अभंग ५३३ देखीचा दिमाख शिकोनियां दावी

अभंग क्र.५३३
देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिर्‍याऐसी केवीं गारगोटी ।।१।।
मर्यादा ते जाणे अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकऴ मूर्ति ।।२।।
काय पडिलासी लटिक्याचे भरी ।ओवाळूनि थोरी परती सांडी ।।३।।
तुका म्हणे पुढें दिसतसे घात ।करितो फजित म्हणउनि ।।४।।

*अर्थ:*
अरे, दुसऱ्याचा पाहून केलेला बेगडी दिमाख आणि चार पुस्तके शिकून झालेले ज्ञान लोकांत बरे दाखवीत बसला आहेस.पण हे लक्षात ठेव की गारगोटी कोठे हिर्‍यासारखी होत असते काय ?।।१।।
अरे अभाग्या; सर्वांपेक्षा आपणच श्रेष्ठ आहोत असे समजू नकोस. कारण, सर्व भूते देवाच्या मूर्ती आहेत ही शास्त्रमर्यादा तू जाण.।।२।।
खोट्या दिमाखाच्या भरी काय पडला आहेस ? तू आपला थोरपणा बाजूला ठेव.।।३।।
*ज्ञानदातासद्गुरु श्रीतुकाराममहाराज* म्हणतात, तुझी पुढे फार मोठी हानी होणार असल्याचे मला दिसत आहे म्हणून मी तुला बोलून फजित करीत आहे.।।४।।