिवें मारियेला मामा । धांवें भक्ताचिया कामा ॥५॥ तुका म्हणे पूर्ण । दावी भक्तीचीं विंदानें ॥६॥

2598 " भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणीगोपाळां गाईंवत्सां ॥१॥ गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥२॥ भक्ति नवविधा तयांसि घडली । अवघीं च केली कृष्णरूप ॥३॥ रूप दाखविलें होतां भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाहीं ॥४॥ नाहीं राहों दिलें जातां निजधामा । तुका म्हणे आम्हांसहित गेला ॥५॥

2599 " भोगी जाला त्याग । गीती गातां पांडुरंग । इंद्रियांचा लाग । आम्हांवरूनि चुकला ॥१॥ करुनि ठेविलों निश्चळि । भय नाहीं तळमळ । घेतला सकळ । अवघा भार विठ्ठलें ॥ध्रु.॥ तळीं पिक्षणीचे परी । नखें चोंची चारा धरी । आणुनियां घरीं । मुखीं घाली बाळका ॥२॥ तुका म्हणे ये आवडी । आम्हीं पांयीं दिली बुडी । आहे तेथें जोडी । जन्मांतरींचें ठेवणें ॥३॥

2600 " भोजन तें पाशांतीचें । निंचें उंचें उसाळी ॥१॥ जैशी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिता ॥ध्रु.॥ कल्पना ते देवाविण । न करी भिन्न इतरीं ॥२॥ तुका म्हणे पावे भूती । ते निश्चिंती मापली ॥३॥

2601 " भोळे भक्तीभाव धरिती मानसीं । त्यासी हृषीकेशी जवळी च ॥१॥ भाव नाहीं मनीं अभाविक सदा । त्याचिया मी खेदा काय सांगों ॥ध्रु.॥ गणिकेसारिकीं नामें उद्धरीलीं । सज्ञानें पडिलीं खटाटोपीं ॥२॥ तुका म्हणे काय शुद्ध माझी जाति । थोर केली ख्याती हरिनामें ॥३॥

2602 " भोळे भाविक हे जुनाट चांगले । होय तैसें केलें भक्तिभावें ॥१॥ म्हणउनि चिंता नाहीं आम्हां दासां । न भ्यो गर्भवासा जन्म घेतां ॥ध्रु.॥ आपुलिया इच्छा करूं गदारोळ । भोगूं सर्वकाळ सर्व सुखें ॥२॥ तुका म्हणे आम्हां देवाचा सांगात । नाहीं विसंबत येर येरां ॥३॥

2603 " भोवंडींसरिसें । अवघें भोंवत चि दिसे ॥१॥ ठायीं राहिल्या निश्चळ । आहे अचळीं अचळ ॥ध्रु.॥ एक हाकेचा कपाटीं । तेथें आणीक नाद उठी ॥२॥ अभ्रें धांवे शशी । तुका असे ते तें दुसरें भासी ॥३॥

2604 " भ्रतारअंगसंगें सुखाची वेवस्था । आधीं तों सांगतां नये कोणा ॥१॥ तथापि सांगणें कुमारिकेपाशीं । ते काय मानसीं सुख मानी ॥ध्रु.॥ तैसा आत्मबोध आधीं बोलों नये । बोलासी तो काय सांपडेल ॥२॥ तथापि सांगणें बहिर्मुखापाशीं । तो काय संतोषासी मूळ होय ॥३॥ तुका म्हणे संत सुखाचे विभागी । ब्रम्हानंद जगीं साधुरूपें ॥४॥

2605 " भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥१॥ अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ध्रु.॥ जोडितसां तुम्ही खाती हेरेंचोरें । माझीं तंव पोरें हळहळीती ॥२॥ तुमची व्याली माझे डाई हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥३॥ दुष्टव्रुति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥४॥ भावा दीर कांहीं धड हा न बोले । नांदों कोणां खालें कैसी आतां ॥५॥ माझ्या अंगसंगें तुम्हांसी विश्रांति । मग धडगति नाहीं तुमची ॥६॥ ठाकतें उमकतें जीव मुठी धरूनि । परि तुम्ही अजूनि न धरा लाज ॥७॥ वेगळे निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥८॥ तुका म्हणे जाला कामाचा अंकित । सांगे मनोगत तैसा वर्ते ॥९॥

2606 " भ्रमना पाउलें वेचिलीं तीं वाव । प्रवेशतां ठाव एक द्वार ॥१॥ सार तीं पाउलें विठोबाचीं जीवीं । कोणीं न विसंभावीं क्षणभरि ॥ध्रु.॥ सुलभ हें केलें सकळां जीवन । फुंकावे चि कान न लगेसें ॥२॥ तुका म्हणे येथें सकळ ही कोड । पुरे मूळ खोड विस्ताराचें ॥३॥

2607 " मंगळाचा मंगळ सांटा । विट तोटा नेणे तें ॥१॥ हें भरा सातें आलें । भलें भलें म्हणवावें ॥ध्रु.॥ जनीं जनार्दन वसे । येथें दिसे तें शुद्ध ॥२॥ तुका म्हणे बहुतां मुखें । खरें सुखें ठेवावें ॥३॥

2608 " मंत्र चळ पिसें लागतें सत्वर । अबद्ध ते फार तरले नामें ॥१॥ आशोचे तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ॥ध्रु.॥ रागज्ञानघात चुकतां होय वेळ । नाम सर्वकाळ शुभदायक ॥२॥ आणिकां भजना बोलिला निषेध । नाम तें अभेद सकळां मुखीं ॥३॥ तुका म्हणे तपें घालिती घालणी । वेश्या उद्धरूनि नेली नामें ॥४॥

2609 " मंत्रयंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ॥१॥ राम कहे त्याके पगहूं लागूं । देखत कपट अमिमान दुर भागूं ॥ध्रु.॥ अधिक याती कुलहीन नहिं ज्यानु । ज्याणे नारायन सो प्राणी मानूं ॥२॥ कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिंहु बलियारी ॥३॥

2610 " मज अंगाच्या अनुभवें । काईं वाईंट बरें ठावें ॥१॥ जालों दोहींचा देखणा । नये मागें पुढें ही मना ॥ध्रु.॥ वोस वसती ठावी । परि हे चाली दुःख पावी ॥२॥ तुका म्हणे घेऊं देवा । सवें करूनि बोळावा ॥३॥

2611 " मज अनाथाकारणें । करीं येणें केशवा ॥१॥ जीव झुरे तुजसाटीं । वाट पोटीं पहातसें ॥ध्रु.॥ चित्त रंगलें चरणीं । तुजवांचूनि न राहे ॥२॥ तुका म्हणे कृपावंत । माझी चिंता असावी ॥३॥

2612 " मज अभयदान देईं दातारा । कृपेच्या सागरा मायबापा ॥१॥ देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांहीं दुजें नेणें ॥ध्रु.॥ सेवाभक्तिहीन नेणता पतित । आतां माझे हित तुझ्या पायीं ॥२॥ तुका म्हणे माझें सर्व ही साधन । नाम संकीर्तन विठोबाचें ॥३॥

2613 " मज ऐसें कोण उद्धरिलें सांगा । ब्रीदें पांडुरंगा बोलतसां ॥१॥ हातींच्या कांकणां कायसा आरिसा । उरलों मी जैसा तैसा आहें ॥ध्रु.॥ धनमंत्री हरी रोग्याचिये वेथे । तें तों कांहीं येथें न देखिजे ॥२॥ तुका म्हणे नाहीं अनुभव अंगें । वचन वाउगें कोण मानी ॥३॥

2614 " मज कांहीं सीण न व्हावा यासाटीं । कृपा तुम्हां पोटीं उपजलीं ॥१॥ होतें तैसें केलें आपलें उचित । शिकविलें हित बहु बरें ॥ध्रु.॥ आम्ही न मनावी कोणाची आशंका । तुम्हां भय लोकां आहे मनीं ॥२॥ तुका म्हणे आतां संचिताचा ठेवा । वोडवला घ्यावा जैसा तैसा ॥३॥

2615 " मज कोणी कांहीं करी । उमटे तुमचे अंतरीं ॥१॥ व्याला वाडविलें म्हुण । मज सुख तुज सीण ॥ध्रु.॥ माझें पोट धालें । तुझे अंगीं उमटलें ॥२॥ तुका म्हणे खेळें । तेथें तुमचिया बळें ॥३॥

2616 " मज त्याची भीड नुलंघवे देवा । जो म्हणे केशवा दास तुझा ॥१॥ मज आवडती बहु तैसे जन । करिती कीर्तन कथा तुझी ॥ध्रु.॥ सांडूनियां लाज नाचेन त्यांपुढें । आइकती कोडें नाम तुझें ॥२॥ न लगे उपचार होईंन भिकारी । वैष्णवांच्या घरीं उष्टावळी ॥३॥ तुका म्हणे जाणों उचित अनुचित । विचारूनि हित तें चि करूं ॥४॥

2617 " मज नष्टा माया मोह नाहीं लोभ । अधिक हो क्षोभ आदराचा ॥१॥ धिग हें शरीर अनउपकार । न मनी आभार उपकाराचा ॥ध्रु.॥ मजहून नष्ट आहे ऐसा कोण । नावडे मिष्टान्न बहुमोल ॥२॥ न दिसती मज आपलेसे गुण । संचित तें कोण जाणे मागें ॥३॥ तुका म्हणे देखोनियां काईं । पांडुरंगा पायीं राखियेलें ॥४॥

2618 " मज नाहीं कोठें उरला दुर्जन । मायबापाविण ब्रम्हांडीं हें ॥१॥ कासया जिकीर करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता खंती ॥ध्रु.॥ विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । संत नेती चाली आपुलिया ॥२॥ तुका म्हणे माझें पाळणें पोषणें । करी नारायण सर्वस्वेंसी ॥३॥

2619 " मज नाहीं तुझ्या ज्ञानाची ते चाड । घेतां वाटे गोड नाम तुझें ॥१॥ नेणतें लेंकरूं आवडीचें तान्हें । बोलतों वचनें आवडीनें ॥ध्रु.॥ भक्ती नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाईं भार तुज ॥२॥ तुका म्हणे नाचें निर्लज्ज होऊनि । नाहीं माझे मनीं दुजा भाव ॥३॥

2620 " मज नाहीं धीर । तुम्ही न करा अंगीकार ॥१॥ ऐसें पडिलें विषम । बळी देवाहूनि कर्म ॥ध्रु.॥ चालों नेणें वाट । केल्या न पवा बोभाट ॥२॥ वेचों नेणे जीवें । तुका उदास धरिला देवें ॥३॥

2621 " मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥१॥ कोणाचा कोणासीं न धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ध्रु.॥ काढा काढा जी मोह बुंथा जाळ । नका लावूं बळें वेड आम्हां ॥२॥ जीव शिव कां ठेवियेलीं नांवें । सत्य तुम्हां ठावें असोनियां ॥३॥ सेवेच्या अभिळासें न धरा चि विचार । आम्हां दारोदार हिंडविलें ॥४॥ आहे तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दुरी दुजेपण ॥५॥ तुका म्हणे काय छायेचा अभिलाष । हंस पावे नाश तारागणीं ॥६॥

2622 " मज माझा उपदेश । आणिकां नये याचा रीस ॥१॥ तुम्ही अवघे पांडुरंग । मी च दुष्ट सकळ चांग ॥ध्रु.॥ तुमचा मी शरणागत । कांहीं करा माझें हित ॥२॥ तुका पाय धरी । मी हें माझें दुर करीं ॥३॥

2623 " मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ती वाटतसें ॥१॥ याचा कांहीं तुम्हीं देखा परिहार । सर्वज्ञ उदार पांडुरंगा ॥ध्रु.॥ काम क्रोध नाहीं सांडिलें आसन । राहिले वसोन देहामध्यें ॥२॥ तुका म्हणे आतां जालों उतराईं । कळों यावें पायीं निरोपिलें ॥३॥

2624 " मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥१॥ तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥ वाहों तुझा भार । दुःख साहोनि अपार ॥२॥ तुका म्हणे नाहीं भेद । देवा करूं नये वाद ॥३॥

2625 " मजुराचें पोट भरे । दाता उरे संचला ॥१॥ या रे या रे हातोहातीं । काय माती सारावी ॥ध्रु.॥ रोजकीर्दी होतां झाडा । रोकडा चि पर्वत ॥२॥ तुका म्हणे खोल पाया । वेचों काया क्लेशेसीं ॥३॥

2626 " मणि पडिला दाढेसी मकरतोंडीं । सुखें हस्तें चि काढवेल प्रौढीं ॥१॥ परि मूर्खाचें चत्ति बोधवेना । दुधें कूर्मीच्या पाळवेल सेना ॥ध्रु.॥ सकळ पृथ्वी हिंडतां कदाचित । ससीसिंगाची प्राप्त होय तेथें ॥२॥ अतिप्रयत्नें गाळितां वाळुवेतें । दिव्य तेलाची प्राप्त होय तेथें ॥३॥ अतिक्रोधें खवळला फणी पाही । धरूं येतो मस्तकीं पुष्पप्रायी ॥४॥ पहा ब्रम्हानंदें चि एकीं हेळा । महापातकी तो तुका मुक्त केला ॥५॥

2627 " मतिविण काय वर्णू तुझें ध्यान । जेथें पडिलें मौन्य वेदश्रुती ॥१॥ करूनि गोजिरा आपुलिये मती । धरियेलें चित्तीं चरणकमळ ॥ध्रु.॥ सुखाचें ओतिलें पाहों ते श्रीमुख । तेणें हरे भूक तान माझी ॥२॥ रसना गोडावली ओव्या गातां गीत । पावलेंसे चित्त समाधान ॥३॥ तुका म्हणे माझी दृष्टि चरणांवरी । पाउलें गोजिरीं कुंकुमाचीं ॥४॥

2628 " मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथिवीचा भार वाहावया ॥१॥ काय धाक आम्हां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु.॥ शंखचक्रगदा आयुधें अपार । वागवितो भार भक्तांसाटीं ॥२॥ पांडवां जोहरी राखिलें कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥३॥

2629 " मथनासाटीं धर्माधर्म । त्याचें वर्म नवनीत ॥१॥ तें चि तें घाटूं नये । आलें जाय नासूनि ॥ध्रु.॥ सांभाळावें वरावर । वर्म दूर न वजावें ॥२॥ तुका म्हणे घालें पोट । मग बोटचांचणी ॥३॥

2630 " मथनीचें नवनीत । सर्व हितकारक ॥१॥ दंडवत दंडा परी । मागें उरी नुरावी ॥ध्रु.॥ वचनाचा तो पसरुं काईं । तांतडी डोईंपाशींच ॥२॥ तुका म्हणे जगजेठी । लावीं कंठीं उचलूनि ॥३॥

2631 " मथनें भोगे सार । ताकें घडे उपकार ॥१॥ बरवी सायासाची जोडी । अनुभविया ठावी गोडी ॥ध्रु.॥ पाक आणि रुचि । जेथें तेथें ते कइंची ॥२॥ वाढितो पंगती । तुका आवडी संगती ॥३॥

2632 " मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां ॥१॥ तुमचे कृपेचें पोसनें । माझा समाचार घेणें ॥ध्रु.॥ नाम धरिलें कंठीं । असें आर्तभूत पोटीं ॥२॥ जीवींचें ते जाणा । तुका म्हणे नारायणा ॥३॥

2633 " मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी ॥१॥ आतां शिकवावा कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट ॥ध्रु.॥ आलें अंगासी तें बळिवंत गाढें । काय वेड्यापुढें धर्मनीत ॥२॥ तुका म्हणे कळों येईंल तो भाव । अंगावरिल घाव उमटतां ॥३॥

2634 " मधुरा उत्तरासवें नाहीं चाड । अंतरंगीं वाड भाव असो ॥१॥ प्राणावेगळा न करी नारायण । मग नसो ज्ञान मूर्ख बरा ॥ध्रु.॥ जननिंदा होय तो बरा विचार । थोरवीचा भार कामा नये ॥२॥ तुका म्हणे चित्तीं भाव निष्टावंत । दया क्षमा शांत सर्वां भूतीं ॥३॥

2635 " मन उतावळि । जालें न राहे निश्चळ ॥१॥ दे रे भेटी पंढरिराया । उभारोनि चारी बाह्या ॥ध्रु.॥ सर्वांग तळमळी । हात पाय रोमावळी ॥२॥ तुकयाबंधु म्हणे कान्हा । भूक लागली नयना ॥३॥

2636 " मन जालें भाट । कीर्ति मुखें घडघडाट । पडियेली वाट । ये चि चाली स्वभावें ॥१॥ बोलें देवाचे पवाडे । नित्य नवे चि रोकडे । ज्या परी आवडे । तैसा तैसा करूनि ॥ध्रु.॥ रोखीं रहावें समोर । पुढें मागें चाले भार । करावें उत्तर । सेवा रुजू करूनि ॥२॥ पूर वर्षला देकारें । संतोषाच्या अभयें करें । अंगींच्या उत्तरें । तुकया स्वामी शृंगारी ॥३॥

2637 " मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥ आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥ धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी । केलें तडातडी चत्ति माझें ॥२॥ तुका म्हणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥३॥

2638 " मना एक करीं । म्हणे जाईंन पंढरी । उभा विटेवरी । तो पाहेन सांवळा ॥१॥ करीन सांगती तें काम । जरी जपसी हें नाम । नित्य वाचे राम । हरि कृष्ण गोविंदा ॥ध्रु.॥ लागें संतांचिया पायां । कथे उल्हास गावया । आलों मागावया । शरण देई उचित ॥२॥ नाचें रंगीं वाहें टाळी । होय सादर ते काळीं । तुका म्हणे मळी । सांडूनियां अंतरी ॥३॥

2639 " मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धिटपणें सलगी देवा ॥१॥ वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भक्ति नेणें भाव नाहीं मनीं ॥२॥ नाहीं जालें ज्ञान पाहिलें अक्षर । मानी जैसें थोर थोरी नाहीं ॥३॥ नाहीं मनीं लाज धरिली आशंका । नाहीं भ्यालों लोकां चतुरांसि ॥४॥ चतुरांच्या राया मी तुझें अंकित । जालों शरणागत देवदेवा ॥५॥ देवा आतां करीं सरतीं हीं वचनें । तुझ्या कृपादानें बोलिलों तीं ॥६॥ तुझें देणें तुझ्या समर्पूनि पायीं । जालों उतरायी पांडुरंगा ॥७॥ रंकाहुनि रंक दास मी दासांचें । सामर्थ्य हें कैचें बोलावया ॥८॥ बोलावया पुरे वाचा माझी कायी । तुका म्हणे पायीं ठाव द्यावा ॥९॥

2640 " मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी । असे हीत माझें तुज कांहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हें पायिं सूख ॥१॥ ऐसा सर्वभावें तुज शरण आलों । देहदुःख हें भोगितां फार भ्यालों । भवतारितें दूसरें नाहिं कोणी । गुरु होत कां देव तेहतीस तीन्ही ॥२॥ जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती ते चि सोये । करीं सर्व संगी परि त्यागु ठायीं । तुका विनवीतो मस्तक ठेवुनि पायीं ॥३॥

2641 " मनाचिये साक्षी जाली सांगों मात । सकळ वृत्तांत आपला तो ॥१॥ तुम्हां परामृश घेणें सत्ताबळें । धरितां निराळें कैसीं वांचों ॥ध्रु.॥ मी माझें सांडून यावया पसारा । आणीक दातारा काय काज ॥२॥ तुका म्हणे आम्ही तुजविण एका । निढळें लौकिका माजी असों ॥३॥

2642 " मनीं भाव असे कांहीं । तेथें देव येती पाहीं ॥१॥ पाहा जनाई सुंदरी । तेथें देव पाणी भरी ॥ध्रु.॥ शुद्ध पाहोनियां भाव । त्याचे हृदयीं वसे देव ॥२॥ तुका म्हणे विठोबासी । ठाव देई चरणापासीं ॥३॥

2643 " मनें हरिरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥ यांच्या भ्रतारांचीं धरूनियां रूपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥२॥ करी कवतुक त्याचे तयापरी । एकां दिसे हरि एकां लेंक ॥३॥ एक भाव नाहीं सकळांच्या चित्ती । म्हणऊनि प्रीति तैसें रूप ॥४॥ रूप याचें आहे अवघें चि एक । परि कवतुक दाखविलें ॥५॥ लेंकरूं न कळे स्थूल कीं लहान । खेळे नारायण कवतुकें ॥६॥ कवतुक केलें सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥७॥

2644 " मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥ रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥ सीण जाला वसुदेवदेवकीस । वधी बाळें कंस दुराचारी ॥३॥ दुराचारियासी नाहीं भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥ पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥ गर्भासी तयांच्य आला नारायण । तुटलें बंधन आपेंआप ॥६॥ आपेंआप बेड्या तुटल्या शंकळा । बंदाच्या आगळा किलिया कोंडे ॥७॥ कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष्य नलगतां ॥८॥ न कळे तो त्यासी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥९॥ नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं जाला गोवा सवें देव ॥१०॥ सवें देव तया आड नये कांहीं । तुका म्हणे नाहीं भय चिंता ॥११॥

2645 " मरण माझें मरोन गेलें । मज केलें अमर ॥१॥ ठाव पुसिलें बुड पुसिलें । वोस वोसलें देहभावा ॥ध्रु.॥ आला होता गेला पूर । धरिला धीर जीवनीं ॥२॥ तुका म्हणे बुनादीचें । जालें साचें उजवणें ॥३॥

2646 " मरणा हातीं सुटली काया । विचारें या निश्चयें ॥१॥ नासोनियां गेली खंती । सहजिस्थति भोगाचे ॥ध्रु.॥ न देखें सें जालें श्रम । आलें वर्म हाता हें ॥२॥ तुका म्हणे कैची कींव । कोठें जीव निराळा ॥३॥

2647 " मरोनि जाईंन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥१॥ चुकविलीं दुःखें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु.॥ केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंतातळमळ नाहीं ऐसी ॥२॥ काळें तोंड काळ करूनि राहिलें । भूतमात्र जालें सज्जनसखें ॥३॥ तुकयाबंधु म्हणें अवघ्या देशदिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्यें ॥४॥

2648 " मरोनियां गेली माया । मग तया कोण पुसे ॥१॥ पोरटियांची दाद कोणा । ऐसा जाना प्रवाहो ॥ध्रु.॥ निढळास निढळ जोडा । होय कोडा कवतुका ॥२॥ तुका म्हणे देवाऐसी । आहों सरसीं आपण ॥३॥

2649 " मविलें मविती । नेणों रासी पडिल्या किती ॥१॥ परि तूं धाला चि न धासी । आलें उभाउभीं घेसी ॥ध्रु.॥ अवघ्यां अवघा काळ । वाटा पाहाती सकळ ॥२॥ तुका म्हणे नाहीं । अराणूक तुज कांहीं ॥३॥

2650 " मस्तकीं सहावें ठांकियासी जाण । तेव्हां देवपण भोगावें गा ॥१॥ आपुलिये स्तुती निंदा अथवा मान । टाकावा थुंकोन पैलीकडे ॥ध्रु.॥ सद्ग‍ुसेवन तें चि अमृतपान । करुनी प्राशन बैसावें गा ॥२॥ आपुल्या मस्तकीं पडोत डोंगर । सुखाचें माहेर टाकुं नये ॥३॥ तुका म्हणे आतां सांगूं तुला किती । जिण्याची फजीती करूं नये ॥४॥

2651 " महा जी महादेवा महाकाळमर्दना । मांडियेलें उग्रतप महादीप्त दारुणा । परिधान व्याघ्रांबर चिदाभस्मलेपना । स्मशान क्रीडास्थळ तुम्हा जी त्रिनयना ॥१॥ जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा । आरती ओंवाळिन कैवल्यदातारा । जय. ॥ध्रु.॥ रुद्र हें नाम तुम्हां उग्र संहारासी । शंकर शिव भोळा उदार सर्वस्वीं । उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देसी । आपुलें पद दासां ठाव देई कैलासीं ॥२॥ त्रैलोक्यव्यापका हो जन आणि विजन । विराटस्वरूप हें तुझें साजिरें ध्यान । करितो वेद स्तुती कीर्ती मुखें आपण । जाणतां नेणवे हो तुमचें महिमान ॥३॥ बोलतां नाम महिमा असे आश्चर्य जगीं । उपदेश केल्यानंतरें पापें पळती वेगीं । हरहर वाणी गर्जे प्रेम संचरे अंगीं । राहिलि दृष्टी चरणीं रंग मीनला रंगीं ॥४॥ पुजूनि लिंग उभा तुका जोडोनी हात । करिती विज्ञापना परिसावी हे मात । अखंड राहूं द्यावें माझें चरणीं चत्ति । घातले साष्टांग मागे मस्तकीं हात ॥५॥

2652 " महुरा ऐसीं फळें नाहीं । आलीं कांहीं गळती ॥१॥ पक्वदशे येती थोडीं । नास आढी वेचे तो ॥ध्रु.॥ विरुळा पावे विरुळा पावे । अवघड गोवे सेवटाचे ॥२॥ उंच निंच परिवार देवी । धन्या ठावी चाकरी ॥३॥ झळके तेथें पावे आणी । ऐसे क्षणी बहु थोडे ॥४॥ पावेल तो पैल थडी । म्हणों गडी आपुला ॥५॥ तुका म्हणे उभार्‍यानें । कोण खरें मानितसे ॥६॥

2653 " मांस खातां हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला ॥१॥ कोण त्याची करिल कींव । जीवें जीव नेणती ॥ध्रु.॥ पुढिलांसाटीं पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ॥२॥ तुका म्हणे कुटिती हाडें । आपुल्या नाडें रडती ॥३॥

2654 " माउलीची चाली लेंकराचे ओढी । तयालागीं काढी प्राणें प्रीती ॥१॥ ऐसी बळिवंत आवडी जी देवा । संतमहानुभावा विनवितों ॥ध्रु.॥ मोहें मोहियेलें सर्वकाळ चित्त । विसरु तो घेत नाहीं क्षणें ॥२॥ तुका म्हणे दिला प्रेमाचा वोरस । सांभाळिलें दास आपुलें तें ॥३॥

2655 " माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी ताहानें ॥१॥ अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ध्रु.॥ मायबापाची उपमा। तुज देऊं मेघश्यामा ॥२॥ ते ही साजेना पाहातां । जीवलगा पंढरिनाथा ॥३॥ माय पाळी संसारीं । परलोक राहे दुरी ॥४॥ तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥५॥ तुका म्हणे नारायणा । तुम्हां बहुत करुणा ॥६॥

2656 " माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता निराळा वरील सारी ॥१॥ एका रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥ध्रु.॥ सुनियांसी क्षीर वाढिल्या ओकवी । भोगित्यां पोसवी धणीवरी ॥२॥ तुका म्हणे भार वागविती मूर्ख । नेतील तें सार परीक्षक ॥३॥

2657 " मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥१॥ या संतांसी निरवीं हें मज देई । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥२॥ तुका म्हणे आतां उदार होई । मज ठेवीं पायीं संतांचिया ॥३॥

2658 " मागणें तें मागों देवा । करूं भक्ति त्याची सेवा ॥१॥ काय उणे तयापाशीं । रिद्धिसिद्धी ज्याच्या दासी ॥ध्रु.॥ कायावाचामन । करूं देवा हें अर्पण ॥२॥ तुका म्हणे विश्वंभर । ज्याच्यानें हें चराचर ॥३॥

2659 " मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देई मज हरी कृपादान ॥१॥ प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥ सर्वभावें शरण आलों पांडुरंगा । कृपाळु तूं जगामाजी एक ॥२॥ तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥३॥ संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें ॥४॥ तुका म्हणे आतां तुझा शरणागता । करावें सनाथ मायबापा ॥५॥

2660 " मागतां विभाग । कोठें लपाल जी मग ॥१॥ संत साक्षी या वचना । त्यांसी ठाउकिया खुणा ॥ध्रु.॥ होइन धरणेकरी । मग मी रिघों नेदीं बाहेरी ॥२॥ तुका म्हणे मी अक्षर । तुज देवपणाचा भार ॥३॥

2661 " मागतियाचे दोनि च कर । अमित भांडार दातियाचें ॥१॥ काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥ एकें सांटवणें प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे भागली करितां माप ॥२॥ तुका म्हणे आतां आहे तेथें असो । अंखुनियां बैसों पायांपाशीं ॥३॥

2662 " मागत्याची कोठें घडते निरास । लेंकरा उदास नाहीं होतें ॥१॥ कासया मी होऊं उतावीळ जीवीं । जाणता गोसावी सर्व आहे ॥ध्रु.॥ जाला तरी वेळ कवतुकासाटीं । निर्दया तों पोटीं उपजेना ॥२॥ तुका म्हणे त्यासी ठाउकें उचित । होईंल संकेत नेमियेला ॥३॥

2663 " मागत्याची टाळाटाळी । झिंझ्या वोढूनि कपाळीं ॥१॥ ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥ध्रु.॥ नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥२॥ तुका म्हणे जाला । उशीर नाहीं तो विठ्ठला ॥३॥

2664 " मागितल्यास आस करा । उरी धरा कांहींबाहीं ॥१॥ म्हणऊनि सारिली आस । होती यास मूळ तें ॥ध्रु.॥ माझ्या मोहें तुज पान्हा । लोटे स्तना वोरस ॥२॥ तुका म्हणे आळवणे । माझ्या देणें उत्तर ॥३॥

2665 " मागितल्यास कर पसरी । पळतां भरी वाखती ॥१॥ काय आम्ही नेणों वर्म । केला श्रम नेणतां ॥ध्रु.॥ बोलतां बरें येतां रागा । कठीण लागा मागेंमागें ॥२॥ तुका म्हणे येथें बोली । असे चाली उफराटी ॥३॥

2666 " मागील ते आटी येणें घडे सांग । सुतवेल अंग एका सूत्रें ॥१॥ पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते उपचार ते ॥ध्रु.॥ आवश्यक तेथें आगळा आदर । चाली थोडें फार संपादतें ॥२॥ तुका म्हणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हातां आल्या ॥३॥

2667 " मागील विसर होईंल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥१॥ दोहींचें अहिक्य घालीं गडसंदीं । स्थिरावेल बुद्धि पायांपाशीं॥ध्रु.॥ अहाच या केलों देहपरिचारें । तुमचें तें खरें वाटों नये ॥२॥ तुका म्हणे व्हावें लवकरी उदार । मी आहें सादर प्रतिग्रहासी ॥३॥

2668 " मागें असताशी कळला । उमस घेऊं नसता दिला। तेणें चि काळें केला । असता अवघा निवाडा ॥१॥ इतका न लगता उशीर । न धरितों भीडभार । सद्धिासी वेव्हार । कासयासी लागला ॥ध्रु.॥ असोनियां माल खरा । किती केल्या येरझारा । धरणें ही दिवस तेरा । माझ्या भावें घेतलें ॥२॥ अझुन तरी इतक्यावरी । चुकवीं जनाचार हरी । तुकयाबंधु म्हणे उरी । नाहीं तरी नुरे कांहीं ॥३॥

2669 " मागें चिंता होती आस । केला नास या काळें ॥१॥ तुम्ही आम्हां उदासीन । भिन्नाभिन्न वारिलें ॥ध्रु.॥ मोहजाळें दुःख वाढे । ओढे ओढे त्यास तें ॥२॥ तुका म्हणे कोण देवा । आतां हेवा वाढवी ॥३॥

2670 " मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥१॥ ऐसें गोही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ध्रु.॥ पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥२॥ तुका म्हणे जाली कोंबड्याची परी । पुढें चि उकरी लाभ नेणें ॥३॥

2671 " मागें पुढें जालों लाटा । अवघा मोटा सरळ ॥१॥ नाहीं कोठें रितें अंग । नित्य रंग नवा चि ॥ध्रु.॥ पोसिंद्याचे पडिलों हातीं । वोझें माती चुकली ॥२॥ जोगावलों पोटीं खर । पाठी भार वरि नाहीं ॥३॥ अवघिया मोकळ्या दिशा । नाहीं वोळसा कामाचा ॥४॥ संताचिये लोळें द्वारीं । पळती दुरी गोमाशा ॥५॥ कांहीं न साहेसा जाला । तुका नेला समर्थ ॥६॥ पातोगें महाद्वारीं । वरि झुली वाकळा ॥७॥

2672 " मागें पुढें नाहीं । दुजें यावेगळें कांहीं ॥१॥ नाहीं उरलें आणीक । केला झाडा सकळिक ॥ध्रु.॥ विश्वासावांचून । नांवें दुजियाचे शून्य ॥२॥ देवाविण कांहीं । तुका म्हणे उरी नाहीं ॥३॥

2673 " मागें बहुत जाले खेळ । आतां बळ वोसरलें ॥१॥ हालों नये चालों आतां । घट रिता पोकळ ॥ध्रु.॥ भाजल्याची दिसे घडी । पट ओढी न साहे ॥२॥ तुका म्हणे पाहतां घडी । जगा जोडी अंगारा ॥३॥

2674 " मागें बहुतां जनां राखिलें आडणी । धांवसी निर्वाणी नाम घेतां ॥१॥ ऐसें ठावें जालें मज बरव्या परी । म्हणऊनि करीं धांवा तुझा ॥ध्रु.॥ माझेविशीं तुज पडिला विसरु । आतां काय करूं पांडुरंगा ॥२॥ अझुनि कां नये तुम्हासी करुणा । दुरि नारायणा धरिलें मज ॥३॥ तुका म्हणे जीव जाऊं पाहे माझा । आतां केशीराजा घालीं उडी ॥४॥

2675 " मागें बहुतां जन्मीं हें चि करित आलों आम्ही । भवतापश्रमी दुःखें पीडिलीं निववूं त्यां ॥१॥ गर्जावे हरिचे पवाडे मिळों वैष्णव बागडे । पाझर रोकडे काढूं पाषाणामध्यें ॥ध्रु.॥ भाव शुद्ध नामावळी हषॉ नाचों पिटूं टाळी । घालूं पायां तळीं किळकाळ त्याबळें ॥२॥ कामक्रोध बंदखाणी तुका म्हणे दिले दोन्ही । इंद्रियांचे धणी आम्ही जालों गोसांवी ॥३॥

2676 " मागें शरणागत तारिले बहुत । म्हणती दीनानाथ तुज देवा ॥१॥ पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ध्रु.॥ अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरु उपमन्ये ॥२॥ गजेंद्रपशु नाडियें जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥३॥ प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत । विषाचें अमृत तुझ्या नामें ॥४॥ पांडवां संकट पडतां जडभारी । त्यांचा तू कैवारी नारायणा ॥५॥ तुका म्हणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनियां मात शरण आलों ॥६॥

2677 " मागेन तें एक तुज । देई विचारोनि मज ॥१॥ नको दुर्जनांचा संग । क्षणक्षणा चित्तभंग ॥ध्रु.॥ जन्म घेईंन मी नाना । बहु सोसीन यातना ॥२॥ रंक होईंन दीनांचा । घायें देहपात साचा ॥३॥ तुका म्हणे हें चि आतां । देई देई तूं सर्वथा ॥४॥

2678 " माझा घात पात अथवा हित फार । अवघा विचार तुझ्या हातीं ॥१॥ ठेवुनि जीव भाव तुझ्या ठायीं चित्त । राहिलों निवांत पांडुरंगा ॥ध्रु.॥ चित्ताचा चाळक बुद्धीचा जनिता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥२॥ तुका म्हणे काय करिसी तें पाहीन । ठेविसी राहीन सुखें तेथें ॥३॥

2679 " माझा तुम्ही देवा केला अंगीकार । हें मज साचार कैसें कळे ॥१॥ कां हो कांहीं माझ्या नये अनुभवा । विचारितां देवा आहें तैसा ॥ध्रु.॥ लौकिकाचा मज लाविसी आभार । शिरोरत्नभार दुःखाचा हा ॥२॥ तुका म्हणे नाहीं पालट अंतरीं । तेथें दिसे हरी ठकाठकी ॥३॥

2680 " माझा पाहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥ बोलविलें तें चि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ध्रु.॥ सोडिलिया जग निंद्य । मग गोविंद म्हणियारा ॥२॥ तुका म्हणे धीर केला । तेणें याला गोविलें ॥३॥

2681 " माझा मज नाहीं । आला उबेग तो कांहीं ॥१॥ तुमच्या नामाची जतन । नव्हतां थोर वाटे सीण ॥ध्रु.॥ न पडावी निंदा । कानीं स्वामींची गोविंदा ॥२॥ तुका म्हणे लाज । आम्हां स्वामीचें तें काज ॥३॥

2682 " माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥१॥ तीथॉ तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥२॥ तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याति ॥३॥

2683 " माझिया जीवाचा मज निरधार । न करीं उत्तर जनासवें ॥१॥ आपुलें कारण साधों जी विचार । करावा हा धीर धरूनियां ॥ध्रु.॥ काय कराविया आणिका या युक्ति । काय नव्हे भक्ती विठोबाची ॥२॥ एक पुढें गेले वाट दावूनियां । मारग तो वांयां कोण सांडी ॥३॥ तुका म्हणे माझी विठोबासी चिंता । भेईना सर्वथा न घडे तें ॥४॥

2684 " माझिया जीवासी हे चि पैं विश्रांति । तुझे पाय चत्तिीं पांडुरंगा ॥१॥ भांडवल गांठी आलें सपुरतें । समाधान चत्तिें मानियेलें ॥ध्रु.॥ उदंड उच्चारें घातला पसरु । रूपावरी भरु आवडीचा ॥२॥ तुका म्हणे मज भक्तीची आवडी । अभेदीं तांतडी नाहीं म्हुण ॥३॥

2685 " माझिया तो जीवें घेतला हा सोस । पाहें तुझी वास भेटावया ॥१॥ मातेविण बाळ न मनी आणिका । सर्वकाळ धोका स्तनपाना ॥ध्रु.॥ वोसंगा निघाल्या वांचूनि न राहे । त्याचें आर्त माय पुरवीते ॥२॥ तुका म्हणे माते भक्तां तूं कृपाळ । गिळियेले जाळ वनांतरीं ॥३॥

2686 " माझिया देहाची मज नाहीं चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥१॥ इच्छितां ते मान मागा देवापासीं । आसा संचितासी गुंपले हो ॥ध्रु.॥ देह आम्ही केला भोगाचे सांभाळीं । राहिलों निराळीं मानामानां ॥२॥ तुका म्हणे कोणें वेचावें वचन । नसतां तो सीण वाढवावा ॥३॥

2687 " माझिया मनाची बैसली आवडी । अवसान घडी एकी नेघे ॥१॥ पाय चित्तीं रूप डोळांच राहिलें । चिंतने गोविलें मुख सदा ॥ध्रु.॥ अवघियांचा जाला विसर हा मागें । वेध हा श्रीरंगें लावियेला ॥२॥ तुका म्हणे कानीं आइकली मात । तो चि जाला घात जीवपणा ॥३॥

2688 " माझिया मीपणावर पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें । पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥१॥ काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख । नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती माझें मुख ॥ध्रु.॥ काया वाचा मनें अघटित । करणें चर्मचक्षु हात पाय । निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणीक सांगों किती काय ॥२॥ लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद । पितृवचन घडली अवज्ञा अविचार। कुटिल कचर वादी निंद्य ॥३॥ आणीक किती सांगों ते अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन । भुतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट हीन ॥४॥ संत महानुभाव ऐका हें उत्तरें । अवगुण अविचारें वृद्धि पापा । तुका म्हणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ॥५॥

2689 " माझिया संचिता । दृढ देखोनि बळिवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आतां तयाच्या ॥१॥ तरि मज कळलासी । नव्हतां भेटी जाणीवेसी । एक संपादिसी । मान करिसी लोकांत ॥ध्रु.॥ तरि हें प्रारब्ध जी गाढें । कांहीं न चले तयापुढें । काय तुज म्यां कोंडें । रें सांकडें घालावें ॥२॥ भोगधीपति क्रियमाण । तें तुज नांगवे अजून । तरि का वांयांविण । तुज म्यां सीण करावा ॥३॥ तुज नव्हतां माझें कांहीं । परि मी न संडीं भक्तिसोईं । हो कां भलत्या ठायीं । कुळीं जन्म भलतैसा ॥४॥ तूं भितोसि माझिया दोषा । कांहीं मागणें ते आशा । तुका म्हणे ऐसा । कांहीं न धरीं संकोच ॥५॥

2690 " माझिये जातीचें मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥१॥ आवडे ज्या हरि अंतरापासूनि । ऐसियाचे मनीं आर्त माझें ॥ध्रु.॥ तयालागीं जीव होतो कासावीस । पाहातील वास नयन हे ॥२॥ सुफळ हा जन्म होईंल तेथून । देतां आलिंगन वैष्णवांसी ॥३॥ तुका म्हणे तो चि सुदिन सोहळा । गाऊं या गोपाळा धणीवरि ॥४॥

2691 " माझिये बुद्धीचा खुंटला उपाव । करिसील काय पाहेन तें ॥१॥ सूत्रधारी तूं हें सकळचाळिता । कासया अनंता भार वाहों ॥ध्रु.॥ वाहिले संकल्प न पवती सिद्धी । येऊं देहबुद्धीवरि नयों ॥२॥ तुका म्हणे दुःखी करिती तरंग । चिंतूं पांडुरंग आवरून ॥३॥

2692 " माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥ काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥२॥ निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥३॥ तुका म्हणे आहें पाईक चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥४॥

2693 " माझी आतां लोक सुखें निंदा करू । म्हणती विचारू सांडियेला ॥१॥ कारण होय तो करावा विचार । काय भीड भार करूं देवा ॥२॥ तुका म्हणे काय करूं लापनिक । जनाचार सुख नासिवंत ॥३॥

2694 " माझी आतां सत्ता आहे । तुम्हां पायां हे वरती ॥१॥ एकाविण नेणें दुजा । पंढरिराजा सर्वांगें ॥ध्रु.॥ पुरवावी केली आळी । जे जे काळीं मागण तें ॥२॥ तुका म्हणे सुटसी कैसा । धरूनि दिशा राहिलों ॥३॥

2695 " माझी मज जाती आवरली देवा । नव्हतां या गोवा इंद्रियांचा ॥१॥ कासया मी तुझा म्हणवितों दास । असतों उदास सर्व भावें ॥ध्रु.॥ भयाचिया भेणें धरियेली कास । न पुरतां आस काय थोरी ॥२॥ तुका म्हणे आपआपुलीं जतन । कैचें थोरपण मग तुम्हां ॥३॥

2696 " माझी मेलीं बहुवरिं । तूं कां जैसा तैसा हरी ॥१॥ विठो कैसा वांचलासि । आतां सांग मजपाशीं ॥ध्रु.॥ तुज देखतां चि माझा । बाप मेला आजा पणजा ॥२॥ आम्हां लागलेंसे पाठी । बालत्व तारुण्यें काठीं ॥३॥ तुज फावलें तें मागें । कोणी नसतां वादिलागें ॥४॥ तुका म्हणे तुझ्या अंगीं । मज देखिल लागलीं औघीं ॥५॥

2697 " माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हायेली ॥१॥ कृवाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥ केली पुरवी आळी । नव्हे निष्ठ‍ कोंवळी ॥२॥ तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥

2698 " माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न विसंभें ॥१॥ विसरतां रूप क्षण एक चत्तिीं । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥ध्रु.॥ विसरतां हरी क्षण एक घडी । अंतरली जोडी लक्षलाभ ॥२॥ तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाये । संजीवनी आहे हृदयामाजी ॥३॥

2699 " माझे अंतरींचें तो चि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥१॥ जीव भाव त्याचे ठेवियेला पायीं । मज चिंता नाहीं कवणेविशीं ॥ध्रु.॥ सुखसमारंभें संतसमागमें । गाऊं वाचे नाम विठोबाचें ॥२॥ गातां पुण्य होय आइकतां लाभ । संसारबंद तुटतील ॥३॥ तुका म्हणे जीव तयासी विकिला । आणीक विठ्ठलाविण नेणें ॥४॥

2700 " माझे तों फुकाचे कायेचे चि कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुम्हांऐसा ॥१॥ कांहीं च न वंचीं आजिचा प्रसंगीं । सकळा ही अंगीं करीन पूजा ॥ध्रु.॥ द्यावें काहीं तुम्हीं हें तों नाहीं आस । असों या उदास देहभावें ॥२॥ तुका म्हणे माझी मावळली खंती । समाधान चित्तीं सर्वकाळ ॥३॥